Incomplete Hearts in Marathi Love Stories by Arjun Kamble books and stories PDF | अर्धवट प्रेमकहाणी – आराध्या आणि अर्जुन

Featured Books
Categories
Share

अर्धवट प्रेमकहाणी – आराध्या आणि अर्जुन

अर्धवट प्रेमकहाणी – आराध्या आणि अर्जुन
   
काही प्रेमकथा भेटीने सुरू होत नाहीत… त्या सुरू होतात एका साध्या मेसेजपासून.

आराध्या आणि अर्जुन यांची ओळख अशीच झाली. एक अनोळखी प्रोफाइल, एक साधा “Hi”, आणि त्यानंतर सुरू झालेलं बोलणं कधी सवय बनलं, ते दोघांनाही कळलंच नाही.

आराध्या सोलापूरची होती. लातूरला डॉक्टर होण्याचं स्वप्न घेऊन शिकत होती. दिवस अभ्यासात जायचा, रात्री थकलेलं मन कोणाशी तरी बोलायला शोधायचं. अर्जुन पुण्यात राहत होता. साधा, शांत, कमी बोलणारा… पण समोरच्या माणसाला समजून घेणारा.

सुरुवातीला गप्पा साध्या होत्या. अभ्यास, कॉलेज, रोजचं आयुष्य. पण हळूहळू त्या गप्पांमध्ये भावना मिसळायला लागल्या. अर्जुन तिच्या दिवसाची काळजी घ्यायला लागला, आणि आराध्या त्याच्या शब्दांत आपलेपणा शोधायला लागली.

दोघांनी कधीच भेटायचं ठरवलं नव्हतं. पण रोज बोलणं थांबत नव्हतं. सकाळचा “Good Morning” आणि रात्रीचा “Good Night” याशिवाय दिवस पूर्णच वाटत नव्हता.

आराध्याच्या परीक्षा जवळ आल्या की ती जास्त तणावात असायची. तेव्हा अर्जुन तिचा आधार बनायचा. “तू करशील,” एवढेच शब्द तिच्यासाठी पुरेसे असायचे. तिच्या यशात तो स्वतःचं समाधान शोधायचा.

कधी कधी अर्जुन मनात विचार करायचा — आपण कधीच भेटलो नाही, तरी ही मुलगी मला इतकी जवळची का वाटते? आणि उत्तर त्याला आराध्याच्या हसऱ्या शब्दांत मिळायचं.

आराध्या देखील नकळत त्याच्यावर अवलंबून झाली होती. दिवसभर काही घडलं की पहिला विचार अर्जुनला सांगण्याचाच असायचा. त्याच्याशी बोलल्यावरच तिला शांत वाटायचं.

हे नातं नाव न दिलेलं होतं, पण खोल होत चाललं होतं. दोघेही ते मान्य करत नव्हते, पण मनात कुठेतरी प्रेम जन्म घेत होतं.

एक दिवस आराध्याने अर्जुनला सांगितलं, “मी गावी चाललेय. घरी मोबाईल तपासतात. मला तुला काही दिवस ब्लॉक करावं लागेल.”

अर्जुन क्षणभर गप्प झाला. ‘ब्लॉक’ हा शब्द त्याला बोचला. पण त्याने काही दाखवलं नाही. त्याने विचारलं, “परत कधी येणार?”

“एक महिन्यानंतर,” ती म्हणाली.

अर्जुनने तिच्यावर विश्वास ठेवला. कारण प्रेमात शंका नसते, फक्त वाट पाहणं असतं.

तो एक महिना अर्जुनसाठी खूप जड गेला. रोज तो मोबाईल पाहायचा, तिचा मेसेज येईल या आशेने. पण दिवस जात गेले, आणि मेसेज काही आला नाही.

एक महिना चार झाला. चार पाच झाले.

आराध्या परत आलीच नाही.

तरीही अर्जुन वाट पाहत राहिला. कारण त्याचं प्रेम अजूनही पूर्ण विश्वासावर उभं होतं.

