Dusht Chakrat Adkalela to - 8 in Marathi Thriller by Pranali Salunke books and stories PDF | दुष्ट चक्रात अडकलेला तो - भाग 8

Featured Books
Categories
Share

दुष्ट चक्रात अडकलेला तो - भाग 8

कारंडेंच्या ऑफिसमधून बाहेर आल्यावर अभिमन्यूला हायसे वाटते व तो स्टाफरूममध्ये येतो. जरा वेळ शांत बसून तो आता झालेल्या संवादाविषयी साधिकाला मेसेज करून कळवतो. त्याने कारंडेंच्या केबिनमध्ये काहीतरी पाहिले पण नेमकं काय हे त्याला आठवत नव्हते.


------------------------------ ------------------------------ -----

घरी आलेली साधिका तिला मंदिरात गुरूजींनी दिलेली चिठ्ठी वाचते. पुन्हा एकदा सुदामाच पत्र मदतीसाठी आलं होतं पण सुरुवात कुठून करायची हे मात्र तिला कळत नव्हतं. तिने लागलीच मारुतीला फोन केला आणि सुदामाविषयी काही सापडतंय का तेही तपासून पाहायला सांगितलं. आजोबंशी सुदामाबाबत बोलायचे ठरवून ती श्रेयाच्या घरी जायला निघते. 

साधिका : उल्का, मी जरा त्या आजींकडे जाऊन येते आणि मी तुला एक मेसेज केला आहे तो पाहशील...मी येते तासाभरात... 

उल्का : ताई, नीट जा...आणि उशीर होणार असेल तर कळव... 

साधिका : हो...येते मी...

------------------------------ ------------------------------

अभिमन्यूच्या नकाराने घाबरलेला कारंडे बरे नसल्याचे कारण पुढे करत ताबडतोब घरी येतो. पुस्तकांच्या कपाटात लपवलेला देवीचा फोटो बाहेर काढून ठेवतो व लागलीच देवीसमोर अगरबत्ती लावतो. 

कारंडे : आई जगदंबे, कुठे अडकलो ग? कधी याच्यातून बाहेर पडेन असं झालं आहे... माझ्या मुलाचा जीव वाचवायचा नसता ना तर... मी कधीच यांच्या कार्यात यांना साथ दिली नसती.. काय करू मी आता ? अभिमन्यूचा होकार हाच माझ्या मुलाच्या सुटकेचा मार्ग होता... पण आता तोही बंद झाला आहे.. साधकांची मदत घेऊ का ? ते सध्या तारिणीला घाबरून आहेत... मग तिचीच मदत घेतो..राकेशने सांगितलं होतं की तिला भेटण्यासाठी दत्त मंदिरात निरोप ठेवावा लागेल की शिंदेची मदत घेऊ...नको नको शिंदेची मदत त्याच्या मागावर पण माणसे आहेत. त्यामुळे मी तिथे गेलो आहे हे त्यांना कळेल...काही तरी कारण काढून मंदिरात जावं लागेल... उषाला पाठवतो... आई जगदंबे माझी भेट होऊ दे ग तारिणीशी... डोळे पुसून तो देवीचा फोटो पुन्हा कपाटात लपवून ठेवतो आणि लगेचच त्याच्याजवळील दुसऱ्या फोनने तो त्याच्या बायकोला, उषाला फोन लावतो. 

------------------------------ -------------------------

श्रेयाच्या घरी आलेली साधिका आजीला हाक मारते. मात्र आजीचा काहीच प्रतिसाद न आल्याने ती श्रेयाच्या खोलीत जाते. तिथे श्रेयाला एका कोपऱ्यात बसलेले पाहून ती तिच्याजवळ जाते. 

साधिका : श्रेया, बाळा आजी कुठे आहे ? काही झालंय का? 

श्रेया : काय झालं ते माहिती नाही पण आजी मला म्हणाली की ती मला बोलवायला येईपर्यंत खोलीच्या बाहेर यायचं नाही... माझा फोन पण तिच्याकडे आहे...

साधिका : बर...तू शांत हो...तुला माहिती आहे का आजी कुठे आहे ते? कोणी आलेलं का घरी ? 

