Laghukathaye - 8 - Vara in Marathi Short Stories by Mrs. Mrinmayee Shirgaonkar books and stories PDF | लघुकथाए - 8 - वर

Featured Books
  • નિતુ - પ્રકરણ 64

    નિતુ : ૬૪(નવીન)નિતુ મનોમન સહજ ખુશ હતી, કારણ કે તેનો એક ડર ઓછ...

  • સંઘર્ષ - પ્રકરણ 20

    સિંહાસન સિરીઝ સિદ્ધાર્થ છાયા Disclaimer: સિંહાસન સિરીઝની તમા...

  • પિતા

    માઁ આપણને જન્મ આપે છે,આપણુ જતન કરે છે,પરિવાર નું ધ્યાન રાખે...

  • રહસ્ય,રહસ્ય અને રહસ્ય

    આપણને હંમેશા રહસ્ય ગમતું હોય છે કારણકે તેમાં એવું તત્વ હોય છ...

  • હાસ્યના લાભ

    હાસ્યના લાભ- રાકેશ ઠક્કર હાસ્યના લાભ જ લાભ છે. તેનાથી ક્યારે...

Categories
Share

लघुकथाए - 8 - वर

११ वर

रामच्या वडलांचा अचानक ह्रदयविकाराने मृत्यू झाला आणि रामचं कुटूंब दु:खाच्या खाईत लोटलं गेलं. राम तर पार मुळापासून हादरला. काहीच वेळापूर्वी आपल्या बरोबर बसून हसत खेळत नाश्ता करणारे आपले बाबा, अचानक या जगातून नाहीसे झाले. याला काय अर्थ आहे? असं कसं चालेल?

काहीतरी तोडगा काढायलाच हवा.

मग रामने सगळे जुने ग्रंथ धुंडाळायला सुरवात केली. कसून तपास सुरू केला. वाचनाचा सपाटा लावला.

आणि शेवटी त्याला एक संदर्भ सापडला. खात्रीलायक उपाय. अतिशय अवघड, पण खात्रीचा.

रामने सर्व पूर्वतयारी केली. व त्याने साधनेला सुरवात केली. घरच्यांना रामचा जिद्दी स्वभाव चांगलाच परिचयाचा होता. त्यामुळे कोणी काही बोलण्याचा प्रश्नच नव्हता. पाहता पाहता रामची तपश्चर्या कडक होत चालली.

नारायणाने नारदाकरवी यमराजांना निरोप धाडला. यमराजाचा रेडा सुस्तावला होता. “काय कटकट आहे? ही काय वेळ झाली मीटींग बोलवायची? तुमच्या ऑर्गनायझेशनमधे तुमची काही पत आहे की नाही?” तो डाफरलाच यमराजांवर!!

“अरे, सबुरीने घे!” ते नरमाईच्या स्वरात म्हणाले. “तुला माहित आहे ना सध्याची स्थिती? कोरोना उद्रेकानंतर भारतातून करोडोंमधे आत्म्यांना उचलता येईल अशी अटकळ होती. ब्रह्मदेवाने सगळी तयारी करून ठेवली होती. आला आत्मा ताबडतोप नव्या मुशीतून काढून, नवा माल पृथ्वीवर पाठवण्यासाठीची सर्व यंत्रणा तयार ठेवली त्यांनी. पण कसलं काय नि कसलं काय? मला जेमतेम लाख दीडलाख कच्चा माल पुरवता आला त्यांना. साहाजिकच पत खाली झाली माझी. आता नोकरी टिकवून ठेवायची तर निदान बोलवल्याबरोबर हजर तर राहायलाच लागणार ना?”

“हं! चला! कुठून यमाचा रेडा झालो असं झालंय मला!”

शेषशायी अस्वस्थपणे या कुशीवरून त्या कुशीवर वळत होते.

“अहो! जरा शांत झोपाल का? असे सारखे हलत राहिलात तर मला नाही बाई पाय चुरायला जमायचे. आणि मेलं हवेत कशाला पाय चुरून? काय मोठे डोंगर पालथे घालताय रोजचे? इथंच तर लवंडलेले असता सततचे!! माझी मेली कंबर भरून येते पालथी मांडी घालून पोजमधे ताठ बसायचं म्हणजे!” लक्ष्मी तणतणली!!

