Savadh - 21 in Marathi Thriller by Abhay Bapat books and stories PDF | सावध - प्रकरण 21

Featured Books
  • انکہی محبت

    ️ نورِ حیاتحصہ اول: الماس… خاموش محبت کا آئینہکالج کی پہلی ص...

  • شور

    شاعری کا سفر شاعری کے سفر میں شاعر چاند ستاروں سے آگے نکل گی...

  • Murda Khat

    صبح کے پانچ بج رہے تھے۔ سفید دیوار پر لگی گھڑی کی سوئیاں تھک...

  • پاپا کی سیٹی

    پاپا کی سیٹییہ کہانی میں نے اُس لمحے شروع کی تھی،جب ایک ورکش...

  • Khak O Khwab

    خاک و خواب"(خواب جو خاک میں ملے، اور خاک سے جنم لینے والی نئ...

Categories
Share

सावध - प्रकरण 21


सावध

प्रकरण २१

“ मिस्टर खांडेकर, मला वाटतंय की तुम्ही मला आव्हान दिले होतेत की रुद्रांश गडकरी ला साक्षी साठी बोलावणार आहात, तर मग बोलवा. बघूया आपण त्याला आता काय म्हणायचं आहे ते.”

“ अशी वैयक्तिक टीका मला आवडणार नाही मी....” खांडेकर खेकसत म्हणाले.

“ पटवर्धन फक्त तुम्हाला तुमच्या आव्हानाची आठवण करून देताहेत.” चेहेऱ्यावरील हसू दाबत न्या. आगवेकर म्हणाले.

“ मी केवळ पाच मिनिटांची विश्रांती घ्यावी अशी कोर्टाला विनंती करतो.” हेरंब खांडेकर म्हणाले.

“युअर ऑनर, साक्षीदाराला शिकवण्यासाठी सरकारी वकील ही मागणी करत आहेत.माझा विरोध आहे.” पाणिनी म्हणाला

“ साक्षीदाराला शिकवण्याची काही गरज नाहीये.”

“ मग बोलवा त्याला लगेच साक्षीला.” पाणिनी म्हणाला

“ मला माझ्या सहकारी वकिलाशी बोलायचं आहे म्हणून पाच मिनिटे हवी आहेत.” खांडेकर म्हणाले.

“ मी त्यासाठी विरोध दर्शवलाय.” पाणिनी म्हणाला

“ विनंती अमान्य.” न्यायाधीश म्हणाले.

“ ठीक तर मग मी राजदत्त रघुवीर हसमुख ला बोलावू इच्छितो साक्ष द्यायला.”

“ तुम्ही रुद्रांश गडकरी ला बोलवाल असं मला वाटलं.” पाणिनी म्हणाला

“ हा मी लावलेला खटला आहे.कोणी कधी साक्ष द्यायची हे मी ठरवणार. दुसऱ्या कोणी मला शिकावाची गरज नाही.” खांडेकर म्हणाले.

“ काही काळापूर्वी तुम्ही मला आव्हान दिलं होतं. आता मी तुम्हाला देतो की हिम्मत असेल तर रुद्रांश गडकरी ला शिकवण्याची संधी मिळण्यापूर्वी त्याला माझ्या उलट तपासणीला तोंड द्यायला लावा.” पाणिनी म्हणाला

“राजदत्त रघुवीर हसमुख कृपा करून पिंजऱ्यात या.” पाणिनी च्या वक्तव्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत खांडेकर म्हणाले.

हसमुख म्हणजे उदक प्रपात कंपनीचा मालक होता.साक्ष देताना त्याने आपले रिव्हॉल्व्हर विकल्याचे सांगितले आणि विक्री होते वेळी रजिस्टर वर खरेदीदाराची सही घेतल्याचे सांगून ते रजिस्टर सादर केले.

“ त्या माणसाला नंतर तू पाहिलंस?” खांडेकरांनी विचारलं.

“ हो ”

“ कोण होतं तो?”

“ आदित्य कोळवणकर त्याला मी तुमच्या ऑफिसात सहा तारखेला सकाळी पाहिलं.” हसमुख म्हणाला.

“ घ्या उलट तपासणी.” खांडेकर म्हणाले.

“ सध्या काही प्रश्न नाहीत माझे. वाटलं तर मी नंतर पुन्हा बोलवीन त्याला. तुम्ही आता रुद्रांश गडकरी ला बोलावताय ना?” पाणिनी ने विचारलं.