श्रेया : आजी कुठे गेली हे माहिती नाही... 

साधिका : बर ये इथे तू बस...तुला खायला काही तरी घेऊन येते... 

श्रेया : मला खायला नको...तू त्यात वेळ न घालवता आजीला शोध प्लीज... 

साधिका : आजीला काहीच होणार नाही... मी जाते तिला शोधायला... तू खोलीबाहेर येऊ नकोस... 

श्रेया : हो... 

श्रेयाच्या खोलीतून बाहेर येताच साधिका तिच्या कंबरेला लावलेल्या क्रॉस बॅगेतून एक रुद्राक्ष काढते व देवघरात जाते. तिथे देवासमोर लावलेला दिवा पाहून आजी मंदिरातून यायच्या आधी शुद्धीत होत्या. म्हणजे घराबाहेर पडल्यावर त्यांच्यावर संमोहन झालं असावं. हातावर रुद्राक्ष ठेवून ती डोळे मिटून आजींचा शोध घेण्याचा प्रयत्न करते. वीसएक मिनिटांनी उठून ती घराबाहेर पडते व एका सरळ दिशेत चालते. अशी चालत असतानाच तिला एका घराबाहेर बसलेली आजी दिसते. तिने आजीच्या डोक्याला रुद्राक्ष लावताच झटका लागावा तशी आजीला जाग येते. त्या स्वतःला असं घराबाहेर बघून बावरतात.

साधिका : आजी आधी घरी चला... 

आजी : अगं पण मी इथे कशी आले... 

साधिका : घरी चला सांगते... 

साधिका आजीला सोफ्यावर बसवते आणि त्यांना पाणी प्यायला देते. त्या शांत झाल्या आहेत हे लक्षात येताच ती त्यांच्याशी बोलायला सुरुवात करते.

साधिका : आजी, सकाळी कोण आलेलं घरी ? 

आजी : शलाका आलेली... 

साधिका : तेव्हा तुम्ही काय करत होतात...

आजी : देवाजवळ दिवा लावला आणि चहा घेत बसले होते. 

साधिका : काय बोलली ते आठवतं का ? 

आजी : अगं मला कसला तरी प्रसाद दिला तिने...मी तो खाल्ला आणि त्यानंतर मला काहीच आठवत नाही... 

साधिका : हात पुढे करा...हा धागा मी तुमच्या हातात बांधते आहे... हा काढायचा नाही..आणि श्रेयाची कोणतीही मैत्रीण घरी आली तर तिला श्रेयाला भेटू द्यायचं नाही...त्यांनी आणलेले काहीही खायचं प्यायचा नाही...ही शलाका आता कॉलेजला असेल ना...तिथेच भेटते तिला... 

आजी : बहुतेक...

साधिका : आजी आधी तुम्ही श्रेयाला भेटून या...तोवर मी इथेच थांबते ...

मनाशी काही गोष्टींची उजळणी करत साधिका आजींना एक उपाय करायला सांगते आणि त्यांचा निरोप घेते.

------------------------------ ------------------------------ -----

अस्थिर मनस्थितीमुळे लवकर घरी आलेला अभिमन्यू त्याच्या घरी शलाका आणि विनिताला पाहून चकित होतो. 

अभिमन्यू : तुम्ही दोघी इथे कशा ? 

शलाका : आम्ही या घरात राहणाऱ्या काकुंसोबत घरी आलो आहोत...हे तुमचं घर आहे का?

अभिमन्यू : हो हे माझं घर आहे... आई, आधी बाहेर ये...

विनिता : सर, ते आईंना रस्त्यात भोवळ आलेली त्यामुळे आम्ही त्यांना मदत केली...त्या आत झोपल्या आहेत... मी उठवून आणू का तुम्हाला... 

अभिमन्यू : मदत केल्याबद्दल तुमचा आभारी आहे मी पण आता मी आलोय ना तर घरी गेलात तरी चालेल...

विनिता : असं कसं सर, आईंना भेटून निघेन मी... 

अभिमन्यू : हे काय आई, आई लावलं आहेस तू ..ती माझी आई आहे तर तू तिला काकी बोल... आणि आता दोघींनी घरी जा... 

