Sunayna - 2 in Marathi Love Stories by Vrishali Gotkhindikar books and stories PDF | सुनयना - भाग 2

Featured Books
Categories
Share

सुनयना - भाग 2

त्याच्याकडे अजिबात न बघता खाली बघत आईने दिलेल्या भाज्या तिने पिशवीत भरल्या आणि त्या दोघी पुढे निघाल्या .बाजारात तिचा एक हात कायम आईच्या हातात होता .तिची आई सोबत असताना असा पाठलाग करणे बरे नव्हते त्यामुळे तो त्यांच्या पासुन बर्याच अंतरावर राहुन त्यांना न्याहाळत राहिला .पुढे एक दोन ठिकाणी भाजी घेतल्यावर बाजाराच्या कोपर्यावर त्या फळाच्या दुकानात आल्या .तिथे मात्र ती काही फळे हातात घेऊन  आईला हे घे, ते घे असे सुचवत होती .फळांची खरेदी झाल्यावर ती आईला काहीतरी म्हणाली तसे तिच्या आईने दोन शहाळी विकत घेतली .तिच्या हातातली पिशवी खाली ठेवली आणि नारळ पाणी प्यायला तिच्या हातात दिले .ती खुप खुश दिसत होती .आणि अगदी चवीने पाणी पीत होती ,तिचे पाणी पिऊन झाल्यावर आईने एक शहाळे प्यायले .या अवधीत ती फक्त इकडे तिकडे पहात होती .मग मात्र दोन दोन पिशव्या उचलून दोघी मार्केट बाहेर पडल्या .त्या कोणत्या दिशेला जातात हे पाहायला तोही बाहेर पडला .पण समोरच एका रिक्षाला हात करून दोघी त्यात बसुन निघुन गेल्या .त्याने मग फुटपाथ ओलांडून आपली मोटारसायकल घेतली आणि रूम वर परत आला .आज तिला पाहुन तो अगदी वेडा झाला होता !!विशेषतःतिचे डोळे त्याला फारच मोहात पाडत होते .आता एकदा संधी साधुन नक्की तिची ओळख करून घ्यायची हे त्याने पक्के ठरवले .नंतर पाच सहा दिवस काहीच घडले नाही .मग मात्र एकदा संध्याकाळी एका मैत्रिणी सोबत ती त्याला दिसली तो पण त्यांच्या मागे काही अंतर ठेवून चालु लागला .त्या दोघी एका  कॉफी शॉप मध्ये शिरल्या .आज तिने निळा कुर्ता आणि काळा टाईट स्कर्ट घातला होता केसाला काळी पिन लावून अर्धवट बांधले होते हातात पांढरी पर्स होती .त्यांच्या जवळचे टेबल त्याने पकडले .आता ती त्याच्या अगदी समोर होती .तिच्या डोळ्यातील काजळाची रेघ ,आणि तिने लावलेली गुलाबी लिपस्टिक पण त्याच्या नजरेत येत होती .तिच्या एकंदर पोशाखवरून आणि “गेटअप” वरून ती खुप श्रीमंत घरातली लाडकी लेक असावी हे मात्र त्याच्या लक्षात आले होते .ती आणि मैत्रीण दोघींनी बटाटेवडा आणि कॉफी मागवली होती .त्याने पण स्वतासाठी तेच ऑर्डेर केले ,आणि त्यांचे लक्ष जाणार नाहीत इतपत त्यांच्यावर नजर ठेवून राहिला .खाण्याचे येईपर्यंत त्या एकमेकांशी अगदी तल्लीन होऊन बोलत होत्या .हॉटेलच्या गोंगाटात फार स्पष्ट बोलणे ऐकु येत नव्हते .पण एखाद्या कार्यक्रमाची तयारी चालली असावी असे वाटत होते .कारण ती पण अगदी उत्साहाने हातवारे करीत काहीतरी बोलत होती .आज तिच्या कडे अगदी पाहत रहावेसे वाटत होते .विशेषतःतिचे सुंदर तपकिरी काजळ रेष ओढलेले डोळे ..थोड्या वेळात दोघांच्या ऑर्डर्स आल्या .तिच्या मैत्रिणीने बटाटेवड्याची बशी तिच्यासमोर सरकवली आणि तिच्या हातात चमचे दिले .तिने खायला सुरवात केल्यावर मैत्रीण पण खाऊ लागली .त्याने पण तिच्याकडे चोरटे कटाक्ष टाकत खाणे सुरु केले .बरेच वेळा त्याची तिची नजरानजर झाली पण तिने त्याला अजिबात ओळख दिली नाही .एकंदरीत तुसडा स्वभाव होता वाटत होता तिचा .त्याला समजले ती आपल्याकडे दुर्लक्ष करते आहे .नंतर कॉफी आल्यावर मैत्रिणीने आधी तिच्या हातात कप दिला आणि मगच स्वतःघेतला .त्याच्या मनात आले हिच्या जवळची माणसे हिची फारच काळजी घेतात नशीबवान आहे अगदी ..!!आज मात्र हिची ओळख करून घ्यायचीच असे पक्के ठरवले होते .पण कॉफी संपताच अचानक त्यांच्या ओळखीची तीन चार माणसे हॉटेल मध्ये आली आणि बघता बघता सर्वजण एकत्र हॉटेल मधुन बिल देऊन बाहेर पडले सुद्धा आणि मग अजिंक्यच्या मनातले मनातच राहिले .असु दे किती पण शिष्ट...हिच्याशी बोलायचेच पुढील वेळी असे त्याने पक्के ठरवले  भेटेल की पुन्हा कधी ..तरी जातेय कुठे  . गेला महिनाभर तो सतत रस्त्यावर ,हॉटेल मध्ये ,दुकानात सगळीकडे बारीक नजर ठेवुन होता ,पण त्याची लाडकी “सुनयना “ कुठ्ठे कुठ्ठे दिसली नाही .नेहेमी कुठे न कुठे भेटणारी ही “परी “अचानक कुठे गायब झाली बरे ?अजुन पंधरा दिवस उलटले तरी तिचा काहीच पत्ता अजिंक्यला लागला नाही .त्याचे मन अस्वस्थ झाले .ती हा भाग सोडुन तर गेली नसेल न .?पण नुसतेच तर्क करीत बसण्यावाचून तो काहीच करू शकत नव्हता.     असाच एके रविवारी त्याला त्याचा जुना मित्र दीपक गाठ पडला .दीपक एक समाजसेवक होता .आपली नोकरी सांभाळून सामाजिक घडामोडीत कायम अग्रेसर असणारा .“अरे यार दीपक आहेस कुठे तु ?किती दिवस झाले लेका पत्ताच नाही तुझा .आणि फोन पण बंद होता ..”“हो रे अजिंक्य अरे हिमाचल प्रदेश मध्ये दुर्गम ठिकाणी शाळा काढायची आहे त्याच्या सर्वे साठी गेलो होतो .जवळ जवळ दहा दिवस तिथेच होतो .कालच परत आलो ,आता ते शाळेचे काम हातात घ्यायचे आहे पुढील महिन्या पासुन “दीपक बोलला .अजिंक्यला त्याचे कौतुक वाटले ,खरेच नोकरी सांभाळून फारच भागदौड करीत असतो हा .“चल संध्याकाळी मस्तपैकी पिक्चर टाकु..रात्री जेवायला पण जाऊ .खुप दिवसात आपल्या गप्पा पण नाही झाल्या मनसोक्त “