डोमेस्टिक हेल्पर पूर्वी मोलघेऊन घरकाम करणाऱ्या बायकांना मोलकरीण म्हणत असत पण आजकाल शहरात त्यांना मेड किंवा डोमेस्टिक हेल्पर म्हंटले जाते.
आमच्याकडे अनेक गमतीदार डोमेस्टिक हेल्पर होऊन गेल्या. त्यांच्या एकाहून एक गमतीदार किस्से आहेत,तेच मी आता सांगणार आहे.
मी,माझी मोठी बहीण,माझे आईबाबा आणि माझे आजी- आजोबा असं आमचं कुटुंब आहे,माझ्या आजोबा एक नंबर चे खवय्ये आहेत त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने केलेले वेगवेगळे पदार्थ खायला आवडतात.
एकदा त्यांनी फर्मान काढलं,"इंदू(आजी) आणि सुषमा(आई) आता तुम्हाला जरा सुट्टी द्यावी म्हणतो,रोज रोज तेच ते काम करून तुम्हाला ही कंटाळा येत असेल आणि तुम्ही केलेला 'रुचकर'(असं म्हणून माझ्या बाबांकडे बघून त्यांनी डोळे मिचकावले) स्वयंपाक खाऊन आम्ही सुध्धा तृप्त झालो 'ओब्ब' असा ढेकर ही त्यांनीं काढला.
"बरं मग म्हणणं काय आहे तुमचं जरा ते तर कळू द्या",आजी
"माझं म्हणणं हेच आहे की आता आपण एक उत्कृष्ट स्वयंपाकिण लावू, माझ्या मित्रा कडे एक स्वयंपाकिण काम करते. ती फारच छान स्वयंपाक बनवते असं त्याचं म्हणणं आहे तेव्हा तिचं स्वयंपाकिण आपण आपल्याकडे लावावी असं मला वाटते.",आजोबा उत्साहाने म्हणाले.
"ठीक आहे तुमची एवढी इच्छाच आहे तर लावा स्वयंपाकिण,बोलावून घ्या तिला",आजी
"बोलावून घ्या? अरे मी बोलावली कालच सांगितलं मित्राला आज येईल ती एवढ्यात शांताबाई",आजोबा ठसक्यात म्हणाले.
"येऊ द्या हमको क्या अपन तो मझा करेंगे",असं म्हणून आईकडे बघत, खांदे उडवून आजी निघून गेली.
आजोबा बघतच राहिले आणि म्हणाले, "काय ही इंदू आणि काय तिचं ते हिंदू 'च' अशी जीभ चावून ते म्हणाले आपलं हिंदी" आजीला मधून मधून हिंदी बोलण्याची हुक्की येते आणि तिची हिंदी ऐकून ऐकणार्याची वाचा बसते.
झालं शांताबाईं ठरल्याप्रमाणे आली तिने संपूर्ण स्वयंपाक केला. आम्ही सगळे जेवणाच्या टेबल वर बसलो टेबल वर बसलो म्हणजे अक्षरशः नाही काही तर टेबल समोरच्या खुर्चीत बसलो.
सगळ्या पदार्थांचा खमंग वास येत होता, वा वा असं म्हणत आजोबांनी स्वतः च वाढून घेतलं आणि जेवण सुरूही केलं. बाबा आणि आजोबा आज मुळीच बोलण्याच्या मुड मध्ये न्हवते, भराभर त्यांचे हात आणि दात चालत होते. मी आणि माझी बहिण बघतच राहिलो तेवढ्यात आजीने माझ्या पाठीवर जोरात थाप मारली आणि म्हणाली, "जेव न निशे लक्ष कुठाय तुझं" आणि माझ्या बहिणीने आश्चर्याने उघडलेल्या तोंडात आईने "घे उषे" असं म्हणून खिरीचा घास कोंबला.
तेव्हा कुठे आम्ही दोघी भानावर आलो.
