The Lord Himself said in Marathi Classic Stories by श्रीराम विनायक काळे books and stories PDF | स्वयं भगवान उवाच

Featured Books
  • ફરે તે ફરફરે - 67

    ફરે તે ફરફરે - ૬૭   હું  મારા ધરવાળા સાથે આંખ મિલા...

  • રાય કરણ ઘેલો - ભાગ 16

    ૧૬ પૃથ્વીદેવ   અરધી રાત થઇ ત્યાં ઉદા મહેતાના પ્રખ્યાત વ...

  • એઠો ગોળ

    એઠો ગોળ धेनुं धीराः सूनृतां वाचमाहुः, यथा धेनु सहस्त्रेषु वत...

  • પહેલી નજર નો પ્રેમ!!

    સવાર નો સમય! જે.કે. માર્ટસવાર નો સમય હોવા થી માર્ટ માં ગણતરી...

  • એક મર્ડર

    'ઓગણીસ તારીખે તારી અને આકાશની વચ્ચે રાણકી વાવમાં ઝઘડો થય...

Categories
Share

स्वयं भगवान उवाच

स्वयं भगवान उवाच

तीक्ष्ण नजरेने सावज हेरीत, सावध पावले टाकीत व्याध फिरत होता. बाणाच्या पल्ल्याबाहेर एका प्रचंड वृक्षाच्या बुंध्याआडून मृगाचे मुख दिसताच व्याध थांबला. थोडा वेळ वाट पाहूनही मृग पुढे येण्याचे चिन्ह दिसेना. व्याध दबकत-दबकत मृगाच्या दिशेने पुढे निघाला. लक्ष्य बाणाच्या टप्यात येताच तो थांबला. मनमुराद चरुन तृप्त झालेला तो मृग वृक्षतळी बसून रवंथ करीत असावा, या गोष्टीचा अंदाज व्याधाला आला. आता वेळ घालवून चालणार नाही. मृग पुढे येईल अन् त्याच्या हृदयाचा वेध घेता येईल ही शक्यताच आता संभवत नव्हती. व्याधाने पाठीवरच्या भात्यातून एक विषमुख बाण काढून धनुष्यावर सिद्ध केला. मृग मुखाचा अचूक वेध घेत त्याने प्रत्यंचा आकर्ण खेचली. धनुष्यातून बाण सुटणार एवढयात गर्द वृक्षराजीत लपलेल्या कुणा बलशाली वानराचा काळीज थरकवणारा बुभुःक्कार निनादला. आयुष्यभर मृगया केलेल्या त्या व्याधावर मात्र त्या भीषण बुभुःक्कराचा यत्किंचितही परिणाम झाला नाही. त्याचे चित्त विचलित झाले नाही. प्रचंड वेगाने सरसरत गेलेल्या बाणाने लक्ष्याचा अचूक वेध घेतला. अन्...
हृदय विंधित जाणारी आर्त मानवी किंकाळी कानावर आली. बाणाचा नेम चुकून, अरण्यात फिरणाऱ्या कुणा मानवाचा वेध त्याने घेतला असेल हे संभवत नव्हते. वृक्षाआड दिसले ते खात्रीने मृगमुख आहे याविषयी शंका नव्हती. मग आर्त मानवी किंकाळी कशी काय ऐकू आली? की लक्ष्यवेध झालेला मृग एखादा मानवी राक्षस तर नसेल? खूप वर्षांपूर्वी प्रभू रामांनी असाच सुवर्णमृगाचा वेध घेतला होता पण प्रत्यक्षात तो सुवर्णमृग नसून कुणी मायावी राक्षस होता म्हणे... तसे तर नसेल? घाबरलेला व्याध झटकन जवळच्या गर्द झुडुपात शिरुन तिथेच मुरुन राहिला. खरा काय प्रकार आहे, याचा उलगडा होईपर्यंत गप्प राहावयाचे असा निर्णय त्याने घेतला.
धप्पकन उडी मारुन श्रीकृष्णाच्या सन्मुख उभा राहत दोन्ही कर जोडून मारुतीरायाने आर्त साद घातली, "प्रभूऽ” वेदना सहन करण्यासाठी दंतपंक्तींमध्ये अधरोष्ठ घट्ट दाबून धरलेल्या प्रभूनीं नेत्र उघडले. पायात रुतलेला बाण खेचून काढण्यासाठी सिद्ध झालेल्या हनुमंताला कृष्णाने दक्षिण हस्त उंचावित 'थांब' अशी खूण केली. "प्रभूऽऽ हा बाण विषयुक्त आहे. हा वेळीच काढून काही वनौषधी जखमेवर लावायला हव्यात. नाहीतर..." परिणामांचे कथन करण्याचे धाडसही न झालेल्या त्या कपिश्रेष्ठाच्या नेत्रातून टप् टप् अश्रुबिंदू ओघळले. शांत स्वरात कृष्ण उद्गारले, “हे बलभीमा! त्या बाणाला आपले काम करु द्या. तुमच्या उपचारांनी कदाचित या वेळी काळ विन्मुचा माघारी जाईलही. पण रामभक्ता.... माझे प्रारब्ध, गांधारी मातेचा शाप, सारे काही अटळ आहे. सांप्रतच्या प्रसंगापेक्षाही भीषण रुप धारण करुन ते माझ्या जीवनात समोर ठाकेल. मला काही तुझ्यासारखे चिरंजीवित्व लाभलेले नाही."
"यादवराया, गीता सांगणाऱ्या विश्वपालकाच्या मुखी ही भाषा शोभत नाही. जनन-मरण या कल्पना तुम्हासारख्या सर्वेषांच्या बाबतीत सापेक्षच असतात नाही का? आणि प्रारब्ध ते तर तुमच्याच हाती असते. तरीही प्रभुऽऽ हा विषयुक्त बाण धारण करुन पंचतत्त्वरुप देहाला आपण का बरे पीडा देता? बाणाच्या वेदना दूर करावयाची उपाययोजना मला करु द्या, प्रभु, किंवा काही अद्भुत लीला दाखविण्याचा आपली चतुर योजना तर नाही ना? रामरुपा, मला तर असेच वाटत आहे कारण आपले संपूर्ण जीवनच अशा अद्भुत लीलांनी भरलेले आहे."
हनुमंताच्या कथनावर कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करणे टाळून श्रीकृष्णानी फक्त क्षीण स्मित केले. "रामभक्ता, एका महान युगाचा अस्त पाहणारा तू खरोखरच भाग्यवंत आहेस. तुझी नम्रता, तुझे मार्दव केवळ अतुलनीय आहे. प्रारब्ध माझ्या हाती असते, ईच्छेनुसार ते बदलता आले असते तर... आंजनेयाऽऽ, अर्जुनाला कार्यप्रवण करण्यासाठी सारे कौशल्य पणाला लावून गीतेचे बोधामृत पाजायची तरी काय गरज होती? दुष्टमती कौरवांची युद्धपिपासू वृत्ती नसती का बदलता आली... अन् मग कौरवांचा निःपात झाला म्हणून गांधारी मातेने उच्चारलेली ती महाभयंकर शापवाणी तरी टळली असती. इतके दूर तरी कशाला जा... नुकताच माझ्या डोळ्यांसमोर घडलेला यादववीरांचा संहार... तो तरी मी कशाला घडू दिला असता? लोकनाथा, माझे नावच कृष्ण असल्यामुळे अगदी दूरान्वयानेही ज्या घटनेशी माझा संबंध पोचतो ती प्रत्येक घटना कृष्णालीलाच ठरावी यात आश्चर्य ते कसले?"
