Pravas in Marathi Travel stories by संदिप खुरुद books and stories PDF | प्रवास

Featured Books
  • నిరుపమ - 10

    నిరుపమ (కొన్నిరహస్యాలు ఎప్పటికీ రహస్యాలుగానే ఉండిపోతే మంచిది...

  • మనసిచ్చి చూడు - 9

                         మనసిచ్చి చూడు - 09 సమీరా ఉలిక్కిపడి చూస...

  • అరె ఏమైందీ? - 23

    అరె ఏమైందీ? హాట్ హాట్ రొమాంటిక్ థ్రిల్లర్ కొట్ర శివ రామ కృష్...

  • నిరుపమ - 9

    నిరుపమ (కొన్నిరహస్యాలు ఎప్పటికీ రహస్యాలుగానే ఉండిపోతే మంచిది...

  • మనసిచ్చి చూడు - 8

                     మనసిచ్చి చూడు - 08మీరు టెన్షన్ పడాల్సిన అవస...

Categories
Share

प्रवास

प्रवास

बिपीन बऱ्याच वेळापासून पुण्याला जाण्यासाठी बीडच्या बसस्थानकामध्ये उभा होता. उद्या त्याचा पुण्याला स्पर्धा परीक्षेचा पेपर होता. त्याला आजच इंजिनिअरिंगला जावून सात वर्ष झाली तरी अजून इंजिनिअरिंगच करत असलेल्या आपल्या बारावीच्या मित्राच्या म्हणजेच सचिनच्या रुमवर मुक्कामासाठी जायचं होतं. पेपर उद्या असला तरी बिपीनचा काहीच अभ्यास झालेला नव्हता. मुद्दाम फिरण्यासाठीच त्याने पुण्याला फॉर्म भरला होता. तरीही बिपीनने बस स्थानकामधून सहजच प्रवासात वाचण्यासाठी चालु घडामोडीचं पुस्तक विकत घेतलं होतं. आज बसस्थानकामध्ये खुपच हिरवळ होती. गाडी येईपर्यंत तो त्या हिरवळतील सुंदर फुलांकडे पाहु लागला.एखाद्या मुलीनं प्रतिसाद दिला की, त्याच्या मनात असंख्य प्रेमलहरी उठत होत्या.

थोडयाच वेळात पुणे गाडी आली. लोकांनी एकच गर्दी केली. पिशव्या, रुमाल, टोपी, बॅग, पेपर जे हातात असेल ते खिडकीतून सिटवर टाकून लोक जागा पकडत होते. बिपीन दरवाज्याजवळ जाईपर्यंत तर गाडी फुल झाली. तरीही तशा गर्दीमध्ये तो वर चढला, पण त्याला जागा मिळाली नाही. सहा-सात तासांचा प्रवास करायचा होता, उभा राहून इतका वेळ प्रवास करणे शक्यच नव्हते. म्हणून तो खाली उतरून दुसऱ्या गाडीची वाट पाहू लागला. थोडा वेळ असाच गाडीची वाट पाहण्यात गेला. तितक्यात एक गाडी आली. लोकांनी पुर्वीसारखीच गर्दी केली. यावेळेला मात्र बिपीननेही खिडकीत बॅग टाकून जागा पकडली. तो आत चढण्यासाठी गाडीच्या पुढे आला, तेव्हा त्याच्या लक्षात आलं. गाडी पुण्याला चालली नाही तर गाडी पुण्याहून बीडला येवून पुढे गेवराईला चालली आहे. त्यानं गडबडीत नीट पाहिलच नव्हतं. त्याने परत खिडकीत टाकलेली बॅग काढून घेतली. तेवढयात दुसरी गाडी आली. त्यानं यावेळेला बोर्ड व्यवस्थीत पाहिला. गाडी पुण्यालाच चालली होती. त्याने मोठया शिताफीने खिडकीतून बॅग टाकून जागा पकडली, आणी तो खिडकीच्या कडेला बॅग ठेवून स्वत: अलीकडे सरकुन बसला. एखादी सुंदर मुलगी आल्यावर तिला जागा देता येईल, असा विचार त्याच्या मनामध्ये आला. एका पांढऱ्या टोपीवाल्या माणसाने त्याला विचारले, “पिंटया,जागा हाई का रं?”

बिपीन म्हणाला,“नाही एक जण येणार आहे”.

