Purple pea in Marathi Moral Stories by श्रीराम विनायक काळे books and stories PDF | जांभळीचा साणा

Featured Books
  • My Wife is Student ? - 25

    वो दोनो जैसे ही अंडर जाते हैं.. वैसे ही हैरान हो जाते है ......

  • एग्जाम ड्यूटी - 3

    दूसरे दिन की परीक्षा: जिम्मेदारी और लापरवाही का द्वंद्वपरीक्...

  • आई कैन सी यू - 52

    अब तक कहानी में हम ने देखा के लूसी को बड़ी मुश्किल से बचाया...

  • All We Imagine As Light - Film Review

                           फिल्म रिव्यु  All We Imagine As Light...

  • दर्द दिलों के - 12

    तो हमने अभी तक देखा धनंजय और शेर सिंह अपने रुतबे को बचाने के...

Categories
Share

जांभळीचा साणा

जांभळीचा साणा

 

 

 

        अच्युतरावांचा निरोप सांगायला शिपाई भिकु गोताड परटवण्यात बाबा भिशांच्या घरी गेला. त्यांचा मुलंगा घनःशाम नुकताच बी.एस्सी. झालेला. त्याला अच्युतरावानी भेटायला बोलावलम्हणजे पटवर्धन हायस्कूलमध्ये नोकरी संदर्भातच विचारणा होणार असं बाबा भिशांनी गृहित धरलं. त्याना शिक्षकी पेशाचा फार अभिमान वाटायचा. चहा घेता घेता त्यानी भिकुकडे खडा टाकला भिकु अच्युतरावांच्या खास मर्जीतला. बऱ्याच आतल्या गोटातल्या बातम्या त्याला असायच्या पण तो नकारार्थी मान हालवित बोलला, “तसा काय माला वाटत नाय, कारण आमच्या सालंत हिंदीची जागा मोकली झालली हाय. तुमचा श्यामा बी. एस्सी.हाय म्हंजे तसा काय नसनार आनी म्हत्वाचा म्हंजे आमच्या संवस्थेत सगला बामनी काम सामनी, बामनांशिवाय दूसऱ्या जातवाल्यान्ला संवस्था घेयाची णाय. पन सायबानी माला पाटवला म्हंजे कायतरी म्हत्वाचाच काम आसेल." भिकु निघुन गेला आणि झटपट तयारी करून शाम बाहेर पडला.

      शामगाडी तळावर पोचला तोवर अच्युतराव लता टॉकीजकडून येताना दिसले. तीनचा सिनेमाचा शोसुरू झाल्यावर ते अधुन मधुन टॉकीजवर फेरी मारायचे. चुकुन माकुन कोणी विद्यार्थी:शाळा चुकवून सिनेमा बघायला गेलेला असलाच तर तो अचुक सापडायचा. सरानी हसून शामच्या:पाठीवर थोपटीत म्हटल, "लेका, फर्स्टक्लासमधे पास झालास ना? मग पेढे कुठे आहेत?" शाम मान खाली घालत म्हणाला,"म्हणजे येणार होतो सर पण.... सर अजुनही तुम्हाला भेटायला यायचं म्हणजे भिती वाटते." दिलखुलास हसत सर म्हणाले,"अरे वेडा की काय तू आता तू मोठा झालास. फर्स्ट क्लास मिळवुन पास झालास मला अभिमान वाटतो. माझा विद्यार्थी ग्रॅज्युएट झाल्याचंऐकल्यावर." बोलता बोलता गोखले नाका आला. शामच्या खांद्यावर हात टाकीतअच्युतराव म्हणाले, "चला लेको आज छाया हॉटेलमध्ये पॅटिस खाऊया." वेटरला ऑर्डर दिल्यावर सर सांगायला लागले.

        "तु पुढे काय करायचं ठरवलयस् ? काल हेडमास्तरांची मिटींग होती.माझे एक स्नेही आहेत गोखलेसर... तुला आचरा माहिती आहे? मालवण तालुक्यातलं गाव आहे.त्याच्या शेजारचं गाव भगवानगड तिथे हायस्कुल आहे त्याना गणितचा शिक्षक हवा आहे. तुजा तिथे." शाम सरांच बोलण ऐकून सटपटला. "पण सर.... मला जमेल शिकवायला? आणि मला खर तर बँकेत जॉब करायचीआवड आहे." पॅटिस खाता खाता सर म्हणाले, "तुला बँकेत जॉब करायचाय हे ठीकआहे. शाळेपेक्षा बँकेत पगार चांगला असतो हे खरंच पण बँकेत जॉब मिळेपर्यंत रिकामं बसण्यापेक्षा तु मिळतेय ती नोकरी स्वीकार. बँकेच्या परीक्षा, इंटरव्यू प्रयत्न सुरू ठेवबँकेत सिलेक्ट झालास तर जा मग मी गोखलेसराना तशी कल्पना देतो." पॅटिस संपल्यावर वेटरला दोन कॉफीची आर्डर सांगतानाच वीस रूपयांची नोट देत सर म्हणाले, "आजची पार्टी मी दिली. तुला बँकेत जॉब मिळाला की तुझ्याकडुन मी पार्टी घेणार."

