Sambarshing in Marathi Classic Stories by श्रीराम विनायक काळे books and stories PDF | सांबरशिंग

Featured Books
  • ફરે તે ફરફરે - 67

    ફરે તે ફરફરે - ૬૭   હું  મારા ધરવાળા સાથે આંખ મિલા...

  • રાય કરણ ઘેલો - ભાગ 16

    ૧૬ પૃથ્વીદેવ   અરધી રાત થઇ ત્યાં ઉદા મહેતાના પ્રખ્યાત વ...

  • એઠો ગોળ

    એઠો ગોળ धेनुं धीराः सूनृतां वाचमाहुः, यथा धेनु सहस्त्रेषु वत...

  • પહેલી નજર નો પ્રેમ!!

    સવાર નો સમય! જે.કે. માર્ટસવાર નો સમય હોવા થી માર્ટ માં ગણતરી...

  • એક મર્ડર

    'ઓગણીસ તારીખે તારી અને આકાશની વચ્ચે રાણકી વાવમાં ઝઘડો થય...

Categories
Share

सांबरशिंग

सांबरशिंग

तब्बल बत्तीस वर्षानी स्वतःच्या मारूतीमधून अशोक मूळगावी हुंबरटला निघालेला. सोबत क्लबमधले उच्चभ्रु मित्र. आजपर्यंत केवळ कथा-कांदबऱ्यांमध्ये वाचलेलं कोकणातलं गाव बघायला, एन्जॉयमेंट म्हणून ! कॉकटेल पार्टी रंगात आली की अशोक आपल्या चौसोपी वाड्याचं रसभरीत वर्णन करायचा. ओसरी,पडवी असलेलं प्रशस्त घर. पायाचे घडीव काळवत्री दगड असलेलं मजबुत उंच जोतं. ओसरीवरचे वेलबुट्टी कोरलेले खैराचे भक्कम खांब. अस्सल सागवानी भव्य तुळया. त्यांच्या दर्शनी टोकांना वर्तुळाकार छेद घेऊन त्यावर कोरलेल्या नागफणा. दर्शनी दिंडी दरवाजाची नक्षीकाम केलेली चौकट. तिच्या मध्यभागी गणपती अन् ऋध्दिसिध्दी कोरलेल्या. शंभर वर्षांची पंरपंरा सांगणारा, कडीपाटाचा, राजांगण असलेला खोतांचा वाडा! ओसरीवर, राजांगणाच्या कडेवर मागील दारी असे तीन शिसवी झोपाळे. राजांगणाजावळच्या झोपाळ्याला खूर असल्यामुळे तो काढल्यावर त्याचा खाटेसारखा वापर व्हायचा. झालंच तर आजोबांनी खास बनवून घेतलेला चंदनी पलंग. त्या काळी मुद्दाम बेळगावातून चंदनी लाकूड सामान आणून तो बनवून घेतलेला. चांदोबा मासिकात सरदारांच्या वाड्याची चित्रं असतात. त्या चित्रांमध्येच बघायला मिळतो असा तो राजेशाही पलंग.
दुसऱ्या दिवशी पार्टीचा हँगओव्हर आला की मग अशोक सकट सगळ्यांनाच हुंबरटमधल्या त्या खोतांच्या वाड्याचं विस्मरण व्हायचं. अशोक शिक्षणासाठी म्हणून मामाचं बोट धरून मुंबईला गेला नी इंजिनिअर होवून मुंब ईतच नोकरीला लागला, अशोकची पत्नी शांता मुंबईईतच जन्मलेली नी लाडाकोडानं वाढलेली. ती ललना गावाचं नाव काढलं की नाक मुरडीत, उठून जायची. नोकरी अन् पार्ट्या या व्यापातून गावाची आठवण तरी कुठली व्हायला? आई-भाऊ अधूनमधून यायचे. त्यांचं गावंढळ मालवणी बोलणं अन् मॅनरलेस, रबीश् वागणं. ती मुबंईला आली की तासा दोन तासांतच राहूलला घेऊन शांता सरळ गिरगावला माहेरी जायची. आई वारल्यावर अशोक चा मामाच हुंबरटला गेलेला. भाऊ त्याच्याबरोबर मुंबईला आले नी मामाकडेच दादरला राहायचे. कधीतरी दोन-तीन महिन्यांनी अशोक त्यांना भेटून यायचा. बस्स ! १० वर्षानी भाऊ गेले अन् हुंबरट विस्मृतीच्या खोल गर्तेत बुडून गेलं.
