साइको in Marathi Horror Stories by Sanjay Kamble books and stories PDF | सायको

Featured Books
Categories
Share

सायको


    
सायको

By Sanjay Kamble

            शहरापासून थोडं दूर आपलं पॅसेंजर सोडून शेखरन पुन्हा आपली टॅक्सी शहराच्या दिशेने वळवली.



 ***





रात्रीची वेळ, ओस पडलेला रस्ता, त्यातच मंद सुटलेला वारा आणि भुरभुरणारा पाऊस एकंदरीत छान वातावरण होतं.. दिवसभर चांगली कमाई झाल्याने आता घरचा रस्ता धरला असला तरी जाताजाता एखादं भाडं मिळालं तरी नकारायच नाही या विचारात अगदी सामान्य वेगात टॅक्सी चालवत होता..शहर आणि आजुबाजुच्या परिसराला जोडणा-या नदीच्या पुलावरून जात असताना हेडलाईटच्या प्रकाशात पुलाशेजारी एका बाजूला त्याला एक तरुणी एका जाड बैगेसोबत काहीतरी करत असल्याच लक्षात आल. जमीनीवर ठेवलेली ती बॅग पुलावरून खाली नदीच्या पाण्यात फेकायच्या विचारात होती की वर खेचत होती हे समजत नव्हतं. तिला पाहत तसाच पुढे जात मनात विचार आला आणि त्यान आपली टॅक्सी थांबवली. खिडकीतून मान किंचित बाहेर काढून रिव्हर्स मध्ये पुन्हा मागे घेत तिच्या शेजारी येऊन त्याची टॅक्सी थांबली..

" हैलो मॅडम, कुठं जायचं आहे ?"

शेखर चा आवाज ऐकताच ती तरुणी काहीशी गोंधळली.. बैग सोडून ती झटकन उभी राहिली आणि काहीशी अडखळत म्हणाली

" अं... कु.. कुठं नाही... अ.. हां... हो . समृद्धी अपार्टमेंट.''

तिची गोंधळलेली ती अवस्था पाहून शेखर आपल्या टॅक्सीतून खाली उतरत म्हणाला.

" थांबा, तुमची बॅग मी गाडीच्या डिकीत ठेवतो.."
म्हणत शेखर न बॅग सहज उचलायचा प्रयत्न केला पण ती बॅग तर उचलनं दूर, ती बैग जागची हलत देखील नव्हती... बैगेकड पहात तो म्हणाला.

" अहो मॅडम सगळं साहित्य एकाच बॅगमध्ये भरण्यापेक्षा आणखी एक बॅग केली असती तर तुम्हाला पण आणि मला पण इतका त्रास झाला नसता.."

 इतकं बोलून शेखर स्वतःच केलेल्या विनोदावर खळखळून हसला पण ती तरुणी मात्र गंभीरपणे त्याच्याकडे पाहत तशीच उभी राहिली.. यावेळी मात्र काहीच न बोलता शेखरनं ती बॅग जोर लावून उचलत गाडीच्या डिकीत ठेवली आणि दोघांचा प्रवास सुरू झाला.





****


ती तरूणी खूपच घाबरी घुबरी झालेली,.समोर लावलेल्या आरशात तिरकस नजरेनं तिची अवस्था पाहून विचारलं.

" इतक्या उशिरा येत आहात ..? कुठे फिरायला गेला होता की आता जात आहात.?"

" फिरायला नाही जात.. आता आली आहे."


''शहरात काय परिस्थिती सुरू आहे आणि तरीही इतक्या रात्री बाहेर पडलाय.. ?"

" शहरातली परिस्थिती .? म्हणजे.? काय झालं ?"

" म्हणजे, तुम्हाला अजून माहिती नाही.?"

" नाही, म्हणजे मी इथली नाही.."

" तरीच... अहो शहरात एक माथेफिरू खुनी मोकाट सुटलाय. रात्री अपरात्री ड्युटी किंवा प्रवास करून घरी परतणाऱ्या महिला मुलींना एकटं गाठून मदत करण्याच्या हेतूनं विश्वासात घेतो आणि मग.."

त्याच्या चेहऱ्यावर छद्मी हास्य पसरलं... भयभीत नजरेनंं त्याच्याकडे पाहत तीनं विचारलं...

"मग... मग काय...?"

