अभिनंदन !!!! अमर सर..  छाया मॅडम जवळ येताचं त्यांनी माझ्याशी शेकहॅन्ड करत माझं अभिनंदन केलं.  छाया मॅडम म्हणजे आमच्या कॉलेजमध्ये इतिहास विषय शिकवित असायच्या.  पाहायला सुंदर,  थोड्या शरीराने जाड जुड म्हणजे भरल्या होत्या.  पण साडी वर अगदी उठावदार आणि कुणालाही आपल्या अदाने घायाळ करतील अश्याचं छाया मॅडम होत्या.  मी तासिका तत्त्वांवर लागलो त्यापुर्वी पासून या महाविद्यालयात  तासिका तत्वांवर प्राध्यापिका म्हणून होत्या. एका अर्थाने  त्या माझ्या सिनियर होत्या, असंच म्हणावं लागेल.  लग्न न झालेल्या म्हणजे अविवाहित असल्याने सर्वांच्या लाडक्या होत्या, असं म्हटलं तरी चालेल. 
"  कशासाठी अभिनंदन करता मॅडम???? "
मी छाया मॅडम ला आश्चर्याने विचारले . 
" काय सर !!!  एवढ्या लवकर नका विसरत जाऊ!!!  मी ही इथेचं शिकवण्याचं काम करते !!!"
छाया मॅडम  चेहऱ्यावर वेगळे भाव  आणतम्हणाल्या.
   अहो मॅडम, "   मी  नेमकं काय केलं???  कळेल का मला????"
घ्या बुवा , " तुमच्यांकडून ते निघणारचं नाही. म्हणे तुमची पूर्णवेळ प्राध्यापक म्हणजे परमनंट भरती होणार आहे,  असं मी ऐकलं आहे.  लॉटरीचं लागली म्हणायची तुमची!!!  देव जाणे माझ्याकडे कधी लक्ष देणार आहेत तर !!!! "
मॅडम तिरस्कार दर्शक बोलून गेल्या. 
" अच्छा!!!!  त्यासाठी अभिनंदन आहे वाटतं.  धन्यवाद मॅडम !!! पण  फक्त त्यांनी शब्द दिलाय.  बघू कधी पर्यंत त्यांच्या शब्दांची पूर्तता होते तर !!! करतील पूर्ण वेळ पगारी ,हे त्यांच्या मनावर आहे!!.
  " तुमची पण  होईल मॅडम निवड.  नक्कीच पडेल तुमच्याकडे लक्ष. " मी मॅडम ला आशावाद दाखवत म्हणालो. 
  " बघू आता !!! तुमचं तर  छान जमलं बुवा!!!  नशीब लागतं त्यासाठी !!! "
छाया मॅडम आता नाराजीचा सुर काढत म्हणाल्या.
    " माझ्या नशिबा विषयी न बोललेलं बरं म्हणतो मी मॅडम . खूप काही शिकवून गेलं हेचं नशीब आणि हीचं नियती . बरं असो,  पुनश्च एकदा धन्यवाद !!! निघतो मी असं म्हणतं, मी तासिका घेण्यासाठी निघून गेलो. 
                     संस्था चालकांनी  दिलेल्या शब्दांने  मी भारावून  गेलो, आनंदित होतो.  आता खऱ्या अर्थाने आई - बाबांना त्यांच्या कष्टाचं चीज होणार आहे. आनंद ने केलेल्या मैत्रीचा आणि दाखववलेल्या विश्वासाचा  सार्थक ठरणार आहे. सोबतचं लक्ष्मीने केलेल्या प्रेमाची पावतीचं म्हणून सरांचे शब्द मनाला सुखावून गेले. आई आणि मी सुद्धा आता आनंदी होतो. घरी आलो आता घर म्हणजे तेचं शहराच्या बाहेर एका वस्तीत वसवलेलं, नंतर घरांत रुपांतर झालेलं ते घर !!.आईला आल्यावर सांगितलं पण तिला फारसं काही समजलं नाही.  फक्त तिच्या चेहऱ्यावरचा  वेगळाच आनंद पाहून मनाला फार बरं वाटायचं. आईला ही मनोमन वाटत असेल की, आपण केलेल्या कष्टाचे फळ म्हणजे आता अमर मास्तर होणार , तोही पगारी होणार!!!  याचा तिला अभिमान वाटतं असे. पण  तो तिचा आनंद ती जगाला सांगू शकत नव्हती.  कारण येथे ना कुणी आपले होतें,  ना कुणी चौकशी करणारे होते. सर्व आपापल्या कामात व्यस्त असायचे. 
                      आई आता म्हातांरी दिसत होती. चेहऱ्यावर सुरकुत्या पडल्या होत्या . डोक्याचे केस पांढरे झाले होते . आता तिने तिचा पेहरावही बदलला होता . साडीच्या जागी ती आता लुगडे नेसायची . दम लागत असल्याने घरची कामे हळू हळू करायची. तासिंका तत्त्वांवर मिळणार्या पगारात आमची राहण्याची आणि खाण्याची सोय होत होती. अजूनही दिवस जेमतेम होतें असे म्हणायला हरकत नाही.  मनात नेहमी माझ्या मुळे आपल्या आईला तिचं गाव सोडावं लागलं . माझ्या प्रेमामुळे लक्ष्मीला जीव द्यावा लागला,  हे दुखणं मनातल्या मनात टोचत असायचं. एकांत मिळाला की रडून मोकळं व्हायचं असं कधी-कधी माझं चालत असायचं. 