जेवणं झाल्यावर आजोबांनी 'अबबई' असा त्याचा जगप्रसिद्ध ढेकर दिला.
"स्वयंपाक फारच चविष्ट झाला होता नाही",बाबा आजोबांना म्हणाले.
"मग मी म्हंटलच होतं,काय आपल्या घरच्या बायका जेवण बनवायच्या पचपचीत आणि मिळमिळीत(तोंड खराब करून आजोबा म्हणाले) आज तोंडाला चव येऊन गेली(खुश होत)",आजोबा म्हणाले.
अशा प्रकारे रोजच शांताबाई चविष्ट स्वयंपाक करू लागली. एके दिवशी आई आणि आजी बाहेर गेल्या होत्या तरीही शांताबाईंच्या भरवश्यावर आजोबानी त्यांच्या मित्रांना जेवायला बोलावलं होतं. आजोबांचे शरद आणि सुधीर असे मित्र आमच्याकडे जेवायला आले होते. आजोबांनी शांता बाईंची त्यांच्या मित्राजवळ खूप प्रशंसा केली होती. आजोबा व त्यांचे मित्र मोठ्या उत्साहाने जेवायला बसले. सगळेजण उत्साहाने ताटातल्या पदार्थांकडे बघत होते. शरद नावाच्या मित्राने एक पदार्थ तोंडात टाकताच 'शरद झाला गारद ' अशी त्यांची अवस्था झाली तर तिकडे दुसऱ्या मित्राने दुसरा पदार्थ तोंडात टाकताच 'सुधीर झाला बधीर ' अशी त्यांची अवस्था झाली, एवढंच नाही तर बधीर झालेल्या सुधीरची कवळी फटकन ताटात पडली. त्यांची ही अवस्था पाहून आजोबांनी हात आवरता घेतला आणि एकीकडे मित्रांकडे खोटं खोटं हसत तर शांताबाई कडे खाऊ की गिळू या नजरेने पाहू लागले.
मित्रांना जड अंतकरणाने निरोप देऊन आजोबा वळले आणि त्यांनी शांता बाईंना कायमचा राम राम ठोकला.
त्यानंतर दुसरी डोमेस्टिक हेल्पर कामावर रुजू झाली जिचे नाव होते 'कांता'
आठ दहा दिवसांनी कांता बाईंच्या पाककलेची पातळी घसरू लागली. माझ्या आजोबांना सुकी भाजी पेक्षा रस्स्याची भाजी आवडते तसे कांता बाईला सांगण्यात आलं होतं त्याप्रमाणे तिने काही दिवस भाजी चांगली केली होती पण पुढे ती रस्सा म्हणून खुशाल भाज्यांमध्ये पाणी टाकायला लागली. एकदा जेवत असताना आजोबांनी कांता बाईंना बोलावलं आणि म्हणाले," काय हे बाई कोणता पदार्थ आहे हा ?"
"भाजी आहे ती, तुमीच सांगितलं होतं ना रस्स्याची भाजी पाहिजे म्हणून केली", कांता
"माझ्या उभ्या आयुष्यात मी पानकोबीच्या पानांना एवढं स्वीमिंग करताना बघितलं नसेल एवढे हे पानं स्विमिंग एक्सपर्ट झालेले आहेत,काही वाटते की नाही तुम्हाला बाई, काय चेष्टा लावलीय,रस्सा म्हणजे पाणी टाकून द्यायचं,एवढं पाणी टाकलं तुम्ही की आज चालत न जाता स्विमिंग च करत जा आता तुमच्या घरी.",आजोबांचा अविर्भाव बघून कांता घाबरून तिच्या घरी पळून गेली.
