ट्रिंग ट्रिंग ..... माझा गुप्तहेरतेच्या कामगिरीचे निरोप येणारा फोन वाजला.
"हॅलो गुप्तहेर राघव बोलतोय. "
"गुप्तहेर राघव लवकरात लवकर कुहू बीच वर ये.", असं म्हणून इन्स्पे. नाईकांनी फोन ठेवून दिला. इन्स्पे. नाईकांची आणि माझी छान ट्युनिंग जमली असल्याने बऱ्याच केसेस मध्ये ते मला मदतीला बोलावून घ्यायचे.
मी कुहू बीचवर पोहोचलो , तिथे इन्स्पेक्टर नाईक माझी वाट पहात होते. "काय झाले इंस्पेक्टर नाईक?", मी
इंस्पेक्टर नाईक, "हे बघ ह्या निळ्या कार मध्ये एका मुलीचा बहुतेक विषारी चॉकलेट खाऊन मृत्यू झाला आहे."
"काय ??? विषारी चॉकलेट ! फारच विचित्र !!", मी
"कोणीतरी तिला मुद्दाम ते चॉकलेट दिले असेल", इन्स्पेक्टर नाईक
"हो! ही कदाचित खुनाची घटना असू शकते, पुढील चौकशीसाठी मला तिची कार आणि मृतदेह कसून तपासू द्या.",मी
मी गाडीजवळ पोहोचलो आणि मृतदेह , विषारी चॉकलेट आणि आतील तसेच कारच्या बाहेरील बाजूची काळजीपूर्वक पाहणी केली. तीची मान स्टेअरिंग वर टेकलेली होती. तिच्या तोंडातून फेस आलेला होता. शरीर निळसर पडलं होतं.
"ती प्रसिद्ध व्यावसायिक रणधीर जहागीरदार ह्यांची मुलगी होती. तिचे नाव रिया आहे. काल रात्री 11 वाजता आम्हाला तिची हरवल्याची तक्रार मिळाली, म्हणून आम्ही जीपीएसच्या सहाय्याने तिच्या फोनचे स्थान शोधून काढले. आणि ती अशा अवस्थेत आढळली.", इन्स्पेक्टर नाईक
"तूम्ही तिच्या कुटूंबाला कळवलं का ?", मी
"हो नुकतीच माहिती दिली आहे, रुग्णवाहिका येत आहे", इन्स्पेक्टर नाईक
मी जागेचं निरीक्षण केले आणि माझ्या छोट्या डायरीत काही मुद्दे नोंदवले आणि तपासणीसाठी काही फोटोही घेतले आणि ड्रायविंग सीट च्या विरुद्ध बाजूच्या दारात मला एक बारीक वस्तू सापडली ती हि मी तूर्तास माझ्याजवळ नीट ठेवून दिली.
“या सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यावर, मला कॉल करा, मला रणधीर जहागीरदार आणि कुटूंबाला काही प्रश्न विचारायचे आहेत.”, मी
"ठीक आहे", इन्स्पेक्टर नाईक इंस्पेक्टर नाईक यांनी जहागीरदारांच्या घरात त्यांची चौकशी करण्यासाठी मला बोलावले.
"नमस्कार श्री. जहागीरदार , मी गुप्तहेर राघव कल्याणी या प्रकरणाचा तपास करीत आहे. त्यासाठी मला तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबातील सदस्यांना काही प्रश्न विचारायचे आहेत ."
"नमस्कार गुप्तहेर राघव कल्याणी! तुम्ही तुमची चौकशी सुरु करू शकता. " श्री.रणधीर जहागीरदार
"तुम्हाला माहित आहे का की काल रिया घराबाहेर केव्हा निघाली होती?", मी
"ती संध्याकाळी 6 वाजता गेली होती, तिने आपल्या आईला सांगितले होते की ती आपल्या मित्रासमवेत जात आहे आणि एका तासाच्या आत येईल , परंतु रात्री १०
नंतरही ती आली नाही तेव्हा मी पोलिसांना फोन केला आणि तिच्या हरवल्याची तक्रार दाखल केली", श्री. जहागीरदार जड आवाजात म्हणाले.
"कोणी तिला ब्लॅकमेल करत होतं का ? किंवा कोणी तिच्या वाईटावर आहे ,याबद्दल तुम्हाला काही माहिती आहे का?", मी विचारलं.
