Dildar Kajari - 8 in Marathi Fiction Stories by Nitin More books and stories PDF | दिलदार कजरी - 8

Featured Books
  • ચતુર

    आकारसदृशप्रज्ञः प्रज्ञयासदृशागमः | आगमैः सदृशारम्भ आरम्भसदृश...

  • ભારતીય સિનેમાનાં અમૂલ્ય રત્ન - 5

    આશા પારેખઃ બોલિવૂડની જ્યુબિલી ગર્લ તો નૂતન અભિનયની મહારાણી૧૯...

  • રાણીની હવેલી - 6

    તે દિવસે મારી જિંદગીમાં પ્રથમ વાર મેં કંઈક આવું વિચિત્ર અને...

  • ચોરોનો ખજાનો - 71

                   જીવડું અને જંગ           રિચાર્ડ અને તેની સાથ...

  • ખજાનો - 88

    "આ બધી સમસ્યાઓનો ઉકેલ તો અંગ્રેજોએ આપણા જહાજ સાથે જ બાળી નાં...

Categories
Share

दिलदार कजरी - 8

८.

पाऊल पडते पुढे ..

रात्रीची वेळ. खरेतर त्यांच्या आयुष्यात दिवस नि रात्र वेगळी काढणे कठीण. एकदा डाका घालायचा ठरला की टोळीत चैतन्य येई. दिवसरात्र न पाहता सारे कामाला लागत. आपापल्या घोड्याला प्रेमाने थोपटत खाऊ घालत. बंदुकीच्या गोळ्या व्यवस्थित भरून ठेवत. आता सरावाने सारे पटापट होत असे. दिलदार दुरून पाहात असे. या सर्वात मेहनत तर खरी. योजना आखणे पण महत्त्वाचे. गावाची निवड करणे, त्यासाठी नीट टेहळणी करून योजना आखणे, सगळ्या धामधुमीत आपली टोळी सुरक्षित ठेवणे, मग लुटालुटीची नीट व्यवस्था लावून देणे.. हे आयुष्य खरेतर खडतर आहे. पण मोहिम फत्ते केली.. गावात एखाद्याला जिवानिशी मारले की टोळीतील सारे कृतकृत्य होत. लहानपणापासून दिलदार हेच पाहात आलेला. संतोकसिंगचा दराराच इतका की सारे झटून कामाला लागत. काम हीच देवपूजा असे संतोकसिंग सगळ्यांना सांगत असे. आणि सारे त्यातून प्रेरणा घेत डाका दरोड्याच्या पंथाचे पाईक बनत. पोलिसांना कधी इतक्या वर्षात येताना पाहिले नव्हते, पण ते असतात हे इतर टोळ्यांवरील पोलिसी कारवाईने ऐकून माहिती होते. तरीही सांभाळून राहणे महत्त्वाचे हे संतोकसिंगचे सगळ्यांना सांगणे होते. तसे सर्व राहात होते. दिलदारला सारे पटत नसले तरी दुसरे काय करावे उमगत नव्हते. कजरी भेटल्यानंतर.. खरेतर दिसल्यानंतर, आयुष्याला काहीतरी उद्देश मिळाल्यासारखे वाटत होते. वयाच्या विशीत हाताला काम नाही पण मनाला तरी काहीतरी चाळा मिळाला. प्रथम चाळा म्हणून सुरू झालेला तो विचार कजरीनाम जपता जपता अखंड मनभर भरून राहिला.

अशात तो रात्री पत्र लिहायला बसला. टोळीमध्ये शांतता होती. आपल्या तंबूतील एका जागी कागद आणि पेन घेऊन दिलदार सरसावून बसला. मास्तरांनी लिहिणे शिकवलेले नीट त्यामुळे अक्षर जरी फार सुंदर नसले तरी कागदावर हवे ते उतरवता येत होते. पण प्रेमपत्र हा मामला काही और असावा ..

पहिल्या कागदावर पेन टेकताच त्याला कळेना .. प्रिय कजरी लिहावे.. प्रिये लिहावे की प्रियतमे.. की राणी.. दिलकी रानी किंवा दिलदारके दिलकी रानी .. की प्राणप्रिये.. मायन्यावर गाडी अडली. पहिल्याच पत्रात जुजबी काही लिहावे की मुद्द्याला हात घालावा? पण जुजबी लिहायचे तर त्यासाठी कारण काय? एखाद्या अनोळखी माणसाकडून पत्र यावे, ते तिने वाचावे आणि त्यावर उत्तर ही द्यावे .. असे काय लिहिता येईल? प्राणप्रिये वगैरे लिहिणे जास्तच आगाऊपणा होईल? मायना सोडून तो मजकुराकडे वळला. नि तिथे अजूनच अडकला. सुरू कसे करावे.. काय लिहिले की तिला राग येणार नाही? परत तोच प्रश्न .. मुद्द्याला हात घालावा? धीर एकवटून त्याने चार ओळी लिहिल्या..

