Dashanan in Marathi Comedy stories by Jyotindra Mehta books and stories PDF | दशानन

Featured Books
  • द्वारावती - 73

    73नदी के प्रवाह में बहता हुआ उत्सव किसी अज्ञात स्थल पर पहुँच...

  • जंगल - भाग 10

    बात खत्म नहीं हुई थी। कौन कहता है, ज़िन्दगी कितने नुकिले सिरे...

  • My Devil Hubby Rebirth Love - 53

    अब आगे रूही ने रूद्र को शर्ट उतारते हुए देखा उसने अपनी नजर र...

  • बैरी पिया.... - 56

    अब तक : सीमा " पता नही मैम... । कई बार बेचारे को मारा पीटा भ...

  • साथिया - 127

    नेहा और आनंद के जाने  के बादसांझ तुरंत अपने कमरे में चली गई...

Categories
Share

दशानन

त्याने डोळे उघडले व सगळीकडे बघितले, पण जागा अपरिचित वाटली. त्याने तिरकस नजरेने बाकीच्या डोक्यांकडे बघितले. बाकीची नऊ डोकी अजून झोपली होती. त्यांना झोपलेले बघून त्याला लक्षात आले की तो पुन्हा पृथ्वीवर आला आहे. त्याला चांगलेच ठाऊक होते की पृथ्वीवरच त्यांच्या सोबतचा तालमेल बिघडतो.

"अरे आळश्यानों उठा आता पाहाट झाली आहे. सुप्रभात ! बघा सूर्यनारायण पण आपल्या कडे बघत आहेत. आपण भुतलावर आहोत. नेमके कुठे आहोत हे बघावे लागेल." त्याने बाकीच्या डोक्यांना जागवायला हे सांगितले.

त्याच वेळेस दुरून एक आवाज आवाज आला. त्याचे कान टवकारले. त्याने ऐकण्यासाठी स्वतःचे लक्ष आवाजावर केंद्रित केले आणि त्याला ऐकू आले 'नारायण नारायण'. त्याला लक्षात आले की नारद मुनी तिकडे येत आहेत. त्याने सगळ्यांना जागवायला जवळच्या डोक्यावर टापली मारली.

असे करताच जिवाच्या डोक्याने खाडकन डोळे उघडले व रागाने बोलले, "कोण आहे दृष्ट? कोणाचे मृत्यू जवळ आहे? या दशाननाच्या मस्तकावर आघात करण्याची हिम्मत कोणी केली? ये मैदानात ! मी युद्धासाठी तयार आहे."

त्याच्या आवाजाने सगळी डोकी जागृत झाली होती. पहिले डोके बोलले, "सहाव्या मस्तका, मी आधी पण सांगितले होते, या चौथ्या मस्तकाला आधीच छाटले असते तर आपण मेलोच नसतो. हेच नेहमी युद्ध युद्ध करत असते. मी किती विनवण्या केल्या पण या चौथ्या आणि पाचव्या मस्तकाच्या प्रभावात कुणी माझे ऐकले नाही. या पाचव्या मस्तकाला सर्वशक्तिमान असल्याचा घमेंड आहे. रामाने मग कशी जिरवली!"

मधल्या डोक्याला हे ऐकवले नाही ते लगेच बोलले, "कोणताही विरोध चालवून घेणार नाही, मी सर्वशक्तिमान होतो, आहे आणि राहणार."

पहिल्या डोक्याच्या शेजारी असलेले दुसरे डोके बोलले, "सर्वशक्तिमान ! डोंबल्याचा सर्वशक्तिमान ! तुला माहित आहे का, तुम्हा तिघांच्या निर्णयामुळे इतिहास आपले नाव नायकच्या ऐवजी खलनायक म्हणून ओळखते. चौथ्याची भांडणाची वृत्ती, पाचव्याची स्वतःला महान समजण्याची वृत्ती आणि सातव्याची सगळ्यांना अपमानित करण्याची वृत्तीमुळे कोणी ही आपल्या मुलाला आपले नाव देत नाही. किती लाजिरवाणे आहे हे. इतका वेदाभ्यास या तिघांमुळे धुळीत मिळाला. हे सातवे प्रत्येक वेळेस विभीषणाचा अपमान करीत होते. असे केले नसते तर त्याने दुश्मनाची साथ का दिली असती पण याला मस्ती फार ना!"