" निर्दयीपणे हत्या... मला तुम्हाला घाबरवायचं नाही...पण कोणावरही विश्वास ठेवू नका.....(समोरच्या आरशातून तिच्या भयभीत नजरेत पाहत अगदी गंभीर आवाजात म्हणाला..) अगदी माझ्यावर देखील."

तीची भयभीत नजर खिडकीतून दिसणाऱ्या भयाण काळोखात स्थिरावलेली... तिच्या भेदरलेल्या चेहऱ्याकडे पाहून त्याने पुन्हा विचारलं..

" काय झालं..? असला विचार करताय.."

"शहरात एक असा सायको खूनी बिनदिक्कत फिरतोय आणि पोलीस त्याला अजुनही पकडू शकले नाहीत..!"

 गाडीच्या डॅशबोर्ड वर ठेवलेलं वर्तमानपत्र त्या मुलीच्या हातात देत म्हणाला...

" पहिल्याच पानावरची खाली कोपऱ्यातली बातमी वाचा... संशयित आरोपी म्हणून आजवर ज्या चौघांना पकडल ते तुरुंगात असताना आणखी एक मुलगी बेपत्ता झाली आहे. म्हणजे तो खूनी अजूनही मोकाट फिरतोय.( म्हणत हाताने आरसा काहीसा फिरवत तीचं शरिर न्याहाळत पुन्हा आरसा चेहऱ्यावर स्थिर करून म्हणाला..) आणि आपलं सावज शोधतोय...


      समोर लावलेल्या आरशातून त्या तरूणीकडे पहात त्यानं विचारलं,
" इतक्या उशिरा येण्यापेक्षा लवकर बाहेर पडायचं ना.."

" खरंतर मी या शहरात नोकरी शोधण्यासाठी भटकतेय मागच्या अनेक दिवसांपासून..."

" मग या शहरात तुमचे कोणी नातेवाईक मित्र मैत्रिणी वगैरे आहेत का?"

"बाकी कोणी नाही. पण हा, एक मित्र आहे... नाही , म्हणजे होता... नाही आहे.."

" होता की आहे..? नक्की काय म्हणायचं आहे तुम्हाला... तुमचा त्याच्या सोबत काही वाद झालय का..? किंवा त्याची तुमच्याशी मैत्री होती पण आता त्याच्याशी मैत्री ठेवायची नाही म्हणजे दोघांचं भांडण झालं, असंच ना..?"

शेखरच बोलणं ऐकून ती तरुणी किंचित हसून म्हणाली

" असंच काहीसं समज.. आधी विश्वास जिंकायचा आणि मग विश्वासघात करायचा... जगात हेच सुरू आहे... पण माझ्याशी विश्वासघात करणा-यांना मी सोडत नाही.."

तिचं बोलणं ऐकून शेखर गमतीने म्हणाला.

" जरा रागीटच दिसताय. बाकी विश्वासघात करणा-यांसोबत काय करताय बरं..?"

ती काहीशी गंभीर स्वरात सांगू लागली.

" मी लहान असतानाची गोष्ट आहे. आम्ही सर्व लहान मुलं एका जुन्या पडक्या वाड्याच्या अंगणात आंधळी कोशिंबीर खेळत होतो. माझ्यावर डाव आला, डोळ्यावर पट्टी बांधली गेली. गोल गोल फिरवत मला कुठंतरी नेऊ लागले.. सारं काही शांत झालं.. कोणाचाच आवाज येईना.. मी तशीच कोणी सापडते का पाहत राहिले पण कुणीच हाताला लागत नव्हतं म्हणून मी डोळ्यांवर बांधलेली पट्टी उघडली आणि हादरून गेले.. मी त्याच पडक्या वाड्याच्या तळघरातील अंधा-या खोलीत होते आणि बाहेरून दरवाजा बंद करून सर्व पळून गेलेले. त्या अंधाऱ्या खोलीत मी एकटी आहे हे कळल्यावर मी खूप घाबरले. रडले , ओरडले किंचाळले पण कोणीच मला तिथुन बाहेर नाही काढलं. कशीबशी मागील पडक्या भिंतीला लाथा मारून बाहेर पडण्यापुरती जागा केली आणि बाहेर पडले . घरी आल्यावर माझ्या मित्रांना जाब विचारला पण त्यांनी सांगितले की आम्ही नाही तर गल्लीत रहाणा-या 'त्या' खोडकर मुलानं तुला वाड्यात कोंडून ठेवलं होतं...या घटनेनंतर पुन्हा त्या मुलाने एका मुलीला झाडाच्या उंच फांदीला अडकवलं.. आम्ही सर्व ओरडून त्याला विरोध करत राहिलो पण तो तीला तसच ठेवून पळून गेला.. ती मुलगी खाली पडली आणि तीचा पाय फ्रॅक्चर झाला..."

