कथेचा उद्देश फक्त मनोरंजन आहे . कोणत्याही अंधश्रद्धेला प्रोत्साहन देण्याचा माझा कोणताच हेतू नाही.
कथेत भीती मांडण्याचा प्रयत्न केला आहे, त्यापलेकडे काहीही नाही...
धन्यवाद 🙏 👍 🙏 🙏
कार हलकासा आवाज करत रस्ता कापत होती . अवतीभोवती दाट अंधार दुतर्फा झाडी आणि हा घाट....
रातकिड्यांचे कर्कश ओरडणे कान फाडत होते व अंधारात हलकेसे धुके खेळत होते .
उतारा लागला आणि कार सपकन् घोंगावत पुढे निघाली . धुके हळूच समोरून निघून गेले तोच , एक स्त्री आकृती अचानक कारसमोर उभी ठाकली .... कार चालकाने आपले हात यांत्रिकपणे फिरवले आणि गाडी वेगात समोरील मोठ्या दगडाच्या दिशेने निघून गेली .
समोर एक खड्डा होता आणि गाडीची चाके त्यात पडताच कार धडाडली व तुषार एकदम झोपेतून जागून उठावा तसा गचका खाऊन स्टेरींगवर हात आवळत झोक गेल्यामुळे पुढे सरकला .
डोळे किलकिले करत त्याने समोर पाहिले , एक मोठा दगड जो अगदी रस्त्याच्या कडेला हातभर अंतरावर होता .
तुषारच्या काळजात धस्स झाले आणि वेगात त्याने स्टेअरींग फिरवले . गाडी पुर्ववत काळ्या रस्त्यावर धावू लागली कसरी घाटही मागे पडला....
आवंढा गिळत तुषारने चेहऱ्यावरील घाम पुसला आणि नेमका काय झाले होते , ते तो बारकाईने आठवू लागला .
तोच त्याच्या लक्षात आले गाडीसमोर एखादी बाई उभी ठाकली होती ....
" पण तेव्हा तर माझे डोळे लागले होते ? बहुतेक मी स्वप्नातच एखादी बाई पाहिली असावी आणि नकळत माझ्या हाताने स्टेअरींग फिरवले असेल , जसे अर्ध्या झोपेत असतांना स्वप्नात पायापाशी काही आले की आपण लाथ फिरवतो !"
" छे !"
तुषार मनोमन हसला .... " म्हणजे हे भुत बित नुसती कोरी कल्पना असते तर .... हा घोळ भुताचा नाही झोपेचा होता तर .... झोप उडवावी लागेल .", स्वतःशीच पुटपुटत त्याने मोबाईल काढला व जीबी स्टोरी टेलर ओपन करून कोणती कथा ऐकावी हा विचार करू लागला .
" रुद्रची विनाशणी तर झाली .... काय ते दोघे भाऊ विनाशणीशी लढतात व पावलोपावलावर भीती दरवळते व शेवटचे युद्ध बापरे !
पण आपल्याला भीती वाटत नाही , ह्यावेळेस देवगन कडाळीची मृत्युपर्वा ऐकतो , बघतो काही दम आहे काय ते , रुद्र व नितेश काय करतात ते ?", म्हणत त्याने कथा सुरू करून हेडफोन कानात घातला .
आता रस्त्याच्या आजुबाजुची झाडी विरळ झाली होती आणि काही दुरूनच तुषारच्या गावाचे नाव जे मिल स्टोनवर कोरले होते ते दिसले .
"आयला, गाव आलं! इतका वेळ 'जीबी स्टोरी टेलर' ऐकूनही मला भीतीचा लवलेशही वाटला नाही. कोणीतरी मला घाबरवेल असं वाटत होतं, पण सर्व फुश्श!", तुषार पुटपुटला ....
ह्या तुषार सारखे काही नामचीन असतातच जे कसालाही घाबरत नाहीत , खुपचं भयंकर चित्रपट असो किंवा कथा त्यांना काही फरक पडत नाही , पण तिच जर गोष्ट प्रत्यक्षात जीवावर आली , तर ह्यासारख्या माणसांची काय गत होत असेल ? देव जानो !
" आला...", म्हणत तुषारने आपली कार समोर रस्त्याला फुटणाऱ्या एका फाटावर फिरवली . रस्ता जेमतेम होता चिखलाने भरलेला , खाच खगळे , पाण्याने भरून राहिलेले डबके आणि रस्त्यापासून काहीच अंतरावर एक टपरी होती .