हे ऐकून सातव्या डोक्याचा पारा चढला, ते चिडून बोलले, "तुमच्या सारख्या कायर मस्तकां सोबत जगण्या पेक्षा मरण बेहत्तर! आपण केलेच काय होते? आपल्या बहिणीचे नाक कापणाऱ्या राजकुमारां सॊबत असलेल्या स्त्रीचे अपहरण करून त्यांचे नाक कापले होते. त्या नंतर रणांगणामध्ये युद्धात मृत्यू पत्करला होता. रणांगणामध्ये वीरगती पत्करलेल्या वीराला कोणी खलनायक कसे म्हणू शकते? हा विजेत्यांकडून झालेला अन्यायच आहे. आपण त्या स्त्रीला स्पर्श सुद्धा केला नव्हता."

ही चर्चा रंगायच्या आधीच नारदमुनी तिकडे पोहोचले होते. त्यांना बघून सगळी डोकी शांत झाली. त्यांना चागंलेच ठाऊक होते की नारदमुनी फक्त 'क' ऐकून संपूर्ण बाराक्षरी रचू शकतात.

त्यांना बघताच आठव्या मस्तकाने पुढाकार घेतला. अतिथींसोबत नेहमी तेच बोलायचे कारण त्याची भाषा गोड होती व कुणाची प्रशंसा करण्यात ते पटाईत होते. ते बोलले, "प्रणाम मुनीवर, दशाननाचा प्रणाम स्वीकार करा."

नारदमुनी हसले व बोलले, "आशीर्वाद दशानन, पण काय आशीर्वाद देऊ बरं! आयुष्यमान भव असा आशीर्वाद तर देऊ शकत नाही. आज इकडे येण्याचे प्रयोजन काय आहे?"

"बाला, याला पलव  हिकडून, डोके फिरवनार आपले." सातवे डोके बडबडले.

तो आवाज नारदमुनी पर्यंत पोहोचला नाही आणि त्याची बडबड वाढायच्या आधीच आठवे डोके हळूच त्याच्या कानात बोलले, "आपण पृथ्वीवर आलो आहोत, कोकणात आहोत असे कुणी बोलले आहे का? जरा भाषा सांभाळ तुझी. मी बोलून याला पाठवून देतो."

नंतर आठवे मस्तक नारदमुनी समोर बघून हसले व म्हणाले, "मुनीवर, हे तर आम्हाला पण ठाऊक नाही. रात्री महादेवचे दर्शन करून झोपलो आणि डोळे उघडले तेव्हा इकडे होतो. हा प्रदेश कोणता आहे हे आम्हास सुद्धा माहीत नाही. दूर असलेल्या पहाडी बघून वाटत आहे कि पहाडी प्रदेशात आहोत."

नारदमुनीने हातात असलेल्या चिपळ्या खडकवल्या आणि बोलले, "याचा अर्थ आपणास कोणतीही सूचना मिळाली नाही. असो, चिंता करण्याचे काहीही कारण नाही. आपण माझ्यामुळे इकडे आला आहेत. हा प्रदेश म्हणजे मायानगरी म्हणून प्रख्यात असलेल्या मुंबईच्या गोरेगाव येथील फिल्मसिटी आहे. माझा एक मित्र आपल्यावर एक चित्रपट बनवीत आहे आणि आपल्या चरित्रावर प्रकाश पाडण्यासाठी त्याला मदतीची गरज आहे. मग या साठी आपल्याहून अधिक कोण मदत करू शकते! असा विचार आला आणि मी महादेवांना विनंती करून तीन दिवसांसाठी आपणास इकडे बोलावले आहे."