"यदुराया, वंदन असो." अकस्मात अवतीर्ण झालेले वेदव्यास म्हणाले, “गोपसख्या, नुकत्याच घडलेल्या या घटनेमुळे हिमगिरीवर समाधिस्थ असता मला जागृती आली. तुझे चरित्र, तुझ्या लीला जनसामान्यांना प्रेरणादायी ठराव्यात अशा आहेत. कुरुक्षेत्रावर घडलेला तो घनघोर संग्राम, तू कथन केलेली मानवी धर्माची सारस्वरुप गीता... हे सारे काही शब्दबद्ध करण्याच्या मनस्वी प्रेरणेमुळे मी समाधिस्थ होऊन चिंतन करीत होतो. काही काही घटनांमागील कार्यकारणभाव आकलन करण्यास माझी अल्पमती अपुरी पडली. त्यांचे निराकरण प्रत्यक्ष तुमच्याकडून करुन घ्यावे असे मी योजिले होते. तथापि इतक्या अकल्पितपणे आपला अवतार समाप्त होईल अशी शंकासुद्धा मला आली नव्हती. एवढ्यातच काही क्षणांपूर्वी घडलेल्या घटनेमुळे मी विचलित झालो. आपली भेट झाली नाही तर, माझ्या नियोजित कार्यात न्यून राहील म्हणून मधुसूदना, या अवघड क्षणी आपल्याला कष्ट देण्याचे पातक माझ्या हातून घडत आहे. यदुवरा क्षमा करा."
व्यासांचे कथन ऐकून भयग्रस्त झालेला हनुमान म्हणाला, "महर्षी अवचितपणे समाधिभंग झाल्यामुळे आपले भान हरपले असावे यदुवंशीयांचा पूर्णपणे नाश झाला आहे बलरामाचीही अवतार समाप्ती झाली आहे, सिंधुसागरात उभारलेली द्वारका तो ग्रासू पाहत आहे, अशा अवघड परिस्थितीत व्दारकास्थित नारीवर्ग, बालके यांना अनाथ करुन देहत्याग करण्याएवढे प्रभू श्रीकृष्ण खचितच निष्ठूर नाहीत. कोणा व्याधाने चुकून सोडलेल्या विषयुक्त बाणाचे निमित्त होऊन मृत्यू यावा एवढे कृष्णाचे सामर्थ्य दुर्बल-क्षीण कसे बरे होईल? या नटखट भुलभुलय्याच्या लीला का तुम्हांला ज्ञात नाहीत? महर्षी! कृष्णलीलांचे एक नवे गारुड पाहण्याचे भाग्य आज आम्हांस लाभत आहे. पूतनावध, कंस दर्पशमन, विचक्रदहन, त्रिपुरासुर दमन, गोवर्धन उच्चाटन, हंसडिंभक निर्दालन अशा किती कृष्णलीला वर्णाव्या? हा सर्वसाक्षी परमात्मा एका यःकश्चित बाणाने मृत होईल अशी शक्यता तरी आपण गृहीत कशी धरलीत या गोष्टीचे मला अतीव आश्चर्य वाटत आहे."
हनुमंताच्या कथनाने प्रसन्नचित्त झालेल्या कृष्णांना वंदनांचा क्षणकाल विसर पडून त्यांनी मंद हास्य केले. "का हसलास रे, माधवा?" व्यासांनी पृच्छा केली. "ब्रह्मर्षी... हनुमंतासारख्या त्रिकालज्ञानी चिरंजिवाने असे बालिश तर्कट रचले तर हसू नये तर करावे तरी काय? प्रभु श्रीरामांसारख्या अवतारी पुरुषात्तमांचा अंत पाहिलेला हा बुद्धिमंत! कृष्णपर्व कधीतरी संपणार एवढा साधा-सोपा विचारही याला सुचू नये...? अरे कपिश्रेष्ठा, एका अतिसामान्य गोपबालाला देवदेवतांच्या पंक्तीत बसविण्याचा तुझा खटाटोप व्यर्थ आहे. माझ्या पावलाचा वेध घेणारा हा विषबाण तू काय सामान्य समजलास? साक्षात बादरायणांची वाणी मिथ्या होईल अशी शंका तरी तुला कशी यावी? गांधारी मातेचा शाप तो काय व्यर्थ होईल? यदुवंशीयांचा निःपात, बलरामांची अवतार समाप्ती या घटना काय सुचवतात...?"
प्रसन्न हास्य करीत हनुमंत उद्गारला, "सर्वेश्वरा, तुझ्या चेष्टा का या मर्कटाला ज्ञात नाहीत? बंदिशालेत तुझा जन्म झाला त्याचवेळी प्रभुरामांचा नव्याने अवतार झाल्याचे संवेदन मला झाले. त्यानंतरचे तुझे कार्य, धर्मप्रस्थापनेची तुझी तळमळ ही का मला ज्ञात नाही? तुझ्या प्रत्येक कृतीत तुझ्या अलौकिकत्वाचे दर्शन मला झाले. तुझ्या प्रत्येक लीलेमध्ये मला प्रभुरामांचा साक्षात्कार झाला. किंकर्तव्य विमूढ पार्थाला युद्धप्रवण करण्यासाठी तू उपदेशिलेली गीतास्त्रस्त्र.! अरे रामराया... अर्जुना एवढाच तादात्म्य पावून मी सुद्धा तिचे श्रवण केले आहे. 'परित्राणाय साधुनां' या वचनात तर आपल्या अवतारकार्याची स्पष्ट कबुलीच राघवाऽऽ तू दिलीस. आता या प्रसंगी जी लीला तुम्ही दाखवू इच्छिता ती पाहण्याचे भाग्य कदाचित माझ्या भाळी नसेलही. तसे असेल तर यदुराया स्पष्ट सांग! मी क्षणार्धात इथून अदृष्य होतो पण माझी दिशाभूल करुन माझी वंचना तुम्ही करु पाहत असाल तर कृष्णराया, तुम्हाला पुरुन उरण्याएवढा हा कपी खचितच नटखट आहे."
मारुतीच्या कथनातून होणारी निःस्सीम भक्ती जाणवलेले व्यासही विचलित झाले. दुःखार्त स्वरात ते उद्गारले, "रामदूता! तुझी ही ईशनिष्ठा पाहता यापुढे तुझा उल्लेख श्रेष्ठ वैष्णव म्हणून होवो! तू पुण्यवंत आहेस म्हणूनच योगेश्वरांचे अंत्यदर्शन घेण्याचे भाग्य तुला लाभले आहे. एका अर्थाने ही कृष्णलीलाच आहे. कपिवरा, व्दापारयुगाचा अंत आता समीप आला आहे. हा गोपाल अंशावतार आहे हे तुझे कथन सत्य आहे. तरीही अवतार समाप्ती ही सुद्धा स्वाभाविकच नव्हे काय? एका यःकश्चित व्याधाने सोडलेल्या ह्या बाणाला हे श्रेय मिळावे यामागे काहीतरी खास कार्यकारणभाव असावा. तसे असेल तर माधवा त्याचे स्पष्टीकरण तूच कर!" रक्तस्त्रावाने क्लांत झालेल्या कृष्णांच्या नेत्रांवर महानिद्रेची झापड येऊ लागलेली दिसताच व्यासांनी आपल्या कमंडलूतील जलाचे सिंचन कृष्णाच्या मुखावर केले.