अगदी अलीकडेच,अडीच-तीन वर्षामागे कुणीतरी पटेल नामक व्यापारी कणकवलीतील दोघा पुढाऱ्याना घेऊन अशोकच्या फ्लॅटवर आला. हुंबरटमधला तो वाडा आजूबाजूच्या जमिनीसह तीन लाख रूपयांना खरेदी करायची ऑफर त्या मंडळींनी दिली. खरं तर मुंबईतल्या हिशोबाप्रमाणे वाड्याचेच पंचवीस लाख मिळाले असते. पण हुंबरटसारख्या आड खेड्यात एवढ्या प्रॉपर्टीसाठी दोन तीन लाख रूपये सुद्धा मोजण्याचं धारिष्ट्यही कुणी दाखवलं नसतं. भाऊ गेले. त्यानंतर सात खंडी धान्य पिकवणारी सुपीक मळेजमिन कुळांना विक्री करण्याची नोटिस आलेली. राणे, घाडी, दळवी, पाष्टे अशा कुळांनी सरकारी दराप्रमाणे रक्कम पोहोच केली. त्या मातब्बर जमिनीची किंमत एक हजार बाराशे रूपये मात्र रोख घेऊन पावलो असं नोटरीसमोरं अशोक ने लिहून दिलेलं. कांतीभाई पटेलची ऑफर ऐकल्यावर अशोकला शेतजमिनीच्या किमतीचं स्मरण झालं.
देसायांची जमीन-वाडा बी. के. जी. हायवेला लागून फोंड्याला जाणाऱ्या फाट्यालगत मोक्याच्या जागी असल्यामुळे पटेल एवढी मोठी रक्कम द्यायला तयार झालेला. त्या जागेवर त्याला हार्डवेअर-कन्स्ट्रक्शन मटेरियल विक्रीचं दुकान आणि बेंडसा घालायचा असल्याचं तो बोलला. हो ना करता साडेचार लाखाना व्यवहार ठरला. बसल्या बैठकीत दोन लाख हार्ड कॅश त्यानं अॅडव्हान्स म्हणून दिली. हायकोर्टात नव्याने प्रॅक्टीस सुरू करणाऱ्या राहूलला नवीन कार पाहिजे असं शांता म्हणालेली. हुंबरटची प्रॉपर्टी विकून राहूलची कारची हौस भागली असती. अशोकला कंपनीची कार मिळालेली. कंपनीचं सेल्स डिपार्टमेंट त्याच्याकडेच. महिन्यातून पंधरा दिवस तो टुरवरच असायचा. म्हणून स्वतःची कार घेणं त्याला सुचलंच नव्हतं. घराच्या व्यवहारातुन अकल्पितपणे मोठी रक्कम आली म्हणून अशोकसह त्याचं त्रिकोणी कुटूंब जाम खुष झालेलं. हुंबरटचं घर, तिथले कुळाचार, खोती असं काहीबाही अशोक मोठ्या हौसेनं शांताला सांगायचा. पण मुंबई अंगात मुरलेली ती उच्चभ्रु पुरंध्री ! अशोक चा घर हा विषय सुरू झाला की चक्क खोट्या जाभंया देत “ओऽऽ शीट् ! स्टॉप दिस हंबग !!”असं म्हणत ती चक्क उठून जायची.
कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर अंबानी रिटायर्ड झाले. त्यांच्या जागी केरळचा जेरोन इसो आला. त्यानं हळूहळू ऑफीस कब्जात घ्यायला सुरवात केली. अशोक ची प्रॉडक्शन सेक्शनला ट्रान्स्फर झाली. पुढचे धिंदवडे चुकवण्यासाठी महिनाभरातच अशोकने स्वतः रिझायनिंग लेटर दिलं अन् फेअरवेल पार्टी घेऊन तो नोकरीतून मुक्त झाला. तो टेन्शन -फ्री झाल्याबद्दल मग ओबेरॉयला दोस्त मंडळींची पार्टी झाली. त्याच पार्टीत एक दिवस मागे पडलेला हुंबरटच्या वाड्याचा विषय निघाला. अशोकचा वाडा अन् कोकण बघून गोव्यापर्यंत फिरून यायचा बेत मूळ धरू लागला. या वेळी मात्र हँगओव्हर उतरल्यावरही अशोकला आपल्या बेताचं विस्मरण झालं नाही. दोन दिवसांत सगळ्या मित्रांना कॉन्टॅक्ट करून त्यानं हुंबरट गोवा ट्रिप फिक्स केली.