"नाही सर मला असं वाटत नाही की कोणी तिला ब्लॅकमेल करत असेल कारण तसं असतं तर तिने मला सांगितलं असतं. तिचा कोणी शत्रूही नव्हता. तिचे प्रत्येकाशी मैत्रीपूर्ण संबंध होते .", श्री. जहागीरदार
"जहागीरदार साहेब तुम्ही एक यशस्वी आणि श्रीमंत उद्योगपती आहात त्यामुळे तुमचे अनेक शत्रू असू शकतात जे अशक्य नाही, बरोबर? हे कृत्य तुमच्या एखाद्या स्पर्धकाने किंवा हितशत्रूने केले असू शकते . तुम्हाला कोणावर संशय आहे का? ", मी
"तुमचं बरोबर आहे गुप्तहेर राघव. माझे बरेच शत्रू आणि प्रतिस्पर्धी आहेत, त्यांच्यापैकी एखाद्याने हे केले असावे, परंतु या विशिष्ट शत्रूने हे केले असेल असा मी कसा काय अंदाज लावू शकेन? मला ते माहित नाही, मला कोणावरही संशय नाही, ते तुमचे काम आहे तेव्हा कृपया लवकरात लवकर माझ्या मुलीचा मारेकरी शोधा ”, रणधीर जहागीरदारांचे डोळे अश्रूंनी भरले होते.
"माफ करा श्री.जहागीरदार मी खरोखर तुम्हाला त्रास देऊ इच्छित नाही . एक शेवटचा प्रश्न सर, जर आपणास हरकत नसेल तर मी अधिक माहिती साठी तुमच्या मुलीचा फोन माझ्याकडे ठेवू शकतो का ?", मी
"नक्कीच, श्री राघव ", जहागीरदार
त्यानंतर मी रियाच्या आईला काही प्रश्न विचारले
"नमस्कार मॅडम , मी तुम्हाला फार त्रास देणार नाही, मला फक्त काही प्रश्न विचारायचे आहेत जर आपल्याला काही हरकत नसेल तर", मी
"नक्की डिटेक्टिव्ह राघव , कृपया विचारा , मी माझ्या माहितीनुसार नक्कीच उत्तर देईन.", श्रीमती जहागीरदार
"गेल्या काही दिवसांपासून काही कारणास्तव रिया डिस्टर्ब् असल्याचे आपल्याला आढळले का ?", मी विचारले.
"नाही, अजिबात नाही, ती एकदम ठीक होती", श्रीमती जहागीरदार
"तिच्या जवळच्या मित्र मैत्रिणींची माहिती तुम्ही देऊ शकाल का ?", मी
"मला सर्व मित्र-मैत्रिणींचे नावे माहित नाहीत पण बहुतेक वेळा तिचे तीन मित्र रुतुजा, मोना आणि मोहन घरी यायचे", श्रीमती जहागीरदार
"ओके मॅम, एक शेवटचा प्रश्न, रियाला कोणत्या ब्रँड चं चॉकलेट आवडत होते ?", मी
"ती बहुतेक वेळा कॅडबो कंपनीचे चॉकलेट खात असे", श्रीमती जहागीरदार
"ओके मॅम, सहकार्याबद्दल धन्यवाद", मी
तिथे श्री जहागीरदार यांची मोठी मुलगी आणि जावई सुद्धा उपस्थित होते त्यांची सुद्धा मी चौकशी केली पण फारशी माहिती मिळाली नाही.
मी त्यांच्या घरातून पोलिस स्टेशनला रवाना झालो.
मी रियाचा फोन कसून तपासला तर त्यात तिचं आणि मोहनचं काही चॅट सापडले ज्यामधून रिया आणि मोहन एकमेकांच्या खूप जवळ असल्याचे कळून येत होते. मी दुसऱ्या दिवशी रियाच्या कॉलेजमध्ये गेलो. तिथे मी तिच्या सर्व वर्गमित्रांची विचारपूस केली आणि रियाबद्दल काही प्रश्न विचारले. तिचं वर्गातल्यांशी आणि तसेच कॉलेजमधील सगळ्यांशी कशी वागणूक होती त्याचप्रमाणे सगळ्यांची तिच्याशी कशी वागणूक होती कोणी तिचा शत्रू होतं का ह्याची इतंभूत चौकशी केली.
