Little things in Marathi Children Stories by Geeta Gajanan Garud books and stories PDF | छोट्यांच्या गोष्टी

Featured Books
  • નિતુ - પ્રકરણ 64

    નિતુ : ૬૪(નવીન)નિતુ મનોમન સહજ ખુશ હતી, કારણ કે તેનો એક ડર ઓછ...

  • સંઘર્ષ - પ્રકરણ 20

    સિંહાસન સિરીઝ સિદ્ધાર્થ છાયા Disclaimer: સિંહાસન સિરીઝની તમા...

  • પિતા

    માઁ આપણને જન્મ આપે છે,આપણુ જતન કરે છે,પરિવાર નું ધ્યાન રાખે...

  • રહસ્ય,રહસ્ય અને રહસ્ય

    આપણને હંમેશા રહસ્ય ગમતું હોય છે કારણકે તેમાં એવું તત્વ હોય છ...

  • હાસ્યના લાભ

    હાસ્યના લાભ- રાકેશ ઠક્કર હાસ્યના લાભ જ લાભ છે. તેનાથી ક્યારે...

Categories
Share

छोट्यांच्या गोष्टी


छोट्यांच्या गोष्टी

श्रीगणेशा

दिनकरला आईने गेल्यावर्षीचंच जुनं दप्तर स्वच्छ धुवून,वाळवून दिलं. त्यात पुस्तकंही जुनीच कोणाचीतरी मागून आणलेली. शेजारी रहाणाऱ्या मानवला त्याच्या बाबांनी आकर्षक दप्तर आणलं होतं. रेनकोटही नवीनकोरा, नवीन डबा, सगळंकसं नवकोरं करकरीत.

दिनू आईला म्हणाला,"सगळं जुनं जुनं दिलयस मला, शाळेत न्हेण्यासाठी. मानवचं बघ सगळं कसं नवीन. मलाही तसंच नवीन दप्तर, नवीन पुस्तकं हवी. नाहीतर मी नाही शाळेत जाणार."

आईने समजावून पाहिलं,ओरडून पाहिलं तरी दिनू ऐकेना तसं आईने त्याच्या बकोटीला धरलन नं मोरीत रेटत न्हेलं. दोन तांबे पाणी त्याच्या अंगावर ओतून, अंग कपडे धुवायच्या साबुवडीनेच खसाखसा चोळलं तसं दिनू परत डोळे चोळत रडू लागला. "बघ, हा साबणही असलाच वापरतेस. अंग धुवायला वेगळा साबण असतोय."
आईही चिडली,म्हणाली,"दिनू, चार घरची धुणीभांडी करून हे घर चालवतेय रे मी. तुझ्या बाबांची कंपनी पडली बंद. त्यांना नोकरी लागली की आपणही आणू तुझ्यासाठी नवंकोरं लेणं."

दिनू गुस्स्यातच शाळेला गेला. नवीन वर्ग, नवीन इयत्ता, मास्तरही नवीन. सबनीस गुरूजी वर्गावर आले. मुलांना पाट्या काढायला सांगितल्या. फळ्यावर सबनीस गुरुजींनी वळणदार अक्षरांत 'श्रीगणेशा' लिहिलं.

गुरूजी म्हणाले,"मुलांनो, आज आपला अभ्यासाचा पहिला दिवस. कोणत्याही शुभ कामाची सुरूवात श्रीगणेशाच्या स्मरणाने करतात. श्रीमंतातला 'श्री' व गरीबातला 'ग' दोन्ही श्रीगणेशात आहेत. श्रीमंत, गरीब देवाला दोन्ही सारखे. एक मात्र खरं, मन लावून अभ्यास केलात तर तुम्ही सर्वच श्रीमंत व्हाल. मात्र श्रीमंती फक्त पैशात मोजू नका. मनानेही श्रीमंत व्हा."

दिनूला गुरूजींचं म्हणणं पटलं. सकाळी आईजवळ केलेल्या हट्टाबद्दल त्याला वाईटही वाटलं नि आईची आठवण आली. मनात म्हणाला,"आता कुणाकडे तरी भांडी घासत असेल. बाबा नोकरीच्या शोधात वणवण भटकत असतील पण थोडीच वर्ष. मी भरपूर शिकून मोठा अधिकारी होईन आणि आईबाबांना सुखात ठेवेन. आता श्रीगणेशा चांगलं वागण्याचा. अवाजवी हट्ट न करण्याचा."

_______________

अंथरूण पाहून पाय पसरावे.

©®गीता गरुड.