ट्रिप फायनल झाल्यापासून अशोक जसा काही हवेतच तरंगायला लागला. अंतर्मनात खोल दडलेला वाडा आता त्याला दिसू लागला. जर्दाळू खात खात झोप्या घेणारा खोतांचा अशोक त्याला दिसू लागला. अशोकला झोपाळा खुपच आवडायचा. गावातली एक-दोन ब्राम्हणांची घरं सोडली तर कुणाकडेच झोपाळा नसायचा. अशोककडे तर तीन-तीन झोपाळे. चौकातल्या झोपाळ्यावर बसून दणक्यात झोप्या काढल्या की राजांगणातून वरचं मोकळं आभाळ दिसायचं. रात्री पलंगावरती मऊ गादीवर झोपलं की राजांगणाच्या मोकळया चौकातून शुभ्र, शीतल चंद्रप्रकाशाचा झोत चौकात उतरायचा. चौकातून थेट चांदोबाच्या गावाला जाणारा तो एक भला थोरला जिना आहे असंच अशोकला वाटायचं. खेळायला येणारे त्याचे मित्र तर त्या प्रशस्त वाड्यात दडादडा धावायचे. मुलांना वाड्यात फिरायचं मुक्तव्दार असायचं. पण बाबल्या उपाध्ये, वाघाटे तलाठी आणि शाळेतले साटम गुरूजी सोडले तर ओसरीवरून आत मधल्या चौकात येण्याचं धाडस गावातला कुणीही मनुष्य सहसा करू धजावत नसे.
मित्रमंडळ मुंबईहून थेट हुंबरटला जायचं ठरलेलं. पण निघायच्या दिवसापूर्वी दोन दिवस, साबळे बिल्डरनी तो बेत थोडासा बदलला. त्यांचा कुणी कलीग चिपळूणच्या अलीकडे लोटे माळावरच्या इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये राहायचा. त्याने अलीकडे तिथे फर्म सुरू केलेली. त्याच्याकडे हॉल्ट करून मग पुढे जायचं असं साबळ्यानी सुचवलं. ठरलेल्या दिवशी मंडळी मुंबईबाहेर पडली. खेड मागे पडलं तेव्हा कोकणात बरंच परिवर्तन झालेलं असावं, ही गोष्ट अशोकच्या पुसटशी ध्यानात आली. लोटे माळ आल्यावर तर तिथला जगड्व्याळ इंडस्ट्रियल एरिया बघून अशोक पुरता चक्रावूनच गेला. साबळ्यांच्या मित्राचं युनिट तर स्वतः अशोक ज्या कंपनीत होता, तेवढं मोठ्ठं आहे हे त्याच्या ध्यानात आलं.
सकाळी सात वाजता मंडळी लोट्याहून बाहेर पडली. संगमेश्वर, हातखंबा,लांजा पार करीत मारूतीनं तरळा गाठलं. आता आपल्या परिसराच्या खुणा अशोकला कुठे कुठे दिसू लागल्या. तरळा पेट्रोल पंपावर मारूती थांबली. केवळ पिक्चरमध्ये शोभावा असा तो पॉश पेट्रोल पंप बघितल्यावर आपल्याला पार्टीचा हँगओव्हर तर आलेला नाही ना? अशी शंका अशोकला आली. जवळ जवळ अडतीस वर्षांपूर्वी अशोकची मुंज झाली. त्यानंतर तो आईबरोबर नाधवडयाच्या मावशीकडे गेलेला. त्या वेळचं बकाल तरळं त्याला कुठेच दिसेना. चायनीज स्नॅक्स कॉर्नर, बीअर बार या गोष्टी