Savadh - 22 in Marathi Thriller by Abhay Bapat books and stories PDF | सावध - प्रकरण 22

Featured Books
  • પિતા

    માઁ આપણને જન્મ આપે છે,આપણુ જતન કરે છે,પરિવાર નું ધ્યાન રાખે...

  • રહસ્ય,રહસ્ય અને રહસ્ય

    આપણને હંમેશા રહસ્ય ગમતું હોય છે કારણકે તેમાં એવું તત્વ હોય છ...

  • હાસ્યના લાભ

    હાસ્યના લાભ- રાકેશ ઠક્કર હાસ્યના લાભ જ લાભ છે. તેનાથી ક્યારે...

  • સંઘર્ષ જિંદગીનો

                સંઘર્ષ જિંદગીનો        પાત્ર અજય, અમિત, અર્ચના,...

  • સોલમેટસ - 3

    આરવ રુશીના હાથમાં અદિતિની ડાયરી જુએ છે અને એને એની અદિતિ સાથ...

Categories
Share

सावध - प्रकरण 22

सावध
प्रकरण २२
न्यायाधीश आपल्या आसनावरून उठताच मायरा पाणिनीला म्हणाली, “ तुम्ही भारीच आहात.त्या साक्षीदाराला मस्तच गंडवलत तुम्ही.”
“ त्याने मला ओळखलं नाही हे मी दाखवू शकलो पण तू तिथे नव्हतीस हे आपल्याला सिध्द करता आलं नाही तर तू तिथे होतीस हे सिध्द होणार आहे.” पाणिनी म्हणाला
“ ते बरोबर आहे.” मायरा म्हणाली.
“ आणि ज्या बंदुकीने खून झालाय परब चा, ती रिव्हॉल्व्हर तुला आदित्य कोळवणकर ने दिली होती. आणखी एक म्हणजे परितोष हिराळकर चा सुध्दा खून झालाय आणि तू त्याचा वीस लाख रकमेचा आयुर्विमा उतरवला आहेस.”
“ अहो पटवर्धन, आमचं लग्न ठरलं होतं.एका स्त्रीला लागणारी सुरक्षितता, घर,प्रेम सर्व काही त्याने मला देऊ केलं होतं.” मायरा म्हणाली.
“ आणि त्या स्त्री चं, आदित्य कोळवणकर वरही प्रेम होतं, त्यानेच त्या स्त्रीला वीस लाख कसे मिळवायचे विम्याच्या माध्यमातून, हे शिकवलं होतं.”
“ काय वेड्यासारखं बोलताय ! सरकारी वकिलांनी मुद्दे मांडल्यासारख ! ”
“ सरकारी वकील काय बोलतील याचा तुला जरासुद्धा अंदाज येणार नाही मायरा. अजूनही तू मला हे सांगितलं नाहीयेस की माझ्या सल्ल्याप्रमाणे तू गॅरेज मधे प्रेत सापडल्यावर,आणि तुझ्या पर्स मधे रिव्हॉल्व्हर असूनही, पोलिसांना का कळवलं नाहीस. ”पाणिनी म्हणाला
“ मला नाही हे सांगता येणार, आणि मी सांगणारही नाही.” मायरा म्हणाली.
“ तर मग याची परिणीती तुला शिक्षा होण्यातच होणार.माझ्या मते कोळवणकर हाच या सगळ्याच्या मागे आहे. दोन माणसांचा खून झालाय आणि त्यातला एक ज्या एका बंदुकीने झालाय, ती खुनापूर्वी आणि नंतरही तुझ्याकडे होती. खून होत असतांना तुझ्याकडे रिव्हॉल्व्हर नव्हती हे सिध्द करण्यासाठी तुला फार सविस्तर आणि सगळ्यांना पटेल असा खुलासा करावा लागेल. ”
“ पटवर्धन,तुम्ही म्हणताय तसं कोळवणकर हा या प्रकरणातला सूत्रधार नाहीये. खऱ्या सूत्रधाराशी तुम्ही अजून बोललेलाच नाही. ” मायरा म्हणाली.
“ कोण?” पाणिनीने विचारलं
