वेळ
दुपारचे बारा वाजत आले होते. तरी हर्षद झोपलेलाच होता. त्याची आई त्याला चार-पाच वेळा उठवून गेली होती. पण तो नुसता उठतो म्हणून परत झोपला होता. त्याची आई त्याला परत उठवायला आली. आणि यावेळी त्याला तिने झोपेतून उठवलेच.हर्षदने डोळे चोळत उठून बाहेर पाहिले.प्रखर सुर्यकिरणांनी त्याचे डोळे क्षणभर दिपले. उशाशी ठेवलेला मोबाईल हातात घेवून वेळ पाहून तो आईला म्हणाला,
"आई! लवकर का उठवले नाही मला?"
"किती वेळ झालं मी तुला उठवते. तुच उठत नाहीस. रात्री बसतो मोबाईल बघत. बघ तुझे डोळे कसे लाल झालेत." त्याची आई म्हणाली.
हर्षदच्या स्वत:ची चूक लक्षात आली. खरंच रात्री तो पहाटेच्या पावणे चार वाजेपर्यंत ऑनलाईन होता. त्याने आवरायला सुरुवात केली. आवरण्यास त्याला दुपारचे दोन वाजले. लगेच त्याला त्याच्या मित्राचा फोन आला. तो जेवण न करता थोडे ब्रेड खावून बाहेर गेला.रात्री जागरण केल्याने दिवसभर तो आळसल्यासारखा दिसत होता.
रात्रीचे अकरा वाजत आले होते तरी दुपारी गेलेला हर्षद अद्याप घरी आलेला नव्हता.
हर्षदचे बाबा ऑफीसवरून नऊ वाजता आले होते.जेवण करून ते थोडावेळ बातम्या पाहत बसले होते.
हर्षदची आई त्यांना म्हणाली,
"एक बोलू का?"
"हो बोल ना. काय झालं?"
"मला हर्षदचं गेल्या काही दिवसातील वागणं बरं दिसत नाही."
"अगं! तरुण आहे तो. मित्र परिवारात रहावे लागते."
"हो. तुमचं म्हणणं खरं आहे पण त्याला काही मर्यादा असतात.रोज रात्री तो उशीरापर्यंत मोबाईलवर ऑनलाईन असतो. दिवसा उशीरा उठतो. आणि उठला की लगेच बाहेर जातो. परत रात्री उशीरा येतो. त्याला काही भविष्य आहे की नाही?"
हर्षदच्या आईच्या बोलण्यावर त्याचे बाबा गंभीर होत म्हणाले,
"काय सांगतेस? मी ऑफीसला गेल्यामुळे मला माहित होत नाही, हा किती वाजता उठतो ते? तु पण काही सांगीतले नाहीस."
"मला वाटले सुधारेल तो.पण वरचेवर तो बिघडतच चालला आहे."
"त्याच्याकडे आता लक्ष देण्याची गरज आहे. ज्यावेळी तरुण मुलं चुकतात, त्यावेळी पालकांनी त्यांच्याकडे लक्ष द्यायलाच हवे." हर्षदचे बाबा काळजीच्या सुरात म्हणाले.
त्यांनी हर्षदला फोन केला. पण हर्षदने फोन उचलला नाही.दोन-तीन वेळा फोन केल्यानंतर त्याने फोन उचलला.
"हॅलो !"
"कुठं आहेस तु?"
"मी बाहेर जेवायला आलो आहे हॉटेलला."
"बरं. लवकर ये जेवण आटोपून."
'हो' म्हणून त्याने फोन ठेवून दिला.
आज जेवणासोबत हर्षदने बियर पण घेतली होती.
साडे बारा वाजता हर्षद घराजवळ आला. त्याला सोडायला आलेल्या मित्राला त्याने विचारले,
"बियरचा वास येतो का?"
तो मित्र पण प्याल्यालाच होता.आता तो काय सांगणार? तरीही तो म्हणाला,
"जरा लांबून बोल.मग नाही येणार वास."
त्याचा मित्र त्याला सोडून निघून गेला. हर्षद दरवाजाजवळ आला. त्याने स्वताच्या हातावर एकदा फुंकर मारली. आणि वास येतो का पाहिले. व नंतर दरवाज्याची बेल वाजवली.
