कालाय तस्मै नमः भाग १
जगात चांगल्या आणि वाईट दोन्ही प्रकारच्या प्रवृत्ती आढळतात. खरं तर वाईट असतं म्हणूनच चांगल्या गोष्टी, व्यक्ती ह्यांची किंमत माणसाला कळते.
युगानुयुगे चांगल्या आणि वाईट प्रवृत्तींच्या अलिखित चढाओढीवर तर जग चालते. कधी चांगल्याची सरशी होते तर कधी वाईटाची. माणसाची मनोवृत्तीही ह्या दोन्ही रंगांना दाखवते. जसं एखादा माणूस पूर्णपणे चांगला नसतो तसाच तो पूर्णपणे वाईटही नसतो. मनस्थिती कशी आहे हे नेहमी त्या व्यक्तीच्या परिस्थितीवर अवलंबून असते. 
प्रत्येक नाण्याच्या दोन बाजू असतात. कोणती बाजू कधी वरचढ ठरणार हे प्रत्यक्ष त्या व्यक्तीलाही सांगता येणार नाही. 
आता माणूस म्हटलं की भावनांची गुंतागुंत तर असणारच. एका बाजूला प्रेम,माया,आपुलकी,जिव्हाळा आहे तर दुसरीकडे द्वेष, राग, तिरस्कार, वैरभावनाही आहे. कुणाला तरी आजूबाजूचं सगळं जग सुंदर दिसतं तर कुणाला मात्र त्या जगाबद्दल खूप तक्रार आहे. हा प्रश्न आहे मनोवृत्तीने निर्माण केलेला. 
चांगल्यातून वाईट शोधायचं की वाईटातून चांगलं हे ठरवणं फक्त माणसाच्या हातात आहे.असो
तर अशाच काही गोंधळातून एक दिर्घकथा साकार करण्याचा प्रयत्न केला आहे. पहिलाच प्रयत्न आहे पण आवडेल ह्याबद्दल खात्री आहे. 
वरती म्हटल्याप्रमाणे सुष्ट आणि दुष्ट दोन्ही शक्ती त्यांच्या वेगवेगळ्या रुपात ह्या कथेत भेटतील. प्रसंगी त्या एकमेकांना हरवण्याचा प्रयत्नही करतील. 
कालचक्रात अव्याहत सुरू असणारा खेळ इथेही खेळला जाणार आहे. फक्त तो खेळ ज्यांनी सुरू केला आहे तो संपवणे आता त्यांच्या हातात उरले नाहीये तर ते त्या "काळाच्या" हातात आहे. 
ह्या खेळात निष्पाप जीवांचे बळी जातील की तेच आपल्यामधील चांगल्या शक्तीला जागे करून खेळात उतरतील ते तर वाचल्यावरच कळेल. अर्थात ते ही त्या काळाच्याच हातात आहे.
म्हणूनच तर म्हटले जाते न "कालाय तस्मै नमः" 
म्हणजेच सगळं जग या काळाच्या अमलाखाली असतं. काळ जसा सुखाची आस लावतो तसा दु:ख विसरायलाही मदत करतो. प्रत्येकाचं आयुष्य काळाशी बांधलेलं आहे. काळ विकता किंवा विकत घेता येत नाही. काळाला दुसरा पर्याय नाही. काळ देतो आणि नेतोही. 
हिंदीत एक म्हण आहे “समय से पहले और जरुरत से ज्यादा कुछ नाही मिलता“, म्हणजे जेव्हा एखाद्या गोष्टीची वेळ येईल तेव्हाच ती घडेल. वेळेच्या आधी नाही आणि नंतरही नाही. केवळ ती योग्य वेळ येण्याची वाट बघणं आपल्या हातात असतं. जेव्हा अशी वाट बघण्याची पाळी येते तेव्हा म्हणावंच लागतं “कालाय तस्मै नम:”
वाचत रहा आणि साक्षीदार व्हा सामान्य माणसाच्या आयुष्यात घडणाऱ्या अतर्क्य घटनांचे. 