तीच बोलणं ऐकून शेखर किंचित हासून म्हणाला.

" लहानपण असंच खोडकर असतं. पण त्यानं ही असं नाही करायचं. मस्करी जिवावर बेतेल असं करू नये... बाकी तुम्ही धाडशी निघालात हं. आज या गोष्टी आठवल्या तरी त्या मुलाला देखील हासु येत असेल ना."

" नाही... कारण एकदा स्कुलबसने घरी येताना तो बसमधून खाली पडला आणि मागुन आलेल्या वहानाची धडक बसली..."

" अरे रे. त्या अपघातात त्याला काही लागलं का.?"

 
शेखरच बोलणं ऐकून ती किंचीत हसून म्हणाली.

" हो...काही दिवसांनी संपला....तुझ्या प्रमाणं सगळ्याच लोकांना तो एक अपघात वाटला."

" अपघात वाटला म्हणजे...?"

काहीच नं बोलत खिडकीतून बाहेर पसरलेल्या मिट्ट काळोखात पहाताना तिच्या चेहऱ्यावर एक क्रूर हास्य पसरलेलं.. पण तीनं सांगितलेला एक एक शब्द ऐकून शेखरच्या अंगावर सरसरून काटा आलेला. अगदी निशब्द पणे तो गाडीच स्टेअरिंग सांभाळून समोरच्या निर्मनुष्य रस्त्याकडे पहात होता. मघापासून गंमतीने बोलणा-या शेखरला एकदम शांत झालेलं पाहून ती म्हणाली.

" काय झालं, भीती वाटतेय का..?"

" भीती ? म... मला... मला भीती का वाटावी..?"

"हो तुला भीती का वाटावी ना. एक अबला , एकटी हतबल मुलगी करू काय शकते.?"

शेखर न कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही हे पाहून ती पुन्हा म्हणाली.

" काय झालं. मी बरोबर बोलतेय ना. मध्यरात्रीची वेळ, निर्जन निर्मनुष्य रस्ता, एकटी मुलगी तुझ्या सारख्या ताकदीनं कितीतरी पटीने अधिक असलेल्या पुरूषाच कारू काय शकते."

शेखर काहीच न बोलता शांतपणे गाडी चालवत होता वर लावलेल्या काचेतून शेखरचा गंभीर झालेला चेहरा पहात ती पुन्हा म्हणाली.
" त्याला देखील असंच वाटलं होतं."

तीचा गंभीर आवाज ऐकून शेखरन विचारलं.

" त्याला कोणाला...?"

" तोच ज्याच्या विश्वासावर मी इतक्या दूर नोकरीसाठी आले होते... मला वाटलेल तो चांगला मित्र आहे. माझी मदत करेल. पण त्याचा हेतू वेगळाच निघाला.."

" म्हणजे काय झालं...?"

समोरच्या त्या आरशातून शेखरकडे पहात तीनं मोबाईल स्क्रीनवर एका तरूणाचा फोटो उघडला आणि त्याला दाखवत म्हणाली.
" सोशल मीडियावर आमची ओळख झालेली... खुपचं रूबाबदार, देखणा आणि पहाताक्षणी मनात भरेल असा तो. आमची खुप छान मैत्री झाली आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. मी जॉब शोधतेय हे त्याला सांगितलं होतं. त्यानं मला एका आयटी कंपनीत नोकरीला लावततो म्हणून बोलवलं... काही दिवस सोबत राहीलो... आणि मग..." 

तीच्या चेहऱ्यावर उमटलेले त्रासिक भाव पाहून त्यानं गंभीर आवाजात विचारलं...

"मग...?"

किंचित हसून ती म्हणाली..

 " त्याला वाटलं होतं की या अनोळखी शहरात ही एकटी मुलगी, ना कोणी नातेवाईक, ना कोणी दुसर मित्र मैत्रिणी, ही माझं काय बिघडवणार नाही.... पण."