"हे चिरंजीवांनो... मी पुनश्च एकदा पूर्वकथित वाक्य दुरुक्त करीत आहे. मी एक अतिसामान्य गोपालक आहे. देवत्वाचा अंशही या कृष्णाकडे नाही. या व्दापार युगामध्ये असुरनिर्दालन कार्य करणारा मी काही एकटाच वीर नाही. भीमार्जुन, बलराम किती नावे घ्यावीत? सामान्य गोपालांमध्ये मी वाढलो तरीही अस्त्रविद्या, शस्त्रविद्या यांचे ज्ञान मी प्राप्त केले. धनुष्यबाण, खड्ङ्ग, गदा, परिघ, शूल यांच्यापेक्षाही दिव्य असे चक्र मी सिद्ध केले, हे सत्य आहे. त्याच्यायोगे उदंड राक्षसांचा वध, जो अन्य अस्त्रशस्त्रांनी संभवत नव्हता तो मी चक्राने केला. काही प्रसंगी प्रतिस्पर्ध्याला हतबल करण्यासाठी, त्याच्यावर प्रभाव टाकण्यासाठी मी साक्षात ईश्वर आहे असे कथनही केले. मात्र ते केवळ लाक्षणिक अर्थानेच घ्यावयाचे आहे. त्यामुळेच कदाचित माझ्या पराक्रमांना तुम्ही दैवीसामर्थ्याचे परिमाण देत असाल. कपिश्रेष्ठा, ज्या गीतेचा दाखला तू देतोस ती गीता म्हणजे गुरु सांदिपनींच्या मुखातून श्रवण केलेल्या श्रेष्ठ धर्मतत्त्वांचे प्रक्षिप्त रुपच आहे आणि कपिवरा... तो उपदेश मी मोहपाशात गुंतलेल्या मूढ अर्जुनाला केला, तुला नव्हे! "
"मायामोहाच्या अतिआहारी जाऊन पार्थाचा सारासार विवेकच नष्ट झाला. लाक्षागृह दहन, द्रौपदीची विटंबना, वनवास, अज्ञातवास किती प्रसंग वर्णावेत? अधमाधम दुर्योधनादी कौरवांचे अनन्वित अत्याचार सहन करुनही ऐन युद्धप्रसंगी पार्थाचे बंधुप्रेम उफाळून आले. केवळ षंढाला शोभावे असे त्याचे भीरुतापूर्ण कथन ऐकून मला अती क्रोध आला. धर्माचे केवळ सार मी जाणिले आहे. तरीही दुराचाराचे प्राबल्य होणार या शंकेने माझे हृदय व्याकुळ झाले. माझ्याकडे काही दैवी सामर्थ्य असते, विधिलिखित बदलण्याएवढे कर्तेपण माझ्याकडे असते, तर हे चिरंजीवांनो षंढ अर्जुनासह साऱ्या कौरवसेनेला मी त्याच क्षणी भस्मसात केले असते. पार्थाची मनधरणी करण्याचे सव्यापसव्य मी खचितच केले नसते."
“अवघड कसोटीच्या त्या क्षणी सारे विश्वच जणू माझ्याभोवती गरगर फिरु लागले. उदंड पाशवी वृत्ती माझ्याकडे पाहून खदखदा हसत आहेत असे मला वाटू लागले. हतवीर्य झालेल्या पार्थाला केवळ त्याच्या क्षात्रसुलभ कर्तव्याची जाणीव करुन देणे पुरेसे होणार नव्हते. त्याच्या प्रत्येक भ्रांतीचे खंडन धर्माचरणी अर्जुनाला केवळ धर्मतत्त्वांच्या आधारे केले तरच पटले असते. हे मला पुरते उमगले. माझ्या प्रगल्भ बुद्धितेजाचा अभिमान त्या क्षणी गळून पडला. महर्षी... प्रगाढ शिष्योत्तमापेक्षा मूढमती अनुयायी पत्करला असे म्हणण्याची पाळी माझ्यावर आली. माझ्या शर्करावगुंठित उपदेशरुप गुटिका कंठात उतरल्या तरीही अर्जुनांचे मनोमालिन्य पूर्णांशाने दूर झाले नव्हते याचे प्रत्यंतर युद्धसमाप्तीपर्यंत मला सातत्याने येत राहिले. माझ्या विद्वत्प्रचुर शब्दांनी अर्जुन संमोहित झाला. श्रवणाने ज्ञात झालेली श्रेष्ठ मानवी मूल्ये मी माझ्या खास शैलीत अशी काही वर्णने केली आहेत की, माझ्या बुद्धिवैभवाने अर्जुन दिपून गेला. गीतेमध्ये माझे शब्दलाघव जरुर आहेत, माझे अनुभवसिद्ध तत्त्वज्ञानही आहे. परंतु हे चिरंजीवांनो, मी प्रतिपादिलेली शाश्वत मूल्ये हे माझे चिंतन आहे असे सांगण्याएवढा मी अहंकारी नाही. मी धर्मरक्षक जरुर आहे पण मानवी जीवनधर्माची मूल्ये सिद्ध करण्याएवढा द्रष्टा मी नाही."
“केशवा, तुझ्या विनयाला खरोखरच तोड नाही. तरीही तुझ्या चरीत्रातील काही अद्भुते अनुत्तरित राहतातच. शिशुपालवध, द्रौपदीवस्त्रहरण प्रसंगी तुझे सहाय्य हे का निसर्गाचे गारूड मानावे? अन् विश्वरूपदर्शन? माधवा, या घटनांची कोणती कारणमीमांसा तू देशील?" वेदव्यासांच्या या पृच्छेला हनुमंतानेही पुस्ती जोडली. "आणि पुरूषोत्तमा बालवयात तू गोवर्धन पर्वत करांगुलीवर धारण केला होतास, अन् तुझ्या सुदर्शनचक्राचे दिव्य तेज... त्याचे विस्मरण कसे करावे?" मंद हसत कृष्ण उत्तरले, “कपिश्रेष्ठा, अगोदर तुझ्या पृच्छेचे समर्थन देतो. बालवयात आम्ही गोपबाल गाईगुरांची खिल्लारे घेऊन वनात जात असू. माझ्या वृत्ती तर मर्कटांशी जुळणाऱ्या होत्या अन् अद्यापही आहेत. गोपालनाचे कंटाळवाणे काम मोठया चातुर्याने सवंगड्यांवर सोपवून मी रानोमाळ भटकत राहायचो."
"त्या भटकंतीतच गर्द वृक्षराजीच्या आड पर्वताच्या पायथ्याशी असलेले भू-अंतर्गत विवर माझ्या दृष्टोत्पत्तीस आले. अतिवृष्टी होत असताना अकस्मात मला त्या पर्वतस्थित विवराची आठवण झाली. मेघांच्या कर्णकर्कश गर्जना आणि विजांचे थैमान यामुळे नखशिखांत हादरलेले माझे सवंगडी! आपण काय करीत आहोत, कुठे जात आहोत याचे भानही त्यांना उरले नाही. त्या विवरामध्ये सुरक्षित निवारा मिळाला तरीही त्यांची भीती कमी होईना, कारण मी माझ्या सामर्थ्याने गोवर्धन उचलून माझ्या करांगुलीवर तोलून धरला आहे असे कथन केले होते. मला सहाय्य करण्यासाठी माझ्या सवंगड्यांनी आपल्या हातातील काठ्यांनी आधार दिला. त्या प्रलयंकारी पर्जन्यामुळे पर्वतावरून वाहणाऱ्या जलप्रपातांनी अनेक शिलाखंड आणि मृत्तिकांच्या राशी विवराच्या मुखाशी साचविल्या. कपिवरा, पर्जन्य थांबल्यावर विवराच्या मुखातून आम्ही कसेतरी बाहेर पडलो पण त्यानंतर मात्र विवराचे मुख पूर्णपणे गाडले गेले, अन् प्रवेशमार्ग बंद झाला मेघांच्या कर्णकर्कश गर्जना आणि विजांचे थैमान यामुळे नखशिखांत हादरलेले माझे सवंगडी! त्यानाही वास्तवाचे भान नव्हते."
