solo backpacking in varanasi - 10 in Marathi Fiction Stories by Shubham Patil books and stories PDF | सोलो बॅकपॅकिंग इन वाराणसी.... - 10

Featured Books
  • My Devil CEO - 2

    सभी नाश्ता करके अपने काम पे निकल जाते है अक्षत और जसवंत जी क...

  • Love Blossom Devil's Unwanted Wife - 1

    वीरेंद्र प्रताप सिंह , बाड़मेर के हुकुम सा , साक्षात यमराज ,...

  • क्या खूब कहा है...

    कोई ठहर नहीं जाता किसी के भी जाने से यहां कहां फुरसत है किसी...

  • शोहरत का घमंड - 109

    आलिया के आंखों के सामने अंधेरा छा जाता है और उसे कुछ भी समझ...

  • वीर साधना

    वीर  बहुत प्रकार के होते हैं।। जैसे की वीर हनुमान , वीर बेता...

Categories
Share

सोलो बॅकपॅकिंग इन वाराणसी.... - 10

इथली पद्धत अशी आहे की आधी श्री मारूतीरायांचे दर्शन घ्यायचे आणि नंतर मंदिरासमोर असलेल्या कोडंडधारी श्रीराम, लक्ष्मण आणि सीता मातेचे मंदिर आहे, तिथलं दर्शन घ्यायचं. सुमारे अर्ध्या तासाने दर्शन झालं. येथे श्री तुलसीदास स्वामींचा वास असायचा. येथील कंदी पेढे फार प्रसिद्ध आहेत. हे पेढे बघून माला भद्रा मारुतीच्या इथल्या पेढ्यांची आठवण झाली. येथून पुढे मी बनारस हिंदू विद्यापीठाकडे निघालो. गेटकडे जातानाच माहिती मिळाली की अयोध्या प्रकरणी निकाल आपल्या बाजूने लागला आहे.

आज सकाळपासूनच नगरात पोलिस बंदोबस्त प्रचंड प्रमाणात वाढवला होता. निकाल लागल्याचे सर्वांना माहीत होते, पण कुठेही जल्लोष नव्हता की आरडाओरड नव्हती. आपल्या बाजूने निकाल लागल्याचा आनंद फक्त होता. विद्यापीठाच्या गेटबाहेर एक व्यक्ती निकालाच्या आनंदात मिठाई वाटत होता. तो अक्षरशः लोकांना ओरडून हाका मारत होता आणि मिठाई देत होता. निकाल मंदिराच्या बाजूने लागल्याचा मलासुद्धा खूप आनंद झाला होता. याचं कारण धर्मांधता मुळीच नाही. जे सत्य आहे तेच शाश्वत आहे आणि उशिरा का होईना सत्याला न्याय मिळतो याची प्रचिती आली.

विद्यापीठ गेटच्या आत अडीच किलोमीटर अंतरावर बिर्ला मंदिर आहे. यालाच नवीन विश्वेश्वर मंदिर म्हणतात. या मंदिराची निर्मिती बिर्ला ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजने केली आहे. या मंदिराची मूळ संकल्पना बनारस हिंदू विद्यापीठाचा एक भाग म्हणून विद्यापीठाचे संस्थापक श्री मदन मोहन मालविय यांची होती. सभोवताचे उद्यान खूप छान पद्धतीने सजविले आहे. बनारस हिंदू विद्यापीठाच्या आवारात सुमारे नऊ मंदिरं आहेत. विद्यापीठ आवारात भारत कला भवन हे एक इतिहासाची आवड असणार्‍यांसाठी एक मोठे संग्रहालाय आहे. यात लाखांपेक्षा जास्त ऐतिहासिक वस्तू, नाणी, भांडी, दुर्मीळ हत्यारे, प्राचीन दस्तऐवज ठेवले आहेत. संग्रहालयात फिरताना एक तास कधी गेला तेच कळले नाही. सकाळपासून बरेच फिरल्यामुळे प्रचंड प्रमाणात भूक लागली होती. समोरच ओम कॅफे मध्ये छोले - भटुरे आणि कोल्ड कॉफी घेतली. कोल्ड कॉफी फक्त कोल्ड होती. थिक वगैरे नव्हती. इथे माझा थोडा भ्रमनिरास झाला. शांतपणे काही वेळ बसून राहिलो. तिथं निकलच्या बातम्या सुरू होत्या. आता ट्रिपचा शेवटचा टप्पा होता. खूप थकून गेलो होतो, पण थकवा काय रेल्वेतसुद्धा काढू शकणार होतो. हे क्षण पुन्हा जागता येणार नव्हते. त्यामुळे आळस झटकून उठलो आणि मार्गाला लागलो.

