Karanji in Marathi Classic Stories by श्रीराम विनायक काळे books and stories PDF | करंजी

Featured Books
  • ફરે તે ફરફરે - 67

    ફરે તે ફરફરે - ૬૭   હું  મારા ધરવાળા સાથે આંખ મિલા...

  • રાય કરણ ઘેલો - ભાગ 16

    ૧૬ પૃથ્વીદેવ   અરધી રાત થઇ ત્યાં ઉદા મહેતાના પ્રખ્યાત વ...

  • એઠો ગોળ

    એઠો ગોળ धेनुं धीराः सूनृतां वाचमाहुः, यथा धेनु सहस्त्रेषु वत...

  • પહેલી નજર નો પ્રેમ!!

    સવાર નો સમય! જે.કે. માર્ટસવાર નો સમય હોવા થી માર્ટ માં ગણતરી...

  • એક મર્ડર

    'ઓગણીસ તારીખે તારી અને આકાશની વચ્ચે રાણકી વાવમાં ઝઘડો થય...

Categories
Share

करंजी

करंजी


बरेच दिवस वाजत असलेले जोशांचे वेगळेचार एकदाचे झाले अन् अण्णांनी त्यांचा मोठा मुलगा 'भाऊ' याला वेगळा टाकला. हे सगळे नाटक अण्णां जोशांची ची बायको बायजाई, धाकटा मुलगा दिनू नि त्याची बायको भागी या तिघांचे ! दिनूचे लग्न लागले आणि महिनाभरातच 'घरात कली शिरला' असे भाऊंची बायको जानकी उभारत म्हणाली. मुळात दिनूसाठी मुलगी बघायचा कार्यक्रम झाला तेव्हाच चकणी,दात पुढे असलेली, देवीच्या व्रणांनी चेहरा भरलेली भटांची 'येसु' भाऊंनी नापसंतच केली. मुलगी बघून आल्यावर रात्री ओसरीवर बोलणी झाली. त्या वेळी भाऊ स्पष्टच म्हणाले, “आमचा दिनू कुठे नि हे घुबड कुठे ? सरळ नापसंत म्हणून कळवा.” पण शिदूनाना भट हे बायजाईच्या नात्यातले! मोठी तालेवार असामी! मुलीसाठी पंचवीस तोळे सोने,पाचशे रूपये रोख,दोन्ही मांडवाचा खर्च आणि मानपान करायची शिदुनानांची तयारी आहे, याची बोलवा कानांवर आल्यानंतर बायााईनेच हे स्थळ जुळवुन आणलेले !
खरे तर पैशा च्या आमिषाला भुलण्यासाठी जोशांची परिस्थिती कोरम होती असेही नव्हते. हयातभर गहाणवट नि व्याजबट्टा करून अण्णांनी खुप माया जमा केलेली ! त्याशिवाय आत्त्याची इस्टेट गडप केलेली होतीच !! मनात आणले तर अण्णा जाोशी स्वतःची आणि बायकोची सुध्दा सुवर्ण तुला करू शकेल असे लोक म्हणायचे नी ते सत्यही होते. पण म्हणूनच बायजाईला अती द्रव्यलोभ ! भाऊंनी मुलगी नापसंत असल्याचा शेरा मारल्यावर, “रूप काय मध घालुन चाटायचे आहे ? मुलगी रूपाने बेतान् काळ-सावळी वाटली तरी बरी ठसठशीत आहे नि आमचा दिनू तरी कुठे एवढा मदनाचा पुतळा लागून गेलाहे ? सरळ पसंत आहे म्हणून कळवा.” असा निर्णय बायजाईने दिला. घरात तिचाच शब्द चालायचा.
भागी इस्टेट घेऊन आली म्हणून बायजाईचा तिच्यावर भारी लोभ. वास्तविक घरातल्या सगळ्या माणसांची जेवणे झाली की मग काय उरलेसुरले असेल ते सुनांनी मान खाली गिळायचे, असा तो काळ ! पण बायजाई भागीला आपल्या बरोबर जेवायला वाढायची. तिला लाडाने 'धाकटी' म्हणायची. हळुहळु तिचे 'धाकटी' हेच नाव रूढ झाले. सास्वा सुनांचे चांगलेच मेतकुट जमले. अगोदर एकटी बायजाई थोरल्या सुनेचा -जानकीचा छळ करायची. आता तिच्या जोडीला धाकटी आली. जानकीबरोबर तिची चार पोरे, त्यांचेही हाल व्हायला लागले. 'इतके खातात, दुपारी नुसता हुडदा घालतात.....' अशा धाकटीच्या तक्रारी सुरू झाल्या. एकदा धाकटीच्या माहेराहून करंज्या आल्या. नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे आल्या-आल्या डबा उघडुन बायजाईने दोन करंज्या तोडांत टाकल्या, दोन धाकटीच्या हातावर घातल्या. जानकीची लहान मुलगी कुशी, तिने हात पुढे केलान् तर तिच्या ढुंगणावर चापटी मारून धाकटीने तिला हाकललेन् आणि करंज्यांचा डबा स्वयंपाकघरात नेऊन ठेवलान्.