महाविद्यालयीन कॅन्टीनमध्ये मी एकामागून एक रुतुजा, मोना आणि मोहन यांना काही प्रश्न विचारले.
"बोल ऋतुजा तुझ्या मैत्रिणी बद्दल तुला काही विशेष माहिती आहे? तिचं एवढयात कोणाशी भांडण वगैरे झालं होतं ? काल ती संध्याकाळी कोणाला भेटायला जाणार होती? तू काही सांगू शकशील?",मी
"कॉलेजमध्ये असताना तर मी,मोना आणि रिया सोबतच असायचो तेव्हा तर तिचं कोणाशी भांडण झालेलं आठवत नाही. तशी रिया खूप मोकळ्या स्वभावाची मुलगी होती. तिचं सगळ्यांशी पटायचं. ती एवढी श्रीमंत होती पण तिच्या वागण्यात त्याचा किंचितही गर्व नसायचा.",ऋतुजा
"रियाचा एखादा मित्र किंवा बॉयफ्रेंड होता का ?",मी
"हो म्हणजे रिया आणि मोहन एकमेकांना पसंत करत होते. बरेचदा ते एकत्र फिरायचे. काल संध्याकाळी मी तिला माझ्यासोबत बाहेर चालते का असं विचारण्यासाठी मेसेज केला तेव्हा तिने ती मोहनला भेटायला जाणार आहे असा मला मेसेज करून कळवलं होत.”
"अच्छा! ठीक आहे ऋतुजा तू आता जाऊ शकतेस", मी
त्यानंतर मी मोनाला काही प्रश्न विचारले,
"मोना तुला काही माहिती आहे का? रिया एवढ्यात कधी टेन्स किंवा डिस्टर्ब् वाटली का?"
"नाही तसं तर डिस्टर्ब् होण्यासारखं काही कारण नव्हतं. फक्त आमच्या क्लास मध्ये जो वीरज आहे त्याचं तिच्यावर एकतर्फी प्रेम होतं आणि तो मोहन शी काही ना काही खुसपट काढून भांडायचा ज्यामुळे रियाला खूप मनःस्ताप व्हायचा.",मोना
"अच्छा , बरं तुला माहिती आहे का की काल संध्याकाळी रिया कोणाला भेटणार होती कारण घरी तिने तिच्या आईला मित्र-मैत्रिणींसोबत फिरायला जातेय असं सांगितलं होतं .",मी
"नाही त्या बाबतीत मला काहीच माहित नाही. कॉलेज झाल्यावर आम्ही आपापल्या घरी गेलो. त्यानांतर आज रिया गेल्याचीच बातमी मला समजली.",मोना
त्यानंतर मी मोहन ला काही प्रश्न विचारले.
"मोहन तुझं आणि रियाचं एकमेकांवर प्रेम होतं हे मला कळलं. तू काल संध्याकाळी तिला बोलावलं हे हि मला कळलं. त्या संधर्भात तू काही सांगू शकशील का?",मी
"मी?? मी नव्हतं बोलावलं! तुम्हाला कोणी सांगितलं? चुकीची माहिती मिळालीय तुम्हाला?", मोहन गोंधळून म्हणाला.
"पण तिचं 'हे ड्युड ' हे सोशल मीडिया अकौंट मी बघितलं. त्यात तिने ऋतुजाला मला मोहितने बोलावलंय म्हणून मी कुहू बीचवर त्याला भेटायला जातेय असा मेसेज केलेला आहे. मग रिया खोटं का बोलेल?",मी
"तिने असं लिहिलं? कमाल आहे पण आमचं भेटण्याचं तर काही ठरलं नव्हतं. मग तिने असं का लिहिलं असावं ?",मोहित ने मलाच प्रश्न विचारला.