“ मला असं सारखं सारखं छेडलेले आवडणार नाही.” खांडेकर तक्रार करत म्हणाले. “ आणि ... उलट तपासणी घेणार नाही म्हणजे काय? म्हणे नंतर बोलवीन! ”

“ एखाद्याची उलट तपासणी घ्यायची की नाही आणि कधी घ्यायची हे मी ठरवीन.” पाणिनी म्हणाला

न्यायाधीश म्हणाले, “ वैयक्तिक टीका नकोत.रुद्रांश गडकरी हा तुमचा मोठा साक्षीदार आहे या केस मधला.आणि पटवर्धन म्हणतात तसे तुम्हीच तुमच्या प्रास्ताविकात आव्हान दिले होते अॅडव्होकेट पटवर्धन यांना. आता तुम्हीच रुद्रांश गडकरी यांना साक्षीदार म्हणून आणायला टाळाटाळ करताय. मला पूर्ण जाणीव झाली आहे की जो पर्यंत तुम्हाला रुद्रांश गडकरी शी बोलायची संधी मिळत नाही तो पर्यंत तुम्ही त्याला बोलावणार नाही. तुमची पाच मिनिटाच्या विश्रांतीची मागणी मी फेटाळली म्हणून तुम्ही जेवणाची सुट्टी होई पर्यंत मुद्दामच वेगळे साक्षीदार बोलावून वेळकाढूपणा करताय. मी काल जन्मलेलो नाही.तुमच्या पेक्षा अनुभवी आहे मी. ” न्या.आगवेकर म्हणाले.

नाईलाज झाल्यासारखे खांडेकर म्हणाले, “ रुद्रांश गडकरी यांच्या नावाचा पुकारा करा.”

त्याचे नाव पुकारलं गेलं.तो पिंजऱ्यात आला.शपथ,ओळख वगैरे झाल्यावर त्याने सांगितलं की पाच तारखेची सायंकाळ त्याच्या लक्षात राहिली कारण गाडीच्या इंजिनाच्या फटफट आवाजामुळे त्याला त्रास झाला होता.हे आवाज लागोपाठ सलगपणे आठदहा वेळा आले.

“ तुम्ही काय केलंत त्या नंतर?” –खांडेकरांनी विचारलं.

“ मी आवाज करणाऱ्या त्या माणसांना खडसावण्यासाठी खिडकी उघडली.”

“ मग? खडसावलं का त्यांना?” खांडेकरांनी विचारलं.

“ नाही.कारण त्या पूर्वीच त्यांनी गाडीचं इंन्जीन बंद केलं होत त्यामुळे आवाज थांबला होता.”

“ तुला गाडी आणि माणसं नीट दिसली? किती अंतर असेल तुमच्यात?”

“ सत्तर पंचाहत्तर फूट असेल.”

“ पुरेसा उजेड होता? ”

“ होता.गाडीचे दिवे चालू होते आणि मला आकृत्या हालचाल करत असलेल्या दिसत होत्या. ते गॅरेज कडे बघत होते, मला त्यांचं चालणे, वावरणे दिसत होते.ते पाठमोरे होते पण त्यांचे कपडे मला दिसत होते.”

“ त्यांचं वर्णन कर.” खांडेकर म्हणाले.

“ त्यापैकी एक मायरा कपाडिया होती..पोलिसांनी ती मला दाखवली तेव्हा तिच्या अंगावर तेच कपडे होते ,जे मी त्या दिवशी पाहिले होते.”

“ दुसरी व्यक्ती?” खांडेकरांनी अधीरतेने विचारलं.

“ आता मात्र मला तुम्ही अंदाजाने उत्तर द्यायला भाग पडताय.” साक्षीदार म्हणाल आणि कोर्टात हास्याची लकेर उठली.

“ देवाने तुला दोन डोळे दिले आहेत. तुला काय दिसलं ते तू सांगू शकत नाहीस?” खांडेकर चिडून म्हणाले.

“ देवाने मला दोन कान सुध्दा दिलेत आणि अत्ता मी काय ऐकलंय ते मला पूर्ण समजलंय. ”

आता पुन्हा उठलेल्या हास्याच्या लकेरीत न्यायाधीश सुध्दा सामील झाले आणि त्यांनी हातोडा आपटून सर्वांना शांत केलं.

“ जेवढं आठवून व्यवस्थित सांगता येईल तेवढंसांगायचा प्रयत्न कर.” खांडेकर म्हणाले.

“ मायरा बरोबरचा माणूस उंच असा गृहस्थ होता.त्याचा चेहेरा मला शेवट पर्यंत दिसला नाही.एखाद्या खेळाडूसारखी देहयष्टी होती. हालचाली वरून तरुण वाटत होता.लांब टांगा टाकत चालत होता.अंगात फेंट रंगाचा कोट होता.” रुद्रांश गडकरी म्हणाला.

“ त्याला पुन्हा पाहिलंयस नंतर? ओळखता येईल तुला? ”

“ मला खातृपूर्वक नाही सांगता येणार.”

“ पण आरोपीला मात्र तू नक्की ओळखू शकला आहेस.” खांडेकरांनी विधानं केलं.

“ ऑब्जेक्शन ! सूचक प्रश्न आहे.आपल्याला हवं असलेलं उत्तर साक्षीदाराने द्यावं असं सुचवणारा.” पाणिनी म्हणाला

“ आक्षेप मान्य.” न्यायाधीश म्हणाले.