त्याला माहीत नव्हतं… ही वाट पाहणं त्याच्या आयुष्यातील सर्वात लांब आणि वेदनादायक प्रवास ठरणार आहे.


---                                               
आराध्या गेल्यानंतर अर्जुनला पहिल्यांदा जाणवलं ते म्हणजे — वेळ अचानक खूप हळू चालू लागली होती.

तो एक महिना तिच्या शब्दांवर जगत होता. “एक महिन्यानंतर येईन.” त्या वाक्याने त्याला धीर दिला होता. तो रोज स्वतःला समजावायचा — आज नाही, पण उद्या नक्की येईल तिचा मेसेज.

सकाळी उठल्यावर मोबाईल पाहणं ही पहिली सवय झाली होती. रात्री झोपताना शेवटचा विचारही तिचाच असायचा. तिच्या नावाची नोटिफिकेशन येईल या अपेक्षेने तो प्रत्येक व्हायब्रेशनकडे पाहायचा.

पण दिवस जात गेले… आठवडे झाले… आणि तो एक महिना कधी चार महिन्यांत बदलला, त्यालाच कळलं नाही.

आराध्याचं काहीच उत्तर नव्हतं.

कधी कधी अर्जुनला राग यायचा. इतकंही महत्त्व नव्हतं का माझं? पण लगेच तो स्वतःलाच थांबवायचा. ती अभ्यासात असेल… तिच्यावर दबाव असेल… तो तिच्यासाठी कारणं शोधत राहिला.

या काळात अर्जुनचं आयुष्य बाहेरून नॉर्मल दिसत होतं. ऑफिस, मित्र, घर — सगळं सुरू होतं. पण आतून तो सतत थकलेला होता. हसणं बनावटी झालं होतं. कोणीतरी विचारलं, “काय झालंय?” तर तो म्हणायचा, “काही नाही.”

पाचवा, सहावा महिना गेला.

अर्जुनला पहिल्यांदा वाटलं — कदाचित ती परत येणारच नाही. हा विचार त्याला आतून हादरवून गेला. कारण त्याने अजूनही तिच्या परत येण्याची जागा मनात रिकामी ठेवली होती.

सात–आठ महिन्यांनंतर अचानक तिचा मेसेज आला.

तो मोबाईल हातात घेऊन काही क्षण फक्त स्क्रीनकडे पाहत राहिला. डोळ्यांसमोर तिचा चेहरा उभा राहिला, जो त्याने कधीच प्रत्यक्ष पाहिला नव्हता, पण मनात पूर्ण कोरलेला होता.

तिचे शब्द साधे होते, पण अर्थ जड होता.

“मला आता तुझ्यासोबत राहायचं नाही. मला करिअर करायचं आहे, अभ्यास करायचा आहे. आपण फक्त मित्र म्हणून राहूया.”

त्या क्षणी अर्जुनला काय उत्तर द्यावं हेच कळलं नाही. तो रागावू शकला नाही. तो विनवू शकला नाही. तो फक्त शांत राहिला.

कारण तिने जे सांगितलं होतं ते चुकीचं नव्हतं. पण वेळ… वेळ खूप उशिरा आलेला होता.

अर्जुनने उत्तर दिलं, “ठीक आहे. तू तुझं करिअर कर. मी समजून घेतो.”

त्या एका वाक्यात त्याने स्वतःचं प्रेम दाबून ठेवलं.

थोडे दिवस ते मित्र म्हणून बोलले. गप्पा कमी होत्या, भावना दडलेल्या होत्या. अर्जुन प्रत्येक शब्द जपून वापरत होता, कारण आता तो तिच्या आयुष्यात फक्त एक पर्याय होता.

आणि मग…

अचानक, कोणतंही कारण न देता, आराध्याने त्याला पुन्हा ब्लॉक केलं.

ना भांडण. ना निरोप.

फक्त पुन्हा एकदा शांतता.

