Lawyer's scolding. in Marathi Fiction Stories by Dilip Bhide books and stories PDF | वकिली हिसका.

Featured Books
Categories
Share

वकिली हिसका.

वकिली हिसका

अमरावतीला १९६० च्या दशकात घडलेली गोष्ट आहे. मिलिंद आणि त्याचा मित्र सिनेमा बघायला गेले होते. शो संपल्यावर रात्री साडेनऊला घरी परतत असतांना इरविन हॉस्पिटल च्या चौकात त्यांना एका पोलिसाने थांबवले. मिलिंदने सायकल थांबवली. दोघेही खाली उतरले.

“कुठे निघालात एवढ्या रात्री?” – पोलीस.

“घरी जातो आहे.” – मिलिंद.

“कुठे गेला होता?” – पोलिस

“सिनेमाला.” – मिलिंद.

“सायकलला लाइट का नाहीये” – पोलिस.

मिलिंद जवळ उत्तर नव्हतं. त्याकाळी सायकल ला एक कंदीला सारखा दिवा असणं हा नियम होता. सायकलला लाइट बसवण्याची हॅंडल च्या खाली खास व्यवस्था असायची.

“डबल सीट चालला आहात. कोण आहे हा?” – पोलिस.

“मित्र आहे.” – मिलिंद.

तुमच्या सायकलला दिवा नाही आणि तुम्ही दोघे जण डबल सीट चालला आहात, हे वाहतुकीच्या नियमाविरुद्ध आहे हे तुम्हाला माहीत नाही का?” – पोलिस.

मिलिंद आणि त्याचा मित्र बघतच राहिले. इतके वेळा ते डबल सीट आणि बिना लाइटचे गांव भर भटकले होते पण कोणी अडवलं नव्हतं. ते गप्पच बसले.

“तुम्ही कायदा मोडला आहे. गुन्हा केला आहे. या साठी मी तुम्हाला आठ आणे दंड करत आहे. ताबडतोब भरा.” – पोलिस.

“आठ आणे! बापरे, साहेब आमच्या जवळ पैसे नाहीत. हवं तर खिसे तपासा.”-मिलिंद 

त्या काळी आठ आणे म्हणजे मोठी रक्कम होती. शेंग दाण्याचं तेल १२ आणे शेर मिळायचं. आणि सोन्याचा भाव  ६० रुपये तोळा होता.

“सिनेमा बघायला पैसे आहेत, पण दंड भरायला पैसे नाही म्हणता. दंड भरा नाहीतर सायकल जप्त करीन.” – पोलिस.

“हवालदार साहेब, आम्ही पिटात बसून सिनेमा बघितला. आईने चार आणे दिले होते, दोन दोन  आण्याची  तिकीटं झाली.” – मिलिंद

पिट म्हणजे स्क्रीन आणि थर्ड क्लास ची पहिली रांग यांच्या मधली मोकळी जागा. इथे खाली फरशीवर बसून सिनेमा बघायचा अशी व्यवस्था होती.

“कोणचा सिनेमा?” – पोलिस.

“धूल का फूल.” – मिलिंद.

“चांगल्या घरातली दिसत आहात म्हणून सायकल जप्त करत नाही. एक छोटीशी  शिक्षा मात्र मिळणारच. काशीनाथ म्हणतात मला.”–पोलिस

छोटीशी शिक्षा म्हंटल्यांवर दोघांच्याही चेहऱ्यावर समाधान उमटलं. पण ते अल्प कालच टिकलं. काशीनाथ खाली वाकला आणि त्याने दोन्ही चाकाची व्हाल्व ट्यूब काढून टाकली आणि रात्रीच्या अंधारात फेकून दिली. दोन्ही चाकातली हवा निघून गेली.

“आता चालत जा घरी. पुन्हा कधी बिना लाइट आणि डबल सीट फिरू नका.”–पोलिस

दोन मैल चालत मिलिंद घरी पोचला तेंव्हा जेवण आटोपून मिलिंद चे वडील अविनाश जे वकील होते, ते ओसरीत झोपाळ्यावर बसले होते.

“काय रे चालत आलास? पंक्चर झाली का?” – अविनाश.

“नाही, थोडी गडबड झाली. आम्ही दोघं सिनेमाहून येत असतांना पोलिसाने अडवलं” मिलिंदने काय घडलं ते वडिलांना सविस्तर सांगितलं.