“कैवल्य कपाडिया.” मायरा म्हणाली आणि चुकून बोलले असं दाखवत आपली जीभ चावली. “त्याला हे कळलं तर तो प्रचंड चिडचीड करेल. ”
“ हा अभिनय होता का?” पाणिनी ने विचारलं.
“ कसला?”
“ हाच, जीभ चावण्याचा, म्हणजे चुकून बाहेर पडली माझ्या तोंडून माहिती असं भासवण्याचा.”
“ नाही पटवर्धन, खरोखरच मी बोलून गेले.” मायरा म्हणाली.
“ तू चांगलीच अभिनेत्री दिसत्येस.माझ्यासाठी काय सापळा लावला आहेस तू समजत नाहीये मला पण मी त्यात अडकणार नाही हे नक्की.” पाणिनी म्हणाला
“ तुम्ही जर गप्प राहिलात तर ती रिव्हॉल्व्हर माझ्याकडे होती हे त्यांना कधीच सिध्द करता येणार नाही.”
“ असं का वाटतंय तुला?”
“ आदित्य कोळवणकर म्हणाला.” मायरा उत्तरली.
“ तो...भोळेपणाचा आव आणणारा डँम्बिस माणूस !” पाणिनी म्हणाला
“ तो खूप हुशार आहे.चतुर आहे.”
“ तुझा हिराळकर बरोबर साखरपुडा झाला होता, सोमवारी रात्री ऑफिसच्या कामाच्या निमित्ताने त्याने बाहेरगावी जायचं ठरवलं होतं.तुला ते माहीत होतं आणि त्या संध्याकाळी तू आदित्य बरोबर होतीस असं तू म्हणतेस, पण मला हा खुलासा पटलेला नाही आणि कोर्टाला सुध्दा पटणार नाही.” पाणिनी म्हणाला
“ पण तसंच घडलंय.आदित्य मला भावासारखा आहे. ” मायरा म्हणाली.
“ हिराळकर आदित्य ला ओळखतो?”
“ नाही.त्यांची कधीच भेट नाही झालेली.” मायरा म्हणाली.
“ त्या बंदुकीवर माझ्या हाताचे ठसे आहेत.कधीतरी त्याचा खुलासा तुला करावाच लागेल. ” पाणिनी म्हणाला
तिच्या चेहेऱ्यावर एक मिस्कील हास्य उमटलं. “ आदित्य ने मला त्यांची आधीच कल्पना दिली आहे. काळजी करू नका, मी सांगेन बरोबर वेळ येईल तेव्हा.”
न्यायाधीश कोर्टात पुन्हा येत असल्याची आरोळी झाली.आणि सर्वजण उठून उभे राहिले.
“कैवल्य कपाडिया याला मी साक्षीदार म्हणून बोलावू इच्छितो. ” खांडेकर म्हणाले.
त्याचं नाव जाहीर होताच मायरा घाबरी घुबरी झाली. “ तुम्ही थांबवा त्यांना, तो येता कामा नाही ”
“ हास. पटकन.” पाणिनी म्हणाला “ सगळेजण तुझ्याकडेच बघताहेत. तोंड पडून बसू नको.हास.”
तिने चेहेऱ्यावर उसनं हसू आणलं. कैवल्य कपाडिया पिंजऱ्यात आला.त्या दोघांची नजरा नजर झाली. अॅडव्होकेट खांडेकरांनी त्याला पहिला प्रश्न विचारला, “ आरोपी आणि तुमचं आडनाव एकच आहे?”
“ ती माझंच आडनाव लावते.” कपाडिया म्हणाला.
“ तुमचं दोघांचं लग्न झालं होतं?”-खांडेकर
“ होय.”
“ नंतर घटस्फोट?”
“ हो.”
“ कधी झाला ? ”
“ अठरा महिन्यापूर्वी ” कपाडिया म्हणाला.
“ तू तिला दरमहा पोटगी देतोस?”
“ होय.”
“ या महिन्याच्या पाच तारखेच्या संध्याकाळी तुमची भेट झाली होती?”
“ हो.ओलिव्ह हॉटेलला संध्याकाळी साडेसहाला.” कपाडिया म्हणाला.
“ आणखी कोण होतं तिथे?”- खांडेकर
“ आम्ही दोघंच होतो.”
“ काय बोलणं झालं?” –खांडेकर
