चैताली च चेतन शी लग्न ठरलं होतं,साखरपुडा झाला होता आणि आठ दिवसावर लग्न असताना लॉक डाउन जाहीर झालं. मग लग्न पुढे ढकलण्यात आलं, पण जेव्हा लॉक डाउन संपण्याचं नावच घेईना तेव्हा चेतन आणि चैतालीच्या आईबाबांनी ठरवलं की लॉक डाउन मधेच लग्न उरकून घ्यायचं. आणि जमेल तशी त्यांची तयारी सुरू झाली. तोंडाला मास्क लावून त्यांनी लग्नाची सगळी खरेदी केली. लग्नाला मुलामुलीचे आईबाबा आणि दोन्ही कडचे दहा वीस पाहुणे एवढेच मिळून लग्नाचा कार्यक्रम करायचा असं ठरलं.
चैतालीच्या बाबांनी त्यांच्या घराजवळ चाच एक छोटा हॉल बुक केला. झालं ! लग्नाचा दिवस उजाडला सगळे वऱ्हाडी हॉल वर जमले. सगळे जण सोशल डिस्टनसिंग चं पालन करत होते,सगळ्यांनी अगदी लहान मुलांपासून तर मोठ्यां पर्यंत सगळ्यांनी तोंडाला मास्क लावले होते.
प्रत्येकाच्या हातात sanitizer ची छोटी बॉटल होती.
सगळ्यांनी आहेरात शर्ट पॅन्ट पीस सोबत एक मॅचिंग मास्क आणि साडी ब्लाऊज पीस सोबत एक मॅचिंग मास्क असं ठेवलं होतं.
चैतालीने रुखवंतात लॉक डाउन चीच थीम ठेवली होती. Sanitizer च्या बाटली सारख्या दिसणाऱ्या वेगवेगळ्या आकाराच्या बाटलीतून लोणचे, सुका मेवा, फेण्या,कुरडया ठेवल्या होत्या. लोकरीच्या स्वेटर सोबत तिने लोकरीचे मास्क पण विणून ठेवले होते.
भरत काम केलेल्या चादरी सोबतच भरत काम केलेले मास्क सुद्धा ठेवले होते.
त्याचप्रमाणे चैताली ला पेंटिंग ची आवड असल्यामुळे तिने तिच्या काही पेंटिंग्स सोबतच मास्क लावलेली बाई हात sanitize करत असलेली बाई ह्यांचे पेंटिंग्स ठेवले होते.
लग्नाची घटिका जवळ येत होती. सगळ्यांना अक्षदा वाटण्यात आल्या. मंगलाष्टक म्हणणं सुरू झालं. नवरा नवरी मध्ये अंतरपाट धरण्यात आला, वास्तविकतः मास्क चा अंतरपाट होताच,तसेही कोणालाच कोणाचे चेहरे ओळखू येत नव्हते पण पद्धत म्हणून शेवटी अंतरपाट धरण्यात आलाच.
एकेक मंगलाष्टके आटोपली आणि एकदाचं शुभ मंगल सावधान झालं.
सोशल डिस्टनसिंग मुळे सगळ्यांनी दुरूनच सुलग्न लावलं. चैताली आणि चेतन एकमेकांच्या नातेवाईकांची ओळख एकमेकांना करून देत होते पण मास्क घातलेला असल्याने बरेचदा बोलणं ऐकू येत नव्हतं.
विहिणीच्या पंगतीची वेळ झाली. पंगतीत सगळे बसले चेतन च्या उजवीकडे त्याची आई,बाबा,आजी,आजोबा,नानी, नाना,आत्या,मामा,काका,मावशी,मामी,काकू आणि लहान मुलं आणि चैताली च्या डावीकडे तिची आई,बाबा,आजी,आजोबा,नाना,नानी, मामा-मामी,काका-काकू,आत्या-मामा,मावशी-काका,लहान मुलं इत्यादी असे सगळे बसले.
चेतन ने आपल्याकडच्या सगळ्या नातेवाईकांना हात स्वच्छ करण्यासाठी हातावर sanitizer दिलं पण चेतन ची आजी फारच भाविक असल्यामुळे आणि sanitizer बद्दल फारसं माहीत नसल्यामुळे हातावर sanitizer चे थेंब पडताच आजींनी मोठ्या भक्तिभावाने ते थेंब तीर्था प्रमाणे पिऊन घेतले आणि डोक्याला हात पुसला, वर चेतन च्या आईला म्हणतात कशा:
"अगं! कुसुम तीर्थात धूप मिसळल्या गेलं का? कडसर चव लागतेय म्हणून म्हंटल"
"अहो आई! तुम्ही ते तीर्थ समजून पिलं की काय?",चेतन ची आई
"म्हणजे ते तीर्थ नव्हतं?",चेतन ची आजी
"अगं नाही आजी! ते sanitizer होतं,जेवण्याआधी हात स्वच्छ करण्यासाठी दिलं होतं.",चेतन डोक्याला हात मारून म्हणाला.
मग उखाणे घेणं सुरू झालं,चेतन ने श्रीखंडाचा घास चैतालीला भरवत उखाणा घेतला:
"मास्क लावून लावून कोंडला माझा श्वास, चैतालीला भरवतो श्रीखंडाचा घास"
मग चैतालीने उखाणा घेतला:
"कुठेही आजकाल येतो मला sanitizer चा वास,चेतन ला भरवते मी पुरणपोळीचा घास"
तेवढयात चैतालीच्या काकांचा आवाज आला,
"अरेरे! हे काय केलं तू भैताडा! जेवे पर्यंत इथे मास्क काढून ठेवला होता मी,त्याच्यातच बासुंदी वाढली! माझा एवढा चांगला N72 मास्क खराब झाला न!"
वाढपी मुलाने कचकन जीभ चावून म्हंटल,"एक्सएमली स्वारी काका! मला तो बाऊल च वाटला!"
सगळ्यांनी कपाळाला हात मारून घेतला
जेवणं झाले, उखाणे घेऊन झाले, सगळे विधी व्यवस्थित पार पडले. वधूची पाठवणी झाली, विशेष म्हणजे बिदाई च्या वेळेस कोणीही रडले नाही उगीच रडा, मग नाक डोळे पुसा! नकोच ते! कोरोनाच्या काळात नाका तोंड डोळ्याला हात लावू नाही हे सगळ्यांनी लक्षात ठेवलं. तसंही चैतालीच्या माहेरच्या आणि सासरच्या घरामध्ये एकच किलोमीटर चं अंतर होतं.
झालं! लग्ना नंतरचे सगळे कुळाचार सोशल डिस्टनसिंग चं पालन करून उत्तमरीत्या आटोपले.
चेतन आणि चैताली ज्याची वाट बघत होते ती मधुचंद्राची रात्र आली. करोना च्या कहराचा नाही म्हंटल तरी त्या दोघांवर बराच परिणाम झाला होता त्यामुळे बराच वेळ विचार केल्यावर त्यांनी ठरवलं की व्हॅक्सिन येईपर्यंत सोशल डिस्टनसिंग पाळायचं. आणि ते सहा वीत अंतर ठेवून झोपून गेले.
अशा रीतीने लॉक डाउन मधलं लग्न अखेर पार पडलं! हुश्श!