दुसऱ्यादिवशी कांता दबकत दबकत घरात आली आणि तिने स्वयंपाक करणं सुरू केलं तसा आजोबांनी बाईला आवाज दिला आणि म्हणाले," हे बघा बाई, मोठ्ठी हिम्मत करून मी आज तुम्हाला शिरा करायला सांगतोय,माझ्यावर पश्चातापाची वेळ येऊ देऊ नका"
थोड्या वेळाने कांता शिरा घेऊन आली, आजोबांनी तो शिरा बघताच देवाला नमस्कार केला आणि एक घास तोंडात टाकला आणि त्यांचं तोंड कडू झालं. "कुठून दुर्बुद्धी झाली मला आणि या बाईला शिरा करायला लावला",अस म्हणून त्यांनी डोक्याला हात लावला.
"काय झालं आजोबा काही चुकलं का?",कांता
"तुझं नाही माझंच चुकलं,जा तू",अस म्हणून आजोबांनी मला बोलावलं
"निशा,जा बेटा हा शिरा नावाचा प्ले डो शेजारच्या पिंटूला देऊन ये त्याला तरी उपयोगी पडेल", असं आजोबा म्हणताच कांता काय समजायचं ते समजली.
दुसऱ्या दिवशी कांताबाई आल्यावर आजोबांनी तिला खुर्चीत बसायला सांगितलं. मी,माझी बहिण, आईबाबा, आजी बघू लागलो. आतल्या खोलीतून आजोबांनी एक पिशवी आणली. आम्हाला कळेचना की आजोबा आता काय करणार. "इंदू आतून हळदीकुंकवाचा करंडा आण बरं",आजोबा आजीला म्हणाले. आजीने करंडा आणला. "लाव कांता बाईंना", आजोबा शांतपणे म्हणाले. कांता बावचळून बघू लागली,आमचाही कन्फ्यूजन चा गोंधळ झाला. आजीने कांताबाईंना हळदी कुंकू लावताच आजोबांनी पिशवीतली शाल काढून कांताबाईंना पांघरली आणि त्यांच्या हातात नारळ देऊन टाळ्या वाजवल्या.
"हे बघा कांता बाई तुमच्या आत्तापर्यंत च्या कामगिरीबद्दल तुमचा सत्कार करण्यात येत आहे हे घ्या तुमच्या मानधनाचे पाकीट,आम्ही फार कृतकृत्य झालो पण आता यापुढे आम्हाला हे सहन होणार नाही तेव्हा तुम्ही या आता आणि अर्थातच उद्यापासून कामावर येण्याची गरज नाही",असं म्हणून आजोबांनी हात जोडले.
तेवढयात ही कांताबाईंनी आजोबांना नमस्कार केला 'आभारी आहे' असं म्हणून जी धूम ठोकली की थेट स्वतः च्या घरापर्यंत.
आजोबांनी हार मानली नव्हती त्यांनी अजून एक स्वयंपाकिण शोधली त्यांचे नाव कौशल्या बाई. ह्या बाई हिंदी बोलायच्या त्यांना मराठी समजायचं नाही. आजीने त्या बाईला सगळ्या सूचना दिल्या. "बघो बाई पहेलेच बोल देती मै मेरे मरद को रस्से वाली सब्जी मंगती,ज्यादा तिखट नको और ज्यादा पाणचट भी नाहि ऐसें करो, रोटी ज्यादा जाडी नई और पातळी भी नई ऐसें सब बनाव",आजीने हिंदीत सूचना दिल्या.
"चिंता मत करो आंटी मैं संभाल लुंगी",कोशल्या बाई. झालं ,कधी कौशल्या बाईच्या पोळ्या जाड्या होत तर कधी कच्च्या,कधी भाजी करपायची तर कधी कच्ची राहायची कधी डाळ कच्ची राहायची तर कधी जळकी लागायची. आजीने काही विचारलं की तिच्याजवळ कारण ठरलेले असे, पोळी जाड किंवा कच्ची का झाली? गहू खराब असेल म्हणून
भाजी कच्ची का झाली ? भाजी चिवट होती म्हणून स्वयंपाक घरात धूर का झाला? तुमच्याकडची चिमनी खराब झाली म्हणून
डाळ का शिजली नाही? कुकर खराब झाला असेल म्हणून. अशा प्रत्येक प्रश्नाचे कौशल्या बाई कडे उत्तर असे. बरं या बरोबरच आठवड्यातून दोन दिवस ती हटकून सुट्टी घेत असे, कारण विचारल्यावर तीचे उत्तर ठरलेलं असे. अमक्याची तब्बेत खराब झाली, तमक्याची मयत झाली, ढमका आजारी पडला कधी ती स्वतः च आजारी पडत असे , अश्या तर्हेने ती तिच्या नातेवाईकांपैकी कोणा न कोणाला आजारी तरी पाडत असे नाहीतर डायरेक्ट त्याला ढगातच पाठवून देत असे.
