Paaus - 3 - last part in Marathi Moral Stories by Nagesh S Shewalkar books and stories PDF | पाऊसः आंबट-गोड! - 3 - अंतिम भाग

Featured Books
  • નિતુ - પ્રકરણ 64

    નિતુ : ૬૪(નવીન)નિતુ મનોમન સહજ ખુશ હતી, કારણ કે તેનો એક ડર ઓછ...

  • સંઘર્ષ - પ્રકરણ 20

    સિંહાસન સિરીઝ સિદ્ધાર્થ છાયા Disclaimer: સિંહાસન સિરીઝની તમા...

  • પિતા

    માઁ આપણને જન્મ આપે છે,આપણુ જતન કરે છે,પરિવાર નું ધ્યાન રાખે...

  • રહસ્ય,રહસ્ય અને રહસ્ય

    આપણને હંમેશા રહસ્ય ગમતું હોય છે કારણકે તેમાં એવું તત્વ હોય છ...

  • હાસ્યના લાભ

    હાસ્યના લાભ- રાકેશ ઠક્કર હાસ્યના લાભ જ લાભ છે. તેનાથી ક્યારે...

Categories
Share

पाऊसः आंबट-गोड! - 3 - अंतिम भाग

(३)

चहा घेत असताना पुन्हा पावसाचा जोर वाढला. मी तात्यांना विचारले,
"तात्या, घरी सांगून आला आहात ना? नाही तर वहिनी..."
"कसे आहे सांगून आलो तरी उशीर झाला म्हणून आगपाखड आणि नाही सांगितले तर मग काय रौद्ररूप..."
मी म्हणालो, "तात्या, तुम्ही बालपण आणि विद्यालयीन जीवनातील पावसाच्या आठवणी सांगितल्या. तुम्ही शिक्षक होता. या काळातीलही काही आठवणी असतीलच..."
" हो ना. निश्चितच आहेत. शिक्षक म्हणून नोकरीला लागलो. नोकरीचे गाव एक आडवळणी खेडे होते. म्हातारी आई आणि तरुण बहिणीला घेऊन त्या खेड्यात राहणे शक्य नव्हते म्हणून मग तालुक्याच्या ठिकाणी घर केले आणि इतर दोन शिक्षकांप्रमाणे मीही सायकलवर जाणे-येणे करु लागलो. चौदा किलोमीटरचे अंतर तोही कच्चा, खडकाळ रस्ता! अशा रस्त्याने सायकलवर जाणे येणे करताना जीव मेटाकुटीला येत असे. श्वासाने छाती भरुन जात असे. हातापायाला गोळे येत असत."
"काय सांगता? खडकाळ रस्त्यावरुन तुम्ही अठ्ठावीस किलोमीटर तेही सायकलवर जाणेयेणे केलेत? कमाल आहे तुमची? आणि मग पावसाळ्यात?"
"पावसाळा म्हटला की मग होणारा त्रास भयंकर असे. पाऊस पडला की, सायकल रूसून बसे. चिखलाचे गोळे दोन्ही मडगारमध्ये शिरून चाके जाम होत असत. सायकल हटून जाग्यावरच गरगर फिरत असे. काही केले तरी चिखल निघतच नव्हता. बरे, अडकलेला चिखल एकदा काढून भागायचे नाही हो. पुन्हा काही अंतर चालून गेले की, ये रे माझ्या मागल्या! त्यादिवशी तीन- चार वेळा चिखल काढूनही पुन्हा पुन्हा चिखल अडकत होता. शेवटी एका झाडाखाली सायकल उचलून नेत आदळली आणि बारा किलोमीटर पायी चालत आलो तेही पडत्या पावसात!"
"माय गॉड! तात्या त्या गावी किती वर्षे होतात हो?"
