Manachya vaatevarti Avyakt to an mi - 4 in Marathi Fiction Stories by अनु... books and stories PDF | मनाच्या वाटेवरती... अव्यक्त तो अन मी... - 4

Featured Books
Categories
Share

मनाच्या वाटेवरती... अव्यक्त तो अन मी... - 4

पुढे...

अनपेक्षितपणे आपली अपेक्षा पूर्ण झाली तर??? कसं वाटेल??? अरे...हे काय विचारानं झालं का?? असं झालं तर आपण अगदी 'सातवें आसमान' वर पोहचून जाऊ...हो ना...!! होतं असं... माझ्यासोबत ही त्यावेळी तेच झालं...दोन वर्षांपासून माझं आणि अतुलचं 'आंधळी कोशिंबीर' खेळणं सुरू होतं...त्यात एकमेकांना दोन वर्षांपासून पाहिलं ही नव्हतं, आता त्याला कुठेतरी पूर्णविराम मिळेल याची अपेक्षा होती...शेवटी आता मी आणि अतुल एवढ्या मोठ्या कालावधी नंतर एकमेकांच्या समोर येणार होतो...हळुवार उलगडणाऱ्या नात्यांची गुंतागुंत सोडवणं फार कठिण असतं...त्यात समोरचा आपल्याबद्दल काय विचार करत असेल, आपलं वागणं, आपलं बोलणं त्याला कसं वाटत असेल हे विचार सतत डोक्यात असतात आणि त्यात त्यांचं अव्यक्त राहणं मात्र आपल्याला कोड्यात टाकतं...आता हे कोडं सुटेल याचे चिन्ह दिसत होते...

माझं नशीब खरंच फळफळलं होतं... अतुलच्या बहिणीचं लग्न ठरलं होतं आणि आम्हाला सगळ्यांना जायचं होतं... माझे बारावीचे पेपर नुकतेच आटोपले होते त्यामुळे ताईने मला लवकर येण्याचा आग्रह केला...आणि आईबाबांनी लगेच हमी भरली...मला तर इतका आनंद होत होता...असं वाटत होतं कधी एकदा अतुल डोळ्यासमोर येतो...माझी जायची तयारी सुरू झाली...यावेळी चेतन उशिरा येणार होता त्यामुळे देवाला एकच मागत होती की लवकरात लवकर अतुलला येऊ दे...नाहीतर चेतनच्या खिखिखी पुढे माझं काही चालणार नाही आणि तो जासुसी करेल तो भाग वेगळा...त्यामुळे मला जितकी शिफारस करता येते, जेवढा वशिला लावता येतो तेवढा मी देवाकडे लावून झाला होता...

ताईकडे येऊन चार दिवस झाले होते...पण मन मात्र कुठेही लागत नव्हतं... हां, नाही म्हणायला माझा एन्ट्रान्स चा अभ्यास सुरू होता, ताईच्या घरी संध्याकाळी गच्चीवर जेवणाच्या पार्ट्या अजूनही चालूच होत्या पण मला सगळं काही अधुरं भासत होतं, मन कुठेही लागत नव्हतं...असं वाटत होतं जावं परत आपल्या घरी..पण आपण आलो तर आपल्याच मनाने, तर सांगणार कसं की लगेच परत का जायचंय त्यामुळे मुकाट्याने सगळ्यांमध्ये मिसळण्याशिवाय पर्याय नव्हता...मीनल ताई...अतुलची बहीण...तिच्याच लग्नाची तर तयारी सुरू होती.. खूप मनमिळाऊ, प्रेमळ होती ती...मग एन्ट्रान्स चा अभ्यास झाला की सगळा वेळ रशु आणि तिच्यासोबत जायचा...एकदा सहज बोलता बोलता मीनल ताई बोलली की, एकदा अतुल आला तर तुला त्याची अभ्यासात फार मदत होईल, गणित खूप चांगलं आहे त्याचं... मलाही तिला आता सरळ सरळ विचारावं वाटत होतं की एकदा सांगूनच दे बाई, की तो येणार कधी आहे, थोडी तरी शांतता मिळेल माझ्या जीवाला... पण मनातले शब्द ओठांवरती येऊ शकले नाही...

