Gurujan in Marathi Moral Stories by संदिप खुरुद books and stories PDF | गुरुजन

Featured Books
Categories
Share

गुरुजन

 

(खास विद्यार्थ्यांसाठी संस्कारमोती या सदराखाली लेखमाला)

3.    गुरुजन

 

            आपल्या जिवनाचे खरे शिल्पकार हे आपले गुरु असतात. चिखलाला आकार दिल्यानंतरच त्याला महत्व प्राप्त होते. आपणही एखाद्या त्या चिखलासारखेच असतो. जोपर्यंत आपल्याला गुरु नसतो तोपर्यंत आपणही आकारहीनच असतो. गुरु आपल्याला ज्ञान देवून आपल्या जीवनाला आकार देण्याचे मोलाचे काम करतात. आई – वडीलानंतर आपले जीवन सुधारण्याचं महत्वपूर्ण काम हे गुरुच करत असतात.

            गुरुही आई - वडीलांप्रमाणेच आपल्या चांगल्यासाठीच आपल्यावर रागावतात. त्यांच्या रागावण्याचे कधीच वाईट वाटून घ्यायचे नसते. ज्ञानाविना आपली किंमत कवडी मोलाचीही नसते. ज्या ज्ञानाने आपल्याला किंमत प्राप्त होते. ज्या ज्ञानामुळे आपल्या जीवनाला अर्थ प्राप्त होतो. ते ज्ञान देण्याचं काम आपले गुरु करत असतात. त्यामुळे नेहमी त्यांचा आदर करा. त्यांच्या समोरच काय त्यांच्या पाठीमागेही कधी त्यांच्या विषयी अपशब्द बोलू नका.

            जीवनाच्या वाटेवर आपल्याला रस्ता दाखवणारा कोणी नसेल तर आपण आपला जीवनाचा मार्ग चुकल्याशिवाय राहणार नाहीत. आपल्या जीवनाच्या आरंभापासून अंतापर्यंत, आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपल्याला गुरुची आवश्यकता असते. आपले पहिले गुरु हे आपले आई – वडील असतात. त्यानंतर शालेय जीवनामध्ये आपल्याला गुरु मिळतात. आपण प्रामाणिकपणे त्यांच्या आज्ञेचे पालन करत राहायचे. आपल्या ज्ञानामध्ये आपोआपच अधिकाधिक भर पडत राहते.

            आपण या जगामध्ये आल्यानंतर सुरुवातीला खूप अज्ञानी असतो. त्यानंतर हळूहळू आपण एक एक गोष्ट शिकु लागतो. खाणे, बोलणे, चालणे या सारख्या प्राथमिक क्रिया आपण शिकतो. जसजसे मोठे होत जातो तसतसे आपण आणखी शिकत जातो. माणूस मरेपर्यंत विद्यार्थीच असतो. आपण कितीही ज्ञान मिळवलं तरीही आपलं खूप ज्ञान मिळवायचं बाकी राहतं.

            साधी कल्पना करा. तुम्हाला लहाणपणीच एखाद्या निर्जन स्थळावर सोडून दिले तर तुमची काय अवस्था होईल ? ज्ञान मिळवणं तर दूरची गोष्ट आहे. तुम्हाला जगणं कठीण होवून जाईल. तुम्ही लहाणपणापासून या समाजात राहता. हळूहळू प्रत्येक गोष्ट शिकत जाता. समाजातील प्रत्येक घटक, प्रत्येक व्यक्ती प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष तुमचा गुरुच आहे. तुम्ही त्या प्रत्येकाकडून काही ना काही शिकत असता.

            आपल्याला जर ज्ञान नसेल तर आपली कशी अडचण होऊ शकते त्याबाबत पुढील एक उदाहरण वाचा.

            एक व्यक्ती एका निर्जन स्थळी अडकतो. अंधार झाल्यामुळे त्याला त्याच ठिकाणी मुक्कामाला थांबण्याची वेळ येते. त्याच्या जवळ मोबाईलही नाही. या ठिकाणावरून दुसऱ्या दिवशी त्याला पूर्व दिशेला जायचे असल्याचे एका व्यक्तीने त्याला सांगीतले आहे. दुसऱ्या दिवशी सकाळ होते. सूर्य उगवतो. तरीही त्याला पूर्व दिशा कळत नाही. याचा अर्थ काय की त्याला सूर्य पूर्व दिशेला उगवतो याचे ज्ञान नाही. या उदाहरणावरून तुम्हाला ज्ञान आणि ज्ञान देणाऱ्या गुरुजनांचे महत्व लक्षात आले असेल. जीवनाच्या प्रत्येक प्रसंगी ज्ञान आवश्यक आहे. आणि ज्ञान मिळवण्यासाठी गुरु आवश्यक आहे.

            आजच्या शालेय विद्यार्थ्यांचं निरीक्षण केलं तर ते त्यांच्या गुरुंची टिंगल टवाळी करताना दिसून येतात. त्यांच्या पाठीमागे अपशब्द बोलतात. ज्या गुरुमुळे आपल्याला ज्ञान प्राप्त होते. ज्या गुरुमुळे आपल्या जीवनाला अर्थ प्राप्त होतो. त्या गुरुंचा अपमान व त्यांचा अनादर करणे ही बाब कितपत योग्य आहे ? आपल्या गुरुंचा कधीही अपमान करु नका. त्यांच्यामुळेच आपल्यासारख्या चिखलाच्या गोळयाला आकार प्राप्त होत असतो.

            तुम्हाला जर मोठा व्यक्ती व्हायचं असेल. आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल. तर तुम्हाला आधी ज्ञान मिळवावं लागेल. ज्ञान मिळवण्यासाठी तुम्हाला गुरुंचा आदर करायला शिकावे लागेल. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपल्याला गुरु मार्गदर्शन करत असतात. त्यामुळे आपल्या आई - वडीलांइतकेच महत्त्व आपण आपल्या गुरुला द्यायला हवे.

            तुमच्या आयुष्यात शालेय जीवनातील व सामाजिक जीवनातील सर्व गुरुजनांचा आदर करा. त्यांच्याकडून नम्रतेने ज्ञान ग्रहण करत राहा. ज्ञानी बनत राहा.

 

लेखक - संदीप खुरुद