" झोप येतेय खुप , जसे त्या घाटावर हलक्या झोपेत ती बाई आली होती , तसे हे मृत्युपर्वा कथेतील काला शिसू, मासंदी किंवा डाकिणी येवू नये , नाहीतर छोटासा प्रवास यमसदनी पोहचवायचा नाही .", म्हणत तुषारने कार , थोड्या अंतरावर पार्क केली .
मोबाईलमध्ये रात्रीचे साडे एक वाजले होते , एवढ्या रात्री एखादी चहाची टपरी उघडी आहे व दोनजण बाहेर बाकड्यावर बसून चहाही पित आहेत हे पाहून तुषारच्या सिक्स सेन्स ने त्याला धोक्याची इशारा दिली .
" गप्प बैस , मी लहानपणापासून ह्या रस्ताने गावात येत जात आहे आणि मागील पाच वर्षांपासून ही चहाची टपरी येथेच आहे..... तसेही मी घाबरत नाही भुतांना , काय तर , माझा विश्वासच नाही .", स्वतःवर मनोमन ओरडत तुषार त्या टपरीपासी गेला व समोरील बाकड्यावर बसत त्याने एक कप चहाची ऑर्डर सोडली ....
चांगला खमंग वास तिथे दरवळत होता . आजुबाजुला नुकत्याच झालेल्या पावसामुळे जमीन हलकी काळी पडलेली होती , हवेत थोडा गारवा होता व अंगाला चांगला झोंबत होता.
ती टपरी साधीच होती , जेमतेम बिस्कुट, चॉकलेट , वेफर्स आतमध्ये होते आणि अनेकांच्या जीवाची जान मधूर , गोड , सुवासिक चहा तिथे भेटत होता .
समोरील बाकड्यावर दोन व्यक्ती बसलेल्या तुषारला दिसल्या , शरीराने आडदांड , करपलेल्या कातडीचे, चेहऱ्यावर हलक्या सुरकुत्या व हलके पांढरे केस .... ते दोघे चहा घेता घेता कधी हसत तुषारकडे पाहत होते , तर केव्हा त्यांचा चेहरा स्थिर गंभर वाटे ....
" हे आज भासावर भास का होत आहेत ?", मनोमन तुषारने स्वतःलाच विचारले .
" साहेब ! चहा .", टफरीवाला चहाचा कप घेऊन आला होता .
" हम्म ..." तुषारने गरम चहाने भरलेला काचेचा ग्लास हातात घेतला .
" तू पाटलांचा पोरं नारे ?", मघापासून चुपचाप बसलेल्या त्या दोघा व्यक्तींपैकी एकाने विचारले .
" होय , मी पाटलांचा मुलगा ,पण तुम्ही मला कसे काय ओळखता ?", तुषारने विचारले .
" तू तरी आम्हाला कुठे ओळखतोस पोरा ...", हसत तो व्यक्ती म्हणाला .
तुषारला थोडे वेगळेच वाटले , पण तो खरं तेच तर बोलतोय ना ? मी लहानपणापासून शहरात शिकायला गेलो , फक्त गावातील काही सोबतचे मित्र सोडले तर मी कोणालाच ओळखत नाही .
" घाबरू नकोस पोरा आम्ही तुझ्या गावातलेच की , हा मनीराम आणि तो टपरीवाला तुळ्यास्या आणि मी मोनोहर ...", तो माणूस म्हणाला .
" मी गावात नसतो ना ? शिकयला शहरात असतो .... केव्हा इथे आलो होतो ते ही आठवत नाही . अस्यात गावातील माणसांना कुठे ओळखेन .", तुषार हसत म्हणाला .
" तुळस्या एक चहा आण आज कितीतरी दिवसांनी कोणीतरी बोलायला भेटलेय.", मनोहर म्हणाला .
त्या वाक्याने एक शिरशिरी तुषारच्या मानेतून निघून मेंदूत जाऊन भिनली .
" पोरा , घाबरू नकोस असेच बोललो...", परत मनोहर हसला .
" मी घाबरत नाही .", तुषार ही हसला .
" बरं , तू त्या कसरी घाटातून आलास ना ? काय भलतं सलतं समोर आले नाय काय ?", मनोहरने विचारले .
" नाही , फक्त डुलकी लागली होती .", चहाचा गोड घोट ओढत तुषार म्हणाला .
