Patni in Marathi Women Focused by संदिप खुरुद books and stories PDF | पत्नी

Featured Books
  • My Wife is Student ? - 25

    वो दोनो जैसे ही अंडर जाते हैं.. वैसे ही हैरान हो जाते है ......

  • एग्जाम ड्यूटी - 3

    दूसरे दिन की परीक्षा: जिम्मेदारी और लापरवाही का द्वंद्वपरीक्...

  • आई कैन सी यू - 52

    अब तक कहानी में हम ने देखा के लूसी को बड़ी मुश्किल से बचाया...

  • All We Imagine As Light - Film Review

                           फिल्म रिव्यु  All We Imagine As Light...

  • दर्द दिलों के - 12

    तो हमने अभी तक देखा धनंजय और शेर सिंह अपने रुतबे को बचाने के...

Categories
Share

पत्नी

            प्रेयसीवर सर्वचजण लिहितात पण खरी प्रेयसी असलेल्या पत्नीवर कोणी जास्त लिहीत नाही. पतीसाठी ती स्वत:चं घर, भावंडे, आई-वडील, गाव सर्वकाही सोडून येते. विचार करा हीच गोष्ट उलट असती तर ? लग्नानंतर पुरुषाला या सर्व गोष्टी सोडून पत्नीच्या घरी जावे लागत असते तर?  या कल्पनेनेच स्त्रीने आपल्या पतीसाठी केलेला त्याग दिसून येतो.

            स्वत:चा जीव धोक्यात घालून आपल्याला बाप बनवणारी पत्नीच आहे. आपल्यासहीत आपल्या आई-वडीलांची, मुला बाळांची काळजी घेणारी आपली पत्नीच आहे. एखादे दिवशी सर्वांना सुट्टी असते पण तिला सुट्टी नसते. स्वयंपाक करणे, भांडे व कपडे धुणे, घर सफाई करणे ही  नित्याचीच कामे नव्या ऊर्जेने ती रोज करत असते. पुरुषाच्या बरोबरीनेच घर सांभाळते. घर कामाबरोबरच बाहेरच्या कामाची जबाबदारी देखील सांभाळते. आजारी असतानाही ही सर्व कामे तिला चुकत नाहीत. सणावेळीही तिला आनंद घेता येत नाही. उलट सणावेळी तर तिची स्वयंपाक व इतर कामे वाढतात.

            आपल्या बरोबरीने ती सर्वच जबाबदाऱ्या खंबीरपणाने पेलते तरी तिला दुय्यम स्थान दिले जाते. प्रेयसीसाठी दुनियेला आग लावण्याची भाषा करणारे मात्र आपल्या पत्नीला गॅससुद्धा कधी पेटवून देत नाहीत. प्रेयसीचा चेहरा चंद्रासारखा दिसतो पण पत्नीच्या चेहऱ्यात कधी आपण चंद्र पाहत नाही. प्रेयसीच्या प्रेमात दुनियेला विसरणारे पत्नीची काळजी घेण्याचं मात्र विसरतात.

            बाहेरच्या एखाद्या गोष्टीचा राग व्यक्त करण्याचे पत्नी हे आपल्याला हक्काचं व्यासपीठ वाटतं. पण कधी आपण तिच्या मनाचा विचार केला का? आपण तिच्यावर इतका हक्क गाजवतो की तिलाही मन असतं हेच आपण विसरून जातो. आपण सतत तिच्यावर काहीना काही कारणाने ओरडत असतो. भाजी चांगली झाली नाही, कपडे धुवून ठेवले नाही, कपडयांना ईस्त्री केली नाही, टॉवेल जागेवर ठेवला नाही. रुमाल जागेवर ठेवला नाही. तिच्यावर ओरडण्यासाठी अशी कितीतरी कारणे आपल्याकडे असतात. ती काय करत नाही हे आपल्याला दिसते. पण ती काय करते हे मात्र आपल्याला दिसत नाही. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तिचे काम चालू असते. चहा करणे, स्वयंपाक करणे, भांडी घासणे, झाडून काढणे, कपडे ईस्त्री करुन ठेवणे, दळण करणे, मुलांना सांभाळणे,मुलांसोबत आपल्याला सांभाळणे, सासु-सासऱ्यांची काळजी घेणे अशी बरीच कामे ती करत असते. आपल्याला ही कामे सोपी वाटतात. कारण ती कामे केल्याने पैसे मिळत  नाहीत. पण आपण हा विचार करतो का? अशी बरीच कामे करुन ती आपले पैसे वाचवते.ही कामे सोपी वाटत असली तरी त्या कामांना खूप ऊर्जा खर्ची होते. यापैकी एकही काम करुन पहा. मग लक्षात येते ही कामे किती अवघड आहेत. आपण मुलांना अर्धा तास देखील सांभाळू शकत  नाही.