"ते मी कसं काय सांगू शकेन? ते रियाला आणि तुलाच माहिती. रिया तर आता सांगू शकणार नाही त्यामुळे तूच जे काही खरं आहे ते सांग आणि मोकळा हो ",मी
"मी कशाला काही लपवू? जे काही आहे ते अगदी खरं सांगितलंय मी.",मोहन
"बरं वीर बद्दल काही सांगू शकशील?",मी
"वीर ? वीर रियावर एकतर्फी प्रेम करतो. तो थोडा भांडखोर आहे. रियाला तो आवडत नाही मी आवडतो, हे त्याला सहन होत नाही. तो नेहमी वाद घालत असतो. रियाला त्याचा राग येतो आणि त्याला माझा राग येतो. ",मोहित
"आणि तुला ? तुला कोणाचा राग येतो?",मी अचानक प्रश्न विचारला.
"मला? मला कशाला कोणाचा राग येईल? मला वीर ची दया येते ", माझ्या एकदम प्रश्नाने मोहन गांगरून म्हणाला.
"बरं मला सांग एवढ्यात रियाचं कोणाशी भांडण बाचाबाची वगैरे झाली होती का?",मी
थोडा विचार करून मोहन म्हणाला,"रियाचं तर नाही पण माझं आणि वीरजचं तुंबळ भांडण झालं होत. रिया मधेत पडली आणि आमचं भांडण थांबलं नाहीतर वीरज ने माझा जीव घ्यायलाही कमी केला नसता."
" अच्छा, वीरज कुठे आहे? आज आला नाही का तो कॉलेज मध्ये ?",मी
"नाही आमचं चार दिवसांपूर्वी भांडण झालं आणि त्या दिवसापासून तो कॉलेज मध्ये आलाच नाही.",मोहन
"अच्छा! असं आहे तर प्रकरण",मी स्वतःशीच विचार करत म्हणालो.
"बरं तुझ्या मताने रियाचा घातपात कोणी केला असेल ?",मी
"काही सांगता येणार नाही ",मोहन
"का वीरज वर तुझा संशय नाही?",मी
"मला नाही वाटत तसं, कारण त्याच प्रेम होतं तिच्यावर. तो कसा काय मारू शकेल तिला ? शक्य नाही.
दैवदुर्विलास पहा! श्री राघव, ज्या रियासाठी आम्ही सतत भांडायचो ती न मला मिळाली न त्याला",मोहन हताशपणे म्हणाला.
मला आश्चर्य वाटलं मोहित आणि वीर मधून आडवा विस्तव जात नव्हता तरीही मोहन वीर ची ग्यारंटी घेत होता.
"ठीक आहे मोहित आता तू जा पण काही वाटलं तर चौकशीसाठी मी तुला पुन्हा बोलावून घेईन",मी
मी वीरजचा महाविद्यालयातून पत्ता घेतला व त्याच्या घरी गेलो , जाताना काही फळं घेऊन गेलो. तेथे मी पाहिले की वीरज आजारी व झोपलेला आहे, म्हणून मी त्याच्या आईला त्याच्या आजाराबद्दल विचारले असता तिने उत्तर दिले की 2-3 दिवसां पासून वीर थंडीतापामुळे आजारी आहे.
डॉक्टरांनी त्याला विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. जवळ जाऊन बघितलं तर त्याचं अंग थंड वाटत होतं. तर त्याची आई म्हणाली आत्ताच ताप उतरलाय . ताप जरी नव्हता तरी तो आजारीच आहे ह्याची मला खात्री पटली कारण त्याचा चेहरा अशक्त वाटत होता तसेच त्याचे डोळे खोल गेलेले होते. त्यांचा निरोप घेऊन मी पोलीस स्टेशनला रवाना झालो.
जिथे मी पुन्हा एकदा रियाचे सोशल मीडिया अकाउंट तिच्या फोनवर तपासले. जिथे मला रियाच्या 'हे ड्यूड' सोशल मीडिया ऍप अकाउंटवर एक मेसेज दिसला.
'हे रिया! Plz आज कुहू बीचवर संध्याकाळी 7 वाजता ये, मी तिथे आतुरतेने तुझी वाट पाहत आहे, लवकर ये' हा संदेश मोहन ने पाठविला होता त्यादिवशीच ज्यादिवशी तिची हत्या झाली होती.
ते वाचून मला धक्का बसला. म्हणजे मोहित चक्क खोटं बोलला होता. परत एकदा मी तो संदेश पूर्ण वाचला त्यात सगळ्यात खाली रियाने मोहन विचारलं होतं.
' हे मोहन हा कुठला नंबर आहे तुझा?'