सातवे मस्तक आठव्याच्या कानात बोलले, "मले काय वाटते, या भैताडा मुळेच फसलो. पाठीत गदा मारून याले फोडू का?"

आठव्या डोक्याने सातव्याच्या डोक्यावर टपली मारली आणि बोलले, "आपण मुंबई मध्ये आहोत, विदर्भात नाही. तू एकदम गुपचूप बस. चुकीचे सल्ले देणे बंद कर." त्या नंतर त्याने बाकीच्या डोक्यांकडे बघितले.

पहिले डोके शांतपणे सगळे ऐकत होते आणि दुसऱ्या व तिसऱ्या डोक्याची नजर नारदमुनी ऐवजी पहाडी आणि झाडांवर वर होती.

आठवे डोके अजून काही बोलेल त्या आधी दहावे डोक्याने नारदमुनीनां विचारले, "तुमच्या मित्राला गायकाची गरज असेल ना? मी ऐकले आहे की हिंदी चिंत्रपटात गाणी असतात."

सातवे डोके दहाव्या डोक्याला झापत म्हणाले, "ए क्या बोल रेईला भिडू, अपन कोन हे मालूम ना! अपन रावण है, कोई दो टके का गवैया नै, समज रेईला ना बाप!"

आता पर्यंत शांत असलेले नववे डोके चिडले आणि बोलले, "या मुर्खाला कोणी तरी शांत करा. नारदमुनी काही महत्वाचे सांगत आहे आणि हा पुन्हा पुन्हा मुखक्षेप करत आहे. एकदम गप्प हो." 

"शट अप, नॉन्सेन्स" सातवे मस्तक बडबडले.

चर्चा वेगळ्या दिशेने जातांना पाहून पाचवे डोके म्हणाले, "मुनीवर, चला आपण तुमच्या मित्राला भेटून त्याची मदत करू. महादेवांनी सांगितले म्हणजे मदत करायलाच हवी."

इतके सांगून दशानन चालू लागला पण नारदमुनी स्वतःच्या जागेवरून हलले नाही. थोड्यावेळाने ते बोलले, "दशानन, या अवतारात गेलात तर तो घाबरून जाईल. वेळकाळ अनुसार बदल करायला पाहिजे. त्याच्या समोर एकाच मस्तक घेऊन चला, नाहीतर तो यमसदनी पोहोचून जाईल, नारायण नारायण."

नारदमुनींचे म्हणणे ऐकून रावणने चुटकी वाजवली आणि त्याचा वेष बदलून गेला. आता त्यांच्या समोर जीन्स आणि पांढरा शर्ट घातलेला एक डोक्याचा रावण उभा होता.

"बोलणे मी करणार, मला गाणे गायायचे आहे." आतून एक आवाज आला.

"ए येडे चूप बैठ, तेरे भेजे में मेरा बात नेई घुसेला क्या!"

"सगळे शांत व्हा, सगळे बोलणे आठवे मस्तक करेल आणि हा माझा आदेश आहे. जो ऐकणार नाही त्याला छाटून टाकेन." पाचव्याचा आवाज येताच सगळे शांत झाले.

नारदमुनीने पण टिचकी वाजवली आणि त्यांचा पण कायापालट झाला. त्यांच्या जागी एक मॉडर्न युवक उभा होता ज्याच्या गळ्यात गिटार होती व घुडघ्यावर फाटलेली जीन्स व ठीकठिकाणी ठिगळ लावलेला टीशर्ट. कुरळे केस खांद्यावर झुलत होते. ते रॉकबेंडचे गिटारिस्ट वाटत होते.

"कम ऑन बडी." इतके सांगून ते निघाले.

"मुनीवर, हा काय वेष आहे?"

