Power of Attorney - 9 in Marathi Fiction Stories by Dilip Bhide books and stories PDF | पॉवर ऑफ अटर्नी - भाग 9

Featured Books
  • નિતુ - પ્રકરણ 64

    નિતુ : ૬૪(નવીન)નિતુ મનોમન સહજ ખુશ હતી, કારણ કે તેનો એક ડર ઓછ...

  • સંઘર્ષ - પ્રકરણ 20

    સિંહાસન સિરીઝ સિદ્ધાર્થ છાયા Disclaimer: સિંહાસન સિરીઝની તમા...

  • પિતા

    માઁ આપણને જન્મ આપે છે,આપણુ જતન કરે છે,પરિવાર નું ધ્યાન રાખે...

  • રહસ્ય,રહસ્ય અને રહસ્ય

    આપણને હંમેશા રહસ્ય ગમતું હોય છે કારણકે તેમાં એવું તત્વ હોય છ...

  • હાસ્યના લાભ

    હાસ્યના લાભ- રાકેશ ઠક્કર હાસ્યના લાભ જ લાભ છે. તેનાથી ક્યારે...

Categories
Share

पॉवर ऑफ अटर्नी - भाग 9

पॉवर ऑफ अटर्नी

भाग  ९

भाग ८ वरुन पुढे  वाचा

रीजनल ऑफिस ला किशोर साडे तीन वाजताच पोचला. थोड्या वेळाने विभावरी पण आली. किशोरला पाहून तिला आनंद झालाच.

विभावरीच्या चेहऱ्यावर मुळीच टेंशन दिसत नव्हतं. नेहमी सारखीच प्रसन्न मुद्रा होती तिची. आणि ती पाहून किशोरला जरा हायसं वाटलं.

“अरे वा फ्रेश दिसते आहेस एकदम, ऑल द बेस्ट.” किशोरनी थम्ब्स अप करून म्हंटलं.  

“थॅंक यू.” असं म्हणून ती ऑफिस मध्ये शिरली

समिती समोर गेल्यावर थोडं इकडचं, तिकडचं बोलणं झाल्यावर प्रश्नांना सुरवात झाली.

“मॅडम जे अधिकार पत्र सानिका नी दिलं आहे, ते तुम्ही केलं नाही, असं तुमचं म्हणण आहे बरोबर ?” समितीच्या एका सदस्याने सुरवात केली.

“बरोबर आहे.” – विभावरी 

“हे खरं कशा वरुन ?” – सदस्य

“म्हणजे ?”  - विभावरी

“म्हणजे तुम्ही म्हणता त्याला पुरावा काय ?” – सदस्य

“मी त्या वेळी म्हणजे जी तारीख त्या अधिकार पत्रावर आहे त्या वेळी, मी अमेरिकेत होते. आणि अधिकार पत्र नंदुरबार ला केलं आहे. मी आयुष्यात कधी  नंदुरबार ला  गेलेली नाहीये. दुसरी गोष्ट, त्यावर जो फोटो लावलेला आहे, तो दुसऱ्याच कोणा मुलीचा आहे. नाव मात्र माझं आहे.” विभावरीचं सविस्तर उत्तर. 

“तुम्ही त्या वेळेस अमेरिकेतच होता या बद्दल काही प्रूफ तुम्ही देवू शकाल ?”

“प्रूफ ? आहे न. माझा पासपोर्ट बघा. हा घ्या. यावर एंट्री आणि एक्जिट च्या सगळ्या नोंदी असतात.” – विभावरी  

पंधरा मिनिटं ते लोकं पासपोर्टचं एक एक पान लक्षपूर्वक बघत होते. मग म्हणाले की

“तुम्ही अमेरिके व्यतिरिक्त कुठेच गेला नाहीत का ?” – सदस्य

“साहेब, मी नोकरी करते एका IT कंपनीत. त्यांनी मला एका वर्षा करता तिकडे पाठवलं म्हणून गेले होते. जग फिरायचं असेल तर मी नवऱ्या बरोबर जाईन. एकटी नाही.” विभावरी म्हणाली

“काय करतात तुमचे मिस्टर ?” – सदस्य

“माझं लग्न झालेलं नाहीये अजून” – विभावरी .

“अधिकार पत्रावर जी तारीख आहे त्या तारखेला तुम्ही अमेरिकेत ऑफिस मधे हजर होता असं प्रमाणपत्र तुमची कंपनी देईल का ?” सदस्यांची पृच्छा

“अॅप्लिकेशन करते. न देण्याचं काही कारण तर दिसत नाहीये. पण मला सांगा, पासपोर्ट वरच्या एंट्रीज पुरेशा नाहीयेत का ?” – विभावरी

“पुरेशा आहेत. पण additional supporting documents असले तर बरं. म्हणून.” 

