तो घाईघाईने रस्त्याने चालत होता. आज ऑफिस सुटायला बराच वेळ झाला होता. रात्रीचे साधारण अकरा वाजले असावे. पाऊस पडायला सुरुवात झाली होती. त्याने लगेच जवळची छत्री उघडली आणि तो सारखा मनगटावरील घड्याळात बघत बघत तो भराभर पावलं उचलू लागला. सगळीकडे सामसूम वातावरण होतं. किर्रर्र अंधार आणि निर्मनुष्य रस्ता. एक दहा मिनिटं चालल्यावर तो त्याच्या ऑफिस जवळ असलेल्या नेहमीच्या बस स्टॉप जवळ आला. भराभर चालल्याने त्याला कपाळावर घाम आला तो त्याने रुमालाने पुसला. ' चला पोचलो बाबा एकदाचं वेळेवर, शेवटची बस चुकली असती तर वांधा झाला असता ' असा विचार करत त्याने बस स्टॉप वरच्या बेंचवर बूड टेकवलं. छत्री बंद करून त्याने सहज इकडे तिकडे बघितलं तर तेवढ्यात त्याचं लक्ष त्याच्या डाव्या बाजूला वेधलं गेलं.
. त्याच्या अंगावर शहारा आला. बाजूला एक साधारण २०-२२ वर्षांची तरुणी लाल साडी परिधान करून बसली होती. तिच्याकडे बहुतेक छत्री नसावी कारण बऱ्यापैकी ती ओली झाली होती आणि थंडीने ती थरथरत होती. त्याने लगेच आपलं जर्किन काढून तिच्याकडे देत म्हंटल, " एक्सक्यूज मी! आपल्याला थंडी वाजते आहे, तर हे घेऊ शकता. "
त्याचं हे वाक्य ऐकून ती जरा संभ्रमावस्थेत पडली, क्षणभर विचार करून तिने ते जर्किन घेतलं.
"धन्यवाद! मी आपली आभारी आहे " तिचा आवाज किणकीणला. ' अरे व्वा! रूपासोबतच देवाने हिला गोड गळा सुद्धा दिला आहे तर!" असा विचार त्याने केला.
"तुमचं ऑफिस आज उशिरा सुटलं का?" त्याने विचारलं.
" नाही तर! माझं ऑफिस सुटण्याची ही नेहमीचीच वेळ आहे. "
" अच्छा! आज मला उशीर झाला जरा ऑफिसमध्ये कामं निपटवता-निपटवता, बरं झालं ते एक प्रकारे, आज तुमच्याशी भेटण्याचा योग आला." त्याने तिच्याकडे बघत उत्तर दिलं. त्याच्या वाक्याने ती मंदपणे हसली.
"आपलं घर लांब आहे की जवळ?" त्याने अजून संभाषण वाढवत म्हंटल.
" फार लांब नाही. बस ने पंधरा मिनिटात पोचते मी घरी. आणि आपलं घर?"
" माझं जरा लांब आहे. अर्धा तास लागतो. " तो घड्याळात पाहत बोलला.
"आपलं नाव काय आहे? " त्याने विचारलं पण तिचं लक्ष नव्हतं म्हणून तिचं लक्ष वेधण्यासाठी त्याने म्हंटलं, "माझं नाव...." तो वाक्य पूर्ण करणार तेवढ्यात एक बस येते.
" चला माझी बस आली. " असं म्हणत ती उठली आणि जर्किन काढून द्यायला लागली.
" असू द्या! घरी पोचेपर्यंत उपयोगी पडेल. पावसामुळे चांगलाच गारठा वाढलाय वातावरणात. "
"पण आपली भेट केव्हा होणार? आज तुम्हाला उशीर झाला म्हणून आपण भेटलो. " ती
" तुमची इच्छा असेल तर मी रोज ऑफिसमध्ये ओव्हरटाईम करून या वेळेस येऊन तुम्हाला भेटू शकतो" त्याने उत्साहात म्हंटल.