ढोम्या निखिलेशच्या वाढदिवसपार्टीहून आला नि आईबाबांकडे हट्ट धरून बसला की निखिलेशच्या आईबाबांनी त्याच्यासाठी नवीकोरी सायकल आणलेय तशीच मलाही हवी. ढोम्याचे बाबा म्हणाले,"अरे ढोम्या, यंदा आपण तुझ्या दादासाठी घेतली नं नवी सायकल. त्याला कॉलेजसाठी फार लांब जावं लागतं म्हणून तो आहे तीच राहूदे म्हणत असतानाही घेतली. तू दोन वर्ष दादाची सायकल वापर मग आपण घेऊ तुला."
ढोम्या पाय आपटू लागला,"दादाला घेतली मग मलाच का नाही घेऊन देत!"
ढोम्याची आजी म्हणाली,"ढोम्या ही इथे दोन पावलांवर तुझी शाळा. हवी कशाला नवी सायकल!"
ढोम्या हाताची घडी घालत घुश्श्यात म्हणाला,"मग निखिलेशची शाळा तरी कुठे लांब आहे तरी त्याला नवीकोरी सायकल, मलाच नाही."
आई म्हणाली,"निखिलेशचे वडील हॉटेल व्यवसायिक आहेत. त्यांची गोष्ट वेगळी राजा. आपण खर्च करताना दहादा विचार करावा."
ढोम्या कोणाचंच ऐकून घ्यायला तयार नव्हता शेवटी ढोम्याच्या बाबांनी त्याला नवी कोरी सायकल आणून दिली पण बाबांच्या गळ्यातली सोन्याची चेन! ती चेन सराफाकडे गहाण ठेवल्याचं ढोम्याने झोपेत ऐकलं नि त्याला रडूच कोसळलं. आजीच्या कुशीत जाऊन तो स्फुंदू लागला.
"आजी, मला सध्या नको सायकल. आपण खरंच ती परत देऊ पण बाबांची चेन परत आणू. तू सांग ना बाबांना असं." खाटीवर पहुडलेले ढोम्याचे बाबा ढोम्याचे शहाणे बोल ऐकून समाधानाने हसत होते."
आजीने ढोम्याला पांघरुणात घेतलं नि त्याच्या गालावर हात फिरवत म्हणाली,"ढोम्या, आता केलास हट्ट तो केलास पण यापुढे मात्र आपल्या अवाजवी हट्टापायी वडीलधाऱ्यांना त्रास होणार नाही याची दक्षता घे बरं. आपल्या ऐपतीप्रमाणे आपण खर्च करायचा असतो. कोणी सोम्यागोम्याने केला म्हणून आपणही त्याच्यासारखीच उधळपट्टी करायची हे सोडून द्यावं. खर्च करताना आपणाला आपण खरेदी करणाऱ्या वस्तूची खरंच गरज आहे का की त्यापेक्षा इतर निकडीचे खर्च आहेत याकडे ध्यान असू द्यावं.
बरंचसं समजल्याचं दाखवत ढोम्याने त्याच्या आजीला गच्च मिठी मारली.

____________


रक्त

©®गीता गरुड.

स्वरा झोपेतून उठली, अगदी नेहमीसारखीच. अंथरुणातून उठून ती ब्रश करायला गेली.

हा..रक्त..आई बघ स्वराला लागलय. स्वरा तुला दुखत नाही!

नाही. स्वराने मागे वळून फ्रॉककडे पाहिलं. आई नेमकी अंघोळीला गेली होती. स्वरा नि तिचा भाऊ बाबांकडे गेले. तिथेच बाजूला बसलेली आजी म्हणाली,"अरे देवा, झालीस तू. चल माझ्यासोबत बेडरुममधे. हे असं परत झालं की फक्त आईला किंवा मलाच सांगायचं हो," असं म्हणत आजी तिला बेडरुममधे घेऊन गेली.

स्वराच्या बाबाला मात्र आईचं बोलणं पटलं नाही. बोलायला येऊ लागल्यापासनं एकही गोष्ट नव्हती जी स्वराने तिच्या दादापासनं व बाबापासनं लपवली असेल.

स्वरा आजीसोबत जाऊन सुती कापडाची घडी घालून आली.

स्वराचा बाबा म्हणाला,"स्वरा पोटात दुखतय का? असं झालं की घाबरायचं नाही. अगं मासिक पाळी ही तुम्हा मुलींना देवाने दिलेली देणगी आहे. तुझ्या आईलाही असंच व्हायचं,अजुनही होतं दर महिन्याला चार दिवस..तुला पुढे बाळ होणार तर त्यासाठी देवबाप्पा तुझ्या शरीरात आतापासूनच बदल घडवत असतो. आवडतात नं तुला छोटी बाळं. बाहुलीची आई व्हायला आवडतं नं.

खऱ्याखुऱ्या बाळाची आई होणं सोप्पं नसतं त्यासाठी दहा ते बारा वयापासनंच मुलींना पाळी येऊ लागते. पहिले दोन दिवस पोटदुखी, थोडा जास्त रक्तस्त्राव मग आपणच हळूहळू कमी होतो चौथ्या दिवसाअखेरीस. जमेल नं तुला हे सारं."

