आज सकाळीच मी माझं आवरून ऑफिस साठी निघाले . ट्रेन अगदी वेळेवर आली होती आणि मी नेहमीप्रमाणेच धावत पकडली होते. मी धावत आल्यामुळे मला धाप लागली होती , मी आतमध्ये जाऊन एक मुली शेजारी डोळे बंद करून बसले होते . हा ! पण डोळे मिटून म्हणजे झोपले नव्हते हा ! मी अचानक मध्येच हसू लागले जसं काही विनोदी स्वप्न पडलं होतं. पण तसं काही नव्हतं तर मी माझ्या बाजूला बसलेल्या मुलीचे शब्द ऐकून हसत होते जे मी गेले पंधरा मिनिटापासून दुर्लक्ष करत होते !
मी त्या मुलीचे बोलणं लपून ऐकत होते असं नाही तर ती अश्या प्रकारे बोलत होती की आजूबाजूचे लोक ते इच्छा नसतानाही ऐकणारच ! आणि हा कदाचित ते नवीन नवीन प्रेम असेल !!! आता मला हसू कशाने आलं असेल हे सांगते बरं…
ती मुलगी सतत फोन वरील मुलाला ,” तु माझ्या सोबत बिलकुल बोलु नकोस ! माझी इच्छा नाही रे बोलण्याची.. तु नेहमी मला असं फसवतोस… ! आणि इतकं बोलून ही फोन चालू च होता !
एकंदरीत त्यांच्या बोलण्यावरून इतकं माझ्या लक्षात आलं होतं की त्या मुलाची ती मुलगी स्टेशनवर वाट बघत होती आणि तिने काही वेळ वाट पाहिल्यानंतरही तो आला नाही.. म्हणून ती समोर आलेल्या ट्रेनमध्ये रागाने चढून गेली.
तिच्या काहीतरी कामासाठी ते चालले होते. अर्थात त एक महत्त्वाचं काम असावं आणि तिने त्याचीही बराच वेळ वाट पाहिली असावी , तरीसुद्धा तो आला नाही आणि थोडक्यासाठी अगदी त्याची ती ट्रेन चुकली होती ! तो बऱ्याच वेळा तिला विनवणी करत होता , अग्गं माझ्या आई मला माफ कर , मला माफ कर म्हणून तो बराचदा तिला अगदी कान पकडून माफी मागतोय की काय असा त्यांच्या बोलण्याचा अंदाज कोणीही बांधू शकत होता ...इतकं सहज आणि स्पष्ट ती मुलगी बोलत होती. पण दोघांचा एकमेकांवर असलेलं नवीन नवीन प्रेम लगेच लक्षात येत होतं . मला खूप छान वाटत होत . तितक्यात थोड्या वेळाने ती मुलगी घाई घाईने जागेवरून उठली आणि तिला ज्या स्टेशनवर उतरायचं होतं , त्याच्या आधीच उतरली होती आणि अगदी खूप घाई घाई मध्ये उतरली . सर्वच लेडीज अचानक तिच्यासाठी ओरडू लागल्या ..अगं ट्रेन सुरू होईल... ट्रेन सुरू होईल आणि ती चालत्या ट्रेन मधूनच उतरली . म्हणजे तिला त्या स्टेशनवर उतरायचं नव्हतं पण ती ज्या अर्थी अचानक उतरली होती त्यावरून त्या मुलाने केलेल्या विनवणी मुळे कदाचित हार मानली असावी तिने ! आणि ती त्याच्यासाठीच त्या स्टेशनवर उतरणार होती ! कदाचित तो नंतरच्या ट्रेनने येत असावा असा मी अंदाज बांधला होता ! पण जे काही होतं .. खूप छान होतं आणि कदाचित हेच ते विनोदी प्रेम होते !
माझ्या ऑफिस समोरच एक कॉलेज आहे. मला रोजच ऑफिसला जाता - येताना बरेच शी जोडपी दिसतात. वेगवेगळ्या ठिकाणी बसलेले असतात . कधी ऑटोमध्ये असतात तर कधी समोर असलेल्या चहाच्या टपरी मध्ये तर कधी वडापावच्या दुकानासमोर तर कधी अगदीच गार्डनमध्ये असतात. अशा बऱ्याच ठिकाणी मी त्यांना पाहत असते . बऱ्याच वेळा मी त्यांच्याकडे दुर्लक्षही करत असते. पण काही विनोदी गोष्टी अशा असतात की माझं लक्ष त्या वेधून घेणारच !
त्यातीलच एक किस्सा असा आहे की .. एक दिवस ट्रेडिशनल डे सेलिब्रेशन चालू होता. तिथे बऱ्याचशा मुली साडी नेसून आल्या होत्या आणि मुलंही खूप असं ट्रेडिशनल ड्रेसिंग मध्ये खूप छान तयार होऊन आले होते.