“प्रचलित शस्त्रांमध्ये चक्र अदभुत आहे हे खरेच. इतर कोणतेही शस्त्र वीराच्या हातातून सुटले की, त्याचा त्यावरील ताबा सुटतो. उलट सुदर्शनचक्र कार्य पूर्ण झाल्यावर पुन्हा फेकणाऱ्याकडे माघारी येते. चक्राचे वजन, त्याचे तीक्ष्ण दात, चक्राची फेक आणि हवेतून अद्भूत ध्वनी काढीत गरगरत त्याने केलेला लक्ष्यवेध! कोणताही वीर अचंबित व्हावा अशीच ही किमया आहे. पुराणकथा श्रवणातून मला चक्र सिद्ध करावयाची स्फूर्ती मिळाली. माझ्या आयुष्याचे ध्येय मानून मी ते सिद्ध केले. त्याचा कौशल्याने वापर करण्यावर प्रभुत्व मी मिळविले. शस्त्रबलापेक्षाही पराक्रमाला अद्भुताची जोड दिली तर सामान्य मनुष्य चटकन वश होतो. मग शस्त्रवापर करण्याची गरज उरत नाही, हे मी अनुभवाने जाणले. सामर्थ्याचा प्रत्यक्ष वापर करुन नरसंहार करण्यापेक्षा त्याचा नुसता धाक निर्माण करुन प्रतिस्पर्ध्याला गलितगात्र करावयाचे ही माझी नीती आहे. ही नीती एवढी यशस्वी झाली की, दुर्याधनासारख्या दुर्मती वीराने सुद्धा मला उघड-उघड विरोध करण्याचे धारिष्ट्य दाखवले नाही."
"बादरायण! वस्त्रहरणामध्येही माझी कसलीही अद्भुत किमया नाही. द्यूतप्रसंगी मी उपस्थित असतो तर मात्र पुढचा अनर्थ टळला असता. मी द्यूत निपुण नाही. तरीही कपटद्यूतामध्ये शकुनीला हार पत्करायला लावण्याचे कौशल्य माझ्याकडे खचितच होते. फाशांचे वजन, त्याच्यावरील चिन्हे यांचे अचूक अवलोकन करुन इष्ट दान मिळण्यासाठी ते कोणत्या प्रकारे टाकले पाहिजेत हे मी चुटकीसरशी अवगत केले असते. सुदर्शनचक्र फेक करण्यामधले माझे कौशल्य द्यूतामध्ये वापरुन मी शकुनीला हार पत्करायला लावली असती पण वस्त्रहरण प्रसंगातून द्रौपदी बचावली ती केवळ तिच्या पातिव्रत्याच्या तेजाने! सभास्थित दुर्योधन, कर्ण, दुःशासन हे दुरात्मे वगळता अन्य वीरांनी तर नेत्र मिटूनच घेतले होते."
"भरसभेमध्ये कटीवस्त्राच्या निरीला त्या अधमाने स्पर्श करताच द्रौपदीच्या नेत्रामध्ये खदिरांगार जागृत झाला. तिच्या नेत्रकटाक्षामुळे ते दुष्ट अक्षरशः दिपून गेले. अन् मग आपण एकामागून एक अशी तिची वस्त्रे सोडीत आहोत असा आभास दुःशासनाच्या मनात निर्माण झाला. पतिव्रता अनसूयेच्या नेत्रसामर्थ्याने महाप्रतापी देवतांनी जिथे मदनाचा त्याग करुन बालवृत्ती धारण केली तिथे दुःशासनाचा काय पाड? कपिश्रेष्ठा, मोठ्या वल्गना करणारा तो लंकेश! पण ताब्यात आलेल्या सीतामाईला स्पर्शही करण्याचे धारिष्ट्य त्याला होऊ नये एवढे पातिव्रत्याचे तेज दाहक असते. द्रौपदीचे चारित्र्य, तिचे पातिव्रत्य अनसूया, मैथिली यांच्याच तोडीचे आहे. अर्थात एक गोष्ट मात्र निर्विवाद सत्य आहे. त्या अवघड क्षणी, याज्ञसेनीला माझ्या स्मरणामुळे धैर्य आले, तिचे मनोबल वाढले, पण त्याचे श्रेय मी कसे घेऊ? रामनाम लिहिलेली शिला सागरात तरंगली पण साक्षात रामांनी स्वहस्ते टाकलेली शिला मात्र बुडाली. या घटनेमागे श्रद्धा-निष्ठा यांचे जे अधिष्ठान आहे; तेच परिमाण द्रौपदी वस्त्रहरणाला लावणे अधिक संयुक्तिक ठरावे."
"माझ्या विश्वरुप दर्शनामध्येही सामान्य मतीला न उलघडणारे असेच रहस्य आहे. श्रेष्ठ हो, पार्थाची कर्तव्यपराङ्मुखता हा सद्धर्माचा, सद्वर्तनाचा पराभव होता. तो कृष्णनीतीचा पराभव ठरला असता. मी स्वतः युद्धपिपासु नाही; परंतु अधर्मचरणाने सत्ता काबूत ठेवणाऱ्या कौवरवांना नष्ट करणे हा शेवटचा आणि एकमेव पर्याय होता. हे चिरंजीवांनो! धर्म ही विचारप्रणाली म्हणजे एक श्रेष्ठ नीती आहे. प्रदीर्घ वैचारिक मंथनातून द्रष्ट्यांनी साध्य केलेले ते नवनीत आहे. सश्रद्ध, सुसंस्कारित मनुष्य सहसा धर्मसंकेतांचे उल्लंघन करु धजावत नाही तो त्यामुळेच! त्या अवघड क्षणी हे रहस्य माझ्या अंतर्मनात उलगडले. धर्मनिष्ठ पार्थाला त्याची युद्ध पराङ्‌मुखता ही धर्माची पायमल्ली आहे, उलट युद्धप्रवणता हा श्रेष्ठ धर्म आहे याची जाणीव करुन द्यायला हवी हे मी अचूक ओळखले!"
"वेदव्यास, मी मनःपूर्वक कबुली देत आहे. पार्थाला युद्धप्रवण करण्यासाठी मला माझ्या विचारमंथनातून स्फुरलेली घटिते मी निःशंक मनाने श्रेष्ठ धर्ममूल्ये म्हणून प्रतिपादिली. कदाचित वेदप्रणीत धर्माची ती व्यवच्छेदक लक्षणे असतीलही. धर्म जर धारण करणारा असेल, ती मानवाची श्रेष्ठ जीवनप्रणाली असेल तर, जीवनाच्या विविध टप्यांमध्ये अचूक दिशादर्शन होईल असे अर्थनिष्कासन माणसाने केले पाहिजे. केवळ या आणि एवढ्याच तर्काच्या आधारे मी स्वानुभवाने ठरविलेली नीती जी जीवनाभिमुख आहे, तीच धर्मसंकेत म्हणून पार्थाला विषद केली. परंतु धर्मतत्त्वांचे सखोल ज्ञान श्रवण, अध्ययन यांद्वारे मी पूर्वी कधीही केले नव्हते. वेदांचे समग्र वाचन करण्याएवढे स्थैर्य आणि अवधी तरी मला कुठे मिळावा?"
"हे महात्म्यांनो, हा माझा विनय नव्हे. त्याचप्रमाणे श्रेष्ठ धर्मतत्त्वांचा अपलाप करण्याचा प्रमादही मी केला नाही. 'सम्यक संकलजः कामो' हा धर्माधारच आहे. माझ्या सगळ्या जाणीवा माझ्या वाणीमध्ये एकवटल्यामुळे असेल, कदाचित कथनामागे असलेला माझा सम्यक् संकल्प कारणीभूत झाला असेल. पण माझ्या कथनाचा ईष्ट परिणाम पार्थावर होत आहे हे लक्षात येताच माझा आत्मविश्वास दुणावला. माझ्या कथनाशी पार्थ एवढा तद्रूप झाला की, माझ्या कथनानुसार अपेक्षित दृश्य त्याच्या अंतःचक्षूना स्पष्ट दिसू लागले. हे बुद्धिमंतांनो, ही तर मानसशास्त्राची किमया आहे; ही संमोहनावस्था आहे. माझ्या विश्वरुपदर्शनामागचे रहस्य हेच होते. श्रेष्ठ हो! रणांगणास्थित शत्रूचा निःपात एकट्याने करण्याएवढे सामर्थ्य माझ्याकडे असते तर गीता सांगण्याचा, कुटिल नीतीने भल्याबुऱ्या मार्गांचा अवलंब करुन विजय प्राप्त करण्याचा कालापव्यय करणारा उपद्व्याप मी कशाला केला असता?"