"हे बडी, कॉल मी नारी" इतके बोलून पहिले व चौथे बोट हवेत झुलवले.

"इसका खिसक गेईला है, मै बोलता वापस चलो भिडूलोक, अपन फस जायेगा." असा आवाज आतून आला, पण समोर असलेल्या आठव्या डोक्याने विचारले, "पण मुनीवर, नारी म्हणजे स्त्री ना?"

वेगात चालत असलेले नारदमुनी थांबले व मानेला झटका देऊन केस झुलवले व म्हणाले, "छोट्या नावांची फेशन आहे. मी त्यांना माझे नाव नारद आहे असेच सांगितले होते पण त्यांनीच ते छोटे करून टाकले. एनी वे आपल्याला लेट होत आहे. लवकर चला."

ते थोड्याच वेळात एका स्टुडिओच्या गेट समोर होते. नारदमुनी रावणाला म्हणाले, "बडी, तुम आज जाओ, मैं तुरंत आता हूँ." इतके सांगून एका दिशेने निघून गेले.

रावण त्या गेट समोर सरसरावाला. गेट जवळ जाऊन तिकडच्या गार्डला म्हणाला, "वत्स, हा फाटक उघड मला आतमध्ये जायायचे आहे."

गार्डने वरून खालती रावण कडे बघितले, "असा नाही जा सकता आत."

"मला खूप दुरून बोलावले आहे, माझ्या सल्ल्यासाठी." आठवे डोके खूप शांततेने म्हणाले.

"देखो भाऊ, हा गार्डन नाही है. इकडे फक्त पैचानवाला जा सकता." गार्डने भोजपुरी आणि मराठीची भेळपुरी बनवली.

"आठव्या मस्तका, हे असे नाही ऐकणार. मला बोलू दे त्याच्याशी." आतून चौथे डोके बोलले.

गार्ड तो गेला नाही म्हणून रंगात बोलला, "देख भाऊ, तुमरा सारखा लोक खूप येतात ओर अंदर जाऊन त्रास देतात. तुम गेला नाही तर दोन दंडा लागावेगा."

प्रकरण वाढणार तेवढ्यात नारदमुनींचा तिकडे प्रवेश झाला आणि ते बोलले, "अरे गजोधर, वो मेरे साथ है, गेट खोलो."

नारदमुनींना बघता च गजोधरने सलाम ठोकून गेट उघडले व दोघे आतमध्ये गेले. नारदमुनी दशाननला एक बिल्डिंग मध्ये घेऊन गेले. पहिल्या मजल्यावर असलेल्या एका ऑफिस मध्ये दशाननला नेले. त्या ऑफिस मध्ये एक टेबल होते व दोन्ही बाजूला चामड्याचे कव्हर असलेल्या खुर्च्या होत्या. मागे एक शोकेस होता ज्या मध्ये काही फ्रेम केलेले सर्टिफिकेट व काही ट्रॉफी सजवून ठेवलेल्या होत्या. भिंतीवरती काही कलात्मक चित्र व एक दोन चित्रपटाचे पोस्टर होते. टेबल वरती कागदे अस्तव्यस्त पडलेली होती. खुर्च्या रिकाम्या होत्या व शेजारी एक सोफा होता त्या मध्ये एक युवक युवतीच्या मांडीवर डोके टेकवून आडवा झालेला होता. त्याचे डोळे बंद होते. दशाननला असे येणे थोडे विचित्र वाटले.

नारदमुनींने त्याच्या कडे बघितले व बोलले, "हे प्रॅक्सी, मी सांगितले होते ना कि माझा एक मित्र आहे ज्याने रावणावर पीएचडी केली आहे. हा तो च आहे."