                        एकेदिवशी छाया मॅडमनी सर्व शिक्षक, प्राध्यापकांना घरी जेवणासाठी निमंत्रण दिली.  अमर सर,  तुम्ही  पण या बरं का!!! अश्या  मॅडम म्हणाल्या.
"  कशासाठी निमंत्रण म्हणायचं मॅडम  हे??? मी आपला प्रश्न केला. 
अहो, "  ते काही खास नाही . माझ्या भावाच्या मुलांचा पाचवा वाढदिवस करायचं , घरच्यांनी ठरवलं  आहे. मग घरचेही म्हणाले , तुझ्या कॉलेजचे शिक्षक प्राध्यापक लोकांना बोलवून घे . म्हणून मी सर्वांना निमंत्रण दिलीत आणि हो तुमच्यासाठी स्पेशल इंन्वीटेशन आहे बरं का !!!!" छाया मॅडम हसून म्हणाल्या.
" माझ्यासाठी स्पेशल इंन्वीटेशन !!!  काही खास आहे का ?????" मी नेहमी प्रमाणेप्रश्न टाकला . 
नाही हो सर, "  तुम्ही ना खूप प्रश्न विचारता बरं !!!  तुम्ही नक्कीचं या!!! अशी तंबी देऊन मॅडम निघून गेल्या.
                       तसं मी मुद्दाम पार्टीला आणि कुठे निमंत्रण असले की , जाण्याचं टाळत असायचो. आणि इथे स्पेशल इन्व्हिटेशन दिले,  त्यामुळे माझ्या मनात शंकेची पाल पुटपुटायला लागली . छाया मॅडमचे अजून लग्न झालेलं नव्हतं.  पाहायला सुंदर नव्हत्या असं नाही.  सुंदर होत्या आणि शरीराला शोभेल एवढ्याचं होत्या. त्यांना कदाचित मी आवडतं असल्याने तसा छाया मॅडम नी माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न यापूर्वी बरेच दा केला होता.  पण मी त्यांना नेहमीचं नकार देत असायचो. कदाचित माझ्यामुळे त्या दुखावल्या गेल्या असतील,  पण माझ्या मनात फक्त लक्ष्मी होती. तिच्याशिवाय कुणाला जागाचं द्यायची नाही, असं मी मनात ठरवलं होतं. आणि लक्ष्मी विषयी मी कुणाला सांगू ही शकत नव्हतो. पण छाया मॅडम ला नकार देऊन, मी नेहमी सारखाचं बोलत असायचो. 
                            एवढा आग्रह  मॅडमनी केल्यावर,  जायलाच हवं!!!  नाहीतर उगाचं राग यायचा त्यांना!!! सायंकाळी आईला सांगून मी, छाया मॅडमच्या घरांकडे दिलेल्या पत्त्यावर जायला निघालो  . नवीन ड्रेस म्हणण्यापेक्षा इस्त्री करून आणला होता.  सफेद शर्ट आणि काळा पॅन्ट असा पेहराव करून मी निघालो.  लक्ष्मीने जेंव्हा पासून म्हटलें होते की , दाढी मला आवडत नाही रे !!! तेव्हांपासून तिच्या आठवणीत क्लीन शेव्ह ठेवत असायचो. पायदळ चं निघालो होतो. म्हटलं आपल्या मुळे काय अडणार आहे???लेट गेलं तरी!! तेवढाचं आपला वेळही जाईल, आणि कार्यक्रमात पोहोचु सुद्धा.  शोधत-शोधत,  विचारपूस करत शेवटी घरा जवळ पोहोचलो. 
                      सर्व शिक्षक , प्राध्यापक आपापल्या बायका पोरांना घेऊन आले होते.  काही स्वतःच्या गाडीने आले होते,  तर काही रिक्षा करून.  मी मात्र आपला पायी चालत आलो होतो. घर दोन मजली इमारत होती. वरच्या मजल्यावर कार्यक्रम सुरू होता. सर्व बाजूला रेलचेल  सुरू होती . घरातील पाहुणे मंडळी एकमेकांना नमस्कार तर  कुणी शेकहॅन्ड,  तर काही मुलं गळाभेट घेत होती . लहान मुले खेळण्यात गुंग होती आणि ओरडत होती ,तर कुणी एक खालून वर पायर्या वर चढत होती. थकले की लगेच पाणी पिऊन यायची. मी आपला हळू हळू वर चढलो.  आमचे कॉलेजचे शिक्षक, प्राध्यापक कुठे दिसतात का ??? ते शोधत होतो.  शेवटी काही प्राध्यापक जेवणावर ताव मारताना दिसले.  बहुधा सोबत लहान मुले असल्याने घरी जाण्याचा वेळ झाला असल्याने, ते लवकर जेवण करून निघणार  असा माझा अंदाज लागला होता. 
क्रमशः....