“ती म्हणाली की ती प्रचंड मोठया संकटात सापडल्ये.तिला तातडीने परदेशी निघून जायचंय.त्यासाठी तिला पैशाची गरज आहे तातडीने. मी तिला पंधरा लाखाची मदत करू शकतो का असं विचारत होती ती. ही रक्कम दरमहा पोटगी देण्या ऐवजी त्या बदल्यात तडजोड म्हणून एकरकमी स्वीकारण्यास तयार आहे असा प्रस्ताव होता तिचा.”
"तू तिला दर महिना पोटगी देतोस का?"
"हो दरमहा 25000"
"तिला हा देश सोडून बाहेर का जायचं होतं याबद्दल ते काही बोलली का?"
"हो. ती म्हणाली की तिच्या अपार्टमेंटच्या गॅरेजमध्ये एका माणसाचं प्रेत सापडलं मी खोदून विचारल्यावर तिने शेवटी कबूल केलं की तो तिचा पूर्वीचा पती होता तिचं म्हणणं होतं की हे जर बाहेर कळलं तर ती पूर्णपणे बदनाम होईल आणि समाजातून उठेल"
"मग यावर तू तिला काय सांगितलंस?"
"मला हे दरमहाच देणं केव्हातरी बंद करायचं होतं तरी पण मी तिला सांगितलं की मी एकदम काही पंधरा लाख देऊ शकणार नाही रोख. मला हा विषय माझ्या वकिलांशी बोलायला लागेल आणि या पद्धतीचा करार आपल्या दोघात करता येईल का ते बघावे लागेल. मी तिला असे सांगितलं की तिची ही कल्पना मला काही फार आवडली आहे असं नाही आणि पंधरा लाख रक्कम सुद्धा खूप मोठी आहे."
"तुझं हे उत्तर तिने मान्य केलं?"
"नाही तिने मला सांगितलं की मला तातडीने काहीतरी हालचाल करणे भाग आहे ती मला असंही म्हणाली की तिने दिलेला हा प्रस्ताव आज मध्यरात्रीपर्यंत मी मान्य किंवा मान्य करावा ती मला मध्यरात्री पूर्वी फोन करणार होती कारण तिला त्या रात्रीच जायचं होतं परदेशी निघून मी तिच्याशी थोडी चर्चा केल्यावर तिने ती रक्कम कमी केली आणि दहा लाखाला तयार झाली."
"तिने तुला पुन्हा फोन केला?"
"नाही ना मी माझ्या वकिलांना भेटलो होतो आणि आमच्या दोघात करायचा कराराचा मसुदा पण त्यांनी तयार करून दिला होता दहा लाख रोख रक्कम मी माझ्याकडे तयार ठेवली होती आणि तिला सही करून द्यायचं, मुक्त करण्याचे पत्र. पण तिने माझ्याशी संपर्क केला नाही."
"तिने तुला प्रस्ताव दिला पंधरा लाखाचा, त्यावेळेला तिच्याबरोबर कोणीही नव्हतं?"
"नव्हतं. मी सांगितलं ना मगाशी तुम्हाला"
"त्वरिता जामकर नावाच्या बाईला ओळखतोस?"
"मी भेटलोय तिला एकदा"
"तुला आरोपींनी तिचा प्रस्ताव सांगितला तेव्हा ही बाई तिच्याबरोबर होती?"
"नाही तेव्हा आरोपी एकटीच होती."
"घ्या उलट तपासणी" खांडेकर आव्हान दिल्याप्रमाणे पाणिनी ला म्हणाले
"तू तिला दरमहा 25000 ची पोटगी देत होतास?" पाणिनीने सुरवात केली.
"होय."
"दरमहा एवढी रक्कम देण्याऐवजी एक रकमे पंधरा लाख देऊन टाकण्यात जो फायदा होता त्याबाबत तू थोडा साशंक होतास अशी तुझी या कोर्टाला समजूत करून द्यायची आहे का?"
"मी तिला असं भासवत होत होतो की एवढी मोठी रक्कम द्यायला मी थोडा का - कू करतो आहे."