मला पाहण्यासाठी असं खूप खूप काही तिथे होतं . तितक्यात अचानक माझ्यासमोर एक मुलगी साडी नेसून अगदी धावत जाताना दिसली आणि तीही रडत ! मी थोडा वेळ तिच्याकडे पाहतच बसले की ही मुलगी इतकी छान साडी नेसली असताना, इतकी छान दिसत असताना , रडत का असावी बरं ? आणि तेही धावत चालली... कुठे चालली असावी... माझ्या ऑफिस कडे जाणाऱ्या रस्त्यावरच ती धावत होती म्हणून ती मला दिसतच होती . मी थोडा वेळ पाहत राहिले.. हि नक्की कुठे जात आहे! काही अंतरावर एक मुलगा उभा होता. ती त्याच्याच दिशेने धावत जात होती ! थोड्याच वेळात त्या मुलाच्या बाजूला जाऊन ती थांबली आणि ती अजून जोराने रडू लागली ! त्या मुलाने तिचा हात पकडला होता आणि तो तिला तिथून निघण्यासाठी बोलत होता , असं मला वाटत होतं.
तो तिला कुठेतरी घेऊन जात असावा असं दिसत होता पण ती मुलगी त्याला नाकारताना मला दिसत होतं .
थोड्या वेळात मी त्यांच्यापासून काही अंतरावर जाऊन उभी राहिले. जेणेकरून मला नक्की काय चाललं आहे याचा थोडासा तरी अंदाज येईल... फक्त जर तो मुलगा त्या मुलीला त्रास देत नसेल ना किंवा काही इतर गोष्टी नाही ना म्हणून मी ते ऐकण्याचा प्रयत्न करत होते पण मी ऐकल्यानंतर मात्र मला हसू आलं .
माझ्या कानावर जे पडलं होतं ते म्हणजे , " मी तुला सांगितलं होतं की उद्या कॉलेजला जायचं नाही ! तरी तू का आलीस आणि तेही अशी !" हे ऐकल्यानंतर मी हसणारच ना .. ? कारण तो मुलगा हे वाक्य त्या मुलीला म्हणत होता. कदाचित तो तिचा बॉयफ्रेंड होता आणि ती त्याची गर्लफ्रेंड होती .
त्याने तिला कॉलेजमध्ये साडी नेसून येण्यासाठी परमिशन दिली नव्हती , तरीसुद्धा ती आली होती ! म्हणून हे सगळं चालू होतं .
आणि म्हणूनच त्या मुलाने तिला जिथे आहे तिथून त्याच्याकडे बोलावून घेतलं होतं आणि तो आता तिला माझ्यासोबत इथून चल असं म्हणत होता आणि त्या बिचाऱ्या मुलीचा जीव सगळा त्या ट्रेडिशनल डे सेलिब्रेशन मध्ये गुंतला होता ! म्हणून ती रडत होती !
अर्थातच तिच्या मैत्रिणी मित्र इतके छान नटून-थटून आले होते की तिला तिथे एन्जॉय कराव असं वाटणारच पण हे प्रेम आणि प्रेम हे विनोदी असतं आपल्याला माहीतच आहे आणि मग ती नाइलाजाने त्याच्या सोबत रडत रडत , आपली छान साडी नेसून नटून - थटून तिथून निघून गेली आणि हा विनोदी किस्सा लक्षात राहीला !
आता प्रेमाचा तिसरा आणि शेवटचा विनोदी आणि भावूक किस्सा !
मी प्लॅटफॉर्म वर पोहचले आणि माझी नेहमीची ट्रेन मिस झाली . एक ट्रेन मिस झाली की मला एक तासानंतर ट्रेन होती . तितका वेळ आता काय करणार तर फक्त मोबाईल आणि आजूबाजूचे निरीक्षण !
एक मुलगा बराच वेळ माझ्या बाजूच्या बाकावर बसला होता . बिचारा सतत समोरील ब्रीजकडे बघत होता . त्याला माझ्यामुळे अस्वस्थ वाटायला नको म्हणून मी माझ्या मोबाईल मधे टाईमपास करत बसले . तितक्यात एक मुलगी एकदम धावत ब्रीजवरून येताना दिसली . तिची सँडल थोडी हील ची होती .म्हणून तिच्या चालण्याचा आवाज येत होता. आणि माझ लक्ष तर लगेच वेधून घेतलं तिने ! तितक्यात ती मुलगी माझ्या जवळच्या मुलाच्या दिशेने येताना दिसली . ती त्याची जवळ आली आणि अर्थातच तिने माझं लक्ष वेधून घेतलं म्हणजे जो वाट पाहत होता त्याच तर लक्ष वेधणारच ! मला काही कळण्याआधीच तिने त्याच्या एक जोरात कानाखाली लावून दिली होती . इतक्या जोरात कानाखाली आणि ते ही प्लॅटफॉर्म वर मी तर शॉक मध्ये गेले !
