लॉकडाउन इफेक्ट 24 मार्च 2020 पासून भारतात लॉकडाउन जाहीर झाले. करोना वैश्विक महामारीने संपूर्ण जग ढवळून निघाले. प्रत्येकाच्या डोक्यावर भीतीची टांगती तलवार लटकू लागली. त्यामुळे लोकांचे आयुष्यच बदलून गेले. एकमेकांना भेटणं,रस्त्यांवरून मोकळं फिरणं बंद झालं, सर्वत्र कोरोनाची दहशत जाणवू लागली. निरनिराळ्या स्तरातील लोकांवर लॉकडाउन चे निरनिराळे परिणाम झाले. कोणाला कुटुंबियांसोबत जास्त वेळ घालवता येऊ लागला तर काही लोकांचे रोजगार गेल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली. आता आपण पाच वेगवेगळे कुटुंब ज्यांच्यावर लॉकडाउन चा कसा वेगवेगळा परिणाम झाला हे बघू.
कुटुंब १: ह्या कुटूंबात ज्येष्ठ नागरिक जोडपं राहते , श्री व सौ पैठणकर.
श्री व सौ पैठणकर खूप आनंदात होते,कारण त्यांचा मुलगा निखिल चार वर्षांनी ऑस्ट्रेलिया हुन घरी भारतात आला होता. सर्वत्र कोरोनाचे वातावरण असल्यामुळे तिथल्या कंपनीने त्याला कामावरून कमी केलं होतं. त्यामुळे तो कायमस्वरूपी भारतात आला होता, त्याच्या एका मित्राच्या ओळखीने त्याला भारतातच चांगली जॉब ऑफर आली होती.
आल्यापासून निखिल ची आई त्याला नवनवीन पदार्थ करून खाऊ घालत होती, मोकळ्या प्रशस्त अंगणात फिरताना,गच्चीत सूर्यस्नान घेताना त्याला खूप छान वाटत होतं.
"बरं झालं बाई!निखिल कायमचाच भारतात आला ते, आता त्याच्या लग्नाचं ही बघता येईल",सौ पैठणकर, श्री पैठणकरांना म्हणाल्या.
"हो न, तिथे कामात सतत व्यग्र असल्यामुळे लग्नाचा विषय काढला की टाळायचाच पठ्ठ्या! आता सापडला चांगला तावडीत,कोरोनाची ब्याद टळली की देऊ उडवून त्याच्या लग्नाचा बार", श्री पैठणकर म्हणाले.
"बार काय उडवू,आधी मुलगी तर शोधावी लागेल की नाही",सौ पैठणकर
"त्यात काय अवघड आहे, आजकाल इतके मॅट्रिमोनिअल संकेतस्थळे आहेत त्यात त्याचं नाव नोंदवून घेऊ,नातेवाईकांना देखील निखीलचा फोटो,परीचयपत्र पाठवता येईल,म्हणजे मुलगी शोधण्याचं काम तरी या लॉकडाउन मध्ये घरबसल्या होऊन जाईल.", श्री पैठणकर
"निखिलच्या कानावर टाका हे आणि दोघे मिळून वधु संशोधनाच्या कामाला लागा.",सौ पैठणकर
निखिल आणि त्याच्या बाबांनी मिळून मॅट्रीमोनिअल साईट वर नाव नोंदवले तसेच निखीलचा फोटो व biodata सगळी माहिती नातेवाईकांना व्हाट्सअप्पवर कळवली.
एकेक मुली बघत असताना एका मुलीच्या अपेक्षा आणि निखिलच्या अपेक्षा जुळत असल्यामुळे त्याने तिला पसंत केलं. निशा महाजन व तिच्या आईबाबांशी अनेकवेळा निखिल व निखिल चे आईबाबा झूम मीटिंग द्वारे भेटले. एकदा लॉकडाउन संपलं की प्रत्यक्ष भेटून पुढचं ठरवता येईल असं ठरलं. आता पैठणकर व महाजन कुटुंबीय लॉकडाउन संपण्याची वाट बघू लागले.
कुटुंब २: ह्या कुटुंबात 3 सदस्य होते शिशीर,शीतल व त्यांची 3 वर्षांची मुलगी शलाका.
शलाका फार आनंदात होती कारण लॉक डाउन असल्याने ती तिच्या आईबाबांसोबत तिच्या आजोळी आली होती. आता धम्माल करणार होती शलाका, ना शाळेची कटकट न डेकेअर मधल्या बाईंची वटवट, कित्ती छान! आईबाबा 24 तास घरात आणि दुधात साखर म्हणजे आजी-आजोबांचा सुद्धा तिला भरभरून सहवास मिळणार होता.
"आजी हा करोना किती छान आहे ना! माझा मित्रच आहे तो",शलाका
" का ग बाई! सगळ्यांना कंटाळून सोडणारा करोना तुला मित्र का वाटतो?",सौ ब्रम्हे आश्चर्याने म्हणाल्या.