'अगं हा माझ्या मित्राचा नंबर आहे. माझा फोन चार्जिंग ला आहे म्हणून त्याच्या फोन वरून मेसेज केला.' त्यावर मोहन ने असं लिहिलं होतं .
'अच्छा येते मी बरोब्बर सात वाजता', रियाचा मेसेज
रियाचा फोन मी बंद केला आणि माझं विचार चक्र सुरु झालं.
याचा अर्थ मोहत ने दुसरा नंबर वापरून रियाला मेसेज केला आणि कुहू बीच वर बोलावून घेतलं. तिथे ती गेल्यावर तिला विषारी चॉकलेट दिलं. तिला कॅडबो कंपनीचं चॉकलेट खूप आवडते हे मोहला माहित असणारच त्याने त्याच कंपनीचं चॉकलेट आणलं ज्यात त्याने आधीच विष घालून ठेवलं असेल. रियाने ते लगेच खाल्लं आणि काही मिनिटातच रियाने प्राण सोडला. रिया मेलेली बघताच मोहत त्याच्या घरी चुपचाप येऊन बसला.
त्यांच्या भेटीचा कोणी साक्षी नाही कि पुरावा नाही. आपण सहज सुटून जाऊ असं मोहनला वाटलं असेल. हरकत नाही हा फोन कोणाच्या नावावर आहे हे मी बघूच शकतो असा विचार करून मी काही सॉफ्टवेअर्स च्या आधारे तो फोन कोणाच्या नावावर आहे ते बघितलं तर मला कळलं कि तो नंबर 'विजय निनावे ' या माणसाच्या नावावर आहे. मी त्या नावावरून सोशल मीडिया अकॉउंटस चेक केले त्यावरून मला एक फोटो दिसला जो बघून मी चक्रावूनच गेलो. त्याच्या एका सोशल मीडिया अकौंटवरूनच मला त्याचा पत्ता मिळाला. त्याच्याकडे जाऊन मी त्याची कसून चौकशी केली. पोलिसांच्या नावाची धमकी देताच त्याच्या तोंडचं पाणी पळालं. त्याने मला एक अत्यंत महत्वाची माहिती दिली ज्यामुळे ह्या रहस्याचा उलघडा झाला.
मी लगेच इन्स्पेक्टर नाईकांना कळवून श्री जहागीरदारांकडे रवाना झालो. श्री जहागीरदारांना मी खुनी सापडल्याचे फोनवर सांगितले. श्री. आणि श्रीमती जहागीरदार यांनी विचारले, "माझ्या मुलीला कोणी मारले? तो कोण आहे? त्याला माझ्या समोर आणा, मी त्याला धडा शिकवतो", श्री. जहागीरदार रागाने थरथरत होते.
"मला तुमचा राग समजू शकतो. श्री. जहागीरदार, कृपया शांत व्हा, कृपया मला आणखी थोडा वेळ द्या. मी तुमच्या मोठ्या मुलीला आणि तुमच्या जावई बुवांना हि इथे बोलावले आहे. तसेच ऋतुजा,मोना आणि मोहीतला हि बोलवलंय त्यांना सुद्धा अपराधीचे नाव जाणून घ्यायचे असेल.",मी
काही वेळाने ऋतुजा,मोना आणि मोहत आले. थोड्या वेळाने जहागीरदारांची मोठी मुलगी आणि तिचा नवरा आले आणि श्री. जहागीरदार यांच्या जावयाने उत्सुकतेने विचारले, "दोषी कोण आहे? आणि तो कोठे आहे?"
"रिलॅक्स श्री राज! मी तुम्हाला सगळं सांगणार आहे", मी शांतपणे म्हणालो . मी लगेच एक फोन केला आणि तेवढ्यात विजय निनावे हजर झाला. श्री व सौ जहागीरदारांनी आणि त्यांच्या मोठ्या मुलीने जावयाने सगळ्यांनी त्याला विचारलं की तू कसा काय आत आला? काही काम आहे का?
"मीच त्याला बोलावलंय. ", मी सगळे त्याच्याकडे आणि माझ्याकडे प्रश्नार्थक नजरेने बघू लागले.