मुलगा तर एकदम शांत, साधा दिसत होता . मुलगी तर एकदम डॅशिंग आणि रोखठोक दिसली . पण प्रेम तर हे होत, तिने एक लावून दिल्यानंतर ही तो मुलगा खाली बसून उठ बस करू लागला , ते ही प्रत्येक उठक या बैठक बरोबर तो सॉरी सॉरी म्हणत होता . मला ही खूप वाईट वाटत होत . या दोघांचं नक्की काय झालं असावं हे मला जाणून घेण्याची खूपच उत्सुकता होती . तितक्यात ती मुलगी बोलू लागली ... अरे ! बिनडोक , ....( २ - ३ ) शिव्या देउन ,' तु इतक्या दिवस झोपला होतास ! आणि तुला आजच झोपेतून उठायचं होत का ? अरे , बिनडोक ! बोलणार आहेस का काही ! '
आणि हा त्याने उठक बैठक थांबून काही तरी बोलण्यासाठी तोंड उघडणारच तितक्यात ती... ’ये चूप! तुला माहित आहे , मी माझ्या बापाची इज्जत घालून इकडे आली आहे ! अरे ती माणसं आज तिसऱ्या वेळेस आमच्याकडे आली होती ! तु आधीच्या दोन वेळेस कुठे मेला होता अस त्याच्यावर ओरडून ओरडून बोलत होती ! आणि पुढे म्हणाली ती म्हणाली ..( जे ऐकण्यासाठी माझे कान आतुर होते)
, “तो मुलगा मला बघून गेला , त्याने होकार दिला आणि मला ही ठीक वाटला ! पुन्हा दुसऱ्या वेळेस ते लोक आमच लग्न जुळवून गेले ! हे ऐकताना तुझे कान कुठे होते ? आणि हो तेव्हा नाही तू कुठे जीव द्यायला गेलास ? आज कुठून तुझा जीव तुला जास्त झाला आहे ! अरे , मी तुझ्या फोन मुळे सगळ्यांसमोर मी हे लग्न करू शकत नाही ! बाकी सगळं माझ्या मम्मी पप्पांना सांभाळून घ्यायला सांगून इकडे पळत आली आहे ! माहित नाही घरी गेल्यावर मला किती आणि काय ऐकावं लागणार आहे ! आणि हो! तुझ्यामुळे मी इथे आली म्हणून तूच घरी येऊन बाकीच काय ते बघ! आणि तिथे जाऊन कोणी नाही ऐकलं तर जीव दे तू !“
हे ऐकून माझ्या चेहऱ्यावर हसू आलं , मला सगळ समजलं होत ! ते कोण होते ? कुठे भेटले ? हे काहीच माहित नव्हतं पण त्याचं काय झालं आणि काय होणार याची कल्पना आली!
थोड्यावेळाने ती, ओरडली ये बिनडोक आधी ते थांबव , आणि नीट उभा रहा ! तो बिचारा तीच सगळ शांतपणे ऐकत होता . तो लगेचच नीट उभा राहिला . त्याने लहान मुलांसारखी तिला मिठी मारली ! त्या मुलीच्या डोळ्यात हलकेसे अश्रू येतेना मला दिसले , ती त्याला प्रेमाने मारू लागली ! “ती इतक्या दिवस कुठे झोपला होतास ? इतक्या भावना कशा लपवून ठेवल्यास ? अरे मला रोज भेटत होतास, मी तर तुला सगळंच सांगत होती , मग तू हे का नाही बोललास कधी ?" तो तिच्याकडे प्रश्नार्थक चेहऱ्याने पाहत होता ! ( मी आता बोलु का ?)
तितक्यात ती म्हणाली , बोल आता ! तो म्हणाला , तू कधी या पद्धतीने मला प्रतिसाद दिलाच नाही ! सहा वर्ष मी वाट बघत होतो. पण कधी तू माझ्या बद्दल अस विचार करू शकतेस अस वाटलं नव्हतं !
आणि आता तर काही दिवस सतत या मुलाच इतक कौतुक करत असायची , जे तू माझ कधीच केलं नव्हतं ! तू इतकं एक भेटीत त्याच कौतुक केल्यावर मी माझ्या मनातल्या भावना कसा सांगू?" मला बऱ्याच दिवसापासून झोप नाही लागत , कोणत्याच गोष्टीमध्ये लक्ष लागत नाही ! म्हणून आज तुला तिथून बाहेर काढण्यासाठी , "मी जीव देईल.. तू आताच्या आत्ता इथे आली नाहीस तर ! अस बोलावं लागलं ! " वॉव ! किती रोमँटिक होत हे !
दोघे खूप इमोशनल झाले होते ! आणि मी ही !
तितक्यात माझ्या ट्रेन ची अनाउन्समेंट ऐकू आली , थोड्याच वेळात माझी ट्रेन येणार होती ! पहिल्यांदाच मला ट्रेन लेट येऊ दे! असं वाटत होत पण तस नाही झालं ! आणि माझी ट्रेन आली आणि मी त्याच्या या गोड प्रेम किस्साचा निरोप घेतला!!!