“अरे तू पोलिसांना माझं नाव सांगितलं नाही का? मग हे झालच नसतं.”– अविनाश.

“चूक आमचीच होती, तुमचं नाव खराब होण्याची भीती वाटली म्हणून नाही सांगितलं.” – मिलिंद.

“ठीक आहे. बघतो मी काय करायचं ते.” – अविनाश.

मिलिंद घाबरला. बाबा काय करणार हेच त्याला कळेना. चूक त्यांचीच होती. शिक्षा झाली. आता करण्यासारखं काय असणार आहे? त्याने वडिलांना विचारलं,

“म्हणजे काय बाबा?” – मिलिंद.

“काही नाही आई वाट बघत असेल, जेवून घ्या.” – अविनाश.

दोन दिवसांनी अविनाश वकिलांनी सिविल कोर्टात अर्ज केला.

कॉंस्टेबल काशीनाथ याने माझा मुलगा रात्री १० वाजता घरी येत असतांना त्याच्या सायकल च्या वाल्व ट्यूब काढून फेकल्या. त्यामुळे मुलाला रात्री दोन मैल पायी चालत यावं लागलं. परिणामी सायकलची दोन्ही चाकं वाकडी झाली. आणि मुलाला खूप मानसिक त्रास झाला. याकरता मला सायकल च्या नुकसांनी पोटी २५० रुपये  आणि जो मानसिक त्रास झाला त्या पोटी ५०० रुपयांची नुकसान भरपाई भारतीय दंड संहिते नुसार कलम ४२६ नुसार काशीनाथ कडून मिळावी.

कोर्टाने अर्ज दाखल करून घेतला आणि काशीनाथला कोर्टात हजार राहण्यासाठी समन्स जारी केलं.

आठ दिवसांनंतर काशीनाथ च्या हातात कोर्टाचं समन्स पडलं. त्याला १५ तारखेला सिविल कोर्टात हजर राहायचं होतं. त्याच्यावर खाजगी मालमत्तेचं नुकसान केल्याचा आणि एका सामान्य नागरिकाला मानसिक त्रास दिल्याचा आरोप होता. काशीनाथने डोक्याला खूप ताण दिला, पण काही लक्षात येत नव्हतं की असं काय त्याच्या हातून घडलं की कोर्टात उभं राहावं लागणार आहे. तो इंस्पेक्टर साहेबांकडे गेला. साहेबांनी समन्स पाहिलं आणि म्हणाले,

“काशीनाथ, हे व्ययक्तिक समन्स आहे, याचा डिपार्टमेंटशी काही संबंध नाही. तुलाच जाऊन हे प्रकरण हाताळावं लागेल. – साहेब.

“म्हणजे मी आता काय करू? माझी काय चूक झाली हे पण मला माहीत नाही. कोणची मालमत्ता? आणि मी काय नुकसान केलं?” – काशीनाथ.

“केस अविनाश वकिलांनी फाइल केली आहे. त्यांच्या मुलांच्या सायकलचं तू काय नुकसान केल ते तुलाच माहीत असणार.” – साहेब.

“साहेब, ती मुलं रात्रीच्या वेळेस विदाउट लाइट आणि डबल सीट जात होती, थोडी समज द्यावी एवढ्याच उद्देशाने मी वाल्व ट्यूब काढली. अजून काही नाही.”-काशीनाथने सफाई दिली.

“तरी पण काशीनाथ वकील साहेबांशी पंगा घेतला हे चुकीचच झालं.” – साहेब.

“तो वकील साहेबांचा मुलगा आहे हे मला माहीत नव्हतं. आणि त्या पोराने पण सांगितलं नाही. मग मला कसं कळणार?” – काशीनाथ.

“साहेब, त्या पोरांनी पण त्यांची चूक कबूल केली. तरी सुद्धा वकील साहेब असं का करताहेत?” – काशीनाथ.

“या वकील लोकांना खूप अभिमान असतो. त्याचाच परिणाम असू शकतो तू १५ तारखेला कोर्टात हजर हो, तिथेच कळेल.” – साहेब.

काशीनाथ डोक्याला हात लावून बसला होता. साहेबांना त्यांची दया आली, ते म्हणाले,

“काशीनाथ तू एकदा वकील साहेबांना जाऊन भेट. माफी माग. हवं तर पाया पड पण केस वापस घ्या अशी विनंती कर.” – साहेब.

“ते माझं ऐकतील का?” – काशीनाथ.