सकाळची शाळा सुटून वासु, मनी, बाळु घरी आली. त्यांना पाळंदीत गाठूनच कुशीने करंज्यांची वर्दी दिलीन्. मनी थोडी जाणती आणि समंजस ! तिने कुशीला दटावले , पण बाळु लहान. त्याचे तोंड करंजी खायला हुळकले. पाटी-पुस्तके ओसरीवर ठेवून,धाबळी पालटून धडसे कपडे बदलून पोरे पाय धुवायला गेली. विसू आगरात पळाला. मनी बावीवर कपडे धुणाऱ्या आईला मदत करायला गेली. जावळपास मोठे माणूस नाही असे बघितल्यावर कुशी आणि बाळू स्वयंपाकघरात गेली. डबा उघडून दोघांनीही एक एक करंजी घेतली नि खायला सुरवात केली.परसदारी बसलेल्या धाकटीने स्वयंपाक घरात काहीतरी खडबडल्याचा आवाज ऐकला अन् ती दणदणत आत आली. बघते तर पोरे करंज्या खाताहेत. तिची नुसती आग आग झाली,“मेली दुर्लक्षणी कार्टी ! हलकटांना सारखी नुसती खावखाव सुटलेली. मेल्यांनो खाण्यासाठी चोऱ्या करता. उद्या लोकांची घरें फोडाल नी दरवडे दिखील घालाल.” बाळ्याचे बखोट धरून तिने कुशीच्या पाठीत चार दणके घातले. “बाळ्या, एवढा मोठा घोडा झालास तरी अक्कल नाय तुला.... माझ्या माहेराहून आलेल्या करंज्या काय चोरा-पोरांना वाटून टाकायला पाठवल्यान् आहेत माझ्या बापसान् ? थांब चांगली अद्दल घडवते तुला. ”
बाळ्याला फराफरा ओढीत धाकटी चुलीजावळ गेली. चुलीतले जळके कोलीत काढून तिने बाळूच्या गालावर टेकवले. जीवाच्या आकांताने बाळू किंचाळला. कुशीनेसुध्दा घाबरून भोकांड पसरले. पोरांचा ओरडा ऐकून धुणे तसेच टाकून जानकी घराकडे धावली. काय झाले ते कळल्यावर वेदनांनी आक्रंदन करणाऱ्या बाळूच्या पाठीत तिने सुध्दा धपाटे घातले. शरमेने तिच्या डोळ्यातून पाणी आले. बाळूचा गाल भलताच भाजलेला. चांगला टळटळीत फराटा त्याच्या गालावर उमटलेला. पोराची आळप थांबेना. तेव्हा परिस्थितीचे गांभीर्य आईच्या लक्षात आले. बाळूला पाणी पाजून लामण दिव्यातले कडू तेल तिने भाजलेल्या व्रणावर सोडले. त्याला मांडीवर घेऊन ती थोपटीत बसली. थोड्या वेळाने बायजाई घरी आली. तिने काही विचारण्या पूर्वीच धाकटीने तिच्या कानात कायतरी खुसफूस केली. बायजाई तोंडाचा पट्टा सोडणार होती , पण पोराच्या गालावरचा व्रण बघून ती सुध्दा घाबरली.
दुपारी पुरूष घरी आले. दिनूकाका, भाऊ सगळे आयकून सुध्दा गप्प बसले. म्हातारा अण्णा तेवढा करवादला, “पोर केवढा, त्याची चूक ती काय नि शिक्षा केवढी ..... ही म्हणजे हडळीच्या वरताण झाली.” हे ऐकल्यावर धाकटी तणतणली, “चोरी केलीन् म्हणून जरा धाक लावण्यासाठी नुस्ता चटका दिला, मी हडळ काय ? आजपावत कोणाचा वाकडा शब्द मी आयकून घेतला नाय. पोराला पाठीशी घालून मला हे अपशब्द काय ?” रागाने तरातरा आत जाऊन धाकटीने करंज्याचा डबा उचलला. तशीच बाहेर येऊन तिने करंज्यांचा डबा अण्णांच्या समोर दाणकन टाकला. ओसरीवर करंज्यांचा नुसता पेर झाला. धाकटीचा अघोचारीपणा बघून सगळी माणसे अवाक् झाली. पण कोणीच काही बोलले नाही.
दिवस जात होते तसतशी धाकटीची धुसफूस वाढायलाच लागली. नेहमी पोरांवरून काहीतरी कलागती व्हायच्या.तरी विसू हल्ली फायनलच्या शिक्षणासाठी त्याच्या आजोळीच राहीलेला. भाऊ 'ब्र' ही काधीत नसत. भांडण त्यांच्या स्वभावातच नव्हते. पण ते न बोलता बाकीच्यांना 'फुस' लावतात असे धाकटी करवादून म्हणायची. आई मात्र अतीच झाले तर एखादा शब्द बोलायची. बाळूच्या गालावर भाजल्याची चांगलीच खुण ऱ्हायलेली. तो तर धाकटीच्या वाऱ्लाही उभा राहत नसे.लग्नाला तीन वरसे झाली तरी धाकटीची कुस उजवली नाही. थोरली सून कायतरी करणी-कारूक करते असे सासू आडपडद्याने बोलायची. आईला सगळे अनावर व्हायचे. डोळ्यातून पाणी काढले नाही असा तिचा दिवस जाईना. अलग राहून उपासमार काढावी लागली तरी परवडले असे तिला वाटायचे. नवस - सायासाने एकदाची धाकटी गरोदर राहिली. चला आतातरी 'करणी करते' हा आपल्यावरचा आरोप तरी टळला म्हणून आई देवाला हात जोडायची. धाकटीवर तर बायजाईने छत्र छायाच धरलीन्. तिसऱ्या महिन्यातच धाकटी डोळीत बसून माहेरी राहायला गेली. आठ-पंधरा दिवसांनी ’ सुनेला बघिनसे झाले' म्हणून ऊठसूट बायजाईच्या धाकटीच्या माहेरी खेपा व्हायला लागल्या. घरातला कली गेल्यामुळे आईचाही जाच जरा कमी झाला. घरात शांतता आली. बघता बघता धाकटीला आठवा महिना लागला.
