(खास विद्यार्थ्यांसाठी संस्कारमोती या सदराखाली लेखमाला.)
2.अभ्यास कसा करावा ?
विद्यार्थी मित्रांनो ! अभ्यास करायचा म्हटलं की आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या कपाळावर अटया पडतात. अभ्यास करणं म्हणजे आपल्याला खूप कंटाळवाणं काम वाटतं. कधी - कधी आपले पालक आपल्याला जबरदस्तीने अभ्यासाला बसवतात. त्यांच्या धाकामुळे जरी आपण अभ्यासाला बसलो तरी आपले मन बाहेर घिरटया घालत असते.
तुम्हाला वाटतं का? अभ्यास फक्त तुम्हालाच करावा लागतो. तर तुम्ही साफ चुकीचे आहात. जे शाळेत जातात त्यांना अभ्यास करावाच लागतो. मोठी माणसंही अभ्यास करुनची मोठी झालेली आहेत. तुम्ही जगातल्या कोणत्याही महान व्यक्तीचं उदाहरण घ्या. ते व्यक्ती केवळ अभ्यासाच्या जीवावरच मोठे झाले आहेत. आज अभ्यास करण्याचं एक तंत्र तुम्हाला सांगतो. आपली शाळा आणि शिकवणी संपल्यानंतर आपल्याकडे खूपच कमी वेळ राहतो. दिवसभर आपला मेंदू थकून गेलेला असतो. तुम्हाला खेळण्यासाठी जास्त वेळ हवा असेल तर तुम्ही शाळेत किंवा शिकवणीमध्ये आपले गुरुजन शिकवत असताना लक्षपूर्वक ऐकले पाहिजे. त्यामुळे तुम्हाला नंतर जास्त वेळ अभ्यास करण्याची गरज पडणार नाही. कारण तुम्ही शिकवताना लक्षपूर्वक, एकाग्र चित्ताने ज्ञान ग्रहण केलं तर तेथेच तुमचा बराच अभ्यास होतो.
तुम्हाला आणखी एक करता येईल. दुसऱ्या दिवशी आपले गुरुजन जे शिकवणार आहेत. तो धडा, कविता किंवा ते प्रकरण आदल्या दिवशी काळजीपूर्वक वाचून काढा. तुम्ही वाचल्यानंतर तुम्हाला त्या दिवशी काही प्रमाणात कळेल. आणि दुसऱ्या दिवशी ते लवकर समजण्यास व लक्षात राहण्यास तुम्हाला मदत होईल. बऱ्याच विद्यार्थ्यांना काही विषय अवघड वाटतात. अशावेळी हार न मानता त्या विषयाकडे इतर विषयांपेक्षा थोडे जास्त लक्ष द्यावे. एक गोष्ट लक्षात ठेवा. पाण्याची धार सतत एखाद्या दगडावर पडत राहिली तर तो दगड कितीही कठीण असला तरी झिजतो. त्याचप्रमाणे एखादा विषय कितीही अवघड वाटत असला तरी तो समजून घेण्याचा प्रयत्न करा. तो विषय तुम्हाला कालांतराने सोपा वाटु लागेल.
उदाहरणादाखल गणित विषय घ्या. गणित विषय बऱ्याच जणांना अवघड व कंटाळवाणा वाटतो. त्याचे मुळ कारण आहे त्यामधील पहिल्या पायऱ्यांकडे आपण दुर्लक्ष करतो. त्या पहिल्या पायऱ्या म्हणजे अंक, पाडे बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार ईत्यादी. लक्षात ठेवा घर बांधताना पाया पक्का असावा लागतो. त्याप्रमाणे गणित शिकताना वरील प्राथमिक क्रिया पक्कया असाव्या लागतात. या क्रिया तुम्ही शिकून घेतल्यानंतर व गणितातील सुत्र पाठ केल्यानंतर तुम्हाला अवघड वाटणारा गणित विषयही सोपा वाटु लागेल.
