अभिमन्यू आरतीला घेऊन हॉलमध्ये येतो. तेवढ्यात सधिकाही कॉफी आणते. या तिघांच्याही डोक्यात विचारांचे काहूर माजते.
साधिका : काकू, मला सांगा…तुम्ही काही प्यायला किंवा बाहेर काही खाल्ले होते का?
आरती : मी बाहेरच सहसा खात नाही…आणि भोवळ कशी येईल? मी चहा - नाश्ता करून गेले होते. हा, मला तहान लागली म्हणून मी पाणी प्यायले…पण पाण्याची बॉटलही माझीच होती…
साधिका : मला दाखवता का बॉटल…
आरती : अभिमन्यू, माझी पिशवी आणतोस का?
अभिमन्यू : हो,
साधिका : काकू अजून काही आठवत का?
आरती : हो, अभिमन्यूची विद्यार्थिनी भेटली होती. तिच्याशी बोलले आणि याला गवार आवडते म्हणून मी पुढे आले. भाजी घेतल्यावर घराच्या दिशेने चालू लागले आणि अचानक घसा कोरडा पडल्यासारखा झाला. तेव्हा तिथेच बसून पाणी प्यायले. त्यानंतरच मला काही आठवत नाही…
अभिमन्यू : हीच बॉटल नेलेली ना तू?
आरती : हो,
साधिका त्या बॉटलमधील पाण्याचा वास घेते.
साधिका : यात काही तरी टाकलं आहे…ही मी माझ्याजवळ ठेवली तर चालेल का? म्हणजे नेमकं काय मिश्रण आहे ते बघायला… आणि घरातलं पाणी पिऊ नका…सगळी भांडी घासून पाणी भरा आणि त्यात तुळशीचे पान टाका आणि ते प्या…अभिमन्यू, तुझ्याकडे त्या मुलींचं फोटो आहे का?
अभिमन्यू : हो, गेल्यावर्षी गॅदरिंगला संपूर्ण वर्गासोबत काढला होता…थांब हा… दाखवतो… हा बघ…
साधिका : मी पाहिलंय यांना, ही श्रेया ना?
अभिमन्यू : हो माझी आवडती विद्यार्थिनी आहे, हुशार आहे ती…
साधिका : काकी, यातली कोणती मुलगी तुमच्याशी बोलत होती…
आरती : ही… मुलगी होती…इतकी सुंदर दिसत होती ना ती माझी तिच्यावरून नजर हलत नव्हती…
साधिका : ही विनिता आहे, म्हणजे हिच्याकडे संमोहन विद्या येते पण पूर्ण नाही…शिकतेय बहुदा…
अभिमन्यू - आरती : म्हणजे ?
साधिका : अभिमन्यू, तुला माहिती श्रेयाला पण विनिताने त्रास दिला आहे कारण ती तुझी लाडकी विद्यार्थिनी आहे… विनिता तुझ्या प्रेमात आहे… आणि तू काही तिला भाव देत नाहीस…तुला मिळवण्यासाठी हे सगळे उद्योग सुरू आहेत तिचे…
अभिमन्यू : श्रेयाला काय त्रास दिला तिने?
साधिका : श्रेयाला एका आत्म्याने झपाटलं होतं…आणि या मागे विनिताचा हात होता..तिने हे कसं केलं याची थोडी फार कल्पना आली आहे मला…मला सांग तिच्या आई-वडिलांविषयी काही माहिती आहे का तुला?
अभिमन्यू : तिचे वडील कॉलेजचे ट्रस्टी आहेत… बाकी काही त्यांच्याविषयी कुणालाच काही माहिती नाही…
साधिका : बर, नाव काय त्यांचं?
अभिमन्यू : दूर्जय भडकमकर…
साधिका : बर, तुम्ही त्या विनितापासून लांब रहा…तुला माहिती आहे अभिमन्यू, तुला संमोहित करून तुला तिच्याजवळ जाण्यास भाग पाडणार होती…तिने तुझ्या आईला मदत केलीस म्हणून तू तिच्याशी चांगलं बोलतो आहेस आणि तिचे उपकार तू कधीच विसरणार नाही..तिला सध्या याच भ्रमात ठेवणं गरजेचं आहे… काकी तिने तुम्हाला संमोहित करून अभिमन्यूजवळ तिची स्तुती करायला सांगितली असेल… पण ते संमोहन तुम्ही खोलीत गेल्यावर संपलं असेल…असा अंदाज आहे माझा…
अभिमन्यू : म्हणजे… आईने उठल्या उठल्या माझ्याजवळ तिची स्तुती करणं अपेक्षित होत पण तिने तस काही घडलं नाही…पण संमोहन सुटलं कसं…
साधिका : काकी, तुमच्या खोलीत मला प्रखर पण सकारात्मक ऊर्जा जाणवली…मला सांगाल त्याचं कारण?
आरती : सांगू कशाला, चल तुला दाखवते…
आरती, साधिका आणि अभिमन्यू तिच्या खोलीत जातात. आरती तिच्या कपाटातून एक लाल फडक्यात बांधलेली वस्तू काढते आणि साधिकाच्या हातात देते.
