Power of Attorney - 6 in Marathi Fiction Stories by Dilip Bhide books and stories PDF | पॉवर ऑफ अटर्नी - भाग 6

Featured Books
  • નિતુ - પ્રકરણ 64

    નિતુ : ૬૪(નવીન)નિતુ મનોમન સહજ ખુશ હતી, કારણ કે તેનો એક ડર ઓછ...

  • સંઘર્ષ - પ્રકરણ 20

    સિંહાસન સિરીઝ સિદ્ધાર્થ છાયા Disclaimer: સિંહાસન સિરીઝની તમા...

  • પિતા

    માઁ આપણને જન્મ આપે છે,આપણુ જતન કરે છે,પરિવાર નું ધ્યાન રાખે...

  • રહસ્ય,રહસ્ય અને રહસ્ય

    આપણને હંમેશા રહસ્ય ગમતું હોય છે કારણકે તેમાં એવું તત્વ હોય છ...

  • હાસ્યના લાભ

    હાસ્યના લાભ- રાકેશ ઠક્કર હાસ્યના લાભ જ લાભ છે. તેનાથી ક્યારે...

Categories
Share

पॉवर ऑफ अटर्नी - भाग 6

पॉवर ऑफ अटर्नी 

  भाग  ६  

भाग ५  वरुन पुढे  वाचा

“चला. छान, शिफ्ट करतांना जर काही मदत लागली तर सांगा. मी येईन. आधी सांगितलं तर सुट्टी मागता येईल.” किशोर नी मदत देऊ केली.

“खरंच याल तुम्ही ? पण माझी एक अडचण आहे, माझं सामान खूप आहे. तुम्ही पाहीलंच त्या दिवशी, ३-४ मोठमोठ्या बॅगा आहेत. हॉस्टेल वर एवढी जागा मिळणार नाही, तुमच्या कडे ठेवलं तर चालेल का ? काकांच्या कडे जवळ जवळ रोज जागा किती अडते, अशी कुरकुर चाललेली असते.” विभावरीनी तिची अडचण सांगितली.

किशोर काही बोलायच्या आतच आईंनी सांगून टाकलं.

“अग खुशाल ठेव. सध्या जरी आम्ही, राहत असलो, तरी शेवटी घर तुझंच आहे. आणि आम्ही काय दोघंच आहोत, भरपूर जागा आहे. केव्हाही आणून टाक.” – माई. 

आईनीच सांगितल्यामुळे किशोरला बोलायला जागाच उरली नाही. त्यानीही मग संमती दर्शक मान हलवली.

“तुम्ही लोकं कीती चांगले आहात हो. माई खरं तर मी आज मुद्दाम आले तुमची क्षमा मागायला. त्या दिवशी माझा तोल सुटला होता आणि मी बरंच अपमान जनक बोलले होते. माफ कराल ना ?” विभावरी ची क्षमा याचना

“अग त्या दिवाशीची परिस्थितीच वेगळी होती. तू अमेरिकेहून इतका मोठा प्रवास करून आली होतीस, आधीच शिणली होतीस आणि त्यात घराचा एवढा प्रचंड घोळ अचानक अंगावर आला, मग तुझाच काय कोणाचाही कंट्रोल सुटला असता. आम्ही कोणी मनाला लावून घेतलं नाही तू ही फार विचार करू नकोस. चल मी अन्न जरा गरम करते मग आता आपण जेवून घेऊ. आधीच उशीर झाला आहे.”  आईनी तिला समजावलं. 

जेवण झालं मग मन मोकळ्या गप्पा झाल्या. विभावरी आणि किशोर त्या दिवशी एकमेकांच्या बरेच जवळ आले.

ती गेल्यावर किशोरनी आईला विचारलं

“आई, तू इतकी जवळीक करते आहेस तिच्या बरोबर, नंतर दुख: होईल बरं, आणि तू तिला सामान ठेवण्यासाठी एकदम कसं हो म्हंटलस ? अग एक दिवस ती म्हणेल की माझं सामान आहे इथे, तुम्ही घरा बाहेर व्हा. मग काय करशील ?”

“असं काहीही होणार नाही. ती मुलगी स्वभावानी चांगली आहे आणि वळण पण चांगलं आहे. समजूतदार आहे. आज अडचणीत आहे आपण मदत करायला हवी तिला. काकांचा पण तिला आधार दिसत नाहीये.” -आई म्हणाली.  

“अग काकांचा आधार नाही हे ठरवून केलेलं नाटक नसेल कशावरून ?” – किशोर.