“आता आठ दिवसांनी मी धाकटीच्या माहेरी जाईन ते तिचे बाळंतपण उरकुनच येईन.”ओसरीच्या उंबऱ्यावर बसून पदरातले शेंगदाणे खात खात बायजाई अण्णांना सांगत होती. तेवढ्यात पाळंदीतुन कोणीतरी येताना दिसले. उन्हात चालून घामाघूम झालेला शिदुनानांकडचा गडी तानू बाणे ओसरीवर येऊन टेकला. बसल्याबरोबर त्याने पाणी मागितले . तांब्याने वरूनच धार ओतून घटा घटा करीत आख्खा तांब्या रिकामा करून तानू बाण्याने ढेकर दिला. मग तो निरोप सांगू लागला., “शिदुनानांनी मुद्दाम माका पाटवलानी. येसू आठोळी बाळत झाली, झील झालो हुतो तो ग्येलो, येसूपण लय शीक हा...”हे ऐकून सगळ्यांच्या तोंडचेच पाणी पळाले. नेमके त्याचवेळी कुशीच्या पाठीवर आईलाही दिवस गेलेले. बायजाईचा नुसता जळफळाट झाला, “जावेचे पोर खाऊन हिची कुस उजावली, लावसट मेली!” बायजाईचा तोंडपट्टा सुरू झाला. आई बिचारी कानकोंडी झाली. दोन महिने विश्रांती घेतल्यानंतर धाकटी घरी आली. आता मात्र आईच्या छळाला पारावार राहीला नाही.“हिच्यापोटी आळवत जलमणार. माझे तळपट केलेन्, हिला बरे भोगणार नाही.”असे शिव्याशाप धाकटी आता राजरोसपणे देऊ लागली. कुशीच्या पाठीवर आईला मुलगा झाला. धाकटी नी बायजाई ह्यांना जसे सुतकच आले!
सुवेर फिटल्या-फिटल्या चौदाव्या दिवसापासून आईच्या कामाचा चरक सुरू झाला. शेकभाज नाही, अंगाला लावणे नाही. आईची आंघोळ होण्यापूर्वी धाकटी थाळीत पाणी ओतून विस्तव विझवून टाकायची. आई गार पाण्याने अंघोळ करायची. हल्ली तिच्या अन्नाचीही आबाळ व्हायला लागली. दुपारी पुरूष माणसे जोवली की बायजाई उरलेली आमटी पिऊन टाकी. मग वेस्वार नाहीतर मसाला घेऊन आई ताकाबरोबर भात गिळायची. मग वेस्वार -मसाला दडवला जाऊ लागला. ताकही संपायला लागले. आई भातावर फक्त मिठाचे दाणे टाकी आणि पाणी ओतून भात ओला करून तसाच गिळी. कुठच्या जन्माचे पाप फिटते आहे, हेच आईला कळेना! नवरा तर धौम्य मुनी. माहेरी सांगून उगाच त्यांच्या जीवाला घोर नको म्हणून आई मुग गिळून सगळे सहन करायची.
शाळेला सुट्टी पडली नि विसू आजोळाहून घरी आला. त्याला आता चांगली समज आलेली. आईच्या कामाचा धिबिडगा त्याच्याने बघवेना. आई नेहमीप्रमाणे भाताला मीठ लावून पाणी ओतून घास गिळायला लागली. विसू अचंबित झाला. “हे गो काय आई? तुला आमटी नाय उरली ? वेस्वार -ताक घेऊन तरी जेव !” आई शांतपणे म्हणाली तु आज बघतोहेस, मीच पातकी. माझे भोग कधी सरतील देव जााणे.... अंगावर पिणारे पोर आहे म्हणून मला जीव जगवायला हवा इतकेच....
रागाच्या तिरमिरीसरशी विसू ओटीवर गेला अन् अण्णांच्या पुढ्यात उभा राहून म्हणाला, “आजोबाऽऽ! तुम्हाला माहिती आहे का? माझी आई पाणी ओतून भात गिळत्येहे. तुम्हाला शोभते का हे ?’’ बायजाई कडकडत म्हणाली, “मोठा आला आयषीचा कैवार घेणारा ! इथे काय चीजा वस्तू कुलपात घालून का ठेवल्या आहेत.पाच गळग्रहांची आईस झाली तरी अजून ओयऱ्याचा अंदाज नाही आणि मी म्हणत्ये, एखाद्या दिवशी संपले कालवण तर त्याला काय करणार? आमची सासू आम्हाला चार-चार दिवस उपाशी ठेवायची, तसे तर नाय्ये ना ? हिला दोन ठाव गाडाभर मिळते ऽऽ हे ना ? ’’
