बळी-  २८
       रंजनाला आता केदारच्या भुताचा विसर पडला होता! आता तिच्या नजरेसमोर पोलीसांची वर्दी दिसत होती! मीराताईंचे शब्द तिला भेडसावत  होते. त्या म्हणाल्या होत्या,
"पोलीस माझ्याकडे चौकशीसाठी आले होते-- केदारविषयी खोदून खोदून विचारत होते -- तुझ्याविषयी विचारत होते-- बहुतेक  ते तुझ्याकडेही येतील!"
        " जर पोलीस चौकशी चालू झाली; तर आपण काय करायचं? मला खूप भीती वाटतेय! ते  असे काही उलटे सुलटे प्रश्न विचारतील,  की माझं खोटं बोलणं लगेच पकडलं जाईल!" ती घाबरलेल्या आवाजात म्हणाली. तिच्या चेह-यावरचा रंग उडाला होता.
      "जे त्या दिवशी सगळ्यांना सांगितलंस तेच त्यांना सांगायचं! पति विरहाने दु:खी असणा-या असहाय स्त्रीची अॅक्टिंग करायची! डोळ्यात पाणी आणायचं!---- तू तर आता एक्स्पर्ट झाली आहेस! " दिनेश हसत म्हणाला.
दिनेश हसून रंजनाला दिलासा देत होता खरा,  पण तो सुद्धा आता मनातून घाबरला होता. पोलीसांचं नाव येताच एवढा वेळ त्याच्या चेह-यावर  दिसणारा बिनधास्तपणा नाहीसा झाला होता. --- चेहरा  गंभीर झाला होता.
          तो तिला पुढे समजावू लागला,
        "मी इतका जबरदस्त प्लॅन बनवला होता -- पोलीस मधे कसे  आले? --  जाऊ दे! हे विचार करून  डोकं खपवण्यात अर्थ नाही!  पोलीस चौकशीला आलेच; तर तू अबला नारीचं नाटक चालू ठेव! तू तुझ्या घरच्या लोकांनाच नाही; तर तुझ्या वकील बहिणीलाही बेमालूम फसवलंस! आता सुद्धा तुझ्यावर कोणीही संशय घेणार नाही; कारण अशा प्रकरणांमध्ये सहानुभूती नेहमी स्त्रीला मिळते!  काळजी करू नकोस! फक्त तुझा जबाब एकच असेल-- बदलणार नाही; याची काळजी घे! "  दिनेश रंजनाला सल्ला देत  होता; पण तो स्वतः मात्र मनातून घाबरला होता. मनातली भीती त्याला शांत राहू  देत नव्हती. काही वेळ  तो डोकं धरून बसला आणि अस्वस्थ स्वरात  पुढे बोलू लागला,
      "आणि एक गोष्ट विसरू नकोस! --- घरी गेल्यावर सासूला फोन करून तिचं  पोलीसांशी काय बोलणं झालं ; ते नीट विचारून घे! पोलिसांना काय शंका आहे; हे आपल्याला माहीत असलेलं बरं; म्हणजे तुला उत्तरं देणं सोपं जाईल!" ---  "मला असं वाटतं; ते तिकडे गेले; म्हणजे नक्कीच तुझ्याकडेही चौकशीसाठी येतील! पण  तू  व्यवस्थित उत्तरं दे;  म्हणजे ते माझ्यापर्यंत  पोहोचू शकणार नाहीत!  चौकशीच्या वेळी माझं नाव कुठेही येणार नाही याची काळजी घे! --- यापुढे काही दिवस आपण  सावध राहूया!---  ही चौकशी चालू असेपर्यंत आपण लांब राहिलेलं बरं! काही दिवस आपल्या भेटी- गाठी बंद रहातील! ही चौकशी संपली, की परत इथेच भेटू--- पण तोपर्यत  मला फोन सुद्धा करू नकोस!" तो आता  निरवा- निरवीच्या गोष्टी करू लागला होता; हे बघून रंजनाने न राहवून विषय काढला,
       " एक महत्वाची गोष्ट तुला विचारायची होती!---" ती चाचरत म्हणाली.
