Dr. Google and Patient in Marathi Health by Dr.Swati More books and stories PDF | डॉ. गुगल आणि पेशंट

Featured Books
Categories
Share

डॉ. गुगल आणि पेशंट

आजकाल पेशंट डॉक्टरकडे यायच्या अगोदर गूगल पारायण करूनच येतो का, असा प्रश्न मला हल्ली सारखा पडतो..

बरं, त्यातून जेवढी माहिती हवी आहे किंवा शंका निरसन पुरतचं गुगलकडे न पाहता, क्लिनिक मध्ये येवून डॉक्टरचीचं उलट परीक्षा घेतली जाते..

मी काही सांगायच्या आत ," मला वाटतं डॉक्टर , मला PCOS चं असणार म्हणून माझी पाळी दोनदोन महिने पुढे जाते " असं सांगणाऱ्या मुली..

किंवा

" मला वाटतं डॉक्टर , माझी RA टेस्ट , Uric acid, vit B 12 , vit D3 टेस्ट करून घ्या.. माझ्या पायाचे सांधे खुपचं दुखतात..

मी तर अशा पेशंटकडे बघतचं राहते..

"अरे मानवा , तुझं वजन बघ , किती वाढलं आहे.ते तुझ्या लक्षात येतंय का..? " तुझ्या पायांना तुझ्या शरीराचं वजन पेलवत नाही.. म्हणून तुझे पाय दुखत आहेत..

मुलींनो, पाळी अनियमित येण्याचं कारण फक्त PCOS चं आहे. हे कोणी सांगितलं तुम्हाला..

असं हे गुगल ज्ञान कधी कधी डोकंदुखी ठरतं..

आधी बेसिक गोष्टी लक्षात घेण्यापेक्षा पेशंट डायरेक्ट रोगाचं निदान करून येतात आणि त्या संदर्भात महागड्या टेस्ट करून घ्यायच्या का ?, असं विचारतात..

मी असं म्हणत नाही की टेस्ट करू नयेत पण पहिल्याच भेटीत गरज नसताना किंवा काही रोगांची फॅमिली हिस्ट्री नसताना का एवढ्या महागड्या टेस्ट करायच्या ?..

पथ्यपाणी करून , औषध खाऊन , गरजेचा असणारा व्यायाम करून जर आजार बरा होत असेल तर फक्त गुगलवर विश्वास ठेवणाऱ्या आणि स्वतःला डॉक्टरपेक्षा शहाणे समजणाऱ्या पेशंटचा केवळ अट्टाहास म्हणून टेस्ट करणं मला योग्य वाटत नाही...

खूप पेशंट त्यांना जाणवत असणाऱ्या लक्षणांची ऑनलाईन माहिती काढून येतात.. हे ऑनलाईन माहिती तुमच्या शंका निरसन करण्यापुरती ठीक आहे..पण त्याद्वारे अगदी उपचार स्वतःहून घेणे किंवा चालू उपचार थांबवणे म्हणजे हे कसं झालं, माहितीय का.. मुलीचा ऑनलाईन फोटो बघायचा आणि डायरेक्ट तिच्याशी लग्न करण्याचा निर्णय घ्यायचा किंवा तिला नाकारायचे..

तुम्ही साधा सर्दी खोकला ऑनलाईन सर्च केलात तरी त्यात न्युमोनिया ते टी .बी. पर्यंत सगळी रोग निदानं येतात..
मग काय, पेशंट तिथंच निम्मा होतो. आपली लक्षणं कोणत्या रोगासारखी आहेत हे तो स्वतःचं ठरवतो. त्याच्या डोक्यातून ते काही केल्या जात नाही.. त्याच्या फॅमिली डॉक्टरने किती जरी जीव तोडून सांगितलं, " काही नाही आहे तुम्हाला , साधा अँलर्जिक खोकला आहे. होईल बरा.."
तरीही हा मनुष्यप्राणी, डॉक्टरवर विश्वास ठेवण्यापेक्षा गुगलवर जास्त विश्वास ठेवतो आणि त्याच्या मनाचं समाधान होत नाही तोपर्यंत इकडे तिकडे भटकत राहतो..

यात पेशंटचा अजून एक तोटा होतो.. सगळेच डॉक्टर प्रामाणिक असतातचं असं नाही...
त्यातलाच एखादा डॉक्टर खूप साऱ्या अनावश्यक टेस्ट लिहून देतो किंवा पेशंटचा स्वभाव बघून त्याला ऍडमिट करून घेतो.. निव्वळ पेशंटच्या समाधानासाठी...अर्थात त्याचही अर्थार्जन होणार असतंच म्हणा..
मग तोटा कुणाचा.. पेशंटचाच...

