Victims - 19 in Marathi Fiction Stories by Amita a. Salvi books and stories PDF | बळी - १९

Featured Books
  • स्वयंवधू - 31

    विनाशकारी जन्मदिन भाग 4दाहिने हाथ ज़ंजीर ने वो काली तरल महाश...

  • प्रेम और युद्ध - 5

    अध्याय 5: आर्या और अर्जुन की यात्रा में एक नए मोड़ की शुरुआत...

  • Krick और Nakchadi - 2

    " कहानी मे अब क्रिक और नकचडी की दोस्ती प्रेम मे बदल गई थी। क...

  • Devil I Hate You - 21

    जिसे सून मिहींर,,,,,,,,रूही को ऊपर से नीचे देखते हुए,,,,,अपन...

  • शोहरत का घमंड - 102

    अपनी मॉम की बाते सुन कर आर्यन को बहुत ही गुस्सा आता है और वो...

Categories
Share

बळी - १९

बळी -१९
रंजनाने आपल्या घराविषयी कोणतीही माहिती त्या गुंडांना दिली नाही; हे ठासून सांगताना केदार इन्सपेक्टर साहेबांवर चिडला होता. रंजनाविषयी त्याच्या मनात खूपच विश्वास होता! तिला कोणी काही बोललेलं त्याला सहन होत नव्हतं.
केदार हट्टी स्वरात पुढे बोलू लागला,
"रंजना जरी फार शिकलेली नसली तरीही खुप स्मार्ट आहे! तिने अनोळखी व्यक्तीला अशी माहिती कधीच दिली नसती! त्यांच्या गप्पा त्यांच्या गावपर्यंत मर्यादित होत्या! त्याच्याशी बोलताना ती तिच्या माहेरच्या आठवणींमध्ये रंगून गेली होती; आणि आपल्या माणसांपासून दूर आलेल्या व्यक्तीच्या बाबतीत हे साहजिक आहे; नाही का?"
केदारच्या बोलण्यात रंजनाविषयी त्याला वाटणारा अभिमान आणि आपलेपणा ओतप्रोत भरलेला होता.
"पुढे काय झालं?" त्याला नाराज झालेला बघून विषय बदलण्यासाठी इन्स्पेक्टर साहेबांनी विचारलं.
" त्या दोघांनी--- त्यातील ड्रायव्हरचं नाव राजेश आणि त्याच्या मित्राचं नाव दिनेश होतं; हे मला त्यांच्या बोलण्यातून कळलं --- एका निर्जन स्थानी मला क्लोरोफॉर्म देऊन बेशुद्ध करण्याचा प्रयत्न केला! पण मी श्वास रोखून धरला; आणि बेशुद्ध झाल्याचं नाटक केलं! ते मला गोराईला घेऊन गेले, तोपर्यंत रात्र झाली होती. तिथे त्यांचा मित्र तिथल्या गुंडांना घेऊन आला होता! मला त्यांच्या एका मित्राच्या बोटीवर चढवून भर समुद्रात नेऊन समुद्रात फेकून दिलं. मी स्विमिंग एक्स्पर्ट असल्यामुळे पोहत वरळी सी- फेस पर्यंत आलो; वरळी सी-लिंक दिसला, आणि मी मुंबईतच आहे हे बघून मी खुश झालो-- देवाचे आभार मानले! पण तोपर्यंत माझ्या हाता-पायांमधली शक्ती संपत आली होती! माझं नशीब बलवत्तर होतं--तिथे किना-यावरील एका बोटीवर मला दोन माणसं मला दिसली; मी त्यांना हातवारे करून मी बुडत असल्याची जाणीव करून दिली! त्यानंतर काय झालं; मला आठवत नाही! असं वाटतंय की मी आजच झोपेतून जागा झालोय! मध्ये जे काही घडलं-- डाॅक्टर पटेल-- प्रमिलाबेन -- हाॅस्पिटल--- ते सगळं आठवतंय; पण स्वप्नवत् वाटतंय!" केदारने सगळ्या गोष्टी अगदी थोडक्यात सांगितल्या. तो पुढे बोलू लागला,
"इन्स्पेक्टरसाहेब! मी तुमचा आभारी आहे! तुमच्या प्रश्नांमुळे माझ्या डोक्यातील गोंधळ खूपच कमी झालाय! मात्र इथे असलेली ही देव- माणसं --- डाॅक्टर पटेल आणि प्रमिला मॅडम --ज्यांनी मी पूर्णपणे परावलंबी असताना, माझ्या कठीण काळात मला प्रेम दिलं-- माया दिली -- आसरा दिला-- तेच काही गोष्टी माझ्यापेक्षा जास्त सांगू शकतील!"
