Shidori in Marathi Classic Stories by श्रीराम विनायक काळे books and stories PDF | शिदोरी

Featured Books
  • નિતુ - પ્રકરણ 64

    નિતુ : ૬૪(નવીન)નિતુ મનોમન સહજ ખુશ હતી, કારણ કે તેનો એક ડર ઓછ...

  • સંઘર્ષ - પ્રકરણ 20

    સિંહાસન સિરીઝ સિદ્ધાર્થ છાયા Disclaimer: સિંહાસન સિરીઝની તમા...

  • પિતા

    માઁ આપણને જન્મ આપે છે,આપણુ જતન કરે છે,પરિવાર નું ધ્યાન રાખે...

  • રહસ્ય,રહસ્ય અને રહસ્ય

    આપણને હંમેશા રહસ્ય ગમતું હોય છે કારણકે તેમાં એવું તત્વ હોય છ...

  • હાસ્યના લાભ

    હાસ્યના લાભ- રાકેશ ઠક્કર હાસ્યના લાભ જ લાભ છે. તેનાથી ક્યારે...

Categories
Share

शिदोरी

शिदोरी


बाळुच्या दत्तकविधानासाठी त्याचे म्हातारे वडिल बापू आणि वडिलभाऊ अण्णामास्तर दामल्यांच्या वाड्यात आले. आपल्याला बघून बाळू धाव मारीत येईल, आपण त्याला पोटाशी घेऊ, बाळू हमसा