#गौरीहर्षल
आनंदाचे डोही 
आज गायत्रीच्या मागे भरपूर कामं होती. असणारच कुलकर्णींच्या घरातली मोठी लेक होती ती आणि आता तिचं हवंहवंसं प्रमोशनही झालं होतं. एका गोंडस परीची आत्या झाली होती ती. गायत्री आणि तिच्या सगळ्या भावंडांच्या पिढीनंतरच्या पिढीत जन्माला आलेली पहिली मुलगी. 
खूप नवस सायास केले गेले होते मुलगी जन्माला येऊन जगावी ह्यासाठी त्यांच्या घरात सगळ्यांनीच.कारण घरात मुली जन्माला येत होत्या पण महिन्याभराच्या आतच त्या पुढच्या प्रवासाला निघून जात होत्या. शेवटी कुलदेवतेच्या आशीर्वादाने घरात मुलगी जन्माला आली आणि ती जिवंतही राहिली. आज तिच्याच बारश्याची लगबग सुरू होती. जवळपास सगळे जण आपापल्या कामातून वेळ काढून हजर झाले होते, तरीही त्यांची उणीव आज सगळ्यांनाच भासत होती.  
माई आणि काका म्हणजेच सरस्वती आणि रामचंद्र कुलकर्णी. गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या कुलकर्णी वाड्याचे मालक. पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या काही परंपरागत गोष्टींचे वंशज.  कुटुंब तसे सुशिक्षित आणि  सधन होते. माई अन् काकांना एकूण आठ मुले - ५ मुलगे ३ मुली.
माईंना म्हणजे सरस्वतीला गावात सगळेच जण माई म्हणूनच ओळखत होते. 
काकांशी लग्न करून त्या ह्या गावात आल्या आणि इथल्याच झाल्या. सासरच्यांनाच नाही तर सासरच्या गावाला आणि गावातल्या लोकांनाही त्यांनी आपलंसं केलं. स्वतःच्या सासुसासऱ्यांच्या पावलांवर पाऊल टाकत माईंनी   कुलकर्णी वाड्याची माणसं जोडण्याची परंपरा कायम ठेवली होती. 
त्याही अगदी पहिल्यापासून सगळ्यांशी गोड हसून मायेने बोलणार, दारात आल्यागेलेल्या प्रत्येकाची प्रेमाने विचारपूस करणार, गावात नवीन लग्न करून आलेली कुठली सून जर माईंना भेटली तर तिला त्यांच्यात स्वतःच्या माहेरचं माणूस भेटल्याचा भास व्हायचा. गावातल्या कितीतरी बायबापड्या घरात कुरबुरी वाढल्या की गाऱ्हाणं घेऊन माईंकडे येत होत्या. 
माईसुद्धा सासुसूनेच ऐकून घेत दोघींनाही योग्य ते मार्गदर्शन करत. त्यांची बोलण्याची पद्धतच अशी होती की सासूला वाटे आपलं म्हणणं सुनेला पटवून दिलं माईंनी अन् सुनेला वाटायची सासूला समजावून सांगितले. समाधानाने एकमेकींसोबत घरी जाणाऱ्या त्या दोघींना बघणाऱ्या माईंच्या चेहऱ्यावर अजून एक घर मोडताना वाचवल्याचा आनंद असे. आणि तो आनंद त्यांना अजूनच जोमाने काम करण्यासाठी ऊर्जा देत असे. तर अशा ह्या माई अगदी काकांना अनुरूप होत्या. काकांच्या सगळ्या चांगल्या वाईट परिस्थितीत त्या काकांच्या सोबतीने खंबीरपणे उभ्या राहिल्या होत्या आणि त्यामुळेच काका प्रत्येक गोष्टीत त्यांचा सल्ला आवर्जून घेत असत. 
