Chukanmuk - 1 in Marathi Fiction Stories by Dilip Bhide books and stories PDF | चुकांमुक - भाग १

Featured Books
Categories
Share

चुकांमुक - भाग १

चुकामुक

भाग १

 

योगेशला त्याची आई म्हणत होती की

“अरे इतके दिवस झालेत, तुझ्या बायकोला काही आराम पडत नाहीये, काही तरी कर बाबा, एवढी तरणी ताठी पोर अशी अंथरूणाला खिळलेली बघवत नाहीरे. परत पदरात एक लहान मुलगी आहे, तिचा तरी काही विचार कर.”

“अग आई, डॉक्टर जसं म्हणतात, तसं सगळं तर आपण करतो आहोतच. आपल्याला त्यातलं काय समजतंय? बरं दोन डॉक्टर पण बदलून झालेत, आता आणखी काय करू ते तूच सांग.” योगेश.

“मी सांगेन तसं करशील का?” आई विनवणीच्या स्वरात म्हणाली.

“आई, अग असं का म्हणतेस, तू काही म्हंटलस आणि मी नकार दिला, असं कधी झालंय का?” योगेश दुखावल्या स्वरात  म्हणाला.

“नाही रे, पण तुम्ही शिकलेले लोकं, बँकेत ऑफिसर, आमच्या जुन्या गोष्टी ऐकाल का याचाच विचार येतो मनात, म्हणून.” – आई.

“तू असा विचार करूच नकोस, अग, प्रिया साठी मी सगळं करायला तयार आहे. सांग तू.” योगेशनी आईला खात्री दिली.

“मला असं वाटतं की तू एकदा शेगावला दर्शनाला जाऊन यावंस. प्रियाच्या प्रकृतीला उतार पडायचा असेल तर तो आता गजाननाच्याच कृपेने पडेल. माझी खात्री आहे.” योगेशची आई म्हणाली.

“ठीक आहे आई. तू म्हणतेस तर तसं करू.” असं म्हणून योगेश बँकेत गेला.

संध्याकाळी, घरी आल्यावर योगेश आईला म्हणाला की “परवा, सकाळी छत्तीसगड एक्सप्रेस ने नागपूरला जातो. मावशीला भेटतो आणि रात्रीच्या सेवाग्राम एक्स्प्रेससने शेगावला जातो. पहाटे पोचल्यावर दर्शन करून अकोल्याला काकांच्या कडे जाईन आणि रात्रीची गाडी पकडून सरळ बिलासपूरला वापस. असा प्रोग्राम ठरवला आहे. जातोच आहे तर मावशी आणि काकांची भेट पण होऊन जाईल. तुला काय वाटतं ?”

“ठीकच आहे. दोनच दिवसांचा प्रश्न आहे, मी बघेन प्रियाकडे, तू काळजी नको करूस. जरूर वाटली तर शेजारचा विनय आहेच.” आई म्हणाली.

निघायच्या दिवशी योगेशची आठ वर्षांची मुलगी, नीता, हट्ट धरून बसली. तिला पण योगेश बरोबर जायचं होतं. खूप समजावून सुद्धा ती हट्ट सोडेना, तेंव्हा योगेश म्हणाला

की “ ठीक आहे आई, घेऊन जातो मी हिला.” आणि तो आणि नीता शेगांवला जायला निघाले. नागपूरला मावशीकडे पोचल्यावर सुद्धा योगेशनी नीताला पुन्हा एकदा विचारलं की “मावशीकडे थांबतेस का ?” पण नितानी  नाही म्हणून सांगितलं. मग दोघे रात्रीच्या सेवाग्राम एक्सप्रेस मधे बसले. S5 मधे रिजर्वेशन होतं. प्रवास सुरू झाला. निताच्या आठवणीतला हा पहिलाच प्रवास होता त्यामुळे तिला सगळीच गंमत वाटत होती. तिला मुळीच झोप येत नव्हती आणि तिचे अखंड प्रश्न चालू होते. त्या प्रश्नांना उत्तर देता देता योगेशला पुरेवाट होत होती.

रात्री दीड वाजता गाडी बडनेरा स्टेशन वर आली. योगेशला चहा प्यायची तलफ आली म्हणून, त्यांनी निताला सांगितलं “नीता, मी चहा घेऊन येतो आहे. जागेवरून हलू नकोस. इथेच बसून रहा.” नितानी मान डोलावली. शेजारच्या काकूंना सांगून योगेश खाली उतरला. तो चहा पितच होता की दुसऱ्या प्लॅटफॉर्म वर उभी असलेली गाडी सुरू झाली. योगेशला वाटलं की त्याचीच गाडी सुरू झाली. समोरच S5 डबा होता त्यात योगेश चढला. थंड वारा येत होता म्हणून थोडा वेळ दारातच उभा राहिला आणि मग आत मधे आपल्या  सीट वर गेला.