शेषशायींची नजर क्षणभरच क्रुद्ध होत निवळली. मग नेहमीचं कमावलेलं हसू चेहऱ्यावर आणत ते म्हणाले, “शांती लक्ष्मीदेवी! शांती! त्या यमाची प्रॉडक्टीविटी कमालिची खालावलीय! तो ब्रह्मदेव सतत माझ्या नाभीला ढुशा देतोय. स्वर्गलोकाची कशी नाचक्की होतेय वगैरे कटकट करतोय. त्यातून त्या भूतलावरील महाभागाने कसली तरी तपश्चर्या चालवलीय. सगळीकडून नुसता त्रास आहे! तुम्हाला काय जातय म्हणायला, न्युसते लॅवंडल्येल्ये तर ॲसता..... ! हं!”

यमराज हात जोडूनच आत आले. तोंडावर अगदी कसनुसं हसू! त्यांना पाहून लक्ष्मीदेवींनी नाक मुरडलंच! यमराजांना खरंतर प्रचंड राग आलेला. पण सांगतात कोणाला. निमूट उभे राहिले.

“काय यमराज? काय हालहवाल? “

“ठीक आहे देवाधिदेव! “

“ठीक आहे? अहो ब्रह्मदेवांना तुम्ही कच्चा मालच पुरवला नाही तर ते विश्वनिर्मिती करणार कशी? यमराजांच्या नाकर्तेपणामुळे टर्नओव्हर पुरता बोंबललाय असा ओरडा करताहेत ते. “

“हं! हं! हो जरा गणित चुकलय खरं! भारतातून भरपूर आत्मे माल उचलता येतील म्हणून होता नव्हता तो सगळा स्टाफ मी जय्यत तयार ठेवला. पण तिथल्या लोकांनी गनिमी काव्याने आमचे सगळे प्लॅन धुळीला मिळवले.”

“हं! आणि तो कोण मानव तपश्चर्येला बसलाय? भंग करण्यासाठी काही प्रयत्न वगैरे कराल की नाही? “

“हं! हो! हो! कालच बातमी कळली मला! “

“यमराज! पूर्वीचा जोश राहिला नाही तुमच्या कामात. करा काहीतरी! इतर बरेच इंटरेस्टेड आहेत या पोस्टसाठी.”

“मी निष्ठावान अधिकारी देवाधिदेवांचा. एक संधी द्या.”

“ठीक आहे. गरज पडली तर नारदाची मदत घ्या.”

“हो, हो, येतो मी!”

“नारायण नारायण!”

रामने डोळे उघडले. नारद मुनी प्रसन्न चेहऱ्याने समोर उभे. रामने उठून नमस्कार केला.

नारदांनी “आयुष्यमानभव!” असा आशीर्वाद दिला. “बोल वत्सा! का तपस्या करतो आहेस? काय आहे मनात?”

“मला यमराजांना प्रसन्न करून घ्यायचे आहे. त्यांच्याकडून मला वर हवा आहे.”

“कसला वर हवा आहे?”

“तो मी त्यांनाच सांगेन.”

“हरकत नाही. पण तुला यमराज किती चतुर आहेत माहित आहेत ना? त्यामुळे जो काही वर मागशील तो नीट विचार करून माग. नाहीतर एवढी केलेली तपस्या वाया जायची. यमराज तुला वर देताना काहीतरी पळवाट नक्की काढणार”

राम विचारात पडला.

नारद म्हणाले “तुझी तपस्या देवाधिदेव श्रीविष्णू ना समजली, म्हणून त्यांनी मला तुझ्या मदतीला पाठवले. पण मला तुझ्या इच्छेविरूद्ध मदत नाही करता येणार. चला, चालू दे तुझी तपस्या. यमराज निघालेच असतील इकडे यायला. वर मागताना फसगत होऊ देऊ नकोस.

नारायण नारायण!”

“थांबा मुनीवर! मला तुमच्या मदतीची गरज आहे.”

नारदाच्या चेहऱ्यावरची प्रसन्नता कैक पटींनी वाढली.

“मुनीवर, माझे वडील अचानक मृत्यू पावले. तेव्हा मी विचलित झालो. घरदार हादरून गेले. मला माझे मरण कधी, व कसे येणार हे आधीच कळावे अशी माझी इच्छा आहे. मी हाच वर मागणार आहे.”