'प्राणप्रिये, तुला पाहिल्यापासून मी दिवाणा झालो आहे. रात्रंदिवस झुरतो आहे. अन्नपाणी गोड लागत नाही. माझ्या दिलाची राणी तू बनली आहेसच, पण तू त्यास संमती देशील? म्हणजे मी राजा होईन का? लवकरात लवकर हो असे उत्तर देशील ना?'

खाली काय लिहावे? तुझा की तुझाच? राजा की अजून काही? इतके लिहिलेच आहे तर हे ही होऊन जाऊदे.. म्हणत लिहिले त्याने..

'तुझा आणि तुझाच ..'

शेवटी नाव लिहिताना मात्र त्याचा हात थरथरला.. स्वतःचे नाव न घालता पत्र पूर्ण करून तो झोपायला गेला.. स्वप्न त्याची वाटच पाहात होते जणू..

सायकलीवर टांग मारून नि डाकियासारख्या वेशात वेडात निघालेला दिलदार गावातील मंदिराजवळ पोहोचला. सायकलीची घंटा ट्रिंग ट्रिंग वाजली.. हवेचा एक जोरदार झोका आला.. पाऊस पडू लागला.. मंदिराच्या आतून धावत धावत कजरी बाहेर आली. जणू त्या डाकियाचीच वाट पाहात असावी. ते पत्र हाती घेऊन ती धावत धावत आत निघून गेली. पोस्टमन दिलदार फक्त बघत राहिला.. जणू त्याचा रोल तितकाच मर्यादित असावा.. पण आतुरतेने पत्र वाचणारी कजरी.. अर्धी लढाई त्याने जिंकली.. कजरी आतून परत आली.. आणि काही बोलणार तोच समशेर दिलदारला झोपेतून उठवत होता ..

"यार.. आता ती काही बोलणार होती.. नि माझी झोप मोडलीस .."

"दिलदारा, उघडून डोळ्यांच्या दारा.. उठ. तुला जायचं आहे.. तुझ्या मोहिमेवर .."

"तरीपण .. पहाटेचे स्वप्न मोडलेस .."

"पहाट? सूर्य डोक्यावर येण्याची वेळ झाली. कजरीभाभी नंतर भेटायची नाही .."

स्वप्नात अडथळा आणल्याने दिलदार समशेरवर चिडला खरा, पण गावात जायचे तर उठणे भाग होते. ते प्रेमपत्र त्याने हाती घेतले.. निरखून पाहिले .. एकदा वाचले.. आणि एकाएकी हिंमत नाहीशी झाल्यासारखा तो मटकन खाली बसला.. हे पत्र कोणाच्या हाती लागले तर? तिच्या बापाने पाहिले तर तिथेच आपल्या प्रेमाचा शेवट.. तर लिहावे ते काय? मास्तरांनी अक्षरे शिकवली.. भाषा शिकवली.. पण हे प्रत्यक्ष उपयोगी पडेलसे काहीच नाही शिकवले? पहिले वहिले प्रेमपत्र सांभाळून त्याने ठेऊन दिले.. दुसरा कागद घेतला.. त्यावर मोजून चार शब्द लिहिले फक्त.. सायकलीवर टांग मारून डाकूचा डाकिया बनत कजरीच्या गावाकडे दिलदार निघाला. प्रेमाच्या गावा जाण्याचा हा पहिला दिवस. सायकलीवर टांग आणि मनात त्याच देवीची प्रार्थना करत तो निघाला ..

दरोडेखोरांच्या त्या टोळीतील सात पिढ्यांत झाले नसेल ते होऊ घातले होते. बंदूक सोडून हाती पेन तर आलेच होते. ते यावे म्हणून गावातून एका मास्तराला पळवून आणून त्याच्याकडून शिकवणी लावली होती.. आणि दिलदार तर म्हणे त्या मास्तरांच्या पाया पडलेला, गुरूजी,गुरूजी म्हणत. आता तर तो घोडा सोडून सायकलीवर बसून जातोय.. तिकडे गावातल्या कुण्या एका पोरीपायी वेडा झाला म्हणे.. डाकूंच्या इभ्रतीला हे शोभत नाही .. उचलून आणायची तिला.. दाखव की हिंमत. पण सरदारांचा पोर. एकुलता एक. सरदार संतोकसिंगापुढे बोलायची कुणाची टाप नाही. सगळे टोळीतील निमूटपणे बघत होते आणि आपसात कुजबुजत होते.

दिलदार आपली सायकल दामटत गावाकडे निघाला होता. हातात त्याने पाच सहा खोटी पत्रे ठेवलेली.. डाकिया म्हणून वेशांतरासाठी आवश्यक म्हणून. जाता जाता कजरीची प्रतिक्रिया काय असेल व असावी याचा विचार करत होता.. आज हिंमत करून हे चार शब्दांचे पत्र तिच्या हाती दिले की त्याच्या प्रेमकथेचा भाग दुसरा सुरू होणार होता. पहिला भाग तसा मजेदार होता.. त्याची दिवसागणिक मनात उजळणी करत दिलदार गावात पोहोचला.