प्रदीर्घ कथनाने थकलेल्या श्रीकृष्णांनी मागे रेलत आपले मस्तक वृक्षराजाच्या बुंध्यावर टेकीत क्षणभर नेत्र मिटून घेतले. थोडावेळ कुणीच काही बोलले नाही. किंचित विश्रामानंतर कृष्णानी नेत्र उगडले अन् हनुमंत बोलू लागला, "हे यदुराया, तुझे आत्मकथन ऐकून काही शंकांचे परिमार्जन झाले. तथापि आपली अनुमती असेल तर थोडी पृच्छा करावी म्हणतो." कृष्ण उतरले, “अवश्य विचार, कपिश्रेष्ठा, तू तर चिरंजीव आहेस. भविष्यात कृष्णचरित्राविषयी काही शंका उपस्थित झाल्या तर त्यांचे निरसन तू करु शकशील. तसेच तुझे शंका निरसन करताना व्यासांच्या मनातील काही विकल्पांचेही निराकरण संभवते".
"पुरुषोत्तमा! प्रभुरामांचे एकपत्नीव्रत पाहता तुला वाटणारी स्त्री सहवासाची ओढ. तुझा नारीवर्ग आणि त्यांच्यासमवेत चाललेली तुझी कामचेष्टिते...एकाच वेळी अनेक स्त्रियांशी रत होण्यामध्ये तुला अससलेले स्वारस्य... प्रभु क्षमा करा पण तुमच्या चरित्रातील हे पर्व मला सतत खटकत राहिले आहे." हनुमंताने स्पष्ट शब्दांत आपली नाराजी व्यक्त केली. सस्मित मुद्रेने कृष्ण उद्गारले, “अरे ब्रह्मचारी कपिश्रेष्ठा! माझ्या या लीलांविषयी तुझ्याच काय पण बहुत जनांच्या मनात बहुत विकल्प असावेत. तू स्वतः निर्लेप आहेस म्हणून स्पष्टपणे पृच्छा करण्याचे धाडस तू केलेस एवढेच!" श्रीकृष्णांनी व्यासांकडे नेत्रकटाक्ष टाकताच वेदव्यास अधोमुख होऊन वामपादाच्या अंगुष्ठाने भूमी उकरु लागले. “हे ब्रह्मचारीन्! तुझी पृच्छा अर्धवट आहे. अनेक स्त्रियांशी रत होऊनही मी स्वतःला ब्रह्मचारी म्हणविण्याचे धारिष्ट्य कसे काय करतो? ही तुझी मूलगामी शंका आहे!"
"कपिवरा! नरदेहामध्ये अमंगल, अशुध्द घटक तर कायमच स्थित आहेत, मलमूत्र स्वेद, श्लेष्म, कफादि बाह्यात्कारी दिसणारे अमंगल घटक तर आहेतच पण शरीरांतर्गत स्थित असलेले दृष्टीला बाह्यात्कारी न दिसणारे कितीतरी अंतःस्त्राव शरीरांतर्गत स्थित आहेत. त्यांचे उच्चारण केले तरीही स्नानशुद्धीची प्रेरणा व्हावी. मनुष्याची चेतना असेपर्यंत हे अमंगल घटक त्याचे ठायी असतातच. किंबहुना मानवाची व्यवच्छेदक लक्षणे जी सांगितली आहेत त्यामध्येच त्यांचे स्थान आहे. तरीही देवकृत्याला आरंभ करताना षडंगन्यासाने केलेली बाह्यशुद्धी पुरेशी असते हा तर शास्त्रार्थ आहे ना? कपिवरा श्रद्धापूर्वक आवाहन करुन साक्षात परमनिधान समोर ठाकले असता अमंगल तत्त्व धारण करणाऱ्या मानवाचा स्वेदस्पर्श झालेले उपचार मांगल्य म्हणून स्वीकृत होतातच ना? हनुमंता, ब्रम्हचर्य ही सुद्धा अशीच मानसिक अवस्था आहे."
"हे कपिवरा! प्रजजनाची क्षमता नसलेल्या मानवाला नपुंसक-षंढ म्हणतात म्हणजे ब्रह्मचर्याची घमेंड किती निरर्थक आहे! परमोच्च आनंद, अतीव दुःख अथवा भीती अशावेळी नरजातीचे अल्प स्खलन होतेच! हा निसर्ग आहे. ब्रह्मचर्याची व्याख्या एवढी सवंग नाही. कंसवध करुन मी जगताचे अरिष्ट निवारण केले. त्याच्या बंदीवासात त्याच्या भोगदासी म्हणून खितपत पडलेल्या सहस्त्रावधी अबलांची मुक्तता मी केली. परंतु माझ्यासमोर कायमची आपत्ती निर्माण झाली. कंसाने भ्रष्ट केलेल्या त्या नारीसमूहाचे समाजात प्रतिष्ठापन करण्यासाठी एकही शास्त्राधार मला मिळाला नाही. स्वतःच्या ईच्छेविरुद्ध कंसाच्या भोगदासी बनलेल्या सहस्रावधी नारींनी आत्मनाश करावा हे समर्थनीय ठरले असते का?"
"मारुतीराया! त्या नारीजनानी त्यांचे भवितव्य माझ्यावर सोपविले. वेदव्यास..त्यांचे पुनर्वसन करावयाला धर्मनिष्ठ समाज मान्यता देणेच शक्य नव्हते. कंसाने भ्रष्ट केलेल्या त्या स्त्रियांचे पाणिग्रहण करण्याचे धाडस धर्मसंकेताविरुद्ध जाऊन मी दाखविले. त्यांनी न केलेल्या चुकीबद्दल त्यांचे जीवन हे शाप ठरावे ही गोष्ट माझ्या सदसद्विवेकबुद्धीला पटली नाही. म्हणून त्या सर्वांना माझे पत्नीपद बहाल करून नवे जीवनाभिमुख धर्मसंकेत मी रूढ केले. रामभक्ता निमित्त मात्र लोकोपवादापायी निष्कलंक चारित्र्य आणि पातिव्रत्य सिद्ध करणाऱ्या साध्वी सीतेचा त्याग प्रभुरामांनी केला. त्यानी आचरिलेला राजधर्म आणि अनाथ अबलांचे जीवन मंगलमय करण्यासाठी स्वतःचे चारित्र्य हनन सहन करणारा मी गोपबाल! मला उमगलेला जीवनधर्म... मारुतीराया, दोघांमध्ये श्रेष्ठ कोण ते तूच ठरव. प्रचलित संकेतांविरुद्ध मी घेतलेला निर्णय अयोग्य आहे याचे तरी समर्थन मात्र तू करू नयेस अशी माझी विनंती आहे. कारण सगळे धर्माधार त्याज्य ठरतात तेव्हा सम्यक् संकल्पानुसार निर्णय घेण्याची मुभा धर्मानेच दिलेली आहे."
