हो नक्कीच. बहुतांशी भारतीय पाश्चात्यांचे अनुकरण करतात. त्याच एकच आणि अगदी सोपं कारण म्हणजे पाश्चात्य संस्कृती ही स्वैराचारावर आधारित असून त्यात बंधनं काहीच नाही मनःपुतं समाचरे म्हणजे मनाला येईल ते वागणे यावर ती आधारित असल्याने आपल्या लोकांना ती फार आवडते. आपल्या संस्कृतीत असलेले नातेसंबंधविषयीचे नियम,सणावरांचे नियम, धार्मिक नियम हे सगळे आजकाल लोकांना नकोशे आणि मूर्खपणाचे वाटतात जड जातात त्याउलट हवं ते हवं तेव्हा करणे हे पाश्चात्य लोकांचं वागणं त्यांची संस्कृती आपल्याला फार रुचते. तात्विक जड गोष्टी आपल्याला पचत नाही हलक्या गोष्टी आपल्याला पचतात.
दुसरी बाब म्हणजे पाश्चात्य देश प्रगत असल्याने त्यांचं जे ही काही असेल ते छानच असा आपला दृढ विश्वास बसला आहे जो अर्थातच चुकीचा आहे. पाश्चात्य देश जरी प्रगत असले तरी सगळ्याच बाबतीत ते आदर्श नाहीत.
ते बुद्धिमान,धोरणी, संधीचा फायदा ओळखणारे,वेळेचे नियोजन असणारे,मेहनती, स्वतःच्या देशाप्रती, कामाप्रति प्रामाणिक असणारे आहेत हे त्यांचे सगळे चांगले गुण आहेत ते आपण घ्यायला काहीच हरकत नाही पण याउलट ते गुण न घेता आपण त्यांच्या संस्कृतीत जे जे वाईट आणि स्वैराचारी आहे तेच घेतो. अर्थात यालाही काही लोकं अपवाद असतीलच जे अजूनही आपल्या संस्कृतीला धरून असतील.
तिसरी बाब म्हणजे मुळात भारतीयांचा स्वभाव परधार्जिणा आहे म्हणजे आपल्या सगळ्या पूर्वजांनी सांगितलेल्या गोष्टींना नावं ठेवणे आपल्या संस्कृतीची टर उडविणे आणि दुसऱ्यांच्या पूर्वजांनी सांगितलेल्या गोष्टींचा त्यांच्या संस्कृती चा उदो उदो करणे हे आपल्या रोमारोमात भिनलेलं आहे ह्यात मोठं योगदान आहे सिनेसृष्टीचे ते वारंवार पाश्चात्य संस्कृती सामान्य माणसांवर बिंबवतात.
तसेच आजकाल शहरात अनेक पाश्चात्य कंपनीत काम करणारे किंवा त्यांच्याशी व्यवहार असणाऱ्या भारतीय कंपन्या त्यामध्ये कामं करणारे कर्मचारी, आय टी इंडस्ट्रीज ह्या मधील कर्मचारी, शहरातील महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थीनि ह्यांच्यावर पाश्चात्य संस्कृती चा प्रभाव दिसून येतो. गावांपेक्षा शहरात पाश्चात्य संस्कृतीचा प्रभाव जास्त दिसून येतो. जेवढी पाश्चात्य संस्कृती नुसार वागणारी व्यक्ती असेल तेवढी ती सुशिक्षित असे मानले जाते जे योग्य नाही.
काहीजण म्हणतात की प्रत्येक संस्कृती ही भौगोलिकदृष्ट्या बनली असते त्यावर मला असा प्रश्न आहे की समजा आपण युरोपीय देश आणि आखाती देश ह्यांची तुलना केली तर आपल्याला असे आढळून येईल की युरोपीय देश अतिथंड आहेत आणि आखाती देश अतिउष्ण आहेत पण आपल्याला काय आढळून येते की युरोपीय देशात स्त्रिया कमी कपडे घालतात (वास्तवात त्यांनी लोकरीचे बुरखे घातले पाहिजे)आणि आखाती देशात उष्ण भौगोलिक परिस्थिती असून स्त्रिया काळे बुरखे(अबाया) घालतात हे किती विरोधाभासी आहे. ह्याचाच अर्थ भौगोलिकदृष्ट्या हा मुद्दा चुकीचा वाटतो.