ते बघून मी म्हणालो," मला कळतोय तुमच्या मनातला गोंधळ. आणि म्हणूनच जास्त न ताणता मी सगळं सविस्तर सांगतो. हे बघा हा आहे रियाचा फोन. ह्या फोनवर ज्या संध्याकाळी रिया घरातून बाहेर पडली त्याच्या 1 तास आधी एक मेसेज आला. ",मी
हे सांगत असताना तिथे उपस्थित असलेली एक व्यक्ती सारखा घाम पूसू लागली.
पुढे मी सांगू लागलो," तो मेसेज मोहन ने दुसऱ्या एका वेगळ्या नंबर वरून केला होता", मी असं म्हणताच मोहत उसळून मी नाही केला मेसेज असे म्हणू लागला. त्याला हातानेच शांत राहण्याची मी खूण केली तसा तो जागेवर बसला.
क्रमशः
पुन्हा मी सांगणं सुरु केलं," हं तर त्या मेसेज मध्ये मोहित ने रियाला कुहू बीच वर संध्याकाळी सात वाजता बोलावलं होतं. तो नंबर वेगळा असल्याने रियाने मोहीतला विचारलं कि हा तुझा नेहमीच नंबर नाही. त्यावर मोहितने मेसेज मधून उत्तर दिलं कि त्याचा फोन चार्जिंग ला असल्याने त्याने तात्पुरता मित्राचा फोन घेऊन मेसेज केलाय. रियाला ते पटलं. तिने कुहू बीच वर येण्याचं कबुल केलं आणि त्याप्रमाणे ती घरून निघाली.
तिथे गेल्यावर तिला मोह न दिसता एक वेगळीच व्यक्ती दिसली जिने तिला विषारी चॉकलेट दिलं जे खाऊन ती मरण पावली.", माझं वाक्य पूर्ण होण्याआधीच श्री जहागीरदारांचे जावई त्रासिकपणे म्हणाले," अहो डिटेक्टिव्ह राघव! केवढं कन्फ्युज करताय आम्हाला? मोहित ने मेसेज केलाय म्हणता मग तो इथेच आहे न, त्याला अटक का करत नाही लगेच?"
"अहो कारण गुन्हेगार तो नसून तुम्ही आहात म्हणून!", मी असं म्हणताच प्रत्येकाने आश्चर्याची प्रतिक्रीया दिली. सगळ्यांना धक्का बसला.
"राज गुन्हेगार ?", श्री जहागीरदारांची मोठी मुलगी सिया म्हणाली.
"जावई बापू गुन्हेगार? कसं शक्य आहे?", श्री व सौ जहागीरदार सोबतच म्हणाले.
"मी गुन्हेगार ? ते कसं ?", एका हाताने घाम पुसत राज म्हणाला.
"कारण ज्या नंबर वरून मोहितच्या नावाने रियाला मेसेज आला होता तो तुम्हीच तुमचा ड्राइव्हर विजय निनांवेच्या फोनवरून केला होता. आता कृपया असं नका म्हणू की हे खोटं आहे म्हणून कारण माझ्याजवळ पुरावा आहे.", असं म्हणून मी त्यांना माझ्या फोनवरचा एक फोटो झूम करून दाखवला.
"हा फोटो मला विजय निनावेंच्या सोशल मीडिया अकौंट वरून मिळाला. ह्यात तुम्ही तुमच्या सासरेबुवांच्या बाजूला बसलेला आहात आणि हा विजय त्यांना पुष्पगुच्छ देतोय. बहुतेक हा श्री जहागीरदारांच्या एकसष्टीचा कार्यक्रम दिसतोय. त्यात तुम्ही जे ब्रेसलेट घातलंय जे अजूनही तुमच्या हातात आहे. त्यातील एक हिरा रियाच्या कार मध्ये मला सापडला होता जो मी तेव्हा जपून ठेवला होता. तो असा कामी येईल ह्याची मात्र मला तेव्हा कल्पना नव्हती. सगळ्यात आधी जेव्हा मी चौकशी साठी इथे आलो तेव्हा त्यादिवशी तुम्ही ते ब्रेसलेट घातलं नव्हतं नाहीतर तेव्हाच मला कळलं असतं.",मी
"हो पण त्याने काय सिद्ध होते? तो हिरा त्याच दिवशी पडला कशावरून?", राज
"दुसरा पुरावा म्हणजे हे तुमचे ड्राइव्हर, त्यांनी कबुल केलंय की काल संध्याकाळी पाच वाजता तुम्ही त्यांचा मोबाईल काही काळापुरता घेतला होता. आणि त्याच वेळेस रियाला मेसेज आलेला आहे. याउप्पर रियाला जे तुम्ही चॉकलेट दिलं त्याचं रॅपर ही मी जपून ठेवलं आहे त्यावरचे फिंगरप्रिंट्स तुमच्या फिंगरप्रिंट्स शी जुळले की शंकेला वावच राहणार नाही. बरोबर ?",मी
आता जवळच्या जार मधील पाणी ओतून राज ने घटाघट पिले.