हुमशी रडत म्हणेल,“बापू ऽऽऽ मी दत्तक गेलो तरी तुम्हाला विसरणार नाही. महिना-पंधरा दिवसांनी घरी खेप करीन.”अशी बापूंना तर खात्री! पण कसचे काय, दामल्यांचा प्रशस्त वाडा,गडगंज इस्टेट यांत बाळू एवढा मश्गुल की साधे ‘केव्हाआलात?’ इतके विचारायलाही त्याला फावले नाही. अपमानाची लाजिरवाणी बोचणी बापूंचे काळीज कुरतडायला लागली. पण आतड्याची माया भोळी ! पोराने जवळ येऊन बसावे,चार शब्द बोलावेत ही इच्छा बापूंच्या मनात पुनःपुन्हा उफाळून यायची. बापूंची ही तगमग अण्णा मास्तरांनी बरोबर ओळखली. त्यांना स्वस्थ बसवेना. मान - अपमान बाजुला ठेवून रात्री त्यांनी बाळूला गाठलेच. बाळू नाइलाजाने बापाजवळ येऊन टेकला. “बाळू, अरे, बापूंशी दोन शब्द बोल तरी. ” न राहवून अण्णा म्हणाले. मग बाळू बोलला, “अण्णा, बापुंची तब्येत तितकीशी बरोबर वाटत नाही. त्यांची उगाच देसरड कशाला काढलीस ? तु एकटा येतास तरी पुरे होते.” तेवढ्यात बाळुच्या दत्तक बहिणीची हाक आली अन् लगबगीने बाळु आत गेला.
दामल्यांचे इष्टमित्र, पाहुणे सगळी तालेवार मंडळी. नोकरांनी गाद्या घालून दिल्या अन् एकेकजण आडवा व्हायला लागला. अण्णा आणि बापू बाहेरच्या ओसरीत कोपरा धरून राहीलेले. त्यांच्या अंथरूणा - पांघरूणाची व्यवस्था कोण करणार? लाज-भीड सोडून अण्णांनी एका गड्याला बोलावून विचारले तेव्हा त्याने आतून एक अर्धे फाटके जाजम आणून दिले. ते पसरून नेसूच्या धोतराचा सोगा पांघरूणासारखा ओढून बापलेक झोपले. दिवसभराच्या दगदगीने बापुना पटकन झोप लागली. पण अण्णाच्या डोक्यात मात्र विचारांचे काहूर उठले.
या बाळुसाठी किती खस्ता खाल्ल्या.त्याच्यावर पोटच्या पोरासारखी माया केली. बाळु खुप शिकेल, बॅरिस्टर होईल ही आपली इच्छा! चांगले शिक्षण मिळेल म्हणून त्याला राजापुरात ठेवला! राहायची, जेवायची राजेशााही सोय सान्यांकडे लावून दिली. महिना तीन रूपये अक्षरशः पोट मारून दिले. त्याचे मात्र बाळूने चीज केले. सातवीच्या परीक्षेत चौऱ्याहत्तर टक्के गुण मिळवून बाळू केंद्रात पहिला आला. मग मॅट्रिकपर्यंत त्याला रत्नागिरीत ठेवण्याची वेळ आली. रत्नागिरी शहर बाजार.आता कसे व्हायचे? हा मोठा पेचच पडला! पण हेडमास्तर बर्वे देवासारखे सहाय्याला आले. त्यांचा एक भाऊ रत्नागिरीलाच स्थायिक. त्याला भेटून त्याच्या ओळखीने कुठे काय जमते का ? हे बघायला अण्णा रत्नागिरीत त्याच्या बिऱ्हाडी दाखल झाले. जमले तर बाळूला त्यांच्या लगामी लावायचा अण्णांचा मनसुबा त्यांची बिऱ्हाडाची चिंचोळी पाजोटी बघून पार ढासळला.
बर्वे मास्तरांचा भाऊ बरीच वर्षे रत्नागिरीत राहिलेला. त्याच्या ओळखी खूप. त्याच्या ओळखीनेच एक गृहस्थ दामले सावकार! कोर्टाजवळ त्यांचा ऐसपैस वाडा. वाड्यात दोनच माणसे , दामले आणि त्याची खाष्ट बायको. त्यांना एकच मुलगी. तिही लग्नकार्य होऊन मुंबईत स्थायिक ! दोन्ही माणसे वय झालेली. रोजची देवपुजा करायला कोणीतरी ब्राह्मणाचा मुलगा मिळाला तर आम्ही त्याची राहण्या-जेवण्याची व्यवस्था करू, असे त्यांनी बर्वे मास्तरांच्या भावाला सांगितलेले. तो धागा पकडून अण्णामास्तर बर्व्यांच्या भावाबरोबर दामल्यांना भेटायला गेले. दामले सावकार बरा माणूस वाटला. पण त्याची बायको मात्र द्रव्यलोभी आणि भलतीच आढ्यताखोर आहे हे अण्णांनी तिला बघितल्यावरच ओळखले. एकुण रागरंग पाहता बाळूच्या राहण्याची सोय चांगली होण्यासारखी होती. बाळू वाड्यात राहील, रोज देवाची पुजा करील, त्याची जेवणाची सोय आम्ही बाहेर करू असे त्यांना अण्णांनी स्पष्टच सांगून टाकले. बेत नक्की करून अण्णा घरी परतले.