"मी एक सामान्य गोपबाल! सहस्त्रावधी स्त्रियांचे पालन कसे करावे... त्यांचा योगक्षेम कसा चालवायचा? त्यांचे सरंक्षण कसे करावयाचे? अशा असंख्य समस्या माझ्यापुढे निर्माण झाल्या. बुरसट वृत्तीने धर्मशास्त्रांचा छळ करीत राहणाऱ्या धुरिणांचा संसर्ग अन् उपसर्गही पोहोचणार नाही अशी दुर्गम, समुद्रस्थित भूमी निवडून मी द्वारका वसविली. ती धनधान्याने समृद्ध केली. माझे निमित्त मात्र का होईना पत्नीपद भूषविणाऱ्या सहस्रावधी नारींना मी कशाचीही कमतरता भासू दिली नाही. हनुमंता, पत्नीविरहामुळे व्याकुळ झालेल्या प्रभुरामांची भग्नमनस्कता कुणालाही-अगदी तुलाही समजू शकेल. पण असंख्य पत्नींच्या नित्य सहवासामुळे मी भग्नमनस्क झालो असेन ही कल्पना तरी कुणी केली का? हनुमंता, विवाहामध्ये 'धर्मेच अर्थच कामेच नातिचरामी' अशी शपथ मी घेतली होती. सहस्त्रांच्या गणनेमध्ये असलेल्या माझ्या स्त्रियांची चिंता... त्यापायी स्त्रीसुख ही भावनाच माझ्या मनात उरली नाही. मात्र त्यांच्या शारीरिक, मानसिक, भावनिक गरजा पूर्ण करण्याचे दायित्व प्रचलित धर्मसंकेतांनुसार माझ्यावर होते. त्याच्या परिपूर्तीसाठी रासक्रीडा ही निष्काम कृष्णलीला माझ्या आयुष्याचा एक अविभाज्य घटक बनली. माझ्या सान्निध्याचे अल्प सुखही प्राप्त झाले नसते तर हनुमंता, त्या स्त्रिया व्यभिचार करायला प्रवृत्त झाल्या असत्या!"
"अंजनीसुता! कामेच्छा-भोगलालसा मला कधी स्पर्शही करु शकली नाही. भोग-शमन-तृप्ती हे सगळे शब्दप्रयोग केवळ मानसिकतेचे-प्रवृत्तीचे निदर्शक आहेत. हे ब्रम्हचारिन् त्या दृष्टीने पाहता कामशमन, वासनातृप्ती अथवा इंद्रियभोगांच्या आहारी जाऊन हा कृष्ण कधीही कामातुर झाला नाही. कृष्ण हा मातृपूजक आहे. मानवी जीवन व्यवहारात स्त्री हे सौख्याचे-शांतीचे परमनिधान आहे. गृहस्थधर्माचे यश तर निःसंशय स्त्रीच्या कर्तृत्वावर अवलंबून असते. स्त्रीचे दुराचरण, स्वैर वर्तन आणि तिचे पतन यासाठी दुरान्वयाने का होईना पण पुरुषच कारणीभूत असतो, हे त्रिकालबाधित सत्य होय. माता, भगिनी, कन्या आणि पत्नी ही स्त्रीची चार रुपे आहेत. हे आंजनेया, कृष्ण स्त्रीच्या पत्नीरुपाशी कधीच तादात्म्य पावू शकला नाही. म्हणून निरंतर स्त्रीसहवासात राहूनही मी निर्लेप राहू शकलो."
"रुक्मिणी-सत्यभामा यांच्याशी माझे विवाह म्हणजे माझ्या पतितोद्धाराच्या कार्याला मिळालेल्या समाजमान्यतेचे द्योत आहेत. तो माझ्या राजकारणाचा, समाजकारणाचा एक भाग आहे. माझ्या राण्यांना झालेली अपत्यप्राप्ती हा त्यांच्या दृष्टीने शरीरसुखाचा भाग असेल, पण माझ्यासाठी ते केवळ अपरिहार्य कर्तव्य होते. माझ्या पालनकर्त्या दूध मातेचाच नव्हे तर, तिच्या समवयस्क गोपींचा मी बाळ होतो. केवळ सुभद्रेचाच नव्हे तर, कोणतेही प्रत्यक्ष नातेसंबंध नसलेल्या कृष्णेचा मी बंधू आहे. मानववंशाच्या इतिहासात कामाच्या उन्नयनाचे असे एकही उदाहरण, आंजनेया, तुला खचितच सापडणार नाही. कृष्णाच्या बासरीचा ध्वनी उद्दीपक नव्हता तर विरेचक होता. त्या ध्वनीने देहभान हरपलेल्या माझ्या सहस्त्रावधी स्त्रीया कृष्णरुपाशी तादात्म्य पावू शकल्या. कृष्णाच्या कृति-उक्तीमध्ये विषयाचा अंशही नव्हता म्हणून कृष्ण उपस्थित असतानाही नारीसमूह निर्भयतेने मुक्तआचरण करु धजावत असे. हनुमंता, म्हणूच एकावेळी असंख्य स्त्रीयांशी रत होऊनही कृष्णाचे ब्रह्मचर्य भंग होऊ शकले नाही. आंजनेया, माझा एक सल्ला स्मरणात ठेव. युगधर्मानुसार बदलत जाणारे, स्वैराचरणाकडे झुकणारे मानवी वर्तन तू पाहत आहेस. मला अवतारी पुरुष मानूनही माझा स्त्रीसहवास तुला रुचला नाही. तरी हे कपिवरा, कलियुगामध्ये तू चुकूनही प्रकट होण्याचे धारिष्ट्य करु नकोस. त्यावेळचे प्रच्छन्न व्यवहार पाहता तुला चिरंजीवित्व हा शाप वाटेल!"
“प्रभु! तुमच्या कथनामुळे माझ्या मनातील विकल्प आता पूर्णपणे दूर झाले आहेत. एखाद्या व्यक्तीचा विशिष्ट वृत्तीमागचा हेतू संबंधित व्यक्तीच स्पष्ट करु शकते. इतरेजन मग ते कितीही बुद्धिमंत असोत, त्यांनी केलेले भाष्य हे केवळ तर्काच्या मार्यादित पातळीवर राहते हेच खरे!" हनुमंताच्या या कथनामुळे व्यासांच्या मनातील संकोचही दूर झाला. कृष्णचरित्राविषयी काही विकल्प आपल्या मनात राहू नये यास्तव निर्भीड पृच्छा करण्याचे धारिष्ट्य त्यांना प्राप्त झाले. "भगवंता! तुझ्या चरित्रातील रहस्ये आता उलगडत चालली आहेत. तुझे चरित्र हे जीवनाचे पथदर्शन ठरणारे आहे. म्हणून तुझ्या अगम्य जीवननिष्ठांचे स्वरुप तू विशद करावेस. कृष्णा, कौरव-पांडवांच्या युद्धाला तू धर्मयुद्ध म्हणतोस. परंतु भीष्म, द्रोण, कर्ण, दुर्योधन यांचा वध युद्धसंकेतांचा भंग करणारा आहे. धर्म-अधर्म यामधील तुला अभिप्रेत असलेला अर्थ तूच विशद करावास अशी विनंती मी करतो."
"व्यासमहर्षी! धर्माचे श्रेठत्व तो सवृत्तीचे वर्धन करतो की, दुष्प्रवृत्तींचे समर्थन करतो यावर निहित असते. युद्धारंभी स्वतःच्या कृतीबद्दल संदेह पार्थाच्या मनात निर्माण झाला. त्यामुळे त्याच्या शौर्याला मालिन्य आले. आपण राज्यतृष्णेपायी आपल्या बांधवांचा संहार करण्यासाठी युद्धप्रवृत्त झालो या आपल्या कृतीचे अतीव दुःख होऊन पार्थाचे शौर्य झाकोळून गेले. माझ्या उपदेशामुळे तो पुनश्च युद्धप्रवण झाला; तरीही त्याच्या शौर्यावर आलेले मनोमालिन्य अखेरपर्यंत अंशरुपाने कां होईंना शिल्लक राहिलेच! युद्धातील काही अपवादात्मक प्रसंग वगळता प्रतिस्पर्ध्यावर निर्णायक प्रहार करताना अर्जुनाचे शौर्य, तेज प्रकट झाले नाही. म्हणून केवळ विजयप्राप्तीसाठी मला नीतीचा आश्रय घेऊन प्रसंगी युद्ध संकेत मोडूनही प्रतिप्रक्षाचा निःपात करवून घ्यावा लागला. ज्या प्रतिस्पर्ध्याचा उल्लेख आपण केलात ते खरोखर वध्य होते का? धर्मस्थापनेसाठी त्यांचा मृत्यू अटळ ठरावा असे कोणते प्रमाद त्यांनी केले होते याचा यथातथ्य ऊहापोह मी करणार आहे."