“ठीक आहे मिळालं की आणून देईन.” – विभावरी

“तुम्ही पोलिसांत तक्रार केली आहे ना ?” – सदस्य 

“हो” – विभावरी

“त्यांची कॉपी देवू शकाल ?” – सदस्य

“आणली आहे मी. ही घ्या.” – विभावरी 

“तुम्ही दोघांनी मिळून केलेली  दिसते  आहे.” – सदस्य

“हो.” – विभावरी 

“असं का ?” – सदस्य

“या संपूर्ण व्यवहारात मी आणि किशोर दोघंही फसवले गेले आहोत म्हणून.” विभावरीचं स्पष्टीकरण. 

“ठीक आहे.  या तुम्ही. जर जरूर वाटली तर पुन्हा येऊ शकाल का ?” – सदस्य

“हो. नो प्रॉब्लेम.” – विभावरी 

विभावरी बाहेर आली. किशोर वाटच  पहात होता.

“काय झालं ?” त्यांनी विचारलं.

“काही खास नाही. घरी जाऊया मग दोघांनाही सविस्तर सांगते. पण खास असं काही नाही.” – विभावरी

घरी गेल्यावर विभावरीने जे जे घडलं ते नीट सांगितलं.

“म्हणजे तुझ्यावर काही आक्षेप नाहीये.” – किशोर.

“काही कारणच नाहीये. चौकशी, तू बँकेला फसवलं आहे का, या विषयी चालली आहे. आणि मला असं वाटतं की आता त्यांचं पण समाधान झालं असावं. कारण माझा तुझ्या बद्दल काहीच आक्षेप नाहीये आणि म्हणून तुला पण त्रास होणार नाही असं मला वाटतं.” विभावरी म्हणाली.

“देव जाणे.” किशोरची प्रतिक्रिया.

त्या दिवशी फारसं बोलणं झालं नाही.

पंधरा एक दिवस झाले असतील, अचानक विभावरी घरी आली.

तिला पाहून माईंना जरा आश्चर्यच वाटलं. म्हणाल्या

“अग अश्या आडवारी कशी ? सुट्टी आहे का आज ? आणि चेहरा असा का पडला आहे तुझा ? काही घडलंय  का ? ये आत ये.” 

“किशोर कुठे आहे ?” विभावरीने आत शिरता शिरताच प्रश्न केला.

“किशोर यायचा आहे अजून. पण येईलच इतक्यात. पण झालं काय ?” माईंचा प्रश्न

“खूप गडबड झाली आहे”. – विभावरी.

“अग, पाणी घे. आणि बस जरा, मी चहा करते तो पी म्हणजे जरा बरं वाटेल मग शांत पणे सांग सगळं. तो पर्यन्त किशोर पण येईल.” माई म्हणाल्या.

चहा होई पर्यन्त किशोर आलाच. आल्या आल्याच त्यांनी विभावरीला पाहिलं. तिचा कोमेजलेला, घाबरलेला चेहरा बघितला आणि त्यांच्या काळजात कालवा कालव झाली. त्यानी डबा आणि बॅग ठेवली आणि तिच्या जवळ बसला. आणि हळुवार आवाजात म्हणाला

“विभावरी, काय झालं, चेहरा किती उतरला आहे. काही तरी विपरीत घडलेलं दिसतंय.”

त्याच्या नजरेतला आणि स्वरातला ओलावा असा काही परिणाम साधून गेला की विभावरी स्वत:ला आवरू शकली नाही, तिने किशोरच्या गळ्यात हात टाकले आणि त्यांच्या खांद्यावर डोकं ठेऊन हुंदके  देवून रडायला लागली. किशोरसाठी हे सगळं अचानकच होतं, पण ज्या गोष्टीची तो बरेच दिवस कल्पना करत होता ती ध्यानी मनी नसतांना झाली. तिची जवळीक त्याला सुखावून गेली. माई बाहेर चहा घेऊन आल्या आणि त्यांनी हे दृश्य पाहिलं. नजरेनेच त्यांनी विचारलं की काय झालंय ? आणि किशोरनी,  काही कल्पना नाही अश्या अर्थाची खूण केली. मग दोघंही स्वस्थ पणे विभावरी शांत होण्याची वाट बघत राहिले.   