युवतीचे आधी लक्ष नव्हते पण जसे नारदमुनी बोलले, तिने प्रॅक्सीच्या केसांवर हात फिरवणे बंद केले व खाडकन उभी झाली. डोक्याला लागलेल्या झटक्याच्या बातम्या आराम करीत असलेल्या धडाला लगेच नाही मिळाल्या त्या मुळे संतुलन बिघडले आणि धडाने सोफ्यातून जमिनीकडे झेप घेतली आणि डोके सोफ्यावर टिकून राहिले. ती युवती प्रॅक्सीला पडलेला बघायला थांबली नाही व दरवाज्यातून बाहेर पळून गेली.

खालती पडलेला प्रॅक्सी स्टाईल मारत उभा झाला आणि बोलला, "नारी, यार बघायचे तरी! कशीबशी सेटिंग झाली होती! उगाच घाबरवले तिला. अपकमिंग ऐक्ट्रेस आहे, कोणीतरी असा फोटो काढून वायरल करेल या भीतीने पळाली. आधी तिला सांगून देतो घाबरायचे काही कारण नाही." असे बोलून त्याने टेबलवर ठेवलेला फोन उचलला आणि नंबर डायल करून बोलू लागला. तो एवढ्या हळू आवाजात बोलत होता की नारदमुनींना फक्त हनी आणि बेबी हे दोनच शब्द कळले.

मोबाईल ठेवताच त्याने दशानना कडे बघितले आणि बोलला, "सो बडी, यु आर ध वन. तर काय इन्फॉर्मेशन आहे तुझ्याकडे  रावण बद्दल?" इतके सांगून तो टेबलच्या मागे असलेल्या खुर्ची मध्ये बसला व समोर असलेल्या खुर्ची मध्ये बसायला इशारा केला.

आठव्या डोक्याने शांत रहात विचारले, "आधी मला सांगा तुम्हाला रावण बद्दल काय माहित आहे आणि त्याच्या जीवनातल्या कोणत्या बाजू बद्दल जाणून घ्यायचे आहे?"

"रावण बद्दल तर सर्वांना माहित आहे. तो राक्षस होता आणि त्याची हाईट सात फूट पेक्षा जास्त होती. त्याच्या डोक्यावर शिंगे होती, त्याच्या तोंडांतून शूळासारखे दोन दात बाहेर होते त्याच्यातून नेहमी रक्त टपकायचे. त्याचे पोट गागरी एवढे मोठे होते व त्याला दहा डोकी होती."

चौथे डोके आतमधून जोर लावू लागले आणि बोलले, "मार साले को." पण आठव्याने ताकदीने त्याला दाबून टाकले.

प्रॅक्सीचे लक्ष त्याच्यावर नव्हते. तो खुर्चीमधून उभा झाला व सिगरेट शिलगावून आपल्या धुंदीत पुढे बोलू लागला, "हे सगळे तर रामायण सिरीयल मध्ये पूर्ण जगाने बघितले आहे. मी त्याचा लूक चेंज करणार आहे. मी ऑलरेडी एनिमेशनवाल्याला कामावर लावले आहे. गागरी एवढ्या पोटवल्याला हिरो म्हणून कोणी एक्सेप्ट करणार नाही. मी सिक्स पेक एब देणार आहे आणि डेंजर लूक साठी मोठी दाढी. यु नो आजकाल बियर्ड इझ इनथिंग, गर्ल्स लाईक इट. एकदम रागीट आणि सायको दाखवेन. थोडा ग्रे शेड देणार आहे मी."

नेहमी शांत राहणारे आठवे डोके आता चिडू लागले होते. त्याच्या चेहऱ्या कडे बघून नारदमुनी लगेच समजले म्हणून विषय वळवायला त्यांनी विचारले, "लूक तर ठीक आहे, स्क्रिप्ट मध्ये काय आहे?"

हा प्रश्न ऐकताच प्रॅक्सी शून्यामध्ये बघू लागला आणि बोलला, "एक दोन आयडिया आहेत पण राइटरांना मी फॉरेनच्या वेबसिरीज बघायला सांगितले आहे. स्क्रिप्ट लगेच तयार होईल. मला एकदम भव्य मूव्ही बनवायचा आहे. बजेट अडीजशे कोटी आहे. डोळे दिपले पाहिजे लोकांचे. पण त्या आधी यु नो, रावणचा सोल पकडायचा आहे. तुझ्या मित्राचे नाव काय आहे?"