“हे बघ, गरज आपल्याला आहे. प्रयत्न करून बघ. कोर्टात तू त्यांच्या समोर टिकणार नाहीस. हे तरी पटतंय न तुला? कदाचित तू माफी मागीतल्यावर ते विरघळतील. पण एकदा प्रयत्न तर करून बघ.” साहेब.

काशीनाथ दुसऱ्या दिवशी सकाळीच अविनाशच्या ऑफिस मधे गेला. तिथे अविनाश नव्हता पण त्याचा असिस्टेंट भेटला. त्याने सांगितलं की साहेब वलगाव ला शेती आहे तिकडे काही काम निघालं म्हणून गेले आहेत.

“कधी भेट होऊ शकेल?” – अविनाश.

“दोन एक दिवस लागतील.” – असिस्टंट

काशीनाथ परतला.

नंतर त्याला जायला वेळच मिळाला नाही. १५ तारीख उजाडली आणि काशीनाथ कोर्टात हजर झाला. व्ययक्तिक केस असल्यामुळे त्याला सुट्टी घ्यावी लागली होती. त्या दिवशी कोर्टात इतक्या केसेस लागल्या होत्या की अविनाश ची केस लागलीच नाही. कोर्टाच्या क्लर्क ने पुढची तारीख दिली. एक सुट्टी वाया गेली. आधीच पोलीस खात्यात सुट्टी मिळायची मारामार, त्यात ही एक सुट्टी विनाकारण खर्च झाली. काशीनाथ वैतागला, पण काहीच उपाय नव्हता. आता पुढच्या तारखेला पण सुट्टी घ्यावी लागणार होती. काशीनाथ चडफडत घरी परतला.

अशाच एक एक महिन्याच्या अंतराने चार पांच तारखा वाया गेल्या. दोन वेळा अविनाश वकील हजर नव्हते म्हणून, आणि दोन वेळा केसेस ची गर्दी होती म्हणून. मधल्या काळात काशीनाथ ची धारणीला बदली झाली. त्यामुळे त्याला चार वेळा धारणीवरून यावं लागलं. सुट्ट्या तर वाया गेल्याच वरतून जाण्या येण्याचा खर्च पण झाला. काशीनाथची आता चीड चीड व्हायला लागली होती. त्याला होणाऱ्या मानसिक त्रासाचं काय? त्यांच्या मनात विचार आला. वर्ष होत आलं होतं. एक एक सुट्टी वाया जात होती. खर्च पण वाढत होता. शेवटी एकदाची कोर्टात केस सुनावणीला आली. 

“काशीनाथ, तू यांच्या खाजगी मालमत्तेचं नुकसान केलस आणि त्यामुळे त्यांना मानसिक त्रास झाला. आणि हे तू मुद्दाम केलं असं वादीचं म्हणण आहे. तुला मान्य आहे का?” – न्यायाधीश

“साहेब मी मुद्दाम असं काहीच केलं नाही. मुलांनी कायदा पाळला नाही म्हणून त्यांना फक्त समज दिली. आणि साहेब ते तर माझं कामच आहे.” – काशीनाथ.

“कोणाचा कायदा मुलांनी मोडला?” – अविनाश.

“रात्रीच्या वेळी मुलं सायकल वरुन विदाउट लाइट आणि डबल सीट जात होती. हे कायद्याच्या विरुद्ध आहे. मुलांना सांगितल्यावर त्यांना त्यांची चूक कळली आणि त्यांनी तसं कबूल पण केलं.” – काशीनाथ.

“युअर ऑनर हे सांगतात तसं जर असेल, मुलांनी चूक कबूल केली असेल, तर त्यांना दंड करायाला हवा होता. पण काशीनाथ तुम्ही तसं केलं नाही. का?” – अविनाश.

“साहेब मी दंड केला होता, पण त्यांच्या जवळ दंड भरायला पैसे नव्हते.”– काशीनाथ.

“मग तुम्ही चलान फाडायला हवं होतं. दुसऱ्या दिवशी आम्ही स्वत: पोलीस स्टेशन मधे येऊन दंड भरला असता, पण तसं न करता तुम्ही सायकल ची नासधूस केलीत. युअर ऑनर याला उद्दाम पणा म्हणायचा नाही तर काय म्हणायचं? – अविनाश

“काशीनाथ यावर तुमचं काय म्हणण आहे?” – न्यायाधीश.