"अगं मित्र नाहीतर काय, करोना आल्यामुळे लॉकडाउन झालं, त्यामुळे आम्ही इथे आलो आणि आईबाबा सुद्धा घरूनच ऑफिसकाम करू शकतात,म्हणून तुम्हां चौघांचा सहवास मला भरभरून मिळतोय,नाहीतर दिवसभर शाळा आणि मग डे केअर या मधेच माझा वेळ जायचा. संध्याकाळी आईबाबा मला घ्यायला यायचे तेव्हा तर मी झोपेला येऊन जायची,फक्त शनिवार रविवार काय तो त्यांच्यासोबत वेळ घालवायला मिळायचा",शलाका म्हणाली.
शिशीर ,शीतल, श्री व सौ ब्रम्हे शलाकाचे बोलणे ऐकून अंतर्मुख झाले. दुसऱ्या दिवशी शलाका अंगणात खेळत असताना तिचे आजोबा तिला म्हणाले," शलाका हे लॉकडाउन संपलं न तरीही तुला डेकेअर मध्ये जावं लागणार नाही बेटा, आम्ही म्हणजे मी,तुझी आजी ,तुझे नाना-नानी आणि तुझे आईबाबा आम्ही
सगळ्यांनी मिळून ठरवलंय की तुझे आईबाबा ऑफिस ला गेले की तुझ्या जवळ तुझे नाना-नानी आणि मी व तुझी आजी आलटून पालटून राहणार आहोत तुझ्या घरी,म्हणजे तुझी शाळा झाली की तुला घरीच राहता येईल, डे केअर ला कायमचा बाय बाय. काय मग! चालेलं न तुला?"
"चालेल काय म्हणता आजोबा, मला तर धावेल", असं म्हणून शलाका तिच्या आजोबांना बिलगली.
शलाका चे आजीआजोबा,आईबाबा प्रसन्नपणे हसू लागले.
कुटुंब ३: राय कुटुंबात दोघेच नवराबायको राहतात. रुद्र आणि रिचा.
दोघांचं एकमेकांशी मुळीच पटत नाही. दोघांचे वैचारिक मतभेद आहेत. लॉक डाउन आधी दोघेही कामानिमित्त दिवसभर बाहेरच असायचे त्यामुळे दोघांचा संपर्क फार कमी वेळ यायचा. शनिवार-रविवार रुद्र त्याच्या मित्रांना, कधी आईबाबांना भेटण्यात तर रिचा सुद्धा तिच्या मैत्रिणींना भेटण्यात, माहेरी बोलण्यात घालवून टाकायचे. त्यामुळे जगासमोर का होईना त्यांचं लग्न टिकून होतं पण लॉकडाउन मुळे सतत तोंडावर तोंड पडल्यामुळे वारंवार त्यांचे खटके उडू लागले.
"तुला मी लग्नाआधीच सांगितलं होतं की मला मुल नकोय,मला माझं करियर महत्वाचं आहे, चूल आणि मूल माझं ध्येय नाहीये. तेव्हा तू तोंडवर करून तोंडभरून 'होsss' असं म्हणाला होतास मग आता का खूळ लागल्यासारखा वागतोय?",रिचा त्राग्याने म्हणाली.
"त्यात काय खूळ लागल्यासारखं आहे? सगळेच जण लग्न झाल्यावर मुलंबाळं होऊ देतात,तेच मी म्हणतोय,काही जगावेगळं नाही. उलट लग्नाआधी तू जे म्हणालीस तेच तुझं तात्पुरतं 'खूळ' असेल असं मला वाटलं म्ह्णून मी फारसं गांभीर्याने न घेता तुला 'होsss' असं म्हणलो.",रुद्र म्हणाला.
"तो तुझा प्रॉब्लेम आहे, जे तू सिरियसली घ्यायला पाहिजे होतं ते तू घेतलं नाही,माझ्या साठी हा विषय केव्हाच संपलाय", रिचा असं म्हणून पलीकडल्या खोलीत जाऊन लॅपटॉप वर ऑफिस काम करत बसली."
रुद्र ने तो बसलेल्या खोलीचं दार जोरात लावून घेतलं. अशा तर्हेने रिचा रुद्र चे रोजच कधी स्वयंपाक करण्यावरून कधी घरकाम करण्यावरून ह्या न त्या कारणाने वाद होऊ लागले. ते वाद एवढे विकोपाला गेले की घटस्फोट घेण्यासाठी ते लॉकडाउन संपण्याची वाट बघू लागले.
कुटुंब ४: जहागिरदार कुटुंबात सात व्यक्ती राहत असत पण नवीन पाहुणीचं आगमन झाल्यामुळे कुटुंब सदस्यांची संख्या आठ वर गेलीय.
श्री व सौ जहागिरदार घरातील ज्येष्ठ नागरिक. त्यांचा मोठा मुलगा सुबोध व लहान मुलगा प्रबोध. सुबोधची बायको सुपर्णा तर प्रबोध ची बायको प्रभा.