"दशानन" नारदमुनी उत्तरले.

"लूक दशु, मला एकदम सॉलिड रावण क्रिएट करायचा आहे. रामायण सिरीयल सारखा सिम्पल व्हिलन नाही, कॉम्प्लेक्स इमोशनवाला रावण प्रेक्षकांसमोर उभा करायचा आहे. अगदी लुसीफर सारखा यु नो. कधी काय करेल त्याचा अंदाज कोणाला यायला नको. त्याला खूप शेड्स द्यायचे आहेत. पीपल लव्ह सर्प्राइझेस यु नो!"

स्वतःचे दशु नाव ऐकून आतून हसण्याचा आवाज आला.

प्रॅक्सी अजून बोलतच होता, "एकदम सायको दाखवायचा आहे, अगदी त्या के. जी. एफ. च्या रॉकी सारखा. एक मस्त स्टोरीलाईन आली माईंड मध्ये. लहानपणी रावणची स्ट्रगल दाखवू.  त्याचा बाप त्याच्या मॉमला सोडून दुसऱ्या बाई कडे जातो. ती एकटीच लहान मुलांना वाढवते. रावणची मॉम त्याला शिकवेल कोई काम छोटा नही होता. थोडा मोठा होऊन रावण स्वतःची गेंग बनवतो आणि सावत्र भावाच्या गेंग म्हणजे त्याच्या राज्यावर हल्ला चढवतो आणि त्याला पळवून लावतो. वोव्ह! मस्त स्टोरीलाईन, यु आर लकी चार्म. तू येताच मला सुचू लागले.  शाबास यार." नारद आणि रावणला कळले नाही के तो त्यांच्याशी बोलत आहे की एकटाच बडबडतोय.

निराश झालेले आठवे डोके आतमध्ये निघून गेले व चौथे डोके बाहेर आले. त्याने बाहेर येताच टिचकी वाजवली आणि रावण स्वतःच्या मूलस्वरूपात आला. त्याने हातात असलेली गदा प्रॅक्सीच्या पृष्ठभागावर मारली आणि त्याच्या फटक्याने तो धाराशायी झाला.

नारदमुनींनी पटकन दरवाजा बंद केला.

रावण बुलंद आवाजात बोलू लागला, "तुला काय वाटतेय मूर्ख माणसा! मला सायको दाखवणार आहेस? मी चार वेदांचा ज्ञाता, महापंडित, महान शिवभक्त, शिवतांडव स्तोत्रचा रचयिता, पौलतस्य वैश्रवण दशानन लंकेश रावण. मी काय आहे हे ईश्वरांना सुद्धा कळले नाही तर तू काय समजणार! मी ज्ञान माझे पिता विश्रवा कडून मिळवले. त्यांनी माझी साथ कधीच सोडली नाही. दुसऱ्या चित्रपटांची कथा एकत्र करून माझ्यावरती चित्रपट बनवायचा आहे. तुला चित्रपटच बनवायचा आहे तर बनव, पौराणिक कशाला? माझे दहा मस्तके आहेत आणि सगळ्यांचे रंग वेगळे आहेत. परत जर माझ्यावर किंवा इतर कोणत्याही पौराणिक पात्रावर चित्रपट बनवला तर याद राख गदा आज मारली तशी हळू नाही मारणार. चला मुनीवर."

बाहेर येईपर्यंत रावण सामान्य रूपात आला होता. नारदमुनींच्या चेहऱ्यावरती स्मित होते. त्यांचे मिशन सफल झाले होते.

"आता आदिपुरुष बनविणाऱ्याची पाळी!" इतके मनात बोलून रावणच्या मागे निघाले.