haldi kanku chaitra gauriche in Marathi Women Focused by Vrishali Gotkhindikar books and stories PDF | हळदी कुंकू चैत्र गौरीचे

Featured Books
  • ماسک

    نیا نیا شہر نئی امیدیں لے کر آیا ہے۔ دل کو سکون اور سکون ملا...

  • Wheshat he Wheshat - 5

    وحشت ہی وحشت (قسط نمبر 5)(بھیڑیے کا عروج: )​تیمور کاظمی صرف...

  • Wheshat he Wheshat - 4

         وحشت ہی وحشت(قسط نمبر( 4)جب تیمور گھر میں داخل ہوا، تو...

  • Wheshat he Wheshat - 3

    وحشت ہی وحشت( قسط نمبر (3)(منظر کشی :)رات کا وقت تھا، بارش ک...

  • Wheshat he Wheshat - 2

         وحشت ہی وحشت قسط نمبر (2)   تایا ابو جو کبھی اس کے لیے...

Categories
Share

हळदी कुंकू चैत्र गौरीचे

हळदी कुंकू चैत्र गौरीचे

चैत्र महिन्याची चाहूल देणारा पाडवा संपला की या हळदी कुंकवाचे वेध सुरू होत

हे हळदी कुंकू चैत्र शुद्ध तृतीये पासून अक्षय तृतीये पर्यन्त कधीही एखाद्या मंगळवारी शुक्रवारी अथवा रविवारी केले जात असे .गौरीला सौभाग्याचे “दान “मागणे तसेच घरात सुबत्ता तसेच मुलांचे सुखसमाधान हा याचा हेतु असायचा

तसेच पूर्वीच्या काळी नोकरी धंदा वा इतर कोणत्याच कारणा साठी बायका फारशा घराबाहेर पडत नसत .

त्यामुळे हे हळदी कुंकू केल्याने त्या निमित्ताने बायका आपल्या घरी येतील थोड्या गुज गोष्टी होतील

हा पण हेतु असे .

आमच्या घरी एकत्र कुटुंब होते .गावात दहा बारा खोल्यांचा मोठा वाडा होता .

माझे तीन काका काकू सहा सात चुलत भावंडे माझे आई वडील ,आम्ही दोन भावंडे ,आजी आजोबा ,

शिवाय काकुच्या भावाची आणि माझ्या पण मावशी व मामाची मुले शिकायला खेड्यातून येवून आमच्या घरी रहात

असत .अशी कमीत कमी 25 माणसे आमच्या घरात होती .शिवाय कारणाने आला गेलेला आणि राहिलेला पाहुणा वेगळाच ... तेव्हा जवळ पास प्रत्येक घरी एकत्र कुटुंब असल्याने थोड्या फार फरकाने घरात खूप माणसे असायची

चैत्र शुद्ध तृतीयेला एका छोट्या झोपाळ्या वर आजी गौर बसवत असे .

. गौरी ला हिरवे वस्त्र नेसवून हळदी कुंकु लावून तिची पुजा केली जात असे .मोगर्‍याचा गजरा तिला माळून ओटी भरली जायची खण नारळाने !!.नैवेद्य म्हणुन तिच्यासाठी खास कोरडे खोबरे आणि गुळ याच्या करंज्या तसेच गव्हलयाची खीर असे .हा एका विशिष्ट प्रकारचा प्रसाद सर्वांना आवडत असे .त्यामुळे जेवणात पण तेच असे .

आम्ही मुले खूप ताव मारीत असु त्या पक्वान्न वर ,..

रामनवमी झाली की आजीच्या देखरेखीखाली समस्त महिला वर्गाची एक बैठक जमत असे !

एकमेकांच्या विचाराने मग सात आठ दिवसात हळदी कुंकू करायचे ठरवले जाई.हा निर्णय आम्हा मुलांना समजताच

आम्ही हुररे म्हणून घर डोक्यावर घेत असू !!

आता तयारी सुरू होई ...

सर्वप्रथम दुसर्‍या दिवशी सकाळी पूजा झाल्यावर आजी दोन गोल मातीच्या

पसरट भांड्यात माती घालून एकात गहू आणि एकात मोहोरी पेरून देत असे .म्हणजे आठ दिवसात त्यांची रोपे होत असत .सगळ्यात पहिल्यांदा बायकांची तयारी सुरू होई. आई, काकू ,आणि आजी, आपल्या जवळ कोणत्या साड्या कोणते दागिने आहेत आणि त्यातली कोणती नेसायची हे ठरवत असत .एकमेकीना दाखवून ते फायनल झाले की मग आम्हा मुलींचे परकर पोलके आणि फ्रॉक यांची तयारी सुरू होत असे .घरच्या शिंप्या कडे आमचे कपडे शिवायला

दिले जायचे ते पण चार दिवसात शिवून द्यायच्या बोलीवर ....आम्ही मुली खुश होवून जात असू .मुलांना मात्र कपडे वगैरे यात फारशी रुचि नसे .त्या दिवशी मित्र गोळा करून काय धुडगूस घालायचा हेच त्यांचे प्लान असत !!