“तिथे नीट रहा, सांभाळून बोल, आपला अभ्यास बरा की आपण.”असे बोधामृत बाळूची आई व बापू यांनी बाळूला व्यवस्थित पाजले. अण्णांचा बाळूवर जीव. राजापुरात त्याने जे यश मिळविले, तिथे त्याची जी नावाजणी झाली. त्यावरून त्याला इतके बोधामृत पाजायला नको असे त्यांचे मत. त्यांनी मोठया हौसेने जाण्याची तयारी सुरू केली. दामल्यांकडे गडी माणसांचा राबता. कोणी काही वस्तू लंपास करील म्हणून अण्णांनी देवगडच्या सहस्रबुध्दे यांच्या दुकानातून एक सुरेख ट्रंक आणि कुलूप किल्ली आणली. बाळू रत्नागिरीला राहायचा म्हणून ग्रामदेवतेवर अभिषेक एकादष्णी झाली. चांगला दिवस बघून विठुशेठ तानवड्याच्या बैलगाडीत बसून रत्नागिरीला जाणारी बोट गाठायला विजयदुर्गला रवाना झाले. वाटभर अण्णा त्याला पुनःपुन्हा बजावीत राहीले. "खाण्या पिण्याची हयगय करू नको. कमी -जास्त पैसे लागले तर न संकोचता कळव. मन लावून अभ्यास कर. वेळच्या वेळी खुशाली कळवीत रहा. तू जेव्हा वकील होशील तेव्हाच माझा जीव शांत होईल, थोडा काळ कष्ट सोसायला हवे. पुजा मन लावून कर. देवाची सेवा करायला मिळते हे भाग्यच आहे. त्यात मात्र टाळाटाळ करू नको. खोलीचे भाडे भरायचे आहे. तर आपल्याला झेपले नसते. पुजेच्या बदल्यात फुकट राहायची व्यवस्था केली हे दामल्यांचे आभारच आहेत हे लक्षात ठेव. ते नाव ठेवतील असे काही आपल्या हातुन घडायला देऊ नको. ”
बाळू भावाचा शब्दन् शब्द मनात साठवून ठेवीत राहिला. आपल्यावर जिवापाड प्रेम करणारा, स्वतःच्या धोतराला गाठी मारून आपल्या शिक्षणासाठी तळमळणारा अण्णा त्याला डोंगराएवढा वाटायला लागला. बोलण्याच्या नादात रत्नागिरी कधी आली कळलेच नाही. पडावातून धक्क्यावर उतरल्यावर ट्रंक, वळकटी घेऊन अण्णा पुढे आणि मागोमाग बाळू चालायला लागले. तेलीआळीचा चढ चढून संपला आणि दामल्यांचे घर दिसायला लागले. दामल्यांचा तो ऐसपैस पसरलेला भव्य वाडा बघून बाळूची छाती दडपून गेली.
ट्रंक,वळकटी ओसरीवर ठेवून दोघेही झोपाळयावर बसले. गड्याने वर्दी दिल्यावर ‘सामान घेऊन आतच या’ असा निरोप आला. दामले,सावकार आणि दामलीण काकू दोघेही चौकशी करायला पुढे आली. गड्याने आणून दिलेल्या तांब्यातले पाणी ओतून अण्णांनी बाळूकडे भांडे दिले. त्याचे पाणी पिऊन झाल्यावर आपण पाणी प्याले. तोपर्यंत दामले सावकार हळूहळू पावले टाकत पलंगावर जाऊन टेकले. अण्णांनी भेट म्हणून आणलेला डबा काढून दामलीण कांकूकडे दिला. त्यांनी ताबडतोब फडका सोडून डबा उघडला. आत चार आंगळे लांब-रूंद अंगठाभर जाड अशा केशरी रंगाच्या आंब्याच्या वड्या! त्या बघतच राहिल्या. मग डब्यातली एक वडी उचलून काकुंनी हुंगून बघितली. आमरसाचा आणि मंद वेलचीचा वास येताच त्यांची जीभ हुळकली. वडीचा एक तुकडा मोडून तोंडात टाकल्यावर त्यांनी एक ठसठशीत मिटकी मारली अन् त्या म्हणाल्या,“जोग मास्तर,या वडीवरून तरी तुमची परिस्थिती सामधाम आहे असे कोणा रांडेच्याला वाटायचे नाही हो.”