कोकणात कधी रूजतील यावर त्यानं स्वप्नातसुध्दा विश्वास ठेवला नसता. निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली की, कोकणचा कॅलिफोर्निया वगैरे करण्याची राजकारण्यांची पेपरबाजी वाचून अशोक हसायचा. हा दरिद्री, वैराण भाग कधी सुधारेल हे त्याने गृहीतच धरलेलं नव्हतं. वास्तवात कॅलिफोर्नियालाही मागे टाकणारं कोकण बघितल्यावर आपण एखादं दुःस्वप्न तर पाहत नाही ना ? असा त्याचा गोंधळ उडाला.
प्रशस्त बी. के. जी. रोड,त्यावरून धावणाऱ्या पॉश मारूती, ट्रॅक्स, सुमो, मोटारसायकल्स, दुतर्फा अपटुडेट स्लॅबच्या बिल्डिंग्ज या जंजाळात अशोक त्याच्या बालपणात बघितलेलं नी आता हरवलेलं कोकण शोधू लागला. नांदगाव तर त्याने ओळखलंच नाही. मारूतीनं सावडाव गाठल्यावर मात्र बॉबकटवाल्या बिनकुंकवाच्या मॉड ललनांच्या गर्दीत हिरवीगार, भरजरी पैठणी लेऊन कपाळभर ठसठशीत चिरी लावणारी आईच भेटल्याचा आनंद अशोकला झाला. आता हुंबरट येणार म्हणून तो सरसावून बसला. गाडी दोन वळणं घेऊन पुढे गेल्यावर त्याची नजर जुना गाडीतळ शोधू लागली. तळावरची घोरिप चिंच तर किती लांबून दिसायची. पण दुतर्फा असलेले स्टॉल, स्लॅबच्या इमारती नि वाहनांची वर्दळ यामुळे त्याची गडबड उडाली. ड्रायव्हरला गाडी थांबवायला सांगून तो खाली उतरला. हॉलिडे रिझॉर्टसमोर हारीने तीन कार थांबल्या म्हणून कॅशियर सावरून बसला. त्याने डॉल्बी सिस्टीमचं स्वीच ऑन केलं. मुंबईला नुकत्याच रिलीज झालेल्या कुठल्याशा पिक्चरमधलं अशोकला न आवडणारं रटाळ, 'अपने वादों को तोड न जाऽऽना' हे गीत ऐकताच आपण नक्की बेशुध्द पडणार, या भितीपोटी तो सावधपणे रस्ता क्रॉस करून पलीकडे गेला. 'भालचंद्र मेडिकल अ‍ॅण्ड जनरल स्टोअर्स, प्रोपा. दळवी बंधू ' हा बोर्ड दिसला. काऊंटरवर उभा असलेला सोनेरी काड्यांचा चष्मा लावलेला रमेश दळवी त्याने अचूक ओळखला. अशोक तीन यत्तांनी त्याच्या मागे होता .
“मी भाऊ देसायांचा मुलगा अशोक” त्यानं मोठ्या अपेक्षेनं सांगितलं. पॉश मारूती कारमधून उतरलेलं मालदार गिऱ्हाईक या पलीकडे ओळखीची काहीच खुण रमेश दळवीच्या डोळ्यांत दिसेना. "बोला साहेब, आमच्याकडे इंपोर्टेड वस्तूंचा स्टॉक आहे. आणि सग़ळ्या प्रकारचा कोकणी मेवाही मिळतो.” सराईत विक्रेत्याचे हसू ओठांवर आणीत दळवीशेठ उद्गारले. “नाही, म्हणजे मला औषधं किंवा वस्तू नकोत, मी भाऊ खोतांचा मुलगा अशोक. बत्तीस वर्षानी प्रथमच हुंबरटला येतोय्.” खरेदीऐवजी रिकामी चौकशी करणारे गिऱ्हाईक असे तुच्छतेचे भाव आता दळवीशेठच्या चेहऱ्यावर उमटले. तो मारूतीमधून आलाय हीच दळवींच्या लेखी जमेची बाजू. म्हणून उत्तर देण्याची तसदी नाराजीनं कां होईना दळवीशेठनी घेतली,“ पण खोतांचा वाडा कांतीभाई पटेलने मागेच खरेदी केला ना ?” त्यावर अशोक