       नक्कीच  काहीतरी महत्वाची गोष्ट होती; पण  विचारायला ती बिचकत होती.
      "काय गं! थांबलीस का? बोल-- मनात अजूनही काही भीती असेल तर सांग! बिनधास्त बोल! -" दिनेशने विचारलं.
      "मी त्या दिवशी केदारच्या  घरून ताईकडे जायला निघताना माझे दागिने आणि बाबांनी दिलेली कॅश तू सांगितल्याप्रमाणे पुस्तकांबरोबर बॅगमध्ये भरून  बरोबर घेऊन निघाले होते! टॅक्सीत केदारला माझ्यासाठी थंड पाणी आणायला सांगितलं; आणि तो पाणी आणायला  उतरला, तेव्हा ती संधी साधून मी तो सगळा ऐवज तुझ्याकडे दिला होता! तू सगळं नीट ठेवले आहेस नं? तुला खूप दिवसांपासून विचारायचं होतं! पण तुझ्याकडे आहेत म्हणजे सुरक्षित आहेत; असा विचार करून विचारलं नव्हतं;" रंजनाला विचारायला संकोच वाटत होता; पण   शेवटी तिने धीर करून  विचारलं.
     इन्सपेक्टर दिवाकर मनाशी हसले. केदारच्या घरातून झालेल्या चोरीची केसचा गुंताही आपोआप सुटला होता.  फक्त चोरच मिळाला नव्हता, तर चोरी कशी झाली; हे सुद्धा मोबाईल कॅमेऱ्यात रेकार्ड झालं होतं.
         "मग आज हे सगळं विचारायचं काय कारण? माझ्यावर तुझा विश्वास राहिला नाही का?" दिनेश चिडला होता.
        " तूच म्हणालास की --- "आपण आता परत कधी भेटू-- सांगता येत नाही!" --- आज मी काॅलेजजवळच्या बँकेत खातं उघडून लाॅकरही घेतला आहे! मला ते पैसे आणि दागिने तिथे ठेवायचे आहेत! इथे ठेवले असशील, तर आताच दे! नाहीतर उद्या सकाळी काॅलेज जवळ - किंवा बँकेत  घेऊन ये!" आता मात्र रंजनेच्या स्वरात ठामपणा होता.
       "तू खातं कसं उघडलंस? तुझ्या बाबांच्या ओळखीवर उघडलं असशील तर आपल्याला महागात पडेल! त्यांचं नाव एवढं मोठं आहे, की त्यांना तिथले लोक  खात्याचे सगळे डीटेल्स विचारल्याबरोबर सांगतील! खूप मोठा घोळ केलास तू!" दिनेश तिच्यावर चांगलाच संतापला होता.
      "जरा ऐक रे , दिनेश! माझ्या एका मैत्रिणीच्या ओळखीने मी खातं उघडलंय! आणि तसंही आता माझं नाव बदललेलं आहे! बाबांचा कुठेही संबंध नाही!" रंजना त्याला समजावू लागली. 
       पण दिनेशचा पारा चढलेलाच होता,
      "वडिलांकडे फुकट रहातेस, तुला कशाला हवेयत पैसे? आणि दागिने घालून कुठे मिरवायला जाणार आहेस? तुला दुःखी परित्यक्तेचं सोंग घेऊन जगात वावरायचं आहे; विसरू नकोस!" दिनेश  तिचा प्रश्न उडवून लावायचा प्रयत्न करत होता.
     तो उत्तर द्यायचं टाळतोय हे लक्षात आल्यावर रंजना चिडली. ती मनाशी विचार करू लगली,
      " हा असा का बोलतोय? माझा ऐवज ढापायचा तर विचार नाही याचा? पण मी असं होऊ देणार नाही! ". प्रथमच तिच्या मनात  तिच्या  प्रियकराविषयी संशय निर्माण झाला होता. पण वरकरणी ती दिनेशला गोड अावाजात समजावू लागली,
       "हे बघ दिनेश! ते माझं स्त्री धन आहे!  मी फार शिकलेली नाही. त्यामुळे माझ्या बाबांनी मला वेळ -प्रसंगाला आधार म्हणून पैसे दिले आहेत! मी तुझ्यावर विश्वास ठेवून सांभाळण्यासाठी तुझ्याकडे दिले होते!  तुझ्यावर विश्वास ठेऊन मी  सगळं दिलं होतं!  आता माझा ऐवज मला परत दे! या बाबतीत मला मस्करी नकोय!" 