आजीचे वाक्ताडन ऐकून मनी पुढे आली,“आज्जी, किती खोटे बोलत्येस, आईला अंदाज नाहीओयऱ्याचा असे म्हणवते तरी कसे गो तूला .....डाळ-तांदुळ-तेल सगळे तू नाहीतर काकू दोघी काढून देता. तुम्ही ओयरून द्याल तेवढे आई रांधते. सकाळी पातळ भात खाऊन झाल्यावर वेस्वार-मेतकूटाचा डबा काकू न चुकता फडताळात टाकून कुलूप घालत्ये. कसल्या वस्तूला हात लावायची सत्ता आईला आहेच कुठे ?” आपले नाव निघालेले ऐकताच धाकटी काकू वादळत आली, “किती खोटारडी नि अघोचरी पोर ही ! न्हाती - धुती झालेली पोर पण जीभेला काही हाड, उद्या सासरी गेल्यावर काय दिवे लावणार आहे देवच जाणे ! ओयरा कमी वाटला तर अधिक मागून घ्यायला हिचे तोंड काय धरलेले आहे काय गो वेसवे ?” भडकलेली मनी हात ओवाळीत म्हणाली, “तु एवढी मोठी बायको नि ओसरीवर येऊन पुरूषांच्या पुढ्यात कसले अपशब्द उच्चारतेस, शोभते का तुला हे ? उगाच कांगावखोरपणाने काहीतरी शोभवून घेतले की झाले. घरात काय चालले आहे ते न कळण्या एवढी मी कुक्कुलं बाळ नाही आता ! पण काकू, तुझे नि आजीचे जे काय सुरू आहे ना,ते मात्र बऱ्याचे नाही. देव बघून घेईल. ’’
आता भांडण चांगलेच रंगात आले. काकु मनीला,आईला, भाऊंना अर्वाच्च शिव्या घालु लागली. “जावेन् करणी करून माझा पोटचा गोळा खाल्लान्.’’ धाकटी काकू गळा काढून रडायला लागली. पुरूष माणसे अस्वस्थ झाली. काका बायकोची कड घेऊन मध्ये पडला. त्याने विसूच्या फाऽड्फाऽऽड् मुस्काटात मारल्यान्. काकू-आजींना दुरूत्तरे केलीन् म्हणून आईने मनीला झोडून काढलेन्. दुपारच्या वेळी घरात नुसती लंका झाली.
शेवटी सगळ्याचे पर्यवसान वेगळेचारात झाले. चार भांडी-कुंडी,दोन मण भात आणि चौथ्या हिश्शाची पडझडातली जमिन देऊन अण्णा जोशानी थोरल्या मुलाला वेगळा टाकला. घराच्या मागील बाजूला एकखणी पडवीत त्याचे बिऱ्हाड झाले. सोनेनाणे, रोकड पैसा यांतली कपर्दिकसुध्दा भाऊला मिळाली नाही. उलट आईच्या गळ्यातले चार मणी नि दोन वाट्या असलेले वाखाच्या दोऱ्यात ओवलेले मंगळसुत्र तिच्या गळ्यातच होते म्हणून राहिले ! बाकी तिला माहेराहून लग्नात घातलेले दागिने - टिक्का,अंगठी,नथ,चार बांगड्या, पाटल्या तसेच भाऊंना दिवाळ सणाला दिलेला तीन तोळ्यांचा गोफ सगळे बायजाईच्या ताब्यात असायचे. भाऊंनी चाचरतच त्याची मागणी केली तर "आज इतकी वरसे सहा-सहा तोंडे आमच्या जीवावर तीन त्रिकाळ हादडता अहात त्याला काहीच खरचले नाय काय रे सोद्या ?" असे उत्तर बायजाईने दिले.
खंडाचे भात यायला अजून अवकाश होता. तोपर्यंत पेज घालून पोरांना जिते ठेवायचे, ते चालेल. रोजचा जाच तरी चुकला असाच विचार आईने केला. गुरांपैकी एक भाकड गाय नि एक म्हैस तीही मारकुटी आणि आई - भाऊं शिवाय कोणालाच दुध काढू द्यायची नाही म्हणून त्यांच्या वाटणीला आली. आईने दुधाचा रतीब घालायला सुरवात केली, तेवढेच चार पैसे हाती येतील ! कामाचा धिबिडगा आता कमी झाला. मोकळ्या वेळात द्रोण-पत्रावळी लाव, फुलवाती करून दे असली कामे करून आई पै-पैसा गाठीला लावू लागली. भाऊसुध्दा कष्टाळू. ते टकळीवर सुत काढून जानवी जोड करायचे. रोज डोळ्यानी टिपे गाळीत लाजिरवाणे जिणे जगण्यापेक्षा एक वेळ उपाशी राहणे परवडले असे आईला वाटायचे. काटकसरीच्या संसारातही ती सुख मानायची. तोंडाने सतत गणपतीचा जाप करीत आई आला दिवस आनंदाने साजरा करायची.
हां-हांम्हणता दिवाळी तोंडावर आली. प्राप्त परिस्थितीत बडेजाव जमणारा नव्हता. पोहे आणि रव्याचे लाडू एवढा मर्यादीत घाट आईने घातला. चकल्या-करंज्या करायच्या म्हणजे तेल जास्त लागणार ! त्यापेक्षाही बाळूला डागल्यापासून आईने करंजी वर्ज्यच केलेली. दिवाळी आली. सुट्टीत मुंबईतला मामा सहकुटंब येणार होता. म्हणून विसू आजोळीच ऱ्हायला. चाव दिवस उजाडला. न्हाऊन -धुऊन, पोहे-लाडू खाऊन पोरे पुढील दारी अंगणात खेळायला गेली.वेगळेचार झाले तरी अण्णा नातवंडाना हाक मारायचा. कधीतरी गुळाचा खडा हातावर घालून त्यांच्याकडून पाय चेपून घ्यायचा. बाळूला देवाची पुजा करायला बोलवायचा. धाकट्या दिवाकरला ओटीवर ठेवून बाळू, कुशी अंगणात खेळायला लागली.