" तुला ठाव नायं पोरा रात्रीचे त्या घाटातून कोणी जीवंत परतत नायं डाकिण दबा धरून बसते . एकतर सुंदर बाईचे रुप घेऊन मोह जाळात फसवते किंवा अपघात !
अपघात घडवते.... ती मांसभक्षी आहे फाडून
टाकते .", मनोहर म्हणाला.
" नुकतीच ऐकली डाकिण बगऱ्या दाताची, वाकड्या नाकाची आणि उलट्या पायाची .... काय देवगन काहीतरी लोकांच्या सांगण्यानुसार निटसे लिहत जावा म्हणा .", तुषार हसत पुटपुटला .
" पोरा , हतोयस ! म्हणजे निबीर काळजाचा आहेस तू तुला अशी भीती वाटत नाही , पण एक सांगू हे हसण्यासारखे नाही .... जीवावर आलं म्हणजे भल्याभल्यांची बोबडी वळते , अंगाचा थरकाप होतो आणि घामाने शरीर चिंब भिजतं .", मनोहर म्हणाला .
" नाही मी हसलो नाही .", तुषार स्वतःला सावरत म्हणाला .
" चल ठिक हाय , मी तुला माझ्यासोबत घडलेली एक घटना सांगतो , त्यांच्यानंतर तू नक्कीच घाबरसील .", मनोहर म्हणाला .
तुषार हसला व मनात पुटपुटला ," आजपर्यंत जे काम भल्याभल्यांना नाही जमलं ते हे काका करतील काय ?"
" मग एक , तेव्हा मी तुझ्याच वयाचा होतो .....", म्हणत मनोहर सांगू लागला .....
........
दिवसाचा प्रकाश जाऊन अंधाराचे साम्राज्य पसरले होते . रातकिडे रात्रीला जिवंत ठेवण्यासाठी कर्कश गाणे गात होते . अवकाश निरभ्र होते आणि त्यात काही चांदण्या लुकलुकतांना दिसत होत्या .
चंद्र मात्र , पुर्ण काळोखात गुडूप झाला होता , जाणार तरी कसा नाही , आज अमावस्या होती .
मनोहरच्या पोटातली गडबड खुपचं वाढली आणि चेहरा वेडावाकडा करत तो डोळे चोळत उठला .
" आयला , इतकी रात्र आणि परसाला जाणे म्हणजे दिव्यच .", म्हणत तो छतावरून खाली आला आणि चपला पायात चढवत समोरील अंधारात थोड्या वेगात चालू लागला .
त्याचे घर गावाच्याच टोकला होते आणि समोरच त्यांची जमिन होती , पण मनोहर म्हणाला," कसाला उगाचच आपल्याच शेताची जागा घाण करायची सुंदरचे शेत बाजूलाच आहे निवांत जाऊन बसतो ."
आपली पाऊले वेगात उचलत त्याने बांध्यावरून खाली उडी टाकली .
तेथील वातावरण भकास होते , आजुबाजुला मानवी वसाहत नव्हती , समोर काही मोजकीच झाडे होती आणि थंड हवा सनसनत फिरत होती .
पण तिथले वातावरण काहीच सेकंदात निर्जीव पडले , एकदम कोणीतरी अवजड दडपण आणल्यागत तेथील वातावरण थंड व जड पडले .
कोणीतरी आपल्याकडे पाहत आहे , ह्या विचाराने एकवेळ मनोहरच्या मनात धडकी भरली . त्याने अवतीभोवती पाहिले , पण फक्त अंधार व काही काळीकुळकुळीत झाडे तटस्थ उभी असलेली दिसली .
हवेत एक वेगळाच सुगंध अचानकपणे दरवळला आणि मनोहर चवताळला , त्याने उठून आजुबाजुला पाहिले आणि त्या आंब्याच्या झाडापाशी क्षणभर काहीतरी चकल्यासारखे त्याला वाटले आणि हृदयाने क्षणात धडकी घेतली .
आणखी एक बदल मनोहरच्या डोळ्यांनी टिपला तो म्हणजे फक्त आंब्याच्या झाडाची पानेच सळसळत होती आणि इतर झाडांची पाने निर्जीव होऊन हलकेसेही हलत नव्हते .
सर्व उरकून मनोहर उठला लहानपणापासून त्या आंब्याच्या झाडाबद्दल ऐकलेल्या गोष्टी त्याच्या मनात परत उजळणी करून लागल्या....
