कारंडेला भेटल्यावर साधिका गुरूंकडे जाते.
साधिका : आजोबा, आजोबा कुठे आहात ?
आजोबा : मी इथे वरच्या खोलीत आहे…तू इथेच ये…
साधिका : बर आले…
ती वर येईपर्यंत आजोबा त्यांची पेटी आवरून ठेवतात. ते त्या पेटीला लॉक लावणार इतक्यात तिथे साधिका येते.
साधिका : आजोबा, काय आहे त्या पेटीत?
आजोबा : वेळ आली की दाखवेन…त्यापेक्षा महत्त्वाचं काम आहे आपल्याकडे सध्या… नाही का?
साधिका : हो…तेही आहेच…आजोबा मी आता कारंडेला भेटले…काही गोष्टींचा उलगडा झाला आहे तर, काहींचा बाकी आहे…
आजोबा : तू सगळं नीट सविस्तर सांग…म्हणजे आपल्याला त्यावर चर्चा करता येईल…
साधिका तिचे कारंडेशी झालेले बोलणे आजोबांना सांगते. त्यानंतर ती आणि आजोबा काही काळ शांत राहिल्यावर आजोबा स्वतःच बोलायला सुरुवात करतात.
आजोबा : साधिका, दुर्जयला हरवणे इतकं सोप्पं नाही…त्याची दुखरी नस आपल्याला सापडायला हवी…फक्त अभिमन्यूला मिळवण्यासाठी त्यांनी कारंडेला कोंडीत पकडलं आहे हे वरवरचं कारण आहे…कदाचित कारंडेला देखील मूळ कारण माहिती नसेल…
साधिका : हो मलाही तोच संशय आहे म्हणून तर मी करांडेच्या मुलाची पत्रिका त्यांना पाठवायला सांगितली आहे…आणि दुर्जयचा जीव त्याच्या मुलीमध्ये असेल असा माझा अंदाज आहे…आजोबा तुम्ही कोणा दिगंबरला ओळखता का ?
आजोबा : काय म्हणालीस ? दिगंबर का?
साधिका : हो…तुम्ही ओळखता का त्याला ?
आजोबा : हो ओळखतो…तू भेटली होतीस का त्याला?
साधिका : नाही पण दुर्जयविरुद्ध तो आपली मदत करू शकेल…अशी माहिती मला मिळाली आहे…
आजोबा : हा त्याची मदत आपल्याला मिळू शकेल… पण दुर्जयला मुलगी आहे? कसं शक्य आहे?
साधिका : काय झालं आजोबा ?
आजोबा : जितकं मला माहिती आहे…त्यानुसार त्याला कुटुंब नाही.. तो फक्त एक आत्मा आहे जो दुसऱ्यांच्या शरीरावर ताबा मिळवतो…आणि स्वतःचे अस्तित्व राखून ठेवतो…तू दिगंबरची भेट घे…
साधिका : आजोबा आपण अर्जुन आणि अभिमन्यूची पत्रिका तपासून पहायची का ?
आजोबा : हो…पण त्या आधी शिरा खाऊयात काय?
साधिका : अरे हो.. मी विसरलेच होते…चला मी गरम करून आणते…
आजोबा : नको तू तो डबा दे मला… मी करतो गरम…
साधिका : ठीके हा घ्या… मी तिला फोन करते तोवर…
आजोबा : थांब आधी नको…हा शिरा खाऊ मग फोन करू…चल खाली जाऊ…
साधिका : हो चला…
स्वयंपाकघरात येताच आजोबा शिऱ्याचा डबा उघडतात आणि डब्यात ठेवलेली चिठ्ठी हळूच उचलतात. नेमके हेच साधिका पाहते.
साधिका : अच्छा…तर हे शिरा प्रकरण आहे…आजोबा तुमच्या दोघांचं काय सुरू आहे…
आजोबा : काही नाही…जशी तुझ्यावर एक जबाबदारी आहे तशीच तिलाही एक जबाबदारी दिली आहे… वेळ आली की सांगेन तुला…मी शिरा गरम करतो..
साधिका : आजोबा, आत्याला नेमकं काय झालं होतं?
साधिकाने तिच्या आत्याबद्दल विचारलेला प्रश्न ऐकून आजोबा थोडे चकित होतात आणि विचारात पडतात. त्यांना असं विचारात गढलेले पाहून साधिकाला आपण काही चुकीचं तर विचारलं नाही ना असं वाटू लागलं.