     इतकं बोलून ती मंद हसत गाडीच्या किंचित उघड्या खिडकीतून बाहेरच्या मीट्ट काळोखात पाहू लागली. वातावरण अधिकाधिक गंभीर बनत चाललं होतं. शेखर काहीसा अस्वस्थ झालेला आणि त्याची ही अस्वस्थता त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. आपली नजर किंचित तिरकी करत त्यानं समोरच्या आरशात पाहिलं तर ती तरुणी अगदी शांत पणे बाहेरचा तो निर्मनुष्य ओसाड परिसर पहात बसून होती.तीला पहाताना शेखरच्या मनात असंख्य विचार घुटमळू लागले.

' ही पोरगी मला जरा सायकोच वाटते.. एका शुल्लक कारणावरून हीन लहानपणी आपल्या मित्राचा अपघात घडवून त्याला जिवानिशी संपवलं. आणि आता या मित्रासोबत काय केलं असेल..? याला देखील ठारच केलं असणार. ही वाटतेच तितकी विचित्र. बरोबर, आता लक्षात आलं. तीची बैग इतकी जड का आहे. या सायको मुलीनं आपल्या या मित्राला देखील ठार केलय आणि त्याचं प्रेत त्या बैगेत कोंबलय. म्हणजे मघाशी त्या पुलावर ती प्रेत लपवलेली बैग नदीच्या पाण्यात फेकायला आलेली. मला पहाताच ती दचकली कारण तीचा प्लान फसला...'

विचार करतच शेखर न वर लावलेल्या आरशातून तिच्या कड पाहील तर ती अगदी निःसंकोचपणे बसुन होती.. त्यानं आपली नजर समोरच्या ओसाड रस्त्याकडे वळवली आणि मनात म्हणाला..

' असं वाटतंय टॅक्सी थेट पोलिस स्टेशनमध्ये न्यावी आणि या सायको मुलीचं सारं पितळ उघडं करावं पण ही इतकी कपटी वाटतेय की तीच्या मित्राच्या खुनात मला पोलिसात अडकवेल.'

 " कसला विचार करतोयस..?"

तीचा शांत धीरगंभीर आवाज कानावर पडला आणि शेखर आपल्या विचारातून बाहेर आला.

" अं... न... नाही..काही नाही.."

" तुझ्या आवाजात कसलीशी भीती, अस्वस्थता जाणवतेय."

तीच बोलणं ऐकून शेखर स्वताला सावरतच म्हणाला.

" भ..भीती... मला... नाही हो.."

" ठीक आहे. अपार्टमेंट आली आहे. गेटमधून आत घे."

शेखर न त्या अपार्टमेंट कडे नजर टाकली आणि गाडी गेटमधून आत घेतली. रात्रीचा एक वाजला होता त्यामुळं कोणी जाग असेल ही अपेक्षा व्यर्थ होती. वॉचमन च्या केबिन वर नजर टाकली तर तीथं वॉचमन नावाचा प्रकार असेल यावरूनच विश्वास उडाला. एका रिकाम्या जागी टॅक्सी थांबवत शेखर खाली उतरला आणि गाडीच्या मागे जात डिक्की उघडत त्या बैगवर नजर टाकली. क्षणभर तो त्या बैगला निरखून पाहू लागला. कदाचित त्या बैगेत काही हालचाल होते का किंवा कुठे आजूबाजूला रक्ताचे डाग दिसतात का हे बारकाईने न्याहाळत होता. पण तीची नजर आपल्यावरच खिळली आहे हे लक्षात येताच त्यान डिक्कीतून ती बैग उचलून जमीनीवर किंचित आपटलीच...हे पाहून ती मुलगी काहीशी रागातच म्हणाली

" अरे सावकाश ठेव ना. आपटतोस काय..?"

तीच्या तोंडातून बाहेर पडलेले शब्द ऐकताच शेखर किंचित हासून पण संशयित नजरेने बैगेकडे पहात म्हणाला.

" तुम्ही तर अशा घाबरताय जसं बैगेत साहित्य नाही तर माणूस आहे आणि बैग आपटल्यानं त्याच्या डोकंबिक फुटेल"

 पण त्यावर प्रतिक्रिया न देता ती तरुणी म्हणाली.

" अरे यार, माझ्या मोबाईल ची बॅटरी संपलीये, तुमचा फोन देता का प्लीज.."