" त्या आंब्याच्या झाडापाशीना हडळ असते म्हणत्यात हडळ ! तिथे जाऊ नकोस , जो कोणी त्या झाडावरील आंबे खातो ना तो दुसऱ्याच दिवशी आजारी पडतो , त्या आंब्याच्या मोठ्या ढोलीतच ती हाडळ राहते म्हणत्यात , पण म्या कधी पाहीली नायं ."
आईने सांगितलेले , मित्रांचे बोलणे हळूहळू त्याच्या कवटीत नगाड्यासारखा नाद करू लागले होते .
" बास्स आता बास्स! आज मी जाऊनच पाहतो ह्या झाडाजवळ त्या ढोलीपाशी , हवे तर आत शिरून बघतो हडळ असते तरी कसी ?", म्हणत मनोहर हळूहळू पुढे सरकला .
आंब्याच्या बुध्याने जणू पेट घेतल्यासारखे धुके तिथे फिरत होते , काही सावल्या तिथे हेलकाव्या खात होत्या व जुगणू टिमटिमत फिरत होते .
मनोहर जसजसा पुढे सरकत होता , तसं तसे ते वातावरण अधीकच गोंधळत होते .
" एकता काय ?", अचानक शांततेला चिरत कसलासा आवाज आला , दचकून मनोहरने बाजूला मान फिरवली , पण तिथे फक्त अंधार होता .
तो मनाला धुंद करणारा सुगंध अचानक मोठ्या प्रमाणत वाढत होता .
तोंडाला कोरड पडल्यागत मनोहर लाळ गिळत हळूहळू पुढे सरकला , खाली वाळलेली आंब्याची पाने हवेच्या जोरदार झोक्याने वाहून गेली आणि तोच ...
...खण.... खण... आवाज डाव्या हाताला हून आला , तसे दचकून मनोहरने तिकडे पाहिले , पण कोणीच नव्हते .
आता मनोहरला तेथील वातावरणात भितीचे चांदणे चमकतांना दिसत होते व त्याचे मन घाबरून गेले होते .
त्याची आंब्याच्या दिशेने जाणारी पाऊले जड पडली होती आणि नकळत त्याच्या कपाळावर घाम जमा होऊन राहिला होता .
वातावरण , ती हवा एकवेळ स्थिर झाल्याचा भास झाला , जणू काही सर्वच शांत झालेले आहे .... तोच एक पांढरी साडी फडफडत आंब्याच्या बुंध्यामागून निघाली.
मनोहर स्तब्ध झाला , त्याचे शरीर थरथरत सुटले होते .
तेवढ्यात दोन लाल डोळे बुंध्यामागून समोर आले , ते मनोहरवर खिळून राहिले होते व अंधारातही चमकत होते .
" न... नाही ...", मनोहरच्या काळजात वेदनेची कळ उठली आणि लगबगीने मागे सरकण्याच्या नादात धाडकन खाली आपटला तोच , कपाळावर हिरवा बुक्का दिलेली , पांढऱ्या साडीची , चमकदार लाल डोळ्यांची एक भयानक स्त्री हळूहळू झाडा आडून समोर आली .
घामाने चिंब भिजलेल्या मनोहरचे शरीर थरथरत होते व तो विस्फारलेले डोळे खिळवून जागचा उठण्यासाठी धडपडत होता .
समोर फक्त त्या स्त्रीची पाठ होती , पाय व डोके पुर्णपणे उलटे आणि ती हळूहळू भेसूर हसत मनोहरच्या दिसने जमिनीपासून फक्त काही उंचीवरून अधांतरी उलटे पाऊले टाकत सरकत होती .
मनोहर जोरात किंचाळला , पण वाफे प्रमाणे एक कोरडी हवा त्याच्या घसातून बाहेर पडली . तो लटपटत कसातरी उठवला व अगदी वेगात आपल्या घराच्या दिशेने धावत निघाला , त्याच्या शरीरावरील कपडे घामाने चिंब भिजलेली होती , डोळे विस्फारलेलेच राहिले आणि छाती चांगली धडधडू लागली होती .
मेल्यासारखा तो तापाने फणफणलेल्या अवस्थेत घरात येऊन एकदम धाडकन पडला .
.......
" तालुक्याहून जास्तीचे पैसे देऊन आणलाय डॉक्टर!"
" पण झाले तरी काय पोराला ?", शेजारीण ताराबाईने विचारले .