दामलीण काकूंची ही अनपेक्षित प्रतिक्रिया अण्णांना मात्र चांगलीच झोंबली. त्यांनीही चरचरीत प्रतिटोला दिला,“हे बघा दामलेकाकू, माझी आई करंदीकर मामलेदारांची मुलगी!जोग तालेवार म्हणून त्यांनी आपली मुलगी आमच्या बापूंना दिली. आमची सुध्दा कुणकवणात मोठी प्रॉपर्टी. पण आम्हाला भाऊबंदांनी फसविले. धडेवाटपात आमची वाताहात झाली म्हणून अशी सामधाम परिस्थिती आली. पण माझी आई मोठ्या हाताची ! चार दिवस उपाशी राहील,पण देण्या घेण्यात मागे नाही यायची !”अण्णांनी तिरमिरीशी उत्तर दिले खरे,पण ते चटकन भानावर आले. आपण दामल्यांच्या आश्रयाला इथे आलो,बाळूला दिवस काढायचे आहेत इथे.मग सारवासारवी करीत ते म्हणाले,“आणि आई म्हणाली, “दामल्यांसारख्या बड्या माणसांना भेट द्यायची आहे ! आपले हसे होता कामा नये. गरिबांचा तिळथेंब का असेना, त्यांना तोंडात घालावासा वाटायला हवा.”
बाळू दामल्यांकडे चांगलाच रूळला. रत्नागिरीहून बर्वे मास्तरांच्या भावाची पत्र येत. त्यात आवर्जून बाळूची खुशाली असायची. बाळूचे सुध्दा नेमाने पत्र यायचे. चतुर्थी, दिवाळी या सुट्टयांना तो घरी यायचा. खानावळीत जाऊ नको,आमच्याकडे जेव, असा दामल्यांचा आग्रह व्हायचा असेही तो सांगे. त्यांच्या कडील शिसवी पाट, चांदीची ताटे, तांब्या- भांडी, ग्रामोफोन यांचे वर्णन तो करायचा. म्हणता म्हणता दोन वर्षे कधीच मागे सरली. सुरवातीला अण्णा त्याला दरमहा चार रूपये पाठवायचे. तिसऱ्या वर्षी बाळूने सांगितल्यावरून ते एक रूपया जाादा पाठवायला लागले. या वर्षात मात्र त्याच्याकडून नियमित पत्रे येईनाशी झाली. गणेश चतुर्थीला दामल्यांची तब्येत बरी नसल्याने गणपतीची जबाबदारी त्याच्यावर पडली अन् चतुर्थीला तो आला नाही. दिवाळीतसुध्दा जेमतेम सणाचे चार-पाच दिवस राहूनच अभ्यास पुरा करण्यासाठी म्हणून तो रत्नागिरीला परत गेला. जाण्यापूर्वी त्याने बापूंना सांगितले की, पुढचे वर्ष अतिशय महत्वाचे आहे. सुट्टीमध्ये आमचे जादा वर्ग आहेत म्हणून मी मे महिन्यात येणार नाही.
चवथ्या वर्षी त्याची पत्रे रतीब घातल्यासारखी चार ओळींची असत. प्रत्येक पत्रात अभ्यासाचा फारच ताण पडतो,हे वाक्य हटकून असायचे. गणेशचतुर्थीत तर बापू, आई सगळीच वाट बघून बघून थकली कारण तो किंवा त्याचे पत्रही आले नाही. बापूंनी त्याला पत्र पाठविले. त्याचे बाळूकडून जे उत्तर आले त्यात तर त्याने अण्णांना नमस्कारसुध्दा लिहिले ला नव्हता. या पत्रामुळे मात्र अण्णा चमकले. त्यानी पत्र पाठवून बाळुला दिवाळीत काही करून येच ! असे कळविले. बाळूकडून उशीरानेच उत्तर आले. आपल्या उत्तरात दामलेकाका आजारी असतात. काका-काकू दोघांनाही माझा लळा लागला आहे. मी दिवाळीत घरी जाणार असे म्हणताच काकू रडायलाच लागल्या. असे चऱ्हाट लिहून दिवाळीला मला यायला जमायचे नाही. दामलेकाकू आईला साडी देणार आहेत. त्या दर वर्षी एका गरीब ब्राह्मण सवाष्णीला साडीचोळी करतात. दिवाळी पूर्वी हस्ते-परहस्ते साडी पाठवून देईन,असे बाळूने लिहिलेले.