      अच्युतरावांची चिट्ठी घेऊन शाम भिसे रवाना झाला. कणकवलीला ऊतरून गाडीची चौकशी केली. तासाभरातच आचरापार गाडीलागली. तिकिट काढताना त्याने कंडक्टरकडे चौकशी केली. नशिबाने हायस्कुलचे सुपरवायझर जोशी त्याच गाडीत होते त्यांच्याशी कंडक्टरने त्याची गाठ घालुन दिली. जोशीसर शामला घरीच घेऊन गेले. "भिसेसर, आपण आंघोळ करू, चहा-फराळ करू आणि मग शिस्तीत सराना भेटायला जाऊया." जोशी सरांच्या आदरातिथ्याने अन् त्यापेक्षाही सर असा त्याचा उल्लेख ऐकुन शाम भलताच ओशाळला. तासाभरातच दोघेही हेडमास्तरांच्या घरी पोचले.सरांनी अच्च्युतरावांची चिठ्ठी वाचली. "ठीक आहे. तुम्ही कसलीही काळजी करूनका. दोन दिवसात तुमच्या खोलीची, जेवणाची व्यवस्था करुया. तोवर तुम्ही शाळेच्याहोस्टेलमध्ये थांबा." त्यावर जोशीसरानी शामची सोय लागेपर्यंत त्याला आपल्या घरीच ठेवायचा आग्रह केला.

       हायस्कुल सुरू होऊन पंधरा वर्ष झालेली पण गणितासाठी बी.एस्सी. मॅथ्स शिक्षक शाळेला प्रथम शामच्या रूपाने मिळालेला. सगळ्या गावालाच या गोष्टीचं अप्रूप. नववी, दहावीची एक एक तुकडी आणि भिसेसर नाही नाही म्हणत असतानाही अकरावी एस. एस्सी. च्या दोन्ही तुकड्यांचं गणितही गोखलेसरानी त्यांच्यावरच सोपवलं. अच्युतराव पटवर्धनांसारख्या नामवंत हेडमास्तरांची शिफारस गोखलेसरांना पुरेशी वाटली. जोशी आणि गोखले दोघांच्याही अचूक:मार्गदर्शनाखाली भिसेसरांची करियर सुरू झाली. गोखलेसरानी शाळेजवळच भावल्या गावकराकडे दोन खोल्यांची जागा बघून दिली. स्वतः आणि लक्ष घालुन खोलीत आंघोळीसाठी:मोरी बांधून घेतली. शाळेत इन्स्पेक्शनला साहेब येत, कधि ऑडिटर येत तेव्हा:त्यांच्या जेवणाची व्यवस्था शाळेचा शिपाई जगन देवळी करायचा. जेवणारी मंडळी अन्नाची तोंडभरून वाखाणणी करीत. भिसे मांसाहारी असणार हे ओळखुन जेवणाची व्यवस्थागोखलेसरानी जगन देवळ्याकडे लावुन दिली. त्यांच्यासाठी आठवड्यातून दोन तीन वेळा मांसाहाराची सोय करण्याची सक्त सुचना जगनला दिली. सगळया मंडळींच्या अगत्याने शाम एवढा भारावून गेला की त्याने कामाला अगदी वाहून घेतल.

        त्यावेळी अकरावीला बोर्डाची परीक्षा हा शाळांचा मानबिंदू समजला जायचा. भगवानगड हायस्कुलमध्ये गणिताचा क्वालिफाईड शिक्षक नव्हता. बी.एस्सी. मॅथ्स शिक्षकच मिळणंमुष्किल होतं. गणिताचा रिझल्ट म्हणजे शाळेचा रिझल्ट हे समीकरण आहे असं गोखलेसर नेहमी म्हणायचे... भिसे सराना प्रोत्साहन देऊन शाळेचा रिझल्ट सुधारण्याच्या खटपटीत सर गढुन गेले. भिसे हुशार, होतकरू निघाले. अकरावीच्या प्रश्नपत्रिकेचा ढाचा लक्षातघेऊन हुकमी गुण मिळवुन देणाऱ्या गणितांचा सराव हा गोखलेसरानी दिलेला गुरू मंत्र भिसेसरानी अंमलात आणला... न रागावता, न मारता मुलाला समजेपर्यंत तोच तोच भाग:शिकवणारे भिसेसर मुलांचे लाडके सर बनले. गणितासाठी रोज जादा तास सुरू झाले.मुलांची नियमित हजेरी रहावी, आबधाक रहावा, आपल्यालाच कामाला लावलं असं भिसेसरनावाटू नये म्हणुन हेडमास्तर आणि सुपरवायझर दोघेही रोज आळीपाळीने जादा तासाना शाळेत:हजर रहात. भिसेसर तास घेऊन स्टाफ रूम मध्ये आले की गरमागरम कॉफीचा कप मिळेल अशी सोय असायची.

        भिसेसरांचं शिकवणं, जादा तास हा गावात मोठा कौतुकाचा विषय झाला. गावातले प्रतिष्ठित लोक,व्यापारी भिसेसर रस्त्यात दिसले की हसुन आदराने रामराम करीत. सर संध्याकाळी आचरा:तिठ्यापर्यंत फिरायला जात. तिठ्यावर अशोक बागवेच्या टपरीत सर गेले रे गेले की अशोक दुकानातली एकमेव खुर्ची त्यांच्यासाठी मोकळी करायला लावायचा. हायस्कुलमध्ये:सरांच्या बरोबरीच्या वयाचा कुणीच शिक्षक नव्हता. मग सर एकटेच फिरायचे. आचरा बंदर,माऊलीच देऊळ, वायंगणिचा सडा अन् जांभळीच्या साण्यावरची देवराई, तिथे डाक बंगल्यासमोरचा ऑबझर्वेशन पॉईंट सराना आवडायचा. डाकबंगल्या समोर पन्नास फुट खोल कडा अन् त्यापुढे    उसळणारा अरबी समुद्र हे दृष्य खुपच लोभसवाणं दिसायचं. तिथे चोविस तास झुळुझुळु वारा लागायचा. या गोष्टी अचुक हेरून ब्रिटिश काळात कुणि कलेक्टरने तिथे डाक बंगला बांधला पण तो भाग एका बाजूला... निर्मनुष्य... कुणीच त्या बाजूला फिरकतनसे पण तो स्पॉट सराना भलताच आवडायचा. त्यानी आपल्या वर्गाचं वनभोजन मुद्दाम जांभळीच्या साण्यावर नेलं.