त्या प्रश्नाबरोबर सुमित्राच्या काळजाचे पाणी पाणी झाले , ती हुंदके आवरत म्हणाली ," ठाऊक नायं, असल्या तरण्या पोराला काय व्हायचे ?
रात्री कुठूनतरी आला आणि तेव्हाच तापाने फणफणलेला होता ."
बोलता बोलता सुमित्रा बाई रडू लागली , बाकी बाया त्यांना धीर देऊ लागल्या .
" आई काल अमावास्या होती . दादा अचानक कुठेतरी बाहेर गेला होता . त्याने काही भलतं सलतं तर पाहीले नसेल ना ?", मनोहरची बहिण सरस्वती बोलली .
तेवढ्यात घामाघूम झालेला डॉक्टर बाहेर आला , त्याच्या तोंडावर भीतीचे सावट फिरत होते .
" काय झाले डॉक्टर माझ्या पोराला ?", काळजीच्या सुरात सुमित्राने विचारले .
" वाटतं ताप मेंदूत भिनलेला आहे, खुप डोळे गरागरा फिरवतो , दात विचकतो.....
असो , काही गोळ्या देतो , त्याला वेळेवर द्या ताप उतरल्यावर बरा होईल तो !", डॉक्टर म्हणाले .
मनोहरचे वडील व काही माणसे डॉक्टरला सोडायला निघून गेले .
साधारण दुपारची दोनची वेळ होती . मनोहरच्या खोलीत पाणी ठेवायला म्हणून सरस्वती आतमध्ये शिरली . मनोहर तोंडावर पांघरूण घेऊन शांत झोपलेला
होता , पण तिथे एक विचीत्र शांतता व नकारात्मकता पसरलेली होती .
वरून कसलासा , पण विचीत्र जळका वास खोलीत दरवळत होता . सरीताचे काळीज अचानक त्या शांततेला व नकारात्मकतेला भेदरून धडाडले .
तिने पाण्याने भरलेला चंबू समोरील स्टूलवर ठेवला , पण त्याच सुमारास कानावर पडलेल्या बाईसारख्या हलक्या आवजाने सरस्वती दचकून मागे फिरली .
पुढच्याच क्षणी तिला जोरदार धक्का बसला , दात विचकत , विचीत्रपणे हसत मनोहर तिच्याकडे एकटक पाहत होता . त्याच्या डोळ्यातील भयानक बदल काही केल्या लपत नव्हता .
सरस्वतीच्या छातीत धडधड वाढतच चालली होती , भितीने थरथरत ती हळूहळू मागे सरकत होती .
तोच मनोहरने टुणकन खाटेवरून हवेत उडी मारली व परत धाडकन ! खाली आपटला .
सरस्वती एकदम किंकाळली व लागलीच खोलीतून बाहेर धावली , तोच खोलीतील आवाज एकूण दारात येऊन ठेपलेल्या आपल्या आईच्या अंगावर सरस्वती आदळली .
" काय झाले ?", थरथरनाऱ्या सरस्वतीकडे पाहत सुमित्राने विचारले .
सरस्वती कापऱ्या आवाजात म्हणाली ," आई दादा.... दादा..."
म्हणत तिने घामाने भिजलेला चेहरा मागे फिरवला व आपल्या थरथरत्या हाताचे बोट खाटेकडे उचलले , पण समोरील दृश्य पाहताच सरस्वतीला परत धक्का बसला व तिच्या चेहऱ्यावरील हाव भाव बदलले .
मनोहर शांतपणे तोंडावर पांघरूण घेऊन आपल्या खाटेवर पडलेला होता .
" चल तू येथून ....", म्हणत सुमित्राने सरस्वतीला ओढले.
.......
रात्री कोणाची हिम्मत होत नव्हती मनोहरच्या खोलीत शिरण्याची , म्हणून मनोहरचे वडील सुभाष स्वतः जेवणाचे ताट घेऊन खोलीत शिरले .
त्या अंधाऱ्या खोलीत कानांना एक विचीत्र कुजबुज ऐकू येत होती व हलक्या दिव्याच्या प्रकाशात भिंतीवर काळ्या सावल्या नाचत असल्याप्रमाणे भासत होत्या .
खोलीत पाऊल टाकल्या टाकल्या सुभाषच्या काळजात चर्रर्र..... झाले .
मनोहर आपले चकचकीत लाल डोळे एकटक सुभाषवर खिळवून पाहत होता .त्याचे डोळे खोल गेलेले होते व डोळ्याभोवती गडद काळे वर्तुळ निर्माण झाले होते .