मोठी काकू आणि आई आता फराळाच्या तयारीला लागत . चकली ,लाडू .करंजी ,

शंकरपाळी ,खोबरे वडी हे सारे पदार्थ गौरी पुढे ठेवायचे असत .घरात खूप लोक असल्याने फराळ तयार करायला दोन तीन दिवस लागत .शिवाय हळदी कुंकू होई पर्यन्त मुलांच्या नजरे पासून हे पदार्थ दूर ठेवणे हे तर एक मोठे काम असायचे ना !

मधली काकु सर्व तयारी आणी देखरेख करीत असे आणी त्या दिवशीची दारात काढली जाणारी मोठी रांगोळी ही तीची खासियत असे.!! गौरीची सर्व सजावट आणी तीच्या पुढची रांगोळी तसेच चैत्रांगण काढणे ही कामे धाकट्या काकु कडे असायची. हळू हळु हळदी कुंकू एक दिवसावर यायचे .

आदल्या दिवशी पुर्ण गल्ली तसेच

नातेवाईक यांचेकडे निमंत्रण करणे ही कामे आम्हा मुली कडे असायची

.मोलकरणी नेहेमी दारावर अन्न मागायला येणार्‍या बायका यांना सुध्धा हळदी कुंकवाला बोलावणे असे .

हळदी कुंकवाच्या दिवशी सकाळी गौरीला पुरणपोळी मसालेभात असा नैवेद्य दाखवला जायचा.सवाष्ण ब्राम्हण तसेच एक कुवारीण पण जेवायला बोलावली जाई

.दुपारी थोडी विश्रांति झाली की तयारीला सुरवात होई.

हळदी कुंकू सोप्यात केले जात असे .

सोपा खुप मोठा असे.त्यावर मोठमोठ्या सतरंज्या घातल्या जात असत॰

आता भिंतीशी टेकुन मध्यभागी पायर्‍या पायर्‍यांची रचना केली जायची

जेणे करून सजावटीचे सर्व काही पायर्‍यावर ठेवले जावे ...

सर्वात उच्च स्थानी मध्यभागी देवघरातली “गौर “आणून बसवली जायची .

फुले गजरे घालून मखर केलेले असायचे

एका पायरीवर सर्व प्रकारची फळे काचेच्या सुंदर डिशमधून मांडली जायची.

दुसर्‍या पायरीवर केलेले सर्व फराळाचे पदार्थ विराजमान व्हायचे.

तिसर्‍या पायरीवर घरात असलेल्या शोभेच्या वस्तु येवून बसत.ज्या नेहेमी काचेच्या कपाटात असायच्या.

चौथ्या पायरीवर परंपरागत सजावट जसे की....

छोट्या गडूवर हीरवीगार कैरी ठेवून त्याला लाल कुंकवाची चोच तयार करणे!!

.काचेच्या ग्लासेस मधून रंगीत पाणी भरून ठेवणे.

स्टील च्या तांब्यावर नारळ ठेवून त्याला हिरवीगार कुंची घालुन बाळ बनवणे.

आणि आठ दिवसा पूर्वी आजीने लावलेले धान्य आता चांगले फुट भर उंच झालेले असे .

त्याची नाजुक कोवळी पालवी मनाला मोह घालत असे

ती मातीची भांडी पायर्‍यावर आणून ठेवली जात ...

संपूर्ण पायर्‍या वर कडेने मोगर्‍याचे गजरे सोडलेले असत.

थोडक्यात पर्यावरण, रंग, सुगंध, कोटुंबिक प्रसंग या सर्वाचे भान सजावटीत असायचे.!!

संपूर्ण घरादाराची हौस त्या सजावटीत दिसून येत असे .

आता समोर सुंदर मोठी रांगोळी आणी सुबक” चैत्रांगण” काकु काढत असे .

सजावट आणी रांगोळी यात आम्हा मुलांची लुडबूड कम मदत चालू असे

स्वयपाक घरात आई आजी आणी मोठी काकु यांची तयारी चालुच असे .