म्हणाला, “ हो, खरंय् ते ! मी मित्रांबरोबर गोव्याला फिरायला निघालोय्. म्हटलं जाता -जाता वाड्याचं दर्शन घ्यावं. मी तर इतक्या वर्षानी कोकण पाहतोय. सगळा भाग आमूलाग्र बदलून गेलाय. उगीच चुकायला व्हायचं अशी भीती वाटली म्हणून म्हटलं नीट चौकशी करूया.” त्यावेळी पायऱ्या चढून वर येणाऱ्या नव्या गिऱ्हाईकाकडे बघत दळवी म्हणाले. “हां, ते बी खराच ! असेच दोन मिनिटे पुढे जा. तुमचा वाडा आता जाग्यावर नाही आता . पॅराडाईज बीअर बारचा मोठ्ठा बोर्ड लागेल. त्याच्या बाजूला लाद्या, कडाप्पे फरशांचे ढीग आणि बेंडसा दिसेल. तीच तुमच्या वाड्याची जागा.”
खट्टू झालेल्या अशोकने पँटच्या खिशातून रूमाल बाहेर काढला. चष्म्याच्या काचा पुशीत तो मारूतीमध्ये जाऊन बसला. मारूतीनं वेग घेतला. मिनिटभरातच 'पॅराडाईज बीअर बार'ची पाटी दिसली. अशोकने गाडी थांबवायची खूण केली .मित्रांना बारमध्ये बसवून, “मी पाच मिनिटं चौकशी करून परत येतो. तुम्ही तोपर्यंत रिलॅक्स व्हा.” असं सांगून अशोक बाहेर पडला. बारच्या कडेला उभा असणारा अशोक भिरीभिरी पाहू लागला. तो पाऊस-पाण्यात सडून गेलेला ढोल्या फणस त्याने अचूक ओळखला. त्याचे सोनचाफ्याच्या फुलासारखे कापे गरे दशक्रोशीत प्रसिध्द. आषाढ्या पौर्णिमेपर्यंत त्याचे फणस मिळायचे. वटसावित्रीला तर खोतांकडचे फणस- गरे न्यायची किती लोकांची वहिवाट. ढोल्या फणसामागे चार डेरेदार आंब्याची झाडं. एवढे आंबे धरायचे की काढणार तरी कधी नी कसे ? आख्ख्या हुंबरटातली पोरं पडीचे आंबे पुंजावायला जमायची नि मे महिन्यात तर वांदरांची झुंडच आंब्यावर वसतीला थांबायची.
बीअर बारच्या जाग्यावर असलेलं, आभाळात उंच गेलेलं अष्टाचं झाड!! त्याच्या शेंड्यावर घारींची घरटी असायची. त्याच्या अजस्त्र फांद्यांना असलेल्या बिळांमध्ये पावसाळ्यात शिंगचोचे पोरं काढायचे. सुपाएवढे पंख असलेली उलटी पाखरं म्हणजे वटवाघळं चिर्रर्रऽऽचिर्रर्र करीत अष्टाची फळं खायला रात्री जमायची. वातामुळे पायांच्या गडख्या झालेल्या आजीला कुणीतरी औषध सांगितलेलं. 'उलट्या' पाखराची चरबी लावून मालिश केलं की वात नाहीसा होतो. मग भाऊंनी गावातल्या बर्कनदाराला, सख्या दळव्याला मुद्दाम बोलावून घेतलं. त्याने खोतांची ठासाची बंदूक साफसुफ केली. रात्रीच्या वेळी काळोखातच नेम धरून एक उलटं पाखरू त्यानं अचूक टिपलं. तो ओंगळवाणा हिडुस पक्षी,त्याच्या अंगाला येणाऱ्या धुरटाणीनं अशोकच्या पोटात नुसतं ढवळून आलं. वटवाघळाची चरबी कशी काढतात ते बघायलासुध्दा तो थांबला नाही. त्यानंतर पंधरा दिवस सकाळ-संध्याकाळ बायजा धनगरीण आज्जीच्या ढोपरांना मॉलिश करायला यायची. पुढे पुढे तर चरबी ठेवलेल्या शिश्याचं बुच उघडलं की त्या ‘हिवळ’ घाणीनं त्याच्या आईचं डोकचं उसळायचं !