सीट वर भलतीच लोकं बसलेली दिसली. योगेशला वाटलं की बडनेरा स्टेशन वर हे लोक चढले असतील, पण मग नीता कुठे आहे? त्यानी इकडे तिकडे पाहीलं, पण नीता कुठेच दिसली नाही. मग त्याच्या लक्षात आलं की आजू बाजूची सगळीच माणसं, वेगळीच आहेत म्हणून. त्याला वाटलं की त्याची बोगी चुकली, म्हणून त्यांनी विचारलं की “ही कोणच्या नंबरची बोगी आहे?” समोरच्या माणसांनी सांगितलं की “S5.” आता योगेशला घाम फुटला. हा काय प्रकार आहे ते त्याला समजत नव्हतं बोगी तीच, पण सगळीच माणसं कशी बदललेली? त्यांनी पुन्हा विचारलं

“ही सेवाग्राम एक्सप्रेसच आहे न?” – योगेश.

“हो, ही सेवाग्राम एक्सप्रेसच आहे, पण तुम्ही असं का विचारता आहात आणि असं भांबावलेल्या नजरेने कोणाला शोधता आहात? काय झालं आहे?” समोरच्या माणसांनी विचारल.

“मी आणि माझी आठ वर्षांची मुलगी शेगावला जा होतो. मी बडनेऱ्याला चहा प्यायला उतरलो आणि बघा काय झालं, सगळेच कसे बदलले?” योगेश आता जवळ जवळ रडायच्या बेतात होता.

“अहो, तुम्ही चुकीच्या गाडीत बसले आहात. ही गाडी नागपूरला चालली आहे.” समोरच्या माणसांनी माहिती पुरवली.

“अहो, असं कसं, ही सेवाग्राम एक्स्प्रेससच आहे ना? – योगेश.

“आता माझ्या लक्षात आलं आहे.” तो समोरचा माणूस म्हणाला “ बडनेऱ्याला मुंबईहून नागपूरला जाणारी आणि नागपूरहून मुंबईला जाणाऱ्या गाड्या क्रॉस होतात. एकाच वेळेला दोन्ही गाड्या प्लॅटफॉर्म 2 आणि 3 वर येतात. तुम्ही उतरले एका गाडीतून आणि चढले दुसऱ्या गाडीत. कळतंय का?”

“अरे देवा” योगेश किंचाळलाच, म्हणजे माझी मुलगी एकटीच, त्या गाडीत? अरे देवा, आता काय करू मी?” योगेश आता रडायला लागला. बाकीच्या लोकांना सुद्धा आता परिस्थिती किती गंभीर आहे त्याची जाणीव झाली. कोणी तरी धावत जावून TTE ला बोलावून आणलं. त्याला सर्व परिस्थिती समजावून सांगितली. तो पण हादरला. एक आठ वर्षांची मुलगी गाडीत एकटीच राहिली, त्याचा पण जीव कळवळला. तो म्हणाला –

“हे बघा साहेब, चिंता करू नका. आता तासा भरात वर्धा येईल. तिथल्या स्टेशन मास्टर ला सांगून शेगांवला मेसेज पाठवू. तिथे तुमच्या मुलीला ते उतरवून घेतील. अगदी नक्की उतरवून घेतील आणि तुम्ही पोहोचे पर्यन्त ते तिची काळजी घेतील. तुम्ही मला तुमच्या मुलीचं वर्णन, आणि तिने कोणते कपडे घातले आहेत हे सविस्तर सांगा, म्हणजे ओळख पटवायला त्रास होणार नाही. तसंच सीट नंबर आणि कोच नंबर द्या. तुम्ही आता  वर्ध्याला उतरा आणि दुसरी व्यवस्था करून शेगांवला जा. तुम्हाला तुमची मुलगी तिथे सुखरूप भेटेल.” त्याच्या या खात्रीपूर्वक बोलण्यामुळे योगेशला जरा धीर आला. बाकीच्या लोकांनी सुद्धा त्याला धीर दिला.

वर्ध्याला गाडी पहाटे ४  वाजता पोचली, सगळे सोपस्कार करून योगेश बाहेर आला तेंव्हा ५  वाजले होते. सकाळी सहा वाजता अकोल्याची बस होती, योगेश तिच्यात बसला.