काल रात्री ओटीचे हरबरे भिजत घातलेले ते उपसून ठेवायचे.

ओली हरबरा डाळ पाण्यातून उपसून ती वाटून त्यात किसलेली कैरी घालुन कैरीची डाळ केली जायची .

त्या काळी मिक्सर नसे .ही डाळ पाट्यावर वाटली जायची

मग मदतीला मोलकरीण अथवा आईची मैत्रीण किंवा एक दोन शेजारणी पण असत

त्याच वेळी उकडलेली कैरी पाण्यात विरघळून त्यात गुळ, मीठ ,केशर, घालुन केलेले पन्हे

माठात थंड होण्यासाठी ठेवले जायचे .त्याकाळी फ्रीज, बर्फ वगैरे नसायचे

त्यामुळे माठाचा वापर जास्त..

पन्हे देण्यासाठी स्टील ची फुलपात्रे दिली जात .

आणी कैरीची डाळ देण्या साठी पळसाच्या पानांचे द्रोण असत.

सुवासिनी साठी मोगर्‍याचे गजरे ओल्या फडक्यात गुंडाळून ठेवलेले असत.

बाहेर हळदी कुंकु ,गुलाब दाणी अत्तर दाणी ,अशी आम्ही पण जय्यत तयारी

करीत असु . ही सर्व तयारी झाल्यावर आम्ही मुली आणी बायका छान सजून नटून तयार होवून आमंत्रित

बायकांची वाट पहायला लागत असु

हळू हळु बायका मुली घरी यायला सुरुवात होई .

आणी मग सारे घर हास्य विनोद गप्पानी भरून जाई

.बायकांनी नेसलेल्या कोर्‍या वस्त्रांचे सुवास..केशरी पंहया चा आकर्षक सुगंध .कैरीच्या डाळी

मधील कच्या कैरीचा गंध ...मोगर्‍याच्या गजर्‍याचे मादक वास …अत्तर गुलाबाची महक ...

घर पुरेच्या पुरे गजबजून जाई !!!!

सर्व काकु,आणि आई कामात दंग असत..

आम्ही मुली पुर्ण मदत करीत असु त्यांना.....

आजीची पुर्ण देखभाल असे ..प्रत्येक बाईला हळदी कुंकू ..डाळ ..पन्हे मिळाले का..

आम्ही मुलींनी त्यांना अत्तर गुलाब दिले का ?

त्यांच्या ओट्या भरल्या का ?

बायका पण आनंदाने सर्वाचा आस्वाद घेवून तारीफ करीत.

.एकमेकीत सुख दुखाच्या आणि इतर गप्पा झाल्या की बायका जायला निघत .

जाताना प्रत्येक जण आजीला नमस्कार करून आशीर्वाद घेत असत .

आजी पण प्रत्येकीची आपुलकीने विचारपूस करीत असे .

अशा रीतीने संध्याकाळ टळून जात असे आणि कार्यक्रम समाप्तीला येई

आता आमच्यात .. कोण आले कोण राहिले याची चर्चा होई .

बायका येवून गेल्या की आता हळुहळू बाहेरचा पुरुष वर्ग अंगणातून आत येई .

आत्तापर्यंत चे बायकांचे राज्य संपुन आता बाबा , काका, त्यांचे मित्र ,शेजारी, पाजारी, आमच्या भावांचे मित्र

घरात गोळा होत असत .

या वेळ पर्यन्त त्यांना घरात नो एंट्री असे .पण आता मात्र मैदान खुल्ले असे .

मोठमोठ्या आवाजात पुरूषांचे बोलणे आणि हसणे याने सर्व घर दणाणून ..जाई !!

त्यांना कैरीची डाळ ,पन्हे दिले जाई

त्यांच्या साठी खास ओल्या हरबर्याची मसालेदार उसळ केली जाई !!

अशा रीतीने एक एक जण खाणे पिणे झाले की निरोप घेवून निघून जाई ..

आणि हळदी कुंकू कार्यक्रम समापन्न होत असे .

आम्ही सर्व खूप दमलेलो असलो तरी मनात अपार समाधान असे !!1

आणि पुढल्या वर्षी हळदी कुंकू साठी काय काय नवीन करायचे याचे बेत त्याच बैठकीत सुरू होत ..

आता एकत्र कुटुंब फारशी अस्तीत्वात नाहीत .

हळदी कुंकू कार्यक्रम खूप कमी घरात केला जातो

आमच्या लहान पणीच्या या हळदी कुंकू कार्यक्रमाची सर कशालाच नाही येणार !!!

वृषाली गोटखिंडीकर