साधिका : आजोबा, माफ करा…मी उगाच आत्याचा विषय काढला…
आजोबा : बाळा, माफी कशाला मागतेस…आणि अचानक तुला आत्येची कशी आठवण आली ? हा घे शिरा…
साधिका : अहो, अभिमन्यूची आई, आत्याची चांगली मैत्रीण आहे आणि तिला आत्येने दिलेली भेट पण खूप सुंदर आहे…तिला स्पर्श करताच मला असं वाटलं की आत्या अगदी माझ्याजवळ आहे…
आजोबा : तू आरतीला भेटलीस का?
साधिका : आजोबा….
आजोबा : काय झालं? अशी का किंचाळलीस?
साधिका : म्हणजे ते, तुम्हाला कसं माहिती अभिमन्यूच्या आईचं नाव?
आजोबा : तू तिला अभिमन्यूची आई म्हणून ओळखतेस…आणि मी तिला तिच्या बालपणापासून ओळखतो…
साधिका : कसं काय?
आजोबा : माझी शिष्या आहे ती…
साधिका : म्हणजे त्या पण साधक आहेत?
आजोबा : हो पण फक्त मंत्र साधना येते तिला…अंजनीचं सुत फक्त हीच्याशीच जुळलं…
साधिका : आजोबा, तुम्ही तरी मला तुमच्या शिष्यांविषयी सांगा…मी त्यांचा शोध घेऊन त्यांना असुराविरुद्धच्या लढाईसाठी घेऊन येईन…
आजोबा : अगं माझे शिष्य नकळत तुलाच भेटणार आहेत…आणि काही काळाने ते स्वतःहून समोर येतील…आरतीने तुला अंजनीची मुलगी म्हणून ओळखलं…
साधिका : हो…बरं आजोबा, मला आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगायची होती. ती म्हणजे दुर्जयची मुलगी…
आजोबा : मला माहिती आहे ते…तू अभिमन्यूला सांग सध्या तरी या मुलीपासून लांब रहा आणि तू आजपासूनच अभिमन्यू आणि अर्जूनच्या सुरक्षेचा विचार कर…तू माझ्या अभ्यासच्या खोलीत जा… मी आलोच…
साधिका : हो…
अभिमन्यूच ठीक आहे पण अर्जुनची कशी रक्षा करू? असा विचार करत साधिकाच्या आजोबांच्या अभ्यासाच्या खोलीत येते. ती हाच विचार करत खिडकीजवळ उभी असतानाच आजोबा खोलीत येतात.
आजोबा : तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील…नको इतका विचार करुस आणि स्वतःची ऊर्जा वाया घालवूस…
साधिका : बर…
आजोबा : ये इथे बस… आपण पत्रिका तपासून पाहू…
साधिका तिच्या फोनमधील अभिमन्यू आणि अर्जुनची पत्रिका आजोबांना दाखवते. ते पाहून आजोबा वहीच्या एका पानावर काही तरी खरडतात. काही वेळाने सगळे अंदाज मांडून झाल्यावर आजोबा आणि साधिकाला काही गोष्टी स्पष्ट होतात.
आजोबा : बघ मी बोललो नव्हतो…कारंडेपासून त्यांनी हे लपवून ठेवलं आहे…
साधिका : या दोघांचं नक्षत्र आणि गोत्र सेम आहे…यांचा वाढदिवस एकच आहे आणि वेळही जवळपास सारखीच आहे…म्हणजे आजोबा अभिमन्यूप्रमाणे हा सुद्धा दृष्टचक्रात अडकला आहे…
आजोबा : हो…आणखी एक गोष्ट…ती म्हणजे यांच्यात काहीतरी समांतर धागा आहे…त्याचा शोध घ्यावा लागेल…
साधिका : हो त्यासाठी मी दिगंबर यांची भेट घेईन…उद्याच जाते…
आजोबा : एवढा वेळ वाया घालवून उपयोग नाही…मी आताच दिगंबरला बोलावून घेतो…
साधिका : काय आता ? अहो आजोबा बाहेर रात्र बघा किती झालीये…
आजोबा : साधिका आपल्याकडे वेळ कमी आहे बाळा…अभिमन्यूवर नक्कीच कोणतं तरी मोठं संकट येणार आहे…एक काम कर तू थोडा वेळ आराम कर…दिगंबर आला की मी तुला बोलवतो..
साधिका : मीपण थांबते ना आजोबा…
आजोबा : तू तुझी शक्ती आणि ऊर्जा आजपासून वाचवायला शिक…जा आता आराम कर…मी हाक मारतो तुला…
साधिका : ठीके…
साधिका खोलीत गेल्याची खात्री होताच आजोबा त्यांच्या टेबलाच्या खणातील एक बटवा काढतात आणि त्यातील एका तबकडी काढतात व तबकडीवरील एक छोटेसे बटण दाबतात. त्या तबकडीवर दत्तात्रेय असं नाव लिहिलेलं असतं.