आता मात्र अण्णा मास्तर हादरले. समक्ष रत्नागिरीला खेप करून बाळूची भेट घ्यायची असा बेत त्यांनी ठरविला. चार दिवसांनी अकल्पितपणे बर्वे मास्तरांच्या भावाचे अण्णांच्या नावे लिहिलेले पत्र आले. बाळू हा दामले काका- काकूंच्या मर्जीस उतरला असून त्याला दत्तक घेण्याचा त्यांचा बेत ठरला! बाळूला सुध्दा ही गोष्ट मान्य आहे. एवढेच नव्हे, खुद्द बाळूनेच दामले काकूंना ही गोष्ट पटविली. मुलाचे जन्माचे कल्याण होईल. मॅट्रिकनंतर वकिलीचे शिक्षण फार खर्चाचे ! अण्णांच्या कमाईवर खर्च झेपायचा नाही. त्यापेक्षा बाळू दत्तक गेला तर त्यांचा भार तरी जरा हलका होईल. घरी पत्र पाठवून ही गोष्ट कळविण्याचे धाडस बाळूला होत नसल्यामुळे त्याच्या विनंतीवरूनच हे पत्र आपण लिहित आहोत असे बर्वे मास्तरांच्या भावाने कळविले.
पत्र वाचल्यावर अण्णांचे मस्तक बधीर झाले. आपण शाळेत आहोत याचेही भान न राहवून ते हमसाहमशी रडायला लागले. काय झाले ते बर्वे मास्तरांना कळेना. त्यांनी लगबगीने अण्णा मास्तरांना हात धरून ऑफिसमध्ये नेले. स्वतःच्या धोतराच्या सोग्याने त्यांचे डोळे टिपले आणि शांत,गंभीर आवाजात त्यांनी म्हटले, “अहो जोग मास्तर,शांत व्हा ! एवढे काय आहे त्या पत्रात?” अण्णानी पुढे केलेले पत्र वाचल्यावर बर्वे मास्तरांचेही डोळे पाणावले. त्यांनी चष्मा काढून डोळे पुसले आणि अण्णांच्या खांद्यावर थोपटीत त्यांनी म्हटले, “अण्णा,तू मास्तर असलास तरी मला लहान भावासारखा. मी तुला ओळखतो ! सगळ्याच गोष्टी आपल्या मनासारख्या नाही घडत. आपले प्राक्तन म्हणायचे आणि गप्प बसायचे ! तू एकच कर, आई बापूंना जप. येणाऱ्या प्रसंगाला तोंड द्यायला तरी ती घट्ट राहीली पाहिजेत !”
पुढच्या सगळ्या गोष्टी अपेक्षेप्रमाणे घडल्या. दामले सावकारांकडची सवाष्णीसाठी पाणी सोडलेली साडी घरी आली. चावदिवसाच्या फराळाचे ताट न उष्टावता जोगांकडची माणसे कसनुशी बसलेली. आई दामलिणी कडची साडी हातात घेऊन रडत बसलेली. चाव दिवस असल्यामुळे बाहेर कोणीतरी फराळ मागायला आले.“काकानुं फळाऽऽर......” आवाजावरून कोणीतरी बाई आलेली वाटली. बरोबर पोरेही असावीत. कारण त्यांचा कालवा सुरू झालेला. अण्णा मास्तरांची बायको धीर करून उठली. बाहेर कोण आले हे दाराआडून बघितले. सकाळीच न्हाऊन-माखून डोक्यावर कुंकवाचा मळवट भरून कातकरीण पोरांचे लटांबर घेऊन आलेली दिसली. अण्णांची बायको देव्हाऱ्याकडे गेली. कुंकवाची कुयरी घेऊन तिने देवीला हळदपिंजर वाहिली. सासवेच्या हातातली साडी काढून घेतली. तिला एवढे अवसान कुठून आले कोण जाणे? एका पितळीत दिवाळीचा फराळ घेतला आणि तिने कातकरणीला आत हाक मारून खणा-नारळाने तिची ओटी भरली आणि साडीची घडी मोडून निऱ्या काढल्या. साडी कातकरणीच्या हातात देऊन ती म्हणाली,“बाई गो, तू कोणाच्या रूपाने आली आली असशील कोण जाणे. आज सणावाराची दारात आलीस म्हणून नमस्कार करत्ये. एकच आशीर्वाद दे!आमच्या घरातली अवदसा बाहेर जाऊ दे!”