सगळे नातेवाईक जेव्हा संपले तेव्हा एकदा तर तिने कहरच केला. "क्यों कौशल्या बाई , कल कायकू दांडी मारी तुमने, हम तुम्हारे भरोशे पे बैठे ना बारा वाजे तक", आजीने परत तिला हिंदीत विचारले.
"वो आंटी कोईतोभी मर गया था",कौशल्या बाई
"कोईतोभी मतबल? तुमको नाव पता नाही? तुम वहा गयी होनगी ना",आजी
"हां मैं गयी थी पर पता नई शायद नाम भूल गयी",कोशल्या चाचरत बोलली.
"लेकीन मेरेको पता चल गया एक नंबर की ठग बाई हो तुम कुछ भी बोलती हो. येलो तुम्हारा पगार और कलसे काम पे मत आवो.", असं म्हणून तिला तिचा पगार देऊन आजीने तिची रवानगी केली.
आजोबांनी शेवटचा प्रयत्न म्हणून एक अजून बाई शोधून आणली, शिलाबाई. शिलाबाई मराठीच होती. या बाईला सुद्धा सगळ्या सूचना देण्यात आल्या. शिलाबाई ची अलगच तऱ्हा होती. तीला पाच पाच मिनिटांनी फोन यायचे, त्यावर ती एवढ्या मोठ्याने बोलायची की विचारता सोय नाही, तिला वाटायचे की जेवढ्या लांबून फोन येईल तेवढं मोठ्याने बोलणं आवश्यक आहे. अजून तिची खासियत म्हणजे तिला ऐकायला कमी येत असे, त्यामुळे तिच्याशीं सातव्या असमान वर जाऊन बोलावं लागे. एकदा बाबांचे मित्र आले होते आणि त्यांचं महत्वाच्या बाबीवर चर्चा सुरू होती एवढ्यात शिलाबाईचा फोन वाजला आणि झालं सुरू शिलाबाईंचं जोरजोरात बोलणं सुरू. बाबा आणि त्यांचे मित्र तो भसाडा आवाज ऐकून जागीच थिजले. आजोबा सावकाश स्वयंपाक घरात जाऊन मोठ्याने म्हणाले,"काहो शिलाबाई,फॉरेनला असते का म्हंटलं पोरगा तुमचा?"
"नाई बा! काम्हून विचारलं?" शिलाबाई
"नाही म्हंटलं, तुम्ही एवढ्या मोठ्याने बोलता म्हणून विचारलं, पण आता झालं न बोलणं आपलं, आता माझ्या मुलाला आणि त्याच्या मित्रांना थोडं बोलायचंय तर बोलू देतो मग त्यांना, नाही तुम्ही म्हणत असाल तरच बरं, नाहीतर नाही" आजोबाने नॉर्मल आवाजात विचारलं.