“ मायरा च्या बरोबरच्या माणसाचं तू जे वर्णन केलंस,तसा माणूस तुला अत्ता इथे आसपास दिसतोय?” खांडेकरांनी विचारलं.

“ सूचक प्रश्न आहे पुन्हा हा.” पाणिनी म्हणाला

“ आक्षेप मान्य.”

“ ठीक, मी बदलून विचारतो, तू त्याचं वर्णन करू शकशील?” खांडेकरांनी विचारलं.

“ पुन्हा माझी हरकत आहे. आधीच विचारलेला आणि उत्तर दिलं गेलेला प्रश्न आहे हा.” पाणिनी म्हणाला

“ उलट तपासणी घ्या ” खांडेकर वैतागून म्हणाले. पाणिनीच्या आक्षेपाला न्यायाधीश काय म्हणतील याचा अंदाज करत आणि त्यासाठी वाट न बघता ते म्हणाले.

“ तुला वाटलं की त्या माणसाला तू परत पाहिलंस म्हणून?” पाणिनी ने विचारलं.

“ मला खरंच वाटलं की मी पाहिलंय म्हणून. होळकर ने जसं वर्णन केलं तसाच होता तो.”

“ थोडक्यात. गॅरेज जवळ तुला दिसलेल्या माणसाची सर्वसाधारण देहयष्टी, कपडे , चालणे वगैरे सर्व त्या रिसोर्ट च्या बंगल्यातून बाहेर पडणाऱ्या माणसा सारखंच होतं? ” पाणिनी म्हणाला

“ हो.”

“ पण तू त्याचा चेहेरा बघितलाच नाहीस?” पाणिनी ने विचारलं.

“ नाही.”

“ तू इन्स्पे.होळकर ची साक्ष ऐकलीस ना? रिसोर्ट च्या बाहेर आलेल्या माणसाकडे तू बरोब्बर निर्देश केलास असं त्याने साक्ष देताना सांगितलंय.” पाणिनी म्हणाला

“ मला वाटतं तसं करण्यात मी चूक केली.” आवंढा गिळत रुद्रांश गडकरी म्हणाला.

“ असं का वाटतं तुला?” पाणिनी ने विचारलं.

“ अहो तुम्ही अत्ता सिध्द केलंत ना की तो माणूस तुम्ही नव्हता.”

“ थोडक्यात तुला सांगण्यात आलं होत की गॅरेज बाहेर उभा असणारा माणूस दुसरा तिसरा कोणीही नसून पाणिनी पटवर्धन हाच होता?”

“ हो.”

“ आणि म्हणूनच रिसोर्ट मधून जेव्हा तो माणूस बाहेर आला तेव्हा तू होळकरला सांगितलस की हाच तो माणूस आहे म्हणून?”

“ मला वाटतंय तसचं काहीसं घडलं असावं. त्या दिव्यांच्या उजेडात सर्व काही अंधूकच दिसत होतं,डोळे दिपून गेल्यामुळे.” रुद्रांश गडकरी म्हणाला.

“ तरीही तू त्या माणसाची ओळख पटवलीस? ” पाणिनी ने विचारलं.

“ हो.”

“ आणि आता तुला वाटतंय की तुझी चूक झाली?” पाणिनी ने विचारलं.

“ हो. मी चुकलो असणार.”

“ ही चूक होण्याचं कारण म्हणजे ती आकृती म्हणजे पोलिसांनी तुला सांगितल्यानुसार तू गॅरेज जवळ बघितलेली आकृती नव्हती? ” पाणिनी ने विचारलं.

“ मला नेमकं कसं सांगायचं ते कळत नाही पण मी सापळ्यात अडकलो खरा.”

न्या.आगवेकर हसले.

“ आणि ही स्त्री, जिला तू पलीकडच्या गल्लीत बघितलस, ती या माणसा बरोबर होती?”

“ हो.” रुद्रांश गडकरी म्हणाला.

“ त्या स्त्रीला आणि या माणसाला तू एकाच वेळी, एकाच ठिकाणी आणि एकाच परिस्थितीत पाहिलंस?” पाणिनी ने विचारलं.

“ हो सर.”

“ आणि त्या माणसाला जर तू ओळखू शकला नाहीस असं तूच म्हणतो आहेस तर त्या स्त्रीला कसा काय ओळखलंस तू?” पाणिनी ने विचारलं.

साक्षीदार गप्प बसला.

“ उत्तर आहे तुझ्याकडे याचे?”

“ नाही सर.” रुद्रांश गडकरी म्हणाला.

“ दॅट्स ऑल युअर ऑनर.” पाणिनी म्हणाला

“ आता कोर्ट दहा मिनिटांची विश्रांती घेत आहे.” न्यायाधीशांनी खांडेकरांकडे बघत जाहीर केलं.

( प्रकरण २१ समाप्त.)