धाकटी काकू उंबऱ्यात बसून खात ऱ्हायलेली. हल्ली तिला डोहाळे लागलेले. सारखी खाव खाव सुटायची,म्हणून वाटीत दोन चकल्या-कंरज्या घेऊन वाटी पदराआड धरून ती खात बसली. तेवढ्यात कोणीतरी फराळ मागायला आले. हातातली वाटी उंबऱ्याआड ठेवून पोहे आणायला धाकटी आत गेली. नेमका त्याचवेळी दिवाकर दाराजवळ पोहचला. उंबऱ्याआड वाटीतली अर्धवट खाऊन ठेवलेली कंरजी उचलून त्याने खायला सुरवात केली. पोह्यांची रोवळी घेऊन धाकटी बाहेर आली. तिने ठेवलेल्या वाटीतली करंजी खाताना दिवाकर दिसला मात्र तिचा जो भडका झाला, आधीच तिला त्याचा दुस्वास वाटायचा. रागासरशी दणदणत येऊन तिने दिवाकराला लाथ मारली. खळ्यात खेळणारी बाळू, कुशी बघितच राहिली. लाथेसरशी दिवाकर भिरकटत भिंतीवर आदळला. रडे फुटण्याआधी डोक्यावर अवघाती आपटल्यामुळे त्याने तडफडणारे मांजर 'क्यांव' करते तसा आवाज काढला नि तो बेशुध्द झाला. डोक्यावर खोक पडून रक्त वाहायला लागले. “आई-भाऊ ऽऽ धावा होऽऽ, काकूने दिवाकराला मारलेन् बघा या.” पोरांनी ओरड मारली. कुशी धावतच पुढे गेली. दिवाकरच्या डोक्यावर पडलेल्या जखमेवर हात दाबून धरला. आई -भाऊ धाव मारीत आले. पोराची अवस्था बघून आई माघारी जाऊन पाण्याचा तांब्या घेऊन आली.
अण्णांना एकसारखा परसाकडला जायचा चळ होता. ते खोरणात बसलेले असताना पोरांचा गलका ऐकल्यावर त्यांनीही आवरते घेतले. दिवाकरची दातखीळच बसलेली. आईने त्याच्या मस्तकावर पाणी थोपटले. एका हाताच्या कुळच्यात पाणी घेतले. दुसऱ्या हाताचे बोट त्याच्या दाढवणाकडे सारीत त्याची दातखीळ उघडण्याचा प्रयत्न केला. कुळच्यातले पाणी त्याच्या तोंडात घातले तरी पोर तोंड उघडीना. धास्तावलेल्या आईने त्याच्या छातीवर कान टेकवला. इवले काळीज भयाने धाड् धाड् उडताना ऐकल्यावर तिच्या जीवात जाीव आला आणि रडायचे तिला त्या वेळी सुधरले.
तोपर्यंत भाऊ कांदा घेऊन आले. कांदा फोडून हुंगवल्यावर पोराने डोळे उघडले.त्या क्षणी घट्ट वळलेल्या त्याच्या बाळमुठी उघडल्या. उजव्या हाताच्या मुठीतली करंजीची कड खाली पडली. त्याच वेळी अण्णा घरी आले. ओटीवरचा गलका बघून त्यांना पायावर पाणी घेऊन चुळ भरायलाही सुधरले नाही. कानावर जाानवे असलेल्या स्थितीतच ते पायऱ्या चढून वर आले. "काय झाले? ’’ अण्णांनी विचारले. मुले म्हणाली, "काकूने दिवाकरला लाथ मारून उडवलेन. डोक्याला खोक पडली नि दातखीळ बसली त्याची.’’ गप्प ऱ्हाती तर ती धाकटी काकूच नव्हे. पोरांच्या सांगण्यावर सारवासारवी करण्यासाठी ती म्हणाली, “मी मारे उंबऱ्याच्या आड म्हणून फराळाची वाटी ठेवली. पण या पोरांनाच मुळी अभरवणा झालेली. हा नेमका तिथे पावला. माझ्या हातात रोवळी होती म्हणून उगाच लाथेन् जरा ढोसल्यासारखे बरीक केले मी, त्याचा तोच मागे सरकून भिंतीवर आदळला. मी काय दिखी अतिरेकपणा नाय हो केलेलाऽऽ.”
धाकटीचे स्पष्टीकरण ऐकल्यावर मात्र शांत-संयमी भाऊ कमालीचे खवळले. “एवढ्या लहान अर्भकाला मारायला तुला लाथ उचलवली तरी कशी म्हणतो मी.... तु बाई आहेस की कैदाशीण?”असे म्हणत त्यांनी फाडकन धाकटीच्या कानशिलात भडकवली. काकू छाती पिटित बोंबा मारायला लागली. हे सगळे रामायण घडत असताना बायजाई घरात कुठे होती, सणवार कसलाही विचार न करता ती उपाध्ये वठारात गप्पाष्टकांना गेलेली.