काही जण असे म्हणतील की ब्रिटिश तीनशे वर्षे आपल्यावर राज्य करून गेल्यामुळे त्यांच्या संस्कृतीचा आपल्यावर प्रभाव आहे मग मोघलांनी तर आपल्यावर सातशे वर्षे राज्य केले मग त्यांच्या संस्कृतीचा किंवा भाषेचा प्रभाव आपल्यावर का बरे दिसून येत नाही? सरसकट आपण बुरखे का घालत नाही?
ह्याचे उत्तर तेच आहे की मोगलांची संस्कृती ही भारतीय संस्कृती पेक्षा अनेक पटींनी बंधनकारक आहे आणि आपल्याला तर बंधन नकोच आहेत मग आपण त्यांची संस्कृती कशी काय घेणार?
पाश्चात्यांचे अंधानुकरण करणाऱ्या भारतीयांचं काय होते हे एका कथेवरून आपल्याला समजेल.
एकदा एक भारतीय एका युरोपीय माणसाकडे जेवायला जातो. एका टेबलवर युरोपीय तसेच भारतीय सगळे पदार्थ ठेवले असतात. पण भारतीय माणसाचा कॉपी करण्याचा स्वभाव असल्याने तो युरोपीय माणसाचे अनुकरण करतो. युरोपीय माणूस त्याच्या नोकराला एक बाउल दोन पाव आणि थोडं दूध मागतो ते पाहून भारतीय माणूस तेच सगळं मागवतो. आता युरोपीय माणूस त्या बाऊलमध्ये दूध ओतून त्यात पाव कुस्करतो ते पाहून भारतीय माणूस सुद्धा अगदी तसच करतो. त्यानंतर युरोपीय माणूस यु यु करून त्याच्या टॉमीला बोलावतो आणि तो बाउल त्याच्या पुढे ठेवतो. ते पाहून भारतीय माणसाला काय करावे काही कळत नाही. युरोपीय माणूस भारतीय माणसाच्या बाउल कडे बघत विचारतो की हे तुम्ही कोणासाठी बनवलं? तेव्हा तुमच्या टॉमीसाठीच असे ओशाळवाणे म्हणण्यावाचून त्याच्याजवळ काही पर्याय उरत नाही.
भारतीय पाश्चात्य लोकांचे त्यांच्या संस्कृतीचे गुणगान करून थकत नाहीत पण जेवढे चांगले शोध पाश्चात्य लोकांनी लावले त्याच्या तोडीसतोड आजाराचे, विषाणूंचे स्त्रोत सुद्धा पाश्चात्यच आहे हे विसरून चालणार नाही. भारतीयांनी त्यांच्यासारखे तंत्रज्ञानाचे शोध नसतील लावले पण त्यांनी विध्वंसक शोध सुद्धा नक्कीच लावले नाहीत हे लक्षात घ्यायला पाहिजे.
मुळात काही बंधने जरी असली तरी भारतीय संस्कृती ही सगळ्यात श्रेष्ठ संस्कृती आहे. आपण पाश्चात्य संस्कृती घेण्यापेक्षा पाश्चात्यांनी आपल्या संस्कृतीतील अनेक गोष्टी घेणे आवश्यक आहे त्यातच त्यांचं भलं आहे. एकवेळ त्यांना जे करायचं ते करू द्यावं पण भारतीयांनी तरी आपली संस्कृती धरून ठेवावी नाहीतर त्यांच्यासारखे करंटे तेच ठरतील.
ह्या सगळ्यात मला एक नमूद करावेसे वाटते की माझ्या मनात कोणाही व्यक्तीबद्दल,भाषेबद्दल,प्रांताबद्दल,जाती-धर्मा बद्दल तसेच देशाबद्दल मुळीच आकस नसून मानवतावादी दृष्टिकोन लक्षात घेऊन सगळ्यांप्रति सद्भावना च आहेत. मी फक्त जे ही वास्तव आहे तेच वर स्पष्ट केले आहे. धन्यवाद🙏
★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★