दुसरीकडे काका म्हणजे रामचंद्र कुलकर्णी , आपल्या छोट्याशा गावात आणि नोकरीत अगदी समाधानी वृत्तीने जगणारा स्वाभिमानी माणूस. अडीअडचणीला कुणी मदत मागितली तर धावून जाणार आणि यथाशक्ती त्या व्यक्तीला मदतही करणार हे संस्कार त्यांच्या आईवडिलांनी त्यांच्यावर केले होते आणि तेच त्यांनी आपल्या मुलांना भरभरून दिले होते. आठही मुलांना आयुष्यात स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी जे करावं लागलं ते सगळं काकांनी केलं होतं. त्याचाच परिणाम म्हणून आज सगळी मुलं आपापल्या क्षेत्रात कार्यरत होती. त्यांचे संसारही काकांनी योग्य वयात मांडून दिले होते. आणि काळानुसार मुलांचं लांब जाणंही मान्य केलं होतं. कारण संपत्तीच्या नावावर काकांकडे फक्त वाडा आणि त्यांची पेन्शन एवढंच होतं. त्यामुळे मुलांना जेव्हा उडण्याची संधी मिळाली त्यांनी आणि माईंनी स्वखुशीने मुलांना जाऊ दिलं होतं. 
माई-काकांचा चार नंबरचा मुलगा भास्करने मात्र पत्नी संगीता आणि मुलगा समीरसह गावातच रहाण्याचा निर्णय घेतला होता. गावातल्या शाळेतच तो शिक्षक होता. त्यामुळे त्याला माई-काकांसोबत राहून त्यांची काळजी घेणे शक्य होते. संगीताही एकत्र कुटुंबातील असल्याने इथेही माणसं सांभाळणं तिला जड जाणार नव्हतंच. उलट नवऱ्याचा निर्णय हसत हसत स्वीकारून ती त्याच्या जोडीने सगळं मनापासून निभावत होती. माईंच्या तालमीत संसाराचे धडेही गिरवत होती. माई काकांच्या सोबत असल्याने तिला समीरची कधी काळजीच करावी लागत नव्हती. कारण बाकीची नातवंडे फक्त सुट्टीत भेटत असल्याने त्या सगळ्यांच्या वाट्याची माया इतरवेळी फक्त समीरला मिळत असे. पण फक्त मायाच नाही त्याच्यावर उत्तम संस्कारही आपसूकच होत होते. 
एकूणच काय चारचौघांसारखं हे कुटुंबही सुखदुःखात एकत्र येऊन,थोड्याफार रुसव्याफुगव्यांसह पुन्हा आपापल्या मार्गाने जात आयुष्याशी जुळवून घेत होतं. पण ....
सगळी मुलं जरी लौकिकार्थाने आपापल्या संसारात रमली असली तरी काकांना मात्र कुठेतरी काहीतरी सतत राहून जातंय असं वाटत होतं. कारण कुलकर्णी कुटुंबाच्या ह्या तिसऱ्या पिढीत मुलगीच जन्माला आली नव्हती. अशातच संगीताला पुन्हा दिवस गेल्याची बातमी माईंनी ज्या दिवशी त्यांच्या कानावर घातली. नकळतच त्यांचा चेहरा इच्छापूर्ती होणार असल्याच्या आशेने उजळला.  देव्हाऱ्याकडे बघून मनोमनच त्यांनी देवाचे आभार मानले. दिवसामागून दिवस, महिन्यांमागून महिने सरत होते. आणि आज तो दिवस आला होता.....
मुलगी जन्माला येणं हे काकांसाठी खूपच विशेष होतं. का ते कळेलच हळूहळू. 
बारशाच्या निमित्ताने काकांची सगळी मुलं एकेक करून वाड्यावर आली होती. आता इतकं मोठं कुटुंब म्हटलं की रुसवेफुगवे भांड्याला भांडं लागणं हे ओघाने आलंच. 
त्यात ज्या गोष्टीची माई आणि काका इतकी वर्षे वाट बघत होते ती नेमकी संगीतामुळे घडली. ती गावात राहत होती म्हणून तसं त्यावरून तिला इतरांचे टोमणे ऐकावे लागतच होते. बाकीच्यांना आता मुलं होणारच नाहीत अशी काही अवस्था नव्हती पण तरीही परीक्षेत पहिल्या येणाऱ्यावर जळणं स्वाभाविकच असतं. असो.
