आजोबांच्या म्हणजेच आंजनेयच्या चेहऱ्यावरची चिंता पाहून दिगंबर विचारात पडतो. आज ना उद्या आंजनेय मदतीला बोलावणार याची खात्री त्याला होतीच पण हे इतक्या लगेच घडेल असे त्याला वाटले नव्हते. त्याचे विचारचक्र चालूच होते की तिथे साधिका येते. तिला पाहून त्याला धक्काच बसतो तर, कुर्ता आणि जीन्समध्ये तिच्यासमोर उभ्या असलेल्या दिगंबरला पाहून ती चकित होते. म्हणजे याला कोणी पाहिलं तर कोणाला खरं वाटणारं नाही की हा एक नावाजलेला अघोरी आहे.
दिगंबर : तू नक्की कोण?
साधिका : मी साधिका, आजोबांची नात…
दिगंबर : अंजनीची मुलगी का तू ?
साधिका : नाही…माधवची मुलगी मी…
दिगंबर : बर…
हे दोघे बोलत असतानाच तिथे आजोबा येतात.
दिगंबर : आंजनेय तू एवढ्या तातडीने का बोलावलंस?
आजोबा : आधी तुम्ही दोघे इथे बसा…आणि हा चहा घ्या…सगळं सांगतो…तुमची एकमेकांशी ओळख तर झालीच असेल…
साधिका - दिगंबर : हो….
आजोबा : दिगंबर मी सरळ मुद्द्याला हात घालतोय…तुला दुर्जयविषयी जे काही माहिती आहे ते आम्हाला सांग…
दिगंबर : दुर्जयचा विषय आला आहे म्हणजे प्रकरण गंभीर आहे तर…सध्या तो सुजय भडकमकर म्हणून जगतो आहे…ते कसं हे सांगतो मी…भडकमकर हे मोठे उद्योगपती त्यांच्या कुटुंबासह सहलीवरून परतत होते. त्याच दरम्यान त्यांच्या गाडीचा भयंकर अपघात झाला…कोणीही वाचलं नाही त्यात… पण सुजय भडकमकर कसा त्यातून वाचला याचं आश्चर्य लोकांना वाटायचं…मलाही वाटलं…पण तो सुजय नव्हता तो दुर्जय होता…सुजय मेल्यावर त्याच्या शरीरावर दुर्जयने ताबा मिळवला होता. नवीन आयुष्य मिळाल्याने त्याने स्वतःच नामकरण केल्याचे नाटकंही त्याने केले. माझी खात्री आहे की हा अपघात त्यानेच घडवून आणला असणार…दुर्जय भडकमकर म्हणून जगत असताना त्याने एका गरीब घरातल्या मुलीशी लग्न केले आणि तिने एका मुलीला जन्म दिल्यावर तिलाही ठार केले. त्याचा मुलीवर खूप जीव आहे. सध्या तो शापमुक्त होण्याची तयारी करतो आहे.
साधिका : सॉरी मी मधेच तुम्हाला प्रश्न विचारते आहे…त्याला शाप कोणता मिळाला आहे…
आजोबा : शाप असा नाही म्हणता येणार पण त्याच्या शक्तींना मर्यादा आली होती…त्याला त्या हव्या तशा वापरता येणार नव्हत्या आणि त्या वापरल्या की त्याची ऊर्जा संपणार होती...कुणा शैतानाने हा शाप त्याला दिला होता.
दिगंबर : आणि तोच शैतान त्याला शापमुक्त करू शकणार होता..त्यासाठी त्याला खूश करणं गरजेचं आहे…
साधिका : त्यासाठी बळी द्यावा लागणार आहे का?
दिगंबर : हो…पण हाच शैतान त्यांना म्हणजे दुर्जय आणि असुराला गुप्त विद्या आणि अमर राहण्याची विद्या देणार आहे…यासाठी काही ठराविक विधी असतो.
साधिका : पण मग बळी हाच तो विधी आहे का ?