            आपण तिच्यावर कितीही ओरडलो. आपण कसेही असलो तरी ती जन्मोजन्मी हाच पती मिळू दे म्हणून देवाला विनंती करते. आपल्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करते. आपल्याविषयी कोणी वाईट बोलले तर तिला आवडत नाही. आपल्याला घरी यायला उशीर झाला तर काळजीने जीव जायची वेळ येते तिची. आपल्या काळजीपोटी ती आपल्याला फोन करते. पण आपल्याला वाटते ती किती किर्र करते. कामानिमित्त आपण बाहेर गेल्यावर ती आपल्याला जेवलात का म्हणून फोनवर विचारते? आपण कधी विचारतो का तिला तू जेवलीस का? तसं पाहिलं तर आपलंही तिच्यावर जीवापाड प्रेम असतं. पण आपण ते व्यक्त करत नाही. फक्त तिच्यावर हक्क गाजवतो.

            तिच्यावर आपण छोटया गोष्टींवरून ओरडतो. पण त्या छोटया गोष्टींपेक्षा तिचं आपल्याशी नातं मोठं आहे हे आपण विसरतो. कधी- कधी आपले नातेवाईक तिला चुकीचं समजताज. त्यांच्या सांगण्यावरून आपण तिला वाईट समजतो. ती चुकत असेल कदाचित. पण तुम्ही तिला समजून घेतलं पाहिजे. ती जेथे चुकत असेल तेथे समजावून सांगीतलं पाहिजे. समजावून सांगण्याआधीच व तिचे म्हणणे पूर्ण ऐकण्या आधीच तुम्ही तिच्यावर ओरडत असाल तर मग तुम्ही मोठी चूक करत असता. खरं तर ती तिचे घरदार सोडून तुमच्यासाठी तुमच्या घरी आलेली असते. मग तुम्हीच तिची साथ सोडली तर तिने काय करायचे?

            आपले आई-वडील, आपले भाऊ-बहीण व आपले इतर नातेवाईक आपल्याला जितके महत्त्वाचे आहेत. तितकीच आपली पत्नी देखील आपल्याला महत्त्वाची आहे. ही सर्व नाती आपल्या पत्नीने आपल्या इतकीच जपली पाहिजेत ही आपली अपेक्षा असते. नाती जपताना ती कोठे चुकत असेल तर तिला प्रेमाने समजावून सांगा ती नक्की ऐकेल. कारण तुमच्या सुखातच तिचे सुख असते.

            तुमच्या सुख दु:खात सामील होणारी तुमची पत्नीच असते. एखादेवेळी तुम्ही मार्ग चुकला तर तुम्हाला चांगल्या मार्गावर घेवून येणारी पत्नीच असते. आयुष्यभर तुमची काळजी घेण्यासाठी तुम्हाला देवाने दिलेली अमूल्य भेट पत्नी असते. तुमच्या आनंदात आनंद मानणारी पत्नीच असते. तुमच्या यशात तिचे यश मानणारी पत्नीच असते. तुमच्यासाठी, तुमच्या घरासाठी झिजणारी पत्नीच असते. तुमच्यासाठी प्रत्येक गोष्टीचा त्याग करणारी तुमची पत्नीच असते. तुमची अर्धांगिनी,तुमची जीवनसाथी तुमची पत्नीच असते. त्यामुळेच तिच्यावर फक्त हक्क न गाजवता तिच्यावर प्रेमही व्यक्त करत चला. ती आपली काळजी घेतेच पण तिची काळजी घेणेदेखील आपले कर्तव्य आहे हे कायम लक्षात असु द्या. ती आहे म्हणून तुमच्या जीवनाला बहर आहे तिच्याशिवाय हे जीवन वाळवंट आहे. ती तिचं कर्तव्य कधीच विसरत नाही पण आपण मात्र विसरतो.

            संसार एकटयाचाच नाही दोघांचाही असतो. संसाररुपी वेलीला तिच्यासोबत प्रेमरुपी खतपाणी घाला. तिच्या साथीने संसाराची वेल बहरल्याशिवाय राहणार नाही. आई नंतर आपल्यावर जीवापाड प्रेम करणारी आपली पत्नीच असते. त्यामुळेच तिलाही आपण जीवापाड जपलं पाहिजे. पती-पत्नीचं नातं आयुष्यभर टिकलं पाहिजे. सर्व स्त्रीयांना समर्पित.