लाल छत्री चहा 
       कळत्या वयातला म्हणजे 1965  च्या दरम्यानचा  काळ हा मध्यम वर्गियांसाठी दुर्भिक्ष्य आणि कमतरतेचा, कदन्न, ओढघस्तीचा काळ. त्या काळी चहा ही  आम्हा पोरांसाठीच नव्हे तर गरीब, हातावर पोट असणाऱ्या कामगार वर्ग़ासाठीही चैनीची वस्तू होती. आम्हा मध्यमवर्गिय ब्राह्मणांच्या घरी दिवसातून 4-5 वेळा चहा केला जात असे . पण कामगार वर्गियांच्या  घरी  असं नव्हतं. म्हणून सकाळी दारात आलेला गडी चहाच्या घोटासाठी रहाटगाडग्यावर अगदी खुशीने  पाणी लाटून देत असे, भाजीचा फणस  फोडून देणं,  खळ्याला चोप देणं किंवा  बेगमीसाठी  डाळलेल्या गंजीतलं गवत ओढून देणं ही  कामं कपभरून मिळणाऱ्या चहाच्या आशेने करीत असे .  पोरासोराना सकाळी अनशापोटी  कडू  कुडेपाक दिला जाई . त्यानंतर आंघोळी वगैरे झाल्यावर एकदा आणि संध्याकाळी शाळेतून आल्यावर एकदा असा दिवसातून फक्त दोनदाच चहा मिळे. मोठी माणसं मात्र सकाळी तीन वेळा नी दुपारी अडीच वाजता झोपून उठल्यावर, चार वाजता आणि संध्याकाळी  असा  दिवसाकाठी  साताठ वेळा  चहा घटाळायची. 
        गोर गरीबाच्या - कामगारांच्या  घरी  कधितरी सटी सहामाशी उपासाच्य दिवशी   चहा केला जायचा.  पाटणकर. दिगंबर काळे, मसुरकर यांच्या किराणा मालाच्या दुकानात त्या वेळी दामोदर शिवराम कंपनीचा लाल छत्री छाप भुकटीच्या रुपातली चहा पावडर मिळायची. तो जाहिरातींचा वगैरे काळ नव्हता. पण किराणा दुकानांमध्ये अंदाजे एक बाय दीड फूट  मापाच्या पत्र्याचा  बोर्ड हमखास असायचा. त्यावर राम शामचा  लाल छत्री चहा आणि दामोदर शिवराम आणि कंपनी असा मजकूर असे. त्यामुळे चहा पावडर म्हणजे  लाल छत्री किंवा दामोदर शिवराम हे अगदी माझ्या डोक्यात फिट्ट  बसलं. असा एक बोर्ड  आम्ही माल घ्यायचो त्या दुकानाच्या दर्शनी दरवाजावर  उन्ह पाऊस खावूनही पंचवीस वर्षं तरी शाबूत स्थितीत असल्याचं माझ्या पक्कं स्मरणात आहे.  क्वचित कधितरी सुमारे दीड बाय दोन फूट  मापाच्या गुळगुळीत  कागदा वर  देवाचं वगैरे चित्र  छापलेलं  नी तळी सहा इंच रुंदीची एका पानावर तीन महिन्याच्या तारखा  छपलेली  चार पानं  पिनेने मारलेलं कॅलेंडरं पाहिल्याचंही स्मरतं. त्या कॅलेंडरवरही  महिन्यांच्या लंगोटीच्या वरच्या बाजूला मोठ्या टाईपमध्ये  दर्जेदार चहाचे विक्रेते  दामोदर शिवराम आणि कंपनी ही अक्षरं नी कोल्हापूर मधला पत्ता छापलेला असायचा. त्यामुळे हे चहा पावडरचे वितरक कोल्हापूर मधले आहेत एवढी माझ्या ज्ञानात भर पडली. 