        जगन देवळी भिसे सरांचा डबा दुवक्त खोलीवर पोच करायचा पण एका रविवारी त्याने सराना घरी जेवायला बोलावलं. त्याचं घर सरांच्या खोलीपासुन हाकेच्या अंतरावर... बारा वाजता सर जगुच्या घरी पोहोचले. अंगणात पाऊल टाकल्यावर दारासमोर काढलेली रांगोळी सराना खुपचआवडली. सदु स्वागताला पुढे आला. सर ओसरीवर जाऊन झोपाळ्यावर बसले. ओटीच्या दारावरचं सुंदर विणलेलं तोरण भरत कामातल्या कौशल्याची साक्ष देणार होतं. त्या बाजुच्याभिंतीवर श्रीकृष्णाचं वॉटर कलरमध्ये रंगवलेलं सुंदर चित्र ! न राहवून भिसेसर म्हणाले, “जगन, हे तोरण कुणी विणलेलं?” “ते होय माझ्या भावाची मुलंगी आहे सुनीती तिने विणलाआणि साईबाबांचं चित्र पण तीनेच काडलला आसा." सर कौतुकाने म्हणाले “व्वा !आर्टिस्ट दिसतायत." खोखो हसत जगन उत्तरला “कसली आर्टिस घेवन् बसलास गेल्या वरसाक अकराव्वीत नपास झाल्ला तसे अडसट टक्के मिळवल्यान पन गनीतात ढगाळला... पंदरावमार्कान नापास... फारम भरताना गनीत नको म्हनत व्हतो आमी पन गोखलेसरांचो आग्रव...हां तेचा ड्राईंग चांगला आसा... दोन परीक्षा झालल्यो आसत... आमच्या शाळेत सरस्वतीचा चित्र तेचाच आसा.”

       आकंठ जेऊन सर उठले. आंबोळया त्याना भलत्याच आवडलेल्या. हात धुवून ते झोपाळयावर टेकले.त्यांच्या पुढयात पानाचं तबक ठेवीत जगन म्हणाला, “माज्या भावजयीक जरा तुमच्याशी बोलाचा आसा.” तेवढयात आतून एक प्रौढ स्त्री व तिच्या पाठोपाठ अठरा एकोणिस वर्षाची मुलंगी बाहेर आली. “सुनीती सरांच्या पाया पड." प्रौढ स्त्री बोलु लागली. “मी जगन भाऊजींची वहिनी.” सुनीतीने सरांच्या पायाना स्पर्श करीत वाकून नमस्कार केला.टपोरे डोळे, लांबसडक केस, लालचुटुक जिवणी, गौर वर्ण, चंद्रबिंबासारखा गोल चेहेराअसलेली लावण्यमूर्ती सुनीती.... सर भान हरपून बघतच राहिले. सुनीतीची आई पुढे म्हणाली, “सर गणितात नापास झाल्यामुळे सुनीती खुपच नाराज आहे. सर तुम्ही शिकवणी घ्याल ना तिची? आम्ही तुमचे उपकार विसरणार नाही.” त्याना थांबवीत सर बोलले, “आई रोज तुमच्या हातचं सुग्रास अन्न खातोय मी. प्लीज उपकार वगैरे म्हणून मला लाजवू नका. मी खात्रीने सांगतो, तुमची सुनीती नक्की पास होईल, नुसती पास नव्हे सत्तर टक्के मार्क मिळवील.”

        सुनीतीअन् गणितात गचकलेली आणखी पाच मुलं-मुली सकाळी आठ वाजता सरांच्या खोलीवर हजर झाली.आठवडाभरात एक एक करीत आणखी चौदा मुलं दाखल झाली. शनिवारी शाळा सकाळची अन् रविवारी सकाळी शाळेत जादा तास असायचे म्हणुन दुपारी शिकवणी घ्यायची गळ सुनीतीनं घातली. एका शनिवारी क्लास सुटल्यावर सुनीती सराना म्हणाली, “सर आमची एक विनंती आहे. उद्या सकाळी शाळेत जाण्यापूर्वी मी भावाला पाठवीन त्याच्याकडे खोलीची चावी द्या. आम्ही क्लासची खोली सारवणार आहोत.” सरानी हो नाही म्हणायचा प्रश्नच नव्हता. सर म्हणाले ठीक आहे “पण सारवण केल्यावर मस्तपैकी रांगोळी काढायची." दुसऱ्या दिवशी सर शाळेत गेल्यावर सुनीती अन् कमल पाडावे दोघीनी रूम उघडली. छपरासह आटेकोपर केर काढुन सारवण घातलं मग सुनीतीने सरांच्या अंथरूणाचे कपडे धुतले, शेवटी चादर, बेडशीट, पिलोकव्हर लक्स साबणानं घासून रूमच्या मागील बाजुला वाळत घातले. रूमसमोर व्हरांडयातसगळं कसब पणाला लावून छानशी रांगोळी काढली. आतल्या खोल्यांमध्ये चारही कोपऱ्यात स्वस्तिक कमळांची नक्षी काढली.

       दुपारीवघरी आल्यावर रांगोळी बघताना किती वेळ सराना दार उघडायचही सुचेना. दुपारनंतर मुलं शिकवणीला आली. चार वाजता क्लास सुटल्यावर मुलं घरी निघाली. सरानी सुनीतीला माघारी बोलावल “सुनीतीऽऽ सारवण रांगोळी ठीक आहे पण माझ अंथरूणसुध्दा ? मला लाजवलस तू !” सुनीतीलाजून म्हणाली, “सर एवढं काय वाटायला नको. तुम्ही जे कष्ट घेता त्याची थोडीशी जाणीव ठेवली आम्ही.” अन् मान खाली घालून ती पळुन गेली. रात्री सर अंथरूणावर आडवे झाले. लक्स साबणाचा मंद वास आला. सुनीतीची कल्पकता लक्षात आल्यावर सर बेहद्द खुष झाले. सरांच्या मनात सुनीतीची अनावर ओढ निर्माण झाली. सुनीती तु माझी हो ऽऽ त्यांच मन साद घालु लागलं. आता काहीही करून आपल्या भावना सुनीतीकडे व्यक्त करून तीचाहोकार मिळवायचाच असा निश्चय करीत शाम झोपला ती रात्र सुनीतीच्या गोड स्वप्नानी भरलेली होती.