"थोडक्यात सांगायचं तर तू तिला असं सांगितलंस ती एवढी रक्कम देण्याबाबत तुझी द्विधा मनस्थिती आहे म्हणून?"
"तसं स्वच्छ शब्दात मी सांगितलं नाही पण तिच्या मनात तसं बिंबवलं."
"पण प्रत्यक्षात मात्र तू तशी तडजोड करायला उत्सुक होतास?"
"अर्थातच"
"पण तू उत्सुक आहेस असं तिला भासू दिलं नाहीस?"
"बरोबर आहे"
"म्हणजे थोडक्यात तू तिला असं सांगितलं की तिचा प्रस्ताव तू स्वीकारशील किंवा नाही हे तुझं अजून ठरत नाहीये"
"अगदी बरोबर"
"थोडक्यात तू तिच्याशी खोटं बोललास"
"युवर ओनर माझा आक्षेप आहे या प्रश्नाला. हा साक्षीदाराचा अपमान आहे."
"या प्रश्नाचे उत्तर हो किंवा नाही असे दिले तरी चालेल"
"कशाबद्दल हो किंवा नाही?"
"तिच्याशी तडजोड करायची इच्छा होती किंवा नाही याबद्दल."
"माझी हरकत आहे या प्रश्नाला."
"तुमची हरकत फेटाळतोय मी"न्यायाधीश म्हणाले
"तू तिच्याशी खोटं बोललास हे मान्य आहे की नाही?"
"हो." रागावून जोरात ओरडला
"परब ला कधीपासून ओळखता तुम्ही?"
"त्याला पाहिलं होतो मी आधी पण तेव्हा तो कोण होता हे मला माहीत नव्हतं म्हणजे मला म्हणायचंय की मायरा चा तो नवरा होता हे मला माहीत नव्हतं. मला ते कळलं तेव्हा तो मला फार मोठा धक्का होता."
"पण त्याला पाहिलेलं होतस तू?"
"कीर्तीकर चा ड्रायव्हर आणि स्वयंपाकी म्हणून तू मला माहिती होता कीर्तीकर आणि मी दोघेही एकाच क्लबचे मेंबर आहोत."
"कीर्तीकर,हिराळकर,दुग्गल, आणि तू असे एकाच क्लबचे मेंबर आहात? आणि एकाच व्यवसायाशी निगडित आहात ?आणि त्यामुळे तुम्ही चौघेही एकमेकांना वरचेवर भेटता?"
"तुम्ही ज्या तिघांची नावे घेतली ते तिघं एकाच व्यवसायात आहेत आणि माझ्या मते ते भागीदारही आहेत एकमेकांचे. माझा व्यवसाय पूर्णपणे वेगळा आहे मी काय व्यवसाय करतो हे त्यांनाही माहित नाही आणि ते काय करतात हे मला कळू नये म्हणून त्यांनी कायमच काळजी घेतली आहे. क्लब मध्ये आम्ही एकमेकांना भेटतो तेव्हा अगदी साध्या कुठल्यातरी विषयावर चर्चा होते म्हणजे सध्या बाजारपेठ काय म्हणते महागाई काय म्हणते वगैरे"
" परब शी कधी बोलला आहेस तू? आणि हे तिघे नेमकं काय व्यवसाय करतात त्याची माहिती त्याच्याकडून काढायचा प्रयत्न केला आहेस?"
"असा प्रश्न विचारून माझ्या साक्षीदाराचा पुन्हा एकदा अपमान केला जातो आहे युवर ऑनर" अॅडव्होकेट खांडेकर हरकत घेत म्हणाले.
"मिस्टर पटवर्धन तुम्ही म्हणताय तशी शक्यता असल्याचा काही पुरावा तुमच्याकडे आहे?"न्यायाधीश आणि विचारलं
"नाही पुरावा नाही हा प्रश्न मी सहज बोलण्याच्या ओघात विचारला आहे"
"तसं असेल तर खांडेकर यांचा आक्षेप मी मान्य करतोय अर्थात तुम्ही प्रश्न बदलून असं विचारू शकता की साक्षीदाराने परब शी काय चर्चा केली?"