आताशी पोरे पुढील दारी,ओसरीवर जायचीही बंद झालेली. आईने ओसरी पडवी दरम्यानच्या दरवाजाला कडी घालून तिथे लाकडी पेटारा ठेवला नि जा-ये करण्याचा मार्गच मुळी बंद केला. पोरांना पुढील दारी न जााण्याची ती तंबी द्यायची. बाळ्या देवपुजा करायला गेलाच तरी आई तो येईपर्यंत टकत राहायची. पूजा करून नैवेद्याचा गुळ न खाताच बाळ्या मागच्या पावली मागे यायचा. दिवाकरला तर ती नजरेआडच पातीत नसे. भाऊसुध्दा कारणा - कारणानेच ओसरीवर बसायचे. भाऊ, बायजाई नि दिनू काका मात्र काही दिवस गेल्यावर कोडगेपणाने मागीलदारी भाऊंच्या बिऱ्हाडात निरशा दुधाचा चहा घ्यायला हमखास यायचे. थोरलीचे करणे - करतव चांगले म्हणून बायजाई हक्काने आमटी-भाजी आपल्या हाताने वाटीत काढून न्यायची. धाकटी काकू मात्र मागील दारी फिरकतही नसे. भाऊंनी तिच्या कानशीलात मारले म्हणून अधून -मधून तिचा कान दुखायचा. जरा काही दुखले खुपले तरी त्याचे कारणसुध्दा धाकटी काकू तेच सांगायची नि शिव्याशाप द्यायची. “चुकून कुठे जरा धक्का लागला त्याचे रांडेच्यानी केवढे भांडवल केलेनी. त्यांच्या श्रापां मुळेच मला मुलगी झाली....”
फायनलची परीक्षा देऊन विश्वनाथ घरी आला. घरची ओढघस्तीची परिस्थिती त्याला गप्प बसू देईना. आपण नक्की फायनल पास होणार याची त्याला खात्री. पास झाल्यावर कुठेतरी शाळा मास्तराची नोकरी मिळण्याची आशा होती. तोपर्यंत कुठे दुकानात वगैरे काम मिळाले तर बघूया,असा त्याने भाऊंच्या पाठी लकडा लावला. भाऊंनी ओळख काढून विजयदुर्गच्या जांभेकरांकडे शब्द टाकला. त्यांची पेढी, धंद्याचा व्याप खुप मोठा. मुलगा सातवी झालेला आहे. हिशोब ठिशोब ठेवले अन् देवपुजा केलीन तरी पुरे असा विचार मामा जांभेकरांनी केला. जेवून- खाऊन महिना चार रूपये पगारावर विसू मामांकडे पेढीवर ऱ्हायला. मुलगा नेकीचा. त्याचे अक्षरही वळणदार, महिना भरातच त्याने मामांची मर्जी संपादन केली.
विसू सकाळी लवकर उठून आंघोळ, देवपूजा उरकून पेढीवर जायचा. हिशोब लिहिणे,अडी नडीला माल द्यायला मदत करायची, कौले मोजून द्यायची,दिसेल ते काम विसू न सांगता करायचा. दुपारी जेवण झाले की वामकुक्षी करणे टाळून विसू पेढीवर जायचा.घाऊक खरेदीदारांची यादी आली असेल त्याप्रमाणे जिन्नस मोजून ठेवायचा. मालाची पोती सारखी करायचा. बंदरावर कौलांची वखार होती तिथे खेप मारायचा. संध्याकाळी कंदील लावल्यावर मामा उठतील तेव्हाच त्यांच्या बरोबर तो घरी परतायचा. संध्याकाळी बाजारात फिरून ये,असे मामा सांगायचे पण विसू पेढी सोडून जायचा नाही. दरमहा चार रूपये पगार ठरला होता खरा पण पहिल्याच पगाराला मामांनी खुष होऊन सहा रूपये त्याच्या हातावर ठेवले नि ते म्हणाले, “उद्या घरी जाा. पैसे आईकडे देऊन तिच्या पाया पड. दोन दिवस रहा नि ये.” विसू घरी जायला निघाल्यावर मामांनी त्याच्या लहान भावंडासाठी खजूर,जर्दाळू, शेंगदाणे, शिवाय दोन रत्तल गुळ. रत्तलभर खडीसाखर, चहा पावडर,पायलीभर बारीक तांदूळ अशा वस्तू दिल्या.
विसू मामांच्या पेढीवर चांगलाच रूळला. आता हिशोबा बरोबर वसूलीची कामे करायलाही तो जायचा. विसूच्या गावचा गाडीवाला विठू अधून मधून बोटीचे पॅसेंजर पोहोचवायला न्यायला विजयदुर्गात जायचा. तो हटकून मामांच्या दुकानात विसूला भेटायला जायचा. विसूचा गाववाला म्हणून मामा दरवेळी त्याला पान सुपारी,तंबाखू द्यायचे. त्यांच्या पेढीवर विसूचे वजन आहे हे बघून तो सुखवायचा. त्याचा मोठेपणा, खुशाली घरी आई-भाऊंना सांगायचा. घरी लागणारा जिन्नस आई विठूकडे कळवायची. विठू आला की, मामा जातीनिषशी चौकशी करून स्वतः माल मापून द्यायचे.