     सरानी ठरवलं खरं,पण प्रत्यक्ष सुनीती समोर आल्यावर मात्र त्यांचा धीर खचायचा. अशा घालमेलीत चार दिवस मागे पडले. सरानी किती पत्र लिहीली अन् फाडून टाकली. शेवटी खंबीर निर्धारवकरून सरानी पत्र लिहीलं... दुसऱ्या दिवशी रविवार होता. सरानी मुलाना उजळणीसाठी गणितं घालुन एकेकाच्या वह्या तपासून मुलाना मोकळं केलं. सुनीतीला मुद्दामच शेवटीठेवलं होतं. तिची वही तपासून देताना सरानी खिशातलं पत्र वहीत ठेवलं. थरथरत्या हातानी वही सुनीतीकडे देताना पुटपुटल्यासारख सर बोलले, “सुनीतीऽऽ प्लीज, हे वाच, तुला पटलं रूचलं तर उत्तर दे ! नाही आवडल तर फाडुन टाक अन् मला माफ कर. पण प्लीज, याचा बभ्रा करू नकोस अन् क्लासही बंद करू नकोस.” सुनीती निघुन गेल्यावर मात्र सराना गिल्टी फिलींग झालं. भावनेच्या भरात आपण नको ते साहस तर केल नाही ना ? तक्रारझालीच तर काही आपली धडगत नाही. त्या रात्री सरांना जेवण गेलं नाही. रात्रभर विचार करकरून डोक पुरतं चक्रावलं. त्याच अंतर्मन मात्र सांगत होत की सुनीती रूकार नाहीद्यायची कदाचित पण बेअब्रू तरी नाही करणार... उत्तररात्री सरांचा डोळा लागला सकाळी क्लासला आलेल्या मुलानी दार ठोठावल्यावर सर जागे झाले. चटकन लुंगी गुंडाळुन शर्ट अडकवीत सरानी दार उघडलं. सगळी मुलं दिसली त्यात मान खाली घालुन सुनीती उभी होती.

        चार दिवस निघुन गेले. नेहेमीप्रमाणे क्लास सुटून मुलं बाहेर पडली पण सुनीती मागेरेंगाळली. सराना खुण पटली. सुनीती काही बोलण्यापूर्वीच सर म्हणाले “सुनीतीऽऽ मलासमजलं तुला काय सांगायचय ते. आज संध्याकाळी पाच वाजता जांभळीच्या साण्यावर ये. मी वाट पहातो.” हातातलं पाकिट सरांच्या अंगावर टाकुन हसतमुखाने सुनीती निघुन गेली.संध्याकाळी पावणेपाचलाच सर संकेतस्थळी पोचले. त्यानी घड्याळ बघितलं. अजून पंधरावीसमिनीटं वाट पहायला हवी असं मनाशी म्हणत सर ऑबझर्वेशन पॉईंटकडे निघाले ते डाकबंगल्यापर्यंत पोचले अन् सुनीती पुढे आली. परस्परांविषयीची ओढ, आतुरता मुक्तपणेव्यक्त करीत जन्मभर साथ देण्याच्या आणाभाका देऊन दोघही माघारी वळली. दिवस जात राहिले, त्यांच प्रेम बहरत गेलं. जाहीर प्रदर्शन करणं दोघानी कटाक्षाने टाळलं...त्यांचं संकेतस्थळ दुर्लक्षित ठिकाणी असल्यामुळे त्यांच्या प्रेमाचा बभ्रा गावभर झाला नाही. मार्चमध्ये बोर्डाची परीक्षा पार पडली. शिकवणीला येणाऱ्या सगळयाचरिपीटर्सनी पास होणार अशी ग्वाही दिली. अकरावीचे वर्ग बंद झाले अन् भिसेसरना निवांतपणा मिळाला. त्या दरम्याने रामेश्वराचा उत्सव सुरू झाला. सुनीती आचऱ्याला मावशीकडेच राहिली. सर उत्सवाला गेले. रात्री देवाच्या पालखी समोर सुनीतीने ‘वाजवी मुरली शामसुंदरा’ हे पद म्हटलं. तिचा गोड स्वर सरांच्या कानात घुमत राहिला.

       किर्तनवसुरू झाल. सरांकडे सूचक कटाक्ष टाकीत सुनीती बाहेर पडली. मागोमाग सरही बाहेर गेले.निवांत कोपरा गाठून किर्तन संपेपर्यंत दोघानीही मनसोक्त गप्पा मारल्या.. दोन दिवसहा प्रकार झाल्यावर मावशीला संशय आला. तिने आडून आडून चौकशी केल्यावर खरा प्रकार तिने ओळखला... तिसऱ्या दिवशी दोघी देवळाकडे जात असताना वाटेतच सरांची गाठ पडली. सुनीतीने मावशीची सरांशी ओळख करून दिली. सराना जेवायला यायचं आमंत्रण दिलं. मगपुढचे चार दिवस संध्याकाळी शाळा सुटल्यावर भिसेसर थेट मावशीकडे जायचे. तिथे रात्रीच जेवण होईपर्यंत दोघाना मोकळेपणाने वावरता येई. त्यांना कोणाचा व्यत्यय येणार नाही याची पुरेपूर खबरदारी मावशी घ्यायची. उत्सव संपल्यावर घरी जाण्यापूर्वी सुनीतीने अंदरकी बात स्वतः होऊन मावशीला सांगितली.