"तुझं आणि परब च नेमकं कुठल्या विषयावर बोलणं झालं होतं?"
"माझा नेहमीचा ड्रायव्हर मध्यंतरी रजेवर होता आणि मला असं कळलं होतं की ड्रायव्हर लोकांची एक असोसिएशन आहे. एक एजन्सी म्हणा हवं तर. त्यांच्यातर्फे एखाद्या दिवशी कोणाला ड्रायव्हर लागला तर तो उपलब्ध करून दिला जातो.
"मी परब कडे त्याबाबत चौकशी केली कारण मला माहिती होतं की तो, कीर्तीकर कडे ड्रायव्हर म्हणून कामाला होता. मी त्याला विचारलं अशी काही ड्रायव्हर लोक पुरवणारी असोसिएशन किंवा एजन्सी त्याला माहिती आहे का?"
"मग काय म्हणाला तो?" पाणिनी ने विचारलं.
" तो म्हणाला की अशी असोसिएशन आहे आणि अशा एका असोसिएशनचा तो सदस्य पण आहे ही असोसिएशन गरजू माणसाला, एका तासांमध्ये ड्रायव्हर पुरवण्याची व्यवस्था करते. तो मला म्हणाला की गुरुवार हा त्याचा सुट्टीचा दिवस असतो म्हणजे बुधवारीच संध्याकाळी सहा वाजता त्याची ड्युटी संपते. त्यानुसार त्या बुधवारी सुद्धा त्याची ड्युटी संपत होती आणि शुक्रवार पर्यंत त्याला कामावर हजर राहायचं नव्हतं यादरम्यानच्या कालावधीत एक तर तो स्वतः मला ड्रायव्हर म्हणून उपलब्ध होऊ शकेल किंवा असोसिएशन तर्फे कुठलातरी ड्रायव्हर उपलब्ध करून देऊ शकेल." कपाडिया म्हणाला.
"तुझ्या भूतपूर्व बायको बद्दल म्हणजे या खटल्यातल्या आरोपीबद्दल तुला काही प्रेम वाटत नव्हतं?" पाणिनी ने विचारलं.
"नाही असं काही नाही उलट काही बाबतीत मला तिचा अभिमानच होता."
"आणि या अभिमानापोटीच किंवा प्रेमापोटीच तू तिला गॅरेज मधल्या प्रेताच्या शेजारी रिव्हॉल्व्हर ठेवून आत्महत्या असल्याचं भासवण्याचा सल्ला दिलास? आणि याबद्दल कुणालाही काहीही न सांगण्याची सूचना दिलीस?" पाणिनी ने विचारलं.
"मी असं काही केलं नाही आणि तुमच्याकडे तसा काही पुरावाही नाही. आरोपींनी मला अडकवण्यासाठी तसं तुम्हाला सांगितलं असेल कदाचित पण त्यात काही अर्थ नाही ते पूर्णपणे चुकीच आहे आणि हे आरोप खोटे आहेत."
"अगदी तसंच नाही पण ती तिच्या अडचणीतनं बाहेर यावी म्हणून तू तिला वेगळं असं काही सुचवलंस?" पाणिनी ने विचारलं.
"मुळीच नाही."
" पोटगी बाबत तिने दिलेला प्रस्ताव हा तू केवळ एक व्यावसायिक प्रस्ताव म्हणून विचारात घेतलास? म्हणजे तिच्या भावनेचा विचार न करता?"
"मला तिच्यामध्ये रस होता.मला फक्त एवढीच खात्री करून घ्यायची होती की केवळ उधळण्यासाठी तिला पैसे नको आहेत ना. आणि हे करत असताना मी एक व्यावसायिक या नात्याने मला जेवढा फायदा करून घेता येईल तेवढा करून घेण्याच्या दृष्टीने ही पंधरा लाखाची रक्कम कमी कशी करता येईल याचा विचार केला आणि मला नाही वाटत यात काही चूक आहे." कपाडिया म्हणाला