—-----------------------------------------------------
मध्यरात्री आरती आभिमन्यूच्या खोलीत येते आणि त्याला निवांत झोपलेले पाहून तिला समाधान वाटते. ती त्याच्या डोक्यावरून मायेने हात फिरवते. थोडावेळ अभिमन्यूजवळ बसून ती तिच्या खोलीत येते.
अजित : अजून किती दिवस त्याच्यापासून सत्य लपवणार आहेस…?
आरती : गुरुदेवांची आज्ञा येईपर्यंत मी त्याला काही सांगणार नाही…सध्या तो ज्या संकटात सापडला आहे…त्यातून त्याचं बाहेर निघणं गरजेचं आहे…
अजित : तू त्यासाठी तुझ्या गुरुदेवांशी संपर्क केलास का?
आरती : त्यांनीच मला याची कल्पना दिली की अभिमन्यू संकटात सापडणार आहे तर सावध रहा…काही अनुष्ठाने करायला पण सांगितली आहेत…तुम्ही नका काळजी करू…ते आहेत तर सगळं ठीक होईल…
अजित : हो…माझा त्यांच्यावर विश्वास आहे… बर तू झोप…परत तुला साधनेसाठी उठायचं असेल ना…
आरती : हो…आजपासून सुरुवात करणार आहे मी…
अजित : आरती, आपण अभिमन्यूवर पाळत ठेवूया का ग? म्हणजे त्याला गरज असेल तेव्हा आपण मदतीला जाऊ शकू…
आरती : नका चिंता करू…मी त्याची सोय केली आहे…तुम्ही आता निवांत झोपा…
—-----------------------------------------------------
रेणुका त्यांच्या खोलीत झोपलेल्या असतानाच त्यांच्या खोलीचे दार वाजते. त्यांनी खोलीचे दार उघडताच वैशाली पटकन खोलीत शिरून दार बंद करते. नेमके त्याचवेळी पाणी प्यायला आलेला सत्येश मात्र तिला आजीच्या खोलीत जाताना पाहतो. त्यांचे काय बोलणे सुरू असेल हे जाणून घेण्यासाठी तो दरवाजाला कान लावतो.
रेणुका : वैशाली, तू इतकी घाबरली का आहेस? काय झालं? वाईट स्वप्नं पाहिलेस का? हे पाणी पी आणि शांत हो…मग सांग काय झालंय ते…
वैशाली : आई, अगं रुपेशने फोन केला होता…त्याला सत्तूची पत्रिका हवी आहे…
रेणुका : म्हणजे सत्तूचा बळी द्यायचा आहे तर त्याला…आणखी काही म्हणाला का तो?
वैशाली : त्याचा माणूस येईल पत्रिका घ्यायला असं म्हणाला…
रेणुका : तू आधी एक काम कर त्या पत्रिकेचे फोटो काढून ठेव आणि त्याला ती पत्रिका दे…
वैशाली : आई अगं, तुला माहिती आहे तो वेडा झालाय…आधीच मी राजेशला गमावलं आहे…सत्तूला नाही गमवायचंय मला…
रेणुका : वैशू, इथे बघ…माझ्यावर विश्वास आहे तुला…
वैशाली ; हो आहे…
रेणुका : मग मी सांगते ते कर…तू पत्रिका दे त्याला…असं पण त्याला याबाबतीत आपल्याला फसवता येणार नाही…आणि सत्तूला गुरूंकडे पाठवण्याची तयारी कर…मला ते पत्रिकेचे फोटो ल लगेच पाठव…सत्तू झोपला आहे का ते बघ आणि मला मेसेज कर… उद्या मी बोलते त्याच्याशी…जा निवांत झोप…
वैशाली : ठीके…
वैशाली खोलीतून बाहेर पडल्यावर रेणुका त्यांच्या कपाटातील एक बटवा काढतात आणि त्यातील गुरुदेव नावाची तबकडीवरील लाल रंगाचे बटण दाबतात.
—---------------------------------------------------
इकडे आजोबा सत्या नावाच्या तबकडीवर लाल रंग चमकत असल्याचे पाहून ते चिंतीत होतात. ते येरझाऱ्या मारत असतानाच दिगंबर तिथे येतो..
दिगंबर : आंजनेय, कसा आहेस मित्रा…?
आजोबा : मी बरा आहे…तू बस मी तुला चहा पाणी आणतो…
आजोबा चहा ठेवून लगबगीने साधिकेला उठवायला जातात.
—--------------------------------------------------