दिगंबर : हो… दुर्जय आणि असुराच्या सगळ्या समस्या सोडवण्याचा रामबाण उपाय बळी आहे…
आजोबा : बळीसाठी किती मुलं हवी आहेत…आणि अटी काय आहेत?
दिगंबर : त्यांचे शंभर बळी झालेत देऊन…मुख्य पाच मुलं बाकी आहेत त्यांचा शोध सुरू आहे…
साधिका : काय पाच मुलं… ?
दिगंबर : हो, एकाच दिवशी आणि एकाच वेळी जन्मलेले, एकच गोत्र आणि एकच नक्षत्र…सामान्य असणारी आणि
आजोबा : आणि साधकांचा अंश असलेली…
दिगंबर : हो हीच ती महत्त्वाची अट आहे…तुला आठतंय ना….गुरुदेवांनी काय सांगितलं होतं…
आजोबा : हो….यांना वाचवायचं असेल तर त्यांना प्रशिक्षित करणं गरजेचं आहे…
साधिका : साधकांचा अंश असलेली मुलं त्याला का हवी आहेत…
दिगंबर : असं म्हटलं जातं की साधकाच्या रक्ताने शैतानाला ताकद मिळते… त्याची शक्ती अगणित वाढू लागते… आणि म्हणून आंजनेय दुर्जय तुझ्या शिष्यांचा शोध घेत होता… पण त्याच्या हाती काहीच लागलं नाही..
साधिका : दोन मुलं तर समोर आहेत…पण बाकीची ३ कशी सापडणार….
आजोबा : दोन नाही तीन मुलं आहेत आपल्यासमोर…जर माझा अंदाज चुकत नसेल तर…
साधिका : काय? कोण ?
आजोबा : थोडा धीर धर तुला समजेलच…
साधिका : बर…काका मला सांगा…दुर्जयच्या मुलीबद्दल तुम्हाला काही माहिती आहे का?
दिगंबर : दुर्जयचे सगळे गुण घेतले आहेत तिने… आणि आता तर दुर्जय स्वतः तिला काही गोष्टी शिकवतो आहे…याआधी एक बाई नेमली होती त्याने…पण तिच्याच्याने ते काही जमलं नाही मग यानेच तिला शिकवायला सुरुवात केली…ही पाच मुलं मिळाली की तो तिला आणखी काही गोष्टी शिकवून तयार करेल… काहीतरी शिजतंय त्याच्या डोक्यात हे मात्र खरं…
साधिका : पण ती संमोहन विद्या वापरते आहे…त्याने ती खूप काही करू शकते ना…
दिगंबर : हो…तुला काय विचारायचं आहे हे माझ्या लक्षात येतंय…पण मी तुला तिच्या संमोहन विद्येचा तोड शिकवेन…
आजोबा : तिला येतो तो…
दिगंबर : तिला येतोय म्हणजे तूच शिकवला असणार…कारण हा तोड फक्त तुझ्या शिष्यांनाच जमेल…
साधिका : पण मग…
आजोबा : तुझ्या मनातलं मला कळतंय पण याचं उत्तर मी नंतर देईन…आता आपल्याकडे एक पाहुणी येते आहे तर तू तिच्यासाठी पाणी घेऊन ये जा…
साधिका : आणते…आणि पुन्हा चहा पण ठेवते…
दिगंबर : कोण येतंय रे…
आजोबा : सत्या…
आजोबांनी हे नाव उच्चारताच तिथे रेणुका येतात.
रेणुका : आंजनेय, दिगंबर कसे आहात तुम्ही?
दिगंबर : आम्ही दोघे पण मस्त…तू बस इथे…
साधिका : आजी हे पाणी घ्या…
साधिकाला पाहून रेणुकाही एक क्षणभर स्तब्ध होतात.