त्याचा चेहरा पुर्ण पांघरूणाने झाकलेला होता , डोळे तेवढे उघडे होते .
ती जळजळीत नजर सुभाषला असाह्य होऊ लागली आणि तो भरलेले ताट घेऊन तसाच खोलीबाहेर पडला .
" काय झाले ? काही खाल्ले काय त्याने ?", सुमित्राने भरलेल्या डोळ्यांनी विचारले .
" नाही , मी येतो ...", म्हणत सुभाषने ताट सुमित्राकडे दिले व लागलीच तो घरातून बाहेर पडला .
आता त्या दोघी , त्या भितीदायक वातावरणात कोंडल्या गेलेल्या होत्या . जसं जसे अंधार गडद होत होते , तसं तसे , मनोहरच्या खोलीतील आवाज वाढू
लागले , अचानक घरातील दिवा चर्रर्र झाला .
आणि हळूहळू एकदम शांतता पसरली. एकवेळ सुमित्रा व सरस्वती दोघीही काळजीने स्तब्ध झाल्या आणि अचानकपणे भेसूर हसण्याचा आवाज मनोहरच्या खोलीतून आला , सोबत धाड .... धप !.... वाजणाऱ्या पावलांचा आवाजही दोघींच्या कानी आला .
एका क्षणात दोघींच्या अंगावर काटा उभा राहिला, कारण हसण्याचा आवाज मनोहरचा वा , कोणा पुरूषाचा नव्हता , तर आवाज एका बाईचा होता , तो ही पुर्णपणे भेसूर .
पुढच्याच क्षणी, धान.... धान.... पाऊले आपटत मनोहर नाचत व भेसूर हसत खोलीबाहेर पडला . त्याला पाहून दोघींच्या पायाखालची जमीनच सरकली.
मनोहरचा चेहरा पुर्ण विकृत झाला होता , डोळे लालभडक चकाकत होते , त्याने अंगावर हिरवी साडी चढवलेली होती व हातात काही काचेच्या बांगड्या खणखणत होत्या .
अचानक त्याने नाचने बंद केले आणि आपली जळजळीत नजर दोघींवर टाकली , त्याच्या कपाळावरील कुंकवाचा मोठा टिळा घामाने गळून लालभडक ओघळत होता , तो डोळे मिचकावत , दात विचकत , भयानकपणे हसत दोघींकडे थरथरत पाहत होता .
दोघीही शहारून, भीतीने गारठून जागच्या स्तब्ध उभ्या होत्या . त्याच क्षणी स्त्री आवाजात भेसूरपणे किंचाळत मनोहर दोघींवर धावला....
दोघीही एकदम घाबरून ओरडल्या , पण त्यांच्याने आपले पाय ही जागचे हलवता येत नव्हते . मनोहर दोघींवर झेपावला, त्याच्या नजरेत हिंस्त्रपणाची आग होती , तो क्रोधाने हल्ला करण्यासाठी फुत्कारत
होता , तोच हवेत भंडारा उडाला ....
त्याबरोबर मनोहरला जोरदार झटका बसला आणि तो किंचाळत समोरील भिंतीवर आपटला, धाड!
त्याच क्षणी घरातील बल्ब फाट् आवाज करत क्षणात फुटला आणि संपूर्ण घरात एका क्षणात गुडूप अंधार पसरले .
कोणीतरी हळूच खर्रर्र.... करत काडेपेटी ओढली व आपल्या हातातील काळी मेणबत्ती पेटवली . मिनमिनत्या मेणबत्तीने तेथील दाट अंधार विरल केला .
एका अनोळखी व्यक्तीशेजारी सुमित्राला सुभाष उभा असलेला दिसला . दोघीही आधीच फार घाबरून गेलेल्या होत्या , वरून त्या काळ्या कपड्यातील व्यक्तीला पाहून, त्यांचे शरीर अधीकच थरथरू लागले होते .
" घाबरू नका हे भद्र स्वामी आहेत , तेच आता मनोहरला ठिक करू शकतील .", सुभाष म्हणाला , दोघींनी थरथरत हात जोडून त्यांना नमस्कार केला .
" ह्या घरात जळक्या केसांचा वास येतोय , म्हणजे नक्कीच हा हडळीचा प्रकार असेल.... ", म्हणत भद्र स्वामींनी महामृत्युंजय मंत्राचा जाप मोठ्याने सुरू केला .