मला कळत नव्हतं, ह्या अश्या कोणत्या भावना आहेत माझ्या मनात, ज्या अतुलसाठी दिवसेंदिवस वाढतंच आहेत...रोज त्याच्याशी बोलणं नाही, भेटणं नाही, एवढंच काय तर दोन वर्षे झालेत आम्ही एकमेकांना पाहिलं ही नाही तरी माझ्या मनात एवढी अस्वस्थता का??? आणि आता तर सवय झाली होती हा पसारा मनात मांडून आयुष्य जगायची...पण आता मी अतुलच्या घरी जायचं टाळत होती, दोन दिवस झाले होते मी मीनल ताईला
भेटली नव्हती, तेंव्हा तिने ताईला फोन करून मला घरी यायला सांगितलं...आता तिने ताईला फोन केला म्हणजे जावंच लागणार होतं...

मी लगेच गेली तिथे...घरी कोणीही दिसलं नाही आजोबांव्यतिरिक्त, कारण सगळे लग्नाच्या खरेदीत व्यस्त होते...मी मीनल ताईच्या रूममध्ये गेली तर ती दिसली नाही..पुन्हा आजोबांना विचारायला गेली तर त्यांचा नेमकाच डोळा लागला होता त्यामुळे त्यांना उठवणं मला पटलं नाही...तेवढ्यात वरच्या रूमचा दरवाजा मला उघडा दिसला, म्हणजे मीनल ताई तिथेच असावी... तिला जोरात आवाज देऊन सांगावं की खाली ये, असा विचार आला डोक्यात पण आजोबा झोपले होते त्यामुळे मीच चोर पावलांनी वरती गेली... जाऊन बघितलं तर बेड वर कोणीतरी झोपलं होतं... घरात कोणी दुसरं नव्हतं आणि मला मीनल ताईने बोलावलं म्हणजे तीच असणार असं मला वाटलं...ती झोपली होती छान पांघरून...शहाणी कुठली...मला बोलवून स्वतः आरामात झोपली... या लोकांना दुपारच्या इतक्या झोपा कश्या येतात देव जाणे...!! स्वतःशीच मी विचार केला...पण आता मला खोड्या सुचत होत्या, म्हणून मी हळूच तिच्यापाठीमागून जाऊन तिला गुदगुल्या केल्या आणि जोरात तिच्या कानात ओरडली....

"सरप्राईज......." तेवढ्यात तिने अंगावरची चादर काढून बाजूला फेकली आणि खाडकन उठून आपल्या दोन्ही गुडग्यांवर बसत माझे हात पकडले...

"कोण आहे हे मूर्ख, मला झो..." आणि हे काय...जेंव्हा त्या व्यक्तीने माझ्याकडे पाहिलं तेंव्हा त्याचं वाक्य अर्धवटच राहीलं...आणि मी?? माझी तर बोलतीच बंद झाली...माझे श्वास रोखल्या गेले, हातपाय थंड पडले...कारण... समोर अतुल होता...त्याने त्याच्या दोन्ही हाताने माझे दोन्ही मनगट गच्च पकडले होते... दोन वर्ष.... हो... दोन वर्षांनी आम्ही पुन्हा एकमेकांच्या समोर होतो आणि पुन्हा तीच अवघडलेली परिस्थिती...पुन्हा आमचे डोळेच बोलत होते, एवढे की आम्ही हरवून गेलो... काही सेकंद असेच गेले..मला तर तिथे बसावं की तिथून उठून पळून जावं किंवा काही बोलावं...याचं कशाचंच भान नव्हतं...त्याच्या डोळ्यात बघत असताना अचानक माझे डोळे खाली झुकले आणि तो हळूच माझ्या कानाजवळ येत बोलला,