तिने घरात जाऊन मुलांना फराळाला हाक मारली. मुले फराळ करायला बसली. सासू, सासरे, नवरा आणि स्वतःसाठीही केळीचे फाळके मांडून त्यावर फराळाचे जिन्नस वाढले आणि प्रत्येकासमोर फराळाचे पान नेऊन ठेवले. तिच्या आवेशाने दिपलेल्या अण्णा, बापू यांनी काही न बोलता लाडवाची डिखळी मोडून तोंडात टाकली. सासू मात्र अजून गप्पच. सून तिच्याजवळ जाऊन बसली अन् म्हणाली,“सासूबाई, ह्यांची मिळकत कमी असेल, पण जो आहे ते कष्टाचे आहे. दुसऱ्याच्या भिकेवर जगायला लागत नाही हे ही कमी झाले काय? ती कातकरीण फराळासाठी दारोदार भीक मागत्येय.देवाच्या दयेने आम्हाला चार गोडाधोडाचे जिन्नस करण्याएवढी तरी ऐपत आहे हे भाग्य म्हणा! बाळू भावोजी बालिस्टर होऊन काय पांग फेडणार कर्म !! ‘हे’ तुमच्यासाठी थोडे करतात का ? देवाची दया होईल, माझी पोरे-सोरे उद्या मोठी होतील, आपल्या कष्टावर सोन्याचा इमला बांधतील अशी मला उमेद आहे. तुम्ही जगलात नाही तरी उद्या जग बघेल. आता बाळू भावोजींचा अध्याय समाप्त झाला. त्यांना काय करायचे ते करू देत. यापुढे घरातल्या कोणीही हा विषय काढला तर मात्र मी विहिर जवळ करीन. मी सुध्दा भाऊ लिमयांची मुलगी आहे,म्हटल्या शब्दाला मागे येणार नाही. ” मग सासू - सून फराळ करायला लागल्या. जोगांची दिवाळी आनंदात साजरी झाली. महिन्याभराने बाळूचे पत्र आले.
॥ श्री कुलस्वामिनी प्रसन्न ॥
मिती मार्गशिर्ष शु।।५ शके १८६०
तीर्थरूप वडिलांचे चरणी त्रिकाल मस्तक ठेवून
बालके बाळकृष्ण याचा शिरसाष्टांग दंडवत!
तुमच्या आशीर्वादेकरून मजला दत्तक घेणेचा मनोदय तीर्थरूप दामलेकाका आणि सौ. दामलीण काकू यांनी मला कथन केला. एकूणात विचार करिता तुमच्यावरचा आणि अण्णांवरचा माझा भार कमी व्हावा अशीच दैवाची योजना दिसत्ये. ती दोघे मजला आपल्या मुलासारिखेच करितात. मनाने दत्तकविधान झालेले आहे. केवळ लौकिक जनांसाठी मिती पौष शुध्द ८, शके १८६० गुरूवार रोजी प्रत्यक्ष दत्तक विधान योजिले आहे. बापू, ती. सौ. आई सर्वांनी यावे असा दामलीण काकूंचा आघ्रवाचा निरोप आहे. उद्या सगळा वेव्हार माझ्या हातात आल्यावर मी तुमचा भार अण्णांवर पडायला द्यायचो नाही. आता कार्याची गडबड. सगळे मलाच बघायला हवे.
ती. अण्णा यांसी आणि सौ. वहिनी यांसी श्री साष्टांग नमस्कार. बालके शिदू,कमा,गजाननयांसी आशीर्वाद. लेखन सीमा॥
बाळू उर्फ बाळकृष्ण - रत्नांग्री
  दत्तक विधानाचा ठरलेला दिवस जवळ आला. अण्णांच्या बायकोने मागे ठेवलेल्या दोन पुतळ्या नवऱ्याकडे दिल्या. “ह्या मोडा आणि दामल्यांना चांगला दणदणीत आहेर करा. बापूमामंजी नी सासूबाई दोघांनाही रत्नांग्रीस घेऊन जावा.” आहेराची खरेदी झाली. जाण्याचे बेत झाले. अण्णांनी ठेवणीतला कोट बाहेर काढला. आईला पुन्हा पुन्हा सांगुनही ती हो म्हणेना. सुनेने पुन्हा पुन्हा फारच आग्रह केल्यावर ती मानी बाई ताड्कन म्हणाली,“दत्तक जायचा विचार बाळूला सुचला ना, तेव्हाच तो मला मेला. खरे तर जनरीत म्हणून एकटा अण्णा गेला तरी सुद्धा पुरे. ह्यांची लोयली आणि कशाला बरोबर नेतो आहे?तिथे रत्नांग्रीस ह्यांच्या साठी कोण एवढे सुकलेले आहे ? त्या बाळ्याला आता धरित्री सुद्धा दिसेनाशी झालेली असेल.”