             त्याकाळी  चोखंदळ मुंबईकर दर्जेदार  माल  फक्त  मुंबईतच मिळतो  असा  अहंकाराचा भाव  जोपासून असायची. आमच्याकडे आल्यावर झोपाळ्यावर बसून आमच्या दादांशी गप्पा मारताना चहा विचारल्यावर  नको नको म्हणायची. पण आईने स्वयंपाक घरात चुलीवर चहाचं आधण ठेवून उकळी  आल्यावर त्यात  लाल छत्री  चहा बुकी टाकल्यावर  थोड्याच वेळात चहाचा  मोहक दरवळ सुटल्यावर , “अरे  माईनी चहा ठेवलाच वाटतं ” असे उत्स्फूर्त उद्गार पाहुण्या मुंब ईकराच्या तोंडून अनाहूतपणे  यायचे. खरी गम्मत तर त्यापुढेच  असे. अॅल्युमिनीयमच्या झाकणीतून (त्यावेळी ट्रे  नसायचे) चहाच्या कपबशा नेवून दिल्यावर  कपातला चहा ओतून बशी तोंडाला लावली रे लावली की  मुंब ईकराचा अहंकार पार गळून पडायचा. तो झक् मारीत विचारी “ तुम्ही चहा पावडर कुठची वापरता? ”  दादा  निर्विकारपणे  सांगायचे ,  “लाल छत्री छाप चहा. दुसऱ्या कुठच्याही  पावडरचा चहा आमच्या घाशा खाली उतरणार नाही. ”  पाहुणा मग दराची चौकशी करी. तो आकडा मात्र आता माझ्या  लक्षात नाही . पण  दादानी दर सांगितल्यावर “इतकी चांगकी चहा पावडर नी इतकी  स्वस्त मिळते  ही? ”  ही चोखंदळ मुंबईकराची प्रतिक्रिया मात्र मला लखलखित  आठवते. 
         त्याकाळी तीन फुटी औरस चौरस  देवदारी ( तेंव्हा प्लायवूड हा शब्द आम्ही  ऐकलेलाही नव्हता ) खोक्यातून चहापत्ती  यायची. त्या खोक्यावरही तुटक तुटक छापात   लाल रंगात    छत्रीचं  चित्र  आणि  दामोदर शिवराम आणि कंपनी  व   तिचा  पत्ता छापलेला असे.  दुकानदार  खोक्याला वरच्या बाजूने  हात जाईल  इतपत  छिद्र  पाडून   दोन तीन महिने  पावडर विकायचा. रोजच्या विक्रीच्या गोड्या तेलाचा डबा  अर्धा   कापून काठ वळवून त्यात चहा पावडर ठेवलेली  असे. संपेल  तशी   खोक्यातून  स्टीलच्या ग्लासाने  पावडर विक्रीच्या डब्यात उसपली जाई. ती उसपतानाही  दुकानभर चहा पावडरचा  मंद  वास   पसरायचा नी चहा प्यायची हुक्की यायची.  देवदारी  खोके रिकामे  झाल्यावर  गावातले   कोणी कोणी  सुतार  ते   अल्प स्वल्पात  विकत घेत. फोटो फ्रेम बनविणारे  फ्रेमची मागील बाजू झाकायला  ते वापरीत. एक दुकानदार  सुतार  बसवून  ते    शिस्तीत खोलून घेई  नी  पडवीतल्या  पार्टिशनसाठी , नाहीतर ‘कूड’ म्हणून आडवस करायला वापरी .  खोक्याना चारही  बाजूनी  दोन इंची पत्र्याची पट्टी  मध्ये दुमडून  काठळी मारलेली असे. 