ती काही न बोलता गालातल्या गालात हसत आपली पर्स सावरत बसकडे चालू लागली. हसल्यामुळे तिच्या गालावरची खळी फारच शोभून दिसत होती. तो तिच्याकडे बघतच राहिला. बसच्या हॉर्न ने तो भानावर आला आणि तिच्या मागोमाग चालू लागला. बस मध्ये तुरळक गर्दी होती. तिने एक सीट बघितली आणि ती त्यावर बसली. तो सुद्धा "मी इथे बसू शकतो का? " असं म्हणून तिच्या उत्तराची वाट न पाहता तिथे बसला. तिच्याजवळ बसताच त्याला थोडा जळकट वास आला. 'अरे! असा कसा जळका वास येतोय?' असा विचार करून त्याने इकडे तिकडे आणि बस च्या बाहेरही पहिले पण त्याला काही जळत असलेलं दिसलं नाही. तो वास तिच्या अंगाचाच येत होता. असेल कुठला तरी पर्फ्यूम म्हणून त्याने दुर्लक्ष केलं. त्याने तिला पुन्हा " आपले नाव नाही सांगितले? " असे विचारले. त्यावर तिने, " नावात काय ठेवलंय? " असं म्हणून हसत त्याचं उत्तर टाळलं.
"नावात काही नाही पण तुम्हाला आवाज द्यायचा असेल तर कोणत्या नावाने हाक मारायची?" त्याने विचारलं.
"सांगेन मी पुढच्या वेळेस, तोपर्यंत तुम्ही विचार करा कोणतं नाव असेल ते?" तिने हसत उत्तर दिलं.
त्याला त्या उत्तराची जरा गंम्मत वाटली म्हणून त्याने जास्त खोदून विचारलं नाही. ती खिडकी बाहेर बघत राहिली आणि तो तिच्याकडे.
पंधरा मिनिटातच ती सीटवरून उभी राहिली.
" माझं घर आलं. " ती लगबगीने जात म्हणाली.
" एवढ्या लवकर तुमचं घर आलं सुद्धा!" त्याने जरा आश्चर्यानेच विचारलं.
" हो, मी म्हंटलं तर होतं तुम्हाला की माझं घर पंधरा मिनिटांच्या अंतरावर आहे ते. " ती त्याच्याकडे आरपार बघत म्हणाली.
"ठीक आहे, भेटू उद्या " तो जरा नाराजीने म्हणाला.
ती गेली त्या दिशेने त्याने बघण्याचा प्रयत्न केला पण तेवढ्यात बस सुरु झाली. त्याला कमालीची हुरहूर वाटू लागली. 'कोण असेल ही? कोणत्या ऑफिसमध्ये काम करत असेल? एवढ्या रात्री बेरात्री एकटी जाताना हिला भीती कशी वाटली नाही? ज्या रस्त्याने ती जाताना दिसली तो रस्ता केवढा निर्मनुष्य होता. कमाल आहे बुआ आजकालच्या डॅशिंग मुलींची.' असा विचार करतच तो घरी पोचला पण घरी आल्यावर त्याला काही झोप आली नाही. तो बसस्टॉप वर झालेला प्रसंग, तेथील संभाषण मनातल्या मनात घोळवत बसला. पहाटे केव्हातरी त्याला झोप लागली. त्याला जाग आली ते कुठल्याश्या जळक्या वासाने. त्याने उठून पाहिलं तर वास किचन मधून येत होता. तो झोपेतून धडपडत उठून किचनमध्ये गेला तेव्हा त्याला दिसलं की सिम केलेल्या गॅसवर एका पातेल्यात दूध उकळून उकळून जाऊन भांड काळं ठिक्कर पडलं होतं. आत्ता त्याला आठवलं की जेव्हा त्याला पहाटे चार ला झोप आली त्याच्या काही वेळा पूर्वीच कॉफी घ्यायची म्हणून त्याने दूध तापवायला ठेवलं होतं पण 'तिच्या' आठवणीत रमल्यामुळे तो गॅस बंद करायला विसरला होता. लगेच त्याने त्याची दिनचर्या आटोपली आणि मोठ्या उत्साहात तो ऑफिसमध्ये गेला. ऑफिसमध्ये ही आज तो नेहमीसारखा त्रासिक दिसत नव्हता उलट मस्त शिळ वाजवत कामं हातावेगळी करत होता. तेवढ्यात त्याच्या मित्राने विचारलंच, " काय रे! काही विशेष? शीळ वगैरे वाजवणे सुरु आहे म्हणून विचारले. "
"अरे लवकरच मी सगळ्यांना पार्टी देणार आहे " तो हसत म्हणाला.
