कृतांत भाग३ षटकोनी आकाराच्या या मैदानात एक पन्नास वर्षांचा प्रौढ इसम गुडघ्यांवर बसून रडत रडत दयेची भीक मागत होता.सभोवार असंख्य लोक बसले होते. मैदानाच्या पूर्वेकडच्या सज्जात एक अत्याधिक सुंदर युवती बसली होती. सौंदर्यांची व्याखा तिला बघूनच सुचली असावी एवढी ती सुंदर होती.ती सुंदरी दुसरी तिसरी कुणी नसून ती अचलापूरची राजकन्या गौरी वर्मन होती.ती जेवढी सुंदर होती तेवढीच ती क्रूर व निर्दयी होती.सारी प्रजा तिचं नाव ऐकलं तरी थरथर कापायची. कोणाला कोणत्याही कारणांसाठी ती अमानुष शिक्षा करायची. तिच्यासाठी तो एक खेळ होता. एखादी व्यक्ती मग ती स्त्री असो किंवा पुरुष रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अवस्थेत बघणे तिला आवडायचं.अश्यावेळी ती खदाखदा हसायची.आत्ता जी व्यक्ती तिच्याकडे दयेची भीक मागत होता त्याचा अपराध एवढाच होता की त्याने तिच्याकडे नजर वर उचलून थांबून तिला न्याहाळ होतं.गौरी वर्मन राजरस्त्यावरून आपल्या लवाजम्यासह फेरफटका मारत असताना कुणीही तिच्याकडे नजर वर उचलून पाहायचं नाही असा नियम होता.हा नियम जो मोडेल त्याला ती वेगवेगळ्या क्रूर शिक्षा द्यायची. आज तिने वेगळी शिक्षा या व्यक्ती साठी ठरवलं होती.दोन मद्य पाजलेले मस्तवाल वळु या माणसावर सोडले जाणार होते.समोरचा माणूस किती वेळ स्वतःला वाचवतो येवढाच प्रश्न शिल्लक होता.ही गंमत पाहण्यासाठी तिने लोकांना बोलावले होते.त्या माणसाच्या बायका व मुलांना ही तिथे मुद्दाम धरून आणले होते.ते सगळ कुटुंब धाय मोकलून रडत होते. राजकन्येच्या बाजूलाच दोन अघोरी बसले होते. तो माणूस मेल्यावर त्याच प्रेत तंत्र साधने ते घेऊन जाणार होते.त्या अर्ध नग्न अघोऱ्यांचा वेश कोणाच्याही मनात गुण निर्माण करेल असा होता. राजकन्येने हात वर करताच ते दोन अघोरी उठले.हातातली कवठी व हाड सांभाळत एक अघोरी मैदानात आला त्या पाठोपाठ दुसरा अघोरी गुलाल व स्मशानातील राख घेऊनखाली आला.त्या माणसाला पूर्ण गुलाल माखला गेला त्याच्या कपाळपट्टीवर राख लावली गेली मग कवटी वरून हाड फिरवत अघोरी किंचाळत मंत्र म्हणू लागला.मध्ये मधे तो हातातली राख उडवत मोठ्याने ओरडत होता.ते दृश्य खूपच भयानक होते.त्या अघोरींचे लाल मोठे डोळे...गरगर फिरत होते.या सगळ्या प्रकारात समोरचा माणूस अर्धमेला झाला होता.आपला विधी पूर्ण करून ते अघोरी पुन्हा जाग्यावर येऊन बसले.राजकन्या गौरी वर्मनाने पुन्हा हात वर केला.त्या वेळी उजव्या कोपऱ्यातले लोखंडी दार वर उचलले गेले. दोन मदमस्त वळु गुरगुरत बाहेर पडले.साऱ्यांनी भयाने हुंकार टाकला...व डोळे मिटले.पण राजकन्येचे डोळे मात्र आनंदाने लकाकले. ती ओरडली..." कोणीही डोळे मिटायचे नाहीत. जो डोळे मिटेल त्यालाही मैदानात फेकले जाईल."सारे भयाने थरारले. समोर जो रक्तरंजित खेळ चालला होता तो सगळ्यांना बघावाच लागणार होता.शिपायांनी ओरड करताच ते दोन्ही वळू सुसाट धावत त्या माणसाच्या रोखाने आपली शिंगे वाकवत निघाले.