विषण्णमनाने मान खाली घालून अशोक कडाप्पांच्या लाद्यांच्या, जंजाळातून बेंडशाकडे निघाला. ‘धाड्ऽऽ धाड् टर्रर्र- ट्रँग्-टर्रर्र’ आवाज काढीत अजास्त्र ओंडक्याच्या चिंध्या करणारा बेंडसॉ, त्या आवाजाने त्याचे कान किटले. बेंडशासमोर कंपाऊंडच्या कडेला परिचयाची वस्तू दिसली. ‘भाताच्या घिरटीचे पेड’ जमिनीवर टाकून कांतीभाईनं हातपाय धुण्याची सोय केलेली. त्याच्या पुढेच वाड्याच्या खराब झालेल्या वासे-खिडक्या - दरवाजांच्या चौकडी नी भोगरलेले लाकडी खांब यांचा डाळ रचलेला. ओसरीवरच्या दिंडी दरवाजाच्या चौकटीची शीर वाळवीने खाल्लेली लाकडं त्याने अचूक ओळखली. ऋध्दि सिध्दीच्या जागी वाळवीने कातरलेल्या खुणा अन् मध्यभागी सोंड झडलेला गणपती. उन्हापावसानं तडकलेली तुळयांची लाकडं, भोगरलेले वासे नि दोन वसवी जवळ पेचलेली मुसळं अशा टाकाऊ लाकडांचा तो ढीग. लाकडं कोसळू नयेत म्हणून टेकून ठेवलेलं वेंगेतही मावणार नाही एवढं मोठं पोहे कांडायचं काळवत्री दगडाचं व्हाईन बघितल्यावर अशोक भक्तीभावानं पुढे झाला. एका तडे पडून सडणाऱ्या खांड बारावर भाऊंनी चुन्याच्या बोटाने लिहलेली आजोबांची मृत्यू तिथी मिती फाल्गुन शु॥ ५ शके १८३५. उन्हा पावसात अस्पष्ट कां होईना, पण आजोबांची मृत्युतिथी शाबूत राहीलेली. लाकडांच्या ढिगाशी तळात लाकडी घोड्याचं मुंडकं. अशोक लहान असताना भाऊंनी नारायण सुताराकडून करून घेतलेली ती दोनचाकी गाडी. घोड्याच्या मुंडक्याचा भाग अन् आयाळीपाशी कणा बसवून दोन चाकं नि हातात धरायचा दांडा. अशोक खाली बसला अन् ढिगाखालची ती गाडी त्याने खेचून घ्यायचा प्रयत्न केला. खूप जोर केल्यावर वरची लाकडं कोसळली अन् घोडा दिसेनासा झाला.
“ए ऽऽ काय पायजेल रे ? इते कसल्या वस्तूला हात लावायचा नाय्.” पटेलाचा कोणी नोकर डाफरत पुढे आला. शरमिंदा होत अशोक बोलला, “मला कांतीशेठ पटेलना भेटायचं आहे. ” त्यावर नोकर बोलला,“मंग सरळ फाटी जााऊन डाव्या हातीला वळा. तिने शेठचा बंगला हाये.” अशोक बंगल्याकडे जाऊ लागला. खोतांचा वाडा भुईसपाट करून त्या ठिकाणी उभारलेल्या स्लॅबच्या भव्य बंगल्यातुन कांतीशेठ बाहेर पडताना दिसला. अशोक समोर आला तरी त्याला न ओळखताच कांतीभाई पुढे निघाला. खरेदीच्या वेळी त्याने अशोकच्या रेक्लमेशन स्कीममधील फ्लॅटवर दोन खेपा घातलेल्या. न राहवून अशोकने हाक मारली, “कांतीशेऽठ, ओळखलंत की नाही?” डोळ्याचा चष्मा काढून अशोकला आपादमस्तक न्याहाळल्यावर ओशाळं हसत कांतीशेठ म्हणाला, “हांऽऽहां सायब्... हे साला चस्म्याचा नंबर बदली करायले झ्याले. आत्ता वळखले मी. तुमी तर आमच्ये मालक देसाईसाब!”