थोडा विश्वास असूद्या की .. तुमच्या फॅमिली डॉक्टरवरही आणि अगदीच त्यांच्या निदानाबद्दल किंवा ट्रीटमेंट बद्दल मनात शंका असेल तर गुगल सर्च करुन स्वतःचं डॉक्टर बनून, स्वतःहून चुकीची औषध घेऊन आपल्या शरीराचं नुकसान करण्यापेक्षा दुसऱ्या डॉक्टरच सेकंड ओपिनियन घेतलेलं कधीही चांगलं...

पेशंटची आणखी एक समस्या म्हणजे, ‘गुगल’वरील औषधांबद्दल सगळी माहिती वाचून ते नकारात्मक विचारांनी ग्रस्त होतात. त्यांच्या उपचारांना उशीर होतो, कारण अनेक वेळा औषधांच्या दुष्परिणामांबद्दल वाचल्यानंतर रुग्ण औषधे घेणेच बंद करतात.

माझी जवळची एक मैत्रीण.. तिला Vertigo चा त्रास आहे.. तिला डॉक्टरांनी Vertin नावाची गोळी चालू केली.. तिला आराम पण पडला त्याचा..एक दिवस असच बिल्डिंग मधील ओळखीच्यांशी बोलताना तिनं हे त्यांना सांगितलं.. तर ते गृहस्थ तिला Vertin चे काय काय दुष्परिणाम असतात ते सांगायला लागले.

तिनं विचारलं , तुम्हाला कसं माहित , तुम्ही तर डॉक्टर नाही आहात..

"अगं, गुगलवर वाच , सगळ आहे.."

बरं , एवढ्यावरच न थांबता , त्यांनी तिला गुगल सर्च करुन लगेचच दाखवलं पण.. काहीचं न बोलता तिनं फक्त मान डोलावली..

त्याचे दुष्परिणाम तिलाही माहीत होते . तिच्या डॉक्टरांनी तिला याची कल्पना दिली होती. त्यामुळे ती निर्धास्त होती.. तिच्या जागी दुसरं कोणी असतं आणि त्याने घाबरून औषधच बंद केलं असतं तर...
काही औषधांच्या बाबतीत त्यांचा फायदा त्यांच्या दुष्परिणामांपेक्षा कितीतरी पटीने अधिक असतो..
हा नियम खूप साऱ्या औषधांना लागू होतो.. डॉक्टरांना त्याची कल्पनाही असते.. त्यामुळेच तर त्या औषधांच्याबरोबर त्याचे दुष्परिणाम कमी करणारी औषधंही दिली जातात...

आपल्याला आरोग्याची चिंता असल्यास इंटरनेटवर अवलंबून न राहता डॉक्टरांशी बोला. आपल्या स्थितीबद्दल अतिशयोक्तीपूर्ण माहिती इंटरनेटवर आढळल्यास आपण अनावश्यक काळजीत पडतो. त्याउलट कमी त्रासदायक दर्शविणारी माहिती आढळल्यास आवश्यक असलेले लक्ष वेळेवर देण्यात आपण अयशस्वी होऊ शकतो, ज्यामुळे परिस्थिती बिघडू शकते.

एक साधी गोष्ट आपल्या सर्वांनाच समजायला हवी, की आरोग्य, मनुष्य शरीरशास्त्र हे विषय शिकायला डॉक्टरांना इतकी वर्षे अभ्यास करायला लागली, तर काही तास ‘गुगल’वर सर्च करून रोग आणि त्याचे उपचार सर्वसामान्य व्यक्तीला समजेल का?

वैद्यकीय ग्रंथ, पाठ्यपुस्तकं, अनेक वर्षे प्रत्यक्ष पेशंट्स तपासून आलेला अनुभव, त्या त्या क्षेत्रातील नामवंतांशी चर्चा, त्यांची सप्रमाण व्याख्याने, नव्या संशोधनांची, तंत्रज्ञानाची, औषधांची साधक-बाधक चर्चा अशा अनेक घडामोडीतून डॉक्टरांचं ज्ञान विकसित होत असतं. इंटरनेटवर माहिती मिळते पण ज्ञानाचा वापर करून आजाराचं निदान आणि औषधोपचार करण्यासाठी योग्य त्या डॉक्टरांना प्रत्यक्ष भेटून, तपासूनच ट्रिटमेंट घेतली तर जास्त हितकारक.

एका डॉक्टरवर विश्वास नसेल तर सेकंड ओपिनियन घ्यावे...पण फक्त वाचलेल्या माहितीवर विसंबून राहू नये...
एवढ्यासाठीचं माझा हा सगळा खटाटोप ....🙏🙏🙏



डॉ. स्वाती अनिल मोरे
कांदिवली पूर्व