जागा असताना बिपीनने त्याला बसु दिलं नाही.बस आता पूर्ण भरली होती. काही माणसं उभेच होते. तेवढयात ड्रायव्हरने गाडी चालू केली. बिपीनला वाटले, आता कोणी येणार नाही. तो एकजणाला बसा म्हणणार, तेवढयात त्याला एक सुंदर मुलगी त्याच गाडीकडे येताना दिसली. लाल ड्रेस मध्ये ती खुपच उठुन दिसत होती. रेशमी केस, गौर वर्ण, पाणीदार डोळे, रेखीव शरीर, नाकीडोळी छान, गुलाबी ओठ काय वर्णावे तिचे सौंदर्य…. अहाहा! ती खुपच सुंदर होती. बिपीनला वाटले, ही आता पूर्ण प्रवासात आपल्या बाजूला बसली तर किती बरं होईल. तिला बिपीनच्या सिटशिवाय जागाच नव्हती. ती गाडीमध्ये चढली. तिने एकवार पूर्ण गाडीमध्ये नजर फिरवली,तिला बिपीन शेजारी जागा दिसली. ती जवळ येताच बिपीननेही लगेचच तिला जागा दिली.

आता ती सुंदरी बिपीनजवळ बसली होती. बिपीनच्या मनात आनंदाच्या उकळया फुटत होत्या. भर उन्हाळयात बिपीनच्या मनात पाऊस पडत होता. अन् पडत्या पावसात मन मोराचा पिसारा फुलत होता. पण तो पांढऱ्या टोपीवाला माणसाच्या बिपीनने त्याला मुद्दामच जागा दिली नाही हे लक्षात आले होते. तो माणूस सारखा बिपीनकडे रागाने पाहत होता. पण एवढं चांगलं तजेलदार, टवटवीत, नाजूक, कोमल फुल शेजारी बसलं असताना त्या माणसाकडं कोण लक्ष देईल? त्यामुळे बिपीन मुद्दाम त्या माणसाला टाळत होता.

बस आता बीड शहराच्या बरीच पुढे आली होती. कंडक्टर तिकीट काढत-काढत पुढे येत होता. मध्येच एखाद्या म्हाताऱ्या माणसा बरं हाप तिकीटावरुन भांडण करत होता. एखाद्या प्रवाशा बरं चिल्लर पैशावरुन वाद घालत होता. एका म्हातारीचा अन् कंडक्टरचा वाद शिगेला पोचला. म्हातारीचे सगळे केस पिकून पांढरे झाले होते. अंगावर सुरकुत्या पडल्या होत्या. पाठीत म्हातारी पार वाकून गेली होती. त्यावरुनच म्हातारीचं वय ऐंशीच्या घरात असेल, असा अंदाज लावता येत होता. पण आधार कार्डवर म्हातारीचं वय कमी होतं. त्यामुळे कंडक्टर म्हातारीला फुल तिकीट मागत होता. म्हातारीचं बरोबर होतं अन् कंडक्टरचंही बरोबर होतं. त्यालाही नियमाप्रमाणेच चालावं लागणार होतं. म्हातारीला कुठंतरी जवळच जायचं होतं.तिच्याकडे हाफ तिकीटा एवढेच पैसे होते. एका माणसानं म्हातारीचं फुल तिकीट काढून वाद मिटवला. साप झाडाझुडपातून वाट काढत जसा पुढे जातो, तसाच कंडक्टर माणसांच्या गर्दीमधून वाट काढत बिपीनच्या सिटजवळ आला. त्या सुंदरीनेही पुण्याचंच तिकीट काढलं. बिपीन मनातून खुप खुष झाला. आता पुण्यापर्यंत ती मुलगी त्याच्या सोबत, त्याच्या बाजूलाच बसणार होती. त्यानेही तिकीट काढलं. आता शेजारी बसलेल्या मुलीशी बोलायला कशी सुरवात करावी? याचा विचार तो करु लागला. तेवढयात एक म्हातारी त्यांच्या सिटजवळ आली आणी तिला म्हणाली,

“थोडं बसु दी गं माय, लई गुडघे दुखतेत बघ”.

त्या सुंदरीनं बिपीनकडे पाहिलं. बिपीन काही न बोलताच खिडकीच्या बाजूला सरकून बसला. ती मुलगीही आता बिपीनला खेटून बसली. आणी म्हातारी तिच्या पलीकडून बसली. तो पांढऱ्या टोपीवाला माणूस बिपीनकडं अजूनच डोळे वटारुन पाहु लागला.

थोडया वेळात त्या म्हातारीचं उतरण्याचं ठिकाण आलं. म्हातारी जागेवरुन उठली. लगेच ती सुंदरी बिपीनपासून सरकून बसली. म्हातारी खाली उतरली. बिपीनला वाटलं, म्हातारी पुण्यापर्यंत सोबत असती तर किती बरं झालं असतं. तो चोरटया नजरेने त्या मुलीकडे पाहत होता. ती समोरच पाहत होती. आणी तो पांढऱ्या टोपीवाला बिपीनला डोळे वटारुन पाहत होता. काही तरी बोलावं म्हणून बिपीनने तिला विचारलं, “परीक्षालाच चाललीस का पुण्याला?”