हळुहळु वातावरण जड पडू लागले , दरवाजा जोरात आपटून धडाडला आणि खिडक्या खाड.... खाड... आपटू लागल्या .
खण.... खण.... हातातील बांगड्यांचा आवाज अचानक घरात वाढला आणि तेवढ्यात एक काळी सावली अती वेगाने मनोहरच्या खोलीतून बाहेर पडली .
हळुहळु वातावरण शांत होऊ लागले , तसे मांत्रिकाने मंत्र म्हणने थांबवले....
तिघांनाही तिथेच थांबण्याचा इशारा करत, मांत्रिकाने सावकाश आपली पाऊले मनोहरच्या खोलीच्या दिशेने उचलली .
ती खोली अगदी अस्ताव्यस्त झालेली होती , मनोहर निपचीत मान टाकून आपल्या खाटेवर उपडा पडलेला होता .
मांत्रिक हळूच त्याच्या तोंडाशेजारी गेला . खोलीत एक भयानक शांतता पसरली होती , फक्त मांत्रिकाच्या श्वासाचे आवाज तिथे घुमले होते .
मांत्रिकाने मनोहरच्या चेहऱ्याचे निरीक्षण केले, मनोहरच्या पापण्या घट्ट मिटलेल्या होत्या , चेहरा घामाने डबडबलेला होता व सर्व कुंकू वाहून एकदम लालभडक झाला होता , अंगावर साडी , हातात बांगड्या जसेच्या तस्या होत्या , पण आता सगळे काही एकदम शांत होते.
भद्र मांत्रिक किंचीत हसला , तोच खाडकन मनोहरने आपले डोळे उघडले..... तसे भद्रच्या छातीत धस्स झाले .
मनोहर भेसूर पणे स्त्री आवाजात किंचाळला.
त्याबरोबर मांत्रिकाला एक जोरदार धक्का बसला आणि तो हवेत उडून, समोरील भिंतीवर जोरात आदळला व धाडकन ! खाली आपटला .
त्याच्या हातातून केव्हाच मेणबत्ती निसटून कुठेतरी पडून विझली होती आणि संपूर्ण घरात गुडूप अंधाराचे साम्राज्य पसरले .
खी....खी.....खी...ही....ही....
त्या काळोखात भेसूर हसण्याचा आवाज घुमला.
मनोहरचे लालभडक डोळे क्रुरपणे काळोखात चमकत होते .
खर्रर्र.... फर्रर्र.... करत एकाच हाताने मांत्रिकाला मनोहर ने वेगात खोलीतून बाहेर भिरकावले .
फरफटत मांत्रिक समोरील लाकडी खुर्ची उडवत भिंतीवर येऊन आदळला व एकदम खाली निपचीत पडला .
त्या प्रसंगाने सुभाष , सुमित्रा , सरस्वती ओरडत एकवेळ मागे सरकले .
हळुहळु मनोहरच्या खोलीतून दोन चमकणारे लाल डोळे बाहेर पडले , ती नजर एकवेळ तिघांच्या शरीरावरून फिरली आणि त्यांचे शरीर एकवेळ शहारून जागचे गोठले .
" खी....खी...खी....ही..ही...", भेसूर स्त्री आवाजात हसत मनोहर बाईसारखा चालत हळूच मांत्रिकाजवळ गेला व मांत्रिकाच्या गळ्याला पकडून क्षणात त्याने त्याला हवेत उचलले .
रक्ताळलेला मांत्रिक स्थिर नजरेने मनोहरकडे पाहत होता व थोडे हसत त्याने लगेच महामृत्युंजय मंत्राचा जाप सुरू केला .
मनोहरला ते शब्द असाह्य झाले व त्याचे शरीर थरथरू लागले . क्रोधाने डोळे मोठाले करत , त्याने मांत्रिकाच्या गळ्यावरील आपली पकड अधिकच आवळली .
भद्र मांत्रिकाने आपला थरथरता हात हळूच खांद्यावर बांधलेल्या झोळीत घातला आणि सपकन् मुठभर विभूती काढत क्षणात मनोहरच्या कपाळावर फासली.
मनोहर किंकाळत थयाथया उड्या मारू लागला , तोच मांत्रिकाने भंडारा काढून त्याच्यावर फेकला आणि मोठा झटका बसून भेसूर किंकाळत मनोहर धाडकन ! मागे आपटला.
मनोहरचे शरीर निपचीत खाली पडलेले होते , पण ती भयानक हडळ किंकाळत तेथून नाहीसी झाली .