***

बडनेरा स्टेशन गाडीने सोडलं,15 मिनिटं झाल्यावर सुद्धा बाबा दिसले नाहीत, छोटी नीता डब्यात इकडे तिकडे शोधत होती. शेजारी बसलेल्या कुटुंबाच्या लक्षात तिची घालमेल आली. त्या बाईंनी विचारलं,

“काय ग बाबा कुठे आहेत तुझे? चहा प्यायला उतरले होते ना? मग?” हे ऐकल्यावर नीता रडायलाच लागली. पाचच मिनिटांत त्या बाईला कळलं की काहीतरी गडबड आहे म्हणून. तिने आपल्या झोपलेल्या नवऱ्याला उठवलं, आणि योगेशला शोधायला पाठवलं. S1 ते S7, पर्यन्त सर्व डबे पालथे घालून झाले. योगेश सापडला नाही. आता काय करायचं. सुनंदाबाईंना आणि त्यांच्या नवऱ्याला प्रश्न पडला. मुलीची जात, जेमतेम ८ वर्षांचं वय, असच वाऱ्यावर कसं सोडणार? त्यांनी नवऱ्याकडे पाहिलं. तो ही गोंधळला होता. बरं मुलगी गोरी, नाकी डोळी, तरतरीत होती. तिला एकटीला सोडलं तर ती संकटात सापडू शकली असती. सुनंदाबाई आपल्या नवऱ्याला म्हणाल्या

“आपण हिला आपल्या बरोबर घेऊन जाऊ. कदाचित हिच्या वडिलांची गाडी चुकली असेल आणि ते बडनेऱ्यालाच राहिले असतील तर ते मागच्या गाडीने शेगावला येतील. तसेही आपण दिवसभर मंदिरात राहणार आहोत, तर त्यांची भेट होऊनच जाईल. बाकी गजानन समर्थ आहेत. तिच्या नवऱ्याला पण ते पटलं. मग सुनंदाबाईंनी तिला जवळ घेतलं आणि हलके हलके थोपटून झोपवलं. शेगावला हे कुटुंब आपल्या बरोबर निता आणि तिची बॅग  घेऊन उतरलं. प्लॅटफॉर्म संपल्यावर शेवटाला कंपाऊंड तुटलं होतं तिथून बाहेर पडले. तिथेच समोर बस स्टँड होता. मंदिराची बस उभीच होती तिच्यात बसून सर्व मंदिरात निघाले.

***

गाडी शेगावला थांबल्यांवर दोन पोलिस S5 डब्यात शिरले. त्यांच्या माहिती नुसार ते सीट नंबर 23-24 वर आले. तिथे दोन वयस्कर बायका बसल्या होत्या आणि आपल्या सामानाची नीट व्यवस्था  करत होत्या.

“इथे एक लहान मुलगी बसली होती, ती कुठे आहे “ एका पोलिसांनी विचारलं.

“माहीत नाही. आम्ही इथूनच चढलो. हे आमचं तिकीट.” -एका बाईने उत्तर दिलं.

“इतर कोणाला माहीत आहे का?” – पोलिस

वरच्या बर्थ वर बसलेल्या माणसांनी सांगितलं “ खाली एक फॅमिली बसली होती, ते लोकं तिला आपल्या बरोबर घेऊन इथेच उतरले.”

“अरे बापरे, कशी होती ती फॅमिली ?” – पोलिस.

“चांगली फॅमिली वाटली साहेब, त्यांचा एक सहा वर्षाचा मुलगा पण होता. बदमाश नाही वाटले. कदाचित ते मुलीला घेऊन पोलिसांकडेच गेले असतील.” वरच्या बर्थ वरचा माणूस म्हणाला.

“तसं असेल तर ठीकच आहे.” असं म्हणून पोलिस चालले गेले. तिथून ते स्टेशन वरच्या  पोलिस चौकीत गेले आणि त्यांना सांगून ते स्टेशन मास्टर च्या ऑफिस मधे गेले. तो पर्यन्त गेट वर असलेला टिकिट चेकर पण आला होता. कोणालाच ती मुलगी सापडली नव्हती. आता परिस्थिती गंभीर झाली होती. स्टेशन मास्टर ला घाम फुटला होता. याची चौकशी होऊ शकली असती आणि हलगर्जी पणाचा ठपका त्यांच्यावर बसला असता.

“साहेब,” तिकीट चेकर म्हणाला “बरेच लोक तुटलेल्या कंपाऊंड मधून जातात. चटकन बस मिळते म्हणून. तसेच हे लोकं गेले असतील तर मंदिरात सापडतील. आपल्याला मंदिरात शोध घ्यायला हवा.” पोलिसांनाही ते पटलं. ते त्यांच्या चौकीवर गेले आणि गावातल्या पोलिस स्टेशनशी संपर्क करून त्यांना सर्व परिस्थितीची कल्पना दिली. त्यानंतर, सिटी पोलिस स्टेशननी मंदिरात दोन साध्या वेशातले पोलिस ताबडतोब पाठवले,

आणि त्यांना सांगितलं की मंदिरातल्या चौकी वर जावून त्यांना पण बरोबर घ्या.

 क्रमश:......

 

दिलीप भिडे पुणे

मो :9561912190

dilipbhide@yahoo.com     

धन्यवाद.