          सरानी जानेवारीत स्टेट बँकेची रिटन टेस्ट दिली होती. फेब्रुवारीत ओरलही झाली. सरांचेमेव्हणे पुण्याला कंपनीत नोकरीला होते. स्टेट बँकेचे रीजनल ऑफिसर दळवीसाहेब त्यांच्या नातेसंबंधातले सरांच सिलेक्शन झाल्यातच जमा होतं, पण सुरूवातीचीपोस्टिंग विदर्भ, मराठवाडा भागात असल्यामूळे दळवीनी सरांचं प्रपोजल मुद्दामच मागेठेवलेलं... पुणा रिजनचं पोस्टिंग सुरू झालं आणि पहिल्याच लॉटमध्येच भिसेसराना लेटरमिळालं. त्यावेळी शाळेच्या वार्षिक परीक्षा सुरू झाल्या होत्या. बँकेच्या लेटरप्रमाणे आठ दिवसात हजर व्हायचं होतं... भिसेसरानी घाबरतच बँकेच लेटरहेडमास्तरांकडे दिलं... लेटर वाचल्या वाचल्या हेडमास्तरांनी हसून भिसेसरांचं अभिनंदन करीत म्हटल, “तुम्ही लकी अहात ! तुम्ही इथे राहिला असतात तर शाळेचं भाग्यच उजळलं असत पण तुम्हाला जी संधी मिळतेय् ती दवडणं म्हणजे मूर्खपणा ठरेल. अहो पगारातच दीडपट तफावत आहे. शिवाय पुढे वरच्या पोस्ट मिळत जातील तशी मिळकतसुध्दा वर्धिष्णु होत जाईल... इथली नोकरी टिकवायची तर तुम्हाला आज ना उद्या बी. एड्. करायला हवं. मगवार्षिक पंधरा रूपये पगार वाढ घेत वर्षच्या वर्ष घटवायला हवीत. एकी एक दुरकी दोनअशी सरधोपट उजळणी केल्यासारखी आर्थिक कमान ! तुम्ही जादा कष्ट घेतलात तरी आर्थिक लाभ शून्य... अर्थात पैसा हे काही जीवनसर्वस्व नव्हे. समाजात केवढ मानाचं स्थानआहे शिक्षकाला ! अच्युतराव पटवर्धनांचं उदाहरण आहे तुमच्यासमोर...

       मानसिक समाधान आणि साफल्याचा आनंद पैशात मोजता येत नाही अन् नावलौकिक काही रूपये मोजुन विकत घेता येत नाही. हे श्रेय तुम्हाला शिक्षकी पेशातच मिळेल. बँकेतला जनसंपर्क,नाती अन् जिव्हाळा निव्वळ कॅज्युअल ! हे माझं तत्वज्ञान मी तुमच्या गळी उतरवणारनाही. प्रत्येकाचं ईप्सित वेगळं असतं. काय धरायचं नी काय सोडायचं हे तुम्ही ठरवायचं... तुमच्या निर्णयाआड मी येणार नाही. तुम्ही इथे आल्यापासून जे कष्टघेतलेत त्याची नोंद मी घेतलेली आहे. यंदा गणितचा निकाल सत्तर टक्क्यांच्या पुढे जाईल याची मला खात्री आहे. मी तुम्हाला अडवणार नाही. हां एक अट आहे. जूनमध्येरिझल्ट लागल्यावर तुमचा सत्कार करू, तुमचा निरोप समारंभ त्यावेळी करू ! त्या कार्यकमाला मात्र यावंच  लागेल तुम्हाला ! तसं वचन द्या मला.” भिसेसरानी हेडमास्तरांना मनापासून नमस्कार केला.

         हेडमास्तरांनी तातडीची स्टाफ मिटिंग घेऊन भिसेसरांना स्टेट बँकेत नोकरी मिळाल्याची घोषणा करून जूनमध्ये एस्स. एस्सी. चा रिझल्ट लागल्यानंतर सरांचा जंगी सत्कार करून त्यानानिरोप द्यायचा बेत जाहीर केला. भिसेसर शाळेबाहेर पडले. त्यानी थेट सुनीतीचं घर गाठलं. त्याना बँकेत नोकरी मिळाल्याची बातमी ऐकल्यावर सुनीतीला आनंदाने नाचावसंवाटलं. संध्याकाळी दोघही जांभळीच्या साण्यावर गेली. रडणाऱ्या सुनीतीचा हात हातात घेऊन सर म्हणाले, “मी शरीराने दूर जात असलो तरी मनाने तुझ्याजवळच असणार आहे. मीबँकेत हजर होतो. माझ बस्तान बसू दे. लग्नासाठी थोडे पैसे साठवीपर्यंत आपण धीर धरायला हवा. एकदा सगळ्या गोष्टी मनासारख्या मार्गी लागल्या की मी तुला न्यायला येईन. तोपर्यंत तू वाट पहात रहा. मला नियमित पत्र पाठव.” दुसऱ्या दिवशी सर निघून गेले. सराना निरोप द्यायला सुनीती राजरोसपणे स्टॉपपर्यंत गेली. गाडी सुटल्यावर गोखलेसरांचं बोलण त्याच्या कानात घुमत राहिलं. शिक्षकी पेशा सोडुन बँकेत हजर होण्यापेक्षा असच उतरावं आणि परत जाऊन शाळेत रूजु व्हावं अशी अनावर ऊर्मी आली पण बँकेतल्या नोकरीचं अन् त्याहीपेक्षा जादा पगाराचं मृगजळ खुणावीत राहिलं.