“साहेब, शाळकरी मुलं होती, पुन्हा अशी चूक त्यांच्याकडून होऊ नये म्हणून मी एक छोटीशी शिक्षा दिली. चांगल्या घरातली मुलं दिसत होती ती साहेब, त्यांना चांगलं वळण लागावं  एवढीच इच्छा होती साहेब, त्यांना त्रास देण्याचा कुठलाही हेतू माझ्या मनात नव्हता. पण आता मलाही धडा मिळाला साहेब. मी माफी मागतो.”– काशीनाथ

“म्हणजे तुमच्या हातून चूक घडली हे तुम्ही मान्य करता आहात” – न्यायाधीश.

“हो साहेब. मी चुकलो. मला माफी द्यावी.” – काशीनाथ.

“वकील साहेबांनी सायकलच्या नुकसान भरपाई साठी २५० रुपये आणि जो मानसिक त्रास झाला त्यांच्या साठी ५०० रुपये असा ७५० रुपयांचा दावा ठोकला आहे. तुम्हाला गुन्हा कबूल आहे तर ही नुकसान भरपाई द्यावी लागेल.” – न्यायाधीश.

“साहेब, ६० रुपये पगार आहे माझा. त्यावर घर कसं बसं चालतं. माझ घर, शेती काही नाही. इस्टेट जायदाद पण नाही. एवढी मोठी रक्कम मी कशी उभी करू? साठ रुपये पगार असणाऱ्या माणसाला एवढी मोठी रक्कम कोणी कर्जाऊ पण देणार नाही साहेब. साहेब कृपा करा पण एवढी मोठी शिक्षा नका देऊ.” – काशीनाथ

“अविनाश साहेब, हा माणूस खरं बोलतो आहे. इतकी मोठी नुकसान भरपाई देणं याला शक्य होणार नाही.” – न्यायाधीश.

“पण साहेब, गुन्हा घडला आहे, शिक्षा व्हायलाच पाहिजे.” – अविनाश.

“ठीक आहे काशीनाथने गुन्हा कबूल केला आहे म्हणून हे कोर्ट त्याला ३ रुपये दंड करत आहे. हा दंड त्याने उद्या पर्यन्त कोर्टाच्या वेळेत भरायचा आहे. न भरल्यास दर दिवशी ३ रुपये वाढत जातील.

सायकलच्या दुरुस्ती पायी जो काही खर्च आला असेल तो काशीनाथने परस्पर अविनाश वकिलांना द्यावा.

डिसमिस

निकाल ऐकून काशीनाथच्या जीवात जीव आला. त्याने मनोमन ईश्वराचे आभार मानले.

कोर्टाच्या बाहेर पडत असतांना त्याला काशीनाथ अशी हाक ऐकू आली. त्याने मागे वळून पाहिले तर अविनाश वकील त्याला बोलावत होते. त्याला बरंच वाटलं. काशीनाथला त्यांचे आभार मानायचे होते. त्यांनी आग्रह धरला नाही म्हणूनच इतक्या कमी शिक्षेवर सुटका झाली होती.

“या काशीनाथ राव, या चला आपण चहा पियू.” – अविनाश

“अं, चहा?” काशीनाथला आश्चर्याचा धक्काच बसला.

बाकावर बसल्यावर अविनाश वकिलांनी पाकीट काढलं आणि २५ रुपये काशीनाथच्या हातावर ठेवले. काशीनाथ त्यांच्या कडे बघतच राहिला.

“काशीनाथराव तुम्ही माझ्या मुलाला त्रास दिला, म्हणून मी पण एक छोटीशी झलक दाखवली. फिटटं फाट. आता तुम्हाला धारणीवरून बस चा खर्च करून यावं लागलं, सुट्टी घ्यावी लागली. आणि हे सगळं माझ्यामुळे झालं. त्यांची ही भरपाई. घ्या. मला दुरुस्तीचा खर्च नको. तीन रुपये आत्ताच भरून टाका. तुम्ही खूप प्रामाणिक आहात. कोर्टात सुद्धा काहीच खोटं बोलला नाही. एक सांगतो, आयुष्यात तुम्हाला वकिलांची जरूर पडू नये, पण जर कधी पडलीच तर बिनदिक्कत माझ्याकडे या. मी काहीही फी न घेता तुमचं काम करेन. प्रॉमिस.” - अविनाश.

काशीनाथ भारावला. त्यांच्याजवळ बोलायला काहीच शब्द नव्हते.

 

******समाप्त.*****

 

दिलीप भिडे