"खरंच सरप्राईज आहे हे माझ्यासाठी..."
तो बोलत असतांना जेंव्हा त्याचे गरम श्वास माझ्या गालावर पडले, एवढे शहारे आले अंगावरती... माझ्या हृदयाची धावणारी गती माझ्या आवाक्याबाहेर होती आता...मी गच्च डोळे मिटून घेतले...त्याने अजूनही माझे हात सोडले नव्हते...तो मलाच बघत असावा पण माझी मात्र हिम्मत झाली नाही डोळे उघडून त्याच्यावर एक नजर टाकण्याची.. तो काहितरी बोलणार इतक्यात मीनल ताईचे स्वर जसे कानांवर पडले तसं आम्ही एक झटक्यात उठून उभे झालो...माझे तर हातपाय थरथर कापत होते...

"काय झालं?? असं भूत पाहिल्यासारखं का उभे आहात तुम्ही दोघं??? आणि काय रे शहाण्या मी तुला दहा मिनिटं आधीच उठवून गेली तर किती भडकला होतास माझ्यावर आणि आता काय झालं तुला ? कसा उठला???"
अतुलकडे रागाने पाहत ताई बोलली...

"नाही...ते आ..मी....म्हणजे...मी झोपलो होतो..प..."
अतुलला काही सुचतच नव्हतं बोलायला...आता मला विचार आला जर हिने मला विचारलं की मी इथे काय करत आहे, तर माझी हालत तर अतुलपेक्षाही खराब होईल त्यामुळे इथून लवकर कल्टी मारावी लागेल...त्या दोघं बहिण भावाची जुगलबंदी सुरू असताना मी काढता पाय घेण्याचा प्रयत्न केला तर मीनल ताईने तिचा मोर्चा माझ्याकडे वळवला...आता मला ती काय बोलेल किंवा काय विचारेल यापेक्षा जास्त चिंता ही होती की मी उत्तर काय देऊ...ती लगेच बोलली,

"तू कुठे गायब होतीस दोन दिवसांपासून?? बरं झालं आलीस..चल माझ्यासोबत मी काय काय शॉपिंग केली दाखवते तुला...." तिने माझा हात पकडला आणि पुन्हा अतुलकडे अंगठा दाखवत बोलली,

"आणि तुम्ही साहेब... झोपा काढा फक्त..बहिणीच्या लग्नात काही कामं नका करू, म्हणजे हे मिळेल...ठेंगा..हीहीही...."
आणि हसत हसत मला घेऊन निघाली रूममधून... मी मागे वळून पाहिलं तर अतुल अजूनही मलाच बघत होता... मी गडबडीने नजर वळवली...

मीनल ताईची किती बडबड सुरू होती, किती काय काय ती मला दाखवत होती पण मी मात्र मनातून आज हवेत तरंगत होती...तिचे शब्द कानापर्यंत पोहचतच नव्हते आणि माझ्या चेहऱ्यावरचं हास्य काही कमी होत नव्हतं...कालच तर देवाला वशिला लावला होता आणि आज देवाने माझं ऐकलं ही...व्वा...काय फास्ट सर्विस म्हणायची...थँकू बाप्पा... थँकू थँकू थँकू...माझं सगळं संभाषण देवाशी मनातच सुरू होतं..आणि मी आनंदाने जागेवरच उडी मारली...आणि इतक्यात लक्षात आलं, अरे...मीनल ताई तोंड डोळे वासून माझ्याकडे बघत आहे.....

"काय ग??? काय झालं???" कदाचित माझ्या हावभावावरून तिला वाटलं असेल मला वेडबीड लागलं की काय...

"कक्क..काही नाही...तुझी शॉपिंग बघून आनंद झाला..."