हळूहळू दिवाळी जवळ आली. एक दिवशी मामा त्याला म्हणाले,“अरे विश्वनाथ,दिवाळीचा सीझन म्हणजे आमच्या दृष्टिने फार्वमहत्वाचा. दिवाळीत तू पेढीवर हजर हवास. दिवाळीपूर्वी चार दिवस तू जिन्नस घेऊन घरी जाऊन ये. मग भाऊबीजेच्या दिवशी तू घरी गेलास, नी चार दिवस राहिलास तरी चालेल. लक्ष्मी पूजनाला सगळी खाती बदलायची असतात. बरीच लिखापढ करावी लागते.” दिवाळीपूर्वी चार -सहा दिवस मामांनी विठू गाडीवाल्याला वर्दी दिली. विठू गाडी घेऊन पेढीवर आला. मामांनी स्वतःच्या मनानेच सामानाची यादी केली. स्वतःच्या देखरेखी खाली जिन्नस नीट पोत्यात बांधून गाडीत चढवून दिले. दुपारी विठू त्यांच्याकडेच जेवला. जेवण झाल्यावर, “तू सामान घेऊन घरी जा. उद्या रहा नि परवा परत ये .”असे सांगून मामांनी विसूला घरी पाठवले. विसू घरी पोहोचेपर्यंत संध्याकाळ झाली. सामानाची बोचकी घरी आणून पोहोचवल्यावर विठू घरी गेला. रात्री जुड्या पुड्या सोडताना आईची कोण धांदल उडाली. सामानात फुलबाजे, चंद्रज्योती नी फटाके बघितल्यावर कुशी,बाळ्या,दिवाकर नाचायलाच लागली. भाऊंनी गुळाची ढेप फोडायला घेतली.
सामानसुमान आलेले बघितल्यावर भाऊ नि बायजाई दोघे मागील दारी येऊन बसली. दोघांनाही बचकभर गुळ खाल्ला. एक भला मोठा गुळाचा खडा उचलून,“ इथे चांगला गुळ मिळत नाय. मला खायला होईल...”असे म्हणत बायजाई उठली. अण्णा मात्र, “आज मी इथेच जेवतो. सुनेने विसूसाठी कायतरी केलेन तर आमचीही सोय होईल. चार घास चवीरवीने खाईन,” असे म्हणत तिथेच थांबले. रात्री जेवणे उरकल्यावर निजाानिज झाली. विसू आईजवळ आडवा झाला. आई त्याला एका हाताने थोपटायला लागली. अकस्मात आईचा हात धरून काहीतरी आठवल्यासारखे करीत विसू उठून बसला. “आईऽऽ रागावणार नसलीस,रडणार नसलीस आणि होय असे वचन देत असशील तरच एक गोष्ट सांगेन म्हणतो." त्यावर आई म्हणाली, “होय रे ऽऽ बाबा ऽऽ होय! एवढे काय सांगणारेस ते सांग बघू . दिले मी वचन.” विसू म्हणाला, “आईऽऽ यंदा कंरज्या कर! आणि यंदाच्या दिवाळीपासून तू सुध्दा कंरज्या खायला लाग!”
विसूचे बोलणे ऐकून आई अवाक् झाली. क्षणभर कोणीच काही बोलले नाही. आईचे रडे सुरू झाले नाही, त्यामुळे धीर चेपून विसू पुढे बोलला, “आईऽऽ देवाच्या दयेने आता चांगले दिवस आले. यापुढे तुझे दैन्य आणि वनवास संपले असे समज! माझे एवढे ऐकच. ह्या करंज्यानी इतके रामायण-महाभारत घडविले. यंदा त्याचे उट्टे फेडण्यासाठी मुद्दाम करंज्या कर !” आई मनात म्हणाली की, विसू आता पोर ऱ्हायला नाही. तिला आतून कढ आले. पण वचन दिले होते म्हणून आणि पोर अभिमानी आहे, या वयात याला केवढी समज आली ! आता त्याचे ऐकायला हवे, असा विचार करून आलेले कढ जिरवून डभर हसत आईने कबुली दिली. “मामांनी उद्या राहायला सांगितले आहे. पण पेढीवर दिवाळीच्या खरेदीची गर्दी असणार, मला राहून चालायचे नाही ”असे सांगून विसू गाढ झोपला. कैक वर्षानी आईलाही बिनघोर झोप आली.
लक्ष्मीपूजनाची गडबड पूर्ण झाली. दिवाळीच्या दिवशी मामांनी सगळ्याच नोकरांना पगार आणि दिवाळी भेटवस्तू दिल्या. त्यांचा तो सालाबाद रिवाजच असायचा. विसुला उत्तम मस्राईज धोतराचे पान आणि सदर्‍याचे कापड दिले. त्याचा पगार वाढवून सहा ऐवजी नक्त दहा रूपये विसूच्या हातात ठेवीत मामा म्हणाले, "विसू, तुझ्या सामानाचे बिल खात्यावर टाकू . पुढच्या महिन्यापासून दरमहा हप्त्याने कापून घेऊ. या वेळी सणा सुदीला पुरी रक्कम घरी ने आणि हो ऽऽ आज संध्याकाळी तू घरी गेलास तरी चालेल. भाऊबीज करून सावकाश परत ये ” संध्याकाळी काळवे पडण्यापूर्वी विसू घरी पोहोचला. तो पाय धुवून आईच्या पुढ्यात जाऊन बसला. भिंतीच्या कडेने मांडलेल्या टोपल्यांवरचे केळीच्या पानाचे फाळके बाजूला करून आईने त्याला फराळाचे जिान्नस दाखवले. “विसू, दोन दिवस आल्या-गेलेल्याला भरभरून फराळ वाटला, त्यानेच माझे पोट भरले. विसू, बाकीच्यांना वाटल्या खऱ्या पण मी काही अजून करंजी खाल्लेली नाही. म्हटले, तू आलास की दोघांनी मिळून कंरज्या खायच्या.”