          सुतार अंबर पक्कड  वापरून एकाबाजूने  पत्र्याची  काठळी   उचकटून काढीत .  सव्वाइंची   तार  चुका  साठवून  त्या सरळ करून पुन्हा वापरल्या जात. खोक्या ची सहा तकटं   सुटी केल्यावर  त्याना आतल्या बाजूने  बेगड  लावलेली असे.  नी  चांभारी  टेकस मारून  फिट केलेली एक बाय एक इंची लाकडी  पट्टीची  फ्रेम  अच्चळ सोडवून  काढावी लागे.  ह्या लाकडी पट्ट्या मात्र  अगदी  पुरचूक असत . देवदारू तकटाना  लावलेल्या बेगडीवर आम्ही पोरं तुटून  पडत असू.  पाच सहा खोक्यांची  बेगड  चुरगळून  एकावर एक  थर  गुंडाळून  त्याचा   चेंडू   करून आम्ही  आबाधुबी किंवा लगोरी  खेळत असू, एरवी आम्ही चिंध्यांचे  चेंडू  बनवू  ते एकसारखे  सुटत  रहात . पण हे बेगडी  चेंडू   वापरायला मस्त नी  दीर्घ  मुदत टिकायचे ही. आबाधुबीत  चेंडूने रिंगणातल्या भिडूला  टिपल्यावर  ‘दामोदर शिवराम  आऊट’  किंवा  ‘लाल छत्री  चहा औट’  अशी आरोळी  पोरं मारीत.  बेगडीची   आणखी एक गम्मत  होई. दोनेक आंगळ  बेगडीच्या तुकड्यात  काड्यापेटीतल्या दोन -चार काड्यांचा गुल मोडून घेऊन त्याची  घट्ट  गोळी  पोरं बनवीत . छप्परी नळ्या च्या पैशा एवढ्या खपरीच्या  दोन तुकड्यांमध्ये आगकाडीच्या गुलाची बेगडीत गुंडाळलेली  गोळी  ठेवून  चांगला वजनदार दगड चारेक फुट उंचीवरून  टाकला  की लवंगी फटाकडी एवढा फट्ट आवाज होत असे. त्याला आम्ही बेगडी  बॉम्ब  म्हणू.  
        देवदारू  खोक्यांची  तकटं   रिफांवर  ठोकून  सुकवणं वाळवणं घालायला दोन तीन सीझन ते  तट्टे   वापरता येत. असे  तीन - चार  फुटी  सुबक तट्टे  पार्टीशन सारखेही   वापरता येत, नी ते दीर्घकाळ  टिकतही.  माझ्या मित्राकडे त्या चार भावंडांच्या अभ्यासाची  वह्या पुस्तकं  ठेवायचं  झडप बंद  चार खणी  कपाट बनवून  घेतलेलं  होतं. त्याच्यावरचे  गोलाकार  दामोदर शिवराम आणि कंपनी व मध्यभागी  लाल  छत्रीचं  चित्र  असलेले शिक्के अजूनही अंत:चक्षूं समोर  तरळून जातात . चहा करताना कपाला अर्धी चिमूट  चहाबुकी हे ठरलेलं  परिमाण असे.  त्यातही एकावेळी आठ-दहा कप चहा केल्यावर फडक्यातला चहाबुकीचा गोळा लगेच टाकून न देता दुसऱ्यावेळी त्यात दोन कपाचा चहा सहज व्हायचा. गडी पैऱ्यांच्या नशिबी तर कायम उकळलेल्या पुडीचाच चहा असे. 
           मध्यंतरीच्या काळात अदमासे  2. 5× 5इंच ,  4 ×7 इंच,  5× 10 इंच  आकाराच्या खाकी कागदी पिशव्यांमधून चहा पावडर दिली  जावू लागली.  अगदी पॉलिथीन पिशव्यांचा वापर सुरु होईतो ही प्रथा दुकानदारानी  पाळली . बहुशा अशा चहा पावडरचे उत्पादकच त्या पिशव्या पुरवीत असावेत. दामोदर शिवरामचे  जाडी पत्ती नी बारीक पूड   असे फ़ॅमिली मिश्रण दरम्यानच्या काळात  मिळू लागल्यावर  आम्ही  ते ही वापरीत असू. त्यांचे समकालीन मुडीस, लिप्टन, ब्रुकबॉण्ड असे काही चहाचे  ब्रॅण्ड ही बाजारात  असले  तरी त्यांच्या  प्रती किलो  किमती  जादा असल्याने बहुजन समाज नी प्रामुख्याने आमच्या भागातले  हॉटेलवाले  तरी  दामोदर शिवरामची चहापत्तीच  वापरीत. 1975 ते 86 अखेर  नोकरी निमित्त  माझे वास्तव्य राजापुर तालुक्यात  कुंभवडे  नाणार   गावांमध्ये  होते. तिथे एखाद दुसरं किराणा दुकान असायचं ,  नी दामोदर शिवराम ऐवजी फुटकळ कंपन्यांची चहा पत्ती  स्वस्त घेवून ती चढ्या दराने विकीत. त्या पावडरीचा चहा काळा  नी  बेचव , स्वाद तर बिलकूल नसे. म्हणून राजापूर खारेपाटण ला  खेप झाली तर तिकडून दामोदर शिवरामचीच चहापत्ती आहे याची खातरजमा करून मी खरेदी करीत असे . कधी घरी पडेलला खेप झाली तर आमच्या कायमच्या दुकानातून लाल छत्री किंवा फ़ॅमिली मिक्श्चर खरेदी करीत असे. 