कांतीशेठ सोबत अशोक त्याच्या ऑफिसकडे निघाला. लाकडाच्या पातळ फळ्या, रिफा ओबडधोबड ठोकून तयार केलेल्या ऑफिसचं दार कांतीशेठनी उघडलं. चिंचोळ्या जागेत एक टेबल, दोन खुर्च्या, जेमतेम चार माणसं बसतील एवढी जुन्या वाड्यात मागिलदारी असणारी जुनी घडवंची आणि भिंतीकडेला भक्कम लोखंडी लॉकर. शेठच्या खुर्चीमागे अशोकच्या आजोबांचा चंदनी पलंग मात्र शाबूत असलेला दिसला. पलंगावर गोणत्याचं तरट अथंरून उशीऐवजी एस. टी. च्या सीटमधला आडझोड फाटलेला चार वीती लांबीचा धुळीनं माखलेला स्पंजाचा तुकडा टाकलेला. खोलीच्या कोपऱ्यात ठोकलेल्या फळीवर ‘दुर्गा माँ’चा फोटो अन् त्याच्या दोन्ही बाजुंना 'शुभ लाभ' अशी गुजरातीत लिहीलेली वेडीवाकडी अक्षरं. खुर्च्या -टेबलामागे उधळलेला भुसा. जमिनीवर तर पाय रूततील एवढा भुशाचा थर ! देवीला अगरबत्ती ओवाळून खुर्चीत बसल्यावर कांतीशेठ बोलू लागला, “मंग कदी आले तुमी साब? हुम्रटमदी तुमचे कोन सगेवाले ऱ्हाईतेत काय ?” त्यावर “आताच, पाच मिनिटांपुर्वीच मी आलो. आम्ही मित्रमंडळी गोव्याला निघालोत. म्हटलं जाता -जाता जन्मभूमीचं दर्शन घ्यावं.” अशोक म्हणाला. त्यावर एका नोकराला बोलावून कांतीशेठ म्हणाला,“आरे, ज्यानू ह्या सायबांल्ला ज्यरा कंपौंडमदे फिरवून आन अने समोरच्या टपरीवाल्याकडे दोन पेशल सांग. अर्जंट आन असा बोल. ”
टपरीवाल्याला ऑर्डर सांगून जानु आला. इच्छा नसतानाही अशोक त्याच्या सोबत निघाला. जानूशी त्याचं बोलणं झालं जानू हरी वालमाचा नातू, भाऊंना ओळखणाराच निघाला. भाऊ खोतांचा मुलगा अशी अशोकची ओळख पटल्यावर जानू भाटासारखा बोलू लागला,“फोंडा -कणकवली यांच्या नस्तावरची ऐन मोक्याची खोतांची जागा धंद्याला पावरफुल्ल. एवढं मोठं ठिकाण,टोलेजंग वाडा,बेरकी कांतीभाईने अवघ्या साडेचार लाखांत गिळलं. कोपऱ्यातल्या दोन-अडीच गुंठे जागेचे बारवाल्याकडून त्याने साडे तीन लाख रूपये मोजून घेतले. कोकण रेल्वे आल्यावर जागांच्या किमती मुंबईच्या वरताण झालेल्या. खोतांची जमीन -वाडा ऐन रस्त्यावर. रस्त्याकडेची दीड एकर जागा पटेलाने स्वतःसाठी ठेवली. मागच्या बाजूला घरांसाठी ५० बाय५०फुटांचे प्लॉट पाडून एन. ए. करून घेतले. हायस्कूल, मराठी शाळा, बँक, आरोग्य केंद्र, इथला नोकरवर्ग किती... झालंच तर धंद्यासाठी बाहेरगावातून येऊन स्थायिक झालेले व्यापारी. घराचे बावीस प्लॉट प्रत्येकी चाळीस हजारांना हातोहात गेले. ठिकाणातले आंबे, सागवान, फणस, आईन, किंदळी शेकडो घनफुट लाकुड झालं. चिव्याच्या बेटातल्या काठ्यांचे दोन ट्रक फुल लोड भरले.
अगदी अष्टाच्या झाडाचे सुध्दा आंबा पार्सल पिंजरे ठोकून पटेलाने देवगडात नेऊन विकले. वाड्याच्या थोड्याफार खिडक्या, दरवाजांच्या चौकटी नि वासे वाळवी लागून फुकट गेले. पण बाकी बरचसं लाकुडसामान म्हणजे अक्षरशः सोनंच होतं. जुनाट सागवानी बारं- तुळया चिरताना चंदनासारखा सुवास सुटायचा. खोतांच्या प्रॉपर्टीचा पटेलानं पैसाच पैसा केला. वाड्यातली जुनी तांब्या-पितळेची