Share Market Basics - Part 3 in Marathi Short Stories by Mahadeva Academy books and stories PDF | शेअर मार्केट बेसिक्स - भाग 3

Featured Books
Categories
Share

शेअर मार्केट बेसिक्स - भाग 3

अकाऊंट ओपनिंग व प्रायमरी मार्केट गुंतवणूक


मित्रांनो, रोखे बाजारात गुंतवणूक करण्यासाठी पुढील गोष्टींची आवश्यकता असते:


१) बँक अकाऊंट:


रोखे बाजारात गुंतवणूक करण्यासाठी, देशातील कोणत्याही मोठ्या बँकेमध्ये, बँक अकाऊंट असणे गरजेचे आहे. अशी बँक निवडा जिचे एटीएम कार्ड मिळते, जी बँक ऑनलाइन सुविधा देते, जिचे अकाऊंट UPI सुविधांबरोबर लिंक करता येते. यामुळे ट्रेडिंग अकाऊंटमध्ये पैसे टाकणे सोयीस्कर होईल.


२) ट्रेडिंग अकाऊंट:


ट्रेडिंग अकाऊंटचा वापर करून आपण रोखे बाजारातील खरेदी-विक्रीचा व्यवहार करू शकतो. ट्रेडिंग अकाऊंट शिवाय असा व्यवहार करता येत नाही. हे ट्रेडिंग अकाऊंट आपल्याला स्टॉक ब्रोकर्सच्या माध्यमातून काढता येते. आपल्या देशात अनेक स्टॉक ब्रोकर्स उपलब्ध आहेत, त्यांच्याकडे आपल्याला ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने ट्रेडिंग अकाऊंट उघडता येते. ट्रेडिंग अकाऊंट उघडण्यासाठी एक चांगला ब्रोकर निवडणे गरजेचे आहे. सध्या आपल्या देशात grow, zerodha, upstox, angle one, motilal oswal यांसारखे मोठे ब्रोकर्स चर्चेत असतात.


ट्रेडिंग अकाऊंट उघडण्यासाठी साधारणपणे पुढील गोष्टींची गरज पडते: आधार कार्ड, बँक अकाऊंट, पॅन कार्ड, फोटो, सही, मोबाइल नंबर, ईमेल आयडी.


आता आपण ट्रेडिंग अकाऊंट उघडताना कोणती काळजी घेतली पाहिजे ते पाहू:


१) अकाऊंट ओपनिंग फॉर्म व्यवस्थित वाचून घ्या.
२) अकाऊंट ओपनिंग फी, वार्षिक फी, ब्रोकरेज चार्ज किती आहेत ते तपासा व नोंद करून ठेवा.
३) तुम्हाला ज्या विभागात ट्रेड करायचे आहे तोच विभाग निवडा. जसे की, कॅश, फ्युचर्स व ऑप्शन्स, कोमोडिटी वगैरे. तुम्हाला फक्त कॅश मध्येच ट्रेड करायचे असेल तर बाकीचे विभाग निवडू नका, म्हणजे त्या विभागासाठीचे वार्षिक चार्जेस वाचू शकतात.
४) तुमचा ईमेल आयडी नक्की नोंदवा, यामुळे तुमच्या अकाऊंट बद्दलची माहिती वेळोवेळी ईमेलवर मिळत राहील.
५) कोणत्याही डॉक्युमेंटवर सही करण्यापूर्वी ते व्यवस्थित वाचून घ्या.
६) तुम्ही भरलेल्या अकाऊंट ओपनिंग फॉर्मची एक कॉपी ब्रोकरकडून मागून घ्या. जर ऑनलाइन अकाऊंट ओपनिंग फॉर्म भरला असेल तर ती कॉपी डाउनलोड करा.


आता आपण रोखे बाजारात व्यवहार करण्यासाठी आवश्यक असणारी तिसरी गोष्ट पाहू:


३) डीमॅट अकाऊंट:


डीमॅट अकाऊंटमध्ये तुम्ही खरेदी केलेले शेअर्स किंवा रोखे इलेक्ट्रोनिक स्वरूपात ठेवले जातात. कोणताही शेअर होल्ड करण्यासाठी डीमॅट अकाऊंट गरजेचे असते, त्याशिवाय व्यवहार पूर्ण होऊ शकत नाही. साधारणपणे, ब्रोकरकडे जेव्हा तुम्ही ट्रेडिंग अकाऊंट उघडत असता, त्याचवेळी ब्रोकर डीमॅट अकाऊंटचा फॉर्मही भरून घेतो. त्या ब्रोकरची cdsl व nsdl यांपैकी ज्या संस्थेसोबत नोंदणी असेल, तिथे तुमचे डीमॅट अकाऊंट उघडले जाते.


मित्रांनो, या तीन गोष्टी शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी आवश्यक असतात. एकदा या तीन गोष्टी मिळाल्या की तुमच्या ब्रोकरच्या ट्रेडिंग अॅपवर किंवा वेबसाइटवर लॉगिन करून तुमच्या ट्रेडिंग अकाऊंटवर तुम्हाला हवा तेवढा पैसा जमा करावा लागतो, मग त्या पैशाचा वापर करून तुम्ही शेअर्स खरेदी करू शकता. खरेदी केलेले शेअर्स तुमच्या डीमॅट अकाऊंटमध्ये जमा होतात. अशाप्रकारे रोखे बाजारातील व्यवहार पार पडत असतो.