"हीहीही... वेडी..."
मीनल ताईला उल्लू बनवण्यात मला यश आलं आणि मी सुटकेचा सुस्कारा सोडला...
*******************
खूप गोड असतात पहिल्या प्रेमाच्या भावना..हो ना.??? जगातली प्रत्येक मुलगी, प्रत्येक मुलगा जेंव्हा आपल्या तारुण्यात पाय ठेवतो तेंव्हा ह्या भावना नक्कीच अनुभवतो... तर मी त्याला अपवाद कशी ठरणार होती?? प्रत्येकाच्या मनात एक प्रेमकथा अशी दडलेली असते ज्याच्याबद्दल आपण कोणाजवळही वाचा फोडू शकत नाही...अगदी त्या व्यक्तीला देखील माहीत नसतं, ज्याच्याबद्दल आपल्या मनात हे सगळं सुरू असतं... खरं प्रेम कशाला म्हणतात हे समजून घ्यायचं वय नव्हतं माझं ते...मुळातच त्या भावनांना प्रेम तरी म्हणतात का?? हे सुद्धा सांगता येत नव्हतं त्यावेळी...जे काही होतं, खूप गोड होतं.... पण जेंव्हा वयासोबत ह्याच भावना परिपक्व होतं जातात आणि आपण ते व्यक्त ही करू शकत नाही तेंव्हा हाच गोडवा, कटुता वाटायला लागतो... आपण ते कधी विसरलेलोच नसतो, कारण बऱ्याचदा किशोर वयातल्या त्या भावना अजून दृढ होत जातात....माझ्याही बाबतीत तेच झालं...मला जमलंच नाही त्या गोष्टी तिथेच सोडून द्यायला...अतुल आयुष्यातुन निघून गेला पण कधीही न विसरता येणारं, आणि कायम मनात बोचत राहणारं दुःख देऊन गेला....

अतुल आल्याचा आनंद तर होताच मला, पण जेव्हा शांतपणे विचार करून पाहिलं तेंव्हा वाटलं की आज अनावधानाने आम्ही समोरासमोर आलो म्हणून त्याच्या डोळ्यात मला आनंद दिसला भेटण्याचा, पण जेंव्हा त्याने फोन केला होता तेंव्हा साधा नंबर न देताच रागारागत फोन आपटून दिला...हा पण विचार नाही केला की मी पुन्हा त्याला संपर्क कसा करणार... हं, याला काय कळतं एका मुलीला किती विचार असतात, कोणाकोणाचा विचार करावा लागतो..मुलगा आहे ना..पण त्याचासारखा धुसमुसळेपणा मला कसा जमणार होता??...त्यादिवशी हा फोनवर होता आणि अगदी त्याचवेळेस बाबांनी बोलावलं, त्यामुळे माझी किती तारांबळ उडाली हे मलाच माहीत..आणि वरून ह्याचे टोमणे की 'राहू दे, नाही जमायचं तुला..'
त्यामुळे तो भेटुनही थोडी नाराजी तर माझ्याही मनात होतीच आता...म्हणून विचार केला की भावनांना आवर घालायचा आणि आता जेंव्हा आमचा सामना होईल तेंव्हा असं सगळं काही विसरून नुसतंच त्याच्यात हरवायचं नाही...अर्थात, ही सगळी वार्निंग वजा सूचना मी माझ्या मनाला देत होती...पण तो आलाय म्हणून मनात 'खुशीके लड्डू' तर फुटतच होते...

घरात मीनल ताईच्या लग्नाची तयारी खूप जोरासोरात सुरू होती...मी दिवसभर रूममध्ये एन्ट्रान्स चा अभ्यास करायची आणि संध्याकाळी मग ताईसोबत अतुलच्या घरी जायची...अतुलमध्ये दिवसेंदिवस गुंतत असताना सुद्धा मला ही जाणीव होती की अभ्यासाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही...खरं तर याची प्रेरणा ही मला अतुल कडूनच मिळत होती... तो आता सेकंड इअर इंजिनिअरिंग ला होता, त्यामुळे सुट्ट्यात घरी येऊनही तो मात्र वेळोवेळी त्याचा अभ्यास ही करायचाच....