"मगाशी साक्ष देताना तू असा शब्द वापरलास की अखेरीस गॅरेज मध्ये सापडलेले प्रेत हे तिच्या आधीच्या नवऱ्याचं आहे हे तिने कबूल केलं"
"मला नाही वाटत मी असं काही म्हणालो"
"तुला आठवत नसेल तर मी कोर्टाच्या क्लार्कला विनंती करतो की त्यानं तुझी साक्ष वाचून दाखवावी"
"नाही वाचून दाखवण्याची गरज नाही मी म्हणालो तसं."
"याचा अर्थ सुरुवातीला तिने ते प्रेत तिच्या पूर्वीच्या नवऱ्याचं असल्याचं मान्य केलं नाही तुमच्या संभाषणाच्या शेवटी मान्य केलं बरोबर आहे की नाही?" पाणिनी ने विचारलं.
"हो बरोबर आहे"
"याचा अर्थ असा की तुमच्यात सुरुवातीला चर्चा झाली आणि तुझ्या लक्षात आलं की ती आपल्यापासून काहीतरी दडवते आहे म्हणून तू तिच्यावर प्रश्नांची सरबत्ती केलीस आणि त्यातून शेवटी तिने कबूल केलं की हे प्रेत तिच्या पूर्वीच्या नवऱ्याच आहे" पाणिनी म्हणाला
"हो तसं म्हणू शकतो आपण"
"याचाच अर्थ ते प्रेत तिच्या नवऱ्याचं आहे हे तिने कबूल करावं म्हणून तुला तिच्यावर दबाव टाकावा लागला?"
"हो. एक प्रकारे."
"म्हणजे तू तिला असं सांगितलं असू शकतं की तिनं सत्य काय ते सांगितल्याशिवाय तू तिला मदत करू शकणार नाहीस?"
"हो अप्रत्यक्षरीत्या तसंच" कपाडिया म्हणाला
"शेवटी तिने तुला वस्तुस्थिती काय ते सांगितलं, आणि मग तू तिला मदत करायला तयार झालास?"
"हो."
"आणि तिनं वस्तुस्थिती काय आहे ते सांगितल्यानंतर म्हणजे ते प्रेत तिच्या नवऱ्याचं असल्याचं सांगितल्यानंतर तू मात्र कबूल केल्याप्रमाणे तिला मदत करायचं टाळलंस?"
कपाडिया ने अस्वस्थपणे मदतीच्या हेतूने अॅडव्होकेट खांडेकरांकडे पाहिलं
"बोल बरोबर आहे की नाही मी विचारलं ते?" पाणिनी ने विचारलं.
खांडेकर काहीतरी हरकत घेतील असं त्याला वाटलं पण त्यांनी काहीच हालचाल केली नाही तेव्हा नाईलाजाने त्यांन उत्तर दिलं,. "मी मदत केली नाही तिला."
"मला वाटलंच होतं तसं. दॅट्स ऑल युवर ओनर" पाणिनी म्हणाला
"आदित्य कोळवणकर ला साक्षीसाठी बोलवा" खांडेकरांनी जाहीर केल
"मी तुला स्मिथ अँड वेसन कंपनीची 38 कॅलिबर ची रिव्हॉल्व्हर दाखवतो ती तू बघ आणि यापूर्वी तू ती पाहिली आहेस का ते सांग."खांडेकरांनी पहिला प्रश्न विचारला
साक्षीदाराने आपल्या खिशातून एक कागदाची चिठ्ठी बाहेर काढली आणि त्यावरचा मजकूर वाचून त्याने उत्तर दिलं. "या प्रश्नाचे उत्तर देणे म्हणजे माझ्यावर आरोप केल्यासारखं होईल म्हणून मी प्रश्नाचे उत्तर द्यायला नकार देत आहे"
" तू हे रिव्हॉलवर उदक प्रपात कंपनीकडून खरेदी केलंस का?" खांडेकरांच्या या दुसऱ्या प्रश्नाला साक्षीदाराने पहिल्या प्रश्नासारखंच उत्तर दिलं.