. "अरे व्वा! प्रमोशन होणार असं दिसतंय " त्याचा मित्र उत्साहाने म्हणाला.
" प्रमोशनच आहे पण ते ऑफिसमधलं नाही. " तो
" मग कुठलं आहे प्रमोशन? " मित्राने प्रश्नार्थक मुद्रेने बघत विचारलं.
" ते कळेल रे लवकरच! ते जरा सरप्राईझ आहे. जरा धीर धर." तो म्हणाला.
एकेक काम संपवत तो घड्याळाकडे बघत होता. हळूहळू सगळे कर्मचारी आपल्या घरी निघाले. जाताना बॉस ने सुद्धा त्याला आज ओव्हर टाईम करण्याची गरज नसून तो नेहमीच्या वेळी घरी जाऊ शकतो असं सांगितलं पण त्यानेच स्वच्छेने आज जास्त काम मागून घेतलं. तेवढ्यात त्याचा तोच मित्र पुन्हा त्याच्याजवळ रेंगाळला आणि काही विचारणार तेवढ्यात हाच म्हणाला, " काही विचारू नको. सांगितलं न सरप्राईझ आहे म्हणून. सांगेनच मी काही दिवसात "
. मित्र हाताने 'कमाल आहे ' असं खूण करत निघून गेला. नेहमीची वेळ झाल्यावर ह्याने फाईल्स ठेवून आपली बॅग उचलली आणि तो वेगाने बसस्टॉप कडे चालायला लागला.
बसस्टॉप नजरेच्या टप्प्यात येताच त्याने तिकडे निरखून पाहिलं आणि तो स्वतःशीच खुश झाला. ती तिथेच बसलेली होती. जवळ गेल्यावर त्याला दिसलं की आजही तिने लालच साडी नेसली होती. तिच्या डाव्या हातात त्याचं जर्किन होतं.
"आलो की नाही वेळेवर? " त्याने रुमालाने कपाळ पुसत म्हंटले. "
"हो अगदी वेळेत आलात. अजून बस यायचीय." ती
" म्हणजे मी इथे बससाठी आलोय असं वाटतंय का तुम्हाला? " त्याने विचारले.
"तर मग कशासाठी?" ती
" मी फक्त तुम्हाला भेटायला आलोय. मला वाटलं तुम्हाला हे कळलं असेल. " त्याचा जरा भ्रमनिरास झाला.
" मला? अच्छा, ते तुमचं जर्किन माझ्याकडे राहिलं म्हणून न? "
" तुम्हाला काही कळत नाही की मुद्दामून न कळल्यासारखं दाखवताय? " तो
" काय? काय कळायला हवंय मला? " ती
" जेव्हा मी तुम्हाला पाहिलं तेव्हाच तुम्ही म्हणजे तू मला आवडलीस, तुला मी आवडलो नाही का" त्याने मोठ्या अपेक्षेने तिच्याकडे पाहिलं. ती काही उत्तर देणार तेवढ्यात बस चा हॉर्न वाजला आणि बस येऊन ठेपली.