"हो बाबा नक्की जमेल. मलाही मोठेपणी छोटुलं बाळ पाहिजे ना त्यासाठी नक्की जमवून घेईन मी..पण बाबा."

"पण काय!"

"मी हे लपवून का ठेवायचं तुझ्यापासून, दादापासून?"

"मुळीच नाही लपवायचं बेटा. तू हक्काने सांगायचस आम्हांला. हो ना आई." असं म्हणत बाबाने त्याच्या आईकडे पाहिलं.

"बरोबर आहे रे तुझं म्हणणं. नवं ते घ्यावं. जुनं जे चुकीचं असेल ते सोडून द्यावं. पटलं मला."

_____________

दृष्टीकोन

नवीन ब्लॉक घेतला, सामंत कुटुंबाने. त्या इमारतीत रहायला येणारं हे दुसरं कुटुंब. बाकीची बिर्हाडं अजून आली नव्हती. घरप्रवेशादिवशी आवर्जुन शेजारच्या पाध्ये वहिनींना बोलावलं, रश्मीने.

पाध्ये वहिनींसोबत त्यांचा सतरा वर्षांचा आयुष आला होता. आयुष इतर मुलांसारखा नव्हता. तो होता वेगळा, मतिमंद. बारकुले डोळे, थोडा वेगळा चेहरा नं दातावर दात वाजवायची,मधुनच जीभ बाहेर काढायची, उगाचच मनमोकळं हसायची त्याची ती लकब रश्मीच्या सासूला अजिबात आवडली नाही.

रश्मीच्या सात वर्षाच्या रियानशी मात्र आयुषची चांगली दोस्ती झाली. आयुष त्यांच्याकडे अधनंमधनं रियानशी खेळायला येऊ लागला.

रश्मीच्या सासूला आयुषचं येणं आवडत नसायचं. रश्मी नसताना तर ती आयुष बाहेर बेल वाजवत असला तरी दार उघडायची नाही. रियानला टेरेसमध्ये घेऊन बसायची.

तरी आयुष संधी मिळाली की यायचाच खेळायला. एकदा रश्मीच्या सासूने आयुषच्या आईला सांगून टाकलं की तुमच्या आयुषला आमच्याकडे नका पाठवत जाऊ. रियानच्या अभ्यासाचा खोळंबा होतो.

त्या दिवबानंतर आयुषची नं रियानची भेट होईनाशी झाली. रश्मीने एकदा आयुषला विचारलंही,"का रे हल्ली येत नाहीस रियानशी खेळायला?" यावर आयुष नेहमीसारखंच हसला.

त्यादिवशी भर दुपारी धो धो पाऊस पडत होता. रश्मी व तिचे यजमान ऑफिसात अडकले होते. सकाळी पावसाची जाग नसल्याने रियानलाही शाळेत पाठवलं होतं.

रियांशच्या आजीला हुडहुडी भरली होती. तापामुळे ती ग्लानीत होती. बसकाकांनी रियांशला नाक्यावर सोडलं पण नेहमीसारखी आजी घ्यायला आली नव्हती. बसकाका आजीची वाट पाहून निघून गेले.

रियांश त्या भर पावसात छोटीशी छत्री घेऊन उभा असलेला आयुषला टेरेसमधून दिसल़ं. त्याने आईकडून छत्री घेतली व धावतच खाली गेला. पाणी तर चांगलच फुगत चाललं होतं. त्या लालतांबड्या प्रवाहात पाय टाकत तो नाक्यापाशी आला. त्याने रियानला उचलून घेतलं व छत्रीत घेऊन रियानच्या दारापाशी आला. रियानने बेल वाजवली.

रियानच्या आजीचा डोळा उघडला..किती वेळ झोपले होते मी आणि रियान..बसकाकांचे मिसकॉल्स..अरे बापरे..बेल ..कोण वाजवत असेल..तिने चार पावलं पुढे जाऊन दार उघडलं. दारात आयुष रियानला कडेवर घेऊन उभा होता.

रियानच्या आजीच्या डोळ्यात अश्रु होते..तिने आयुषसमोर हात जोडले. जणू त्याला सांगत होती..आयुष बाळा, चुकले रे मी तुला ओळखायला.

आयुषने आजीच्या अंगात स्वेटर, कानाभोवती मफलर पाहून तिच्या गळ्याला हात लावला.

ताप..ताप म्हणत त्याने तिला झोपायला सांगितलं. रियानचं अंग, डोकं पुसून त्याला कोरडे कपडे घालायला लावले. रियानने ते घालताच आयुषने तीन बोटांचा मोर करून त्याला छान छान म्हंटलं. आयुष आपल्या आईला घेऊन आला. तिने रियानच्या आजीला गोळी दिली व मऊभात करून दिला.

त्यादिवसानंतर आजीचा आयुषकडे पहाण्याचा द्रुष्टीकोन बदलला.

समाप्त

--©®गीता गरुड.