आई उठली. तिने सगळ्या मुलांना हाका मारून प्रत्येकाला करंजी दिली. भाऊ-विसू यांना वाटीतून दोन-दोन कंरज्या दिल्या. स्वतः एक कंरजी घेतली. सगळीजण आनंदात करंजी खायला लागली. करंजीचे टोक मोडून तोंडात घातल्यावर मात्र आईला रहावेना. तिचे रडे डोळ्यांबाहेर आले. विसूसकट सगळेच एकदम गप्प झाले. मग पदराने डोळे टिपीत आई म्हणाली, “अरे खुळ्यांनो, गप्प का झालेत. माझे रडे आनंदाचे आहे. या करंजीचे इजा-बिजा झाले! तिजा काय होतो याचा घोर लागला होता माझ्या जीवाला. पण देव अगदीच कृतघ्न नाही बरे ! तिसरी करंजी आनंद-ऐश्वर्य घेऊन लक्ष्मीच्या पावलाने आली. पोरांनो,एक लक्षात ठेवा ! यापुढे दिवाळीलाच नव्हे प्रत्येक सणावाराला घरात करंजी झालीच पायजे. मी आहे तोपर्यंत करीनच, पण माझ्या माघारी तुम्हीसुध्दा माझा हा वसा म्हणून सांभाळा!”
तिन्हीसांजा होत आलेल्या. आईने देवापुढे समई लावली. नेसण-खोचण ठाकठिक केले. मग रोवळीत भरून कंरज्या आणि सोबतीला दिवाकरला घेऊन आई धाकटीकडे गेली. धाकटी मुलीला मांडीवर घेऊन झोप्या काढीत बसलेली. करंज्या भरलेली रोवळी सास्वेपुढे ठेवून आई म्हणाली,"यंदा विसूच्या कष्टांवर चार जिन्नस धादूसपणे करता आले. वेगळी ऱ्हायल्ये खरी,पण तुमच्या आशीर्वादाने बरे दिवस आले. म्हटले आता अढी नको.” रोवळीभर कंरज्या बघून सासू चाट झाली. “अगोबायो, इतक्या करंज्या? सगळ्याच भरून आणल्यास की काय ? पोरांना तरी चार राखून ठेवल्यास की नाय ?”
मग तोंडभर हसत आई म्हणाली, “असे कसे? ठेवल्या तर! त्यांना तर आधी हव्या. यंदा भरपूर केल्या आहेत करंज्या. विसूने हे इतके जिन्नस आणून टाकलेन्. म्हटले यंदा तरी जरा हात सोडून करूया. सासूबाई ऽऽ मी इतक्या दिवाळ्या बघितल्या, इतक्या दिवाळ्यांना फराळाचे केले पण यंदा मात्र मला करंज्या केल्यासारख्या वाटल्या !”
◙ ◙ ◙ ◙ ◙ ◙ ◙ ◙