थोड्या वेळाने विभावरी शांत झाली. भानावर आली. तिच्या लक्षात आलं की तिने किशोरच्या खांद्यावर डोकं ठेवलं आहे. ती चपापली आणि दूर सरकली. मग माईंना पण तिथे पाहीलं आणि ओशाळवाणे हसली.

“अग ठीक आहे विभावरी, शेवटी माणूस आपल्याच माणसाचा आधार घेतो ना.” माईंनी तिला सावरून घेतलं.

मग तिच्या पाठीवरून मायेने हात फिरवून म्हणाल्या

“आधी चहा पी म्हणजे जरा बरं वाटेल आणि मग काय घडलं ते निवांत पणे सांग. आम्ही आहोत ना तुझ्या बरोबर. सगळं ठीक होईल बघ.”

चहा प्यायल्यावर मग माईंनी विचारलं

“काय झालं विभावरी ? काही सिरियस घडलं का ?”

“नाही हो माई, माझंच चित्त थाऱ्यावर नाहीये, माई हे सगळं काय चाललं आहे आपल्या आयुष्यात? कोणाचीही चूक नसतांना आपण सगळे कसल्या सापळ्यात अडकलो आहोत? सानिका अजून सापडत नाही आणि पोलिस काही सांगत नाहीत. काही कळत नाही. दिवस भर तर ऑफिस मध्ये वेळ निघून जातो, पण रात्री हॉस्टेल वर गेल्यावर मी एकटी असते ना खूप अस्वस्थ व्हायला होतं. काय करू हो, काकांकडे परवा गेले होते. पण तिथे जाऊन सुद्धा मनाला शांती मिळत नाही. त्यांचं तिसरंच काही तरी चाललं असतं. माझं म्हणण कोणी फारसं मनावर घेतच नाहीत. मग इथेच आले.” विभावरीनी आपली व्यथा सांगितली.

“हे बघ,”माई म्हणाल्या “आता आपण तिघं तर बरोबर आहोत, मग कशाला काळजी करतेस ? तुझा मलूल चेहरा काही आम्हाला पाहायची सवय नाहीये. हास बघू नेहमी सारखी.”  

“उद्या आपण कमिशनर साहेबांच्या ऑफिस मधे जाऊ. बघू कोणी आपली कैफियत ऐकतं का ?” किशोरनी सुचवलं

“सगळेच पोलिस सारखे.” – विभावरी अजून त्याच मूड मधे होती.

“इतकी निराश होऊ नकोस. पोलिस म्हणताहेत न की तपास चालू आहे म्हणून, शेवटी ती पण माणसंच आहेत, जादूगार नाहीत. कामिशनर ऑफिस मधे जाऊन येऊ. एकदा हा प्रयत्न करून बघू. नाहीच काही झालं तर बघू पुढे काय करायचं ते.” किशोरनी तिला समजावण्याचा प्रयत्न केला.

नंतरचा वेळ असाच काही, बाही बोलण्यात गेला. टेंशन कायम होतं. जेवण झाल्यावर माई विभावरीला म्हणाल्या

“विभावरी तू आज हॉस्टेल वर जाऊ नकोस. तुझी मन:स्थिती ठीक नाहीये. तू आज इथेच रहा.”

“माई, इथे कशी राहू? मी ऑफिस मधून सरळ पोलिस स्टेशन आणि तिथून इथे आले आहे. कपडे पण नाहीयेत माझ्या जवळ. नको मी हॉस्टेल वरच जाते.” विभावरीने आपली अडचण सांगितली. 

“नाही. तुझ्या या अश्या अवस्थेत तुला मी एकटं सोडायला तयार नाही. तुला हवं तर तू काकांकडे जा , किंवा किशोर येईल तुझ्या बरोबर, हॉस्टेल वर जाऊन तू कपडे घेऊन ये. काय करतेस?” माई म्हणाल्या.

विभावरीनी दोन मिनिटं विचार केला मग म्हणाली की “काकांकडे नको, ते अजून मलाच बोलतील. पण माई, मी इथे राहणं बरोबर दिसेल का? शेजारी, पाजारी काय विचार करतील? लोकं काय म्हणतील ?”

“तू स्वत:चा विचार कर, लोकांचा नको. लोकं काय दोन्ही बाजूंनी बोलतात. तू जा किशोर बरोबर आणि सामान घेऊन ये. आता जास्त विचार करू नकोस.” माईंनी निक्षून सांगितलं. 

क्रमश:........

 

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

dilipbhide@yahoo.com

धन्यवाद.