त्याचे बाबा जागेच होते. त्यांनी दरवाजा उघडला. त्यांना पाहताच हर्षद थोडा दूर झाला.
त्यांनी त्याच्याकडे नुसते पाहिले. तो काही न बोलता खाली मान घालून स्वत:च्या रुममध्ये गेला.
आज रविवार असल्याने हर्षदचे बाबा घरीच होते. हर्षद दुपारी एक वाजता झोपेतून उठला. त्याला आवरायला दोन वाजले. त्याने गडबडीमध्ये जेवण केले आणि लगेच तो बाहेर गेला.आज पण त्याला रात्री घरी यायला एक वाजला. नंतर तो पहाटे सव्वाचार वाजेपर्यंत ऑनलाईन होता.
दुसऱ्या दिवशी तो उशीरा उठला आणि आवरून लगेच बाहेर निघाला. त्यावेळी त्याच्या बाबांनी त्याला विचारले,
"हर्षद कुठे चाललास?"
"बाहेर चाललोय मित्रांकडे.तुम्ही आज ऑफीसला नाही गेलात? त्याने उलट प्रश्न केला.
"नाही बेटा.ऑफीसच्या कामात मला एक मुलगा आहे हे मी विसरलोच होतो."
"काय झालं बाबा?" त्याने विचारले.
"मी पाहतोय. तु भविष्याचा थोडा ही विचार न करता, काही काम न करता, अभ्यास न करता दिवस वाया घालत आहेस."
"त्यात काय बाबा एवढे.हीच एन्जॉय करण्याची वेळ आहे.नंतर आयुष्य पडलं आहे काम करायला."
"तुझं खरं आहे. एन्जॉय करण्याची हीच वेळ आहे. पण तुम्ही जो एन्जॉय करत आहात तो खूप चुकीचा आहे. आम्ही पण तुमच्या वयामध्ये एन्जॉय केला. पण असं रात्र-रात्र जागून चेहऱ्यावरील तेज व अंगावरील मास कमी नाही होऊ दिलं. एन्जॉय करताना भविष्याकडे दुर्लक्ष नाही केलं."
"बाबा तुमचा काळ वेगळा होता.आमचा काळ वेगळा आहे."
"बरोबर आहे तुझं. आमचा काळ खराच वेगळा होता. त्यावेळी गावात एखाद्याकडेच टी.व्ही. असायचा.आम्हाला एखादी मालिका किंवा मॅच पहायची असेल तरी दुसऱ्याच्या दारात जावे लागायचे. पण तो आनंद वेगळाच होता. त्यावेळी कार्यक्रमाची वेळ ठरलेली असायची. त्यामुळे त्या वेळेची प्रतिक्षा करण्यात वेगळीच मजा असायची. तुमच्यासारखं मोबाईलमध्ये सहजासहजी काहीच पाहता येत नव्हतं.आम्ही रात्री लवकर झोपायचो, सकाळी लवकर उठायचो, व्यायाम करायचो, जेवण केल्याशिवाय घराच्या बाहेर पडत नव्हतो, एकत्र जमायचो, गप्पा मारायचो, मैदानी खेळ खेळायचो, सगळयांच्या सुख-दु:खात सामील व्हायचो, मोठयांचा आदर करायचो, कधीतरी हौसेने सिनेमाला जायचो,आम्हाला कोणतीच गोष्ट सहजासहजी मिळायची नाही. त्यामुळेच आम्हाला ती मिळालेली गोष्ट खूप मौल्यवान वाटायची. त्याकाळी कोणाचा फोन आला तर खूप नवल वाटायचं. आमच्याही शेतात पाटर्या व्हायच्या पण त्याला मर्यादा असायच्या.आम्ही वडीलधाऱ्या माणसांना खूप भ्यायचो त्यांचा मान राखायचो आणि महत्त्वाचं म्हणजे आम्ही वेळेचा सद्उपयोग करायचो."
"बाबा! तुमचे खरे आहे. पण माणसाने काळानुसार बदललं पाहिजे."
