तांडव भाग 3 
  एक कार वेगाने तळगावची घाटी ओलाडंत होती.एक पंचविस वर्षाचा तरूण ती गाडी चालवत होता.तो भारावल्या सारखा दिसत होता.यंत्रवत  तो गाडी चालवत होता.हेडलाईटच्या प्रकाश झोतात रस्त्याच्या कडेला कुणीतरी  उभे असलेले त्याला  दिसले.थोड जवळ जाताच त्याच्या लक्षात आल की ती एक तरूणी आहे.ती गाडीला हात दाखवत थोडी पुढे आली.अभावितपणे तरूणाने ब्रेक दाबले. जांभळ्या रंगाची साडी...जांभळा ब्लाउज...खांद्याला जांभळी पर्स...दोन धनुष्याकृती भुवयांमध्ये गोलाकार जांभळ कुंकू .. पायात जांभळ्या रंगाच्या चपला......चेहर्यावर मोहक हसू व डोळ्यात मधाळ मोहिनी असा तिचा वेष होता. वेळ  होती रात्री दोन वाजून दोन मिनीटांची ! हे काहीतरी वेगळ आहे ...हे कुणाच्याही लक्षात आल असत पण त्या तरुणांचा मेंदू विचार करण्याच्या स्थितीत नव्हताच मुळी!. मुळातच तो ओढल्यासारखा एका अनिवार ओढीने तंळगांवच्या दिशेने आला होता.
       तरूण गाडीतून  उतरून खाली आला. ती अनोळखी तरूणी  समोर आली.तिच्या पावलांचा आवाजी ऐकायला आला नाही  जणू ती हवेत चालत होती. ती हसली...
" मला लिफ्ट द्याल...तळगांवपर्यत....अगदी पहिलं घर आहे तिथपर्यंत!"  त्या तरंणीने आपला हात त्याच्या डोळ्यासमोरून फिरवला. गाढ निद्रेतून जाग झाल्यासारखे त्याचे डोळे  निवळले. समोरचा चेहरा ओळर्खीचा वाटला.
"तू...तू...कस शक्य  आहे?"
" ओळखस...! ..व्वा...तुमच्यासारखे  वासनांध लोक या जगात आहेत तोवर सार शक्य आहे.  ताई म्हणाला होतास मला...आठवतय?....अरे सख्खी बहिणही विश्वास ठेवणार नाही  ऊद्या या शब्दावर."  ती विचित्र हसली. ते हसू मानवी नाही हे त्याच्या लक्षात  आल.
" मी नशेत ह...ह...होतो. माफ...कर...मला."
" माफी....शक्य नाही..मी पण त्यावेळी  धाय मोकलून रडत होते...विनवणी  करत होते....सोडलात  मला?.... माझ्या देहाचे हसत-  हसत लचके तोडलात..."  ती तरूणी  गरकन फिरली .एक भोवरा गरगरत हवेत निर्माण झाला.आजूबाजूचा पाला- पाचोळा वर उडाला.
"  हेमराज  ...ये ...आपली शिकार इथे आहे."
अचानक तिथे धुक्याच एक दाट आवरण तयार झाल. अगदी बाजूने जरी कुणी गेला असता तरी त्याला तिथे  काय चाललंय याची जाणीव  झाली नसती. त्या तरुणांने पळण्याची  धडपड करून पाहीली पण पाय जड झाल्याप्रमाणे हलेनात. हवेत कंप निर्माण झाला.एक अनोखा गंध वातावरणात  पसरला.एक दिव्य तेज:पुंज पुरूष तिथे प्रकट झाला. त्याच्या खांद्यावरच्या  सशाण्याचे डोळे...गुंजेप्रमाणे लाल भडक झाले होते.
"विरूपाक्षा...तूझी शिकार समोर आहे चल...शिकारीतल तूझं कौशल्य दाखव." त्या दिव्य पुरुषाने ससाण्याला आज्ञा केली. पंख फडकावत त्याने झेप घेतली....दणकट धारदार चोचीने त्या जडवत झालेल्या तरुणाच्या डोळ्यावर प्रहार केला.  लालसर रक्ताची चिळकांडी ...व त्यानंतर एक दिर्घ किंचाळी हवेत घुमली.
त्याचवेळी त्या दिव्य पुरूषाच्या हातातला पंचशूल वेगाने त्या तरुणांच्या चेहर्यावर आदळला. ...पुन्हा एक आर्त किंकाळी हवेत घुमली.तो तरूण तडफडत खाली कोसळला. नंतर ससाण्याच्या चोचीचा व पंचशूलाचा आघात त्या तरुणावर होत राहिला. 