      रंजनाने कितीही प्रयत्न केला, तरी हळू हळू तिच्या मनातला संशय तिच्या बोलण्यात डोकावत होता. 
      "आपल्या दोघांमध्ये हे तुझं माझं कधी सुरू झालं! आता नीट ऐक! तू जी कॅश माझ्याकडे दिली होतीस; त्यातून हे घर घेतलं! माझं जुनं घर पडायला आलं होतं! शिवाय ते गावामध्ये भरवस्तीत होतं!  हे घर नसतं तर आपल्याला निवांतपणे भेटता आलं असतं का?  उरलेल्या पैशांतून सेकंड हँड कार घेतली--- तू स्कूटरवरून राजरोस माझ्याबरोबर फिरू शकत नाहीस -- म्हणून कार घ्यावी लागली! हे सगळं मी तुझ्यासाठी केलंय! परत पैशांचा हिशोब माझ्याकडे मागू नकोस! मला आवडत नाही!"     
       दिनेश तावातावाने बोलत होता. रंजनाने चौकशी केली; हे त्याला आवडलं नव्हतं. मघाशी उतू जाणारं प्रेम आता दोघांच्याही  स्वरात दिसत नव्हतं. दोघांमधलं रोमँटिक संभाषण आता गंभीर वादविवादावर  येऊन पोहोचलं होतं. प्रेमामध्ये व्यवहार येताच संवादात विसंवाद निर्माण झाला होता.
       यावर रंजना समजुतीच्या स्वरात म्हणाली,
     "ठीक आहे!---  पण माझे दागिने?  ते तरी नीट ठेवलेयस नं?  ते आताच माझ्याकडे  दे! उद्याच बँकेच्या लाँकरमध्ये नेऊन ठेवते! त्या बँकेतल्या माझ्या खात्याविषयी कोणालाही माहिती नाही! पोलीस केदारच्या घरी गेले होते; म्हणजे इथे आपल्यापर्यंत कधीही पोहोचतील. माझ्यावर ते  संशय घेणार नाहीत; याची काळजी मी घेईनच!  पण तरीही  चौकशी सुरू झालीच, तर आपल्याकडे काही मिळता कामा नये! कारण जर दागिने आपल्याकडे मिळाले, तर सगळा डाव आपल्यावर उलटेल!" रंजना त्याच्या बोलण्यातली नाराजी ओळखून त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होती.
       "तू उगाच घाबरतेस! तुझेच  दागिने आणि पैसे तुझ्याकडे मिळाले; किंवा तू कोणालाही दिलेस,  तर कोणताही गुन्हा होत नाही!" दिनेश म्हणाला.
      "पण --- त्या दागिन्यांमध्ये सासूबाईंनी मला लग्नात घातलेले दागिनेही आहेत; शिवाय केदारने त्याच्या एका कस्टमरकडून मिळलेली कॅश कपाटात ठेवली होती; ती सुद्धा मी रोकड रकमेबरोबर घेतली  होती! म्हणजे चोरीची केस होऊ शकते नं?" रंजना म्हणाली.
        " ही काळजी करण्याचं तुला कारण नाही! माझ्याकडे त्यांना काहीही मिळणार नाही! मी ते दागिने  सुरक्षित जागी ठेवले आहेत!" दिनेश  हसत म्हणाला. त्याच्या डोळ्यांत आता वेगळीच चमक होती.
       " मला ते  हवे आहेत; दिनेश!" रंजना आता हट्टाला पेटली होती. आता तिला  संशयाच्या पिशाच्चाने तिला झपाटलं  होतं.
                       ********         contd.-- part 29.