आजुबाजूच कोलाहल ऐकताच तो इसम कसाबसा उभा राहण्याचा प्रयत्न करू लागला.पण अर्धवट उभा राहिल्यावर तो पुन्हा कोसळला.ते वळू त्या व्यक्ती जवळ पोहचले तेवढ्यात अचानक दोन बाण हवेतून सू... सू..आवाज करत....आले व त्या वळूच्या पायात घुसले.मोठ्याने हुंकार भरत ते वळू तिथेच धडपडत खाली कोसळले. कोणाला काही कळणे अगोदरच उतरत्या पायऱ्यांवरून टपटप उड्या मारत एक शुभ्र घोडा वाऱ्या वेगाने मैदानात आला. हातातला झेंडा मातीत रोवत तो ओरडला..." मैत्रेयांचा विजय असो." त्या पांढऱ्या ध्वजावर तीन पोपटी रंगातली पिंपळ पाने कोरली होती.त्या घोडेस्वाराने त्या खाली पडलेल्या माणसाला उचलून आपल्या घोड्यावर घातले व तो त्याच वेगाने पुन्हा पायऱ्या चढत निघून गेला.कोणालाच काही कळेना .सगळीकडे धावाधाव सुरू झाली होती.राजकन्या हतप्रभ झाल्यागत जागीच उभी राहिली होती.तो घोडेस्वार अगदी तिच्या समोरून गेला होता.त्याचा चेहरा निळ्या रुमालाने झाकलेला होता पण तिला त्याच्या उघड्या भरदार छातीवर कोरलेली शिवपिंड स्पष्ट दिसली होती.भानावर येताच राजकन्या गौरी धावतच मैदान बाहेर आली आपल्या घोड्यावर उडी मारतच ती त्या घोडेस्वारचा पाठलाग करू लागली. तिच्या पाठोपाठ सात ते आठ सैनिक घोड्यावरून निघाले. स्वतः राजकन्या उत्तम योद्धा होती.तलवार व तिरंदाजीततिचा हात धरणारा कोणी योद्धा नव्हता.पण यावेळी तिच्या कमरेला फक्त एक खंजीर होता. बघता बघता तो बुरखाधारी घनदाट जंगलात घुसला. राजकन्या सुद्धा त्या उंच व भल्या मोठ्या झाडांच्या गर्दीत घुसली.तिच्या मागे असलेले सैनिक थोडे दूर राहिले होते. थोडे अंतर पार केल्यावर तिचा घोडा एका आडव्या फांदीला अडकला व ती खाली कोसळली. घरंगळत ती वेगाने उतारावरून दरीकडे जाऊ लागली.खाली खोल दरी होती.जर ती दरीत कोसळली तर मृत्यू ठरलेला होता.तीच शरीर ठेचकाळत ...आपटत ...खाली जात होते.तिचे हात आधार शोधत होते.अचानक तिच्या हाताना एक दगडाचा सुळका लागला.जीवाच्या आकांताने तिने तो सुळका पकडला.लटकत तिने खाली पाहिले तेव्हा ती हादरली.खालची झाडे वितभर उंचीची दिसत होती. आपण अस लटकत किती काळ राहू शकू हे तिला समजत नव्हते.कधी नव्हे ते तिने देवाचा धावा सुरू केला. तेवढ्यात एक जाडजूड दोर सरसरत त्या खडक पर्यंत पोहचला. त्या दूरवरून एक इसम झपकन खाली आला.खडकाव उभे राहत त्याने तिचे हात पकडले व तिला वर उचलले.त्या इसमाच्या ताकदीचा अंदाज तिला आला.पहिल्यांदाच झालेला एक समर्थ पुरुषाचा स्पर्श त्याही स्थितीत तिच्या अंगावर काटा फुलवून गेला.तिने आपल्या वाचवणाऱ्या तरुणाकडे पाहिले त्याच्या छातीवर ते कोरलेले शिवलिंग तिला दिसले.ती चमकली तो तोच तरुण होता.ज्याने त्या शिक्षा झालेल्या माणसाला वाचवून पळवून नेले होते.अजूनही त्याचे तोंड झाकलेले होते." मला तोंड लपणारी माणसे आवडत नाहीत."तिने रागाने सांगितले." मला त्याची पर्वा नाही.