ती झटकन उठून बसमध्ये चढली. तो ही तिच्यामागे गेला. ती बसली त्याच सीटवर तो ही बसला पण आज त्यांच्यात काही संभाषण होत नव्हतं. तो तिच्याकडे ती काही बोलेल या आशेने पाहत होता पण ती सारखी खिडकीबाहेरच बघत होती. तिचा स्टॉप आला तशी ती उतरायला निघाली. ती खाली उतरताच त्याच्या मनात काय आलं कुणास ठाऊक, तो ही तिच्या मागोमाग जायला खाली उतरला. त्याने तिला थोडं पुढे जाऊ दिलं आणि लगेच तो तिच्यामागे चालत गेला. ती गल्ली बोळातून जाऊ लागली. तो ही तिच्या मागे गेला.थोडं पुढे गेल्यावर ती एका ठिकाणी थांबली आणि तिने मागे वळून पाहिलं. तो लगेच जवळच्या झाडाआड लपला. ती पुन्हा चालायला लागली. तो ही मागोमाग चालायला लागला. तेवढ्यात एक ओढा आला म्हणून तिने तिची साडी गुढग्यापर्यंत वर केली. त्याची नजर तिच्या गुढग्या वरून खाली खाली जात तिच्या पावलावर स्थिरावली आणि तो उडालाच!! त्याने झटकन तिच्या चेहऱ्याकडे पाहिलं आणि पुन्हा पायांकडे पाहिलं. डोळे चोळून चोळून बघूनही समोरचं दृश्य तेच होतं. तिचे पाय चक्क उलटे होते. पाहता पाहता ती ओढा ओलांडून गेली. त्याने समोर पहिले तेव्हा त्याला तिथे काही ठिकाणी आग लागलेली दिसली. तेवढ्यात त्याचं लक्ष डावीकडे असलेल्या पाटी कडे गेलं 'स्मशान भूमी '
त्याने तिथून जी धूम ठोकली ती डायरेक्ट घरी आल्यावरच थांबला. हातातल्या जर्किन ला अत्यंत जळका वास येत होता. त्याने ते कचऱ्यात फेकून दिलं. आजही त्याला झोप लागली नाही. रात्रभर तो टक्क जागाच राहिला. सकाळी त्याचं अंग जरा गरम असल्याने त्याने रजा घेतली. कितीही झोपण्याचा प्रयत्न त्याने केला तरी कालचा प्रसंग जसाच्या तसा त्याला आठवू लागला.
राहून राहून त्याच्या अंगावर काटा येऊ लागला. दिवस तर त्याने कसातरी काढला पण पुन्हा रात्र झाली. आज झोपणं आवश्यक आहे कारण उद्या ऑफिस टाळता येणार नाही असं म्हणून शेवटी त्याने झोपेची गोळी घेऊन जबरदस्ती झोपण्याचा प्रयत्न केला. सकाळी तो ऑफिसमध्ये गेला तेव्हा त्याचा मूड पार गेला होता. तो हळू हळू त्याचे काम आटोपत होता तेवढ्यात त्याला त्याचा मित्र मस्तपैकी शीळ घालत काम करताना दिसला. त्याला लगेच परवाचा तो स्वतः आठवला. लंच ब्रेक मध्ये मित्र त्याच्याजवळ आला आणि म्हणाला, " आज मी तुला सरप्राईझ देणार आहे!"
" कोणतं? " असं विचारल्यावर त्याने सांगितलं, " अरे काल तू नव्हता आला ऑफिसमध्ये तर मला ओव्हरटाईम करावा लागला "
" मग?त्याचा सरप्राईझशी काय संबंध?" त्याने काळजीने विचारले
"अरे ऑफिस मधील काम संपवेपर्यंत मला खूप उशीर झाला. मग रात्री अकरा च्या सुमारास मी ऑफिसकाम आटोपून बसस्टॉप वर गेलो. तर तिथे मला कोण दिसलं माहिताय?"
" कोण? " त्याने श्वास रोखून विचारले.
"तिथे होती एक अप्सरा!!" मित्र स्वप्नाळू डोळ्यांनी म्हणाला.
"मग?" त्याने आवंढा गिळत विचारले.
"अरे आम्ही खूप गप्पा मारल्या, लवकरच मी तिला लग्नासाठी प्रपोज करणार आहे." त्याचा मित्र उत्साहात म्हणाला.
" थांब मित्रा! एवढा एक्साईट होऊ नको. जी तुला अप्सरा वाटतेय ती हडळ आहे. विश्वास बसत नसेल तर आज तिला भेट आणि तिच्या पायाकडे बघ मग कळेल तुला. " तो पोटतिडकीने म्हणाला.
"काहीतरीच काय बोलतो! एवढी सुंदर स्त्री हडळ कशी असेल?"
"अरे मलाही तसाच अनुभव आला. मी असाच दोन तीन दिवसांपूर्वी ओव्हरटाईम करून बस स्टॉप वर पोचलो होतो....... असं म्हणून त्याने त्याच्या मित्राला सगळं सांगितलं. ते ऐकून त्याचा मित्र डोक्याला हात लावून बसला आणि त्या दोघांच्याही डोळ्यांसमोर संपूर्ण ऑफिस फिरू लागलं.