आजोबा ; सत्या ही माझी नात, साधिका… आणि साधिका ही सत्या…म्हणजेच रेणुका… पण हिला सत्याच म्हण…
रेणुका : अरे पण ही तर अगदी…
आजोबा : हो अंजनीसारखी दिसते… पण ही अंजनी नाही… बर तू धावत आली आहे म्हणजे महत्त्वाचं काम असेल…वेळ न घालवता बोल…सगळ्यांनी चहा घ्या…नाही तर गार होईल…हा…सत्या बोल तू…
रेणुका : रुपेशने माझ्या नातवाची म्हणजेच सत्येशची पत्रिका मागितली आहे…मला वाटतं तो सत्येशची बळी द्यायचा विचार करतो आहे… त्याला खूश करण्यासाठी…
साधिका : कोण रुपेश?
आजोबा : हीचा मुलगा…जो साधक होता आणि नंतर माझा विश्वासघात करुन त्याला सामील झालेला…सुदामाला कैद करणारा…
साधिका : आजी मला माफ करा हा…मला माहिती नव्हतं…
रेणुका : मुली, तू माफी नको मागू…आंजनेय ही त्याची पत्रिका घ्या…
आजोबा रेणुकाने दिलेली सत्येशची पत्रिका तपासून पाहतात.
आजोबा : अभिमन्यू आणि अर्जुन प्रमाणेचही पत्रिका आहे…या तिघांचाही जन्म एकाच दिवशी, एकाच वेळी एकाच नक्षत्रावर आणि एकाच गोत्रात झालाय…
दिगंबर : रुपेश नक्कीच काहीतरी घोळ घालणार…आपल्याला त्याला रोखण्यासाठी काही तरी करावं लागेल…
आजोबा : आपण त्याला रोखू पण दुर्जयला कसं रोखणार…
साधिका : तुमच्या दोघांचेही मुद्दे बरोबर आहेत पण आधी रुपेशला रोखुयात का? म्हणजे पुढे काय करता येईल याचा अंदाज येईल…
आजोबा : हो…सत्या तू सत्येशला सत्य सांगितलं आहेस ना..
रेणुका : हो…पण त्यालाही साधक बनायचं आहे… आणि ते कसं करणार याचा विचार करते आहे मी…
आजोबा : रुपेशला अडवणे एवढं सोप्पं नाही…दिगंबर या रुपेशला कशात अडकवता येईल हे पहा…आणि रेणुका मी उद्या या तिघांची पुन्हा बारकाईने पत्रिका तपासतो आणि काही मार्ग सापडतो का ते पाहतो.. तू मंत्र साधना सुरूच ठेव…सत्येशला मारक आणि तारक मंत्र शिकावं आणि सराव करून घे त्याच्याकडून…साधिका तू सुदामा आणि अर्जुनची सुटका याच्या मागे लाग…पण दुर्जयच्या नजरेत न येता… रेणुका तुझ्याकडे सत्यजितच्या वस्तू आणि रुद्राक्ष असेल ना…
रेणुका : हो आहेत ना…
आजोबा : तो रुद्राक्ष त्याच्या गळ्यात घाल…आणि मानसिकरित्या त्याला जास्त तयार कर…आता आपण सगळेच आराम करूया…तुम्ही तिघे सकाळीच जा घरी…साधिका आजीला खोली दाखव…
आजोबा त्यांच्या खोलीत आल्यावर कपाटातील एका पेटीवर हात फिरवतात व सगळ्या शिष्यांना एकत्र करायची वेळ आली आहे असा विचार ते करतात.
—------------------------------------------------------
एकीकडे सगळे जग निद्रिस्त झालेले असताना ती मात्र खिडकीत उभे राहून सूर्योदय होण्याची वाट पाहत होती. येणाऱ्या संकटाची तिला चाहूल लागली होती आणि आता लवकरच काही कठोर पावलं उचलावी लागणार होती. मनाशी एक निर्धार पक्का करत ती खिडकी बंद करून बेडवर आडवी होते…पहाटे कधीतरी तिचा डोळा लागतो.
------------------------------------------
-प्रणाली प्रदीप