         सुनीती सरांच्या आठवणी कुरवाळीत रहायची. अधून मधून जांभळीच्या साण्यावर जाऊन मनावरचं ओझ़ हलकं करायची. जूनच्या पहिल्या आठवडयात एस.एस्सी.चा रिझल्ट लागला. शाळेचा रिझल्टअडुसष्ट टक्के लागला. भिसे सरांकडे शिकवणीला जाणारी सगळी मुलं गणितात पास झाली.सुनीतीला पासष्ट गुण मिळाले. हेडमास्तरांनी भिसेसराना सत्काराच्या निमंत्रणासह मुलांच्या नावानिशी गणिताचं गुणपत्रक पाठवून दिलं. सरांच उत्तर आलं... त्यांनी सत्तावीस जून येतो असं कळवलं... सर सव्वीस तारखेला भगवानगडला आले. ते राजरोसपणे सुनीतीकडेच राहिले सर अन सुनीतीच्या गप्पा सुरू असताना ओसरीवर ती दोघचं होती.दुसऱ्या दिवशी सत्काराचा जंगी सोहोळा झाला. सगळे पालक, माजी विद्यार्थी जमा झाले.कार्यक्रमाचं स्वागत गीत सुनीतीने म्हटलं. एवढ्या मोठ्या सभेत बोलायची भिसेसरांच्या आयुष्यातली पहिलीच वेळ. सगळयांच्या कौतुकाच्या वर्षावामुळे सर एवढे भारावून गेले की योजलेलं भाषण त्याना आठवलच नाही. सरांचं ऋण व्यक्त करून अन् मुलांच कौतुक करून सरानी भाषण आवरतं घेतलं. निरोपाचे शब्द उच्चारताना हेडमास्तर गोखले सरांचा स्वरही कातर झाला.

        “भिसेसरांच्या निरलस कष्टांमुळे शाळेला प्रथमच एवढं दैदिप्यमान यश मिळालेलं आहे. या शाळेच्या इतिहासात सरांच नाव कोरलं गेलय तसंच त्यांच्या वैयक्तिक उत्कर्षाचा शुभारंभ याप्रशालेतून झाला हा सुध्दा दैवी योगच म्हणायला हवा. माझं शंभर टक्के निकालाचं स्वप्न मात्र अपुर राहिलं.” भाषणाचा समारोप करताना सरानी अशी कोपरखळी मारली कीत्यांच्या बोलण्यातल मर्म ध्यानात आल्यावर जाणत्यांच्या मनावरचा ताण हलका होऊनसभेचा शेवट गोड झाला. “भिसेसर शाळा सोडून गेले म्हणजे फक्त नित्यसंपर्क कमी झाला एवढंच ! अल्पावधितच या गावाशी त्यांचा जो ऋणानुबंध जुळला आहे त्या खातर भविष्यातही सरांचं येणं जाणं राहणार आहे, ते आम्हाला भेटत राहणार आहेत असा माझा भरवसा आहे.शुभास्ते पंथानः संतु!” टाळयांच्या कडकडाटात गोखलेसरांचं भाषण संपलं. त्या दिवशी संध्याकाळी प्रथमच भिसेसर आणि सुनीती राजरोसपणे जोडीन जांभळीच्या साण्यावर फिरायलागेली. या वेळी निरोप घेताना सरांचा गळा भरून आला. सुनीतीला तर अश्रु आवरेनात. पुढच्या गोष्टींसाठी अनिश्चित काळ वाट पहात थांबावं लागणार ही कल्पनाच भीषण होती.

         पाचसहा महिन्याचा काळ मागे पडला. भिसेसरांच्या जॉबचं काम करणारे दळवीसाहेब, त्यांच्यासाठी सावंतानी मोठ्या हॉटेलमध्ये पार्टीचा बेत ठरवला. नियोजित वेळी दळवीसाहेब फॅमिलीसह आले. त्यांच्या सोबत त्यांची बहिण वंदना पण आली. सावंतानी शामला सगळ्यांचा परिचय करून दिला. मग ड्रिंक्स आली. शाम भिसेसाठी ही पार्टी नवीनअसली तरी इतरांसाठी ते रूटिन होत. शामची बहिण, दळवी साहेबांची मिसेस, त्यांची बहिण या महिला वर्गासाठीही ग्लास भरले गेले रात्री उशिरा मंडळी घरी परतली. दोन दिवसानंतर गप्पांच्या ओघात सावंत म्हणाले, “शाम, परवा पार्टीला दळवी साहेबांची बहिण वंदना आली होती ना, ती गरवारे मध्ये स्टेनो आहे. तीला कंपनीचा फ्लॅट आहे. ती मुलगी कशी काय वाटते तुला?” मेव्हण्याना नेमकं काय म्हणायचं आहे ते शामला कळलनाही. तो प्रश्नांकित चेहेरा करून म्हणाला, “मी काय सांगणार!" त्यावर हसून शामची बहिण म्हणाली, “अरे बुद्दू त्याना असं विचारायचय की तुला आवडली का वंदना ? आज दळवीसाहेबांचा फोन आला होता याना, दळवीसाहेबांनी वंदनाला प्रपोज केलय तुझ्यासाठी." बहिणीचं बोलणं ऐकून शामला पायाखालची वाळुच सरकल्यासारखं वाटलं.“मी मागाहून सांगतो विचार करून" त्याने वेळ मारून नेली. सावळ्या रंगाची, बॉबकट केलेली, भडक लिपस्टिक लावुन बोल्ड वागणारी, घमेंडखोर वंदना... सहधर्मचारीणी? त्याला कल्पनासुध्दा करवेना. त्या रात्री शामला झोप लागली नाही.