              ज्या चार शाळांमध्ये सेवा केली  तिथेही स्टाफच्या ती क्लबमध्ये दामोदर शिवराम चहा पत्ती  लोकांच्या पसंतीला उतरली. वर्षभरापूर्वी जुन्या शाळेतले सहकारी भेटले. गप्पांमध्ये ते सहज बोलून गेले की, काळेसर तुम्ही आमच्याकडून गेल्यावर टी क्लबच्या चहाची क्वलिटी घसरली. मी विनम्रतेने म्हणालो, ‘ घाटगे सर,  मी कोल्हापूरच्या दामोदर शिवरामची पत्ती आणून देत असे तेंव्हा.’  मी हयातभर  तीन वस्तू एकाच ब्रॅण्ड च्या वापरल्या. पार्ले किंवा साठेची बिस्किटं, टाटाचा रेड रॅपरचा सिंथॉल  आणि  दामोदर शिवरामचा चहा. साठे बिस्किट कंपनी खूप वर्षामागे बंद झाली. पार्ले कंपनी बहुराष्ट्रीय कंपनीच्या कब्जात गेली नी  पहिला दर्जा घसरला. चव  स्वाद साधारण  टिकलेली असली तरी  आताची बिस्किटं  पट्कन मोडतात. चहात बुडवली तर कधि विरघळली पत्ताही लागत नाही.  2020 मध्ये मुलगा एम्. डी. झाला नी त्याने पुण्यात  दवाखाना थाटला. मी सेवा निवृत्त झालो होतो. मग आम्ही  उभयता आमचं  पडेलचं घर बंद करून पुण्याला  वारजे येथे स्थायिक झालो. 
        पूर्वी मी  सकाळी   तीन ते चार वेळा आणि संध्याकाळी   ते रात्री झोपेपर्यंत  किमान तीनवेळा   अर्धा-अर्धा कप चहा घेत  असे. पुण्याला आलो नी  मनाजोगा चहा मिळेनासा झाला. इकडे दामोदर शिवरामचं  नावही किराणा दुकानदाराना माहिती नाही, ते नसो  बापडं. पण माझा चहा फक्त दोन वेळांवर आला. किंबहूना  नाईलाय म्हणून चहा घ्यायचा. सूनबाईने  कितीतरी ब्रॅण्ड बदलून बदलून वेगवेगळ्या चहा पत्त्या आणून शिकस्त केली. पण  मी आणि सौ. सुगंधा कोणाच्याही पसंतीला उतरणारी चहापत्ती  नाही मिळाली. ह्या चार वर्षांच्या काळात  दामोदर शिवराम.... राम शामचा लाल छत्री  चहा ही नावं  अंतर्मनात प्रकर्षाने रुंजी घालीत राहिली. गावी तर वर्षभरातही  खेप होत नाही. 14  फेब्रुवारी  24 ला अकल्पितपणे  नृसिंह वाडीतून अंबाबाईला  जाताना  शाहूपुरीत  एच पी  चा  बोर्ड दिसला नी  दामोदर शिवरामची  पेढीही दिसली. 