--------*----------*-------*--------*****----------*----'
   एक कार धडाधडा जळत असल्याच स्वप्न मला पडल. मी झटकन जागा झालो.माझा चेहरा घामाने भिजून गेला होता. अर्धवट उघड्या डोळ्यांनी मी डोक्याजवळच्या छोट्या टेबलाकडे पाहिल .मी थक्क झालो. टेबलावर...ती ..यक्षमूर्ती होती. पहाटेचे सहा वाजले होते.मी उठलो. डोळ्यांवर पाणी  मारल...व मूर्तीच निरीक्षण केल अपेक्षेप्रमाणे ससाण्याच्या चोचीवर व पंचशूलावर रक्ताचे सूक्ष्म डाग होते. मी ती मूर्ती  स्वच्छ घुतली व पुन्हा सूटकेसमध्ये बंदिस्त  केली.
तोंड  वैगेरे घुवून मी चहा मागवला.एवड्यात मोबाईलची रिंग वाजली.फोन इन्स्पेक्टर वारंगांचा होता. 
" बोला, सर...'
" इथे घाटीत पुन्हा  एक हत्या झालीय...व एक कार पूर्ण जळालेल्या स्थितीत आहे. सी. आय.डी. ची माणसं इथ आलीत...तुम्ही इथे या."
मी कही क्षण गप्प राहिलो.हे अस घडणार ह्याचा मला अंदाज होता.गीता दुष्टांना...त्यांच्या पापांची शिक्षा देत होती. कुणाची हत्या होणे वाईटच...पण  यावेळी मला मात्र  जे घडतेय ते योग्य  वाटत होत.मी झटपट तयारी केली.मोटरसायकलने तिथे पोचलो. मला बघताच  वारंग माझ्याजवळ आले. मी त्यांच्या सोबत मृतदेहाकडे गेलो.निदर्यपणे त्याचा चेहरा..विद्रूप केला गेला होता....चेहर्यावरच्या जखमा या...ससाण्याच्या चोचीच्या व पंचशूलाच्या आहेत हे माझ्या लक्षात  आल. देहावर एकही वस्त्र  नव्हते.  माझी नजर इकडे -तिकडे भिरभिरली.. . मला हवे ते दिसले...थोड्या अंतरावर  दोनच पाने उरलेली सातविणाची डहाळी  दिसली.
सी.आय.डी.चा एक अधिकारी  (राणे)माझ्याजवळ  आला.
" आणखी तिन हत्या होतील असा अंदाज तुम्हीच वर्तविला होता ना?" त्याने मला विचारले.
" होय."
" कश्यावरून?"
मी काही न बोलता...समोर बोट केल....सातविणांची दोन पानांच्या डहाळी समोर होती.
'ते बघा...अजूनही दोन हत्या होवू शकतात."
"तुमचा या प्रकरणाशी काय संबंध काय आणि काल रात्री  तुम्ही  कुठे होता."
" तळगांवत ...अरुणोदय लाॅजवर..."
" सातविणाच्या पानांवरून तुम्ही ....यापुढे दोन खून होणार अस म्हणताय...याबाबत आणखी काही माहिती  आहे तुम्हाला?... आजूबाजूला सातविणाची झाड दिसत नाही.?
" हे बघा मी फक्त...परिस्थितीजन्य  पुरावा बघून सांगितलं...याशिवाय मलाही काही  जास्त माहित नाही."
" ठिक आहे...आम्हाला सांगीतल्याशिवाय...तळगांव सोडू नका. पुढच्या  हत्या कश्या रोखायच्या ते आम्ही बघू."
मी मान हलवून होकार दिला. सध्या तरी मी काही बोलणार नव्हतो.मी सत्य सांगितले तर ते कुणालाही  पटणार नव्हते किंवा कळणारही नव्हते. पण एक गोष्ट  निश्चित  होती की वाटेल ते झाले तरी पुढच्या हत्या होणारच होत्या.ते थांबवणे कुणाच्याही हाती नव्हते.खर म्हणजे त्या हत्या नव्हत्या तर न्याय होता. 
" सर, या तरुणांची  ओळख पटली? कारची कागदपत्रे सापडली?"
"अजून काही हाती लागल नाही. आश्चर्य म्हणजे कार आतून बंद आहे."
माझ्यासाठी हे आश्चर्य नव्हतेच मुळी.