सुबोध-सुपर्णा चा मुलगा सुजय तर प्रबोध-प्रभा ची मुलगी प्रिया अवघ्या बारा दिवसांची नुकतंच तिचं बारसं झालंय. सुदैवाने प्रभाला डिस्चार्ज मिळाल्यावर लॉकडाउन जाहीर झाले होते नाहीतर फार पंचाईत झाली असती.
प्रभा चे माहेर ग्रामीण भागात असल्याने तिथे अद्ययावत दवाखाने नव्हते म्हणून बाळंतपण सासरी करून मग प्रभाने माहेरपणाला जावं असं ठरलं होतं परंतु लॉक डाउन जाहीर झाल्याने तिला माहेरी काही जाता आले नाही. प्रभा माहेरी गेल्यावर सुपर्णा देखील तिच्या माहेरी जाणार होती पण लॉकडाउन मुळे तिचंही जाणं रहित झालं.
लॉकडाउन मुळे मोलकरीण बाईंना जबरदस्तीची सुट्टी मिळाली होती,त्यामुळे सगळे कामं सुपर्णाला घरीच करावे लागत होते. जाऊचे बाळंतपण, सासूबाईंना लो बीपी चा त्रास असल्यामुळे त्या फार काम करू शकत नव्हत्या तरी त्यांना जेवढं जमेल तेवढं त्या करायच्याच.
सासरे पूजा करणे सुजय ला गोष्ट सांगणे, त्याचा अभ्यास घेणे हे महत्वाचे कामं करायचे. सुबोध प्रबोध बाहेरून काही सामान आणायचे असतील ते आणून देत असत बाकी दिवसभर ऑफिसकामा साठी ते लॅपटॉप समोरच बसलेले असायचे. नाश्ता,स्वयंपाक, धुणी-भांडी,केर-लादी, घराची स्वच्छता, बाळ-बाळंतिणीची काळजी घेणे हे सगळे कामं सुपर्णाला करावे लागत असत,त्यामुळे ती मेटाकुटीला येत असे,प्रभाला जाऊवर कामाचा भार पडल्यामुळे संकोचल्यासारखे होत होते.
सुजय आईला अजून काम पडू नये म्हणून त्याच्या खेळण्याचा पसारा स्वतः च आवरून ठेवायचा,ऑनलाइन शाळा झाली की आजोबांच्या मदतीने ज्या दिवशीचा अभ्यास त्या दिवशीच करून घ्यायचा,घरचे सगळे जण शक्य तितके सुपर्णाला मदत करायचे पण कामाचा पसारा एवढा असायचा की सगळेच हतबल झाले होते.
घरातील सगळेच जण विशेषतः सुपर्णा लॉकडाउन संपण्याची वाट बघू लागले.
कुटुंब ५:
सावळे कुटुंबात मालती, महिपती व त्यांचे चार मुलं मीरा,मीना,मिता व मनोज असे सहा सदस्य होते.
चौथ्या खेपेस नंबर लागल्यामुळे मनोजला घरचे सगळे चौबाऱ्या म्हणायचे. लॉक डाउन चा या कुटुंबावर फारच वाईट परिणाम झाला होता. महिपती वेठबिगारी वर काम करत असे तर मालतीबाई चार घरचे कामं करून संसाराला हातभार लावायची. पण लॉक डाउन मुळे दोघांचे कामं हातचे निघून गेले होते.
मीरा, मीना, मिता, मनोज यांची शाळा बंद झालीं होती,घरी स्मार्टफोन नसल्यामुळे ते ऑनलाइन शाळेत बसू शकत नव्हते. जिथे रोजच्या खाण्याचेच वांधे झाले होते तिथे ऑनलाइन शिक्षण कुठून परवडणार? एक सांज खायचं एक सांज पाणी पिऊन राहायचं, असे त्यांचे दिवस जात होते.
मालती जिथे कामाला जायची तिथल्या काही कनवाळू मालकीणींनी तिला दोन महिन्याचा पगार फुकट दिला होता, ते पैसे आणि जवळचे साठवलेले पैसे यात सावळे कुटुंबियांचे दोन महिने कसेबसे निघाले. पण जेव्हा एकवेळचं जेवण करता येणंही अशक्य होऊ लागलं तेव्हा त्यांनी शहरातून आपल्या गावी जाण्याचा निर्णय घेतला. गावी जाऊन जो काही जमिनीचा तुकडा होता त्यावर सगळे मिळून, मेहनत घेऊन धान्य पिकवू लागले. जे काही मिळत होतं ते कसंतरी पोटात ढकलून एकेक दिवस रेटत ते लॉकडाउन संपण्याची वाट बघू लागले. अशा रीतीने कोरोनाच्या कहराने अवघे जग ढवळून निघाले आणि लॉकडाउन चे जनतेवर बरेवाईट परिणाम झाले.
◆◆◆◆◆◆◆