मित्रांनो, एकदा तुमचे ट्रेडिंग व डीमॅट अकाऊंट ओपन झाले की तुमच्या ब्रोकरच्या अॅपवर जाऊन तुमच्या डीमॅट अकाऊंटसाठी नॉमिनी म्हणजेच वारसदार नक्की नोंदवा. मग भविष्यात तुम्हाला काही झाले तर तुमचे शेअर्स तुमच्या वारसदाराला मिळतील. लक्षात ठेवा, तुम्ही रोखे बाजारात केलेली गुंतवणूक तुमच्या डायरीमध्ये लिहून ठेवा व त्याबद्दल तुमच्या कुटुंबातील व्यक्तींना माहिती द्या. असे केल्याने तुमच्या माघारी तुमच्या कुटुंबीयांना त्या पैशाचा क्लेम करणे सोपे होईल.


आता आपण, प्रायमरी मार्केट किंवा आयपीओ मध्ये गुंतवणूक कशी केली जाते ते पाहू:


एखाद्या कंपनीला आयपीओ द्वारे प्रायमरी मार्केटमधून प्रथमच जेव्हा आपले शेअर्स विकायला काढायचे असतात, तेव्हा त्याबद्दल माहिती देणारी जाहिरात ती कंपनी प्रसिद्ध करते. एक निश्चित तारखेपर्यन्तच आपण तिचे शेअर्स खरेदी करण्यासाठी अर्ज करू शकतो. हा अर्ज आपल्याला ब्रोकर्सच्या व बँकेच्या माध्यमातूनही करता येतो. अशाप्रकारे आयपीओ द्वारे शेअर्स वितरित करताना कंपनीने एका अर्जदाराने कमीत कमी अमुक इतके शेअर्स खरेदी केले पाहिजेत अशी अट घातलेली असते. समजा, एखाद्या कंपनीने त्यांच्या आयपीओ मध्ये २५ रु दराने कमीत कमी १०० शेअर्स खरेदी करण्याची अट घातली असेल तर आपल्याला १०० च्या पटीतच शेअर्स खरेदी करता येतात. यालाच १०० चा एक ‘लॉट’ असे म्हटले जाते. मग ३०० शेअर्स खरेदी करायचे असतील तर त्यासाठी १०० चे तीन लॉट खरेदी करावे लागतील. या उदाहरणामध्ये शेअरची किंमत २५ रु प्रती शेअर आहे, म्हणजे एक लॉटसाठी येथे २५०० रु खर्च होतील. समजा राम नावाच्या व्यक्तीने एक लॉट खरेदीसाठी या कंपनीत अर्ज केला, मग एक लॉटसाठी लागणारे २५०० रुपये रामच्या अकाऊंटमध्ये गोठवले जातील, ज्यावेळी त्याला त्या शेअर्सची लॉटरी लागेल तेव्हा त्याचे २५०० रुपये कंपनीच्या खात्यात जातील व जर रामला शेअर्सची लॉटरी लागली नाही तर त्याचे गोठवलेले २५०० मुक्त होतील व त्याला ते नेहमीप्रमाणे वापरता येतील.

मित्रांनो, आपण अर्ज केला म्हणून आपल्याला आयपीओ मध्ये शेअर्स मिळतीलच असे नाही, आपल्यासारखे अनेक लोक त्यासाठी अर्ज करत असतात, मग अर्जदारांनी मागणी केलेल्या शेअर्सची संख्या ही कंपनीकडे विकण्यासाठी उपलब्ध असलेल्या शेअर्सच्या संख्येपेक्षा जास्त असेल, तर ज्यांना त्या शेअर्सची लॉटरी लागेल त्यांना ते शेअर्स मिळतात. एकदा सर्वाना शेअर्स वितरित झाले की ती कंपनी सध्याच्या नियमांनुसार ६ दिवसांमध्ये स्टॉक एक्स्चेंजला लिस्ट केली जाते, त्यानंतर तुम्हाला आयपीओमध्ये मिळालेले शेअर्स सेकंडरी मार्केटमध्ये विकता येतात.


आता आपण, कॉंट्रॅक्ट नोट म्हणजे काय ते जाणून घेऊ:

कॉंट्रॅक्ट नोट:


मित्रांनो, तुम्ही केलेल्या रोजच्या व्यवहाराची माहिती देणारे डॉक्युमेंट म्हणजे कॉंट्रॅक्ट नोट. तुम्ही जर तुमचा ईमेल आयडी तुमच्या ब्रोकरकडे रजिस्टर केला असेल व ईमेल द्वारे कॉंट्रॅक्ट नोट प्राप्त व्हावेत असा पर्याय निवडला असेल तर तुम्ही केलेल्या रोजच्या व्यवहाराची माहिती कॉंट्रॅक्ट नोट मध्ये तुम्हाला तुमच्या ईमेलवर २४ तासाच्या आत ब्रोकरकडून पाठवली जाते. यामुळे रोखे बाजारात आपण केलेल्या व्यवहारांचे एक रेकॉर्डच आपल्याकडे तयार होते.

मित्रांनो, शेअर मार्केट व्यवस्थित शिकायचे असेल तर https://t.me/mahadeva_academy1 या टेलेग्राम चॅनलला जॉइन करा. यासोबतच तुमच्या प्रतिक्रिया कळवा व पुढील भाग नक्की वाचा, धन्यवाद!