"बादरायण! पितृसुखासाठी भीष्म प्रतिज्ञाबद्ध झाले. पुढे चित्रांगद युद्धात मारला गेला. त्याचा ज्येष्ठ भ्राता विचित्रवीर्य, याला तो सक्षम नसूनही भीष्मांनी राज्याभिषेक केला. त्याच्यासाठी काशीराजाच्या कन्यांचे अपहरण भीष्मांनी केले. स्वयंवरातील वधूंचे बळाने अपहरण हा संकेतभंग नव्हता का? क्षत्रियाने स्वतःच्या हेतुपूर्तीसाठी तसे करणे एक वेळ मान्य झाले असते. पण विचित्रवीर्यासाठी भीष्मांनी हे कृत्य केले. या त्यांच्या कृत्यामुळे विचित्रवीर्याचे सामर्थ्य हीन ठरले. सर्वच राजांनी भीष्मांच्या कृत्याचे अनुकरण केले असते तर काय अनर्थ ओढवला असता याची कल्पनाच केलेली बरी! विचित्रवीर्याचा मृत्यू झाल्यानंतर माता सत्यवतीने भीष्मांना विवाह करण्याची आज्ञा दिली. परंतु आत्मनिष्ठ भीष्मांनी प्रतिज्ञेची सबब सांगितली. तत्कालीन परिस्थितीत कुरुंच्या साम्राज्याला समर्थ वारस नसतानाही भीष्मांनी मातेची आज्ञा पाळू नये हे कितपत समर्थनीय आहे? की पित्याच्या इच्छेसाठी अविवाहित राहण्याची प्रतिज्ञा करावी लागली याचे शल्य त्यांच्या मनात होते? महर्षी... द्यूतात कपटाने 'पण' जिंकलेल्या विषयांध धृतराष्ट्र पुत्रांनी एकवस्त्रा द्रौपदीला राजसभेत आणले. परंतु भीष्मांनी 'अर्थस्य पुरुषो दासाः' असे लंगडे समर्थन करीत स्पष्ट उत्तर देणे टाळले. तिची विटंबना होत असता त्यांच्यासारखा पराक्रमी वीर स्वस्थ बसला."
"हनुमंता! विरोध राहू दे... किमान हे निंद्य कृत्य पाहणे नको म्हणून सभात्याग करणे तरी भीष्मांना शक्य होते की नाही?" क्रोधित झालेला हनुमंत उद्गारला, "यदुवरा पतिव्रतेची विटंबना पाहून स्वस्थ बसतो तो वीर नव्हेच, धर्माचरणी तर अजिबात नव्हे. यदुवरा, मी अशा प्रसंगी माझा दुरान्वयानेही संबंध नसता तरीही अशा कृत्याचे स्वबलाने परिमार्जन केले असते अथवा आत्मघात पत्करला असता." कृष्ण पुढे बोलू लागले, "अधर्माचरण घडत असता, त्याचे परिमार्जन करण्याचे सामर्थ्य असता गप्प बसून राहायचे... या कृतीचे समर्थन करणारा एखादा धर्मसंकेत असेल असे मला वाटत नाही. असला तरी तो बदलण्याचे धाडस दाखवायला हवे. शेवटी धर्म हा सदाचरणासाठी असला पाहिजे. दुष्प्रवृत्तींचा नाश कसा करावा याचे दिशादर्शनही धर्मामध्ये मिळायला पाहिजे, अन्यथा धर्म हा एकांगी, निरर्थक ठरेलच पण तो आपले अस्तित्वही टिकवू शकणार नाही, असे माझे स्पष्ट मत आहे."
“कौरवांचे अधर्माचरण पाहता युद्धप्रसंगी तरी तटस्थ राहणे भीष्मांना शक्य होते. परंतु दुर्योधनाचा पक्ष घेउन भीष्म रणांगणात उतरले. म्हणून त्यांचा वध हे त्यांच्या नीतीला त्यांच्याच नीतीने दिलेले उत्तर आहे. व्यास महर्षी! द्रोण तर उघड उघड पक्षपाती होते. अश्वत्थाम्याची कुवत, मानसिकता या कशाचाही विचार न त्यांनी पुत्रप्रेमापोटी त्याला संहारक अस्त्रांचे दान दिले हे तर सर्वश्रुतच आहे. दुर्योधन, कर्ण, दुःशासन या त्यांच्या शिष्योत्तमांची ख्याती सर्वश्रुतच आहे. शिष्याची योग्यायोग्यता न पारखता दुष्टमती छात्रांना अमोघ शस्त्र विद्या मुक्तहस्ते प्रदान केली. उलट एकलव्याच्या एकनिष्ठ गुरुभक्तीची कदरही न करता न शिकवलेल्या विद्येपोटी त्याच्या अंगुष्टाची गुरुदक्षिणा त्यांनी मागितली. त्यांच्या परस्पर विरोधी वर्तनाचे समर्थन कोणी कसे करावे? राजाश्रयामुळे मिंधे बनलेले द्रोणाचार्य... गुरुपरंपरेच्या कोणत्या श्रेष्ठ संकेतांचे पालन त्यांनी केले? उलट धर्मयुद्धात अधर्माच्या बाजूने ते उभे राहीले."
"द्रोणवधासाठी धर्मराजाला सत्याचरण भंगाचा मोबदला द्यावा लागला. महर्षी! कर्ण तर स्वभावतःच दुराचारी होता. अर्जुनाचा द्वेष हेच त्याचे जीवितकार्य. तो सूतपुत्र आहे यास्तव द्रौपदीने त्याला स्वयंवरात सहभाग घेऊ दिला नाही. हा डूख मनात ठेवून राजसभेत आणलेल्या द्रौपदीची विटंबना चालली असताना त्याने दुष्टमती कौरवांना प्रोत्साहन दिले. अर्जुनाशी स्पर्धा करण्याच्या उन्मादात परशुरामांकडून कपटाने अस्त्रप्राप्ती करण्यापर्यंत त्याची मजल गेली. एवढेच कशाला अभिमन्यूला एकाकी गाठून अधर्म युद्ध करणाऱ्या पुरुषांमध्येही कर्ण होता. फक्त अंत्यसमयी त्याला धर्माधर्म विवेक सुचला. ज्याने स्वतः अधर्माचरण केले त्याने दुसऱ्याला धर्माचरण शिकवावे म्हणजे 'परोपदेशे पांडित्यम्' असाच न्याय नव्हे का?"