आरती : बाळ, हे उघडून बघ कदाचित तुला ओळख पटेल…
ती वस्तू पाहून चकित होते…लाल फडक्यात सोन्याने वेष्टित केलेला रुद्राक्ष आणि हनुमानाची छोटीशी गदा पाहून तिला तिची आत्या आठवते. आजोबा तिला नेहमी बोलायचे तू ना अंजनीसारखी दिसतेस. जन्माला आलीस माधवच्या पोटी पण मुलगी शोभतेस अंजनीची…ही वाक्यं आठवताच तिचे डोळे आत्याच्या आठवणीने भरून येतात.
अभिमन्यू : साधिका काय झालं?
आरती : तिला तिच्या आईची आठवण आली?
साधिका : ती माझी आत्या आहे…
आरती : ती तुझी आत्या आहे? मला वाटलं तू अंजनीची मुलगी आहेस…
साधिका : सगळ्यांना असच वाटतं की मीच तिची मुलगी आहे…तुम्ही कसं ओळखता तिला?
आरती : माझी जिवाभावाची मैत्रीण होती…अगदी घट्ट…तू अगदी तिच्यासारखीच दिसतेस, बोलतेस, चालतेस आणि तोच आत्मविश्वास, तेच डोळे… तुला पाहिलं आणि एक क्षण मला वाटलं अंजनीच आली आहे…
साधिका : हो…
आरती : कुठे आहे ग ती? कशी आहे? माझी भेट घडवून दे ना…
साधिका : आत्या आता हयात नाहीयेय…
ते ऐकताच आरतीला धक्का बसतो…
साधिका : काकी सावरा स्वतःला….ही वस्तू जपून ठेवा..आपण नंतर यावर बोलू… येते मी…अभिमन्यू काळजी घे आणि सावध रहा…
अभिमन्यूच्या घरातून बाहेर पडल्यावर साधिका मारुतीला फोन लावते व त्याला मंदिरात भेटायला बोलावते.
—------------------------------------------------------
मंदिरात पोहोचल्यावर साधिका दत्तांच्या मूर्तीला नमस्कार करून गाभाऱ्यामागे असलेल्या खोलीत जाते आणि ध्यान लावून बसते. साधारण एक तासाभराने ती डोळे उघाडते. तोवर मंदिरही दर्शनासाठी बंद केले होते. त्यामुळे ती मंदिराच्या गुरुजींशी बोलायला जाते.
साधिका : गुरुजी, तुम्हाला आता वेळ आहे का? मला थोड बोलायचं होतं…
गुरुजी : हो बोल ना…
साधिका : मला सांगा…सध्या प्रचलित असलेला किंवा कुप्रसिद्ध असलेला अघोरी कुणी आहे का? म्हणजे तुम्हाला याविषयी माहिती ठेवून असाल तरच सांगा…
गुरुजी : बघ, मी जेव्हापासून या साधक वर्गात आलो ना तेव्हापासून मी सगळ्या गोष्टींवर बारीक नजर ठेवायला सुरुवात केली…प्रचलित म्हणशील तर दिगंबर नावाचा आहे…पण तो चांगल्या कामांसाठी आणि लोकांची मदत करण्यासाठी प्रसिद्ध आहे…आणि कुप्रसिद्ध म्हणून दुर्जय नावाचा अघोरी आहे पण तो कसा दिसतो, काय करतो हे कुणालाच माहिती नाही…त्याच्या नावाव्यक्तिरिक्त मला काही माहिती नाही…
साधिका : बर, त्या दुर्जयविषयी कुणाकडून माहिती मिळेल…?
गुरुजी : दिगंबरकडून…एकमेकांचे शत्रू आहेत ते…त्यामुळे एकमेकांविषयी इत्यंभूत माहिती असणार दोघांना…
साधिका : कुठे भेटतील हे…
गुरुजी : तुला पत्ता पाठवतो मी…तिथे जा…त्याचा नंबर पण देतो…
साधिका : धन्यवाद गुरुजी…मी आहे त्या खोलीत…
गुरुजी : बर…तुला काही लागलं तर आवाज दे…
साधिका : हो…
खोलीत आल्यावर साधिका तिला घरी यायला उशीर होणार असल्याचे उल्काला कळवते आणि गुरूनामाचा जप करायला घेते तर, कारंडेने सांगितल्याप्रमाणे मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ आलेली उषा मंदिराचा दरवाजा वाजवते. त्यामुळे गुरुजी तिला आत घेतात.
गुरुजी : बोला काय काम आहे…
उषा : मला तारिणीची मदत हवी आहे…
गुरुजी : तारिणी कुठे आहे हे तर मला माहिती नाही पण तिच्यापर्यंत पोहोचण्याचा मार्ग मी तुम्हाला सांगतो. तुम्ही इथेच थांबा…मी आलोच…
उषा : बर…
गुरुजी गेल्यावर उषा गाभाऱ्यातील दत्ताच्या मूर्तीला वंदन करून एक प्रार्थना करते.