एकीकडे बारश्याची जय्यत तयारी सुरू होती. दुसरीकडे कुणीतरी सगळ्यात विघ्न आणण्यासाठी तयारी करत होतं. 
हे सगळं झालं, पण उत्सवमूर्ती कुठे आहेत ते बघू आपण. जिच्याबद्दल सगळं होत होतं ती मात्र मस्त गरम गरम पाण्याने आंघोळ करून झोळीत गुडूप झाली होती. तशी आता ती २ महिन्यांची झाली होती. त्यामुळे आवाज आला की कान लगेच टवकारले जात आणि मग काय एकेक कार्यक्रम सुरू. तिची आजी म्हणजे माई तिच्या अवतीभवतीच होती. 
सगळं छान घडत असताना मात्र माईंनी काकांना आपल्या मनातली हुरहूर बोलून दाखवली होती. 
बाकीचे सगळे आपल्या कुटुंबासह आले असले तरी त्यांना मात्र अजून कुणाच्या तरी येण्याची आस होती. ती व्यक्ती येईल की नाही त्यांना काहीच कळत नव्हतं. पण आजच्या दिवशी त्या व्यक्तीने इथं हजर असावं असं मात्र त्यांना राहून राहून वाटत होतं. 
आज मोठे तर मोठे पण घरातल्या लहानांचा उत्साहही ओसंडून वाहत होता. 
वाड्यात मध्यभागी जी मोकळी जागा होती तिथे बारश्याची तयारी केली होती. मध्यभागी छानसा सजवलेला पाळणा होता. आजुबाजुला सगळ्या आलेल्या पाहुण्यांची बसण्याची व्यवस्था होती. हळूहळू लोक यायला सुरुवात झाली. काकांचा आणि माईंचा गोतावळा भरपूर होता. त्यामुळे बारसं नाही म्हटलं तरी दणक्यात होत होतं त्या काळच्या मानाने.
बाळालाही तयार करून बाहेर आणलं होतं. सगळेजण कौतुकाने तिला न्याहाळत होते. तीही टपोऱ्या डोळ्यांनी टुकुटुकु इकडे तिकडे बघत होती. बाळाच्या मोठ्या आत्याने गायत्रीने बाळाला पाळण्यात घातले. आणि सुरू करू का म्हणून विचारण्यासाठी ती माईंकडे वळली. तर माई एकटक  वाड्याच्या दरवाज्याकडे बघत होत्या. माई काय बघत आहेत म्हणून सगळ्यांच्याच माना तिकडे वळल्या. 
वाड्याच्या दरवाज्यात दोन जण उभे होते. 
"श्रीपाद",माईंच्या तोंडून नकळतच हाक बाहेर पडली. 
सहा फूट वगैरे उंच, मध्यम शरीरयष्टी, गोरापान पण रापलेला वर्ण पण वेगळ्याच तेजाने उजळलेला चेहरा आणि डोळे अगदी मनाचा ठाव घेणारे. त्यांच्या हातात हात धरून त्यांचीच छोटीशी प्रतिकृती उभी होती. माई काका दोघेही डोळ्यात येणाऱ्या अश्रूंना कसेबसे थोपवत होते. शेवटी दोघेही त्याच्या दिशेने चालू लागले. ह्या सगळ्या मध्ये एक व्यक्ती अशीही होती जिला त्या दोघांचं येणं आवडलं नव्हतं. 
कोण आहेत हे दोघे ?? ज्यांच्या येण्याने घरात जणू काही उत्साहच भरला होता. त्या दोघांच्या येण्याने वातावरणात तयार झालेली सकारात्मक ऊर्जा बाहेरून आलेल्या लोकांना ही जाणवत होती. का कुणास ठाऊक पण प्रत्येकाला असं वाटत होतं की आता आपल्या आयुष्यात खूप काहीतरी छान घडणार आहे.
क्रमशः
#स्वतःला_शोधताना
#गौरीहर्षल
ह्या कथेचे सर्व कॉपीराईट अधिकार लेखिकेकडे सुरक्षित आहेत. परवानगी न घेता वापरल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.