“नाही, नाही असं होणार नाही तिची नजर स्वच्छ आहे. कसलंही कपट तिच्या नजरेत जाणवत नाहीये. तू निश्चिंत रहा, माझी अनुभवी नजर आहे. एकदम निरागस आणि मन मिळावू मुलगी आहे ती.” माईंनी त्याचा मुद्दा सपशेल खोडून काढला. विषय तिथेच संपला. तसं किशोरला जरा बरंच वाटलं. आता सामान इथे आहे, म्हणजे तिच्या चकरा होणार. किशोर मनोमन खुश झाला. तिची भेट झाली की त्याला उत्साह यायचा. आणि आईनी बोलून दाखवलं नाही, पण त्याचं मन त्यांनी ओळखलं होतं. आणि खरं सांगायचं तर त्यांना पण विभावरी आवडली होतीच. 

दुसऱ्या दिवशी सोमवार पासून रुटीन सुरू झालं. चौकशी समिती बसल्याचं कळलं होतं पण पुढे काही हालचाल दिसत नव्हती. त्यांनी मॅनेजर ला या बद्दल विचारलं तर तो म्हणाला या सर्व गोष्टी हळू हळू होतात. पण होतात हे नक्की. जास्त काळजी करू नकोस. जे व्हायचं असेल ते होईल. शुक्रवारी विभावरीचा संध्याकाळी फोन आला. किशोर बँकेतून बाहेर पडला होता, त्यामुळे त्यानी फोन घेतला.

“हॅलो मी उद्या शिफ्ट करायचं म्हणते आहे. तुम्हाला जमेल ना ?”

“हो जमेल. कुठे येऊ ? काकांकडे ?” किशोर नी होकार भरला.

“नाही नाही. मीच येते आहे तुमच्या कडे, माझ्या बॅगा आहेत ना, त्या तुमच्याकडे ठेऊ आणि मग हॉस्टेल वर जाऊ.” विभावरीने प्लॅन सांगीतला.

“हो, चालेल. केंव्हा येता आहात” किशोर नी विचारलं.

“साधारण अकरा बारा तरी होतीलच.” – विभावरी.

“ठीक आहे या. मी तयार राहतो”– किशोर

घरी गेल्यावर किशोरनी आईला विभावरीचा कार्यक्रम सांगीतला.

“अरे बारा वाजता येते म्हणते आहे तर जेवून जाणार आहे का ?” आईने विचारले.

“ते माहीत नाही. तसं बोलणं काही झालं नाही.” – किशोर.  

“अरे मग विचारायचं नाही का ? असे कसे रे तुम्ही लोक ? ठीक आहे ती आल्यावर विचारू तिला. मी अर्धा स्वयंपाक करून ठेवते.” आई म्हणाली.

“अग ती जेवली नाही तर सगळं वाया जाईल.” किशोरची शंका 

“काही वाया जाणार नाही तू नको चिंता करू.” आईनी विषय संपवला.

दुसऱ्या दिवशी शनिवारी साडे अकरा वाजता विभावरी आली. किशोर खाली गेला होता तिचं सामान आणायला. एका खोलीत सामान ठेवल्यावर एक बॅग घेऊन विभावरी हॉल मध्ये आली. म्हणाली

“मी निघते आता. हॉस्टेल वर जाऊन पण सगळी व्यवस्था करायची आहे.” – विभावरी म्हणाली.  

“अग बारा वाजताहेत, जेवायची वेळ आहे दोन घास खाऊन जा.” आई बोलली.

“अहो, माई नको नको, मेस एक दिड वाजे पर्यन्त चालू असते काही प्रॉब्लेम नाहीये. आणि तसंही आता सवय करावीच लागणार आहे. उद्या पासून आहेच मेस चं जेवण.” विभावरी संकोचानी म्हणाली.

“येतांना घरून नाश्ता तरी करून आली आहेस का ?” आईचा प्रश्न

“नाही. काकांकडे ब्रेक फास्ट फक्त काका करतात. तशीच पद्धत आहे.” – विभावरी.

“मग बस टेबल वर आणि गरम गरम दोन घास खाऊन घे. असं जायचं नाही. आमच्या घरची अशीच पद्धत आहे.” आईचं फायनल उत्तर.

“माई अहो कीती काळजी करता तुम्ही ! मला एवढी सवय नाहीये.” विभावरी बोलली.

“मग आता सारखी येत जा, नाही तरी हॉस्टेल वरच राहणार आहेस ना, मग येत जा, आपोआप सवय होईल.” माई म्हणाल्या.

मग विभावरी टेबल वर बसली. आणि म्हणाली.

“मी एकटीच कशी बसू ? तुम्ही दोघं पण बसा ना माझ्या बरोबर.”