मराठी व हिंदी विषयाचा अभ्यास करताना व्याकरण लक्षात घ्या. त्यामधील धडे एखाद्या गोष्टीप्रमाणे व चित्राच्या रुपात लक्षात ठेवा. इंग्रजी विषयाचा अभ्यास करताना इंग्रजी बाराखडी, व्याकरण, शब्दार्थ यांचा प्रामुख्याने अभ्यास करावा. तसेच त्यामधील धडे आपल्या मातृभाषेमध्ये लक्षात ठेवावेत.
इतिहास विषय काही जणांना कंटाळवाणा वाटतो. अशावेळी तारखा व इ.स. आपल्या मित्रांच्या जन्मतारखेनुसार लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. इतिहासातील कोणता व्यक्ती कोणत्या व्यक्तीच्या पूर्वी जन्मला आहे या बाबी लक्षात ठेवा. इतिहासातील युद्ध, क्रांती, उठाव, स्वातंत्र्यसंग्राम हे ही एखाद्या गोष्टीप्रमाणे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा.
भूगोल हा विषय आपल्याला आपली पृथ्वी आणि त्यावर असलेल्या नैसर्गिक आणि मानवी घटकांचा अभ्यास यांबद्दल शिकवतो. पृथ्वी, पर्वत, नद्या, प्राणी, वनस्पती, हवामान तसेच शहरे, संस्कृती याबद्दल भूगोल विषय आपल्याला माहिती सांगतो. सदर विषयामध्ये आपण रुची दाखवली व व्यवस्थित समजून घेतला तर भूगोल विषयही खूप सोपा वाटु लागतो.
विज्ञान विषयामध्ये प्रामुख्याने आपण वस्तु, ऊर्जा, पदार्थ आणि त्यांच्या अभिक्रिया, सजीवांच्या जीवन प्रणालींचा अभ्यास, पृथ्वी व तिच्या घटकांचा अभ्यास तसेच ग्रह, तारे यांचा अभ्यास शिकतो. विज्ञान विषयाचा अभ्यास करताना प्रामुख्याने आकृत्या लक्षात ठेवाव्यात. एखादा घटक समजला नाही तर पुन्हा पुन्हा वाचावा. वरील विषयांप्रमाणेच नागरिकशास्त्र, अर्थशास्त्र व इतर विषयांचा अभ्यास करावा. प्रत्येक विषयाचा अभ्यास करताना जुन्या प्रश्नपत्रिका अभ्यासाव्यात. कोणत्या घटकाला किती मार्क आहेत. याचा विचार करुन त्या घटकाचा किंवा त्या प्रकरणाचा किती अभ्यास करायचा व त्यासाठी किती वेळ द्यायचा याबाबत योग्य नियोजन करा.
एखादा विषय आपल्याला अवघड वाटत असेल. त्यामधील बाबी आपल्या लक्षात राहत नसतील तर एक एक गोष्ट आपल्या वहीवर दहा - दहा वेळा लिहून काढा. मग ती गोष्ट तुमच्या कधीच विस्मरणात जाणार नाही. अभ्यास करणे आपल्याला सुरुवातीला नको वाटते. पण एकदा अभ्यासाला सुरुवात केली तर आपले मन प्रसन्न होते. अभ्यास केल्याने आपल्या मनाला समाधान मिळते. अभ्यासाचा अतिताण घेवून कधीच अभ्यास करायचा करु नका. मोकळया व आनंदी मनाने अभ्यास करायला सुरुवात करा. एकदा का तुम्हाला अभ्यासाची सवय झाली तर तुम्हाला रोज अभ्यास करावासा वाटेल. प्रत्येकाला दिवसाचे चोवीस तासच मिळत असतात. त्यामुळे आपल्या दिवसातील वेळेचे योग्य नियोजन करा. मग तुम्हाला खेळण्यास व अभ्यासालाही वेळ मिळेल.
अभ्यास करण्यासाठी आपल्या मनाची तयारी असावी लागते. कोणतीही गोष्ट मनातून केली तरच माणूस यशस्वी होतो. तुम्ही आता वरीलप्रमाणे गोष्टी लक्षात घेवून आनंदाने अभ्यास कराल अशी आशा बाळगतो आणि या विषयावर येथेच थांबतो. धन्यवाद !