     आम्ही दोघं आणि उपळ्यातल्या चुलत भावाची बायको  तीही   लाल छत्री – दामोदर शिवराम ची फॅन. पुण्याला परत जाताना अगदी  योजून शाहूपुरीत  कार थांबवून दामोदर शिवराम  मध्ये गेलो. अहो आश्चर्यम्....  आमचा लाल छत्री  ब्रॅण्ड  शाबूत असलेला बघून सगळे सुखवलो. लालछत्री सोबत  मिक्श्चर ऑर्डर केली. आत्ल्या बाजूला नोकराने पत्ती  मापायला सुरवात केली नी तो परिचित गंध दरवळला. त्याच वेळी  दर फलक पाहिल्यावर तर मी  उडालोच....  लाल छत्री 300 रुपये नी मिक्श्चर 400 रुपये किलो....  पुण्यात  होलसेल मध्येही  हे दर ऐकायला मिळायचे नाहीत. मी मुक्त कंठाने प्रशंसोद्गार काढले,  ‘  मी गेली चार वर्षं वगळता पन्नासहून अधिक वर्षं  तुमचा चहा पितोय.’  पण काउंटरकरच्या माणसाने   काही प्रतिसाद  देणं  राहो,  नजर वर उचलून बघितलंही नाही. एकतर त्यांच्या  लेखी   तीन चार किलो चहा पत्ती घेणारी   आम्ही फुटकळ  गिऱ्हाईकं  असणार   किंवा  संकोची, विनम्र   स्वभावा मुळेही आपली स्तुती  ऐकून  प्रतिसाद देणं  त्याना  सुचलं नसेल कदाचित.....! आमच्या मागे उभी असलेली  वहिनीही  दामोदर शिवरामच्या  चहाची   तारीफ करू लागलेली.  ते ऐकल्यावर नोकरवर्ग मात्र  कुतुहलाने पुढे सरसावले नी  हसऱ्या चेहेऱ्याने  आम्ही कोण कुठले .... विचारपूस सुरु केली. 
          पेढी वरचे अन्य  चारपाच नोकर ही पुढे आले नी आतल्या केबिनमध्ये बसलेले  प्रौढ  गृहस्थही  बाहेर आले. ते सुबोधजी गद्रे , दामोदर शिवराम कंपनी च्या  मालकवर्गा पैकीच  निघाले. आता मलाही हुरुप आली नी  ‘राम शाम चा  लाल छत्री  चहाचा संदर्भ मी दिला.  चहापत्ती  मापायला सुरवात केल्यावर इकडे बाहेर पर्यंत  गंध दरवळत आला,  आजही  दामोदर शिवराम  ची गुणवत्ता  टिकून आहे  याची खात्री पटली’ अशी मनमोकळी   प्रतिक्रिया दिली.  एच. पी. हे त्यांचच प्रॉडक्ट आहे   नी पुण्याला रविवार पेठेत  त्यांचे सगळे  ब्रॅण्ड  मिळतात  हे त्यानी अभिमानाने सांगितलं.  मला  तर अत्यानंद झालेला. धंद्यामध्ये   वस्तूचा उत्तम  दर्जा  नी   वाजवी किंमत  ही  गुणवत्तेची  परिमाणं   निरिच्छतेने  आणि   साक्षेपाने  जोपासणं  हे  दुर्मिळ! अमेरिकन ट्रेड पॉलिसीने  ग्रासलेल्या  आजच्या व्यवसाय  नीतीच्या युगात  पैशाचा  अति हव्यास न बाळगता  व्यवसाय निष्ठा  ‘व्रताचरण’ म्हणून जोपासणं   लोप पावलेलं आहे. म्हणूनच  अत्यंत प्रांजळ भावाने मी  त्यांचा आदर करतो. एखादी वस्तू  महाग किंवा निकृष्ठ  मिळाली तर आपण  त्या व्यावसायिकाला  शिव्यांची लाखोली वाहतो  नी  ते योग्यही आहे.  पण त्याच बरोबर सकोटीने  प्रामाणिक  व्यवसाय  करणाराची मुक्तकंठाने  स्तुती करणं  हे ही  सात्विक ग्राहक म्हणून आपलं कर्तव्य ठरतं.  
                                                                              प्रा. श्रीराम काळे