आता मला बनारसी साड्या जिथे बनविल्या जातात तिथे जायचे होते. अध्यात्म, पान, थंडाई, स्ट्रीट फूड, गल्ली, मंदिरे, इतिहास, संगीत, संस्कृत यासोबतच वाराणसी तिथल्या सिल्क साड्यांसाठी प्रसिद्ध आहे. मी मदनपुरा या भागात साड्यांचे विणकाम बघण्यासाठी आलो. येथील बहुतांश विणकर मुस्लिम धर्मीय आहेत. हातमाग आणि यंत्रमाग यांचा प्रचंड आवाज होत होता. एका जणाला मी त्यांच्या व्यवसाय आणि दिनचर्येबद्दल विचारले. (मी त्यांचे नाव विचारायला विसरलो.) त्यांचे पुर्ण परिवार या विणकामात मदत करते. म्हातारे वडील हातमागावर सात दिवसांत एक साडी विणतात तर तीच साडी यंत्रमागावर चार तर पाच तासांत होते. इथल्या लोकांचे सर्व कुटुंब हे साड्यांच्या व्यवसायात गुंतलेले असते. पण एक गोष्ट इथे सांगावीशी वाटते की, इथे प्रचंड मोठ्या प्रमाणात हँडलुम आणि इतर मशीन्सचा आवाज अविरतपणे सुरू असतो. त्यामुळे कदाचित इथे येऊन साड्या बनविण्याची प्रोसेस बघणं हे एखाद्याला कंटाळवाणं वाटू शकतं. साड्यांसाठी लागणारे रेशीम जास्तकरून बंगलोरहुन येते. साडीची किंमत ही सुमारे दोन हजारांपासून सुरू होते तर दोन लाखांपर्यंत साड्या उपलब्ध असतात. परदेशी पर्यटकांना या साड्यांनी फार भुरळ घातली आहे. तिथून जवळच असलेली ‘ब्राऊन ब्रेड बेकरी’ गाठली. ही एक जुनी आणि प्रसिद्ध बेकरी आहे. तिथे गार्लिक ब्रेड टेस्ट करून रूमवर आलो तेव्हा चार वाजले होते.

वाराणसीची ट्रिप आता शेवटच्या टप्प्यात होती. रूमवर आलो तेव्हा हॅरीसन आणि सॅम्युअल दुपारीच गेल्याचे समजले. मी देखील चेक-आऊट केले आणि अस्सी घाटावर आलो. लोकांची नेहमीप्रमाणे कामे चालली होती. सात वाजता मला निघायचे होते. शांतपणे अस्सी घाटावरील बाकावर बसलो आणि मागील तीन दिवसांची उजळणी करू लागलो. हा माझ्या प्रत्येक ट्रिपमधला आवडता टप्पा आहे. शांतपणे एका ठिकाणी बसून चिंतन करायचे. “ते दोघं अमेरिकन मित्र मला आयुष्यात कधीही भेटणार नव्हते. पण त्यांच्यासोबतच्या काही तासांनी मला विचार करण्याची एक वेगळी दिशा दिली होती. कितीतरी लोकं या तीन दिवसांत भेटले होते. त्यांच्याशी परत माझी भेट होणार नव्हती. ते तिचाकी सायकलवले काका, राम भंडार वाले राजेंद्रजी, संतमत वाले अनुयायी, पानवाले केशवजी, मला जेवणाचा आग्रह करणारे मराठी लोकं हे सर्व माझे कुणीच लागत नव्हते. मी त्यांना आयुष्यात पहिल्यांदाच पहिलं होतं. पण तरीही ते अगदी जवळचे वाटले. आपल्या कामाव्यतिरिक्त पुढे जाऊन ते काहीतरी वेगळे होते. इथे हिंदू आहेत, मुस्लिम आहेत, नेपाळी, अमेरिकन, स्पॅनिश, आयरिश, रशियन अगदी चिनी सुद्धा. म्हणूनच की काय वाराणसी एक छोटे जग आहे. काळापेक्षाही जुने आणि इतिहासापेक्षा आधी असलेले हे महानगर जगभरातील पर्यटकांना म्हणूनच खुणावत असल्यास त्यात आश्चर्य वाटण्याचे काम नाही. असंख्य वेगवेगळ्या प्रकारची व्यक्तिमत्वे वाराणसीत घडली नव्हे वारणसीने ती घडवली त्यात कलियुगात संन्यासाश्रमाचा उपदेश करणारे श्री नृसिंह सरस्वती स्वामी, संत रामानंद, संत रविदास, गोस्वामी तुलसीदास, संत कबीर, स्वातंत्र्य सेनानी मदन मोहन मालवीय, असंख्य संस्कृतपंडित, लेखक मुन्शी प्रेमचंद, प्रसिद्ध संगीतकार असे असंख्य व्यक्तिमत्त्व आहेत.”