"यानंतर काय घडलं; याची कल्पना मला अाहे कारण डाॅक्टर तुझा ठाव-ठिकाणा शोधण्यासाठी सतत मला येऊन भेटत होते; पण केदार!-- माझा तुला एक सल्ला आहे; तू इतक्यात तुझ्या माणसांना भेटण्याची घाई करू नकोस! आम्हाला अजून थोडा तपास करायचा आहे!" इन्स्पेक्टर म्हणाले.
"कसला तपास? मला माझ्या माणसांना भेटायला काय अडचण अाहे? पाहिजे तर तुम्ही माझ्याबरोबर या! मी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी ख-या आहेत; हे तुम्हाला पटेल! मी घरातून निघून इतके दिवस झाले; माझी आई कशा अवस्थेत असेल, कल्पनाही करवत नाही! मला तिला लवकरात लवकर भेटायचं आहे! " केदारने चमकून विचारलं.
"आम्ही पोलीस जरा संभ्रमात आहोत! तूच विचार कर--- तू जखमी अवस्थेत सापडलास; त्याला सहा महिने झाले! तुझी ओळख पटावी म्हणून आम्ही मिसिंग कंप्लेंट कुठून आली आहे का; याचा कसून शोध घेतला होता. तुझा फोटो प्रत्येक पोलीस स्टेशनला पाठवला होता. पण काहीही निष्पन्न झालं नाही! तू मुंबईत रहाणारा आहेस; घरात आई - पत्नी आणि भावंडं आहेत------- तर मग तुझा शोध घेण्याचा प्रयत्न त्यांनी का केला नाही? माणूस जेव्हा अचानक् बेपत्ता होतो; तेव्हा माणसं हवालदिल होतात--- सतत पोलीस स्टेशनला येऊन त्याला शोधून काढण्यासाठी पोलीसांच्या मिनतवा-या करतात! तो माणूस सुखरूप असेल की नाही याची त्यांना एवढी चिंता असते; की आम्ही कितीही समजावलं- रागावलो तरीही पोलीस स्टेशनला सतत खेपा घालतात; पण तुझ्या माणसांनी सहा महिन्यात साधी मिसिंग कम्पेंटही केली नाही---- हे काय गौडबंगाल आहे; याची चौकशी मला प्रथम करावी लागेल. हे प्रकरण तुला वाटतं; तेवढं साधं सोपं नाही. केदार! मी सांगेपर्यंत तू आईला फोन करू नकोस!
इन्स्पेक्टर साहेबांचं होणं ऐकून केदारचा चेहरा उतरला होता.
"माझ्या आईवर जराही संशय घेऊ नका! ती असं काही करणं शक्य नाही! तिचं माझ्यावर खूप प्रेम अाहे!" तो इन्सपेक्टरना समजावू लागला.
"प्रथम आम्हाला सगळी परिस्थिती समजावून घ्यावी लागेल! सध्या तुझे छुपे शत्रू तू समुद्रात बुडालास; या आनंदात आहेत!तू जिवंत आहेस; हे तुझ्या आईकडून कळलं, तर तुझ्या जिवावर उठलेले लोक सावध होतील, आणि आम्हाला गुन्ह्याचा छडा लावणं कठीण होऊन बसेल!
इन्सपेक्टरचं म्हणणं केदारलाही पटलं. त्याने मान हलवून संमती दर्शवली. तिथून निघताना इ. दिवाकर म्हणाले,
"मी सगळी चौकशी करून एक-दोन दिवसांत तुला भेटायला येतो! त्यानंतर तू तुझ्या घरी जाऊ शकशील! काळजी करू नकोस! सगळं ठीक होईल!!"
आता दिवाणखान्यात केदार, डाॅ. पटेल आणि प्रमिलाबेन तिघेचौघे होते.
केदारने प्रमिलाबेनना विचारलं,
"मी आईला भेटणार नाही; पण तिची तब्येत ठीक आहे नं? तुम्ही काल रात्री तिला फोन केला होता ---- ती बोलली तुमच्याशी?"
"होय! ती ठीक आहे! तीच बोलली माझ्याशी!" प्रमिलाबेन त्याच्या खांद्यावर हात ठेऊन त्याला शांत करत म्हणाल्या.