अण्णांचे विचारचक्र खंडित झाले.आता मागील दारी आचाऱ्यांची वर्दळ सुरू झालेली. अण्णा उठून मागील दारी जाऊन आले. हंडा तापत ठेवलेला बघितला. जाऊन बापूंना उठवून आणले. नंतर पाहुण्यांची वर्दळ सुरू झाल्यावर गार पाण्याची आंघोळ करण्याची पाळी नको म्हणून दोघांनीही आंघोळी उरकल्या. सकाळी बाजारात वर्दळ सुरू झालेली दिसल्यावर अण्णा बापुंना घेऊन बाहेर पडले. करमरकरांच्या हॉटेलात जाऊन दोघांनीही गोडाचा शिरा खाल्ला,चहा प्याले आणि फिरत फिरत वाड्याकडे माघारी परतले. गळ्यात गोफ आणि हातात सलकडे, बोटात तीन-तीन अंगठ्या घालून बाळू जसा काय हवेतुनच चाललेला ! दत्तक विधानाचा मुख्य कार्यक्रम झाल्यावर दामले सावकार, दामलीण काकू, बाळू आणि मुलगी,जावई आहेर घ्यायला बसले. अण्णांनी पाचही जणांना अंगागवडी केलेला आहेर बघून मात्र पाहुणेसुध्दा चांगलेच चमकले. हा आहेर म्हणजे अण्णाने आपल्याला ‘शालजोडीतून’ दिलेली आहे, हे बाळू उमजला. त्याला ही गोष्ट वर्मी लागली. दुपारी जेवणावेळी सुरू झाल्यावर बाळू अण्णाजवळ गेला अन् त्याला म्हणाला,“अण्णा! अरे, ऐपत नसताना एवढा मोठा आहेर कशाला म्हणून केलास? आम्हाला काय अशी अपेक्षा नव्हती. ”
आता मात्र अण्णाचा तोल गेला ! भाऊ तुटला तरी चालेल असा निर्णय घेऊन ते फाड्कन उतरले, “बाळू रे,दामले सावकार- सावकारीण तुला लगेच आपली वाटायला लागली काय रे? आम्हाला अपेक्षा नव्हती म्हणे. जन्मदाते अजून जिवंत आहेत तुझे हेही लक्षात ठेव ! माझी ऐपत मोजणारा मोठा पैसेवाला गब्रू झालास नाय तू ? आता सलकडे, अंगठ्या मिळाल्यावर लगेच तुला अण्णा भिकारी वाटायला लागला काय रे ? चौदा रूपये पगारातले सहा-सहा,सात-सात रूपये तुला एकट्याला पाठवून उरलेल्या पैशात सहा पोटे जाळायची श्रींमती काय असते हे तुला नाही कळायचे. एक लक्षात ठेव. माणसाचा मोठेपणा त्याच्याकडे किती पैसे आहेत यावर नसतो अवलंबून, त्याने तो कसा मिळवला याच्यावर मोजला जाातो जागात ! आणि पैशाने दत्तक विधाने होतात, पैशासाठी दत्तक विधाने होतात, पण आतड्याची नाती नाहीत विकत घेता येत.
हे पैशाचे आमिष तुझ्या अभ्युदयाच्या आड मात्र यायला देऊ नकोस आणि तू जोडलेल्या नवीन नातेसंबंधातही विषासारखे व्हायला देऊ नकोस. तू 'जोग' आहेस. सिंहाच्या डोक्यावर शिंगे बांधली म्हणून त्याला कोणी रेडा म्हणणार नाही की स्वतः सिंहसुध्दा गवत नि पेंड खायला लागायचा नाही. यापुढे तरी निदान जोगांच्या लौकिकाला आणि दामल्यांच्या ऐश्वर्याला जप. संपत्तीच्या लोभापायी जोगाचे कूळ बुडवलेस नी जन्मदात्यांशी प्रतारणा केलीस, आई-बाप काय उघडी पडायची नाहीतय पण उद्या पैशाच्या मदाने दामले काका-काकूंशी फिरून पडलास, त्यांचेच खाऊन त्यांच्यावरच उलटलास हे मला कळले तर मात्र लक्षात ठेव, मी फाटका असेनपण तू आपल्या वर्तनाने आमच्या नावाला काजळी फासतो आहेस असे जर दिसले तर तू जिवंत रहायचा नाहीस!”
बाळू सर्द झाला नी खेटरासारखे तोंड करून बाजूला गेला. बापू - अण्णा फक्त वरण भात खाऊन उठले. रात्री तर त्यांनी दुपारच्या जडान्नामुळे भूक नसल्याची सबब सांगून जेवण नकोच म्हटले. दोन दिवस झालेल्या दगदगीमुळे रात्री अण्णांना गाढ झोप लागली. सकाळी उठून आंघोळी झाल्या. जााणाऱ्या पाहुण्यांच्या सरबराईत बाळू मश्गूल झाला. बापूंना आणि अण्णांनाही चहाची लहर आलेली पण बोट गाठायला जायचे आहेच. मग खेपेतच बाहेर पडूया असे अण्णांनी ठरविले. त्यानी दामलीण काकूला‘येतो’ म्हणून सांगितले. “अहा रे मेल्यांनो, भावाला आवरा आवरीला मदत करायला दोन दिवस रहायचे नाही का ? आणि आमच्याकडचा आहेरसुध्दा अजूनी द्यायचा आहे की.” दामलीण म्हणाली. त्यावर अण्णा म्हणाले, “अहो, आम्ही घरचेच. आहेराचे काय एवढे? मागून पुढून पाहता येईल. बापूंना आता दगदग नाही सोसत. आम्ही हळूहळू निघतो. ”