छोट्या गावात नवीन पोस्टमन आल्याचे पाहून सगळ्या नजरा त्याच्याकडे वळल्या. ह्याचा विचार त्याने आधी केला नव्हता. त्या गावातील नेहमीच्या पोस्टमनशी गाठ पडली तर? ह्या विचाराने त्याला धडधडू लागले. तशात समोर देवळाबाहेर कजरी दिसली आणि त्याच्या वाढणाऱ्या धडधडीला अजून एक कारण मिळाले. सायकलीवरून उतरत चालत चालत तो कजरीमागे गेला.. आणि तिच्या नावाची आयुष्यातली पहिलीच हाक तिला मारली,

"कजरीदेवी मौर्या .. पत्र आहे तुमचे."

कजरीने चमकून मागे पाहिले. आपल्या दिलाच्या वाढत्या धडधडीचा आवाज तिला ऐकू जाईल की काय.. दिलदारला भीती वाटली नि मध्येच एखादा ठोकाही चुकला.. तिचा आवाज कानी पडला..

"कोठून आलंय? आणि माझ्यासाठी?"

"होय. तुमचेच पत्र. हे घ्या."

दिलदारने लिफाफा हाती दिला.

"तुम्ही गावातले नेहमीचे पोस्टमन वाटत नाहीत..?"

कजरीच्या प्रश्नाने दिलदार क्षणभर गोंधळला, पण क्षणात सावरत म्हणाला,

"नाहीच. मी त्या दुसऱ्या गावात असतो. खास एवढे एक पत्र द्यायला आलोय.."

आपल्या त्वरित जबाबाने दिलदार स्वतःवरच खूश झाला. आपण या गावातील नाही म्हटल्यावर आपण त्या गावचे नाही हे दाखवणे सोपे होते!

कजरीने लिफाफा पाहिला ..

"पण यावर पत्ता नाही?"

"नाहीच. खास पत्र आहे. खास द्यायला आलोय."

"कोणी दिलंय?"

"ते नंतर सांगेन.. उत्तर घ्यायला कधी येऊ?"

"पत्रात काय आहे?"

"अहो मी फक्त पत्र वाटतो. वाचत नाही .."

"ते ही खरंच.. पण मला पोस्टाने उत्तर पाठवायचे असेल तर? पत्ता द्या.."

"नको.. नको. मी स्वतः नेऊन देईन.."

"पण त्यासाठी तुम्हाला खास इकडे यावे लागेल.."

"येईन की.. पत्रे वाटणे हे कामच माझे की.."

"अशी सर्वांची पत्रे वाटता तुम्ही? बिना पत्त्याची?"

"नाही हो.. खास फक्त हेच पत्र.."

"पण कोणत्या गावात असता तुम्ही?"

"हरिनामपूर."

ऐनवेळी दिलदारला मास्तरांच्याच गावाचे नाव आठवले..

"अहो.. इतक्या दूरवरून.."

"पोस्टमनला कसले आलेय दूर आणि जवळ .. आपले कर्तव्य करणे.."

"पण हे पत्र पोस्टाने नाही आलेय.."

"सांगितले ना.. खास पत्र, खास तुमच्यासाठी, म्हणून खास आलोय द्यायला .."

कजरीशी असेच बोलत रहावे असे वाटत होते, पण तितक्यात कुठूनतरी आवाज आला,

"कजरी, कोण आहे गं?"

"कोणी नाही मावशी .."

कजरीने पत्र हळूच लपवले आणि ती मागे वळली..

"उद्या येतो .. यावेळी .."

घाईघाईत दिलदार म्हणाला नि सायकलीवर टांग मारून परत निघाला .. मागे वळून पाहात कजरी मनाशी म्हणाली, 'हरीनामपूर? ते तर उलट्या बाजूला राहिले? आणि हा पोस्टमन चाललाय ह्या बाजूला?'

जाता जाता दिलदार कजरीच्या चेहऱ्यावरचे अवखळ भाव आठवत होता, तिचा मंजुळ आवाज कानात साठवलेला परत परत ऐकत होता.. एकाएकी त्याच्या ध्यानात आले, कजरीच्या मावशीने हाक मारली तसे तिने ते पत्र का लपवले? न वाचताच त्यातील मजकुराचा अंदाज तिला आला असावा? की मुली अशा जात्याच हुशार असतात? त्या पत्राच्या निमित्ताने पहिली भेट नि पहिली ओळख तर झाली. दिलदार स्वतःवर खूश झाला. आजवरच्या एकूण योजनेला फळ आलेले. हरिनाथ गुरूजींची मेहनत कामी आली होती. इथवर झालेय.. पुढेही काहीतरी चांगलेच होईल.. विचार करत त्याची सायकल पुढे निघाली. समोर लक्ष गेले तर त्या दिवशी ज्याच्यावर तो धडकलेला तोच पोस्टमन .. त्याचा स्फूर्तीदाता.. पुढ्यात पत्रांची बॅग लटकावून चालला होता. त्याने बघू नये म्हणून सायकलीचा वेग वाढवत दिलदार झरकन पुढे निघाला ..