“हो, तु पण परीक्षालाच चाललास का?” असा तिनं बिपीनला उलट प्रश्न केला.

बिपीनला पण तेच पाहिजे होते. तो हो म्हणाला.

तिनं त्याला बोलता-बोलता एक प्रश्न विचारला,

“अरे! या वर्षाची सार्क परिषद कोठे झाली रे? मी वाचलं आहे पण माझ्या लक्षातच येईना.”

आता बिपीनचा तरी कुठं अभ्यास झाला होता. त्याला सार्क परिषदेमध्ये कोण कोणते देश आहेत, याचीही माहिती नव्हती. त्याला मनातच वाटलं अशा सुंदर मुलींसाठी तरी अभ्यास करायला पाहिजे. तेवढयात त्याला त्याने थोडावेळा पुर्वी घेतलेल्या चालु घडामोडी पुस्तकाची आठवण झाली.

तो म्हणाला,“अगं, हो मी पण वाचलयं पण माझ्याही लक्षात येईना. थांब माझ्याकडे पुस्तक आहे.”

असे म्हणून त्याने ते पुस्तक तिच्याकडे दिले. आणी मनातच म्हणाला, आता बघ यात काय बघायचे ते. पण मला काही प्रश्न विचारु नकोस. ती पुस्तक पाहत होती आणी बिपीन तिलाच पाहत होता. तिनं खुपच सुगंधी सेंट मारलेला होता. त्यामुळे तिचा सुगंध येत होता. तिला हवं असणारं उत्तर मिळालं. तिने आणखी बराच वेळ पुस्तक चाळलं. थोडा वेळ अभ्यासाच्या आणी इतर गप्पा मारल्या. बिपीनने स्वत:बद्दल आहे त्याच्यापेक्षा जास्त बढाया मारल्या.

पुढील थांबा जवळ आला होता. आता त्या पांढऱ्या टोपीवाल्या माणसाला पण जागा झाली होती. तो बिपीनच्या शेजारच्याच सिटवर बसला होता. उन्हाळा असला तरी कुठेतरी अवकाळी पाऊस झाला होता. त्यामुळे हवेत गारवा येवून ओल्या मातीचा सुगंध दरवळत होता. गाडी तेथून बाहेर निघताच गार वारा अंगाला झोंबु लागला. गार वाऱ्याच्या झुळकेने तिला झोप आली. तिनं झोपेतच बिपीनच्या खांद्यावर डोकं ठेवलं. वाऱ्याने उडणारे तिचे रेशमी केस बिपीनच्या गालावर स्पर्श करु लागले. आता ती बिपीनच्या खुपच जवळ होती. बिपीन तिचा चेहरा न्याहाळु लागला. तिच्या गोऱ्या गालावर असणारा काळा तिळ म्हणजे तिला कोणाची नजर लागु नये म्हणून देवानं तिला दिलेलं वरदानच असावं. असं त्याला वाटलं. तिचं सौंदर्य इतक्या जवळून पाहणं हा आतापर्यंतचा त्याच्या जीवनातील सर्वात आनंदी क्षण होता. हा क्षण कधीच संपवू नये असं त्याला मनोमन वाटत होतं.

अहमदनगर यायला अजून अर्धा-पाऊणतास वेळ होता. ती निवांत बिपीनच्या खांद्यावर डोकं ठेवून झोपलेली होती. तितक्यात तिला कोणाचा तरी फोन आला. बहुतेक समोरची व्यक्ती तिला, कुठपर्यंत आली आहेस? म्हणून विचारत होती.

तिनं बिपीनला विचारले, “सद्या आपण कुठे आहोत?”

बिपीनने तिला “नगरजवळ आहोत.” म्हणून सांगीतले. तिने तसं त्या फोनवरील समोरच्या व्यक्तीला सांगीतले. आणी फोन ठेवून दिला. नगरचं माळीवाडा बसस्थानक आलं. काही प्रवासी खाली उतरले. थोडयाच वेळात नगरचं पुणे बसस्थानक आलं. तेव्हा आणखी काही प्रवासी खाली उतरले. बिपीन शेजारची ती सुंदर मुलगी खिडकीतून बाहेर पाहत कोणालातरी शोधत होती. तेवढयात एक तरुण गाडीत चढला. त्याला पाहताच तिला खुप आनंद झाला.

तो जवळ येताच ती मुलगी बिपीनला म्हणाली,

“प्लीज तु दुसऱ्या सिटवर बसतोस का?”

बिपीन नाविलाजाने तेथून उठून पांढऱ्या टोपीवाला माणूस बसला होता, त्याच सिटवर बसला. बिपीन त्या दोघांकडे पाहत होता. त्यांच्या हावभावावरुन आणी बोलण्यावरुन त्याला कळून चुकलं की, तो मुलगा तिचा प्रियकर आहे. थोडया वेळापुर्वी ज्याचा फोन आला होता,तो हाच होता.