"होतो पाच वर्षे. चिखलाचा त्रास होऊ नये म्हणून एकदा सायकलचे दोन्ही मडगार काढून टाकण्याचा विचार केला आणि एका रविवारी दोन्ही मडगार काढून टाकले. सोमवारी सकाळी फार मोठा तीर मारल्याप्रमाणे सायकलवर शाळेत पोहोचलो. दुपारी तीनच्या सुमारास धुवाँधार पाऊस सुरु झाला. चार वाजता शाळा सुटेपर्यंत सर्वत्र पाणीच पाणी सोबत चिखलच चिखल! सोबतच्या शिक्षकांनी सायकली शाळेत ठेवल्या आणि नऊ किलोमीटर अंतर असलेल्या कच्च्या रस्ताने निघाले. मलाही चला म्हणाले. मी म्हणालो, मडगार काढले आहेत आणि पाऊसही थांबलाय. चिखलाचा त्रास होणार नाही. मी सायकलवर टांग मारली नि निघालो. केलेल्या प्रयोगाची फलश्रुती लगेच समोर आली. जो चिखल मडगार अडवून ठेवायचा तोच चिखल आता जोराने दोन्ही बाजूने शरीरावर मारा करीत कपड्यांचे रंग बदलत होता. कपडे सारे चिखलाने भरून गेले. आश्चर्य म्हणजे जसा राष्ट्रीय महामार्गावर आलो तसे पावसाचे नामोनिशान नव्हते. सारा परिसर कोरडाफट होता. आजूबाजूने जाणारे माझ्या अवताराकडे बघून हसत होते. शहरालगत एक ओढा होता. तिथे सायकल धुतली. कपड्यांचा चिखलही धुतला. चिखलाची माती बरीच निघाली परंतु  डाग आणि रंग तसाच राहिला. लोकांच्या डोळ्यातील विविध भाव अनुभवत घरी पोहोचलो. स्नान करून, स्वच्छ कपडे घालून सायकलला पुन्हा मडगार बसवून घेऊन आलो..."
"तात्या, खरेच खूप भोगलेय हो तुम्ही..."
"ते काही विचारुच नका. तुम्हाला सांगतो, काही दिवसानंतर वेगळाच अनुभव आला. शाळा सुटायला काही वेळ बाकी असताना अचानक जोराचा पाऊस आला. एक शिक्षक हसत मला म्हणाले,
"तुम्ही तर सायकलवर येणार असाल ना?"
"कसची सायकल हो. आता कानाला खडे लावले. मडगार बसवले आहेत. आता तुमच्यासोबत पदयात्रा..." असे म्हणत त्यांच्यासोबत सायकल शाळेत ठेवली आणि निघालो. गावाच्या बाहेर पडलो. पाहतो तर काय गावालगत असलेला ओढा ओव्हर फ्लो होऊन धों.. धों... आवाज करीत वाहत होता. तो आवाज आणि जोराने वाहणारे पाणी पाहताच अंगावर काटा आला, भीतीने अंग थरथर कापू लागले. माझी अवस्था ओळखून सोबतचे वयस्कर शिक्षक म्हणाले,
"तुम्हाला पोहणे येत नाही ना? हरकत नाही. माझा हात धरा. हात सोडू नका. वाहत्या पाण्याकडे न पाहता समोर बघा. पाणी जास्त नाही."
     त्यांच्या बोलण्याने बराच धीर आला. त्यांच्याप्रमाणे पायातल्या चपला हातात घेऊन, जीव मुठीत धरून निघालो खरा पण हिंमत होत नव्हती. शेवटी त्या शिक्षकाचा हात घट्ट धरला आणि पुराच्या पाण्यात पहिले पाऊल टाकले आणि भीतीची एक थंडगार लहर शरीरात पसरली. तसाच पुढे निघालो. जसजसा पाण्यात शिरत होतो तसतशी त्या शिक्षकांच्या हातावरची पकड घट्ट होत होती. पाण्याची उंची आणि प्रवाह वाढत होता. एक वेळ तर अशी आली की, पाणी चक्क कमरेच्या वर आले. तितक्यात हातात धरलेली चप्पल पाण्याच्या जोरामुळे मला सोडून गेली. ते शिक्षक सातत्याने धीर देत म्हणत होते,