“प्राचीन काळी वाराणसी नगरात ब्रम्हदत्त नावाचा राजा राज्य करत होता..., एके जन्मी बोधिसत्व वाराणसीच्या ब्राह्मण कुळात अवतारीत झाला होता.... लहानपणापासून बोधिसत्वाच्या जातक कथांमध्ये असं वाचत आलो होतो. ही तीच बोधिसत्वाची ‘वाराणसी’नगरी होती.”

“पवित्र गंगा शांतपणे आपल्यासोबत असंख्य जलबिंदू घेऊन समुद्रभेटीला निघाली होती. वर्षानुवर्षे ती अशीच वहात होती. प्राणदायिनी गंगा पावसाळ्यात मात्र संबंध घाट आपल्या अजस्त्र बाहूंनी गिळू पहाते तेव्हा मात्र वाराणसीतील लोकांची त्रेधातिरपीट उडते. मागील वेळी आलो तेव्हा आठ नोव्हेंबरला नोटबंदी झाली होती आणि आज नऊ नोव्हेंबरला अयोध्या निकाल मंदिराच्या बाजूने लागला होता. या ऐतिहासिक घटनांचा मी वाराणसीत होतो हा केवळ विचित्र योगायोग होता. आणि त्या दिवशी मला भारताचा खरा अर्थ समजला. मी आज ज्या ठिकाणांतूनत फिरलो होतो त्यात बहूसंख्य मुस्लिम होते. निकाल त्यांच्या विरोधात लागला होता. तरीही शांतता होती. दोनचार दिवसांवर ईद येऊन ठेपली होती. मुस्लिम बांधवांची रोषणाई आणि सजावट चालली होती. हाच तो खरा एकसंध भारत होता. सर्वांना सामावून घेणारा.” असो,

साडेपाच झाले होते आणि मी वरच असलेल्या पिझ्झेरिया वाटिका कॅफे मध्ये गेलो. हा वाराणसीचा एक प्रसिद्ध कॅफे आहे. तिथला सर्वांत जुना कॅफे म्हणून या कॅफेला ओळखले जाते. १९९२ साली स्थापन झालेल्या कॅफेत एक वेगळाच अनुभव येतो. संध्याकाळी या कॅफेमध्ये जाण्याची वेगळीच मजा असते कारण समोरच गंगा वहात असते आणि विद्युत रोषणाई मुळे परिसर देखावा फार सुंदर असतो. म्हणजे आपल्या एका कानाला कॅफेतलं जॅझ संगीत ऐकू येतं आणि दुसर्‍या कानाला गंगा आरती. समोरची गंगा आणि डिशमधलं अप्रतिम अन्न. स्वर्गसुख वगैरे म्हणतात ते हेच असावे बहुतेक. तिथे एक Apple Pie + Ice cream ऑर्डर केले. गरम आणि थंड यांचे मिश्रण असलेला तो पदार्थ मला खुप आवडला. Apple Pie + Ice Cream ही त्यांची खासियत आहे. काही वेळ तिथं बसण्याची इच्छा होती, पण आता वेळ नव्हता. बिल चुकते करून निघालो आणि घाटावर एक नजर फिरवली. सर्व वाराणसी आठवण्याचा प्रयत्न केला कारण नंतर आठवण्यासाठीसुद्धा वेळ भेटणार नव्हता. रिक्षास्टॉप वर आलो आणि परत एकदा, "वाराणसी जंक्शन चलोगे ?"