अगदी काही क्षणापुर्वी कधीच संपू नये,असा वाटणारा प्रवास कधी एकदाचा संपतोय. असं बिपीनला वाटु लागलं. त्या पांढऱ्या टोपीवाल्याचं सुरुवातीपासूनच बिपीनकडे लक्ष होतं. त्याच्याही सर्व प्रकार लक्षात आला होता. काही वेळापुर्वी रागानं बघणारा तो माणूस आता बिपीनकडे हसून पाहत होता. त्या मुलीचा मोबाईल भारीतला होता. बिपीनचा मोबाईल साधाच होता, म्हणून त्याने त्याचा मोबाईल बंद करुन ठेवला होता. आता तिची पर्वा न करताच त्यानं तो मोबाईल बाहेर काढला. आणी सचिनला फोन करुन पुण्याच्या जवळ आल्याचं सांगीतलं. सचिननं त्याला सरळ रुमकडेच ये म्हणून सांगीतलं.

शिवाजीनगर बसस्थानक आलं. सर्व प्रवासी खाली उतरले. ती मुलगी आणी तो तरुणही उतरले. तिनं जाता-जाता एकदाच बिपीनकडं पाहिलं, त्याला तेवढयानेच समाधान वाटलं. तो पांढऱ्या टोपीवाला माणूसही बिपीनकडे पाहून हसतच ‘पुन्हा भेटु’ म्हणून निघून गेला. प्रवासानं बिपीन आधीच थकलेला होता. तो माणूस पुन्हा भेटु का म्हणला असेल? याचाच विचार करत हॉटेलमध्ये चहा घेवून तो सचिनच्या रुमकडे निघाला.

बिपीन सचिनच्या रुमवर आला. त्यानं बेल वाजवली, सचिनने दरवाजा उघडला. आत जातो तर काय? तो पांढऱ्या टोपीवाला माणूस सचिनच्या रुमवरच होता. तो बिपीनकडे पाहूनच हसत होता. बिपीनला लगेचच त्याचे थोडया वेळा पुर्वीचे शब्द आठवले, पुन्हा भेटु.

बिपीनने सचिनला बाजूला घेवूनच विचारले, “हा माणूस कोण आहे?”

त्यावर सचिन म्हणाला, “अरे, ते माझे वडील आहेत”.

बिपीनने सचिनला सगळी हकीकत सांगीतली.आणी म्हणाला, “अरे, तुझे वडील काय जादूगार आहेत का? त्यांना कसं कळलं मी येथेच येणार आहे म्हणून. ते मला कसे म्हणाले पुन्हा भेटु?” सचिनच्याही काही लक्षात आलं नाही.

हातपाय धूवून बिपीन बाहेर आला. सचिनच्या वडीलांच्या नजरेला नजर मिळवण्याची त्याची हिंमत होत नव्हती. कारण त्यानं एक मुलगी आपल्या बाजूला बसावी म्हणून त्यांना बसमध्ये जागा दिली नव्हती. बिपीनच्या मनावर दडपण आल्याचं त्यांच्या लक्षात आलं.

ते बिपीनला हसतच म्हणाले“, “जाऊ दे, होत असतं असं कधी तरी.आम्ही पण तुमच्याच वयातून गेलो आहोत.” त्यांच्या मोकळया बोलण्यानं बिपीनलाही जरा धीर आला.

तो म्हणाला, “काका, तुम्हाला कसं माहीत झालं, मी इथच येणार आहे म्हणून?”

त्यावर सचिनचे वडील म्हणाले,“पुणे जवळ आल्यावर तु सचिनला फोन केला होतास, त्यावेळी तुझ्या मोबाईलवर सचिन भोसले म्हणून मी नाव वाचलं होतं, आणी सचिनही मला म्हणाला होता की, आज माझा एक मित्र पण बीडहून परीक्षासाठी पुण्याला येणार आहे. त्यावरुनच माझ्या लक्षात आलं, सचिनचा मित्र तुच आहेस. आणी तु सचिनच्या रुमवरच येणार आहेस. म्हणूनच मी तुला पुन्हा भेटु असं म्हणालो होतो.”

जेवणं केल्यावर बिपीन झोपला होता. पण त्याला काही झोप येत नव्हती. त्याला परीक्षेची चिंता नव्हती. आयुष्याच्या परीक्षेत नापास झाल्याची चिंता होती. एका मुलीमुळे आपण आपल्या मित्राच्या वडीलांना बसायला जागा दिली नाही. या आजच्या घडलेल्या प्रसंगाने त्याला पश्चाताप होत होता. आजचा प्रवास आयुष्याच्या पुढील प्रवासात त्याला नक्कीच कामी येणार होता.