Laghukathaye - 4 - Ganya Manee ani Jambhul in Marathi Short Stories by Mrs. Mrinmayee Shirgaonkar books and stories PDF | लघुकथाए - 4 - गण्या, मनी आणि जांभूळ

Featured Books
  • My Wife is Student ? - 25

    वो दोनो जैसे ही अंडर जाते हैं.. वैसे ही हैरान हो जाते है ......

  • एग्जाम ड्यूटी - 3

    दूसरे दिन की परीक्षा: जिम्मेदारी और लापरवाही का द्वंद्वपरीक्...

  • आई कैन सी यू - 52

    अब तक कहानी में हम ने देखा के लूसी को बड़ी मुश्किल से बचाया...

  • All We Imagine As Light - Film Review

                           फिल्म रिव्यु  All We Imagine As Light...

  • दर्द दिलों के - 12

    तो हमने अभी तक देखा धनंजय और शेर सिंह अपने रुतबे को बचाने के...

Categories
Share

लघुकथाए - 4 - गण्या, मनी आणि जांभूळ

गण्या जागा झाला दचकून, घंटेच्या आवाजाने. क्षणभर कळेना त्याला, कुठे आहे ते! मग हळूहळू जाग आणि आठवण एकत्रच आली.

काल संध्याकाळी पोलीस त्याला इथे सोडून गेले.

‘बा नं टांगलं सोत्ताला, आन् दोन दिसांनी आय पोलीस ठेसनात, मंदी आनी मला घिऊन ग्येली. आजाचा तिनं मुडदा पाडला शेतात, आसं म्हनली. समदं सांगितलं. पोरांना बगनारं कुनी न्हाय म्हनली. आयेला आता कुटं न्येलं काय म्हाईत. मंदीला पोरींच्या रिमांडात धाडनार हुते. मला हितं सोडलं. पन माजी मनी ऱ्हायली तितंच! आनि जांबळाचं झाड बी. त्येना कसं आननार ? बा, आजा, म्येले, आय पोलिस ठेसनात. मंदी आनि मी रिमांडात. घरला कोनीच न्हाय. मनी म्यॅंव म्यॅंव करत सोदत आसंल. आनि जांबळाला तर बोलताबी येत न्हाय. बोलता येत आसतं, तर बा नं टांगलं सोत्ताला, तवा आवाज दिला नसता व्हय त्यानं?’

“ए, उठ रे. येळ संपली की आंगोळ नाय करायला मिळायची. घंटा ऐकलीस का नाय?”

गण्या पट्कन उठून बसला. सगळी मुलं भराभर कपडे घेऊन निघाली होती. गण्याकडे काहीच नव्हतं. तो तसाच सगळ्यांच्या मागून निघाला. मुलं प्रातर्विधीच्या रांगेत उभे राहून तिथलं काम उरकून आंघोळीच्या रांगेत उभे राहत होते.

एक मोठा नळ उंचावर बसवलेला. एक माणूस जरा मागे उभा राहून शिटी वाजवायचा. शिटी वाजली की नळाखालचा मुलगा बाहेर, रांगेतला मुलगा नळाखाली. साधारण तीन मिनिटांनी पुढची शिटी.

गण्या पाहत बसला. सगळ्यांचं झाल्यावर त्या माणसाने एक कपड्याचा जोड, एक टॉवेल,एक प्लेट, एक मग , गण्याच्या हातात दिला. गण्याला नळाकडे जाण्याची खूण करून नळ सुरू केला. गण्या नळाखाली उभा राहिला. तीन मिनिटांनी नळ बंद झाला.

घरी विहिरीवर किंवा ओढ्यात मनसोक्त डुंबून आंघोळ व्हायची. आता ते बदललं.

सगळी मुलं आता एका रांगेत बसली. वाढपी चहा पाव घेऊन आले. प्रत्येकाच्या मगात चहा ओतून पाव प्लेटीत टाकत निघाले. त्यांच्या हालचाली अगदी यंत्रवत होत्या. भरभर! प्रत्येकाच्या मगात पडणारा चहाही बरोबर तेवढाच. गण्याला पाहत राहावसं वाटलं ते सगळंच. मग त्याच्याही पुढ्यात चहा पाव आला. तो मन लावून चहा पाव खायला लागला.

थोड्या वेळानं हाजरी झाली. पोरं तिथल्याच वर्गांमधे गेली. हाजरीवाल्यानं गण्याला थांबवून घेतला.

"नाव?"

“गण्या.” त्याने आपल्याजवळचे कागद तपासून त्याचं पूर्ण नाव लिहीलं.