........
मनोहर ने आपली गोष्ट सांगून संपवली होती . पावसाची हलकी सरी टप ... टप... करत टपरीच्या पत्र्यावर कोसळत होती . तिघांच्या हातातील चहाही थंड पडलेला होता .
" आता तरी घाबरलास काय ?", मनोहरने तुषारला विचारले .
" हा....हा.... ही... वाईट वाटून घेऊ नका , पण मी इतकाही घाबरलेलो नाही , कारण माझा भुतांवर विश्वासच नाही , माफ करा .... हा...ही....", तुषार हसत म्हणाला .
" हे सांगून तुनी खुप मोठी चुकी केलीस .", अगदी करड्या आवाजात मनोहर म्हणाला .
तुषारला त्याच्या बोलण्याचा रोख काही समजला नाही , पण आतल्या आत त्याला तिथे काहीतरी भयानक प्रकार असल्याचे वाटू लागले आणि तोच पों.... असा हॉर्नचा मोठा आवाज आला , दचकून तुषारने समोर पाहिले आणि त्याच्या काळजात जोरदार धस्स ! झाले....
एक मृत्यू प्रायः वेदनेची कळच काळजात उमटली .
एक अनियंत्रित ट्रक अगदी वेगात त्यांच्या दिशेने सरकत होता , कोणाला पळण्याची वेळही नव्हती , कारण डोळ्याच्या बुबुळ्यांना चिरत ट्रकच्या हेडलाईटचा प्रकाश अगदी समोर येऊन ठेपला होता आणि पुढच्याच क्षणी सर्वकाही चेंदामेंदा करत ट्रक त्यांच्यावरून चालून गेला .
तुषार वेगात बाकड्यावरून खाली आपटला होता व त्याने भितीने आपले डोळे घट्ट बंद केले होते . सर्व काही शांत वाटताच त्याने हळुहळु आपल्या पापण्या उघडल्या .
पावसाच्या सरी जोरदार कोसळत होत्या आणि तिथे फक्त अंधार होते .
तोच अचानक वीज जोरात कडाडली आणि काळोखातील ती जागा क्षणभर उजळून निघाली , तुषारचे डोळे विस्फारले आणि त्याचे काळीज लटलट उडू लागले .
समोर विटांचा , पत्र्यांचा ढिगारा पडलेला होता व ते सर्व खुप जुने झालेले होते . तिथे ट्रक किंवा मनोहर , मनीराम व तुळस्या कोणीचा कोणीच नव्हता , फक्त कधीतरी उध्वस्त झालेल्या टपरीचे अवसेस पडलेले होते .
" ही....ही.....ही....ही....ही.... ", काळोखातून एखाद्या पुरूषाचा हसण्याचा आवाज आला , थरथरत धडपडत तुषार कसातरी उठवला व कारच्या दिशेने धावत निघून गेला .
कारचा दरवाजा घट्ट आपटून त्याने बंद केला व क्षणात कार सुरू करून वेगात पळवली . तुषारचे शरीर पाण्याने व घामाने चिंब भिजलेले होते , त्याचे शरीर , होठ , हात पाय अद्यापही थरथरत होते व धडधडत असलेले हृदय जणू छातीचा पिंजरा फोडून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होते .
" तुला मी एक गोष्ट सांगतो , ह्यानंतर तू नक्कीच घाबरसील .", मनोहरचे ते शब्द राहून राहून तुषारच्या कानाच्या पडद्यावर आपटत होते .
गोष्ट ऐकणारा , वाचणारा तुमच्यातही कोणी असा तुषार सारखा असेल जो घाबरत नसेल तर आत्ताच सावध व्हा ! नंतर जीवावर आल्यावर सर्व आपोआप समजते....
भीती ही इतरत्र कुठे लपलेली नाही , जरा डोके वर करून तुमच्या आसपास अंधारात , घरातील अंधाऱ्या कोपऱ्यात बघा....
तिथेच भीती लपलेली आहे....ही...ही....ही....ही.....
DEVGAN A 🌹K 💐
........ समाप्त........
ही कथा कशी वाटली नक्की कळवा आणि तिने तुम्हाला घाबरविले किंवा नाही ते ही कळवा आणि आपल्या अमुल्य रेटिंग्ज आणि प्रतिक्रिया द्यायला विसरू नका धन्यवाद 🙏🙏👍👍💐💐💐💐💐💐💐💐💐