"काळ बदलला तरी त्यावेळी आणि आताही दिवस व रात्र सारखीच आहे. देवानं दिवस कामासाठी दिला आहे. आणि रात्र ही आरामासाठी दिली आहे. पण आजची मुलं रात्री उशीरा झोपतात व दिवसा उशीरा उठतात, त्याचा परिणाम आरोग्यावर होतो. त्यामुळे काही जणांना कमी वयात बरेचशे आजार उद्भवतात.कोणतीही गोष्ट प्रमाणापेक्षा जास्त केल्यास ती घातक असते. मग तो मोबाईलचा वापर असो, अथवा जागरण असो अथवा अन्य काही असो."
"ठीक आहे बाबा. मी प्रयत्न करतो. आजपासून."
"आता कसा बोललास? मला तुझी काळजी आहे म्हणूनच तुला सांगीतले. मी म्हणत नाही मोबाईल वापरू नकोस. वर्तमानात माणसाची ती एक गरजच आहे.त्यामधून सकारात्मक घेण्याचा प्रयत्न कर.मोबाईलच्या माध्यमातूनही खूप काही चांगल्या गोष्टी शिकता येतात. पण मोबाईलचा अतिवापर टाळ."
हर्षदलाही आता त्याच्या वडीलांचे म्हणणे पटु लागले होते. तो त्यांचे म्हणणे लक्षपुर्वक ऐकत होता.
"बेटा तुला माहित आहे का या जगात सगळयात मौल्यवान गोष्ट कोणती आहे?"
त्यांनी त्याला विचारले.
हर्षदने बराच वेळ विचार केला पण त्याला उत्तर देता आले नाही. तो म्हणाला, "तुम्हीच सांगा बाबा."
"या जगात सगळयात मौल्यवान गोष्ट ही वेळ आहे. एकदा गेलेली वेळ कितीही संपत्ती पणाला लावली तरी परत येत नाही. आपण एखाद्याला आपला वेळ देतो. त्यावेळी त्याला आपण आपल्या आयुष्यातील कधीही परत न येणारी गोष्ट देत असतो. त्यामुळे वेळेचा सद्उपयोग कर. आता जर तु वेळेचा सद्उपयोग केलास तर भविष्यात यशस्वी होशील.नाहीतर गेलेल्या वेळेविषयी पश्चाताप करण्याशिवाय तुझ्या हातात काही नसेल. त्यामुळे मोबाईलमध्ये व फालतु कामामध्ये वेळ वाया घालु नकोस."
आता हर्षदला त्याच्या बाबाचे म्हणणे पूर्णपणे पटले होते. तो लवकर येण्याच्या अटीवर वडीलांची परवानगी घेवून घराच्या बाहेर पडला.
हर्षदची आई त्याच्या बाबांना म्हणाली,
"बरं झालं तुम्ही त्याला समजावून सांगीतले.माझं तो ऐकला नसता."
त्यावर ते हसत म्हणाले, "मुलं वयात आल्यावर आई-वडीलांनी त्यांच्याकडे लक्ष द्यायला हवे. कारण हे वयच अल्लड असते. इथेच मुलांच्या दिशा चुकतात. आणि ते आयुष्यात भरकटत जातात. हाच आयुष्याचा टर्निंग पॉईंट असतो. इथे मुलं चुकली तर त्यांचे भविष्य बरबाद होते. आजकालच्या मुलांना पाश्चात्य संस्कृती आवडु लागली आहे. इतर देशांतील संस्कृतीमधून जे चांगले आहे ते जरुर घ्यावे पण आपली संस्कृती माणसाने विसरु नये. आजची मुले प्रमाणापेक्षा जास्त मोबाईलच्या आहारी जात आहेत. त्यामुळे पालकांनी मुलांकडे वेळीच लक्ष द्यायला हवे. नाहीतर जशी गेलेली वेळ परत आणता येत नाही तशीच वाया गेलेली मुलं परत वळणावर आणता येत नाहीत."
त्यादिवशी पासून हर्षदच्या वागण्यात बदल झाला. वेळेचे भान ठेवून तो वागु लागला. कारण त्याला कळले होते. जो वेळेचे योग्य नियोजन करतो. तोच आयुष्यात यशस्वी होतो.
-संदिपकुमार