         दुसऱ्या दिवशी बहिणीला एकटी गाठून शामने आपल्या अफेअरची कल्पना दिली. आपण वचन देऊन गुंतल्याचं कबूल करीत सुनीतीचा फोटो समोर ठेवला. झुरळ झटकावं अशा आविर्भावात बहिण म्हणाली, “कोण ती गावंढळ पोर... अन् तीच्यासाठी चालून येणाऱ्या लक्ष्मीला लाथाडतोस? वंदनाचं क्वालिफिकेशन, तिचा जॉब, दळवी फॅमिलीच सोशल स्टेटस..... तिच्या चपलेशी तरी बरोबरी होईल का तू ठरवलेल्या त्या गावंढळ मुलीची?” त्यांच बोलणं सुरू असतानाच सावंत आले त्यानी शामला सगळं सविस्तर विचारून घेतलं. शामला त्याच्या प्रेमप्रकरणातून बाहेर काढायचा क्ल्यू त्यानी अचूक शोधला. “शाम! मी काय सांगतोय तेनीट लक्षात घे. तू पुण्यात आहेस. इथे सेटल होणं सोप नाही. आम्ही दोघही नोकरी करतोय पण दहा वर्ष दोन खोल्यांच्या जागेत काढल्यावर हा फ्लॅट घेतला आम्ही... तरीही बँक लोनमध्ये एकाचा पगार कापून जातोय. तुझी नुकतीच सुरूवात होतेय. पैसा पैसा जोडुन सेटल होईतो तुझी चाळीशी उलटेल. वर तू जी मुलगी ठरवली आहेस ती देवदासी समाजातली !आमचं सोड पण तुझे वडिल बाबा भिसे... तू जातीबाह्य संबंध केलास तर तुझे नाव टाकतीलते ! आयुष्याची माती करून घ्यायचीय का तुला? नीट विचार कर. वंदनाच्या रूपाने मोठी संधीचालून आलीय. दळवींशी सोयरीक जुळली तर वर्ष दोन वर्षात मॅनेजरच्या पोस्टपर्यंत जाशील तू. नीट विचार कर आणि चार दिवसात तुझा निर्णय सांग.”

         मेव्हण्यांचा उपदेश पचवणं शामला खुपच जड गेलं पण हळुहळु त्याचा निर्णय पक्का होत गेला. एकारात्री निर्धार करून शाम उठला सुनीतीची सगळी पत्रं, तिचा फोटो बॅग मधून बाहेरकाढला. ते सगळ बाड सुनीतीने दिलेल्या पिलो कव्हरमध्ये भरलं अन् त्याचं घट्ट पुडकंकरून रद्दी पेपरमध्ये गुंडाळलं... दुसरे दिवशी बँकेत जाताना कॉर्नर जवळच्या कचराकुंडीत ते पुडकं फेकून दिल्यावर त्याच्या उरावरच दडपण हलकं झालं. बँकमध्ये पोचल्यावर त्याने झोनल ऑफिसला दळवीसाहेबाना फोन केला. सावंतांच्या बोलण्याचा रेफरन्स देऊन आपल्याला प्रपोजल मान्य असल्याच सांगितलं. पुढच्या गोष्टी रितसर घडतगेल्या. लग्नाची तारीख तीन महिन्यानंतरची ठरली. मध्यंतरी सुनीतीचं पत्र आलं. शामने पोस्टमनला पाच रूपयाची नोट देऊन पत्रावर मालकाचा पत्ता बदलला असा रिमार्क लिहून तेपत्र सुनीतीच्याच नावे रिडायरेक्ट केलं. त्या नंतर मात्र कधिच सुनीतीच पत्र आलं नाही.

         लग्न चार दिवसांवर आलं. शामने दोन पत्रिका भगवानगडच्या पत्त्यावर पाठवल्या. एक शाळेलाअन् दुसरी जगन देवळीला... दळवीनी अक्षरशः पिक्चरमध्ये दाखवतात तसा लग्नाचा थाट उडवून दिला. त्या चकचकाटात शामला पुसटशीसुध्दा सुनीतीची आठवण आली नाही. लग्नानंतर हनिमूनला जाऊन वंदनाच्या कंपनी क्वार्टर्समध्ये शाम वंदनाचं सहजीवन सुरू झालं...पहिल्या दिवशी बँकेत जाताना डबा करून हवा असा हट्टच शामने धरला म्हणून वंदनाचा नाईलाज होता. वंदना लाडाकोडात वाढलेली, टिपीकल पुणेरी कल्चर हाडीमाशी भिनलेली, प्रच्छन्न स्वातंत्र्य हा हक्क मानणारी ललना. तिला कंपनीत लंच मिळायचा, तिच्या मते शामने दुपारचं जेवण कँटिनमध्ये घ्यायला हरकत नव्हती. लंच अवरमध्ये टिफीन उघडल्यावर वास्तवाची भीषणता त्याच्या लक्षात आली. अर्ध्या कच्च्या वेड्यावाकड्या आकाराच्या पोळया आणि एकीकडे तिखट दुसरीकडे मीठ अशी करपलेली भेंडीची भाजी... टिफीन डस्टबीनमध्ये फेकून तो कँटिनला गेला. प्रत्येक घासागणिक सुनीतीकडे खाल्लेल्या खरपूस भाकऱ्या, मटण वडे, मच्छी कढी, नीर फणसाची कापं, आंबाड्याचं रायतं, वालीच्या शेंगाची भरपूर खोबरं घातलेली भाजी अशा स्वादिष्ट मालवणी अन्नाची चव जिभेवर घोळवीत तो समोरच बेचव अन्न चिवडु लागला.