त्यांच्या डोळ्यात पाणी होतं. केदार आता लवकरच आपल्यापासून दुरावणार, या विचाराने त्या नाराज झाल्या होत्या. परत त्या बंगल्यात दोघंच रहाणार होती. त्यांची दोन्ही मुलं मोठा मुलगा संकेत आणि मुलगी सुजाता --- दोघंही परदेशात शिक्षण घेऊन तिथेच स्थाईक झाली होती. केदारला पाहून त्यांना संकेतची आठवण आली होती, आणि त्यांनी गेले सहा महिने त्याची मनापासून काळजी घेतली होती. त्यांनी केदारकडे पाहिलं आणि म्हणाल्या,
"केदार! तुझ्यासाठी आज आनंदाचा दिवस आहे;; तुला तुझं अस्तित्व परत मिळालं आहे! तुझ्या डोळ्यात पाणी का? गेल्या सहा महिन्यात आमच्याकडून काही चूक झालीय का? तसं काही घडलं असेल, तर विसरून जा! एकच लक्षात ठेव, की मला तू माझ्या संकेतसारखा आहेस! अधून- मधून आम्हाला भेटायला येत जा! आम्हाला विसरू नकोस! तुझ्या रुपाने आम्हाला दुसरा मुलगा मिळालाय! तुला आता तुझी हक्काची माणसं भेटतील; पण आम्हा दोघांनाही प्रत्येक क्षणी तुझी आठवण येईल! गेले सहा महिने तू आमच्या कुटुंबाचा एक भाग झाला होतास!" त्या म्हणाल्या.
"तुम्ही दोघं मला देवासारखी भेटला नसतात तर त्या अवस्थेत माझं काय झलं असतं; मी कल्पनाही करू शकत नाही! तुमच्यामुळेच मी इथपर्यंत आलो आहे! तुम्ही मी आजारी असताना माझी काळजी घेतली-- योग्य उपचार केले; म्हणून मला हा पुनर्जन्म मिळाला आहे! तुम्ही दोघंही मला आईवडिलांच्या जागी आहात! मी तुम्हाला कसा विसरेन? मला माझ्या आईची खूप आठवण येतेय-- तिला कधी एकदा भेटतोय , असं मला झालंय; हे खरं आहे ---- पण आता मनात शंकेची पाल चुकचुकायला लागलीय! मला सगळ्यांची एवढी काळजी वाटतेय; पण त्यांना माझी किती काळजी आहे, हे मला कळत नाही ? इन्सपेक्टर साहेबांप्रमाणे मलाही प्रश्न पडलाय ; पोलीस कंप्लेंट का झाली नसेल? माझ्यावर एवढं प्रेम करणारी, मला तासभर उशीर झाला, तर कावरी- बावरी होणारी माझी आई मला शोधायचा प्रयत्न न करता; इतके दिवस स्वस्थ का राहिली असेल? माझ्या पत्नीचे-- रंजनाचे वडील मोठे कारखानदार आहेत! सरकार- दरबारी त्यांच्या मोठ्या ओळखी आहेत! त्यानी तर आकाश- पाताळ एक करायला हवं होतं! असं का वागले असतील सगळे जण? की त्यांच्या लेखी माझ्या अस्तित्वाला काही किंमत नाही?" केदारच्या डोळ्यांत पाणी होतं.
"असा विचार करू नकोस केदार! आपला गेल्या काही दिवसांचा सहवास आहे; तरीही माझा जीव तुझ्यात एवढा गुंतला आहे; तर तुझ्या सख्या आईची काय अवस्था असेल? तिच्या अशा वागण्याला काहीतरी कारण असेल!" प्रमिलाबेन म्हणाल्या.
डाॅक्टर पटेलही केदारला धीर देऊ लागले,
"आपल्याला सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील, असं का झालं; याचा शोध पोलीस घेतीलाच! इन्स्पेक्टर साहेब उद्याच तुझ्या आईला भेटणार आहेत! तिच्याकडून त्यांना नक्की काय झालंय; हे कळेल! या सगळ्या प्रकरणातील सत्य बाहेर यायला आता फार काळ जाणार नाही! पण तू आता शांत रहा! जास्त विचार करू नकोस! काही दिवस धीर धर!" ते म्हणाले.
केदारने होकारार्थी मान हलवली. तो मनाशी म्हणत होता,
"नाही तरी माझ्याकडे दुसरा काय पर्याय आहे? माझं डोकं तर चक्रावून गेलं आहे! सगळ्यांच्या सल्ल्याने चालणं योग्य होईल!"
******** contd.-- part २०