अण्णा आहेर पडत असताना बाळूचा गडी अपेक्षेने पाहतो आहेसा दिसला म्हणून अण्णांनी कोटाच्या खिशात पैशाची पिशवी बाहेर काढण्यासाठी हात घातला मात्र, खिशात पिशवी नव्हती ! सगळे खिसे उलटसुलट तपासून झाले. काल झोपण्यापूर्वी पैशाची पिशवी कोटाच्या खिशात ठेवल्याचे पक्के स्मरण अण्णांना होते . आता काय करायचे? काल रात्री मला काळ झोपच लागली, मोकळी ओसरी आणि मोकाट माणसे, भरवसा तरी कोणाचा नी कसाद्यायचा ? घरी परत जाण्यासाठी परतीच्या भाड्याचे काय ? बरोबर म्हातारा बाप, लांबचा पल्ला, अण्णांना भवजळ आठवले. पण काही झाले तरी आधी इथून बाहेर पडायचे. पुढचे पुढे....गणपती गजाननावर भार टाकून बापूंना घेऊन अण्णा बंदराकडे निघाले.
बापूंना चहाची जोरदार तल्लफ आलेली होती. दामल्यांच्या बेड्यातुन बाहेर पडता पडता,“कुठे तरी बरासा चहा घेऊया”असे बापूंनी म्हटले. ऐकले न ऐकलेसे करून अण्णा चालीला लागले. सकाळची थंड वेळ, 'पण पुढे काय करायचे ' या चिंतेने अण्णांना घाम फुटला. सख्खा भाऊ इथे असल्यामुळे स्नेही -सोबती गाठून पैसे मागायचीही चोरी. घामाघूम झालेल्या अण्णांनी मग कोट काढून हातावर घेतला. तेली आळीचा उतार आल्यावर त्यांनी मागे नजर केली. बापूंना एक पिशवी पण तीही जाड झालीसे दिसले म्हणून अण्णा थांबले. बापू जवळ आल्यावर पुढे होत अण्णांनी त्यांच्याकडची पिशवी आपल्या हातात घेतली. या गडबडीत हातावर ठेवलेला कोट खाली पडला. पिशव्यांसकट खाली वाकून दोन बोटांनीच त्यानी कोट उचलला. नेमका कॉलरचा भाग घरला गेला अन् बोटांना काहीतरी जाड लागले.
अण्णांना एकदम आठवण झाली. लख्ख्कन हजारो सूर्य नजरेपुढे तळपून गेल्याचा भास त्याला झाला. अण्णा पहिल्यानेच नोकरीवर रूजू व्हायला जाताना आईच्या पाया पडले. तेव्हा तिने जीव जीव म्हणून जपलेला राजा छाप चांदीचा रूपया त्याच्या हातावर ठेवला.अण्णांनी तो खर्च न करता कोटाच्या कॉलर जवळील चोर खिशात ठेवला. त्यांनी झटकन चोर खिशातून रूपया काढला अन् हातावर घेतला. गरज फक्त आठ आण्याची ! दोघांचे बोटीचे तिकीट प्रत्येकी चार-चार आणे !! त्याकाळी दुकानदार चांदीच्या रुपयाचे चार आणे जादा म्हणजे सोळा आण्या ऐवजी वीस आणे देत. ऐन मोक्याच्या क्षणी आईची शिदोरी कामाला आली. अण्णांचे मन भरून आले. आतापर्यंतचा सगळा ताण क्षणातच शिथिल झाला. ‘बाळू,या रूपयाची सर दामल्यासावकाराच्या गडगंज इस्टेटीत नाही रे.आई,बाप,भाऊ या नात्यांच्या मोबदल्यात तू इस्टेटीचा सौदा केलास पण लौकिकाची शिदोरी, मायेची शिदोरी गमावलीस तू ! परमेश्वरा, आत्ता माझ्यावर आली होती अशी सत्वपरीक्षेची वेळ माझ्या बाळूवर कधी आणू नकोस, कारण त्याच्याकडे आता आईच्या मायेची शिदोरी नाही......आणि अशी वेळ त्याच्यावर आणलीसच तर त्याच्या चोरखिशात एक रूपया राहील अशी शिदोरी तरी तू त्याला दे !!"
तेली आळीच्या उतारावरून खाली उतरून गेल्यावर नाक्यावरच्या पटवर्धनांच्या हॉटेलात जाऊन दोन पैशांचा चहा अण्णा - बापू प्याले अन् बंदराच्या रस्त्याला लागले.
◙ ◙ ◙ ◙ ◙ ◙ ◙ ◙