गुरुजी : ताई, तुम्ही त्या मागच्या खोलीत जा…तिथे साधिका म्हणून आहेत त्या करतील तुमची मदत…
उषा : बर,
गुरूजींनी सांगितलेल्या दिशेने उषा चालत जाते.
साधिका : या काकू, बसा…बोला तुम्हाला तारिणीला का भेटायचं आहे?
उषा : ते मला….
साधिका : काकू, न घाबरता जे काही आहे ते सांगा…
उषा : पण आम्हाला मदत मिळेल ना?
साधिका : आमच्याने शक्य असेल तर नक्की मिळेल…तुम्ही बोला…पाणी हवंय का तुम्हाला?
उषा : नाही नको, मी सगळं सांगते…मी उषा अवधूत कारंडे…माझे पती अवधूत हे एका महाविद्यालयाचे मुख्याध्यापक आहेत… आणि ते एका मोठ्या संकटात अडकले आहेत…
साधिका : हे तेच कारंडे ना, जे शाक्त पंथीय होते…पण आता त्यांनी तो मार्ग सोडला आहे…
उषा : हो तेच ते…आम्ही ज्या संकटात अडकलो आहोत…
साधिका : तुम्ही शांत व्हा…मला नीट सांगा काय झालं आहे ते…
उषा : पाच वर्षांपूर्वी हे नवरात्रीला एका पूजेला गेले होते…तिथून आल्यावर ते खूप घाबरले होते…आमचा मुलगा अमर, पुण्याला शिकायला होता…त्याचे काही अघोऱ्यांनी अपहरण केले आणि यांना त्यांच्या गटात सामील होण्यास सांगितले…एक दिवस यांना भेटायला एक माणूस आला…दर्शन राजवाडे नावाचा…तो त्यांना त्याच्यासोबत बाहेर कुठेतरी घेऊन गेला…तिथून आल्यावर हे बोलले की त्याने आपल्या मुलाचा आत्मा कैद करून त्याच्या शरीरावर ताबा मिळवला आहे…आम्ही दोघेही घाबरलो…आम्हाला काही समजत नव्हत काय करावं? खूप विचारांती यांनी त्यांना होकार कळवला आणि मला हे बोलले की तू जाऊन गावी रहा…मग आम्ही असं भासावल की यांनी भक्ती मार्ग सोडला म्हणून आम्ही वेगळे झालो…
साधिका : तो अघोरी कोण होता…माहिती आहे का तुम्हाला?
उषा : दुर्जय… त्यानेच तर यांना बळी पाडलं…वाम मार्गात यायला…त्या अघोऱ्यासोबत आणखी एक जण आहे पण त्याची ओळख आम्हाला माहिती नाही..त्या लोकांना कोणती तरी शक्ती जागृत करायची आहे… आणि त्यासाठी त्यांना बळी लागणार आहेत…आणि ते बळी आणण्याचे काम यांच्यावर सोपावले आहे..त्यांना आता हे सगळं नकोस झालं आहे…ते स्वतः काही करू शकत नाही…म्हणून मग मी आले… तो दुर्जय यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी कॉलेजचा ट्रस्टी झाला…आणि त्याच्याकडे बक्कळ पैसा आहे…
साधिका : कुटुंब आहे का त्याचं…
उषा : त्याला एक मुलगी आहे इतकीच माहिती आहे मला…
साधिका : मग आता तुमची साधकांकडून काय अपेक्षा आहे…
उषा : आमच्या मुलाला त्याच्या ताब्यातून सोडावा…आणि आम्हाला या दुष्टचक्रातून वाचवा…
साधिका : एवढ्या लवकर तरी तुमची या चक्रातून सुटका नाही…एक काम करा…माझा नंबर मी तुम्हाला देते…. मला कारंडे सरांना भेटायचं आहे…त्यांनतर मी ठरवेन की मदत करायची की नाही?
उषा : ठीके…पण त्यांच्यावर पाळत असेल तर ते कसे भेटणार?
साधिका : ते मी बघेन…तुम्ही हा निरोप द्या त्यांना…या आता तुम्ही… बाहेर एक माणूस उभा आहे त्यालाही मदत हवी आहे…
उषा : बर… येते…
ती बाहेर जाताच मारुती त्या खोलीत येतो.
साधिका : तुला यायला एवढा उशीर का झाला ?
मारुती : माहिती काढायच्या शोधात कुठे कुठे फिरावं लागलं मला…
साधिका : काही माहिती मिळाली का?
मारुती : हो बरच काही….
मारुती त्याने मिळवलेली माहिती साधिकाला सांगतो. ती ऐकल्यावर साधिका सुदामाच्या शोधकार्याला सुरुवात करण्याचे ठरवते. ती काही सूचना मारुतीला देते व दत्ताच्या मूर्तीला वंदन करून घरी यायला निघते पण त्याआधी ती अभिमन्यूला त्याची पत्रिका घरी घेऊन येण्यविषयी कळवते.