शिलाबाई चा चेहरा निर्विकार होता, एकदा तिने आजोबांकडे बघितलं मग आजीकडे बघितलं आणि भिडली परत कामाला. आजोबांनी प्रश्नार्थक नजरेने आजी कडे बघितलं तेव्हा आजीने सांगितलं की शिलाबाईला काहीही ऐकू आलेलं नाही. आजोबांनी शिलाबाई ला कोपरापासून नमस्कार केला. एकदा आजोबांना शिलाबाई ला काहीतरी सूचना करायच्या होत्या म्हणून त्यांनी तिला बोलावले व मोठ्याने म्हंटले, आजी तिकडून म्हणाली की अजून मोठ्याने बोला तसे आजोबा अजून मोठ्याने बोलले, आजी म्हणाली की अजून मोठयाने, आता आजोबा एवढ्या मोठ्याने म्हणाले की शेजारचे गणू काका घाबरे-घुबरे होऊन आले व म्हणाले,"गंगाधरराव कोणाचं काही चुकलं का एवढे का तुम्ही चिडलेले दिसता, तुमचा मोठा आवाज ऐकून ताडकन उठून मी आलो मला तर आवाज दिला नाही न तुम्ही."
मग आजोबांनी गणुकाकांचा गैरसमज दूर केला, "स्वयंपाकिण बाई बहिऱ्या असल्यामुळे मी ओरडलो" असे त्यांना सांगितले.
एके दिवशी आजोबांना जरा ऍसिडिटी झाली असल्याने त्यांनी शिलाबाईला साधी खिचडी करायला सांगितली. "हे बघा शिलाबाई अगदी साधी खिचडी करा त्यात काही टाकू नका.",आजोबा
"बरं", शिलाबाई थोड्यावेळाने आजोबांना भूक लागली त्यांनी जेवायला वाढून मागितलं. शिलाबाईंनी त्यांना वाढून दिलं. ताटातल्या खिचडीकडे संशयाने एकटक बघून शेवटी त्यांनी एक घास तोंडात टाकला, घास टाकताच त्यांनी मळमळल्या सारखं तोंड करून लोटी भर पाणी पिऊन टाकलं. "नका हो नका माझा एवढा छळ मांडू शिलाबाई",असं म्हणून आजोबांनी उपरणं डोळ्याला लावलं. शिलाबाईंनी घाबरून माझ्या आजीला बोलावून आणलं.
" का हो काय झालं?",आजी गोंधळून म्हणाली.
"किती हा भोळेपणा, इंदू. ह्या शिलाबाई का एवढ्या भोळ्या आहेत? अगं मी फक्त यांना साधी खिचडी करायला सांगितली त्यात काही टाकू नका असं मी म्हंटल तर यांनी भाबडेपणाने हळद आणि मीठ सुद्धा टाकलं नाही गं, मला असहनीय आहे हा भाबडेपणा",असं म्हणून ताडकन उठून आजोबा उभे राहिले आणि शिलाबाईंना काही म्हणणार एवढ्यात त्यांनी तिचा बहिरेपणा लक्षात घेऊन एका कागदावर लिहून दिले,
'शिलाबाई आता तुम्ही घरी जा, उद्या सकाळी नऊ वाजता या' शिलाबाई मान डोलावून निघून गेल्या. सकाळी नऊ वाजता परत एकदा शांताबाईंप्रमाणे शिलाबाईंचा सुद्धा आजोबांनी शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार केला त्यांचा पगार आणि हो ऐकण्याची मशीन त्यांना प्रेझेन्ट देऊन त्यांना कायमचा राम राम म्हंटला. "आता कोणती डोमेस्टिक हेल्पर आणायची?",आजी म्हणाली
"आता कोणतीच डोमेस्टिक हेल्पर नको आता तुम्ही घरच्या बायका जे ही कराल ते निमूटपणे खाऊन पडून राहीन मी बापडा, एवढेच नव्हे तर ह्या उषा-निशा यांनी काहीही पदार्थ बनवण्याचे प्रयोग करू दे, जरा ही हुं का चुं मी करणार नाही", आजोबा कोपरापासून हात जोडत म्हणाले.
"ये हुई ना बात" असं मोठ्याने आणि "अब उंट आया पहाड के नीचे" असं हळूच म्हणत आजी हसून स्वयंपाक घराकडे वळली.
. ****************समाप्त************