एका संध्याकाळी मी मीनल ताईला भेटायला गेली नाही तर दुसऱ्या दिवशी तीच आली...माझी परीक्षा जवळ येत होती त्यामुळे तिनेही मला जास्त डिस्टर्ब केलं नाही...पण त्यादिवशी माझं तिच्याकडे लक्षचं नव्हतं, कारण एका गणितात मी अटकली होती आणि खूप प्रयत्न करूनही माझ्याने ते सोडवल्या जात नव्हतं...परीक्षा जवळ आली आणि मला साधे साधे प्रश्न सोडवता येत नाहीयेत म्हणून मी खूप बैचेन झाली होती, माझी अवस्था पाहून तिने लगेच अतुलला बोलावणं पाठवल...त्याने लगेच प्रश्न बघितले आणि तो सोडवायला लागला आणि मला समजवून ही सांगत होता...आम्ही अभ्यासत मग्न आहोत म्हणून मीनल ताई निघून गेली...मी प्रश्न सोडवत असताना काही वाटलं नाही पण जेंव्हा माझं सगळं सोडवून झालं, तेंव्हा लक्षात आलं की रूममध्ये मी आणि अतुल दोघेच आहोत...आता या शांततेत मात्र आम्हा दोघांनाही अवघडल्या सारखं जाणवत होतं... मधेच आमची नजर एकमेकांवर खिळायची आणि मग लगेच आम्ही इकडेतिकडे बघायला लागायचो...आता मात्र मी पुस्तकं बंद केलीत आणि जागेवरून उठून उभी राहीली, बाहेर जाण्याकरता.... तेवढ्यात अतुल बोलला,

"फोन करणार होतीस ना....??"
आणि त्याच्या शब्दांनी मला पुन्हा जागेवरचं बांधून ठेवलं...

"हां...अम्म्म.. म्हणजे हो...पण नंबर नव्हता...."

"नंबर मिळवणं काही अवघड काम तर नाही?? मिळाला असता कोणाकडूनही?? हो ना???"

"हो... पण काय सांगून मागितला असता नंबर...काय काम आहे किंवा कशाला हवा, याच काय कारण सांगितलं असतं मी??"

"जसा चेतन चा नंबर घेते, त्याला बोलते, तसंच माझ्याही बद्दल सांगून मिळवता आला असता नंबर..?"

"चेतनची गोष्ट वेगळी आहे..आम्ही बोलतो, मित्र आहोत, हे माहीत आहे घरी सगळ्यांना...पण आपलं वेगळं आहे..."

आणि हे बोलून मीच जीभ दाताखाली चावली हा विचार करून की मी काय बोलून गेली....

"हम्मम...अच्छा... आपलं वेगळं आहे..काय वेगळं... ते सांगशील जरा???" अतुल माझ्या जवळ येत बोलला,
आता अतुलने मला माझ्याच शब्दांत फसवलं होतं..
त्याला उत्तर देणं जमणार नव्हतं मला, आणि कळतही नव्हतं काय बोलावं... आणि तो माझ्या जवळ येऊन उभा राहिला त्यामुळे तर अजूनच धडधड वाढली होती...तो पुन्हा हळूच बोलला,

"काय वेगळं आहे?? बोल...."

"काही नाही..मला नाही माहीत..." असं बोलून मी तिथून पळ काढणात तोच त्याने माझ्या ओढणीचं एक टोक पकडलं आणि बोलला,

"अहसासो को लफ़्जो में पिरोया जाये जरुरी तो नही,
लेकीन हर आहट पर इंतजार तेरा हम भी करते है..."

मी वळून त्याच्याकडे पाहिलं, आणि आजही त्याच्या डोळ्यात मला हेच जाणवलं की आमच्या दोघांच्या मनातही सारख्याच भावना आहेत एकमेकांसाठी... तेवढ्यात रश्मी पळत पळत आली माझ्याजवळ आणि बोलली,

"माऊ.. चेतन काकाचा फोन आहे तुझ्यासाठी, तो बोलला की त्याने तुला खूप मिस केलं..."
रशुचे शब्द ऐकून मी अतुलकडे पाहिलं तर त्याचा हातून माझी ओढणी कधीच सुटली होती...आणि चेहऱ्यावरचे भाव निराशेत बदलले होते...मी काही बोलणार तेवढ्यात अतुल माझ्या समोरून निघून गेला, पुन्हा मला एक कोड्यात टाकून......
**********************

क्रमशः