"घाबरु नका. झालेच आता. बघा. आपण अर्ध्यापेक्षा पुढे आलो आहोत. आता झालेच..."असे करता करता आम्ही पडत्या पावसात, पुराच्या वाहत्या पाण्यात ओढ्याचा पैलतीर गाठला आणि जीव भांड्यात पडला. घरी पोहोचताच आईने गरमगरम पाण्याने आंघोळ करायला लावून सुंठ-मीरे घातलेला चहा प्यायला दिला. रात्री झोपतांना छाती, डोके, गळ्यावर व्हीक्स चोळून दिले. थकव्याने म्हणा, भीतीने म्हणा बरीच शांत झोप लागली..."
"बाप रे! काय भयंकर अनुभव आहे हा. ऐकताना अंगावर काटा येतोय तर त्यावेळी तुमची काय अवस्था झाली असेल ही कल्पनाही करवत नाही."
"तिथून बदली झाली. नंतर मोटारसायकल घेतली. मोटारसायकलचा आमचा हा दररोजचा प्रवास साठ किलोमीटरचा होता. पावसाळ्यात हमखास अनेकदा भिजावे लागे. कुठे थांबता येत नव्हते कारण रस्त्याने शेताशिवाय काहीही नसायचे. झाडाखाली थांबावे तर वीज पडण्याची भीती आणि झाडाखाली उभे राहिले तरी कमी प्रमाणात का होईना भिजावेच लागे. पावसाला न जुमानता निघायचे. पाऊस नेहमी तोंडावर असायचा. त्यामुळे पावसाच्या थेंबांचा मारा जणू दगडांचा मारा असल्याप्रमाणे लागायचा. अंगात हुडहुडी भरायची पण प्रवास थांबला नाही, थांबवला नाही. साठ किलोमीटर दररोज जाणे येणे करीत असे. पावसात भिजून घरी आलो की, सुंठमिऱ्याचा दोन कप चहा प्यालो की अंगात भरलेली हुडहुडी कमी होत असे."
"बाप रे! अहो, तोंडावर येणारा पावसाचा मारा खूप भयानक असतो हो. एक दोन वेळा मी तो अनुभव घेतला आहे. जवळच्या म्हणजे पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या बँकेत मला काही दिवसांसाठी प्रतिनियुक्तीवर पाठविले होते. नेमके ते दिवस पावसाळ्याचे होते. मी तिथे साधारण पंधरा दिवस काम केले परंतु दोन-तीन वेळा भिजत यावे लागले. पावसाचा मारा समोरून अर्थात तोंडावर होता. दगडांचा मारा व्हावा असे त्या थेंबांचे फटके बसत होते. एकेदिवशी मी घरी येऊन गरम पाण्याने आंघोळ करून आरशात बघितले तर संपूर्ण चेहरा लालभडक होऊन सुजला होता तेव्हापासून पावसात भिजण्याचे टाळत आलो."
"असा तर मी चेहऱ्यावर अनेकदा पावसाचा मारा उपभोगलाय.  एके वर्षी पंधरा ऑगस्टला एक भयंकर प्रसंग घडला. मी पत्नीला तिच्या शाळेत सोडून माझ्या शाळेवर परतत असताना ध्यानीमनी नसताना अचानक पाऊस सुरू झाला. काही क्षणात पावसाने उग्र रुप धारण केले. रस्त्यावर कुठे थांबायलाही जागा नव्हती. थांबावे तर मी मुख्याध्यापक असल्याने ध्वजारोहणाची सारी जबाबदारी माझी होती. तसाच भिजत निघालो. दहा मिनिटाच्या मोटारसायकलच्या प्रवासात चिंब भिजलो. माझी शाळा गावाच्या दुसऱ्या टोकाला असल्याने सारे गाव ओलांडून शाळेत जावे लागे. तसाच शाळेत पोहोचलो. पाऊस सुरू होण्यापूर्वी सहकारी शिक्षक शाळेत पोहोचले होते. पावसाळ्याच्या दिवसात नेहमीच एक पोशाख गाडीच्या डिकीत ठेवलेला असे. तो पोशाख घालून होईपर्यंत मुसळधार पडणारा पाऊस पूर्णपणे थांबला. चक्क ऊन पडले. हळूहळू एक- एक विद्यार्थी आणि पालक शाळेत येऊ लागले. योग्य वेळी ध्वजारोहण झाले. गावचे सरपंच अचानक म्हणाले,