हायफाय सोसायटी लाईफचा खरा दणका आणखी आठवडाभराने वंदना नित्यनेमाने क्लबात जायला लागल्यावर त्याला कळला. तिथे फ्री लाईफच्या नावाखाली चालणारे स्त्री-पुरूषांचे प्रच्छन्न व्यवहार बघुन त्याला शिसारी आली. आर्थिक सुबत्तेच्या हव्यासाची भीषण किंमत आपल्याला मोजावी लागणार हे तो पुरतं समजून चुकला. सुनीतीची जी दारूण प्रतारणा आपण केली त्याचा पुरेपूर वचपा नियती काढणार हे आपल प्राक्तन असल्याचं शाम समजून चुकला. बँकेत जॉईन व्हायला गाडीत बसुन निघल्यावर झालेली घालमेल त्यालाआठवली. तो आपल्या संयमी मनाचा कौल होता. शाळेतला जॉब सोडायचा निर्णय घेण्यापूर्वी गोखले सरांसारख्या निर्लेप प्रांजल माणसाचा सल्ला विचारायचही आपल्याला सुचलं नाही... दुसऱ्याने कितीही माथी मारलं तरी काही निर्णय आपले आपण घ्यायचे असतात हेसाधं व्यावहारीक गणित तत्त्वनिष्ठ पित्याचं उदाहरण समोर असुनही चुकलं... एवढा मोठा निर्णय घेण्यापूर्वी सगळी वस्तुस्थिती आपण वडिलांच्या कानावरही घातली नाही. मुळात त्यांच्या इच्छेविरूध्द शिक्षकाची नोकरी सोडुन बँकेत जॉब स्विकारला हीच मोठी चुक झाली. सुनीतीच्या निर्मळ प्रेमाचा चोळामोळा करताना आपण माणुकीशीच उद्दामपणाने फारकत घेतली, याचं अतीव दुःख शामला झालं पण आता खूप उशिर झाला होता.

         बावीस वर्ष मागे पडली.... शामच्या मुलीने बारावी झाल्यावर हाय्येस्ट मेरीटच्या बळावर इंजिनिअरींगला प्रवेश मिळवला म्हणून मग तिला प्रॉमिस केल्याप्रमाणे गोवा, सावंतवाडी,मालवण असा चार दिवसांचा दौरा शामने आखला. परतीच्या प्रवासात रत्नागिरी करून यायचा बेत ठरला. मालवणला आल्यावर जैतापूर पावस कोस्टल हायवेने शॉर्ट कट आहे असं कळलं...शामची कार कोळंब पुलावरून पुढे आली. वायंगणी आल्यानंतर परिसर ओळखीचा भासला वंदनाला कोल्ड्रिंक प्यायची लहर आली. आचरा तिठ्यावर गाडी पार्क करून मंडळी खाली उतरली.शामने बघितलेला आचरा अन् समोर दिसणारं चित्र यात जमीन अस्मानचा फरक शामला वाटला.पूर्वस्मृती जाग्या झाल्या. डावीकडुन पुढे जाणारा रस्ता सुनीतीच्या मावशीच्या घरी जातो हे शामने ओळखलं. वंदना आणि मुलगी प्रभात कोल्ड्रिंक मध्ये शिरल्या... शामची नजर अशोक बागवेच्या टपरीकडे वळली. शाम टपरीत शिरला. आत प्लास्टिकची टेबल खुर्च्याआणि खाद्य पदार्थांच्या बरण्या एवढाच माफक बदल झालेला... समोर गल्ल्यावर बसलेला,टक्कल पडलेला, गालफडं बसलेला अशोक बागवे शामने अचूक ओळखला. अशोक भिसेसराना ओळखणं शक्यच नव्हतं. भिसेसरानी कॉफीची ऑर्डर दिली.

          “कायहो ऽऽ हा उजवीकडचा रस्ता भगवानगडवरून कणकवलीला जातो ना?” अशोक बागवेनी मुंडी हालवली. “तिथे जांभळीच्या साण्यावर तो डाक बंगला नी देवराई आहे ना?” दाढी खाजवीत अशोक म्हणाला, “आसा आसा. पन मदी जोऊळ झाला. डाक बंगलो कोसाळलो. देवराई लय वाडली." समोरचा कॉफीचा कप उचलीत उत्साहाने भिसेसर म्हणाले, “तो स्पॉट फारचसुंदर आहे. समोर निळाशार समुद्र, हिरवीगार वनराई, पर्यटक जात असतील ना तिथे?”त्यावर 'च्यक च्यक' असा आवाज काढीत अशोक बोलला, “छ्या! थयसर कोण्ण्येक जायत नाय. आसा काय थय. पानी दुकु भेटनार नाय थयसर... आनी दुसरा म्हनशात तर ती जागापन बादिक म्हनान गावातले लोकाव जायत नाय थंय.” अचंबित होत भिसेसरानी विचारलं, “कां.. कां बरं? काय बाधिक आहे तिथे?”

         दीर्घ उसासा सोडीत अशोक म्हणाला, “काय सांगा तुमका सायब भगवानगडात देवळ्याची पोरगी व्हती... तेचो प्रेम झालो हायस्कुलतल्या मास्तराबरोबर... तेका बँकेत मोट्या पगाराची नोकरी गावली म्हनान हायसकूलतली नोकरी सोडुन ग्येलो तो. पन जाताना लगीन करूचा वचन दिला त्याने पोरगीक... पोरगी मास्तराचा मागणा येयत म्हनान वाट बगायची.फुडे त्या मास्तराचा लगीन झाला... तेच्या लग्नाची पत्रिका इली मग मातर पोरगी भयाभित झाली. जेवीना खायना. तेचा डोका फिरल्यासारका झाला. सकाळी उजाडला काय पोरगीमास्तराची वाट बगुक जांभळीच्या साण्यावर जावन दिवसभर बसायाची नी एक दिवस थयच गळफास लावन मेली ती. अमवाशे पूर्णिमीक थयसर फिरताना दिसता आजुन.” कॉफीचा घोट घेता घेता भिसेसराना जोरकस ठसका लागला. लगबगीने पुढे येऊन त्यांच्या पाठीवर थोपटीत अशोक म्हणाला, “बेतान ऽऽ बेतान सायब वयच पानी प्या बगु.”

                       ************