नारद मुनी गालातल्या गालात हसले.

“हं! तपस्या फार मोठी आहे वत्सा तुझी. नुसता कधी व कसा मत्यू येणार हे जाणून घेण्यापेक्षा तू तो तुझा तुला ठरवता यावा असा वर का नाही मागत?”

“असं येईल मागता?”

“न यायला काय झालं? एवढी तपस्या करतो आहेस. शिवाय मागताना भरपूर मागावं. मग थोडसं मिळतं. तेव्हा आता हा विचार कर की मृत्यू कसा हवाय तुला? केव्हा हवाय? अचानक, तुझ्या वडलांसारखा? की अपघाती मृत्यू? की हळूहळू, आधी व्याधींनी पूर्वसूचना देऊन? भरपूर शारिरीक हालअपेष्टा होऊन? जवळच्या लोकांनी तुझ्या जाण्याची इच्छा करून? वाट पाहून?”

राम विचारात पडला. त्याच्या नजरेसमोर त्याचे जर्जर झालेले शरीर दिसू लागले. जवळची मंडळी कंटाळून डोक्याला हात लावून बसलेली दिसू लागली. त्याने जोरजोरात नकारार्थी मान हलवली.

“किंवा तू असं का नाही करत? भरपूर आयुष्य मागून घे! किंवा त्यापेक्षा अमरत्वच का नाही मागत?”

राम एकदमच हुशारला. “असा वर मिळेल?”

“अरे, तू विचारपूर्वक निगोशिएट केलं पाहिजेस. पण काय हवय ते मनाशी नक्की ठरव. द्विधा मन नको. बघ हं! समजा, तू हजार वर्षांचं चीरतरूण आयुष्य मागितलंस, आणि मग अचानक मृत्यू, तर कसं होईल? म्हणजे बघ तुझ्या पुढच्या दहा पिढ्यांचा तू साक्षीदार असशील. तुझी नातवंडं, पतवंडं सगळे तुझ्या डोळ्यांसमोर जन्म तर घेतीलंच, पण त्यांचं संपूर्ण आयुष्य तुला पाहता येईल. अर्थात त्यांचे मृत्यूही पाहावे लागतील मात्र. तुला मिळालेलं हजार वर्षांचं चीरतरूण आयुष्य त्यांना खटकेल का रे कदाचित?”

नारदाने हळूच पिल्लू सोडलं.

रामचा मगाशी हुशारलेला चेहरा एकदम काळवंडला. “माझ्या प्रिय बायकामुलांचेही मृत्यू मला पाहावे लागतील.” तो हताश होत म्हणाला.

“हो, ते तर पाहावे लागणारच!”

“मी फक्त माझा मृत्यू कधी होणार आणि कसा होणार एवढंच जाणून घेण्यासाठी तपस्या करत होतो, मी तेवढंच मागेन.”राम चिडून म्हणाला.

“नारायण! नारायण! हं! असं म्हणतोस! बरं तसं तर तसं! पण यमराजाने तुला एकदा का हे सांगितलं की मग काय होणार?”

“काय होणार?”

“ विशेष काही नाही. फक्त सांगितल्या क्षणापासून तू त्या क्षणाचाच विचार करकरून कष्टी होणार! तो दिवस फार दूर असेल, तर कदाचित काही वर्ष तू सुखाने घालवशील. पण मग तू सतत त्या दिवसाचाच विचार व भयाने तुझे राहिलेले दिवस, महिने, वर्ष व्यतीत करशील.”

राम कमालीचा हादरला. “मुनीवर, तुम्ही म्हणालात की यमराज यायला निघालेत. मी आता काय करू? मला कसलाच वर नकोय! चुकलंच माझं, मी अशी तपस्या केली ते.”

“नारायण! नारायण!”

“लवकर सांगा मुनीवर!”

“तू नीघ इथून लगेच! मी पाहतो यमराजांना काय सांगायचं ते!”

रामने नारदांना नमस्कार केला व तो पळत सुटला घराकडे. झाडामागे लपून बसलेला यमराज बाहेर आला.

“तुझे खूप उपकार झाले नारदा!”

“नारायण नारायण!”नारद अदृश्य झाले.

रेड्याने तोंडातली गवताची काडी तुच्छतेने थुंकली.

“हं! चला आता!”

“चल बाबा,”दमलेला यमराज म्हणाला.