"त्यामुळे आता बऱ्या बोलाने सांगा सगळं",मी
राजने अडखळत बोलणं सुरु केलं , “खरंच मला तिला ठार मारण्याची इच्छा नव्हती पण माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता. श्री. जहागीरदार यांनी ६१ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने जाहीर केले होते की कंपनीचे सर्व अधिकार ते रियाला देत आहेत कारण ती तिचं कॉलेज सांभाळून कंपनी व्यवस्थित मॅनेज करीत आहे म्हणून. हे त्यांचं विधान ऐकून मला फारच अपमान वाटला, मला वाटले श्री. जहागीरदार यांनी हेतुपुरस्सर माझ्याकडे दुर्लक्ष केले. त्यांना असे का वाटले नाही की राज कंपनी सांभाळण्यास सक्षम आहे? काय करायचं? सर्व अधिकारी माझ्या हातात येतील म्हणून मी काय करावे? आणि अचानक माझ्या मनात एक विचार आला.
मला मोहित आणि रियाच्या नात्याबद्दल माहित होतं , म्हणून मी त्याचा फायदा घेण्याचा विचार केला आणि मी मोहितच्या नावाने विजयच्या फोनवरून रियाला मेसेज केला.
त्या दिवशी संध्याकाळी मी रियाला कुहू बीचवर आमंत्रित केले, ती आली आणि तेथे मला पाहून आश्चर्यचकित झाली. मी तिला सांगितले की मी माझ्या बिझिनेस क्लायंटला भेटायला आलो आहे.
मी तिच्याशी थोडं इकडचं तिकडचं बोललो आणि तिला चॉकलेट दिले कारण तिला चॉकलेट्स फार आवडत असल्याने तिने लगेच चॉकलेट घेतले आणि खाल्ले.
मी लगेच तेथून माझ्या कामावर निघालो पण निघत असताना तिच्या कारच्या दारात माझं ब्रेसलेट अडकलं जे मी जोरात ओढून काढलं त्यात त्याचा एक हिरा तिथे कारमध्येच पडला त्याकडे माझं लक्षच नव्हतं. मला वाटले मी जे काही हवे ते साध्य केले परंतु हा माझा गैरसमज होता. दुर्दैवाने मी डिटेक्टिव्ह राघवच्या जाळ्यात अडकलो "
"माझ्या बहिणीबरोबर तू असे कसे केले ?", राजच्या पत्नीने आरडाओरडा केला आणि तिच्या पतीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला.
"शांत व्हा! मॅम! आता दोषींना हाताळण्याचे काम पोलिसांचे आहे", मी
इंस्पेक्टर नाईक आले आणि राजला अटक करून घेऊन गेले.
"माझा जावई खरोखर क्रूर आहे याची मला जाणीव नव्हती, मी त्याच्याशी माझा मुलगा असल्याप्रमाणे वागत होतो पण त्याने आपला खरा चेहरा दाखविला", श्री. जहागीरदार आपल्या हातांनी चेहरा झाकून म्हणाले, त्यांच्या डोळ्यांतून अश्रू ओघळले.
सौ. जहागीरदार आणि सियाही रडू लागल्या. मी त्या सर्वांना शांत करण्याचा प्रयत्न करीत होतो , पण मला त्यांना शांत करण्यासाठी योग्य शब्द सापडत नव्हते. ऋतुजा,मोना आणि मोहन हतबुद्ध पणे बघत रडत होते. निष्पाप रियाचा स्वार्थाने आंधळ्या झालेल्या राजमुळे हकनाक बळी गेला होता.
समाप्त
★☆★☆★☆★☆★☆★☆★☆★☆★☆★