“महर्षी! दुर्योधनाला तर पांडवांचे अस्तित्वच मान्य नव्हते. सत्तातृष्णेपायी त्याने पांडवांना जगणेही मुश्किल केले. त्याच्या कपटी स्वभावाचे किती दाखले द्यावेत? तरीही निर्णायक युद्धापूर्वी धर्मनिष्ठ युधिष्ठिराने त्याला कोणत्याही पांडवाशी द्वंद्वयुद्ध करण्याची अनुमती दिली होती. परंतु भीमाची प्रतिज्ञा पूर्ण व्हावी हा जणू विधिसंकेतच होता! गदायुद्धात जेव्हा त्याचा शक्तिपात होत चाललेला दिसला, तेव्हा मीच भीमाला त्याच्या जानुस्थानी प्रहार करण्यास सुचविले. दुर्योधन अंतिम क्षणी जी खेळी खेळू इच्छित होता ती मी ओळखली एवढेच! माझ्या संकेताकडे भीमाचे दुर्लक्ष झाले असत तर दुर्योधनाने युद्धसंकेत बाजूला सारुन भीमाचा कपटाने वध केला असता. महर्षी,... युद्धाचा धर्म म्हणजे विजय प्राप्ती! जी नीती आचरून कौरवांनी पांडवांना युद्ध करण्यास प्रवृत्त केले त्याच नीतीने त्यांचा पराभव झाला हे कुरुक्षेत्रीच्या युद्धाचे फलित आहे."
"सगळा समाजच सदाचरणी बनला तर, मग धर्मतत्वे, शास्त्राधार यांची आवश्यकताच उरणार नाही. प्रत्येक युगामध्ये अनिष्ट प्रवृत्ती असतातच. असीम सुखप्राप्तीसाठी इष्ट-अनिष्ट, साधन-शुचिता यांची पायमल्ली करणे ही मानवाची सहज प्रवृत्तीच आहे. धर्माचे अंतिम ध्येय परमोच्च श्रेणीपर्यंतची प्राप्ती जी प्रायः होत नाही. सत्ता, सुखसाधने यांची प्राप्ती तर धर्माचरणापेक्षाही दुर्मार्गाने फार अल्प काळात होते जेव्हा संपूर्ण समाजातच अशा वृत्तीचे प्राबल्य होते तेव्हा समाजाची घडीच विस्कटून जाते. म्हणून धर्मावर नीतीचा अंकुश असावा लागतो."
"महर्षी! धर्मरक्षणासाठी शस्त्राचा धाक असावा लागतो. प्रभु रामचंद्रांसारख्या पुरुषोत्तमाने तो ठेवला होता. परंतु द्वापारयुगामध्ये शासकच धर्माची पायमल्ली करू लागल्यामुळे धर्म क्षीण झाला...दुर्बल झाला. म्हणून धर्मप्रतिष्ठापनेसाठी प्रभुरामांसारखे धर्माचरणी प्रशासक स्थिर करणे हेच माझे जीवितकार्य ठरले. अर्थात शस्त्राच्या धाकाने धर्म रुजविताही येत नाही. शस्त्रबळाने फार तर बाह्यात्कारी तात्पुरते दृश्यबदल शक्य आहेत. धर्म रुजविण्यासाठी अंतःप्रवृत्ती बदलाव्या लागतात. चित्तशुद्धी करावी लागते. स्वयंस्वीकृती हे धर्मप्रसाराचे शाश्वत निधान आहे. शस्त्राने दुर्जनांचा नाश करता येतो, दुष्टप्रवृत्तीचा नव्हे. दुःष्प्रवृत्तीचा नाश करण्यासाठी नीतीसारखे प्रभावी शस्त्र दुसरे नाही! कुरुक्षेत्रावरील युद्ध हे दोन्ही पातळयांवर खेळले गेले. दुष्टनिर्मूलन आणि दुष्प्रवृत्तींचे दमन दोन्हीही या युद्धाने साध्य झाली असून, अंती श्रेष्ठ धर्मतत्वांची प्रतिष्ठापना झाली आहे. म्हणूनच वेदव्यास! कुरुक्षेत्रीचे युद्ध हे धर्मयुद्धच म्हणावे लागते!"
"हे चिरंजीवीन्! या गो पालकाला त्याच्या सामान्यत्वाच्या मर्यादा सांभाळून जे करता आले ते विदितच आहे. कृपा करून कृष्णलीलांना कोणतेही देवत्वाचे परिमाण लावू नका. कृष्ण देव्हाऱ्यात राहीला तर नित्यपूजेतील पंचोपचार स्वीकारणाऱ्या पंचायतना एवढा तो नगण्य होईल. तो अलौकिक असता तर, स्वतःच्या पुत्रपौत्रांच्या, बांधवांच्या अनिर्बंध वर्तनाला आळा घालणे त्याला सहज शक्य होते. कृष्णाच्या नजरेसमोर त्याच्या वंशीयांचा विच्छेद झाला आहे. सती गांधारीच्या शापामुळे वेदनामय मृत्यू त्याच्या वाट्याला आला आहे. हे अखिल जगताला कळू द्या. महर्षी! माझ्या कार्याचे यापरते श्रेय दुसरे कोणते बरे असेल? तेव्हा कृष्णलीलांचे वास्तव वर्णन करावे अशी माझी अपेक्षा आहे. कृष्णासह कौरव-पांडवांचे जीवनवृत्त कथन करणारा ग्रंथ नवनवोन्मेषशालीनी प्रतिभेचा आविष्कार असण्यापेक्षा सरधोपट पद्धतीने केलेले वृत्त कथन असाच असू द्या!" कृष्ण, हनुमंत, बादरायण व्यास यांचा हा संवाद संपत असता झुडपात दडलेला व्याध प्रकट झाला. आपल्या हातून घडलेल्या कृतीचा पश्चात्ताप झाल्याने त्याचे मुख म्लान झालेले दिसत होते.
श्रीकृष्णांना वंदन करुन व्याध बोलता झाला, "श्रीकृष्णा! मी तर मृगमुख समजून शरसंधान केले. माझ्या धनुष्यातून सुटलेल्या बाणाने तुझा वेध घेतला याचे अतीव दुःख मला होत आहे. एका श्रेष्ठ पुरुषाचा वध माझ्या हातून घडल्यामुळे मला दुष्कीर्ती प्राप्त होणार आहे, याचेही शल्य माझ्या हृदयाला टोचत आहे." धीरगंभीर स्वरात कृष्ण म्हणाले, "व्याधा! मृत्यू हे निखळ सत्य आहे. इहलोकीच्या सगळया पाप तापांचे निवारण होऊन माणसाला मुक्त करणारा मृत्यू हे तर मानवाचे परमप्राप्तव्य आहे. कदाचित आजवर न पाहिले, न अनुभवले असे दारुण दुःखही भविष्यात माझ्या नशीबी असेल... कोणी सांगावे? व्याधा, माझ्यासाठी तू तर माझा तारणहार होऊन आला आहेस. योग्य काळी, योग्य स्थळी या कृष्णाच्या जीवनाला पूर्णविराम देऊन तू एक महान कर्तव्य पार पाडले आहेस. व्याधा मी तुझा शतशः ऋणी आहे..." कृष्णाच्या कमलनेत्रांचे तेज क्षीण होत त्यांच्या पापण्या मिटू लागल्या. क्रोधायमान झालेला हनुमंत म्हणाला, "व्याधा, तूझी चूक तू कबूल केली आहेस, तुझ्या कृत्याचा पश्चात्तापही तुला झालेला आहे तेव्हा तुझ्या प्रमादाबद्दल मी देत असलेली शिक्षा भोगायला तू आनंदाने तयार रहा. या माझ्या गदाप्रहाराने मी तुझ्या मस्तकाचे चूर्ण करु इच्छितो." गदा उगारायला सज्ज झालेल्या हनुमंताला आवरीत व्यास म्हणाले, “थांब हनुमंता, अशी चूक करु नकोस. हा व्याध कुणी साधासुधा नाही. प्रभु श्रीकृष्णासारख्या पुरुषोत्तमाच्या अवताराची समाप्ती करण्यासाठी व्याधरुपाने शरसंधान करणारा हा प्रत्यक्ष 'काळ' आहे!" अन् मग बादरायण व्यास आणि हनुमंत व्याधापुढे नतमस्तक झाले.