अर्जुनला आता कळलं होतं — काही लोक आयुष्यात येतात प्रेम शिकवायला, आणि निघून जातात वेदना देऊन.

ही गोष्ट अजून संपलेली नव्हती… कारण अर्जुनचं एकटेपण अजून सुरूच होतं.


---
आराध्याने ब्लॉक केल्याचा क्षण अर्जुनसाठी नवीन नव्हता… पण यावेळी वेदना जास्त खोल होत्या. कारण आता त्याला समजलं होतं — ती परत येणार नाही, किमान आधीसारखी तरी नाही.

रूममध्ये बसून तो बराच वेळ मोबाईलकडे पाहत राहिला. स्क्रीन काळी होती, पण मनात आठवणी उजळून निघाल्या होत्या. तिचं हसणं, तिच्या शब्दांतला आपलेपणा, आणि तिच्या आवाजातली ती ओळख… जी त्याने कधी प्रत्यक्ष ऐकलीही नव्हती.

आता रात्री उशिरापर्यंत जागं राहण्याचं कारण उरलं नव्हतं. कुणाचा “Good night” येणार नव्हतं, कुणासाठी “Take care” लिहायचं नव्हतं. तरीही अर्जुन झोपायचा नाही. कारण झोपली की स्वप्नात ती यायची.

दिवस पुढे सरकत होते, पण अर्जुन तिथेच थांबला होता. ऑफिसमधले सहकारी बदलले, प्रोजेक्ट बदलले, महिने बदलले… पण त्याचं मन मात्र त्या एका टप्प्यावर अडकलं होतं जिथे आराध्याने ‘एक महिना’ असं म्हटलं होतं.

तो स्वतःला सतत विचारायचा — मी तिला इतकं का प्रेम केलं? ती थांबली असती का, जर मी थोडा वेगळा असतो?

उत्तर कधीच मिळालं नाही.

एकटेपणा आता सवयीचा झाला होता. शनिवार–रविवार कोणाशी न बोलता जायचे. कधी कधी तो मुद्दामच मोबाईल सायलेंटवर ठेवायचा, जणू कुणाचा मेसेज येणार नाही याची खात्री करून घ्यायला.

आणि मग…

दोन–तीन महिन्यांनी पुन्हा एकदा तिचा मेसेज आला.

“Happy New Year.”

अर्जुन काही सेकंद फक्त ते दोन शब्द वाचत राहिला. त्याला आनंद झाला नाही, रागही आला नाही. फक्त मनात एक जड शांतता पसरली.

तो रिप्लाय करतो — “Happy New Year.” एक साधं उत्तर. कारण आता त्याच्याकडे देण्यासाठी जास्त काही उरलेलं नव्हतं.

ते पुन्हा बोलू लागले. मित्र म्हणून. औपचारिक. मर्यादित.

आराध्या तिच्या आयुष्यात पुढे गेलेली होती. अभ्यास, करिअर, नवीन लोक. अर्जुन ते ऐकत होता, समजून घेत होता, हसत होता. पण प्रत्येक वाक्याच्या शेवटी तो स्वतःला थोडं हरवत होता.

कधी कधी तो मनात म्हणायचा — मी तुझ्या आयुष्यात फक्त मेसेज आहे का?

पण तो कधीच विचार तिला विचारला नाही. कारण काही प्रश्नांची उत्तरं ऐकण्याइतकी ताकद नसते.

आज अर्जुन एकटा आहे. पण तो रागावलेला नाही. तो तक्रार करत नाही. तो फक्त शांत आहे.

कारण त्याने शिकलं आहे — काही नाती आपल्या आयुष्यात येतात आपल्याला बदलायला, आणि काही लोक आपल्यात राहूनही कायमचे निघून जातात.

आराध्या आता त्याच्या आयुष्याचा भाग नाही… पण त्याच्या आयुष्यातला एक अध्याय मात्र कायम तिच्याच नावाने राहील.

---

समाप्त