भांडी, त्यांची मोड तीनशे किलो झाली. खोतांचे दोन झोपाळे कांतीभाईने दीड-दीड हजारांना विकले. एक झोपाळा त्याला खुर आहेत. त्याचा उपयोग तो आपल्या साठी खाटेसारखा करतो. खोतांचा शिसवी देव्हारा न् मंडपी अण्णा जोशांनी बावीचशे रूपयाला घेतली. पहारी, कुदळी, फावडी, कोयते, जुनी शेर, नवटांग, कुडव, पायलीची मापं, लोणचं कालवायच्या लाकडी काथोटल्या, चिनी मातीच्या बरण्या -पेले हर चीज नेमक्या किमतीला विकून पटेलाने पैसा च पैसा कमावला. नाही म्हणायला देव्हाऱ्ह्यातले देव तेवढे टोपलीत भरून गावाबाहेरच्या गवळदेवाजवळ ओतलेले आहेत.
वाड्याची खरेदी केल्यापासून जानू पटेलाकडे नोकरी करीत असल्यामुळे त्याने अगदी खडान् खडा माहिती अशोकला दिली. शेवटी त्याने उपोद् घात केला, “खोत! तुमी एवडे शाणे-सुर्ते. इथे परत्यक्ष येऊन, गावतल्या जाणत्या माणसांकडे दरा-दामाची चौकशी करून तरी येव्हार करायचा होता. अहो, तुमच्या तीन पिढ्यांना हयातभर हातार् पाय डाळून बसून खाण्या इतका पैसा भेटला असता. पन सायेब, तुम्ही सगळ्याची माती क्येलीत.” जानुच्या या वाक्ताडनाने सर्द झालेला अशोक माघारी वळला. पटेलाच्या ऑफिसात ते परत आले. टेबलावर बशीखाली झाकलेल्या कपाकडे बोट करीत कांतीशेठ म्हणाला,“साब, च्या घ्या !”
अशोकने साय धरलेला तो चहाचा कप जानू च्या हाती देऊन म्हटलं, “घे तू! मी चहा पीत नाही. ” त्याने सफारीच्या खिशातून विल्सचं पाकीट बाहेर काढलं. सिगरेटसाठी हात पुढे केलेल्या कांतीशेठला सिगरेट देऊन त्याने पाकीट खिशात ठेवलं. “कांतीशेठ, समोरच्या लाकडांखाली एक खेळण्यातला लाकडी घोडा आहे. घराची आठवण म्हणून मी तो नेणार आहे. जरा नोकरांना सांगून तेवढी लाकडं चाळवायला हवीत.”
नोकरांनी लाकडांचे तुकडे बाजुला केले. नाकपुडी तुटलेला,एक चाक शाबूत असलेला घोडा मिळाला. त्याच्या बाजुलाच एक सांबराचं शिंग पडलेलं मिळालं. ओसरीवर भिंतीत खुंटीसारखं बसवलेलं ते हातभर लांबीचं सांबरशिंग नि घोडा अशोकने उचलला.मग खिशातून शंभरची नोट काढून पुढे केली. “कांतीशेठ, या दोन वस्तुंची अल्प किंमत म्हणून हे ठेवा.” त्यावर “नकोऽनको” म्हणत कांतीशेठने नोट घेतली. नित्य सवयीनुसार ती उजेडात पारखुन लेंग्याच्या खिशात ठेवली. “सायब, पैशाची काय जरवर नवती. ते घोडा तर खराबच हाय. हरीणचा सिंग तेवडा किंमतबाज हाये. बंबईमदे तेचा पाचसो रूपिया सजमदे मिळेल. ते लाकडाचा समज्यून आमी राबीटमदी फ्येकला. तुमचा फ्लॉटमदे चांगला शो पीस ऱ्हाईल बगा. कांतीशेठची भेट म्हणून!” रुमालानं सांबरशिंगावरची माती अशोकनं पुसली. डोळ्यात गोळा होऊ पाहणारे अश्रू निग्रहानं थोपवीत जड आवाजात अशोक म्हणाला, “बराय् कांतीशेठ, चलतो आता! कधी मुंबईला आलात तर जरूर या !!" अन् तोंड फिरवून तो रस्त्याच्या दिशेनं जाऊ लागला.
◙ ◙ ◙ ◙ ◙ ◙ ◙