मी तोंड लपवून वाईट कृत्य करत नाही. आणि आपण आपल्या राज्यात नाही आहात हे लक्षात ठेवा." तो तरुण म्हणाला." आम्ही राजकन्या आहोत. आमच्याशी अदिबीने बोला."तिने खंजीर काढण्यासाठी हात कमरेजवळ नेला." तुम्हाला वर उचलताना मी खंजीर काढून घेतलाय." तरुण हसत म्हणाला." आपण या खडकावरच राहूया की वर वाटेवर जाऊया? जमेल स्वतः वर जायला की मी उचलून घेऊ." त्याने विचारले.गौरीच्या लक्षात आलं की ती अतिशय थकलीय व अंगावरच्या जखमा मुळे वेदना जाणवतात आहेत.तिचे हात पाय सोलून निघाले होते.ती न बोलताच गप्प उभी राहिली.त्या तरुणाने कमरेचा शेला सोडला." तुम्ही माझ्या पाठी राहा.मला घट्ट पकडा.हा शेला मी आपण दोघांभोवती बांधतो." ती चमकली.एका पर पुरुषाच्या पाठीवर बसून डोंगरचढ चढायचा? कस शक्य आहे हे?
" या शिवाय पर्याय नाही.घाबरू नका माझ्या मनात कोणतेही वाईट विचार नाहीत.जवळ जवळ एक माड उंच चढ चढायचा आहे. "राजकन्या गौरीने गुपचूप त्याच्या छाती भोवती हात लपेटले.वृक्षाला जशी वेल बिलगते तशी ती त्याला बिलगली.त्याने दोघांभोवती शेला गुंडाळून कमरेला घट्ट बांधला.दोन्ही हातानी दोर पकडून...पायांनी दगडावर जोर देत तो वर सरकू लागला.तिने त्याच्या पाठीवर डोके टेकले.तो क्षण क्षण झुंजत वर चढत होता.हा जीवघेणा अवघड प्रवास संपूच नये असच तिला वाटत होत.तिच्या सुडौल पुष्ट शरीराची पकड त्याच्या पाठीवर अधिकच घट्ट होत गेली.तिला थोडी ग्लानी आली. तिच्या तोंडावर पाणी बसल्यामुळे ती जागी झाली तेव्हा ती वरच्या अरुंद वाटेवर होती. तो जवळच एका झाडाला टेकून बसला होता." तुमचा घोडा व सैनिक जंगलातल्या पशूंच्या भक्षस्थानी पडले असतील. तुम्ही माझा घोडा घेऊन जा.जमेल का ? मी सोडू राजधानीच्या सीमेवर?"ती कशीबशी उठून बसली." तुम्ही कोण आहात? आणि ज्या माणसाला तुम्ही वाचवलं तो कुठे आहे?"" खरं तर मी तुमचा शत्रू आहे. मैत्रेय नावाची संघटना हे राज्य शक्तांच्या तावडीत सोडवण्या साठी आम्ही प्रयत्न करत आहोत.मी आयुष ह्या संघटनेचा एक स्थापक. तुमचे वडील महाराज वर्मन हे अग्निधराच्या हातातले बाहुले बनले आहेत.बाबा अग्नीधर जो तुम्ही चक्रधर म्हणून ओळखता एक भयानक कुटिल मांत्रिक आहे. तो राज्य आपल्या ताब्यात घेणार आहे. समजलं!"तो तरुण म्हणाला." चला मी तुम्हाला जंगला बाहेर सोडतो. "त्याने चेहऱ्यावरचा रुमाल दूर केला.गौरी चमकली.तो तरुण पिळदार शरिरच होता पण त्याचा चेहरा सुद्धा सुंदर होता लांब चेहरा ..पाणीदार तेजस्वी डोळे...नुकतीच फुटलेली मिसरूड..बाकदार नाक... मर्दानगी त्याच्या चेहेऱ्यावर झळकत होती.तो तरुण घोड्यावर बसला.काही न बोलता ती त्याच्या पाठीमागे बसली.आपणहून तिने आपले हात त्याच्या छाती भोवती गुंडाळले. आयुषने घोड्याच्या पाठीवर थाप मारली." खरच बाबा अग्निधर,राज्य ताब्यात घेण्यासाठी हे करतोय?"" हो ,चार दिवसांनी तो यासाठी एक गुप्त विधी करणार असल्याची बातमी आमच्याजवळ आहे.