शेखर चा नाईलाज झालेला. काही न बोलता त्यानं मोबाईल च लॉक काढलं आणि मोबाईल तीच्या हातात दिला. एक नंबर डायल करून ती काही अंतरावर उभी फोनवर बोलू लागली तसा शेखर मात्र टॅक्सी मधे येऊन बसला आणि काही अंतरावर पाठमोऱ्या उभ्या त्या तरूणीच्या हलचाली बारकाईन पाहू लागला... काहीशी निराश होऊन ती टॅक्सी जवळ आली. मोबाईल शेखरच्या हाती देऊन विनंतीच्या स्वरात म्हणाली.

    " माझी मैत्रीण फोन उचलत नाही. कदाचित गाढ झोपली असावी. आणि इतकी जड बैग तिसऱ्या मजल्यावर न्यायची म्हणजे.."

शेखर चा नाईलाज झालेला. मोबाईल खिशात सरकवत ती जड बैग कशीबशी उचलून अपार्टमेंट च्या दिशेनं चालू लागला...

दोघेही लिफ्टमधे शिरले...पण दोघेही निशब्द होते. शेखरला देखील लवकरात लवकर तिथून निघायचं होतं... लिफ्ट थांबली... दोघेही बाहेर पडले आणि रिकाम्या व्हरांड्यातून चालू लागले... एका खोलीजवळ जात ती तरुणी थांबली आणि पैसे देण्यासाठी आपली पर्स पाहू लागली. 

" अरे देवा. पर्स खाली टॅक्सीतच राहीली वाटतं.. प्लिज माझी पर्स घेऊन येता का....."

आता मात्र त्याला काहीसा रागच आला, तिच्याकड संशयित नजरेने पाहत शेखर म्हणाला...
" मघाशी म्हणालात या शहरात तुमची कोणी नातेवाईक किंवा मैत्रिणीही नाही आणि आता मैत्रीण तयार झाली... ही इतकी जड बैग.. नक्की काय चाललंय तुमचं."

शेखरच बोलणं ऐकून ती काहीशी गोंधळली...

" अहो बैग माझी आहे मग तुम्ही का घाबरताय..? पळून नाही जात..‌ पैसे पर्समधे आहेत आणि पर्स तुमच्या गाडीत आहे... हवी तर मी पर्स घेऊन येते.. तुम्ही इथं थांबा..." 

शेखर नं क्षणभर विचार केला... 

' मला इथंच टाकून ही पळून जाऊ शकते..'

" नको.. तुम्ही इथं थांबा.. मी पर्स घेऊन येतो.."

शेखर लिफ्टच्या दिशेने चालू लागला तशी तीनं दरवाजाची बेल वाजवली... लिफ्ट मध्ये जात शेखरनं पुन्हा तिच्याकडं पाहिलं तर ती तशीच दरवाजा समोर उभी होती..

 बराच वेळ गाडीत शोधाशोध करून देखील पर्स भेटली नाही... आता मात्र त्याचा‌ पारा चांगलाच चढलेला... आपल्या गाडीचा दरवाजा रागातच बंद करून तो लिफ्टच्या दिशेने निघाला... दोन तीन वेळा बटन दाबलं आणि तसाच उभा राहिला तोच सायरन करत पोलीस व्हॅन गेटमधून आत आल्याच लक्षात आलं... त्यानं आणखी एकदा लिफ्ट च बटन दाबल एव्हाना एक सब इन्स्पेक्टर आणि दोन कॉन्स्टेबल गाडीतून उतरून त्याच्या दिशेन धावत येत असल्याच जाणवलं आणि मागे लिफ्ट चा दरवाजा उघडला... सबइन्स्पेक्टर नी शेखरच्या दिशेने पिस्तूल रोखलं..

" जागचा हालशील तर गोळ्या घालीन...''

आता मात्र शेखरचा धीर सुटला... ते शब्द ऐकून त्याच्या हाता पायातली शक्तीच संपली.... भीतीनं क्षणातच त्याचा घसा कोरडा झाला. आणि एकामागून एक विचार डोक्यात घुमायला लागले.

' त्या सायको तरूणी नं मला पद्धतशीरपणे अडकवलय, मघाशी माझ्या मोबाईलवरून तीनं आपल्या मैत्रीणीला नाही तर पोलिसांना फोन केला होता.. च्यायला कुठं दुर्बुद्धी सुचली आणि चार पैशासाठी हीला बघून टॅक्सी थांबवली.' 

एक कॉन्स्टेबल जवळ येत म्हणाला

" तीथं भींतीजवळ उभा रहा."