" साहेब या पाचही जणांचा एकमेकांशी काहीतरी संबध असावा...एखादी घटना त्यांच्याशी निगडीत असावी."
मी पोलिसांना थोडी दिशा  देण्याचा प्रयत्न केला.पण त्यांनी ते गंभीरपणे  घेतले नाही. 
" खुनी हुषार आहे...व मनोरूग्णही असावा.पण त्याला शोधून काढू....त्याला शिक्षा देवू. " वारंग म्हणाले.
मी हसलो.ज्यांना शिक्षा दिली पाहिजे त्यांना कुणीतरी शिक्षा देतोय व ज्याला शिक्षा देण्याच्या गोष्टी  करताहेत ते अस्तित्वातच नव्हते. मी वारंगाना सांगून तिथून जाणे पसंत केले. 
आता यापुढे काय घडणार याचा मी विचार करत होतो.
   ते सातजण मुळात तळगांवत का आले होते? कुठे थांबले होते?खरच त्यांच्या गाडीच्या रेडीएटरमधल पाणी संपले होत की गीता घरात एकटी आहे हे समजल्यामुळे त्यांनी मुद्दाम  गाडी बंद पडल्याच नाटक केल होत...हे जाणून घेण्याची मला उत्सुकता होती. धरणाच्या परीसरात   काही फार्महाऊस होती. यापैकी एखाद्या फार्महाऊसवर त्यांनी पार्टी केली असेल...त्यावेळी मद्य व ड्रग्स वापरले असतील व नशेत पुढच्या गोष्टी  घडल्या असतील.
     मी त्वरीत माझी मोटरसायकल  धरणाच्या दिशेने वळवली.चौकशीनंतर कळल की तिथे एकूण चार फार्महाऊस होती.मी मेजर दळवीचे फार्महाऊस सोडून इतर फार्महाऊसवर चौकशी करण्याचे ठरवले.मी तिन्ही ठिकाणी चौकशी  केली.तिथल्या व्यवस्थापकांनी सहा महिन्यांपूर्वी तिथ कुणाचीही पार्टी झाल नाही अस सांगितल. मुळात अश्या पार्टीला आम्ही परवानगी देत नाही अस सांगितल.अखेर मी सहज म्हणून मेजर दळवींच्या फार्म हाऊसवर गेलो.मला बघताच मेजर दळवी  समोर आले.
" या, अजून काय माहिती  पाहिजे. "
" सहज आलो"
   मी त्यांच्या सोबत अंगणात पोहोचलो.खुर्च्यांवर बसल्यावर मी इकडे तिकडे बघत विचारले. 
" हा परीसर छान आहे. इथे पर्यटक येत असतील नाही?"
" फारसे नाही येत. येतात ते फक्त  मजा करण्यासाठी येतात.... बराच त्रास देतात....इथला निसर्ग बघण्यासाठी कोणीही येत नाहीत. "
" मग फार्महाऊसवर सतत कुणीतरी पाहिजे ना. मग तुम्ही पुण्याला गेलेला तेव्हा  इथे कोण होता?" मी सहजपणे विचारले. 
  मेजर थोडा वेळ थांबले ...थोडसं आठवून म्हणाले.
" हा ..आठवलं....पंढरीला मी इथे ठेवलेल.."
" पंढरी? कोण पंढरी ?" मी प्रचंड  दचकलो.अनपेक्षितपणे  एखादा बॉम्ब अंगावर  पडावा तस झाल.
" पंढरी रंगसूर! हरकाम्या आहे...पुरेसै पैसे दिले की वाटेल ते काम करतो."
" विश्वासू आहे?"
" होय! पण कशासाठी?"
" त्याला सोबत घेवून आजूबाजूच्या परीसर पहावा म्हणतोय...इतिहासच्या दृष्टीने. "
मी चक्क खोट बोललो. खर म्हणजे माझ डोक चालेनासे झाल होत.पंढरीने बर्याच गोष्टी माझ्यापासून लपवून ठेवल्या होत्या.पंढरीने ती खेळणी माझ्याकडेच का आणून दिली होती? त्या रात्री पंढरी मेजरांच्या फार्महाऊसवर होता. ते सातजण या फार्महाऊसवर आले होते का? पंढरीची या प्रकरणातील भूमिका  काय?
असे बरेच प्रश्न मेंदूत गोंधळ  घालत होते. 
या प्रश्नांची उत्तरे पंढरीला भेटल्या शिवाय मि कळणार नव्हती. 
--------*-------------*------------*--------------*-------
भाग-3 समाप्त