पण आम्ही ती हाणून पडणार आहोत." आयुष म्हणाला.ती त्याच्यापाठीवर डोके टेकून विचार करत होती की आजपर्यंत आपण फक्त रयतेला त्रासच दिला...अन्याय केला.अनेक पाप केली.आपल्याला कल्पनाही नव्हती की बाबा अग्निधर राज्य हडपण्यासाठी हे करतोय.या तंत्र मंत्र यांच्या जाळ्यात आपणही फसलो." अग्निधराने प्रधान,सेनापती यासहित सर्वांना वश करून घेतले आहे.सारे सैन्य त्याच्या एका इशाऱ्यावर बंड करू शकते. कदाचित ते तुमच्या कुटुंबाला ताब्यात घेऊ शकतात किंवा मारूही शकतात. यात महाराणी रत्नमाला व तुमचे मामा राज्य बळकावण्याचा एक वेगळा प्रयत्न करताहेत." आयुषने सांगितले." नाही.हे होऊ देता नये." राजकन्या गौरी त्वेषाने म्हणाली." मैत्रेय त्यासाठी जीवाची बाजी लावतील." आयुष ने आश्वासन दिले.बघता बघता घोडा जंगलाबाहेर पोहचला. आयुष घोड्यावरून उतरला.घोडा गौरीच्या ताब्यात दिला व तिच्या अंगावर आपली शाल पांघरली." मला वाटत मी इथून निघालेल बर. अग्निधराचे हेर संपूर्ण राज्यभर पसरले आहेत."आयुष जाण्यासाठी वळला.गौरीला आपण काहीतरी मागे ठेऊन जात असल्यासारखे वाटले. " आयुष...!" गौरी पुटपुटली.आज पहिल्यांदाच तिचा आवाज थरथरत होता.तिचा चेहरा आरक्त झाला होता.आयुष वळला.त्याने प्रश्नार्थक मुद्रेने तिच्याकडे पाहिले." आत्ता मी मैत्रेय संघटनेत सामील होतेय.आपण शक्तांचा बीमोड करू. चालेल?"" राजकन्ये, हे अवघड आहे.तुम्ही स्वतः या राज्याच्या उत्तराधिकारी आहात."" मला माझ्या चुका सुधारायचा आहेत. " गौरी म्हणाली . तिने घोड्याला टाच मारली.आयुषकडे वळून बघततिने विचारले." पु... पुन्हा...कधी भेट होईल?"आयुष फक्त हसला.-----****-------******---***-------******-------*****----एवढे वाचल्यावर राज थांबला.गौरी, शर्मा व मौर्ये ही हकीकत काळजी पूर्वक ऐकत होते. " यापुढे मैत्रेय व आयुष ने मिळून बाबा अग्निधराचा कृतांत या क्रूर दरोडेखोराला जीवंत करण्याचा विधी ऐनवेळी कसा हाणून पाडला याच वर्णन आले आहे. आपल्याला सापडलेले ते नऊ सांगाडे बाबा अग्निधर व त्यांच्या शिष्यांचे असावेत तर दहावा सांगाडा हा डाकू कृतांताचा असावा.तुम्ही माना किंवा न माना पण हे दहाही जण आज वेगळ्या रूपात वावरत आहेत.लवकरच काही तरी अघटीत घडणार आहे हे नक्की. यावरचा उपाय आपल्याला पुढच्या हकिकतीत सापडेल. आपण ते उद्या वाचूया."राज म्हणाला." खरच अस घडलंय? विश्वास बसत नाही." गौरी म्हणाली." मला वाटतं या सर्व घटनांमध्ये काहीतरी संगती असावी पण ती आपल्या आकलना पलीकडची आहे." शर्मा म्हणाले." सर तुम्ही सुध्दा?" गौरीने विचारले." हो मला पण काहितरी गडबड वाटतेय." मौर्ये म्हणाले." मला वाटतं आपल्या सर्वांचा ह्या इतिहासातील घटनेशी संबध होता." राज गंभीरपणे म्हणाला.तेवढ्यात टेबलावर ठेवलेली ती जड तलवार आपणच सरकली व राजच्या पायाजवळ पडली.______*******______******______*****_******____बाळकृष्ण सखाराम राणे भाग ३ समाप्त