शलाका : सर, तुम्ही आताच आला आहात तर शांत बसा...विनिता जा ग सरांसाठी पाणी घेऊन ये ...

विनिता : सर, हे पाणी घ्या... 

अभिमन्यू तिने आणलेलं पाणी घेणार इतक्यात स्वामींच्या फोटोजवळील दिव्याची काच तडकते. ते पाहून काही तरी गडबड असल्याची जाणीव अभिमन्यूच्या मनाला होते आणि तो तडक आईच्या खोलीत जातो.

शलाका : अग त्याने हे पाणी प्यायलं नाही...आता?

विनिता : काळजी नको करुस...मी किचनमधल्या सगळ्या पाण्यात मी विभूती टाकली आहे...ते प्यायल्यावर तो नक्कीच स्वतःहून माझ्याजवळ येईल...चल आपण त्याचा निरोप घेऊन निघू...

शलाका : हो, तू थांब इथे मी त्याला बोलावून आणते...

शलाका अभिमन्यूला बोलवायला जाणार इतक्यात तोच बाहेर येतो.

अभिमन्यू : तुम्ही दोघी आता घरी जा.. आईला मदत केली त्यासाठी थँक्यू... 

विनिता : हो सर, येतो आम्ही... 

त्या दोघी निघून गेल्याची खात्री होताच अभिमन्यू साधिकाला फोन करतो आणि काही वेळातच साधिका त्याच्या घरी येते. घरात प्रवेश करताच तिला एक जाणीव होते. 

साधिका : एवढ्या घाईने का बोलावलंस मला… 

अभिमन्यू : अगं, आईला रस्त्यात भोवळ आली म्हणून माझ्याच दोन विद्यार्थिनी तिला घरी घेऊन आल्या. मला त्या मुली अजिबात आवडत नाहीत. त्यांच्याकडे नुसतं पाहिलं तरी नकारात्मकता जाणवते आणि आज त्यांनीच मला मदत केली. आई पण अजून शुध्दीवर आली नाहीयेय. मला त्या मुलींवर अजिबात विश्वास नाही म्हणून तुला बोलावलं…बघ ना आईला काय झालंय ते…

साधिका : चल आपण आधी तुझ्या आईला बघू…. 

साधिका आरतीच्या खोलीत जाताच तिला सकारात्मक ऊर्जेचा भास होतो. ती आरतीचा हात हातात घेते व तिला हाक मारते. 

साधिका : काकू, उठताय ना…? 

आरती : हं…हो…

स्वतःला घरात पाहून आरती चकित होतात. 

आरती : अभिमन्यू, मी तर बाजारात होते…तहान लागली म्हणून पाणी प्यायले आणि त्या नंतरच मला काहीच आठवत नाही… कसं शक्य आहे…आणि ही कोण आहे… 

अभिमन्यू : अगं आई तुला रस्त्यात भोवळ आली म्हणून माझ्या विद्यार्थिनी तुला घरी घेऊन आल्या होत्या… 

आरती : अरे पण अभिमन्यू तू आपला खरा पत्ता कुठे कॉलेजमध्ये दिला आहेस? मग त्यांना हा पत्ता कसा समजला… 

साधिका : आधी तुम्ही दोघे शांत व्हा… अभिमन्यू तू आधी स्वामींजवळ ठेवलेलं पाणी आईला प्यायला दे…काकी, मी साधिका…शिंदे सरांची मुलगी…तुम्ही शुध्दीवर येत नव्हतात म्हणून अभिमन्यूने मला घरी बोलावलं…

अभिमन्यू : आई, हे पाणी घे… 

साधिका : अभिमन्यू मला त्या मुलींची नावं सांग.. 

अभिमन्यू : शलाका आणि विनिता… 

साधिका : ठीके आपण बोलू यावर…तुम्ही दोघं फ्रेश व्हा मी कॉफी आणते बनवून…कॉफी घेत घेत याविषयावर बोलू… 

साधिका कॉफी बनवताना आजी आणि आरतीबाबत घडलेल्या घटनांची उजळणी करते आणि विनिता ही साधारण मुलगी नाही याची तिला खात्री पटते. 

------------------------------------------------------------

- प्रणाली प्रदीप