"गावकऱ्यांनो शाळेला मुख्याध्यापक आणि शिक्षक कसा असावा तर आपल्या हेडमास्तर आणि शिक्षकांसारखा! माझे दुकान शाळेच्या रस्त्यावर असल्याने मी रोजच पाहतो, आपले शिक्षक बरोबर वेळेवर येतात. आज तर हेडमास्तरांनी कमालच केली. धो धो पडणाऱ्या पावसात हेडमास्तर नखशिखांत भिजून आले. मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले..." असे म्हणत सरपंचांनी स्वतःसोबत आणलेली शाल माझ्या अंगावर टाकली. त्या शालीच्या नव्हे तर सरपंचाच्या कौतुकाच्या उबेने चिंब भिजल्यानंतर नकळत माझे डोळे पाणावले. दुसऱ्या क्षणी मनात विचार आला, यापेक्षा अजून कोणता मोठा पुरस्कार असू शकतो?"
"खरे आहे. नागरिकांनी केलेले कौतुक हाच खरा पुरस्कार असतो..." मी बोलत असताना तात्यांच्या भ्रमणध्वनीवर कुणाचा संदेश आला. तो वाचत तात्या हसत म्हणाले,
"चला. निघावे लागेल. कालिकादेवीने ढग पाठवलाय."
"काय झाले तात्या? कालिकादेवीचा ढग? हा काय प्रकार आहे?" असमंजसपणे मी विचारले.
"अहो, विरहाने त्रस्त झालेल्या कालिदासांच्या यक्षाने काळ्या ढगाकरवी संदेश पाठवला होता. आमच्या व्याकूळ पत्नीने ह्या ढगाहस्ते... मोबाईलकरवी... निरोप पाठवलाय. ऐका. तिने लिहिलेय, 'कुठे आहात? केव्हा येणार? किती वेळ लावत आहात? पावसात भिजू नका हं. सर्दी झाली तर रात्री वाफ घेणे, शेकणे, मलम चोळणे, हात पाय दाबून देणे, डोके दाबणे, सुंठीचा चहा करुन देणे असे एक ना अनेक उपचार मला करावे लागतात त्यामुळे सध्या पाऊस कमी झालाय तर लवकर या... बघा. हा आमचा विरह..." असे म्हणत हसत तात्या निघाले...
     तात्यांना निरोप देण्यासाठी मी दारापर्यंत गेलो. परत वळत असताना त्या दृश्याने माझी पावले जाग्यावर खिळली. पावसाची अविश्रांत रिमझिम चालू होती. महाविद्यालयातून तीन चार नवयौवना भिजण्याचा आनंद घेत घरी परतत होत्या त्यांचे ते नखशिखांत भिजलेले रुपडं माझ्यासारख्या साठी गाठलेल्या मानवाला सैरभैर करत होते. मी त्या सौंदर्याचे निरीक्षण करीत असताना पाठीमागून आवाज आला...
      ये रे घना, ये रे घना
      न्हाऊ घाल माझ्या मना...
    मी दचकून मागे वळून पाहिले. सौभाग्यवती ते गाणे गुणगुणत होती. त्याचवेळी तिच्या नजरेतील खट्याळपणा आणि चेहऱ्यावर पसरलेली लाली पाहून माझी अवस्था कशी वेगळीच झाली…

००००

नागेश सू. शेवाळकर
११०, वर्धमान वाटिका, फेज ०१,
क्रांतिवीरनगर, लेन०२,
हॉटेल जय मल्हारच्या जवळ,
थेरगाव, पुणे ४११०३३
संपर्क:- ९४२३१३९०७१