“अग तू बस. अजून पोळ्या व्हायच्या आहेत. तुला गरम गरम करून वाढते तू जेवून घे म्हणजे तुला उशीर होणार नाही.” माईनी सांगितलं.

“माई अहो मला हॉस्टेलवरच जायचं आहे, थोडं उशिरा गेलं तरी काय फरक पडणार आहे ? मी थांबते. नाही तर असं करूया, मीच करते पोळ्या, तुम्हालाच आज गरम पोळ्या करून घालते. तुम्हीच आधी बसा.” – विभावरी.  

“अग तू पाहुणी आहेस, तू कशाला करतेस, तूच बस मी आहे ना.” – माई

“माई,” विभावरीचा स्वर ओलसर झाला, “पाहुण्यांची काळजी घेतल्या जाते पण इतकी आत्मीयता आणि जिव्हाळा त्यात नसतो. मग का असं सारखं सारखं मला पाहुणी आहेस असं म्हणता ? मला तुमच्याकडे मुळीच परके पणा वाटत नाही. परके पणा काय असतो हे मला काकांकडे राहून चांगलंच समजलंय.”

आता माईंनी पण राहवेना. म्हणाल्या

“खरंय ग तुझं म्हणण. कधी कधी एक क्षण सुद्धा पुरतो आपलेपणा वाटायला.”

“मग मी करू पोळ्या ? चालेल ?” – विभावरी.

“चालेल.” – माई.  

“अग आई, काय हे, त्यांना काय कामाला लावतेस ? कसं दिसेल ते. काकांना कळलं तर त्यांना काय वाटेल ?” किशोरनी आपली शंका बोलून दाखवली.

“काका काय म्हणणार, आता मी हॉस्टेलवर राहायला जाते आहे, त्यांच्याकडे आठ पंधरा दिवसातून एकदा जाईन. मी तिथे नाहीये म्हंटल्यांवर ते लोक फार चौकशी करणार नाहीत. पूर्वीही मी इथे एकटी राहतच होती की. फार चौकश्या नाही करत ते लोकं. मी तिथे असतांना माझी जबाबदारी वाटायची त्यांना. अजून काही नाही. आता मी त्यांच्याकडे राहत नाही म्हंटल्यांवर, अंगाला काहीही लावून घेणार नाहीत ते लोक.” – विभावरी जरा फणकाऱ्यानेच म्हणाली.  

“बापरे चांगलाच धसका घेतला होता की त्यांनी तुझा.” – माई

“हूं. आहे खरं तसं.” – विभावरी.  

जेवण झाल्यावर किशोर विभावरीला हॉस्टेल वर सोडून आला. त्या निमित्तानी  त्याला हॉस्टेल नेमकं कुठे आहे ते पण कळलं.

बुधवारी बँकेत मॅनेजरला चौकशी समिती च्या सदस्या कडून फोन आला. त्याच्याशी बोलणं झाल्यावर, मॅनेजर नी किशोरला बोलावून सांगितलं की “उद्या दुपारी तुला समिती समोर हजर राहायचं आहे. तेंव्हा तू उद्या 3 वाजे पर्यन्त रीजनल ऑफिस ला पोहोच.”

घरी पोचल्यावर किशोर नी आईला सांगितलं की त्याला उद्या चौकशी समिती समोर हजर व्हायचं आहे म्हणून. काय निघेल चौकशी मध्ये ही चिंता तिला लागली. किशोर सुद्धा अस्वस्थ होता.

“विभावरीला सांगितलं का ? नसेल तर तिला पण सांग.” आई म्हणाली.

“तिला कशाला ? तिचा काय संबंध ?” – किशोर.

“सांग रे बरं असतं”. – आई.

मग त्यांनी विभावरीला फोन करून सांगितलं.

“तुम्ही मुळीच चिंता करू नका. तुम्ही काहीच केलं नाहीये. तुम्ही आत्मविश्वासाने चौकशीला सामोरे जा. माझी खात्री आहे की तुम्ही यातून निष्कलंक सुटाल. By the way हे ऑफिस आहे कुठे ?” विभावरीने त्याला धीर देण्याचा प्रयत्न केला.

किशोरनी तिला ऑफिस चा पत्ता दिला. आणि म्हणाला की “पत्ता घेऊन तुम्ही काय करणार ?”

“काही नाही, असंच.” – विभावरी.

किशोर दुसऱ्या दिवशी दुपारी दोन वाजता बँकेतून बाहेर पडला. आणि बरोबर 3 वाजता रीजनल ऑफिस ला पोचला. आणि पाहिलं तर समोर विभावरी उभी होती.

  

क्रमश: ..........

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

dilipbhide@yahoo.com

कथा आवडली असेल तर जरूर लाइक करा.

धन्यवाद.