Ramayan - Chapter 7- Part 47 in Marathi Spiritual Stories by MB (Official) books and stories PDF | रामायण - अध्याय 7 - उत्तरकांड - 47

Featured Books
Categories
Share

रामायण - अध्याय 7 - उत्तरकांड - 47

अध्याय 47

सीतेचे वनाभिगमन

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

परतीला पोहोचली :

अयोनिजेच्या मुखकमळें । ऎसं वदतां सुमित्रेच्या बाळें ।
नावाडी पाचारिला कुशळें । सुंदर नौका आणविली ॥१॥
कैवर्ते नौका सुंदर पूर्ण । आणोनि म्हणे करा जी आरोहण ।
धरणिजेसहित ऊर्मिलारमण । नावेवरी बैसला ॥२॥
रथसहित तेधवां सूत । ऎलतीरीं राहोन त्वरीत ।
पैलतीरीं दोघे उतरोनि तेथ । स्नानसंध्या सारिली ॥३॥

लक्ष्मणाचा दुखाःवेग :

शोकें संतप्त लक्ष्मण । बोले जानकीप्रति सद्रद वचन ।
म्हणे माते निमित्तधारी जाण । जनासारिखें श्रीराम आचरला ॥४॥
मज जी जेथें येतें मरण । तरी पावतो कॄतकल्याण ।
हें माझेनि दुःख न देखवे जाण । काय आपण करावें ॥५॥
जरी मज मरण येतें । तरी मी पावेतों महायशातें ।
अपेशपात्र झालों सुहृदांतें । मुख कैसें दाखवूं ॥६॥
हे मजयोग्य नह्वे काम । सांगता झाला आत्माराम ।
बिभीषणा सुग्रीवा योग्य परम । ते हें तत्क्षणीं करिते हो ।
पूर्वी आचरलों होतों पाप । तें माझें मज फळलें सद्रूप ।
निंद्द लोकीं तें मजकरवीं भूप । ऎसे प्रयोजनीं प्रेरीत ॥८॥
ऎसें करितां दीर्घ रूदन । मूर्छापन्न पडे लक्ष्मण ।
सवेंचि मूर्छा सांवरून । आक्रंदोन पैं उठे ॥९॥
ऎसें सौमित्राचे रूदनदुःख । ऎकोनि जानकी कळवळली देख ।
लक्ष्मणासि म्हणे महाबाहो ऎक । काय कारण रूदन करिसी ॥१०॥
या काळीं लक्ष्मणा । का करिसीं तूं रूदना ।
काय तुज अग्रतुल्या वाग्बाणा । हाणोनि भेदलें ह्रद्य तुझें ।॥११॥
काय चुकलासि श्रीरामाचें । कोण कर्म घडलें तुज साचें ।
किंवा अपवाद श्रीरघुपतीचे । तुवां केले लक्ष्मणा ॥१२॥
कीं श्रीरामें शापिलें ।कीं कोण दुःख तुज ओढवलें ।
तें सत्य मजप्रति ये काळें । विशद करून सांगावें ॥१३॥
माझी आज्ञा तुज सौमित्रा । सांगें सकळही वृत्तांता ।
काहीं वंचिसी तरी आण आतां । माझी तुज पैं असे ॥१४॥
ऐकोनि जानकीचें वचन । लक्ष्मण अधोमुख दीन होवोन ।
कंठीं बाष्प सद्रदीत मन । बोलता झाला ते समयीं ॥१५॥

सत्यस्थिती लक्ष्मणाने सीतेला निवेदिली :

अहो धरणिजे अवधारीं । तुझी निंदा करिती जन नगरीं ।
पाटणी विजनीं घरोघरीं । हाट चौहटा बैसोनियां ॥१६॥
रावणें सीत हरिली । ते नेवोनि लंकेस ठेविली ।
अशोवनीं राक्षस बळी । तिजपासीं रक्षण ठेविले ॥१७॥
तिचा ऎसा समाचार । पापिष्ठां राक्षसां नाहीं विचार ।
मग त्या रावणा मारोनि श्रीरघुवीर । अयोध्येसि घेवोनि आला ॥१८॥
एकाएकीं न पुसत । जानकी गृहीं घाली श्रीरघुनाथ ।
ऎसें श्रीरामें अधर्मकृत्य । सूर्यवंशीं पैं केलें ॥१९॥
तेणें जानकी भयभीत । श्रीराम झाला भयचकीत ।
तयाचें ह्र्द्य झालें तप्त । अति दुःखित लोकलज्जे ॥२०॥
ऐसा श्रीराम मजजवळी । वदलासे सत्य ये काळीं ।
नगरअपवाद हृद्यकमळीं । सकळांमाजि बैसले ॥२१॥
माझी पतिव्रता जानकी । परम पावन त्रैलोक्य़ीं ।
परी मज निंदिलें ये लोकीं । पुरपाटणी घरोघरीं ॥२२॥
तरी आतां तू लक्ष्मणा । वनासि नेईं पद्ननयना ।
गंगातीरीं तपोधन नाना । तदाश्रमाप्रति सोडावी ॥२३॥
करूं नये स्त्रियेचें हनन । त्यावरी गरोदर जाण ।
भरले षण्मास पूर्ण । वधितां दारूण पातक ॥२४॥
इजसीं रथीं बैसवोन । सौमित्रा वेगीं करी गमन ।
भागीरथीपरपारीं तपोधन । तेथें नवोन सोडावी ॥२५॥
ऎसें जानकी वर्तमान । यथार्थ वदला रघुनंदन ।
तेणं दुःखे माझें मन । खेदें क्षीण होतसे ॥२६॥
तरी धरणिजे तीर पावन । येथें वसती पवित्र जन ।
या वनाचें नाम तपोवन । साधु सज्जन रहावया ॥२७॥
तरी जानकीये अवधारीं । तुवां रहावें या वनाभीतरीं ।
येथें वाल्मीक तप करी । तो मित्र राया दशरथाचा ॥२८॥
तयाचे चरण आश्रयून । करावें फळमूळभक्षण ।
श्रीरामीं अखंड अनुसंधान । लावावें जाण जानकीये ॥२९॥
श्रीरामीं ज्याची चित्तवृत्ती । तो नर वंद्द त्रिजगती ।
श्रीरामी ज्याची अभक्ती । त्या नरकीं वस्ती आकल्पवरी ॥३०॥
ऎसी करितीं श्रीराम भक्ती । तैं चारी मुक्ति पाया लागतीं।
सकळ स्वार्थ घरीं रिघती । पुरुषार्थ होती कामारे ॥३१॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे उत्तरकांडे एकाकारटीकायां
जानकीवनाभिगमनं नाम सप्तचत्वारिंशोध्यायः ॥४७॥ ओंव्या ॥३१॥