"शाळेत जात होतास गावी?”

गण्याने नकारार्थी मान हलवली.

वर्ग: ‘पहिली’लिहीलं.

मग एक पत्र्याची पाटी, पेन्सील, एक अंकलिपी मिळाली. गण्या हरखलाच ते बघून.

जा पहिलीच्या वर्गात जाऊन बस.

गण्या पाहत राहिला. मग तोच उठला. गण्याच्या दंडाला धरून पहिलीच्या वर्गात घेऊन गेला. मास्तरांना सांगून बसवलं त्याला तिथे.

शाळेतलं काही गण्याला कळलं नाही. तो नुसताच पाहत बसला. मग पाटीवर त्याने जांभळाचं झाड, त्याला आठवत होतं तसं काढलं. अचानक त्याच्या डोळ्यांसमोर एका फांदीला बा लटकला होता ते आलं. त्याने तेही आठवेल तसं काढलं. कोणीतरी चुगली केली. मास्तरांनी पाटी पाहिली आणि खाड्कन बसली गण्याच्या मुस्काटात. त्याला कळलंच नाही का मारलं. तो नुसताच गाल चोळत बसला. “एवढ्याशा वयात ही खुनशी वृत्ती!” मास्तर ओरडत होते. “कोणाला लटकवायचय रे तुला? कोण आहे हा?”

“माजा बा! लटकला त्यो आपनहूनच! दारातल्या जांबळावर!” गण्या सत्य सांगता झाला. मास्तर एकदमच गप्पं झाले. काही न सुचून त्यांनी गण्याची पाटी पुसून त्याच्या हातात दिली. त्याच्या खांद्यावर हात ठेवून, बस म्हणाले. गण्याला ते ही काही कळलं नाही. तो बस म्हटल्यावर बसला.

शाळा संपल्यावर दुपारी परत तशीच रांग. यावेळी रोटली आणि डाळीचं कालवण. गण्याला तेही आवडलं. ‘घरला मिळाली तर भाकर, ती बी पान्यासंगट, फार जालं तर मीटाचा खडा., हितं मजाय की. मंदीला बी मिळत आसंल का आसंच? आनि आयला? मनी आसती तर तिलाबी मी माज्यातला टुकडा दिला आसता.”

जेवणं झाल्यावर मुलांना निरनिराळी कामं होती वाटून दिलेली. भांडी घासायला, जमीन पुसायला, अंगण झाडायला, बेडशीटं चादरी धुवायला, ज्याचा त्या दिवशी जो कामाचा वाटा होता ते काम तो करू लागला.

गण्या सगळ्यात लहान होता. तिथल्या माणसाने त्याला माळ्याकडे पाठवलं. “माळीबाबा, या पोराला द्या काही काम.”

नवीन रोपं आणलेली,लावायची होती, त्यात मदत करायला सांगितली माळ्याने.

अगदी लहान लहान रोपं एकत्र होती. माळ्याने लहान लहान पिशव्या खताने भरायला दिल्या गण्याकडे. मग एक एक रोप वेगळं करून त्या पिशव्यांमधे लावायला सांगितलं. “मंग उलीसं पानी घालाचं लावून जाल्यावर म्हंजी रुजंल रोपटं, काय?”

गण्याने मान हलवली. पिशव्या भरून तो एक एक रोप लावू लागला. एक रोप हातात घेतल्यावर त्याला वेगळाच ओळखीचा वास आला. त्याने परत परत हुंगला. त्याचे डोळे चमकले. तो निरखून पाहू लागला त्या रोपाला. ओळख पटलीच!

पहिल्यांदाच तो कोणी न विचारता बोलला,”ह्ये जांबळाचं हाय न्हवं? “

माळ्याने वळून पाह्यलं. “व्हय. ओळकलास की बरूबर! हाडाचा माळी हाईस म्हनायचा. मोटं कर त्येला आता. मंग जिमीनीत लावू.”

गण्या किती तरी वेळ त्या रोपट्यावरून मायेनं हात फिरवत राहिला. “त्येचं जांबळाचं झाड त्येला सोदत आलं व्हतं. आता मनीबी येनार!” त्याची खात्रीच पटली.

तो थांबणार होता इथेच आता तिची वाट पाहत.

गण्याचं सगळं जग पुरं होणार होतं,मनी आल्यावर.

तो रिमांडमधे पुरता रुजणार होता आता, त्या जांभळाच्या रोपासारखा!

“बरं जालं आयनं आजाचा मुडदा पाडला!” तो मनात म्हणाला.