"रिव्हॉल्व्हर खरेदी करताना रजिस्टर वर तू परितोष हिराळकर अशी सही केलीस का?"
"याही प्रश्नाला उत्तर देण्यासाठी माझा नकार आहे"
" परब ला तू मारलास का" खांडेकरांनी विचारलं
"नाही"
"तुझी आणि त्याची ओळख होती?"
"नाही आमची ओळख नव्हती."
"मगाशी ज्या रिव्हॉल्व्हर ची मी चौकशी केली ते रिव्हॉल्व्हर तू परब च्या प्रेताशेजारी ठेवलं होतंस का?"
"नाही." कोळवणकर ने उत्तर दिलं
"दॅटस ऑल युवर ओनर" पाणिनी पटवर्धन कडे बघून खांडेकर म्हणाले
"मला एखाद दुसराच प्रश्न विचारायचा आहे उलट तपासणीत." पाणिनी ने विचारलं. "वर उल्लेख केलेली रिव्हॉल्व्हर कधी ना कधी तुझ्या ताब्यात होती?"
"या प्रश्नाचे उत्तर देण्यास मी नकार देतो या कारणास्तव की हे उत्तर देणे म्हणजे माझ्यावर आरोप करण्यासारखे होईल" साक्षीदार म्हणाला
"मायरा कपाडिया चे नकळत तू कधी हे रिव्हॉल्व्हर घेतल होतस?" पाणिनी ने विचारलं.
"याचे उत्तर देणे म्हणजे माझ्यावर दोषारोप केल्यासारखं होईल म्हणून मी उत्तर देऊ शकत नाही."
"तुझ्याकडे कधीकाळी मायरा च्या फ्लॅटची चावी होती?"
"नाही सर"
"मी तुला दोन पत्र आता दाखवणार आहे दोन्ही पत्र टाईप केलेली आहेत त्यापैकी एक पत्र कनक ओजसच्या गुप्तहेर संस्थेच्या नावाने लिहिलं आहे आणि दुसरं मला उद्देशून लिहिलं आहे.
पहिलं पत्र मायरा च्या अपार्टमेंटच्या किल्लीच्या संदर्भात आहे तर दुसरा पत्र तिच्या अपार्टमेंट मधल्या टेबलाच्या ड्रॉवरच्या किल्ली संदर्भात आहे. माझा प्रश्न असा आहे या दोन पैकी कुठलं तरी एक पत्र तू लिहिल आहेस का?" पाणिनी ने विचारलं.
"नाही. मी लिहिलेलं नाही"
"दॅट्स ऑल युवर ओनर" पाणिनी म्हणाला
"दॅट्स ऑल."खांडेकर म्हणाले.
"या साक्षीदाराने ज्या पद्धतीने उत्तर दिली आहेत त्यावरून मी असं सुचवतो की सरकारी वकिलांनी नेमकी काय परिस्थिती आहे हे स्पष्ट होण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात"न्यायाधीश म्हणाले.
"येस युवर ओनर सर्व शक्यतांचा विचार आम्ही केलेला आहे आणि त्याच्या परिणामांचा सुद्धा."खांडेकर म्हणाले
"कोर्ट आता जेवणाची सुट्टी घेत आहे"न्यायाधीशांनी जाहीर केलं आणि ते आपल्या खुर्चीतून उठले. पाणिनीपटवर्धन कनक ओजस ला उद्देशून म्हणाला,"सॉरी कनक आज तुझ्याबरोबर जेवायला येऊ नाही शकणार मी बाहेर."
"कारे काय विशेष?"कनक ओजस ने विचारलं.
"मला आता बऱ्याच जणांना फोन करायचेत तू सौम्याला घेऊन जेवायला जा आणि तिला चांगलं खाऊ पिऊ घाल."
"तू प्रत्येक वेळेला फक्त सौम्याला घेऊन जेवायला जातोस अशी माझी तक्रार असते पण आज तू स्वतः न येता सौम्या आणि मला एकत्र जेवायची संधी दिलीस खरी पण त्याचा खर्च मात्र मला करावा लागणार" कनक कुरकुरत म्हणाला.
( प्रकरण २२ समाप्त)