"हवालदार , बैगची झडती घ्या.."

इन्स्पेक्टर साहेबांचे करड्या आवाजातील ते शब्द ऐकून शेखर हतबल झाल्यासारखाा भिंती शेजारी उभा राहीला.. एव्हाना आजुबाजूच्या फ्लॅट मधील काही लोग आपापल्या अर्धवट उघड्या दरवाजातून बाहेर पाहू लागले. तसा एक कॉन्स्टेबल पुढ आला आणि लिफ्टच्या आत असलेल्या त्या मोठ्या बैगची चेन खेचायला सुरवात केली... शेखरनं तिरकस नजरेनं मागे पहाण्याचा प्रयत्न केला तशी पोलिसांच्या आडून तीच बॅग लिफ्टच्या आत दिसली.. त्याचं डोकं सुन्न झालं.. 

'काही वेळापूर्वी मी स्वत: तिसऱ्या मजल्यावरील त्या रूम बाहेर ठेवलेली ही बॅग पुन्हा लिफ्ट मध्ये कशी आली... म्हणजे शेवटी त्या सायको पोरीनं मला अडकवलं..'

 आणि सर्व उपस्थितांच्या नजरा त्या बैगेवर स्थिरावल्या, शेखर तर धीर सुटल्यासारखा फक्त पहात होता. चेन हळूहळू सरकवत बैग उघडली आणि शेखरची भीती खरी ठरली. बॅगेत एक प्रेत होतं. कॉन्स्टेबलच्या आडून नीट दिसत नसलं तरी डार्क नीळ्या जीन्स मधले पाय तरी स्पष्ट दिसत होते ते पाहून शेखर स्तब्धच झाला. डोळे बंद करून भिंतीवर डोकं टेकलं तसा इन्स्पेक्टर साहेबांचा करडा आवाज त्याच्या कानावर पडला.

" शेवटी सापडलासच... खून करून ते प्रेत या बॅगमध्ये कोंबून प्रेताची विल्हेवाटट लावायला जात होतास ना..? मागिल सहा महिन्यांत हा चौथा खून... पॅटर्न सेम. फक्त प्रेतं फेकण्याची जागा वेगवेगळी.. आजवर वाचलास. पण आज प्रेताची विल्हेवाट लावायला जाताना रंगेहाथ सापडलास. तुझ्या सारख्या सायको किलरला आता फासावरच लटकवणार." 

ते शब्द ऐकून शेखरचा धीर सुटला.. हात जोडून गयावया करत त्यानं इन्स्पेक्टर साहेबांकड पाहिलं तर त्यांची नजर त्याच लिफ्ट मध्ये एका कोपऱ्यात स्तब्धपणे उभ्या तरूणावर होती... तीशीतील तो तरूण खुपचं देखणा रूबाबदार होता.. आणि झटकन त्याला आठवलं... काही वेळापूर्वी आपल्या गाडीत बसलेल्या पॅसेंजर तरुणीने याच तरुणाचा फोटो आपल्याला दाखवला होता... आता पोलिसांनी त्याला अटक केली होती... शेखर कडे पहात इन्स्पेक्टर साहेब म्हणाले.

" तुझ्या मदतीमुळ आम्ही या 'सायको' किलर पर्यंत पोहचू शकलो.. तु फोन केलास आणि आम्ही येईपर्यंत याच्यावर पाळत ठेवलीस... बाकी काळजी करू नकोस.. या प्रकरणात तुला पोलिसांचा कसलाही त्रास होणार नाही याची काळजी घेऊ.. "
 
काय चाललंय हे शेखरला समजेनास झालेलं.. तो विचारात पडला,
'मी कधी फोन केला होता.? फोन तर त्या तरूणीने.. म्हणजे तीनं हे प्रकरण बाहेर काढलं. साहेबांना सांगायला हवं की तुमची मदत त्या तरूणीने केलीये. मी उगाच तिच्या वर संशय घेत होतो.'

 शेखर काही बोलणार तोच त्या बैगेशेजारी बसलेले कॉन्स्टेबल बाजूला झाले आणि बैगेत ठेवलेला मृतदेह शेखरला दिसला... मृतदेह त्याच तरूणीचा होता जी शेखरला इथवर घेऊन आलेली... आणि शेखरच्या कानात पाठीमागून ती कुजबुजली.

' विश्वासघात करणा-यांना मी सोडत नाही. काही झालं तरी..'

समाप्त.